Skip to main content

ते हृदय कसे आईचे......

लेखक पैसा यांनी रविवार, 22/08/2010 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
आमची मनी, म्हणजे मनीमावशी. अर्थात वाघाची मावशी. मासे खाणे आणि झोपा काढणे हा तिचा अत्यंत आवडता उद्योग. तिचा जन्मच आमच्या घरात झाला. त्यामुळे घरातील सर्वांची अतिशय लाडकी. आहे तशी गुणी. कधी कोणाला नख लावत नाही. की चावत नाही. तिला पहिल्यांदा पिल्लं झाली तेव्हा तिने मला रात्रभर सोबत बसवून ठेवलं होतं, एवढा माणसांवर विश्वास ठेवते. खूपच मायाळू, म्हणजे मधेच मांडीवर येऊन बसेल आणि रोज सकाळी पोळी भरवून घेईल. खूप लाड करून घेते. तिची पिल्लं लहान असतानाची ही हकीकत. एकदा रात्री एक मोठा बोका चोरपावलांनी घरात घुसला. आम्ही सगळेजण झोपेत होतो. मनीने सरळ त्याच्यावर हल्ला चढवला. आवाज ऐकून आम्ही सगळे जागे झालो. पहातो तर काय, तो बोका खिडकीतून पलायन करण्याच्या प्रयत्नात होता. मनीने त्याचा पाठलाग सुरू केला. खिडकीतून बाहेर, मग रस्त्यावर, मग पाठच्या डोंगरावर. बोका पुढे आणि मनी मागे अशी शर्यत आम्ही पाहिली. बरेच वेळाने मनी परत आली. मी म्हटलं आला गल्लीचा दादा परत. पण तेव्हापासून तो बोका परत आला नाही. आता रात्री मनी पिल्लांपासून थोडी दूर बसून रहाते. कारण एखादा बोका आला तर? पिल्लं थोडी मोठी झाली. मनी हळू हळू पिलांना घेऊन बाहेर जायला लागली. एकदा त्यांचा शिकारीचा खेळ रंगात आला होता. मी बाल्कनीतून ते मनोरंजक दृश्य बघत होते. एवढ्यात रस्त्यावरून 4/5 कुत्रे भुंकत आले. आम्ही रहातो त्या बिल्डिंगला कुंपण नाही. थेट रस्ताच आहे. त्यामुळे कुत्रे पिलांच्या दिशेने आले. पिल्लं घराकडे पळायला लागली. आणि त्यांची आई? ती सरळ अंग फुलवून कुत्र्यांवर धावून गेली. काय झालं हे लक्षात येताच मी बाल्कनीतून खाली धावले. मनीला कुमक आलेली पाहताच कुत्रे मागे फिरले. तोपर्यंत पिल्लं घरात पोचली होती. मनी गुरगुरत जागीच बसून राहिली. मी आमच्या झाशीच्या राणीला उचलून घरात आणलं. थोड्याच वेळात जणू काही झालंच नाही अशा प्रकारे त्यांचा खेळ परत चालू झाला. आता या विलक्षण प्रसंगाची आठवण झाली तरी थरकाप होतो. त्या कुत्र्यांपैकी एखाद्याने मनीची मानगुट धरली असती तर ती तत्काळ यमसदनाला पोचली असती. पण त्या क्षणी तिने कसलाही विचार न करता कुत्र्यांवर हल्ला चढवला. आता तिला या प्रसंगाची आठवण सुद्धा नसेल. शेवटी प्राणी ना! पण या दीड वर्ष वयाच्या आईत सुद्धा तीच वैश्विक भावना जागृत आहे. कुणीतरी म्हटलं आहे ना, “प्रत्येक ठिकाणी शारीर रुपात उपस्थित रहाणं परमेश्वराला शक्य नाही, म्हणून त्याने आईची योजना केली.”
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4935
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

मस्त लेख... प्रत्येक ठिकाणी शरीर रुपात उपस्थित रहाणं परमेश्वराला शक्य नाही, म्हणून त्याने आईची योजना केली हे एकदम मस्त..पण उगाच माकडीणीची कथा आठवली..

प्रत्येक ठिकाणी शरीर रुपात उपस्थित रहाणं परमेश्वराला शक्य नाही, म्हणून त्याने आईची योजना केली..... खरय...

मस्त...तुमची मनी खूप आवडली... अवांतर: सगळ्याच आया अशा नसतात...काही देवाच्या ऐवजी सैतानाने सुद्धा पाठवलेल्या असतात.

"मांजर व्हा" असा काहीसा धमाल धडा आठवला ! लेखक आठवत नाही बहुधा रमेश मंत्री , आठवत असल्यास सांगा ! लेख मस्तच !

हिच मनिआइ काहि दिवसांनी पिलांशी तुटक वागायला लागते आणि पिलान्ना काही झेपत नाही हा काय प्रकार आहे तेव्हा पिलांची दया येते. आमच्या मनिने पल्ले मोठी झाल्यावर स्वत:हुन घर बदलले. भेटायला मात्र यायची, पण एका पिल्लालाही जवळ येवुन द्यायची नाही. बायदवे लेख छान आहे.

मनी आवडली. स्वाती

सर्व वाचकांना आणि प्रतिसाद लिहिण्यासाठी आपला वेल खर्च करणार्‍यांना मनापासून धन्यवाद. इथले एक एक सुरेख लेख आणि त्याहून भारी प्रतिक्रिया वाचून भीत भीत पांढर्‍यावर काळं करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. पण खूप छान वाटलं. खरंच धन्यवाद.

व्वा व्वा मनी चे लेखन आवडेश :) लेखावरुन एक गाणे आठवले - शुक शुक मन्या जातोस की नाही शुक शुक ! अगं नको गं मने तुला न शोभे तुझ्या मन्याला असं हे टाकून बोलणं !