Skip to main content

हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 07/04/2010 09:57 या दिवशी प्रकाशित केले.


हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता

हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता
का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||


मी रोगजर्जर, असूनी पंगू, मरण समोर उभे, काळ
अपेक्षीत तुला मी अजूनी रहावा थोडा वेळ
दैवगती ही अशीच राहे, जीवन मिटे हे, न जगता

का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||

तू नच अभागी, मीच कमनशीबी, अर्धीच आयुष्यरेषा
अधूरेच आयुष्य ,जगलो, उरली न काही आशा
शोक नको, जन्मेन पोटी पुन्हा, असशील तू माझीच माता ||२||

का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||

(वरची एक ओळ अशीही वाचता येईल : अधूरेच आयुष्य जगलो, उरली न काही आशा)

हे माते, कुरवाळ पुन्हा, अश्रू पडू दे डोई, थापटता
नंतर आक्रंदू नको, वात्सल्य संपवू नको, राख माझ्याकरता
हलकेच हातांनी भरवण्याचा हट्ट पुरव आता जाता जाता ||३||
का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०४/२०१०

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1896
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

पाठ्यपुस्तकातल्या कवितेची आठवण झाली.
जुन्या स्टाईलची वाचनीय कविता.
अशीच एक कविता होती.त्यातली पहीली ओळच फक्त आठवतेय.
..धीर धरी शोक आवरी जननी,भेटेन नऊ महिन्यांनी..
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.


चांगली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara