Skip to main content

मिपावरची दर्जेदार लेखनाची उदाहरणे.

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 31/08/2010 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
दर्जेदार लेखन म्हणजे काय? हा अत्यंत गहन प्रश्न आहे. चांगल्या लेखनाची व्याख्या करताना भल्याभल्यांची दमछाक होते. कारण काहीही व्याख्या केली, तरी उत्कृष्ट लेखन ती व्याख्या छेदून दशांगुळे वर उरतंच. मग ते सामावून घेण्यासाठी पुन्हा व्याख्या बदलायची आणि पुन्हा पुढची दहा अंगुळं पसरणारं काहीतरी सापडलं की ये रे माझ्या मागल्या सुरू होतं. पण कधी कधी चांगलं लेखन म्हणजे काय, याचं उत्तर अश्लील म्हणजे काय याला एकाने दिलेल्या उत्तराप्रमाणे होतं "चांगलं लेखन म्हणजे काय हे मला सांगता येणार नाही, but I will know it when I see it". आपल्यापैकी बहुतेकांना हा आतला आवाज असतो - जो चांगल्या लेखनाला दाद देतो. मग भले त्याचं विश्लेषण करून सांगता का येईना. पुरणपोळी तोंडात ठेवल्यावर विरघळली म्हणजे ती मस्त जमली - ती कशी करायची, ती कशामुळे विरघळते हे प्रत्येकाला सांगता येईलच असं नाही. मला विशेष आवडणाऱ्या लेखनाची वैशिष्ट्य अशी - सरळसाधं, अनुभूतीतून आलेलं, मनाला भिडणारं, वाचकाला नव्या विश्वात अलगदपणे घेऊन जाणारं.... मला माहीत आहे, ही उत्तरं नाहीत. कारण यात पुन्हा मनाला भिडणारं म्हणजे काय असा प्रश्न विचारता येईल. त्याचं उत्तर द्यायचं मी अर्थातच टाळलेलं आहे. मला कविता आवडतात, त्याही अवडंबर न माजवणाऱ्या, सहजसुंदर, ओघवत्या. विनोदी लिखाण आवडतं - तेसुद्धा ओढाताण न करता सहजी फुललेल्या विनोदांचं. कधीकधी अतिशय क्लिष्ट, तांत्रिक, सुरचित लेखनही आवडतं. प्रचंड सोफिस्टिकेटेड विनोदही आवडतात. मला काय आवडतं हे लिहायला लागल्यावर माझ्याच लक्षात यायला लागलंय की चांगलं म्हणजे काय हे जाऊचदेत, मला चांगलं काय वाटतं याचं वर्णन करणंही अवघड आहे. त्यामुळेच या लेखात मांडलेल्या 'दर्जेदार लेखन म्हणजे काय?' या प्रश्नाच्या रटाळ, तांत्रिक उत्तरापेक्षा वाचकांनी मिपावरची उत्कृष्ट लेखनाची उदाहरणं द्यावीत असं मी आवाहन करतो आहे. यामागे अनेक उद्देश आहेत. एक म्हणजे गेले काही आठवडे मिपावर जे लेखन येतं आहे त्यात दुर्दैवाने फुटकळ कौल, चारोळींचे काथ्याकूट, भंपक व भडक लेखन यांची उदाहरणं मला नेहेमीपेक्षा जास्त दिसली आहेत. त्यात गेल्या काही महिन्यात मिपाची सदस्य संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. इतक्या मोठ्या (नवीन) वाचकवर्गाला मिपावर केवळ फालतू लेखन व टाईमपास होतो अशी कल्पना होणं व्यक्तिश: मला पसंत नाही. मिपावर मी अनेक चांगले लेख, कविता, चर्चा, विडंबनं वाचलेली आहेत. गेल्या काही दिवसांतलं लेखन हे नियम नसून अपवाद आहे हे दाखवण्यासाठी आधीचं चांगलं लेखन नवीन वाचकांना बघायला मिळालं तर बरं होईल असं मला वाटतं. दुसरा उद्देश असा की मी नवीन व जुना यांच्या कुठे तरी मध्ये आहे. त्यामुळे मी सदस्य व्हायच्या आधी मिपावर झालेल्या उत्तमोत्तम लेखनापैकी बरंच मीदेखील वाचलेलं नाही. जर जुन्या व जाणत्या सदस्यांनी आपल्या वाचनखुणा उघडून त्यातलं आवडतं लेखन सादर केलं तर मलाही अनेक चांगलं लिखाण वाचायला मिळेल. तिसरा हेतू असा की या चर्चेला मिळालेल्या प्रतिसादांतून मिपावरच्या उत्तम लेखनाची एक लायब्ररी तयार व्हावी. मग जेव्हा केव्हा त्याज्य लेखन दिसेल तेव्हा हा धागा उघडून त्यातल्या आपल्या आवडत्या लेखनाला प्रतिसाद देऊन चांगले धागे वर काढून गाळ तळात बसवण्याची क्षमता सदस्यांमध्येच येईल. मी अशी विनंती करतो की प्रतिसाद देताना प्रथम आपल्याला आवडलेल्या लेखनाचे, कवितांचे, चर्चांचे (तीन ते चार) दुवे द्यावेत. जर कोणी एखाद्या लिखाणाचा दुवा दिला असेल तर तो परत देऊ नये - जितके अधिक दुवे मिळतील तितकं चांगलं. शक्यतो कविता, विडंबनं, लेख, कथा, चर्चा, पाककृती, कलादालन अशा वेगवेगळ्या विभागांमधला एक एक दुवा द्यावा. (दुवा ठळक व अधोरेखित करावा) मग त्याखाली अगदी मोजक्या वाक्यांत ते का आवडलं हे नोंदवावं. सुरूवात मी करतो कथा : शिंपिणीचे घरटे - रामदास कविता : समर्थ - क्रान्ति लेख/चर्चा : कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे - धनंजय शिंपिणीचे घरटे या कथेत शिंपीण पक्षी धागा धागा जुळवून घरटं उभं करते त्याप्रमाणे जिद्दीने घर आपल्या पायांवर - शिवणयंत्राची पायपट्टी चालवत अक्षरश: - उभं करणाऱ्या आईची कहाणी आहे. ती पूर्ण वाचल्याशिवाय तिची धार जाणवत नाही. समर्थ कवितेत अतिशय सहजपणे कवयित्रीने आपल्या कवितेचं मागणं, गाऱ्हाणं सांगितलं आहे. अशा फार थोड्या कवितांपैकी आहे की ज्या पहिल्या वाचनातच पाठ होतात, ओठावर रेंगाळतात. कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे हा लेख म्हणून आलेला आहे. पण तो आत्मानुभव आहे. खूप खोलवर काही साठलेलं एकदम मोकळं केल्याचा प्रत्यय येतो. तो लेख असला तरी त्यावरची चर्चासुद्धा वाचण्याजोगी आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32964
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

आम्हाला दिलीप बिरुटे सर यांचे लेखन आवडते. साधे आणि सोपे असते. त्यांनी उपक्रमावर मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल सुरेख लेख लिहिला होता. त्यातून खूप नवीन माहिती मिळाली होती. येथे त्यांनी कुणा रावाची खिल्ली उडवणारा भन्नाट लेख लिहिला होता तो अनेकांच्या लक्षात असेल. या शिवाय आपले 'सहज' अवघड विषयांना हात घालण्यात वाकबगार आहेत. त्यांच्या लेखनाचेही आम्ही चाहते आहोत. पण हल्ली यांचे लेखन दिसत नाही. मिभो भारी लिहायचे आणि चर्चा करायचे पण हल्ली एकोळी व्रतामुळे पार पेन्शनीत निघाल्या सारखेच लिहित असतात! विकास, चित्रा, राजेश घासकडवी, धनंजय, मुक्तसुनित, स्वाती दिनेश, नंदन, प्रियाली, इन्द्र्राज पवार, मितान, केशवसुमार, छोटा डॉन आणि कोलबेर या सोबत इतरांचेही लेखन आवडते. नगरीनिरंजन यांचा हल्लीच आलेला लेख हे खुसखुशीत लेखन कसे करावे याचा नमुनाच आहे. धनंजय हल्ली का लिहित नाही हे कळले नाही. बहुदा कार्यबाहुल्य असावे. प्रतिसाद या बाबतीत कापूसकोन्ड्या यांची सहमत. आवडलेला प्रतिसादक म्हणजे टारझन उर्फ कुबड्या खविस.क्षणभरच टिकणारी पण टारगट सही त्यानेच करावी. लेखन करतांना, आपण काय लिहित आहोत, हे किमान एकदा वाचून तरी पाहिले पाहिजे ही माफक अपेक्षा नव्या लेखकांकडून आहे.

"लेखन आवडते" या गटात माझ्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. हा विश्वास अनाठायी असणार नाही याची काळजी मी निश्चितच घेत राहीन. "....आपण काय लिहित आहोत, हे किमान एकदा वाचून तरी पाहिले पाहिजे..." हे मी कटाक्षाने पाळतो....निव्वळ लेखनातील भावासाठीच नव्हे तर, शुद्धलेखनासाठीही. एखाद्याच्या लेखनातील मुद्दा कितीही भावला तरी जर लिखाण अशुद्ध असेल तर मी पुनश्च त्या पृष्ठाकडे जात नाही. "ऊस डोंगा परी रस नाही डोंगा..." हे जरी खरं असलं तरी इथे असणारे सदस्य शिक्षणाच्याबाबतीत 'डोंगा' नसल्याने लिखाणातील अशुद्धता माफ करता येण्यासारखी गोष्ट नाही....(अर्थात हे वैयक्तिक मत आहे.) इन्द्रा

विसोबा खेचर, श्रावण मोडक, रामदास, राजेश घासकडवी, संजोपराव, परा, टारझन, केसु, पिडा, बिपिन कार्यकर्ते, अडगळ, विलासराव, काळे काका, प्राजु, इन्द्र्राज पवार... यादी लै मोठी हाय हे आनी ह्यांच्यासारखे झकास लिहिनारे मिपा सोडुन मराठी आंतरजाळाव एकत्र कुठच न्हायत! ह्यो सर्वांना आमचा दंडवत! अवांतरः ते टारोबा कुठशिक आसत्यात सध्या?

हा धागा वरती काढून मधल्या काळातील दर्जेदार लिखाणे या निमित्ताने सगळ्यांनी सांगावीत म्हणून हा प्रतिसाद देते आहे.

धागा वरती काढल्या बद्दल आभार! साधारणता, २०१० च्या शेवटी मिपा वर आल्याने ह्या धाग्या मुळे दिलेले सर्व लिखाण तेंव्हाच वाचल्याने मिपा बरोबर नाते घट्ट झाले होते.. त्या पुढील(२०१० नंतर चे )आवडलेले लिखाण आणि त्यांच्या लिंक्स लवकरच देतो...

गेल्या पाच वर्षांत वाचल्या गेल्या साहित्यिकांपैकी हमखास वाचनीय.... प्रचेतस,किल्लेदार, चक्कर बंडा,गारगोवलेकर,प्राची अश्विनी,समर्पक,नागनिका ,पाकपद्म भक्ती,टर्मिनेटर, भागो आणी इतर अनेक. वरिष्ठ म्हणू की जुन्या जाणत्या म्हणू, "रोशनी",तात्या,मी दिपाली,धन्या,केशवसुमार,,संजोपराव,बिपीन कार्यकर्ते आणी इतर काही. ज्यांचे लेखन आवडले,प्रतिसादले पण वयापरत्वे लक्षात न राहीले त्या सर्वांचेच मनापासून आभार. एकंदरीत, माझा पिंड वाचनाचा ,लेखकाचा नाही पण मिपा करांनी सांभाळून घेतल्यामुळे थोडीफार वटवट केली.