पु्स्तक परिचय - 'आशावादी अनुमान' - एक निराशा
पुस्तकांचं पूर्ण नाव 'भारतीय लोकसंख्येचा शोध घेत केलेले माझे आशावादी अनुमान'
लेखक : डॉ. वसंत गोवारीकर.
अनुवाद : सुधा गोवारीकर.
सत्तरीच्या दशकात लोकसंख्येच्या स्फोटाच्या प्रश्नाने भारतातल्याच नव्हे तर जगातल्या विचारवंतांना भेडसावलं होतं. माल्थसने ज्या संकटाचं भाकित केलं ते लवकरच खरं होणार की काय असं अनेकांना वाटत होतं. भारतात लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कुटुंबनियोजनाचा मोठा कार्यक्रम राबवला गेला. या पार्श्वभूमीवर डॉ. वसंत गोवारीकरांनी या समस्येचा अभ्यास करून नव्वदीच्या दशकात एक इंग्लिश पुस्तक लिहिलं, आय प्रेडिक्ट. त्या पुस्तकाचं हे संक्षिप्तीकरण.
खूप आशेने वाचायला घेतलं. एखाद्या प्रश्नावर मूलभूत विचार करण्याची गोवारीकरांची प्रतिमा डोळ्यासमोर होती. तिला अर्थातच तडा गेला नाही. पण एकंदरीत मांडणीमुळे रसभंग झाल्यासारखं वाटलं.
सुमारे पंच्याहत्तर पानाच्या पुस्तकात, पहिली साठ पानं हे लोकसंख्येच्या प्रश्नाची जटिलता मांडण्यात घालवली आहेत. शेवटच्या दहा पंधरा पानात आशावादी भाकित. बरं, ती जटिलता मांडताना देखील एक आवश्यक सूत्रबद्धता पाळलेली नाही. अभ्यासक व तज्ञ काय म्हणतात याचा तो एक विस्तृत लिटरेचर सर्व्हे आहे. त्यातही प्रत्येक अभ्यासक त्या मोठ्या प्रश्नाबाबत काय म्हणतो हे थोडक्यात लिहिलेलं आहे. त्यामुळे वाचताना अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचे अगदी छोटे संक्षेप एकापाठोपाठ एक वाचल्यासारखं वाटतं. लोकसंख्यावाढ हा प्रश्न आहे का? असल्यास तो किती बिकट आहे? तो सोडवण्यासाठी आव्हानं काय आहेत? ती कशी सोडवता येतील? त्यात किती यश येतं आहे? आणि याचा आढावा घेऊन भविष्यातल्या आशावादाची कारणं काय? अशी संगती नाही. त्यामुळे वाचताना अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचे अगदी छोटे संक्षेप एकापाठोपाठ एक वाचल्यासारखं वाटतं.
पुस्तकात माहिती भरपूर आहे. र. धों. कर्वेंनी तत्कालीन वैचारिक वातावरणाच्या खूपच पुढे जाऊन लोकसंख्या नियंत्रणाचे विचार आग्रहाने कसे मांडले याविषयी माहिती येते. आकड्यांच्या पलिकडे जाऊन लोकसंख्यावाढ म्हणजे काय, ती कुठच्या टप्प्यांमधनं होते, विशेषत: भारतात तीमुळे काय अडचणी येतात (अन्न उत्पादनासाठी मर्यादा जमिनीची नसून पाण्याची आहे) तीवर मात करण्यासाठी काय पावलं उचलावी याबाबत वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार वाचायला मिळतात. पण पुन्हा एखादा हिरा फिरवून त्याचे वेगवेगळे पैलू एकामागोमाग एक, तुकड्यातुकड्यात दिसावेत तसं होतं. संपूर्ण हिरा एकदम प्रतीत होत नाही. ते चित्र तुकडे जोडून करावं लागतं.
गोवारीकरांचे विचार पटण्यासारखेच आहेत. थोडक्यात त्यांचं म्हणणं असं, की प्रगतीच्या टप्प्यावर प्रथम वेगाने मृत्यूदर कमी होतो. मग हळुहळू जन्मदर कमी होतो. तरीही मृत्यूदर कमी होतच असतो, जन्मदर कमी होण्याचं प्रमाण हळू असतं. पर्यायी लोकसंख्या वाढीचा दर वाढतच असतो. त्यानंतरची पायरी म्हणजे मृत्यूदर खूप कमी झाल्यामुळे तो अजून फारसा कमी होत नाही, किंवा हळुहळू कमी होतो. मात्र जनता सुजाण झाल्याने, नियमनाची साधनं व ती वापरण्याचं ज्ञान पसरल्यामुळे जन्मदर वेगाने कमी व्हायला लागतो. इथे आपल्याला प्रथम लोकसंख्यावाढीचा दर कमी होताना दिसतो. (लोकसंख्या अर्थातच वाढतच असते...) त्यांनी हे पुस्तक लिहिलं तेव्हा भारत या टप्प्यावर होता. याचा अर्थ प्रगती आखलेल्या मार्गाने चालू आहे, आणि असेच प्रयत्न चालू राहिले तर जन्मदर व मृत्यूदर एकाच पातळीवर येऊन लोकसंख्या स्थिरावते. काही दशकांनी हे भारतात होईल.
यामागे सरकारी योजनांचा हातभार आहेच, पण खरं श्रेय ते लोकांना देतात. नियमन करता येतं ही नवीन जाणीव, मोजकीच मुलं असतील तरी ती जगतील अशी खात्री, व नियमन करण्यात फायदा आहे हे गणित करण्याची क्षमता लोकांमध्ये असते. या जोरावर जशी सामाजिक आरोग्याची व साक्षरतेची परिस्थिती सुधारते तसतसे आपण होऊनच लोक पावलं उचलतात. म्हणजे हा प्रश्न केवळ जननक्षमतेचा किंवा अमुक एक संख्येत नशी बंद करण्याचा नसून अधिक विशाल, सामाजिक स्वरूपाचा आहे.
मात्र आशावादी अनुमानांत ते म्हणतात की
- पुढच्या पाच वर्षांत (1995 च्या आसपास) वार्षिक वृद्धीदर 1.42 टक्के इतका होईल. (2001 च्या जनगणनेत यापेक्षा अधिक दर होता असं मला आठवतं आहे)
- भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होणार नाही. (चीनसारखे कठोर नियम न अवलंबता)
- शेवटच्या टप्प्यात संक्रमण होऊन लवकरच वाढीचा दर जवळपास शून्यावर येईल.
- लोकशाही मार्गाने हे साध्य झालं हे दर्शवण्यात भारत यशस्वी होईल. (आणीबाणीतल्या काही घटना वगळता)
एकंदरीत आशावादी अनुमानं आकड्यांनी अचूक नसली गुणात्मकदृष्ट्या बरोबर वाटतात. पण पुस्तकाच्या मांडणीमुळे वा संक्षेपामुळे उत्तम माहिती ही तुटकरीत्या आली आहे. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे असमाधानकारक असं वैचारिक कोलाज वाटतं.
वर्गीकरण
इंटरेस्टी
नकारात्मक
In reply to नकारात्मक by डॉ.श्रीराम दिवटे
हा
In reply to नकारात्मक by डॉ.श्रीराम दिवटे
मुद्दा
In reply to मुद्दा by श्रावण मोडक
>>>
एका
ह्म्म्म..
परीक्षण
In reply to परीक्षण by भडकमकर मास्तर
धन्यवाद
Inevitable Billion Plus
In reply to Inevitable Billion Plus by आळश्यांचा राजा
भरपूर पगार
ओळख आवडली
पुस्तकपरि
पुस्तक
In reply to पुस्तक by कानडाऊ योगेशु
होय
माल्थुशियन
In reply to माल्थुशियन by मिसळभोक्ता
किती काळ?