Skip to main content

कंट्रोल झेड

लेखक अविनाश ओगले यांनी मंगळवार, 03/08/2010 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीतल्या नवरा बायकोंचं एकमेकाशी पटेनासं झालं काउन्सिलिंगला कपल शेवटी आमच्यापाशीच आलं (मी विचारलं, हं सांग रे लग्न कसं ठरलं? तो म्हणाला..) माझं सर्फींग चाललं होतं, ही विंडोत उभी दिसली सहज पिंग केलं तशी सांगतो काय गोड हसली आयडिया केली, आयडी शोधला, चॅटींगला इन्व्हाईट केलं डेटाफाईल डाउनलोड केली, सांगा काय वाईट केलं? फेसबुक, ऑर्कुट, हायफाय भेटी, मेसेज, मेल रोजच्या रोज कॉन्फिग्रेशन जुळतंय वाटलं, मॅरेजसाठी केलं प्रपोज (नंतर आमचं लग्न झालं... आता कळून चुकलंय...) सुंदर आहे देखणी आहे पण नको तितकी बडबड आहे हार्डवेअर तसं चांगलं, पण सॉफ्टवेअरमध्ये गडबड आहे किचनमध्ये हिचं मन जरा सुद्धा रमत नाही आयटीतल्या या मुलीला साधी भातआमटी जमत नाही हट्टी, आळशी, हेकेखोर साध्या गोष्टीत करते प्रॉब्लेम व्हायरस तेव्हा गावलाच नाही, कुणाला आता करायचं ब्लेम (मग तिनं तिची बाजू मांडली) हिरमुसलेली चिडून म्हणाली, याची माझी नोकरी निराळी मी दिवसा कामाला जाते, याची नेहमीच रात्रपाळी मी ही कमावते, याला म्हटलं, घरकामात कशाला मरु स्वयंपाकपाणी, धुणीभांड्यांचं सरळ आउटसोर्सिंग करु कामाचा इतका ताण, प्रोजेक्ट म्हणजे नसतो खेळ हा मिसकॉल देतो तेव्हा, मला बघायलाही नसतो वेळ महिनोन्-महिने भेट नाही, संसार पार घसरलेला सुखाचं क्रेडिटकार्ड हातात, पासवर्ड मात्र विसरलेला (संसार मोडू द्यायचाच नव्हता, मी समजूत काढत म्हणालो...) सोसणं आणि सॅक्रिफाईज हाच संसाराचा असतो अर्थ मॅरेजीस आर अरेंज्ड इन हेवन बट सफर्ड ऑन अर्थ केल्या चुका विसरुन जा, फक्त धरा धीर थोडा असा त्रागा नका करु, डायव्होर्सचा तर विचार सोडा नोकर्‍या बदलतील, काळ बदलेल, भेगा काय सहज सांधाल घरात पाळणा हलल्यावर, कायम कायम सुखानं नांदाल प्रोग्राम त्याचा*, कंट्रोल त्याचा, बदलायचं आपल्यात बळ नसते आयुष्याच्या कीबोर्डावर "कंट्रोल झेड"ची कळ नसते *परमेश्वर. अर्थात System Administrator -अविनाश ओगले
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3837
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

मॅरेजीस आर अरेंज्ड इन हेवन बट सफर्ड ऑन अर्थ
=)) =)) ह्यावरुन Even god hates marriages! He makes them in Heaven and send the couple to Earth! हे आठवले.

छान जमलीये!

ओगलेशेठ, बरेच दिवसांनी आगमन केलेत.. सुंदर आणि समयोचीत कविता.. (वाचक)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

असेच म्हणतो. काका, छान कविता!

In reply to by मेघवेडा

असेच म्हणतो. छान कविता!

In reply to by गणपा

आयडीचे नाव न बघता शीर्षक वाचून भीतभीत कविता उघडली. शब्दकौशल्य लक्षात येताच चमकून आयडी तपासला. बर्‍याच दिवसांनी आले अविनाश ओगले, समयोचित लिहिते झाले - सहमत.

In reply to by धनंजय

हेच म्हणतो.

प्रोग्राम त्याचा*, कंट्रोल त्याचा, बदलायचं आपल्यात बळ नसते आयुष्याच्या कीबोर्डावर "कंट्रोल झेड"ची कळ नसते
एक्दम सही!! मस्त जमली आहे कविता.

हॅ काय वायझेड कविता! अशी प्रतिक्रिया येतीये का पहायला आलो होतो

एकही शब्द आधिक-उणा नाही इतकी नेमकी उतरली आहे कविता, आणि या क्षणाला मिपावर 'प्रासंगिक' वाटली तरी आय-टी/ नॉन आय-टी हा वाद वगळला तर सार्वकालीन विषय आहे. इ मेल मधून फॉरवर्ड करावी इतकी आवडली.

कविता आवडली. मुख्य म्हणजे, समयोचित आहे ! अवांतरः कंट्रोल-झेड : सस्पेंड प्रोग्राम कंट्रोल-सी : किल प्रोग्राम कंट्रोल-डी : एण्ड-ऑफ्-ईन्पुट आयटीतल्या "रात्रपाळी" मुळे कण्ट्रोल-डी होते, आणि त्याची परिणिती कण्ट्रोल-झेड मध्ये लवकरच झाली नाही, तर कण्ट्रोल-सीची शक्यता असते.

In reply to by मिसळभोक्ता

'Undo' साठी वापरलंय कवितेत. तुम्ही Unix वाले दिसताय. :-)

अतिशय मार्मिक आणि समयोचित! वाचायची राहून गेली होती ओगलेशेठ! :) चतुरंग

तुमची ही कविता ई टिव्ही वरील हास्यरंग मध्ये ऐकली होती. छान आहे आवडली.

प्रोग्राम त्याचा*, कंट्रोल त्याचा, बदलायचं आपल्यात बळ नसते आयुष्याच्या कीबोर्डावर "कंट्रोल झेड"ची कळ नसते झकास !!! :)