आंतरराष्ट्रीय राजकारण हे जितकं रोचक तितकंच क्लिष्ट. तिथे एकाच वेळी प्रत्येक जण आपला पट मांडतो, आपली चाल खेळतो आणि त्याच वेळी प्रत्येक जण इतरांच्या पटावरचे प्यादे असतो. अश्या ह्या बहुआयामी राजकारणात जसजसं जग जवळ येऊ लागलं तसतशी अधिक क्लिष्टता व प्रसंगी अधिक रोचकता येऊ लागली. त्याच बरोबर हा पट शांत डोक्याने मांडून व इतरांच्या पटांवरील आपली परिस्थिती लक्षात घेऊन ज्यांनी हा खेळ खेळला ते त्या त्या मार्गाने पुढे गेले व इतर अनेक जण त्या खेळात वाईट प्रकारे भरडले गेले.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर कोणत्या एका गोष्टीभोवती आंतरराष्ट्रीय राजकारण फिरलं हा प्रश्न विचाराल तर "तेल" हे उत्तर कोणीही देईल. पण केवळ हे उत्तर माहित असण आणि तो खेळ समजून घेणं आणि दुसर्याला समजावणं हे अधिक कठीण. आणि ज्यांनी हा तेलाचा खेळ खेळला त्या "तेलियां" बद्दल काय बोलावे? अश्याच एका तेलियाबद्द्ल "शेख अहमद झाकी यामानी" यांच्याबद्दल श्री. गिरिष कुबेर यांनी लिहिलेले दमदार व रोचक पुस्तक म्हणज "एका तेलियाने". या पुस्तकात लेखक आपल्याला केवळ यामानी यांच्याबरोबरच इतर अनेक तेलियांची ओळख तर करून देतातच व त्याचबरोबर वाचक करतो ती आंतरराष्ट्रीय राजकारणाची एक अत्यंत रोचक, डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी सफर!
यामानी हा सौदी अरेबियाचे माजी तेलमंत्री. आखातातील सौदी अरेबियासारख्या तेलावर तरंगणार्या देशाचे तेलमंत्री व तेही पुरी २५ वर्षे पदभार सांभाळणारा हा तेलिया वाचकाला गुंग करून ठेवतो. सौदी अरेबियाच्या जन्मापासून सूरू होणारी ही कथा अरबांच्या मागासलेपणापासूनही सुरू होते. वाळवंटातील टोळ्यांचे तेलामुळे अचानक होणार्या मिळकतीने दिवस बदलतात. अर्थातच पश्चिमी जग ही ताक्द ओळखून तिथे आपले बस्तान बसवते व अरबांच्या तोंडाला पाने पुसून केवळ काहि पैसे व सुंदर बायकांच्या बदल्यात खोर्याने तेल ओढत असते. अश्यावेळी यामानींच्या रुपाने सौदी अरेबियाला तेलमंत्री मिळतो व एकुणच अरबस्थानाच्या नशीबाने राजे फैजल त्यावेळी सत्तेवर असतात.
पुढे ओपेक, ओआपेकचे राजकारण. गडाफी, इराणी शहा वगैरे तेलिये, ओपेकच्या एकजुटीने पाश्चिमात्यांचे घटते वर्चस्व, त्याच दरम्यान उफाळु लागलेला इस्त्रायल वाद, इजिप्तच्या खेळ्या, अमेरिका, ब्रिटन च्या चाली, रशियाची प्रत्युत्तरे, फ्रेंच, जर्मन, नेदरलंड, अल्जेरिया, इराक, कुवेत, इराण, इस्त्रायल, येमेन, जॉर्डन, जपान अश्या बहुविध खेळाडुंनी व त्याच वेळी प्याद्यांनी, रचलेले व्युह व ते राजे फैजल यांच्या मदतीने भेदणारे यामानी वाचाकाला पुस्तक संपेपर्यंत खिळवून ठेवतात.
एकतर ह्या पुस्तकात उल्लेख असलेले बरेच जण नेहमीचे ऐकलेले-वाचलेले आहेत. तेलसंकट, इराण-इराक युद्धे, शीतयुद्धे, इस्त्रायल प्रश्न वगैरे तर अनेकांनी अनुभवलेली आहेत. त्यामुळे त्यातील संदर्भ, प्रसंग, व्यक्ती, शहरे यांचे उल्लेख वाचकाची त्या राजकारणाची सहज नाळ बांधतात. एक उदा. देतो. अमेरिका तेलबंदी आल्यावर ओपेकप्रमाणे तेल खरेदीदारांची संघटना बांधण्यासाठी परिषद घेणार होती. तसे काहि झाले असते तर तो तेल उत्पादक देशांना झटका असता. अश्यावेळी यामानी यांची मुत्सद्देगिरी सगळ्यांना आठवत असेलच. आता हा परिच्छेद बघा तो वाचून अनेकांनी ही बातमी वाचल्याचं आठवेल
" सा सार्या पार्श्वभूमीवर यामानी जेव्हा पॅरीसला उतरले तेव्हा फ्रान्सचे अध्यक्ष जॉर्जेस पापेंदू यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जातीने हजर होते. हा प्रकार आता वारंवार घडणार होता. ह्या दौर्यात एका साध्या मंत्र्याच्या स्वागताला राष्ट्रप्रमुखांनी जाणं साजेसं होणार होतं. सारी माध्यमं हे तेलमंत्री काय बोलतात त्याकडे डोळे लाऊन होती. फ्रान्सने आपली आधीचीच भुमिका मांडली. इस्त्रायलने १९६७च्या युद्धापासून व्यापलेला अरब देश व पॅलेस्टाईन भुभाग परत करावा अशी स्वच्छ भुमिका घेतली. याला प्रतिसाद म्हणून यामानींनी लगेच घोषणा केली फ्रान्सला तेलकपातीतून वगळायची. दुसर्या दिवशी फ्रान्सच काय जगातील सार्या वृत्तपत्रांनी यामानींची बातमी छायाचित्रासकट छापली"
"पुढच मुक्काम होता लंडन. या देशाची भुमिकाही स्वछ होती. कधी नव्हे ते अमेरिकाच्या कच्छपी असलेल्या इंग्लंडनं आता महासत्तेची कास सोडली व इस्त्रायलचा निषेध केला. त्यामुळे इंग्लंडचं काय करायचं ते यामानींना माहित होतं. ते लंडनला उतरले तेव्हा इंग्लंड मध्ययुगीन मागास भागासारखं वाटत होतं. वीज नाही , बँका कोलमडलेल्या, कोळसा संपामुळे रेल्वे बंद आणि नाताळचा सण. यामानींनी इंग्लंडला पूर्वी होता तितका तेल पुरवठा सूरू करण्याचं घोषित केलं व पुन्हा यालाही प्रसिद्धी मिळाली"
हे सारं वाचकाला लख्ख आठवतं, पुढे बेल्जियम, जर्मनी इतकंच काय राजनैतिक संकेत झुगारून तेलमंत्र्यांच्या भेटीला आलेले जपानचे सम्राट काय सगळं वाचक आठवतो आणि पुढे झालेल्या अमेरिकेच्या पचक्याची आठवण होऊन वाचक मनात हसतो आणि उत्कंठेने पुढचे पान उलटतो.
ज्या यामानींना नुसता ताप जरी आला तरी वॉल स्ट्रीट गडगडायचा त्यांची कार्यपद्धती, व्युहरचना आणि मुख्य मणजे देशाभिमान व देशप्रेम बघितलं की त्यांना सलाम ठोकावासा वाटतो. आणि ही राजकारणाची व्याप्ती व त्याचे गरीब देशांवरचे भयावह परिणाम बघितल्यावर त्याकाळी तुलनेने गरीब असलेल्या भारताने ना खेळिया होऊन ना प्यादे बनून म्हणजेच बरेचसे अलिप्त राहून किती बरं केलं असंही वाटून जातं.
थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची रंजक शैलीत मजा घ्यायची असेल तर हे पुस्तक वाचणे मस्ट आहे. अगदी मिळवून वाचावे असे!
पुस्तकः एका तेलियाने
लेखक: गिरीश कुबेर
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती: पहिली
पाने:२४७
किंमतः २०० रुपये
वाचने
4730
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय अभ्यासपुर्ण.
परिचय
उत्तम.
छान
पुस्तकपरिचय आवडला.
In reply to छान by सहज
छान
In reply to पुस्तकपरिचय आवडला. by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to पुस्तकपरिचय आवडला. by ३_१४ विक्षिप्त अदिती
हेच बोलतो.
In reply to छान by सहज
खुप छान पुस्तक आहे
वाचलेलं नाही
In reply to खुप छान पुस्तक आहे by अर्धवट
मी पण हे पुस्तक वाचले
छान पुस्तक शिफारस
हे पुस्तक जबरदस्त आहे
पेट्रो ताकद
छान परीचय
ओळख
+१
In reply to ओळख by स्वाती दिनेश
+२
In reply to ओळख by स्वाती दिनेश
छान परिचय
दाद
चांगला परिचय.
पुस्तक संग्रही आहेच ॠ परिचय
धन्यवाद!
समर्थ परिचय
धन्यवाद