Skip to main content

असा कसा हा पेपरवाला!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 17/09/2010 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही या नव्या भागात राहायला आलो त्यासरशी आमच्या शेजारच्या आजीबाईंनी दुसऱ्याच दिवशी दार ठोठावले. पाठीची पार धनुकली झालेली, अंगावर सुरकुत्यांचे जाळे, डोईवर पदर अशा त्या नऊवारी नेसलेल्या आजीबाई दारातूनच म्हणाल्या, "तुमाला पेपर लावायचा आसंल तर माज्याकडनं घ्यावा. माझी एजन्सी हाय. " त्यांच्याकडे काही क्षण थक्क होऊन पाहिल्यावर आमच्या मातुःश्रींनी भारल्यागत होकारार्थी मुंडी हलविली आणि म्हातारबाईंच्या पेपर एजन्सीचा माणूस रोज दारात पेपर टाकू लागला. बघता बघता वर्ष लोटले. एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की ह्या भागात, खास करून आम्ही जिथे राहतो त्या गल्लीत असे अनेकजण पेपर एजन्सी चालवितात. आमच्या इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेत भल्या पहाटे वर्तमानपत्रांचा टेम्पो दे दणाद्दण वर्तमानपत्रांचे गठ्ठे टाकून जातो. मग पहाटे चार वाजल्यापासून सॉर्टर्स येऊन त्यांचे वर्गीकरण करतात. साडेपाच-सहा च्या दरम्यान पेपर टाकणारी मुले आपापल्या सायकल्स, बाईक वरून ही वर्तमानपत्रे घरोघरी टाकायला घेऊन जातात. हे काम एवढे शिस्तीत चालते की गल्लीच्या कुत्र्यांना पण ह्या लोकांची सवय झाली आहे. तर अशा परिस्थितीत आम्हाला अगदी घरबसल्या विविध पेपरवाल्यांचा सहवास मिळत होता. दररोज पहाटे साखरझोपेची दुलई बाजूला सारून नित्यकर्माला लागण्यासाठी ह्या पेपरवाल्यांच्या आवाजाचा, त्यांच्या गप्पांचा , त्यांच्या मोबाईलवरून केलेल्या संभाषणांचा फार फायदा होई. आमच्या पहिल्या मजल्यावरच्या घरात त्यांच्यापैकी कोणी शिंकले तरी खणखणीतपणे ऐकू येई. आजीबाई सर्व पेपरवाल्यांची वर्दळ संपली की इमारतीच्या दारातच सकाळची कोवळी उन्हे खात एका तरटावर बसून पेपर विकायला सज्ज होत असत. शिवाय त्यांची नजर चौफेर असे.... त्यामुळे कोठे काय चालले आहे ह्याची बऱ्यापैकी खबर त्यांना लागलेली असे. एक दिवस आजीबाई अचानक आजारी पडल्या. एक-दोन महिन्याचे हॉस्पिटलाचे दुखणे झाले आणि आजीबाईंची प्राणज्योत मावळली. त्यांच्या घरच्यांनी पेपर एजन्सी बंद करण्याचा निर्णय घेतला. दुसरेच दिवशी आमच्याकडे अजून एक पेपर एजंट आला. (ह्या एजंटांना कसा सगळा पत्ता लागायचा कोणास ठाऊक! ) चांगल्या झुबकेदार मिशा, कपाळाला टिळा, अंगात शर्ट -पँट, काखोटीला चामड्याची बॅग, पायात वहाणा अशा वेषातला हा एजंट बोलण्यावरून शिकलेला वाटला. झाले! त्याने दुसऱ्या दिवशीपासून पेपर टाकायचे ठरले. त्याच्या भेटीत त्याने सांगितले होते की तो रीयल इस्टेट एजंटपण आहे, दुधाचा ही धंदा आहे इत्यादी इत्यादी. खरे तर आपल्या पेपरवाल्याची कोण एवढी चौकशी करतो! पण त्याने आपण होऊनच ही माहिती दिली. त्या नंतर सुरू झाला एक मजेदार अनुभव! आमच्या मातुःश्रींचे व पेपर टाकायला येणाऱ्या मुलाचे वारंवार खटके उडू लागले. कधी तो दाराच्या बाहेर कोणीही उचलून न्यावा अशा पद्धतीने पेपर टाकत असे तर कधी त्याला उशीर होत असे. मातृदैवताला सकाळी साडेसातच्या आत वर्तमानपत्र वाचण्याची सवय असल्याने तिला हा उशीर जराही खपत नसे. मग काय! आई तो यायच्या वेळेला दबा धरूनच बसत असे आणि तो अवतरला की त्यांची किरकोळ हुज्जत रंगत असे. मग एक दिवस कंटाळून आईने त्या पेपर एजंटचा फोन नंबर धुंडाळून थेट त्याच्याकडेच तक्रार केली. दुसऱ्या दिवसापासून आमचा पेपर वेळेत येऊ लागला, दारात लोळत पडण्या ऐवजी कडी-कोयंड्यात खोचला जाऊ लागला. पण मग त्या महिन्यापासून पेपरचे बिल येणेच बंद झाले. आमच्या पांढरपेशा मनांना ही गोष्ट सहन होणारी नव्हती. अशी उधारी ठेवायची म्हणजे काय! आपल्याला अशा गोष्टी जमत नाहीत आणि ती वस्तुस्थिती आहे! अखेर रात्रीच्या निवांत झोपेचा प्रश्न आहे, राव! आपण कोणाचे देणे लागतो ह्या विचारानेदेखील आमची झोप उडते. तर अशा आमच्या ह्या वर्तमानपत्राचे बिल घेण्यास उदासीन पेपर-एजंटला आईने अनेक निरोप धाडले, फोन केले. त्याचे उत्तर ठरलेले, "ताई, काय घाई आहे! घेऊ की निवांत बिल, कुठं पळून का जातंय... " त्याच्या अशा उत्तरांनी आम्ही अजूनच अस्वस्थ होऊ लागलो. दरम्यान येथील रीयल इस्टेट वाल्यांचे राजकारणी व गुंडांशी असलेले संबंध कोणीतरी मोठ्या अक्कलहुशारीने आमच्या कानी घातले होते. मग तर काय! आम्हाला दरदरून घाम फुटायचाच काय तो शिल्लक राहिला. न जाणो हा पेपर एजंट कोणत्या गँगचा माणूस असला तर? तो उद्या-परवा कर्जवसुलीसारखी दारात माणसे घेऊन उभा ठाकला तर? निरनिराळ्या हिंदी पिक्चर्समधील असे गावठी गुंड, त्यांची दहशत वगैरे सीन्स आमच्या चक्षूंसमोर तरळू लागले. घरापासून पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर एक खाटिकखाना आहे. तिथे घेऊन जाणाऱ्या बकऱ्या, बोकडांमध्ये आम्हाला आमचे चेहरे दिसू लागले. शेवटी आम्ही गृह-सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला.... पेपरवाला बदलायचा.... आमच्याकडे पेपर टाकणाऱ्या पोराकडे निरोप दिला. तो तर हसायलाच लागला. झाले! आमच्या छातीचे ठोके चुकले. दुसऱ्याच दिवशी त्या पेपर एजंटचा फोन आला.... "ताई, काय नाराज आहात का आमच्यावर? जाऊ की घेऊन बिलाचे पैसे निवांत! तुम्ही नका काळजी करू!" (त्याने सबंध वर्ष बिलाचे पैसे घेतले नव्हते!) पण आमचा निर्णय ठाम होता. एकतर बिलाचे पैसे घे, नाहीतर पेपर टाकणे बंद कर. आम्ही दुसरा पेपरवाला शोधतो. काहीसे कुरकुरतच त्याने फोन ठेवून दिला. पुढचे दोन दिवस पेपर आला नाही. एरवी सकाळी सकाळी पेपर दृष्टीस पडला नाही की अस्वस्थ होणारी आमची आई कधी नव्हे ते पेपर आला नाही म्हणून आनंदात होती! दोन दिवसांनी शेजारील फ्लॅटमध्ये पेपर टाकणाऱ्या नव्या पेपर-एजंटला सांगून पुन्हा आमच्याकडे पेपर सुरू झाला. त्या आधीच्या पेपरवाल्याने अजूनही बिल दिले नव्हते व बिलाचे पैसेही नेले नव्हते. वाटले, लवकरच तो बिलासकट हजर होईल. पण छे! तिसऱ्या दिवशी त्याच्या पेपर टाकणाऱ्या मुलाने आधीप्रमाणे पुन्हा आमच्याकडे पेपर टाकायला सुरुवात केली. जणू काही मधल्या काळात काहीच घडले नव्हते! आता मात्र अती झाले होते. एकाच वेळी घरात दोन-दोन पेपर एजंट्सकडून पेपर येत होते! पुन्हा एकदा आमची गोलमेज बैठक झाली. दुसऱ्या दिवशी आई पेपरवाल्याच्या प्रतीक्षेत दबाच धरून बसली. तो आल्यासरशी त्याला 'का टाकतोस आता पेपर? ' म्हणून फैलावर घेण्यात आले. त्यावर तो मुंडी हालवत, हसत 'तुम्ही आमच्या मालकांनाच विचारा' असे म्हणून खांदे उडवित निघून गेला....!!!!! मालक अर्थातच फोनवर उपलब्ध झाले नाहीत! आता रोज आम्ही दोन-दोन पेपर्स चा संशयी मनाने आनंद लुटतो. कदाचित आमचा आधीचा पेपर एजंट येईल, बिलाचे पैसे घेईल, कदाचित घेणारही नाही. आमच्या दमल्या थकल्या मनांनी त्याच्या वागण्याचे कोडे उलगडविण्याचे तूर्तास रहित केले आहे. रात्री झोपेत पेपरच्या गठ्ठ्यांखाली आपण गुदमरत आहोत असले काही स्वप्न पडल्यास आम्ही त्याचा विचार न करण्याचा प्रयत्न करतो. कसली वर्गणी मागायला कोणती तरुण मंडळे आली की 'आली आपल्या पेपर एजंटची माणसं! ' असा डरपोक विचार आम्ही अजिब्बात म्हणजे अजिब्बात करत नाही. त्यांना जुजबी पैसे देऊन वाटेला लावतो. वेळप्रसंगी घरात कोणीच नसल्याचा बहाणा करतो. आणि रोज देवाकडे आमच्यासारखा उदार, कनवाळू पेपर एजंट इतर कोणालाही न मिळो म्हणून कळकळीने प्रार्थना करतो. न जाणो देव ऐकेल आणि पुन्हा एकदा आमच्या राज्यात सर्व काही आलबेल होऊन आम्ही सुखाने झोपू लागू! --- अरुंधती (ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

वाचने 4465
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

होय, हे अनुभव येतातच! एवढेच नाही तर ठराविक वारी येणार्‍या पुरवण्याही गायब असतात. मग त्या पेपर टाकणार्‍या पोर्‍याला गाठण्यासाठी सकाळी लवकर उठायचे, जाब विचारायचा. पुढचे दोनेक अठवडे सगळं काही ठीक, पुन्हा ये रे माझ्या मागल्या आणि ताक कण्या चांगल्या! कधी एका महिन्यात दोनदा बील घेउन येणार तर कधी दोन दोन महिने बीलच नाही असेही प्रकार होतात. हे प्रकार फक्त पेपरवालेच करतात असे नाही तर माझ्या आईकडे येणारा फुलपुडीवाला, दूधवाला, गव्हाची कोवळी पाती (रसासाठी) घेउन येणारा हे सगळेच जण एका माळेचे आहेत. शेवटी कंटाळून आता प्रत्येकजण गरजेप्रमाणे चार जिने उतरतो.

मी तर म्हणतो दुध पण त्याच्याकडुनच घेत चला. पेपर बरोबर दुध शर्करा योग येइन जुळुन . तसेच तुम्ही कुठल्या भागात राहिला आलत ते कळाले नाही आम्च्या जवळच्या भागात असला तर हा दुध शर्करा योगाचा लाभ घ्यावा म्ह्णतो .. बाकी छान लिहिले आहे. आधीच्या आजींचे चित्र डोळ्यासमोर दिसते .. आणि मातृदैवत शब्द आवडला

मी तर म्हणतो दुध पण त्याच्याकडुनच घेत चला. पेपर बरोबर दुध शर्करा योग येइन जुळुन . तसेच तुम्ही कुठल्या भागात राहिला आलत ते कळाले नाही आम्च्या जवळच्या भागात असला तर हा दुध शर्करा योगाचा लाभ घ्यावा म्ह्णतो .. बाकी छान लिहिले आहे. आधीच्या आजींचे चित्र डोळ्यासमोर दिसते .. आणि मातृदैवत शब्द आवडला

केबल माफीया ऐकले होते पण पेपर माफीयापण आहेत की काय :-) अवांतर - मिपाच्या भयकथावाल्यांनी ह्या धाग्याचा वापर करुन त्या दिवंगत आजीला पुन्हा आणुन तिसरा पेपर टाकावा.

असू द्या हो! रद्दी विकून त्याचेच पैसे त्याला द्या म्हणजे झालं!

किती पापभिरू माणसे असतो नाही आपण ? तो माणूस फुकट पेपर टाकतो तरी आपण अस्वस्थ होतो. त्याचा छडा लावल्याशिवाय मनास शांती लाभत नाही. ही उलघाल चांगल्या शब्दात मांडली आहेस.

In reply to by शुचि

+२

पण अरूंधाती, दोन वेगवेगळे पेपरवाले एकच पेपर टाकतायत की वेगवेगळे. म्हणजे उदा. तुझ्याकडे 'दै. सकाळ'च्या दोन प्रती येऊन पडतायत की एक 'सकाळ' आणि एक 'लोकसत्ता'? दोन वेगवेगळे पेपर येत असतील तर अजूनच चांगलं :) >> राव! आपण कोणाचे देणे लागतो ह्या विचारानेदेखील आमची झोप उडते. अग काय हे ! 'वॉल स्ट्रीट'वरच्या लोकांकडून काहीतरी धडे घे की ;)

In reply to by संदीप चित्रे

असेच म्हणतो. 'भिंत रस्त्या'वरचे बरेचजण, काय ते कर्तेकरविते आपणच आहोत आणि लोकच आपल्याला देणे लागताहेत अशा आविर्भावात असतात! शिकण्यासारखं आहे खरंच!! ;) पण तुझा अनुभव आवडला. एकदम अशीच उलघाल होते आपली! :( (एम्.डी. भांड एजन्सीकडून पेपर घेणारा)चतुरंग

In reply to by संदीप चित्रे

>>'वॉल स्ट्रीट'वरच्या लोकांकडून काहीतरी धडे घे की घेतली की रे , मि पा वरच्या काही लोकांनी. ;-)

In reply to by संदीप चित्रे

>>>अग काय हे ! 'वॉल स्ट्रीट'वरच्या लोकांकडून काहीतरी धडे घे की छे छे देशी लोक काही कमी नाहीत. काय ते "दलाल स्ट्रीट" का काय तिथे कार्यरत असणारे आणखी कुठ कुठल्या रोडवर वेगवेगळ्या प्रकारे घाम गाळणारे अनेक "गुरु" आहेत की ... अगदी स्वच्छ मायबोलीत शिकवणी घेतील. :)

हे हे हे... अनुभव चांगला मांडलाय. एकंदर फुकट ते पौष्टिक यावर आपला विश्वास नाही हे समजल. आमचे पिताश्री रोज सकाळी स्वतः पेपर आणि दुध आणायला जातात. तेवढाच मॉर्निंग वॉक होतो म्हणे.

तुमचे सर्वांचे ज्यादा पेपरची रद्दी घेण्यापासून, स्वतःची पेपर एजन्सी सुरु करण्यापासून ते वॉल स्ट्रीटवाल्यांकडून मौलिक धडे घेण्याबद्दलचे सल्ले आवडले! :-) संदीप, ''सकाळ''च्या दोन प्रती व इंडियन एक्स्प्रेसच्या दोन प्रती+ पुरवण्या + जाहिरात पत्रके असा जाडजूड गठ्ठा रोज सकाळी तुमच्या दारात पडलेला बघून काय हालत होईल, कल्पना करा! ;-) आणि सणासुदीला जास्तीच्या पुरवण्या..... बरं, वर्तमानपत्र वाचल्याशिवाय ''पैसे वसूल'' भावना येत नसल्यामुळे व आपण वृत्तपत्र संपादकाचा ते न वाचून जणू अवमान करत आहोत अशी विचित्र भावना मनात घर करून राहिल्याने दोन वृत्तपत्रे अशीच न उघडता बाजूला ठेवावी लागतात, तशीच ती इस्त्रीच्या घडीने रद्दीत जातात ह्याचे ढळढळीत वाईट वाटते हो!!

लेख आवडला! :) मागे मुंबैत असताना आमचा केबलवाला कधीच पैसे मागायला आला नाही आणि आम्हीही त्याचा नंबर शोधायचे कष्ट घेतले नाहीत.. ;)

पेपर एजन्सी मालक पुढच्या वॉर्ड निवडणुकीला उभा रहाणार आहे असे वाटते. एकगठ्ठा मतदान करून उपकार फेडून टाका. असो. अनुभव आवडला.
तो रीयल इस्टेट एजंटपण आहे, दुधाचा ही धंदा आहे इत्यादी इत्यादी.
-हा सार्वत्रिक अनुभव दिसतो. शिवाय तो तुमच्या सोसायटीच्या/नगराच्या शेजारच्या झोपडपट्टीत रहात असेल तर मग प्रश्नच मिटला. :)