Skip to main content

मराठी ५० वर्षांनंतर कशी असेल?

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 17/03/2010 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रसंगः आमच्या कंपनीच्या बसमध्ये एका बाकावर दोन मुली आणि एक मुलगा असे तीन मराठी वीर बसले होते. मी स्थानापन्न होत असतांना ऐकलेला संवाद असा: एक मुलगी: अगं ते खलबत्त्यात कुटून घ्यायचं. दुसरी: खलबत्ता म्हणजे? पहिली: तुला खलबत्ता माहित नाही? तुला माहिती आहे का रे? शुंभः (नंदीबैलासारखी मान हलवत) नाही. पहिली: अगं खलबत्ता म्हणजे कुटण्यासाठी एक लोखंडाचं भांडं असतं आणि एक जाड वजनदार असा लोखंडी रॉड असतो. त्याला बत्ता म्हणतात आणि ज्या भांड्यात कुटतात त्याला खल म्हणतात. मिक्सर वापरात येण्याआधी कुटण्यासाठी खलबत्ता वापरत असत. अजूनही खेड्यांमध्ये वापरतात. दुसरी: मग ते इतिहासात खलबत असलं काहीतरी असायचं ते काय असायचं? पहिली: ते वेगळं. ते खलबत म्हणजे जहाज! मी: (मनात) नाही गं माझ्या मैने, ते गलबत! गलबत म्हणजे जहाज. आणि खलबत म्हणजे सुमडीत केलेली चर्चा, ऊहापोह, योजना तयार करण्यासाठी केलेली बोलणी! (मोठ्याने जाऊन सांगावं असं वाटलं पण स्वतःला आवरलं.) शुंभः (अजून शुंभासारखेच भाव) असं आहे होय! दुसरा प्रसंगः एक ओळखीची मुलगी आणि मी असचं गप्पा मारत बसलो होतो. मी माझी कुठेतरी झालेली फजिती सांगत होतो आणि बोलता बोलता "मी खजील झालो" असे वाक्य बोललो. ती हसत सुटली. मी: (विस्मयाने) काय झालं हसायला? ती: खजील म्हणजे? मी: अगं खजील म्हणजे काय हे तुला माहित नाही? ती: नाही. मला एकदम 'फाजील' आठवलं आणि हसू आलं. मी: अगं फाजील वेगळं आणि खजील वेगळं. खजील म्हणजे एम्बरासमेंट होणे किंवा एकदम आपली चूक लक्षात येऊन चपापणे. ती: आणि फाजील म्हणजे काय? हिंदी पिक्चरमध्ये वकील "मेरे फाजील दोस्त" करत असतात नेहमी. पण फाजीलचा मराठी अर्थ काहीतरी 'वेगळा' आहे ना? मी: अगं फाजील हा बहुअर्थी शब्द आहे. फाजील म्हणजे चावट असा ही होतो. फाजील म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त असा ही होतो. इंग्रजीमध्ये एक्सेस चा जो अर्थ आहे तोच अर्थ फाजीलचा मराठीमध्ये आहे. म्हणजे शेतातले फाजील पाणी काढून टाकावे याचा अर्थ शेतात साठलेले ज्यादा पाणी काढून घ्यावे. आणि हिंदी पिक्चरमधला फाजील हा उर्दू असावा पण त्याविषयी मला नक्की माहिती नाही. संदर्भावरून त्याचा अर्थ जाणकार, इतरांपेक्षा जास्त माहिती असलेले असा असावा असे वाटते. आम्हाला आमची आजी कधी-कधी "पुरे झाला आता फाजीलपणा" असे म्हणायची. त्याचा अर्थ की आता चेकाळणे, मस्ती करणे पुष्कळ झाले; आता नीट वागा. एकंदरीतच काहीतरी मर्यादेपलिकडे असा फाजीलचा अर्थ आहे आणि प्रसंगानुरुप त्याच्या विविध अर्थछटा निघतात. ती: ह्म्म्म्म... तिसरा प्रसंगः आम्ही कंपनीच्या कँटीनमध्ये (चकाट्या पिटत) बसलो होतो. दोन मराठी मुली आणि मी ! कशावरुनतरी मराठी वृत्तपत्रांचा विषय निघाला. आणि अग्रलेखांचा बादशाह 'नवाकाळ' चा विषय निघाला. अग्रलेख हा शब्द उच्चारल्यावर- पहिली: बाप रे, कितने सालों बाद ये वर्ड सुना. मेरे ग्रँडफादर को मैं बचपन में 'महाराष्ट्र टाईम्स' के अग्रलेख पढ के सुनाती थी. (ही मुंबईची असणार हे जाणकारांनी ओळखले असेलच. मुंबईमधल्या बहुतेक सगळ्या ० ते ४० वयोगटातल्या मराठी लोकांना (अपवाद आहेत) नीट मराठी वाचता, लिहिता येत नाही, याचा त्यांना अभिमान असतो, दिवसातून कमीत कमी एकदा ही गोष्ट ते अभिमानाने सगळ्यांसमोर जाहिर कबूल करतात, कायम हिंदीत बोलतात, मराठीत बोलतांना अडखळतात, कुणीतरी फासावर लटकवेल अशी भीती चेहर्‍यावर बाळगून चोरी केल्यासारखे अशुद्ध मराठी बोलतात, मोजून १० सेकंदांनंतर पुन्हा हिंदीवर येतात, इंग्रजीची बोंब त्यांच्या इंग्रजी बोलण्यावरून जगजाहिर करतात, पुलं, कुसुमाग्रज यांना ऐकून माहित असतात, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर वगैरे मंडळी कुठल्या ग्रहावरची असा चेहरा त्यांचा विषय निघाल्यावर करतात, नारायण सुर्वे, कवी ग्रेस, ना. घ. देशपांडे, रमेश मंत्री हे निकारागुआ मधले रहिवासी असावेत असा यांचा विश्वास असतो, मराठी वृत्तपत्र वाचणे म्हणजे एकदमच गावठी कृत्य असं यांना कुणीतरी बाबा बंगालीने किंवा यांच्या हिंदीभाषक ज्ञानी मित्रांनी सांगीतलेलले असते. कुणी अस्खलित मराठी बोलत असल्यावर त्याच्याकडे हे तुच्छतेने बघतात आणि मोडकं-तोडकं हिंदी किंवा इंग्रजी बोलणार्‍यांच्या कळपात घुसून तसचं बोलण्यात धन्यता मानतात. मराठी सिनेमे, नाटकं वगैरे यांना अगदीच डाऊनमार्केट वाटतं. ग्रुपमध्ये 'अवतार' किंवा 'द हर्ट लॉकर' किंवा 'रॉकेटसिंग' विषयी हिरिरीने बोलतात पण 'नटरंग'चा विषय निघाल्यावर मात्र कसलं बोअरिंग डिस्कशन चाललयं असा भाव चेहर्‍यावर आणतात. बरं यांचं हिंदी देखील अगदी सुमार दर्जाचं असतं. एकूणच कुठल्याच गोष्टीचं सखोल ज्ञान नसलेला, अर्धवट हिंदीत बोलणारा आणि मुंबईला 'बॉम्बे' म्हणणारा कुणी मराठी इसम आपल्या पाहण्यात आला तर तो मुंबईचा आहे असे बिनदिक्कत समजा.) मी: तू आता मराठी पेपर वाचत नाहीस का? पहिली: नही यार, हम तो डीएनए पढते हैं. मराठी मैं ठीक पढ नही पाती....(काहीतरी बघत असते) अरे वो देखो एक गाडी खडी हैं ब्रिंक्स आर्या लिखा हुआ हैं उसपे. वो हमारे कँटीन को ब्रेड सप्लाय करते हैं क्या? मैंने बहुत बार देखी हैं ये गाडी कँपस में. मी: (अगं माझ्या हुशार मैने, असं काय करतेस, जरा बघत जा ना नीट) आयसीआयसीआय बॅंकेच्या एटीएम मशिन्समध्ये कॅश लोड करतात ते. त्याचं काँट्रॅक्ट ब्रिंक्स आर्या या कंपनीचं आहे. पहिली: ओह, ऐसा हैं क्या.... दुसरी: हो, वैसाईच हैं वो. वरचे प्रसंग बघता मराठीचं पुढल्या ५० वर्षात काय होईल हो? नक्राश्रू, राका, राकट, कातळ, कळकट, विचक्षण, ज्ञानपिपासू, विहंगम, हुंकार, प्रबुद्ध, हतबुद्ध, पाटा-वरवंटा, रवी (घुसळण्याची), महामेरु इत्यादी आणि असे बरेच शब्द इतिहासजमा होतील की काय? मराठी ही फक्त सपोर्ट लॅग्वेज म्हणून शिल्लक राहिल की काय? "मी आधी एग व्हाईट आणि यलो एका पॅनमध्ये बीट करून घेतलं आणि मग त्यात हाफ कप शुगर आणि कार्डमम पावडर टाकलं...वॉव, तुला प्रमोशन मिळालं...आता तर माझा पार्टीचा हक बनतो...." असलं मराठी वापरणार आहोत की काय आपण? हाय रे कर्मा, ये क्या सितम हैं, ये क्या जुलम हैं!!! --समीर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17310
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

मला वाटते इथे जातींचा तितकासा संबंध नाही. सामाजिक पार्श्वभूमीचा देखील संबंध नाही.
मूळ लेख वाचून असे वाटले नाही. उदा: आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो. इंग्रजी नीट येत नसल्याचा न्यूनगंड बहुजन समाजात दिसतो. दोहोंत फरक आहे. पुल, कुसुमाग्रज ऐकूनच माहीत असणे, ग्रेस वगैरे माहीतच नसणे वगैरे आपले आक्षेप पाहाता यात हे गृहित दिसते, की मराठी साहित्याविषयी किमान जाण प्रत्येक मराठी माणसास असावी. ग्रामीण आणि नागर बहुजन समाजात हे गृहितक कधीच रास्त नव्हते. त्यामुळे पुन्हा टीकेचा रोख विशिष्ट (ब्राह्मणी) जातींकडे असावा, असे वाटते. मराठी वृत्तपत्र वाचणे - बहुजन समाजातले तरूण मराठी वृत्तपत्रे अजूनही वाचतात. सामना/म.टा/नवाकाळ/पुढारी/लोकमत वगैरे वाचताना तरुण दिसतात (लोकसत्ता मात्र क्वचितच!). मुंबईत म.टा.ने तर या तरुणाईस मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचले असावे. ते इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा प्रयास करीत असतात, पण राजकारण, चालू घडामोडी, वगैरेंचा स्रोत मराठी असतो. मराठी चित्रपट - नटरंग हा बहुजन तरुणाईचा सध्याचा सर्वात लोकप्रिय चित्रपट आहे. ते अवतार बघतीलही, पण 'हर्ट लॉकर'? छे छे! ऑस्कर विजेते गंभीर चित्रपट पाहणे हे या समाजात रुढ नाही. यामुळे निरीक्षणे ब्राह्मणी वर्गातूनच आली आहेत, आणि म्हणून प्रातिनिधिक नाहीत, असे वाटले. बहुजन समाजात स्वतःविषयी न्यूनगंड असतो, पण मराठीविषयी तुच्छता नसते, असा आमचा अनुभव आहे. राज ठाकरे त्यांना का भावतात, याचे एक कारण हा मराठीविषयीचा अभिमान आहे. ब्राह्मणी वर्गात आपली निरीक्षणे योग्यच आहेत. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

जातिवाचक उल्लेख अगदीच अवांतर आहे.
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो
अजिबात सहमत नाही.

In reply to by Dhananjay Borgaonkar

आपले म्हणणे नीटसे कळले नाही.
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो अजिबात सहमत नाही.
मूळ लेखकास असे वाटते, की मराठी न येण्याचा अभिमान बर्‍याच मराठी युवकांमध्ये दिसतो. आम्ही म्हटले की निरीक्षण ब्राह्मणी वर्गावर आधारलेले दिसते, त्यामुळे हे ब्राह्मणी वर्गात दिसते, असे म्हणता येईल. बहुजन समाजात हा अभिमान आम्हांस दिसत नाही. आपण नक्की कशाशी सहमत नाही, ते कळले नाही. आपल्या मते हा अभिमान मराठी युवकांत एकंदरीतच दिसत नाही, की ब्राह्मण युवकांत दिसत नाही की आणखी काही? - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

In reply to by चिंतातुर जंतू

आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो. मला असे वाटत नाही. मराठी नीट येत नसल्यचा अभिमान सरसकट सगळ्या जातीतल्या लोकांमध्ये दिसतो. मी ज्या माझ्या सहकार्‍यांची उदाहरणे सांगीतली आहेत त्यात ब्राह्मण कुणीच नाही. किंबहुना मराठी नीट येत नसल्याचा अभिमान मला मुंबईच्या तरुणांमध्ये जास्त आढळला. त्यांच्यात जातीचा कुठे संबंध आल्यासारखे वाटले नाही. मुंबईचा मराठी तरुण हीच एक जात. उलटपक्षी ब्राह्मण समाजात थोडे सोवळे वातावरण असल्याने आणि जागृती जास्त असल्याने ब्राह्मण समाजातील तरूण त्यातल्या त्यात जास्त बिनधास्तपणे मराठी (बर्‍याच अंशी शुद्ध) बोलतांना, मराठी चित्रपटांवर हिरीरीने बोलतांना आढळतात. आजकालच्या शहरी वातावरणात सगळी सरमिसळ झालेली आहे. आमच्या कार्यालयात सफाई करणारे दोन मराठी तरूण एकमेकांशी मराठी येत असून देखील हिंदीमध्ये बोलतात. चारचौघात बोलतांना आपण बोललेले हिंदी इतरांच्या कानावर गेले म्हणजे आपली पत वाढते असा एक गैरसमज बर्‍याच तरुणांमध्ये आहे. त्यातलेच हे उदाहरण. बहुजन समाजातले तरूण मराठी बोलतात पण याच समाजात हिंदीच्या अव्वल असण्याच्या गैरसमजाचा पगडा देखील दिसतो. मी जर त्यांच्याशी मराठीत सुरुवात केली तर ते हिंदीत बोलतात. एका रुग्णालयात चतुर्थ श्रेणी मावश्या माझ्याशी प्रत्येक भेटीत हिंदीतून बोलत असत. मी मराठीच बोलतो हे लक्षात आल्यावर त्या नाईलाजाने मराठीतून बोलत असत. याला मराठीचा न्यूनगंड नाही तर काय म्हणावे? बहुजन समाजातील तरूण मराठी वृत्तपत्र वाचतात पण ते अगदी वरवरचे. आणि खूप कमी बहुजन तरूण वृत्तपत्र वाचतात. 'पोलीस टाईम्स', 'संध्यानंद' इत्यादी भडक वृत्तपत्र वाचण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून ते हिंदीतून संवाद साधायचा प्रयत्न करतात. हिंदी देखील व्यवस्थित येत नाही म्हणून आपापसात मराठीत बोलतात. जर त्यांना यापैकी एखादी भाषा व्यवस्थित आली असती तर कदाचित त्यांनी देखील तिचा सर्रास वापर केला असता. सध्याच्या घडीला ते आपापसात मराठीत बोलतात यावरून त्यांना मराठीचा न्यूनगंड नाही हे सिद्ध होत नाही कारण त्यांच्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या हिंदीतून बोलण्याच्या अट्टाहासात त्यांचा मराठी किती कुचकामी आहे हा न्यूनगंड दिसून येतोच. साहित्याची जाण प्रत्येकाला असावी हा निकष नाहीच. मी काही उदाहरणे दिली आहेत आणि ती एका विशिष्ट अपेक्षांच्या दृष्टीकोनातून दिलेली आहेत. एका ३६ वर्षाच्या आयटी क्षेत्रात वरच्या दर्जाचे काम करणार्‍या मराठी युवकाला निदान साहित्याविषयी अगदी थोडी माहिती असावी ही अपेक्षा निराधार नाही. त्याने कमीत कमी कालचे वृत्तपत्र वाचलेले असावे आणि त्यात विंदांच्या मृत्यूची बातमी त्याने वाचलेली असावी ही अगदी न्यूनतम अपेक्षा त्याच्याकडून ठेवणे अजिबात गैर नाही. ही अपेक्षा मी रुग्णालयात काम करणार्‍या चतुर्थ श्रेणीतल्या मराठी कामगारांकडून खचितच करणार नाही. सगळ्यांकडून अपेक्षा एकच की मराठीची लाज वाटू देऊ नका. आज मराठी लोकांमध्ये (थोड्या फार प्रमाणात सगळ्याच जातींमध्ये, स्तरांमध्ये) मराठीचा न्यूनगंड दिसतो. मी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे शेवटी मुद्दा लाज न वाटू देता मराठी वापरण्याचा आहे. मराठीचा अभिमानाने वापर होत नाही ही सार्वत्रिक समस्या मांडणे हा माझा हेतू होता. यात जातीचा आणि सामाजिक पार्श्वभूमीचा संबंध आहे असे मला अजूनही वाटत नाही. --समीर

मुंबई-पुण्याच्या वादाचा काय फायदा परिस्थीती बदलायला प्रयत्न करायला हवा... हेच ते. हेच ते. माझंदेखील हेच म्हणणं आहे. पण हा बोरु बघा की. लिहून लिहून झिजला तरी खोड जात नाही.

मराठी न येण्याचा अभिमान मुंबईच्या काही मराठी युवकांत असेल असेल हे तेवढे पटत नाही.पण आपण शिकले पाहिजे हा विचारही दिसत नाही.मराठी न बोलण्याचे मुख्य कारण राज्यात हिंदीचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार हेच होय.म्हणूनच हिंदी+इंग्रजी बोलणे(जे हिंदी चित्रपटांत/मालिकांत दाखवले जाते) युवकांना शुद्ध मराठी बोलण्यापेक्षा सोयिस्कर वाटते. याच कारणांमुळे ग्रेस्/नारायण सुर्वेंपेक्षा गुलझार/जावेद अख्तर मराठी युवकांना जास्त माहित असतात. भेंडी P = NP

तुमच्या खलबती मैत्रिणीला "मॉर्टर अँड पेसल" माहित असतील का हो? अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती, मलाच 'मॉर्टर अअँड पेसल' म्हणजे काय ते माहित नाही. :-) काय आहे हे? --समीर

In reply to by समीरसूर

इंग्रजांचा खलबत्ता (आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडे असतो त्या प्रकारचा) ! मला प्रश्न असा पडला होता की जर त्या मुलामुलींना खलबत्ता कळत नसेल आणि 'मॉर्टर अँड पेसल'ही कळत नसेल तर सांगायचं कसं? आणि हे कळत नसेल तर याचा अर्थ खलबत्ता आता सामान्य घरांमधनं हद्दपार होतो आहे असं मानायचं का? सॉरी थोडं अवांतर होतं आहे, पण रहावलं नाही म्हणून विचारलं! अदिती (अवांतरचः चुचुने 'अशुद्ध मराठी'ची तक्रार करणं म्हणजे एक खेकडा दुसर्‍याला म्हणतो तू फेंगडा चालतोस!)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे... बर्‍याच गोष्टी आपल्या जीवनातून नाहिश्या होत आहेत त्यांच्याशी निगडीत असलेले शब्दही त्या बरोबर नाहीसे होत आहेत... द कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू... बर्‍याच नवीन गोष्टी आपल्या जीवनात येत आहेत आणि त्याच्याशी निगडीत नवीन शब्द भाषेत येत आहेत... नवीन संकल्पना नवीन वाक्प्रचार घेऊन येत आहेत. 'सगळंच मुसळ केरात' याचा अर्थ नवीन मुलांना कळणार नाही, पण एखादा आधुनिक प्रेमवीराला प्रेमभंगानंतर "जाऊ दे रे, सरळ फॉर्मॅट मार" असं सांगेल ते त्याच्या आजोबांनाच काय वडिलांनाही कळणार नाही. बिपिन कार्यकर्ते

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला वाटतं तुम्ही म्हणता तो प्रश्न इंग्रज तरूणांना विचारला आणि जर त्याचा अर्थ त्यांना सांगता आला नाही तर, ती वस्तू वापरातून गेली असल्यामुळे ती त्याना माहीत नाही असे म्हणणे उचीत ठरेल. समीर यांनी इथे त्या मुलींचं इंग्रजी उच्च दर्जाचे असते असे म्हटले नाही. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!