✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खरे खोटे - भाग १ (प्रांतांच्या गोष्टी - ४)

आ
आळश्यांचा राजा यांनी
Fri, 08/27/2010 - 19:22  ·  लेख
लेख
प्रांतांना कलेक्टरांनी एक ऍडिशनल जबाबदारी दिली होती. त्यांच्या सबडिव्हिजनच्या अखत्यारीत नसलेल्या पळसपंगा ब्लॉकच्या विकासकामांचा नोडल ऑफिसर बनवले होते. हा ब्लॉक हळूहळू नक्षलग्रस्त होत होता, आणि ब्लॉक ऑफिस भ्रष्टाचारग्रस्त झालेले होते. हरिविलासपूर पोलीस ठाण्यातल्या एका एएसआय ला नक्षलवाद्यांनी पकडून नेऊन ओलीस ठेवल्यापासून कलेक्टर आणि एस्पींची झोप उडाली होती. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पुनर्रचना जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात नव्हती, पण अनौपचारिकरीत्या त्यांनी वेगवेगळ्या विभागांतील वीस चांगले अधिकारी निवडून त्यांना जिल्ह्यातील वीस ब्लॉक्सचे नोडल अधिकारी बनवले होते. आपल्या हुकुमी एक्क्याचे पान म्हणजे नवीनच जॉइन झालेला, आणि इमेज आणि करियर बनवायला उत्सुक असलेला आय ए एस प्रांत कलेक्टरांनी पळसपंग्याशी पंगा घ्यायला पाठवला होता. प्रांतांची स्ट्रॅटेजी होती भरपूर फिल्ड व्हिजिट्स. सरकारातला एक महत्त्वाचा अधिकारी गावांगावांतून फिरतो ही एकच गोष्ट नक्षलवादाच्या सुरुवातीच्या उसवणीला टाका घालायला बऱ्यापैकी पुरेशी होती. त्यानंतर ब्लॉक ऑफिसची झडती. पण पळसपंगा ब्लॉक होता प्रांतांच्या ठाकूरगढ हेडक्वार्टरपासून दोन तास लांब. हे वेळेचे गणित जमवण्यासाठी प्रांतांनी सुरुवातीला आपल्या अखत्यारीतल्या भागातल्या भेटी कमी केल्या. असे दोन महिने गेले. एक दिवस संध्याकाळी प्रांत सेन्ससचे काम बघत रेस ऑफिसमध्ये बसले असता प्रधानबाबूंचा फोन आला. “सर आहात का? भेटायचं होतं जरा.” प्रधानबाबू म्हणजे दैनिक समाजचे वार्ताहर. संयमित बोलणारा आणि प्रांतांना आवडणारा सुसंस्कृत माणूस. प्रांतांनी लगेच होकार दिला. दहा मिनिटांत चार पाच वार्ताहर आले. त्यात सितारा टीव्ही चॅनेलचे मोहंतीबाबू पण होते. हे स्थानिक आमदारांचे भाऊ होते. या मंडळींविषयी सबडिव्हिजनमधले काही अधिकारी फारसे चांगले मत बाळगून नव्हती. ही मंडळी काही अधिकाऱ्यांकडे ‘खंडणी’ मागतात असं प्रांतांच्या कानावर आलं होतं. खरं खोटं माहित नव्हतं.पण प्रांतांना मात्र त्यांनी आपल्या सुसंस्कृत वागण्याने जिंकले होते. एक दोन वेळा प्रांत त्यांच्याच गाडीत बसून जलशुद्धीकरण प्लॅंटचा खोललेला कच्चा चिट्ठा ऑंखो देखा बघायला गेलेही होते. लॉ ऍण्ड ऑर्डर समस्येतही एक दोन वेळा या मंडळींची प्रांतांना साथ मिळाली होती. दुसऱ्या बाजूने, पत्रकारांनादेखील प्रांतांच्या गुड बुक मध्ये राहण्यात मजा येत होती. तक्रार केली की लगेच दखल आणि हालचाल होत होती. प्रांतांच्या कानाजवळ असल्यामुळे खालच्या ऑफिसांमध्ये शब्द रहात होता. असे एकूण सिम्बायोसिस होते. मंडळी जरा सिरीयस होती. प्रधानबाबू म्हणाले, “सर आपल्याला माहीत आहे का, आपल्या सबडिव्हिजनमध्ये एक गाव असे आहे, जिथे गेली सोळा वर्षे एकही सरकारी योजना पोचलेली नाही. एवढंच नाही, तर आपल्या गाडीने तिथंपर्यंत आपण जाऊसुद्धा शकणार नाही!” प्रांतांना आश्चर्य वाटले. “प्रधानबाबू, आपली सबडिव्हिजन इतकी पण दुर्गम नाही, इथे आल्यापासून मागच्या चार महिन्यांत मला एवढे तरी समजले आहे. अन्यथा मी अशा गावात पहिल्यांदा आल्या आल्या गेलो असतो. असो. कोणते आहे हे गाव?” आपल्या इथे कमी केलेल्या भेटींकडे तर या मंडळींचा रोख नसावा, प्रांतांना वाटून गेलं. शक्य नव्हतं. इन एनी केस इतका भटका अधिकारी ठाकूरगढने पाहिलाच नव्हता आजपर्यंत. “सर पारुडीपोसी नावाचे हे गाव आहे. एन एच २१५ पासून आत पाच किमी. बाळीबंधपासून. बाळीबंध म्हणजे ते बघा तुम्ही त्या शहीद आयटीबीपी जवानाच्या अंत्यसंस्काराला गेला होतात, ते गाव.” “हो, मला माहीत आहे बाळीबंध. मी दोन वेळा गेलोय तिथं. असं एखादं गाव तिथून हाकेच्या अंतरावर आहे यावर माझा विश्वास बसत नाही.” “व्हिडीओच बघा ना सर,” मोहंतीबाबू आपला कॅमेरा बंदुकीसारखा बाहेर काढत म्हणाले. प्रांतांना हसू आले. “विकासच नाही म्हणताय मोहंतीबाबू तर चित्रं कशाची दाखवणार आहात?” “बाइट आणलेत ना सर, लोकांचे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे.” “बरं. सांगा. पण त्याअगोदर मला एक सांगा – हे दुर्गम गाव तुम्हाला कसं काय सापडलं, आणि तेही आत्ता. गेली सोळा वर्षे हे गाव हायवेपासून एवढं जवळ असूनही सरकारपासून आणि तुमच्यापासून लपून कसं काय राहू शकलं? आज अचानक असं काय घडलं की तुम्हाला याचा शोध लागला, हं?” “सर आजचीच गोष्ट आहे. आम्ही कोर्टात बातम्यांसाठी गेलो होतो. रुगुडी ठाणेदारांनी वीसेकजण पकडून आणले होते. आम्ही विचारलं काय झालं म्हणून तर समजलं की पारुडीपोसीमध्ये एक चर्च बांधायचं चाललंय. त्यावरुन हाणामारी झाली. मग आम्ही ताबडतोब गाडी काढली आणि गेलो त्या गावात. आम्ही बीडीओंना फोन लावला आणि भेटायला येऊ का म्हणून विचारलं. त्यांनी टाळाटाळ केली. मी इथे नाही, तिथे आहे, टूरवर आहे. आम्ही म्हणालो, आम्ही ’तिथे’ येतो, तर म्हणाले मी ’तिथून’ अजून कुठे चाललोय. आणि फार तुसडेपणाने बोलले.” मोहंतीबाबूंची शेवटची वाक्यं तक्रारीच्या सुरात होती. प्रधानबाबू म्हणाले, “सर, आम्ही योग्य आदर ठेऊन बोललो असता असं तोडून बोलणं शोभतं का बीडीओंना? तुम्ही त्यांना समज द्यायला हवी.” “शांत व्हा. कदाचित त्यांना कलेक्टर नुकतेच बोलले असतील, मूड खराब असेल, किंवा खरंच भेटता येणं शक्य नसेल. शिवाय, तुम्ही म्हणता तसं त्यांचं बिंग बाहेर पडणार असेल, तर ते तुम्हाला टाळणारच ना? का या आणि करा माझी हजामत असं म्हणणार?” प्रांत समजावणीच्या सुरात बोलले. मंडळींच्या गालावर हसू उमटले आणि आठ्या कमी झाल्या. मोहंतीबाबू खुर्चीत पुढे सरकले आणि म्हणाले, “सर, या गावात जायला धड रस्ता नाही. आम्हाला गाडीतून उतरून चालत जावं लागलं.” “तुमची गाडी तर जाऊच शकणार नाही सर,” साहूजींनी भर घातली. मोहंतीबाबू पुढे बोलले, “या गावात ना रस्ते आहेत, ना वीज. गावाच्या सभोवार घनदाट जंगल आहे. दोन तीन महिन्यांतून एकदा केंव्हातरी बारीपदाहून काही मिशनरी रात्रीच्या वेळी लपत छपत गावात येतात आणि धर्मांतरं करतात. आता परिस्थिती अशी झालेली आहे, की गावातला एकजिनसीपणा कमी होऊन ख्रिश्चन आणि हिंदू असे तट पडलेत. आपली संस्कृती डोळ्यांसमोर नष्ट होताना काही लोक नाही बघू शकत. अशात एक चर्च या लोकांनी बांधायला काढलं. ते सरकारी जमिनीवर येतंय म्हणून लोकांनी त्याला विरोध केला आणि पोलीसांनापण सांगितलं. त्यातूनच भांडण वाढलं आणि आजची केस झाली.” प्रांत ‘अम्यूझ’ झाले. त्यांना हे सगळं रंजीत वाटलं. पण काही बोलले नाहीत. “आज मिशनरी येतायत, उद्या नक्षल येतील. या भागाचा दंतेवाडा किंवा कंधमाळ व्हायला वेळ लागणार नाही.” “झालं तुमचं?” प्रांत म्हणाले, “आता जरा मला तो व्हिडीओ दाखवा बघू.” प्रांतांनी दहा मिनिटे फास्ट फॉरवर्ड करुन तो व्हिडीओ पाहिला. काही लोकांच्या मुलाखती आणि एका अर्धवट बांधकामाचे चित्रण होते. मोहंतीबाबू म्हणाले, “सर आम्ही एक स्टोरी बनवलीय. तुमच्या बाइटशिवाय पूर्ण होणार नाही!” प्रांत म्हणाले, “मोहंतीबाबू, तुम्हाला माहीत आहे, मी ओल्ड फॅशन्ड बाबू आहे. माझ्या बातम्या न आलेल्या बऱ्या! माझ्या बऱ्या वाईट कामाविषयी जरुर आणा, पण माझं नाव, आणि चेहेरा आणू नका!” “नाही नाही सर. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला बोललंच पाहिजे.” “बरं बोलतो. पण धर्मांतरावर माझ्या नो कॉमेंट्स. आणि नक्षलवादावर पण मी काहीही बोलणार नाही. कबूल?” “सर नुस्तं कॅमेऱ्यात दिसलात तरी बास आहे आम्हाला!” मग बाइट द्यायच्या आधी प्रांतांनी त्यांना नक्षलवादावर आणि कंधमाळ प्रकरणावर एक छोटंसं लेक्चर दिलं, जेणेकरुन बाइटचा हट्टाग्रह जरा शांत होईल! (क्रमशः) ************ प्रांतांच्या गोष्टी - पहिली दुसरी तिसरी -१ तिसरी-२

Book traversal links for खरे खोटे - भाग १ (प्रांतांच्या गोष्टी - ४)

  • ‹ कस्टोडियल डेथ -भाग २ (प्रांतांच्या गोष्टी – ३)
  • Up
  • प्रांतांच्या गोष्टी -५ नोकरशाहीतील बंधुता! ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10346 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

वाचतोय...

प्रभो
Fri, 08/27/2010 - 19:28 नवीन
वाचतोय...
  • Log in or register to post comments

पुढे?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/27/2010 - 19:29 नवीन
पुढे? पुढचा भाग लवकर टाका. प्रांतांच्या समजुतदारपणाच्या चार गोष्टी मिपावरही येण्याची गरज आहेच; शिवाय आम्हालाही त्यातून शिकता येईल.
  • Log in or register to post comments

म्हाराजं चांगली चालवली आहे ही

अनाम
Fri, 08/27/2010 - 19:30 नवीन
म्हाराजं चांगली चालवली आहे ही मालिका.. पुढिल भागाची वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments

आवडलं.

यशोधरा
Fri, 08/27/2010 - 19:31 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

लगेच

श्रावण मोडक
Fri, 08/27/2010 - 19:37 नवीन
लगेच पुढचा भाग टाका. अन्यथा या प्रांतांची बदली करावी लागेल. बदली कुठं? त्याला दुर्गम भागात काम करणं आवडतं असं दिसतंय, म्हणून ही बदली अत्यंत सुगम भागात करावी लागेल. किंवा साईड पोस्ट द्यावी लागेल. तीच शिक्षा!!! बाकी प्रांत-पत्रकार नातं भारी रेखाटलंय. जुने दिवस आठवले. त्या गावाची कहाणीही एका जुन्या घडामोडीची आठवण देणारी आहे. हे असेच एक गाव महाराष्ट्रातील दोन महामार्गांवर वसलेल्या एका जिल्हा केंद्रापासून फार तर दहा-बारा मैलावरचं. तिथंही हीच स्थिती. एका आमदारानं आपल्या वाढदिवशी ते गाव दत्तक घेतलं, पुढे वर्षभरात गावाचा रस्ता झाला, पाणी आलं वगैरे. अर्थात, ते नंतर कोलमडलं हा भाग वेगळा.
  • Log in or register to post comments

जुने दिवस आठवले. त्या गावाची

स्वाती२
Fri, 08/27/2010 - 22:45 नवीन
जुने दिवस आठवले. त्या गावाची कहाणीही एका जुन्या घडामोडीची आठवण देणारी आहे. वाचायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वाचतोय .. लवकर लवकर लिहा

स्वप्निल..
Fri, 08/27/2010 - 22:35 नवीन
वाचतोय .. लवकर लवकर लिहा :)
  • Log in or register to post comments

मस्त.

विलासराव
Fri, 08/27/2010 - 22:39 नवीन
वाचतोय. अर्थातच आवडतय.
  • Log in or register to post comments

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

स्वाती२
Fri, 08/27/2010 - 22:42 नवीन
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

प्रत्येक भाग आवर्जून वाचला आहे..

पिंगू
Sat, 08/28/2010 - 00:23 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे....
  • Log in or register to post comments

हा भाग छोटा झाला काय? पुढचा

भडकमकर मास्तर
Sat, 08/28/2010 - 01:04 नवीन
हा भाग छोटा झाला काय? पुढचा लवकर येऊदे
  • Log in or register to post comments

आयला...

राजेश घासकडवी
Sat, 08/28/2010 - 01:18 नवीन
आता मागचे सगळे भाग वाचायला लागणार...आयच्यान् मी हे प्रांत वगैरे काहीतरी भौगोलिक असेल म्हणून नंतर वाचू म्हटलं होतं. अधिकार्‍यां च्या काम करण्याच्या पद्धतीचं वास्तववादी चित्रण वाटतं. सत्य परिस्थितीवर, प्रत्यक्ष आतल्या अनुभवावरून लिहिलं असावं अशी दाट शंका येते आहे. सरकार कामच करत नाही यावर ठाम विश्वास ठेवून असलेल्या जनतेला अशा वास्तववादाचा डोस अजून मिळाला तर बरं होईल. छान लेखन आहे, घटनांचा वेग योग्य वाटतो. अजून लवकर येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

वाचतेय.पुढील भाग लवकर येवु

प्राजक्ता पवार
Sat, 08/28/2010 - 11:43 नवीन
वाचतेय.पुढील भाग लवकर येवु देत.
  • Log in or register to post comments

लवकर येऊ द्या

विसुनाना
Sat, 08/28/2010 - 11:53 नवीन
नेहमीप्रमाणेच ताकदीचे लिखाण. पुढचे भाग लवकर यावेत.
  • Log in or register to post comments

+१

सहज
Sat, 08/28/2010 - 14:04 नवीन
हेच. वाचतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

तुमच लिखाण आवडत आहे आधीपासुन,

टुकुल
Sat, 08/28/2010 - 12:53 नवीन
तुमच लिखाण आवडत आहे आधीपासुन, पण मला प्रांत म्हणजे कलेक्टर/डेप्युटी कलेक्टर की अजुन कुठली पोस्ट ते अजुन कळल नाही. --टुकुल
  • Log in or register to post comments

अरे वा! 'प्रांत' आले...

बहुगुणी
Sat, 08/28/2010 - 16:44 नवीन
...चांगल्या लेखनाचा छान शिडकावा फारा दिवसांनी मिपावर, बरं वाटलं. राजा साहेबः तुमचं लिखाण आवडतंच, थोडा विस्तृत लिहा प्रत्येक भाग, म्हणजे रसभंग होणार नाही. तुमच्याकडे लिहायला मटेरियल कमी नाही हे स्पष्टच आहे. येऊ द्या पुढचा भाग लवकर, फार वाट पहायला लावू नका.
  • Log in or register to post comments

बॉसी !! आधी का नाही वाचले असे

सुहास..
Sat, 08/28/2010 - 21:31 नवीन
बॉसी !! आधी का नाही वाचले असे वाटुन गेले ...... फॅन झालो आजपासुन.. "आज मिशनरी येतायत, उद्या नक्षल येतील. या भागाचा दंतेवाडा किंवा कंधमाळ व्हायला वेळ लागणार नाही " हेच आणी अगदी असेच , ईर्शाळ्यापासुन ते पितळखोर्‍यापर्यंत....
  • Log in or register to post comments

उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल

आळश्यांचा राजा
Sat, 08/28/2010 - 23:15 नवीन
उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल सर्वांचेचे मनापासून आभार. (त्यामुळे पुढचं लिहायला थोडं टेन्शन येतं हा भाग वेगळा, पण वाढलेला उत्साह त्या टेन्शनवर मात करतो!) @गुरुजी प्रांत म्हणजे काहीतरी भौगोलिक असं खुद्द प्रांतांनाही ते प्रांत होईपर्यंत वाटत असे असं (विश्वसनीय वगैरे सूत्रांकडून) समजतं ;-)
सरकार कामच करत नाही यावर ठाम विश्वास ठेवून असलेल्या जनतेला अशा वास्तववादाचा डोस अजून मिळाला तर बरं होईल
असा ठाम विश्वास बनायला काय कारणं असावीत तेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. @टुकुल वेगळा धागा टाकतोय. @श्रामो पाप आमचं आणि शिक्षा प्रांतांना? सुगम भागात/ साइड पोस्टिंगला गेल्यावर आम्ही गोष्टी कुणाच्या सांगायच्या? त्या वेताळा (अवलिया फेम) सारखं कायम बिचार्‍यांना दुर्गम आदिवासी भागात रहावं लागणार, प्रांत याच पोस्टवर, प्रमोशन/ डिमोशन इ. न होता! त्यांचं वयही वाढणार नाही हे वे सां न ल! ;-) आणि काय हो, तुमच्या नोंदी दिसत नाहीत आजकाल. तुमचीच बदली करायची वेळ आलेली दिसते!
  • Log in or register to post comments

आळ्शांचा राजा

विद्याधर३१
Sat, 10/02/2010 - 17:54 नवीन
आळ्शांचा राजा कुठे आहात? पुढ्चा भाग लवकर टाका .
  • Log in or register to post comments

फारच छान

गुंडोपंत
Sat, 10/02/2010 - 18:02 नवीन
जबरी लेखन. फार आवडले आहे. पुढील भागाची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

पुढील भाग?

diggi12
Wed, 05/22/2024 - 22:25 नवीन
पुढील भाग?
  • Log in or register to post comments

वर अनुक्रमणिका आहे

श्रीरंग_जोशी
Wed, 05/22/2024 - 23:34 नवीन
लेख सुरू होण्यापूर्वी अनुक्रमणिका आहे. या लेखमालिकेतल्या पुढच्या ५ भागांसह या लेखमालिकेच्या सर्व भागांचे दुवे अनुक्रमणिकेत ड्रॉप डाऊन प्रकारे उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: diggi12

सर

diggi12
Tue, 07/02/2024 - 15:54 नवीन
सर या लेखाचा पुढचा भाग नाही आहे त्यात
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा