लहानपणी आजीकडे जायचो तेव्हाचा तिने सांगितलेला एक किस्सा. तिच्याकडे रात्री गाद्या घातल्यानंतर आजी, मामा, आई, मावशी गप्पा मारत बसायचे. खरं तर त्या गप्पा ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. पण हा किस्सा तिने सांगितला आणि त्या रात्री माझी झोपच उडाली. ती मी ऐकलेली पहिली "भयकथा" पण ती "कथा" नव्हती.. तो तिचा अनुभव होता.
आजीचं सासर उरणचं. पहिल्या बाळंतपणानंतर ती घरी आलेली होती. तिला झोपायला घरातली एक बाज दिली होती. ती बाज खूप दिवस अडगळीच्या खोलीतच पडलेली होती. रात्री कधीतरी तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळाला बघायला म्हणून ती उठली. पाहते तर बाळाच्या जवळ एक जख्ख म्हातारी बाई बसलेली. आजीला पाहून ती म्हणाली, "ही बाज माझी आहे. हे बाळ माझं आहे." आजी किंचाळलीच. ती म्हातारी उठली व उंबरठा पार बाहेर गेली. जाताना पुन्हा पुन्हा वळून आजीला बाज माझी आहे हे सांगत होती. सर्वजण उठून आले तेव्हा सर्वांना त्या म्हातारी बद्धल सांगितलं. तिचं वर्णन ऐकून तिची सासू म्हणाली की ती बाज तिच्या चुलत सासूची होती. आजीची झोपायची दुसरी सोय करून ती बाज पुन्हा अडगळीच्या खोलीत टाकायचं सर्वानुमते ठरलं.
ह्या घटनेला खूप वर्षं होऊन गेली. घरातली म्हातारी माणसं एक एक करून वारली, आजोबा वारले. आजी मामा डोंबिवलीला राहायला आले. उरणच्या जागेची आणि सामानाची वाटणी करायचं ठरलं. त्या वाटणीत पुन्हा ती बाज मामाच्या वाट्याला आली. मामाचं डोंबिवलीतलं घर तसं छोटंच. त्यात बाज राहणं शक्यच नव्हतं. ती बाज घराच्या बाहेर ठेवली होती. घरात खूप बाकीचं सामान असल्यामुळे मामा बाहेर त्या बाजेवर झोपला होता. त्यारात्री पुन्हा ती म्हातारी आली. ह्यावेळेला ती तर मामाचे केसच ओढायला लागली. "उठ, बाज माझी आहे". मामाचा आरडओरडा ऐकून शेजारी आले. त्या बाजेचा इतिहास आजीने मामाला सांगितला. ती बाज लवकरात लवकर विकून टाकायला हवी असं मामाने त्या क्षणी ठरवलं. एका भैयाला मामाने ती बाज विकली. दुसर्या दिवशी भैया परत दारात उभा. त्यालाही तोच अनुभव आला होता. मामाने मुकाट्याने त्याचे पैसे परत केले. बाज पुन्हा घराबाहेर. अखेर मामाने एका सुताराकडून त्या बाजेच लाकूड वापरून एक छोटं डेस्क आणि इतर बारीक सामान बनवलं. त्याचा नंतर कुणाला काही त्रास झाला नाही.
शेवटी झोपता झोपता मला आजी शांतपणे म्हणाली की आता त्या बाजेची काही लाकडं आपल्या ह्या कॉटला वापरली आहेत. मला घामच फुटला. त्या दिवसापासून आजपर्यंत मी पुन्हा त्या कॉटवर झोपू शकलो नाही.
वाचने
3277
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे!!मला
अरे बा प रे
मराठे आणि
माझा बै
कंदील्या
स्वानुभव
....
ज्यांचा
भय ईथले संपत नाही.
माझ्या आजोळी
अरे वा!
मस्त