पितृपक्षातली स्वप्नं, योगायोग व श्रद्धा
डिस्क्लेमर - या लेखांत श्रद्धांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना अशी चिकित्सा केलेली मुळात आवडत नाही, किंवा अशा चिकित्सेने त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं वाटतं त्यांनी हे लेखन वाचू नये. ज्यांना अशा डिस्क्लेमरची गरज वाटत नाही, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे.
आपला एखाद्या गोष्टीवर विश्वास कसा बसतो? एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर 'अनुभवातून' असं म्हणता येईल. अगदी अडीच वर्षाच्या मुलालासुद्धा 'ब्लेडला हात लावू नकोस, त्याने लाल बाऊ होतो' हे सांगून, त्याच्याकडून दहावेळा वदवून घेतलं तरी त्याचा हात ब्लेडवरून फिरायला शिवशिवतोच. प्रत्यक्ष कापून रक्त वाहताना दिसल्याशिवाय व बोटाला बाऊ झाल्याशिवाय त्याचा विश्वास बसत नाही. (हे आमच्या घरी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. अनुभव आहे!) अनुभवातूनच आपण 'त्याच्याकडनं आम्ही आधी रतीब लावला होता, पण तो खूप पाणी घालतो दुधात. आता दुसऱ्याकडून दूध घेतो, त्याचं दीडपट लोणी येतं' वगैरे उपयुक्त गोष्टी शिकतो. हेच जर आपल्याला कोणी आधी सांगितलं असतं तर आपला विश्वास बसला असताच असं नाही. प्रत्यक्षात मोठा लोण्याचा गोळा बघितल्यावर जी खात्री पटते ती खरी.
पण अनुभव हा शब्द फारच अघळपघळ आहे. अघळपघळ म्हणण्याचं कारण असं की काही अनुभव तर्काच्या कसोटीवर मोजून पहाता येतात, तर काही इतके वैयक्तिक असतात की (सध्या तरी) मोजून पहाता येत नाहीत. म्हणजेच काही वस्तुनिष्ठ असतात, तर व्यक्तिनिष्ठ असतात. वर दिलेला अनुभव हा अर्थातच वस्तुनिष्ठ आहे. तो लोण्याच्या गोळ्याच्या आकारात मोजता येतो. तत्वतः त्या दोन गवळ्यांकडचं दूध आणून त्यावर काही निरीक्षणं करून किती लोणी येणार हे आधीच सांगता येतं. याउलट सूर्यास्ताच्या सौंदर्याचा अनुभव व्यक्तिनिष्ठ आहे. म्हणजे तो कुठच्याच स्वरूपात मोजताच येणार नाही असं नाही, पण ती मोजमाप करण्यासाठी व्यक्तीच्या अंतरातच डोकवावं लागतं (किती सुंदर वाटला ते सांग, असा प्रश्न विचारून वगैरे...)
पण हे वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ असे दोन नेटके खण नेहेमीच असतात असं नाही. कधी कधी काही साध्या नैसर्गिक घटनांतून, योगायोगाने लागणाऱ्या संगतींमुळे काहीतरी दिव्य अनुभव आल्याची प्रचीती येते. तेव्हा दिव्यत्वाच्या दुधापासून योगायोगाचं पाणी वेगळं करण्याचा हा प्रयत्न.
नुकतीच मिपावर पितृपक्षात सापांची, कावळ्यांची अथवा पितरांची स्वप्नं दिसण्याबद्दल चर्चा झाली. त्यात अशी स्वप्नं पितृपक्षातच का पडावीत हा प्रश्न आला. ज्या व्यक्तींना अशी अनेक स्वप्नं पितृपक्षात पडतात त्यांची या बाबतीत 'माझे पितर मला स्वप्नांतून संदेश देत आहेत' अशी श्रद्धा होणं स्वाभाविक आहे. पण यामागे केवळ योगायोग असू शकेल का? किंवा वेगळ्या प्रकारे हाच प्रश्न विचारायचा झाला, तर पितर स्वप्नातून संदेश नसतानाही काही लोकांना नेमकी पितृपक्षातच अशी स्वप्नं पडतील का?
हे जाणून घेण्यासाठी मी एक कौल घेतला - सर्वसाधारणपणे पितरांशी संबंधित असलेली चिह्नं किती वेळा स्वप्नात दिसतात, हे तपासून पहायला. त्यावरून असं दिसून आलं की कौलात भाग घेतलेल्या सरासरी व्यक्तीला आत्तापर्यंतच्या आयुष्यात सुमारे 12 वेळा अशी चिह्नं दिसलेली आहेत. हा अर्थातच काटेकोर वैज्ञानिक पद्धतीने घेतलेला कौल नाही. पण एक सर्वसाधारण अंदाज यायला त्यातून मदत होते. म्हणजे हा आकडा 1200 नसावा, अथवा 1-2 इतका लहान नसावा इतपत यातून कळतं. तसंच या गणितासाठी सरासरीचं प्रमाण वापरणं कितपत योग्य ठरेल हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. कारण मिळालेलं वितरण (डिस्ट्रिब्यूशन) हे नॉर्मल डिस्ट्रिब्यूशन नव्हतं. पण तूर्तास सर्व समाजाविषयीचे निष्कर्ष बाजूला ठेवून आपण तो सरासरीचाच आकडा वापरू. म्हणजे इथे काढलेले निष्कर्ष ज्यांना बरोब्बर बारा स्वप्नांत अशी चिह्नं दिसली आहेत अशांना तंतोतंत लागू होतील. ज्यांना कमी वा अधिक स्वप्नं पडतात अशांसाठीचे आकडे कमी अधिक होतील, मात्र युक्तिवाद तोच राहील.
गृहीतक - स्वप्नात दिसणारी चिह्नं कधी दिसतील हे सांगता येत नाही. पितृपक्षातच ती दिसतील असं नाही. ती यदृच्छेने कधीही दिसू शकतील.
माहिती - काही लोकांना प्रत्येकी 12 स्वप्नात अशी चिह्नं दिसलेली आहेत.
सोयीसाठी आपण 24 पंधरवडे धरू. म्हणजे ही 12 स्वप्नं 24 पंधरवड्यांमध्ये अनेक लोकांसाठी विभागली गेली तर बऱ्याच लोकांना पितृपक्षात एक स्वप्न पडलेलं असणं साहजिक आहे. प्रश्न असा आहे की एखादं स्वप्न पडलं तर ते लक्षात राहीलच असं नाही, किंवा विशेष वाटेलच असं नाही. तेव्हा अधिक स्वप्नं पडण्याची शक्यता काय? तर त्याचं उत्तर आहे की सुमारे 1.3% लोकांना तीन किंवा अधिक स्वप्नं पितृपक्षातच पडतील. तीन किंवा अधिक स्वप्नं नेमकी पितरांची आठवण काढण्याच्या वेळी पडली तर एखाद्याला कदाचित वाटेल की अरे हो, मला असली स्वप्नं पितृपक्षातच पडतात.
पण हे झालं बरोब्बर 12 स्वप्नं पडणाऱ्यांविषयी. जर जास्त स्वप्नं पडत असतील तर त्यातली तीनपेक्षा अधिक - कदाचित 5-6 स्वप्नंदेखील पितृपक्षात पडू शकतील हे उघड आहे. समजा जर 5 किंवा अधिक स्वप्नं पितृपक्षातच पडली तर त्यांना 'मला जवळपास प्रत्येक पितृपक्षात सापाचं किंवा पितरांचं किंवा कावळ्याचं स्वप्न पडतं' हे खूपच ठामपणे म्हणता येईल. ज्यांना 50 स्वप्नं आत्तापर्यंत पडलेली आहेत अशांसाठी हा आकडा 5% इतका येतो. म्हणजे केवळ योगायोगामुळे अशा पॉप्युलेशनमधले पाच टक्के लोक विश्वास ठेवू शकतील की 'यात काहीतरी लपलेला अर्थ आहे खरा.' आणि हे केव्हा, तर आपल्या गृहीतकाप्रमाणे स्वप्नात दिसणारी चिह्नं कधी दिसतील हे सांगता येत नसताना.
एकदा असे लपलेले अर्थ शोधायला लागलं की मग अनेक संबंध डोळ्यासमोर येतात. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी (किंवा दोनच दिवस आधी, किंवा तीनच दिवस आधी...), परीक्षेच्या आधी मी आजारी होतो तेव्हाच नेमकं, मी ट्रिपला जायच्या आधल्या रात्री (नंतर तिथे अपघात झाला), माझी आर्थिक परिस्थिती वाईट होती तेव्हा (त्यानंतर लगेचच सुधारली)... अशा अनेक संगती योगायोगाने जुळवता येतात. कारण वर्षाच्या प्रत्येक दिवशी काही ना काही होत असतंच. तसं केलं तर या 1.3 ते 5 टक्क्यांपेक्षा कितीतरी अधिक लोक स्वप्नांमध्ये काहीतरी अद्भूत आहे असा विश्वास ठेवू शकतात. आणि अशा विश्वासापुढे तर्क चालत नाही. ती श्रद्धा बनते. कारण ती खोलवर असलेल्या आत्मानुभवातून आलेली असते.
पितृपक्षात पडणारी स्वप्नं - व त्यातून निर्माण होणारे विश्वास ही फक्त श्रद्धा मूळ धरण्याची एक पद्धत झाली. अमुक गुरूने दिलेली अंगठी, लहानपणी आईने शिकवलेला संकटप्रसंगी म्हणण्याचा श्लोक, कायम वापरण्याचा लकी शर्ट, अशा अनेक गोष्टींतून टक्क्या टक्क्यांनी लोक श्रद्धावान होतात. मी आधी एका लेखात निव्वळ नशीबाने 15% लोकांना बाबागिरीवर कसा विश्वास बसू शकतो ते दाखवलं होतं. वरची उदाहरणं त्याच जातकुळीतली. फक्त इथे आपल्याला मुद्दामून फसवणारा कोणी नसतो. आपणच यदृच्छेने दिसलेल्या काही आकारांमधून अर्थ काढतो. व एका अर्थाने स्वतःच स्वतःची फसवणूक करतो. अशी फसवणूक करून घेणारे सुखी आयुष्य जगतात, कदाचित. पण कधी कधी जैत रे जैत मधल्या नायकाप्रमाणे ते गरज नसताना राणीमाशीच्या मागे लागतात आणि तिला मारण्यापोटी आपल्या पत्नी व भावी बाळाचा बळी देतात.
मुळात 'स्वप्नात दिसणारी चिह्नं कधी दिसतील हे सांगता येत नाही. पितृपक्षातच ती दिसतील असं नाही. ती यदृच्छेने कधीही दिसू शकतील.' हे आपण गृहीतक म्हणून मानलं. योगायोगाने काही लोकांना ती पितृपक्षातही आधिक्याने दिसतील असा निष्कर्ष आपण काढला. मग योगायोग व खरोखर पितरं स्वप्नं पाडतात यापैकी कुठचं स्वीकारावं? इथे ऑकॅमचा वस्तरा कामी येतो - जी निरीक्षणं काहीच विशेष गृहीत न धरता समजून घेता येतात त्यासाठी क्लिष्ट गृहितकं का अंगावर घ्यावीत?
दिव्यतेच्या दुधातून योगायोगांचं पाणी काढून टाकण्याचा हा प्रयत्न. पण सगळं पाणी पिळून काढलं तर काय शिल्लक राहील असाही प्रश्न पडतो. शेवटी कधीतरी, कुठेतरी त्या दुधातून मोजता येण्यासारखा लोण्याचा गोळा यायला हवा. नाहीतर अश्वत्थाम्याला पाण्यात मिसळून दिलेलं पीठच हाती यायचं.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमचा तो लेख मी तेव्हाच वाचला
संख्याशास्त्र.............
रूमाल
कालच 'फिल्मी' वर
फार सुरेख लेख
गृहीतक - स्वप्नात दिसणारी
मनी वसे ते स्वप्नी दिसे..
तुमचे स्पष्टीकरण
रोचक, अभ्यासपूर्ण
काहीच कळले नाही बॉ. आमचे
थोडा खुलासा
कौल पाहिला होता तेव्हाच या
लेख काहिही समजला नाही
तर्कसंगती
इंद्रदा रोजच्या रोज हे येवढे
गार गार वाटले कल्पनेने...
अहो पवार, त्या बँकेतल्याच
बदली होईल.
नीरक्षीरविवेक
प्रत्येकाला पडलेलं स्वप्न हे
या स्वप्नांचा कधी अभ्यास केला
अभिनंदन!
धन्यवाद चित्रा
संख्याशास्त्रातले गणित कळलेले नाही
एक तर लेख काय कळलाच नाय..अन
सवडीने