Skip to main content

आठवणीतल्या मैफली - १

आठवणीतल्या मैफली - १

Published on 24/06/2010 - 11:46 प्रकाशित मुखपृष्ठ
मुंबईला आयायटीत असतानाची गोष्ट. झेवियर्स कॉलेजने 'मल्हार के प्रकार' सादर करण्यासाठी गंगुबाई हनगळाना आमंत्रित केलं होतं. गंगुबाईना माझ्या सांगितीक अनुभूतीच्या अवकाशात एक विशेष स्थान आहे. या कार्यक्रमापूर्वी मी त्यांना रेडिओवर संगीतसभांमध्ये फक्त ऐकायचो. प्रत्यक्ष मैफल ऐकायचा हा पहिलाच योग होता. झेवियर्स मधली ही मैफल बर्‍यापैकी रंगली होती, पण मला काही तरी हवं होतं आणि ते मिळत नसल्याची एक रुखरुख मनाला लागली होती. काय हवं होतं ते नेमकं शब्दात पकडण शक्य नव्हतं कारण तेव्हा संगीताचं तेव्हा तेव्हढं ज्ञान नव्हतं (आताही फार आहे असं नाही!). गंगुबाईनी मल्हारचे ५-६ तरी प्रकार श्रोत्यांसमोर मांडले. रात्रीचे आठ वाजून गेले तेव्हा अचानक त्यांनी गाणं थांबवले. श्रोत्याना अभिवादन केले आणि मैफल संपली असल्याचे सूचित केले. साहजिकच पुष्कळसा श्रोतृवर्ग उठून जाऊ लागला. झेवियर्सचा हॉल बराचसा रिकामा झाला होता पण २५-३० श्रोते तसेच बसून राहिले होते.गंगुबाईनी आणखी काही गावं म्हणून... त्या श्रोत्यांमध्ये मी आणि माझ्या मित्रांचा समावेश होता हे सांगायला नकोच. समोर आशाळभूत पणे बसून राहिलेले श्रोते बघून गंगुबाईना पण उठणे अवघड झाले आणि त्या हसून म्हणाल्या, "हे मल्हारचे प्रकार वगैरे गाणं हे माझं काम नाही. मला आयोजकांचा आग्रह फारच झाला म्हणून गायले. गोड मानून घ्या."एवढे बोलल्यावरही श्रोते ढीम्म जागे वर बसून... शेवटी थोडा वेळ "आता काय करावं" अशा विचारात सापडलेल्या गंगुबाई म्हणाल्या, "बरं...आता मी जरा माझं-माझं गाते" आणि तंबोरे परत सुरु झाले. पेटीनं परत सूर धरला आणि तबल्यावर थाप पडली आणि आम्हा हट्टाने बसून राहिलेल्या नशीबवान श्रोत्याना दिव्य गाणे ऐकायला मिळाले. खास गंगुबाईंचं गाणं. रागाचं नाव माहिती नव्ह्ते (तेव्हा तेव्हढी समज आलेली नव्हती), पण इतका वेळ रुखरुख लागून राहिलेल्या मला त्या दिव्य गाण्याने "आपल्याला हवे असलेले ते हे़च" अशी अनुभूती मात्र दिली. नंतर कळले की तो होता शंकरा. आणि त्या दिवसापासून शंकरा हा माझा अत्यंत आवडता राग आहे. पुढे काही वर्षानी माझी आपोआप श्रोता म्हणून बढती(!) होत गेली (बढती झालेल्या श्रोत्याचं एक लक्षण म्हणजे गायक ज्या तात्पुरत्या केलेल्या लाकडी प्लॅटफॉर्मवर गातात त्या प्लॅटफॉर्मला नाक लावून गाणं ऐकायचं). आयायटीतच स्पिकमॅकेने एक महोत्सव आयोजित केला होता. त्यात गंगुबाई गाणार होत्या. मी त्या महोत्सवाला मुद्दामून पुण्याहून गेलो होतो. आणि त्याच महोत्सवात फरिदुद्दीन डागरांचा आमच्या बॅडमिंटन हॉलचे छप्पर भेदून आकाशाला गवसणी घालणारा हिंडोल मी प्रथम ऐकला. साहजिकच गंगुबाईंच्याकडून पण "असंच काही" ऐकायला मिळावं अशी अपेक्षा निर्माण झाली होती. सकाळचे सत्र होते. त्या १ला राग कोणत्या गायल्या हे आता आठवत नाही पण तो बहूधा अपेक्षा ठेवून गेल्यामुळे असेल माझ्या पसंतीला उतरला नाही, हे मात्र खरं. स्टेजला नाकं लावून जे गाणं ऐकतात त्यांची एक खासियत असते. कलाकाराला फर्माईश करायची संधी त्यांना मिळते. ती संधी मला स्पिकमॅकेच्या महोत्सवात गंगुबाईंच्या गाण्याच्या वेळी मिळाली. सकाळची वेळ होती तरीही मी "निर्लज्ज"पणे शंकरा गायची विनंति केली. "हा कोण मूर्ख सकाळी शंकरा ऐकायला आला आहे", अशा नजरेने त्यांनी माझ्याकडे बघितले आणि डोळे बारीक करून मानेने नाही म्हटले. मी पण थोडा हिरमुसलो. पण नंतर मात्र जे झालं त्याला योगायोग म्हणावं की नशीबाचा वरदहस्त ते ठाऊक नाही. किराणा घराण्यात सहसा न गायला जाणारा, पण माझा मात्र अतिशय आवडता 'देशकार' गंगुबाई गायल्या. एखाद्या लहान मुलाला खुपखुप आवडणारी वस्तू अनपेक्षितपणे मिळाली की ते जसे खूष होते तसं काहीसं झालं. देवानं अक्कल वाटली तेव्हा तू कुठे होतास असं कुणी विचारल तर मी विचारात पडतो. बहूधा मी पृथ्वीवर चाललेल्या मैफलींकडे कान लावून बसलेला असणार...
लेखनप्रकार

याद्या 5509
प्रतिक्रिया 40

मालक, हे लेखन कुठं लपवून ठेवलं होतं? पुढचे भाग? ते बाकी धागे काही काळ बंदच ठेवा, असा वाचक म्हणून हट्ट आहे. तुमचे हे धागे अधिक मूल्याचे आहेत हे वेगळे कशाला सांगू? माझ्याशी इथले अनेक वाचक सहमत होतील.

In reply to by श्रावण मोडक

-हट्टाग्रही

In reply to by राजेश घासकडवी

मोडकांशी तंतोतंत सहमत. युयुत्सशेठ, मजा येते आहे, येऊद्यात पटापट ... ह्या निमित्ताने तुमच्यात आणि तात्यांच्या 'मैफिली' ह्या विषयावर लेख-प्रतिसादांची जुगलबंदी व्हावी ही अपेक्षा. उत्तम लेखन वाचयला मिळेल. ------ (चपला पिशवीत ठेऊन मैफिलीत पुढची जागा पकडणारा ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

अगदी ... स्टेजला नाक लावून ही फर्माईश! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझीपण!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

ए अरे जरा बाजूला सरका... मला नाक लावायला जरा जागा द्या. युयुत्सु...तुम्ही करा चालू फुडच्या मैपिली... आंबोळी

In reply to by आंबोळी

मी पण.. संगीतातल जास्त काही कळत नाही पण तुमचे अनुभव आणी माहीती नक्की आवडेल वाचायला. --टुकुल

In reply to by टुकुल

का बुवा इतर काहीतरी लिहित असता? -Nile

In reply to by प्रभो

सहमत आहे --अवलिया

In reply to by श्रावण मोडक

आता पुढची मैफल कुठली ह्याची आधीच वाट बघतोय. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

छान लेख.. सवडीने केव्हातरी मीही केलेली श्रवणभक्ति लेखमालास्वरुपात मांडीन..यात अनेक जाहीर आणि खाजगी मैफलींचा समावेश असेल..
नंतर कळले की तो होता शंकरा. आणि त्या दिवसापासून शंकरा हा माझा अत्यंत आवडता राग आहे.
शंकरा हा करीमखासाहेबांचा आणि रामभाऊ कुंदगोळकरांचाही अगदी पेट राग.. खासाहेबांची 'आज़ सुहाग' आणि रामभाऊंची 'कल न परे' या बंदिशी प्रसिद्ध आहेत.. अण्णांचा शंकराही काही वेळेला ऐकायचा योग आला आहे. शंकरा गाताना अण्णा नेहमी शुद्ध कल्याणातील एक जागा घेतात. हीच जागा खासाहेबही घ्यायचे.. :) सौ वीणा सहस्रबुद्धे यांचाही शंकरा मला आवडला होता.. गजाजानबुवांचे चिरंजिव, म्हणजे आमचे मधुभाई हे देखील शंकरा अप्रतिम रंगवतात.. देशकार किराण्यात फारसा गायला जात नाही हे खरं आहे.. अण्णा मात्र गातात..त्यांची 'झननन झननन बाजे' ही बंदिश प्रसिद्ध आहे.. देशकार हा खास ग्वाल्हेरचा राग.. गजाननबुवांचं रेकॉर्डिंग, मधुभाई, उल्हासकाका यांचाही देशकार खासच.. येऊ द्या अजूनही.. म्हणजे मलाही प्रतिसादपर काही लिहिता येईल.. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गाणी मला खुप आवडतात. मला कुठल्याही रागाची माहिती नाही.त्यामुळे ज्यादा काही लिहु शकत नाही. पण युयुत्सु खरच छुपे रुस्तुम आहेत. अजुन असेच लेख येवुद्यात. वेताळ

ह्या बाबतीत श्रामोंशी बाडिस. हा घे भीमसेनांनी गायलेला देसकार. भीमसेन हा नियमितपणे गातात. :)

मस्त लिखाण. अतिशय आवडले. ते फुटकळ धागे काढण्यापेक्षा हे असलं काही लिहीत जा पाहू.

In reply to by यशोधरा

>>>मस्त लिखाण. अतिशय आवडले. ते फुटकळ धागे काढण्यापेक्षा हे असलं काही लिहीत जा पाहू. सहमत आहे...! -दिलीप बिरुटे

देश राग ऐकले होते (बजे सरगम हर दिशासे...) आता हा देशकार काय प्रकार आहे? दुवे पण देत जा राव. अजुन मजा येईल. और भी आने दो!

In reply to by सहज

देशकार, भूप यांचे आरोह अवरोह सारखेच आहेत, पण (if I remember correctly) एक बिलावल थाट आणि दूसरा कल्याण थाट. देशकार उत्तरांगप्रधान तर भूप पूर्वांगप्रधान. बरोबर ना तात्या? ;) युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु, आणखी एक विनंती. आता थाट, राग, सूर, वर्ज्य सूर, आरोह-अवरोह अशा संज्ञांसाठी एक लेख लिहू शकाल काय? तसं झालं तर अशा सर्व लेखांचा आणखी थोडा आस्वाद घेता येईल. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आता थाट, राग, सूर, वर्ज्य सूर, आरोह-अवरोह अशा संज्ञांसाठी एक लेख लिहू शकाल काय? तसं झालं तर अशा सर्व लेखांचा आणखी थोडा आस्वाद घेता येईल.
खरं तर या सर्व संज्ञा मी जवळपास विसरून गेलो होतो कारण उदय भवाळकरांकडे शिकताना त्यांनी आरोह-अवरोह पण कधी सांगितले नाहीत. त्यांचा मंत्र एकच - हम गाते है वैसा गाओ और बेशरम होके गाओ ;) युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

त्यांनी आरोह-अवरोह पण कधी सांगितले नाहीत. त्यांचा मंत्र एकच - हम गाते है वैसा गाओ और बेशरम होके गाओ असं पण गाण्याचं शिक्षण असतं हे फार आवडलं.... यावरून पु.ल. देशपांड्यां नी शाळेतल्या विद्यार्थ्यांना गाण्याची आवड निर्माण करण्यासाठी व्याकरणात अडकवू नये, त्यांना आनंदाने गाणी म्हणायला प्रोत्साहन द्यावे, असे सांगणारे एक पत्र मुंबई महपालिकेला लिहिले होते ते गेल्या रविवारच्या लोकरंगात प्रसिद्ध झाले होते त्याची आठवण झाली... लिन्क http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=77193:2010-06-11-10-17-46&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117

In reply to by युयुत्सु

एक बिलावल थाट आणि दूसरा कल्याण थाट. देशकार उत्तरांगप्रधान तर भूप पूर्वांगप्रधान. बरोबर ना तात्या?
थाटाचं माहीत नाही.. परंतु देशकार उत्तरांगप्रधान आणि भूप पूर्वांगप्रधान हे मात्र बरोबर.. :) शुद्ध कल्याण हा भूप-देशकाराचाच एक सखा..परंतु त्यात अवरोहात निषाद आणि तीव्र मध्यमही लागतात. जाताना 'भूप' आणि येताना 'यमन' असं म्हणा हवं तर! :) तरीही शुद्ध कल्याण हा एक वेगळीच खासियत असलेला राग! अत्यंत साजूक आणि सत्विक... शुद्धकल्याणातले हे निषाद आणि मध्यम आमिरखासाहेब फार छान दाखवायचे.. अण्णांचा शुद्धकल्याण हा खरं तर मास्टरपीस.. परंतु आमिरखासाहेबांचा शुद्ध कल्याणही मला फार आवडतो.. तात्या.

युयुत्सु हे एक वाईट गृहस्थ आहेत. इतके दिवस त्यांनी असे काही लिहिता येत असूनही लिहिले नाहीत. त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी असेच भरपूर अजून लिहावे अशी त्यांच्यावर सक्ती करण्यात यावी अशी प्रशासनाला विनंती करतो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आम्हाला संगीतातले ** जरी कळत नसल तरी सहमत आहे प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

ओ की ठो? सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

धागा वाचल्यानंतर लेखकाचे नाव चार चार वेळा तपासले :-) पण शेवटी प्रतिसाद वाचल्या वर खात्री पटली तसे मला गाण्यातले काही कळत नाही पण मैफिलीचे वर्णण आवडले आणि आपणही तिथे असतो तर असे क्षणभर वाटुन गेले... युयुत्सु आणि तात्या या दोघांनीही आपले मैफिलीचे अनुभव लिहावे असे म्हणतो निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

कृपया आता एवढच लिहून थांबू नका. तुमच्या श्रवण-भक्तीबद्दल अजून भरपूर वाचायला आवडेल.

युयुत्सु तुम्ही इतकं सुंदर लिहू शकता राव! अजून येऊदेत. (पिटातला कानसेन)चतुरंग

हा लेख चांगला आहे. पण युयुत्सुंचे आधीचे लेखन वाईट म्हणुन आपण त्यांच्या कार्याला नावे ठेवत आहोत. त्यांनी सर्वप्रकारचे लेखन चालु ठेवावे.

लेख व अनुभव दोन्ही सुंदर! आय आय टी कॅम्पसमधील अश्याच एका श्रवणीय कार्यक्रमाची जुनी आठवण ताजी झाली! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

युयुत्सु शेठ, तुम्ही सांगितलेला फरक अर्थात बरोबर. ओळीने गायचे झाल्यास आधी भुप आणि मग देशकार म्हणजे वर्तुळ पुर्ण. गंगुबाईंचं गाणं खासच. त्यांचा ७८ LP वरचा ३ मिनीटातला भैरवही तसाच. अप्रतीम लेख. - वाटाड्या..

छान लिहिले आहे. पुढे रागाचे आरोह अवरोह , एखादी ध्वनीफित /युट्युब टाका. म्हणजे सर्वांना रागांची अधिक माहिती होईल . मीनल. http://myurmee.blogspot.com/

सर्व प्रतिसादानी मूठभर -कदाचित जास्तच- मांस चढले आहे आणि गेले दीड महिना जिममध्ये चालू असलेल्या मेहनतीवर पाणी पडले! आता डाएटीशिअन आणि इन्स्ट्रक्टरला काय सांगू? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

युयुत्सु यांना मस्त लेखाबद्दल धन्यवाद ... आणि ही लेखमाला अशीच चालू ठेवावी अशी विनंती....

ज्यांना भूप आणि भूपाची भावंडे यांच्यातला फरक समजाऊन घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी भेट द्यावी. http://www.sawf.org/newedit/edit08052002/musicarts.asp real player install केलेला असणे आवश्यक. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

' सुजन कसा मन चोरी' हा भूप आणि' अजि राधाबाला' हा देसकार, असे माझे वडिल सांगायचे ते अंधुक स्मरते. दोन्ही गाणे बालगंघर्वांची आहेत. तात्या व युयुत्सु यांनी वर्णन केलेल्या लक्षणांवर ती बरोबर उतरतात असे वाटते. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सुजन कसा मन चोरी' हा भूप आहे. दूसरे पद ऐकलेले नाही त्यामुळे सांगता येणार नाही. 'प्रिये पहा' मधली १ ली दोन कडवी देशकार मध्ये गातात आणी ३रे जोगियात गातात. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

In reply to by युयुत्सु

सुजन कसा मन चोरी' हा भूप आहे.
मूळ बंदिश 'फुलबन सेज..' ही आहे.. भास्करबुवांनी या बंदिशीवरूनच स्वयंवराकरता 'सुजन कसा..' बांधलं..