Skip to main content

रुपांगी ज्योतिष.

लेखक प्रा.विद्याधर घैसास यांनी गुरुवार, 02/09/2010 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
सौंदर्याचा चाहता नाही असा माणूस दुर्मिळच आणि म्हणूनच Beauty is an object of joy foreverअशी इंग्रजीत म्हण आहे. आपल्याला लाभलेल्या निसर्गदत्त रुपरंगाला प्रसाधनांच्या सहाय्याने खुलविण्याचा मानवी अट्टाहासही पुरातन आहे. स्त्रियांचा तर हा खास आवडीचा आणि जिव्हाळ्याचा प्रांत. एका तत्ववेत्त्याने असे म्हटले आहे ,There is no ugly woman ,but there are women who do not know how to look beautiful . याचा मतितार्थ एवढाच की सुयोग्य काळजी घेतल्यास व विषयाची जाण वाढविल्यास प्रत्येक स्त्री सुंदर दिसू शकते. ज्योतिषशास्त्राचा संशोधक व २५-३० वर्षाचा अभ्यासक या नात्याने पत्रिकेच्या माध्यमातून सौंदर्यवृध्दीला सहाय्यभूत घटक शोधून काढणे ,सौंदर्यविषयक निदान आणि उपाय यांचा ज्योतिषशास्त्रीय परामर्श घेणे ,मला आव्हानात्मक वाटले व म्हणून इतर अनेक प्रांतांमध्ये संशोधन पूर्ण केल्यानंतर मी सौंदर्य व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घालणारा "रुपांगी ज्योतिष " हा विषय निवडला. संशोधनाला सुरुवात झाली तीच मुळात विषयाच्या नावापासून . ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून रुपवर्धन चिकीत्सा करणारा म्हणून रुपांगी = रुप +अंग(रुप ज्याने अंगी भिनते) ज्योतिष असे शिर्षक दिले. अंगलक्षण होराशास्त्र , देहबोली, (बॉडी लॅंग्वेज) मेडीकल पामीस्ट्री अशा संलग्न विषयांच्या आधारे संशोधनाला अधिक आखीव ,रेखीव व उपयुक्त करण्याची प्रक्रिया अव्याहत चालू आहे. रुपांगी ज्योतिषाची तोंडओळख तुम्हा जिज्ञासू वाचकांना व्हावी ,ज्ञानाची काही नवी क्षितीजे पाहण्यास तुम्ही उद्युक्त व्हावे एवढाच या लेखाचा माफक उद्देश आहे. सौंदर्याचे तीन प्रमुख घटक (असे की ज्यात बदल घडवणे शक्य असते.) म्हणजे सतेज कांती-नितळ कांती.तजेलदार काळेभोर केस ,व सुडौल बांधा. आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून याचा वेध घेऊ या. सतेज कांती: कातडीचे दोन स्तर असतात . बाह्य व अंतर्गत. बाह्य कातडी शुक्र या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. तर अंतर्गत कातडी बुध हा ग्रह दर्शवितो. हे दोन ग्रह पत्रिकेत कोणत्या राशीत व कोणत्या भागात आहेत यावरून व्यक्तीच्या कांतीचे स्वरुप ठरते. जलतत्वाच्या राशी (कर्क ,वृश्चिक ,मीन ) आर्द्रतादर्शक (high moisture) तर अग्नितत्वाच्या राशी (मेष,सिंह, कन्या )शुष्कतादर्शक आहेत. पृथ्वीतत्वाच्या राशी (वृषभ ,कन्या ,मकर )कांतीचा घोटीवपणा (tenacity) दर्शवितात, तर वायुतत्वाच्या राशी (मिथून तूळ ,कुंभ) शुष्क व निबर कांती देतात. पत्रिकेतील लग्न (प्रथम स्थान ) व चतुर्थ स्थानी असलेल्या राशींचा व ग्रहांचा प्रभाव कांतीवर पडतो हे लक्षात घ्यावे. कांतीचा तलमपणा (smoothnes.) छिद्रे (porasity) चिवटपणा (elasticity), घोटीवता (tenacity) तापमान (heat level )आर्द्रता (moisture level) या सहा घटकांचा अभ्यास पत्रिकेवरून व अन्य परिक्षण निरीक्षणातून करता येतो व त्यातील असंतुलन झालेले घटक योग ध्यानधारणा घरगुती उपाय व विशिष्ट प्रसाधनांच्या सहाय्याने संतुलीत करता येतात. चेहेर्‍यावर उठणार्‍या तारुण्यपिटीकांचे कारणही अनेक वेळा पचन प्रक्रिया ,मासिक धर्म, अथवा त्वचेच्या छिद्रांचा मोकळेपणा यांच्याशी निगडीत असतो. व त्याचा अचूक वेध पत्रिकेतून घेता येतो. चंद्र हा मासिक धर्माचा कारक गुरु यकृताचा (लिव्हरचा ) कारक. केतू हा त्वेचेवरील छिद्रांचा कारक. चेहर्‍यावरची अती तैलता (ऑयली फेस) बुध व शनीच्या कुयोगामुळेसंभवते. तर जीवाणू संसर्गामुळे कांतीची होणारी हानी हा 'राहू' चा त्रास आहे.धूळ आणि प्रदूषक घटक यामुळे संसर्गाला वाव मिळतो. अडथळ्यांचे कारण व निराकरण सतेज कांती प्राप्त होण्यासाठी आड येणार्‍या गोष्टींमध्ये काही शरीरांतर्गत आहेत ,तर काही बाह्य घटक आहेत. मानसिक तणाव (चंद्र ) कोठासाफ नसणे (गुरु) रक्त दोष आणि सदोष मासिक धर्म (शनी ) अष्टम स्थान ही चार प्रमुख कारणे आहेत. बाह्य घटकांमध्ये चेहेर्‍याची व सर्वांगाची अस्वच्छता ,उन ,धूळीचे कण व प्रदूषक घटकांचा प्रभाव प्रसाधनांची अ‍ॅलर्जी कातडीला होणार्‍या जखमा ही प्रमुख कारणे आहेत .या कारणांचे निराकरण करण्यासाठी अष्टौ प्रहर जागरुकता लागते. आहार -विहार - निद्रा यांचाही कांतीवर प्रभाव पडतो. सौम्य संतुलीत आहार ,योग निद्रा, मसाज , कमरेचे व्यायाम ,सुयोग्य साबणाचा वापर ,गरम पाण्याचे स्नान (एकवीस मिनीटे) ,कृत्रीम रंग आणि घटकांचा वापर टाळणे,बाहेरून घरी आल्यावर चेहेरा गरम -गार पाण्याने धुणे असे साधे सोपे उपायही सतेज मुलायम व दोषविरहीत कांती बहाल करतात. पुढच्या भागात आपण केशसंभाराचा विचार करू आणि त्यापुढील भागाचा विषय आहे सुडौल बांधा . तोपर्यंत हा भाग वाचा आणि प्रश्न विचारा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10648
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

गुरु यकृताचा (लिव्हरचा ) कारक.
यापुढे क्वार्टर मारताना आधी दोन थेंब गुरुच्या नावाने शिंपडले पाहिजेत.. :)
सौम्य संतुलीत आहार ,योग निद्रा, मसाज , कमरेचे व्यायाम ,
ऑ? कमरेच्या व्यायामाने कांती उजळते म्हणता? उद्यापासूनच ट्राय मारतो.. ;)
आणि त्यापुढील भागाचा विषय आहे सुडौल बांधा .
वाचायला उत्सुक आहे.. :) (बेढब) तात्या.

रुपांगी ज्योतिष हा शब्द आवडला. बाकी फलज्योतिषावरील आमची मते (सु) (कु) प्रसिद्ध आहेतच

In reply to by प्रकाश घाटपांडे

एक प्रश्न आहे. नियमित व्यायाम, आहार, योग्य योग (/योगा), सौंदर्यप्रसाधने इत्यादींमुळे त्वचेचा पोत सुधारण्याचा अनेकांचा, अनेक जणींचा अनुभव आहे. याचा अर्थ त्यांच्या कुंडलीतही फेरफार झाला का?

In reply to by पुष्करिणी

पुढच्या भागात आपण केशसंभाराचा विचार करू आणि त्यापुढील भागाचा विषय आहे सुडौल बांधा . साला, पहिल्यांदाच एखादा लेख "क्रमशः" असल्याचा आनंद झाला. मस्त ! येऊ द्या प्रा. साहेब ! (मिपावरच्या प्रा आणि डॉ चा फ्यान) मिसळभोक्ता पण एक शंका आहे, सर. सौंदर्याचे तीन प्रमुख घटक (असे की ज्यात बदल घडवणे शक्य असते.) म्हणजे सतेज कांती-नितळ कांती.तजेलदार काळेभोर केस ,व सुडौल बांधा. समजा यात बदल घडवणे शक्य असते, तर मग तुमच्या मते ते ग्रह वगैरे पण बदलणे आवश्यक असेल ना ? साली माझी कुंडली रूपांगानुसार बदलवून घ्यावी म्हणतो. (नितळ कांतीचा शंकेखोर)

>>पत्रिकेतील लग्न (प्रथम स्थान ) व चतुर्थ स्थानी असलेल्या राशींचा व ग्रहांचा प्रभाव कांतीवर पडतो हे लक्षात घ्यावे. >>बाह्य कातडी शुक्र या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. तर अंतर्गत कातडी बुध हा ग्रह दर्शवितो. लग्नरास मिथुन, चतुर्थात कन्येत केतू आणि चंद्ररास सिंह (पूर्वा १), शुक्र अष्टमात, लग्नेश भाग्यात यावरुन तुम्ही कांती, अंगलक्षण कसं ठरवाल ??

लै भारी! रुप, अंग, देह, सुडौल बांधा, सतेज कांती-नितळ कांती, तजेलदार काळेभोर केस , आखीव ,रेखीव सोल्ड!!!!!! >आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून याचा वेध घेऊ या...... त्याचा अचूक वेध पत्रिकेतून घेता येतो. जे समोर दिसते आहे त्याचा वेध पत्रिकेतुन कशाला घ्यायचा? त्यावरचे उपाय तर वैद्यकशास्त्र सांगते, ज्योतिषाचा काय संबध?

याचा मतितार्थ एवढाच की सुयोग्य काळजी घेतल्यास व विषयाची जाण वाढविल्यास प्रत्येक स्त्री सुंदर दिसू शकते.
हे आमच्या शुर्पणखेला कळले असते तर कशाला बिचारीचे नाक कान कापले गेले असते ?

In reply to by अवलिया

मग परा उगाचच लक्ष्मणाने अन्याय केला अशी बोंब मारतो.
हो मग ? आता असे आहे बघ नानबा, लक्ष्मण तिथे एकटाच होता. उर्मीलाबै इकडे महालात :) राम आणि सिता ह्यांना थोडातरी एकांत मिळत असेल का ? जर ह्यानी काही काळासाठी का होईना शुर्पणखे बरोबर जोडी जमवली असती तर चौघेजण सुखाने नांदले असते का नाही ? पुन्हा शुर्पणखेशीच नाते जोडले गेल्याने जंगलातील राक्षसांची भिती राहिली नसती आणि राक्षसांशी चर्चा करुन ॠषी-मुनींना होणारा उपद्रव देखील रक्तपाताशीवाय थांबवता आला असता.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हे आमच्या शुर्पणखेला कळले असते तर कशाला बिचारीचे नाक कान कापले गेले असते ? आमच्या शुर्पणखेला ?????????????

In reply to by चिंतामणी

का हो, तुम्हाला काही त्रास? ;-)

In reply to by चिंतामणी

बरोबर आहे, मागील जन्मी तो शरीराने आणि मनाने रावण होता. या जन्मात शरीराने परा आहे.. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच

सौम्य संतुलीत आहार ,योग निद्रा, मसाज , कमरेचे व्यायाम ,सुयोग्य साबणाचा वापर ,गरम पाण्याचे स्नान (एकवीस मिनीटे) ,कृत्रीम रंग आणि घटकांचा वापर टाळणे,बाहेरून घरी आल्यावर चेहेरा गरम -गार पाण्याने धुणे असे साधे सोपे उपायही सतेज मुलायम व दोषविरहीत कांती बहाल करतात
हे उपाय काय कामाचे? शनी, केतुची शांती किंवा गुरुचा, चंद्राचा खडा धारण करणे असे काही साधे सोपे ज्योतिषी उपाय असतील तर सांगा बोवा. कांती कशी ऑपॉप उजळली पाहिजे ;) प्रा. कम्विणार पैश्यास

माहिती बरीच आहे, पण रूपांगी ज्योतिष रूपाविषयी नक्की काय करतं हे कळलं नाही.
जीवाणू संसर्गामुळे कांतीची होणारी हानी हा 'राहू' चा त्रास आहे.धूळ आणि प्रदूषक घटक यामुळे संसर्गाला वाव मिळतो.
हेही कळलं नाही. जीवाणू संसर्गामुळे कांतीची होणारी हानी हा 'जीवाणूं' चा त्रास आहे, असं मला वाटलं असतं. पुढे 'धूळ आणि प्रदूषक घटक' विषयीही लिहिलं आहे. ते बरोबरच वाटतं. पण मग इथे राहू कुठे येतो? राहू पत्रिकेत असल्यामुळे हे त्रास होणारच असतील तर मग रूपांगी ज्योतिषाकडे जाऊन हात दाखवून अवलक्षण का करून घ्यावं?

मूळात हे प्रा.घैसास 'इथे' नांदणार आहेत का? हा प्रश्न संपादक मंडळापैकी कुणीतरी अधिकारवाणीने विचारावा. नाहीतर ते कुणीतरी "शहाजहान खान" आले ~ पैगंबर आणि रमजान म्हणून मुस्लिम धर्म कसा मोठा ~ सांगून १०० च्या वर प्रतिसाद खावून अल्लाला प्यारे झाले....नंतर परवापरवाच मैलभर लांबीच्या पद्व्या झळकविणारे ज्योतिषतज्ज्ञ प्रा.डॉ.होनकळसे आले...तीनचार धाग्यांचा दंगा घातला....गायब झाले. अजूनही असतील....त्या दोघांनी ना प्रतिसाद दिले ना सदस्यांनी प्रस्तुत केलेल्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर. आता हे प्रा.घैसास म्हणतात 'प्रश्न विचारा...." तर विचारतोच ~~ 'तुम्ही इथे राहणार आहात का?' त्याचे ज्योतिष अगोदर मांडा मग रुपांगा वरील प्रश्नांचे पाहु या. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

=)) या इंद्रालाच संपादक करा रे!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ब्याडा !!

In reply to by इन्द्र्राज पवार

सासुरवासाला अजून सुरुवातच झालेली नाही म्हटलं तरी.
तेच तर. इंद्र्राजांचे दोन प्रतिसाद दहा ओळींमध्ये आटपले! यापेक्षा आणखीन किती चांगली वागणुक द्यायची म्हणतो मी? (ह.घे.)

In reply to by इन्द्र्राज पवार

सहमत. वादग्रस्त लेख टाकून पळणार्‍या आणि क्रमश: असे लिहून चालू गोष्टी वार्‍यावर सोडणार्‍यांचे काहीतरी केले पाहिजे.

या इंद्रालाच संपादक करा रे!
-१ इंद्रदांचे मेगाबायटी प्रतिसाद कमी व्हावेत, त्यांच्या प्रसिद्धीला ओहोटी लागावी व त्यांचे मानसीक स्वास्थ्य हरवुन जावे ह्यासाठी केलेली हि कुटील मागणी आहे. आम्ही तिचा निषेध करतो. कोल्हापुरचे असले तरी आम्हाला ते प्रिय आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो परा... कुठली प्रसिद्धी आणि कसली आली आहे ओहोटी. इथल्या मेगा प्लेअर्सपुढे आम्ही म्हणजे बोळातले ब्रॅडमन ! तरीदेखील अदितीच्या (अनाठायी) मागणीचा तुम्ही निषेध केला ते बरे झालं. "कोल्हापुरचे असले तरी आम्हाला ते प्रिय आहेत." ~~ हे बाकी झकास ! आम्ही चितळ्यांना नावे ठेवू, त्यांच्या मिठाईला नाही. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

आम्ही चितळ्यांना नावे ठेवू, त्यांच्या मिठाईला नाही.
अहो, मिठाई खा पण हलवायाचं घर पाहू नका असं उगाच नाही म्हटलेलं! ;-) इंद्रा संपादक व्हावा यासाठी मी दोन सेकंदांचं नैष्ठीक मौन पाळत आहे.

मस्त :)

"रुपांगी ज्योतिष " या बद्दल काही माहिती नव्हते आपण तर त्यावर संशोधन केलेले दिसते तेव्हा आपले लेखनही आवडीने वाचू. फक्त एक कळले नाही, आपण म्हणता ''सतेज कांती प्राप्त होण्यासाठी आड येणार्‍या गोष्टींमध्ये काही शरीरांतर्गत आहेत , तर काही बाह्य घटक असतील'' तर पत्रिकेच्या माध्यमातून त्यावर उपाय कसे करता येतील. आणि बाह्य घटक म्हणजे कोणते घटक ? बाकी लेखन वाचतोच आहे. योग्य प्रश्न आमच्या वतीने श्री घाटपांडे साहेबच तुम्हाला विचारतील. >>>पुढच्या भागात आपण केशसंभाराचा विचार करू आणि त्यापुढील भागाचा विषय आहे सुडौल बांधा . अहाहा....! सुडोल बांध्याचे, सुंदर केशरचना असलेले फोटो पुढील भागात टाकता आले तर जरुर टाका. :) -दिलीप बिरुटे

In reply to by पुष्करिणी

केशसंभाराविषयी एकवेळ एकमत होईल, पण बांध्याचे काय ? सुडौल बांध्याची नक्की व्याख्या कोण ठरवणार ? कोणाला उर्मिला मातोंडकरचा बांधा सुडौल वाटतो तर कोणाला आयेशा टाकियाचा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

छे, कोणाला काय वाटेल तेही ग्रह्च ठरवतात... तसही दोन प्राजींच्या चर्चेतून कळेल हळूहळू ..:)

In reply to by पुष्करिणी

>>>>छे, कोणाला काय वाटेल तेही ग्रह्च ठरवतात... सहमत आहे. पत्रिकेत सुडोल बांध्याबद्दल काही निकष असावेत असे वाटते. :) -दिलीप बिरुटे

In reply to by पुष्करिणी

>>>सुंदर केशसंभार आणि बांध्याच्या पत्रिकांचे फोटो टाकाच हो घैसास सर. नको नको.. अश्लील म्हणुन संपादक उडवायचे..

In reply to by अवलिया

नको नको.. अश्लील म्हणुन संपादक उडवायचे..
काय टाकले ह्यापेक्षा कोणी टाकले हे महत्वाचे ;) त्यावर उडते का उडत नाही हे अवलंबुन. नाना फडणवीस.

रोचक माहिती आहे. (वाचक)बेसनलाडू यावरून एक रंजक प्रयोग (रिवर्स इंजिनिअरींग) करता येईल का, याचा विचार करतो आहे. व्यक्तीची कांती, बांधा, केशसंभार इ. चे सखोल परीक्षण करून तिची पत्रिका तयार करायची. जन्मस्थान, दिनांक, वेळ यावरून तयार केल्या जाणार्‍या पत्रिकेशी तिची तुलना करायची. या दोन पत्रिका एकमेकींशी किती जुळतात, ते पहायचे :) (प्रयोगशील)बेसनलाडू दुसरे असे, की अर्ध्या लेखात ग्रहगोलीय घटकांचे, त्यांच्या योगांचे व्यक्तीच्या रंगरूपावर होणारे परिणाम (कारकत्त्वाच्या नात्याने) नमूद केले आहेत. आणि शेवटीशेवटी पर्यावरणीय, जनुकीय घटकांचे तसेच आहार, निद्रा, व्यायाम इ. चे होणारे परिणामसुद्धा विषद केले आहेत. त्यामुळे घासकडवी गुरुजींना पडलाय, तोच प्रश्न मलाही पडला आहे. नक्की कुणाचा परिणाम निर्णायक ठरतो - ग्रहगोलादी ज्योतिषीय घटकांचा की आहार, निद्रा, जनुके, पर्यावरणा या भौतिक घटकांचा? ज्योतिषीय घटकांच्या (त्यांचे कारकत्त्व, योग इ.) मदतीने भौतिक घटकांचे परिणाम नियंत्रित करता येतात का/होतात का/करता येतील का? की ज्योतिषीय घटक मानवी नियंत्रणाबाहेर असतात, असे वाटते. उलट आहार, निद्रा, पर्यावरणासारखे घटक मानवी नियंत्रणात असणे शक्य आहे (किती झोपावे, काय खावे/खाऊ नये, उन्हातान्हात किती फिरावे/फिरू नये इ.) मग असे असताना रंगरूप खुलविण्याचे मानवी प्रयत्न एका मर्यादेपाशी येऊन पूर्ण थांबतील आणि ज्योतिषीय घटाकांचाच अंतिम, कायमस्वरूपी प्रभाव राहील, असे म्हटले तर ते चूक ठरेल काय? असे म्हणणे तार्किक ठरेल काय? In short, does it or will it make any sense? :P (जिज्ञासू)बेसनलाडू

एका तत्ववेत्त्याने असे म्हटले आहे ,There is no ugly woman ,but there are women who do not know how to look beautiful . याचा मतितार्थ एवढाच की सुयोग्य काळजी घेतल्यास व विषयाची जाण वाढविल्यास प्रत्येक स्त्री सुंदर दिसू शकते. बहुतांश स्त्री-पुरुष दिसायला कुरुप, यथा-तथाच असतात. कितीही प्रयत्न करा, फेअर अँड लव्हली ( साधे / असे ज्योतिषशास्त्रीय किंवा कसेही) त्यात काहीही* फरक पडत नाही. कसे असतात ( स्वभाव, गुण इ.) हे बदलणे अवघड असते, खूप कष्ट घ्यावे लागतात.

सौंदर्याच्या कल्पना बहुधा समाजसापेक्ष (वंशसापेक्ष) असतात नाहीतर आफ्रीकी स्त्रीपुरुषांना जोडीदार मिळालेच नसते. (कुठलेच साहित्य वाचत नसल्यामुळे- आणि वाचले तरी) घोडा गाढवापेक्षा हॅण्डसम असतो असे गाढवीला कधीच पटणार नाही. आणि गाढव घोडीच्या मागे जाणार नाही.

In reply to by नितिन थत्ते

हा हा हा 'म्युल' व 'हिनी' प्राण्यांच्या आईवडलांच्या प्रेमाला अपमानीत करु नका मिश्टर थत्ते.

आधीच ग्रहतार्‍यांना सूर्याभोवती फिरण्याचं काम करतानाच आपल्यासारख्याच एका ग्रहावरच्या काही जीवांच्या परिक्षा, लग्न, मुंजी, वस्तु घेणं, विकणं, अपघात, घात, प्रेम वगैरे बघावं लागतंय. त्यात तुम्ही लोकांच्या कमरा, ओठ, त्वचा, केस, अशा गोष्टीतही त्यांना लक्ष घालायला लावत आहात याबाबत तमाम ग्रहगोलांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो !! (उपग्रह) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

त्यात तुम्ही लोकांच्या कमरा, ओठ, त्वचा, केस, अशा गोष्टीतही त्यांना लक्ष घालायला लावत आहात याबाबत तमाम ग्रहगोलांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो !! >>> =)) =)) =)) =)) अगाययाया !! मला एक सांगा , एखाद्याचं कंबर्राड मोडायच असेल तर मला कुठल्या ग्रहाकडे साकड घालाव लागेल आणी त्याला ते वाचवायचे असेल तर त्याने कोठल्या ग्रहाकडे जायच ??

In reply to by सुहास..

"त्यात तुम्ही लोकांच्या कमरा, ओठ, त्वचा, केस, अशा गोष्टीतही त्यांना लक्ष घालायला लावत आहात" ~~ हे तर काहीच नाही. धाग्यात असेही 'सजेशन' आहे की, रोज गरम पाण्याने "एकवीस मिनिटे" आंघोळ करावी. महाराष्ट्रातील ३५ पैकी ३२ जिल्ह्यातील नळांना दिवसातून एकवीस मिनिटेही पाणी येत नाही तर इतकी प्रदीर्घ (आणि सचैल...) आंघोळ कुणाच्या नशीबी असेल? (सन्माननीय अपवाद : नीता व टीना अंबानी) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

एकवीस मिनिटे थेंबथेंब पाणी अंगावर घ्यावे आणि नंतर अर्ध्या मिनिटात नेहेमीप्रमाणे आंघोळ करावी. ;)

In reply to by मृत्युन्जय

माफ करा, आंघोळीचा एकूण कालावधी महत्त्वाचा आहे. एकवीस म्हणजे एकवीसच मिनिटांत आंघोळ झाली पाहिजे. तेव्हा तुमच्या प्रतिसादात योग्य तो बदल सुचवीत आहे, साडेवीस आणि अर्धे मिनिट याप्रमाणे.

In reply to by मृत्युन्जय

एकवीस मिनिटे थेंबथेंब पाणी अंगावर घ्यावे आणि नंतर अर्ध्या मिनिटात नेहेमीप्रमाणे आंघोळ करावी.
त्यापेक्षा आपल्या अंगावर पळीने २१ मिनिटे पाणी घालण्यासाठी कोणाला नेमस्त केल्यास ते अधिक सोपे पडेल.

In reply to by सुहास..

मला एक सांगा , एखाद्याचं कंबर्राड मोडायच असेल तर मला कुठल्या ग्रहाकडे साकड घालाव लागेल आणी त्याला ते वाचवायचे असेल तर त्याने कोठल्या ग्रहाकडे जायच ??
कंबरडं मोडायला पूर्वी एक विशाल असा टारग्रह होता :) . त्याचे वहान होते बाईक.. त्याला सध्या दीर्घग्रहण लागले आहे.. (म्हणून तर असले धागे वाढले आहेत) मात्र एकदा त्या ग्रहाने कंबरडं मोडलं की कंबरड मोडलेला वाचेल ह्या ग्रहात कोणी नसल्याने वाचवण्याचा ग्रह कोणता हे शोधायच्या फंदात पडलेले नाही

मुकेश अंबाणींच्या बद्दल सांगावे. त्याची त्वचा अजुन सतेज का झाली नाही?

हा लेख जाहिरात विभागात टाकावा ही नम्र विनंती! तसा विभाग नसल्यास बनवावा ;)

In reply to by भाऊ पाटील

मंडळी यवढ सगळ तुम्हीच बोलताय मंग प्रा सायबांना वायली झैरातीची काय गरजं? ते तर काय बी बोल्ले नाय!

जलतत्वाच्या राशी (कर्क ,वृश्चिक ,मीन ) आर्द्रतादर्शक (high moisture) तर अग्नितत्वाच्या राशी (मेष,सिंह, कन्या )शुष्कतादर्शक आहेत. पृथ्वीतत्वाच्या राशी (वृषभ ,कन्या ,मकर )कांतीचा घोटीवपणा (tenacity) दर्शवितात, तर वायुतत्वाच्या राशी (मिथून तूळ ,कुंभ) शुष्क व निबर कांती देतात. वरील राशींमध्ये आमची अतिप्रीय अशी धनु राशी नसल्यामुळे अगदीच जोरात णीसेद. धनु रास कुठल्याही तत्वात येत नसल्याने या राशीचे लोक कुठल्याही तत्वांना बांधील नाही हे समजल्यामुळे घोर निराशा झाली आहे. आजपर्यंत जी तत्वे आम्हि मार्गदर्शक समजत होतो, त्यांचा आमच्या जीवनात काहीही उपयोग नाही हे अतिकटुसत्य समजल्यामुळे जीवनातील उत्साह संपला अहे. तसेच केवळ स्वतःची रास रुपांगी ज्योतिषात 'लिस्टेड' नसल्यामुळे कितीही प्रयत्न केला तरीदेखील आम्हास सुंदर दिसता येणार नाही हे वाचून युनिव्हर्सल निराशा आलेली आहे! या आत्यंतिक निराशेमुळे जर आम्हास आत्महत्या करावेसे वाटू लागले तर?? सध्या या प्रश्नामुळे जीव थार्‍यावर नाही! (जीव थार्‍यावर नाही हे दाखवण्यासाठी शुद्धलेखनाच्या चुका करायचे मनात आले होते, पण असल्या फुटकळ तत्वांना बांधील नसल्याने फाट्यावर मारले आहे.) असो! -- (नैराशिक) असुर

In reply to by असुर

जलतत्वाच्या राशी (कर्क ,वृश्चिक ,मीन ) आर्द्रतादर्शक (high moisture) तर अग्नितत्वाच्या राशी (मेष,सिंह, कन्या )शुष्कतादर्शक आहेत.
माझ्या चेहेर्‍याच्या त्वचेची रास कर्क ,वृश्चिक ,मीन यांपैकी एक असणार आणि हातापायाच्या त्वचेची रास बहुदा मेष,सिंह, कन्या यांपैकी असणार!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझी रास नक्की 'धनु'च आहे! कारण साबण, फेसवॉश, क्रीम, डिटर्जंट वगैरे कसल्याही आर्द्रतादर्शक्/शुष्कतादर्शक तत्वांनी काहीहि फरक पडला नाही! अजून एक प्रश्न! ते भुजंगधारी का काय ते असतंय ना, ते कुणाचं रास आसेल तर काय होतं वो? ते रास कुटल्या प्रकारात मोडतं तेवडं सांगून सोडा की वो! बाकी आमच्या नैराश्यावर उपाय काय? विचार करुन हैराण झालो आहे!

In reply to by असुर

थांबा थांबा, इतकी घाई नका करू..अजून केशसंभार आणि सुडौल बांधा बाकी आहे :) त्या डिपार्टमेंट्मधे लै भारी असेल काहीतरी. धीर सोडू नका...

In reply to by पुष्करिणी

सगळे लोक मला काय करु नये तेच सांगतात, काय करु ते कोणीच सांगत नाही! फ्रस्ट्रेट व्हायला होतं!

In reply to by मेघवेडा

तुमच्या या उत्तराचा मला काहीहि फायदा होत नाहीये. उलट माझं मनोधैर्य खच्ची होतंय. अशानं मी तुम्हालाच जबाबदार धरेन बरं! ते २१ मिनिट आंघोळ प्रकाराने हापिसला जायला उशीर झाला, आणि मग ब्वासने आम्हाला तोंड काळं करता येत असेल तर पहा असा (खतरनाक) उपाय सांगीतला. त्यामुळे आंघोळीत इंटरेस्ट वाटत नाही!

In reply to by असुर

अरे एवढी बडबड करण्यापे़क्षा " मला आत्महत्या करावीशी वाट्टे" असा एक धागा तरी काढायचा! छ्या!

माझ्या पत्रिकेत सगळ्या राशींची मिळून एकच रास झाली आहे, ती म्हणजे भाताची रास!

In reply to by प्रकाश घाटपांडे

=))

पत्रिकेतील लग्न (प्रथम स्थान ) व चतुर्थ स्थानी असलेल्या राशींचा व ग्रहांचा प्रभाव कांतीवर पडतो हे लक्षात घ्यावे काही लोक प्लास्टिक सर्जरी करून घेऊन आपले रंग-रुप चांगले करतात. ह्याचा अर्थ असा होतो काय, की प्लास्टिक सर्जरी केल्याने ग्रहांची स्थितीत सुधारणा होते? मुळची पत्रिका व त्यावर आधारीत रुप बदलत नाही ह्यावर जर तुम्ही ठाम असाल, तर मग ह्या प्रश्नाचे उत्तर काय द्याल - वाईट रंग-रुप असणार्‍या लोकांनी प्लास्टिक सर्जरी केली आणि सुंदर रुप मिळवले, तर पत्रिकेतले ग्रह आहे त्याच ठिकाणी असल्याने त्यांचा परिणाम नविन रुपावर होऊन त्या व्यक्ती पुन्हा मुळरुपात यायला हव्यात, पण असे होत नाही, का?