मी सध्या Nuclear Deception हे Adrian Levy-Cathy Scott-Clark लिखित पुस्तक वाचत आहे. सध्या फक्त २० टक्केच वाचून झालेय. पण या भागात जे वाचले त्यावरून दोन गोष्टी ल़क्षात येतात त्या इथं मांडाव्याशा वाटल्या म्हणून हे लिहितोय.
(१) रोनाल्ड रेगन यांची हॉलीवूडमधील एक अभिनेता म्हणूनची कारकीर्द कितीही अयशस्वी झाली असो, पण राष्ट्रपती या भूमिकेत त्यांनी जे आपलं अभिनयकौशल्य दाखविलं ते असामान्यच होतं असे म्हणावं लागेल. चेहरा 'सरळ' ठेवून इतकं धादांत खोटं बोलण्याचं त्यांचं प्राविण्य फारच श्रेष्ठ दर्जाचं होतं यात शंका नाहीं (त्याचा वापर भारताच्या विरुद्ध केला गेला म्हणून "कौतुकास्पद" म्हणवत नाही हे मात्र खरं!). रेगन यांना सोवियेत यूनियन "संपविण्या"चं श्रेय दिलं जातं. ते बरोबर आहे का? त्यात "पैशाचे सोंग आणता न ये" याचा रशियाला आलेल्या अनुभवाचा भाग किती व रेगन यांच्या नेतृत्वाचा भाग किती हा चर्चेचाच विषय ठरेल. तेलाच्या किमती कडाडून "खिशात चार चव्वल" खुळखुळू लागताच पुतीन-मेडवेडेव या द्वयींची भाषा/सूर बदलू लागलाय हे आपण पहातोच आहोत. (अमेरिकास्थित मिपा सभासदांचं या विषयावरील वाचन जास्त सखोल असेल. त्यांनीही या विषयावरील प्रतिसादात भर घालावी ही विनंती. कारण मी कितीही प्रयत्न केले असले तरी माझं वाचन एकतर्फी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीं. खरं तर मला अमेरिकन लोक खूप आवडतात, पण अमेरिकन लोक आणि अमेरिकन सरकार यांत खूप फरक आहे.)
केवळ अफगाणिस्तानवरील रशियन आक्रमण परस्पर पाकिस्तानी रक्त सांडून परतविण्यासाठी या गृहस्थानं पाकिस्तानचे असामान्य लाड केले, त्या राष्ट्राला अणूबॉंब बनविण्याचे तंत्रज्ञान दिलं, त्यासाठी पाकिस्ताननं अमेरिकन कायद्यांचा भंग करून निषिद्ध "हाय-टेक" वस्तू त्यांच्या निर्यातीचा परवाना नसतानाही आयात केल्या तिकडे केवळ काणाडोळा केला इतकंच नव्हे तर त्यांच्या कस्टम्स् खात्यानं अशी तस्करी करतांना रंगे-हात पकडलेल्या पाकिस्तानी मुलकी व लष्करी चोरांना त्यांच्यावरचे आरोप सौम्य करवून (dilute) त्यांना पाकिस्तानमध्ये परत जाऊ दिलं. एका बाजूने तस्करी करण्याच्या घटनांना सर्रास गुप्त संमती देत असतांनाच अमेरिकन कॉंग्रेसपुढे खोट्या साक्षी द्यायला आपल्या सहकार्यांना भाग पाडलं व स्वत:ही लेखी स्वरूपात सही-शिक्क्यानिशी खोटी निवेदनं दिली जेणेकरून अमेरिकेची पाकिस्तानला दिली जाणारी मदत थांबू नये व रशियाविरुद्धचे युद्ध अबाधित विनाखंड चालावं.
या पाकिस्तानची अण्वस्त्रं कधी पाकिस्तानी तालीबानच्या हाती पडतील याचा नेम नाहीं. (अफगाणी तालीबान व पाकिस्तानी तालीबान या एक ध्येय असलेल्या पण दोन अलग संघटना आहेत.) माझ्या मतें आज ना उद्या पडतीलच! आणि ती जेंव्हा त्यांच्या हातात पडतील तेंव्हां ९/११ ला पार झाकोळून टाकेल असा हल्ला अमेरिकेवर होण्याची दाट शक्यता आहे.
रेगन यांचं चित्र असलेल्या नोटा छापायला निघालेल्या अमेरिकन सरकारनं जरा गंभीरपणानं विचार करावा अशीच सत्यपरिस्थिती आहे. ("उत्तम कथा"च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखात याबद्दल कांहीं माहिती आहे, पण या पुस्तकात ती जास्त प्रगल्भ स्वरूपात वाचायला मिळते.)
(२) जनरल झिया हा पाकिस्तानच्या आजवरच्या सर्व नेत्यांत सर्वात धूर्त नेता होता यात शंका नाहीं. त्यांनं अमेरिकेला असं कांहीं आपल्या जाळ्यात गुंतवलं होतं कीं अमेरिकेपुढचे सर्व पर्यायच संपवून टाकले. अयूब खान, भुत्तो यांच्या नेतृत्वाच्या काळात दिल्या गेलेल्या मदतीत अमेरिकेचा वरचष्मा होता, पण झियाच्या काळात तो पूर्णपणे पाकिस्तानच्या हातात गेला व तेंव्हापासून तो पाकिस्तानच्याच हातात आहे. झिया काळाच्या पडद्याआड गेला (गेला कसला? अमेरिकी राजदूतासह त्याला पडद्याआड धाडला गेला!) असला तरी पाकिस्तानी वरचष्मा चालूच आहे. मुशर्रफनेही त्याच्या कारकीर्दीत असाच अरेरावीयुक्त धुमाकूळ घातला होता.
दुसरी एक अदूरदर्शी गोष्ट झियानं केली ती म्हणजे पाकिस्तानचं इस्लामीकरण त्यानंच सुरू केलं, मुल्ला-मौलवींना फाजील भाव दिला व शारिया कायदा लागू करण्याचाही घाट घातला. त्याचाच एक भाग म्हणून अतिरेक्यांना प्रशिक्षण द्यायची केंद्रं त्यानं सुरू केली. (तोपर्यंत अशी केंद्रं सरकारी आश्रयाखाली चालू नव्हती). या प्रशिक्षणकेंद्रांत जन्मलेल्या भस्मासुरानं आपल्याला (भारताला) तर छळलेच, पण आता त्यानं आपला मोर्चा स्वतःच्या जन्मदात्याकडे वळवला आहे व पाकिस्तानी पोलीसखात्यावर व लष्करावर आपला नेम धरला आहे. हळू-हळू त्याचे डोळे इराणकडेही वळू लागले आहेत. या भस्मासुराने झियाला तर यमसदनी पाठवलंच पण लाल मशीदीचा ताबा घेऊन त्यांच्यावर हल्ला करायला मुशर्रफला भाग पाडून त्याचीही 'विकेट' काढली.
दूरदृष्टीचा संपूर्ण अभाव असलेल्या या दोघांच्या (रेगन व झिया) धोरणानं आज पाकिस्तानमध्ये अराजक पसरत आहे व त्याचा त्रास आपल्यालाही भोगायला लागणार आहे यात शंका नाहीं. यापासून आपला कसा बचाव करायचा याचं "राष्ट्रीय" धोरण पक्षातीत विचार करून एकमतानं आखणं ही आजची खास गरज आहे. एवढी प्रगल्भता आपल्या आजच्या बुळ्या नेतृत्वात आहे कां?
याचं उत्तर देणं खूप अवघड आहे.
या आधी मी "The fall of House of Bush" हे Craig Ungher लिखित पुस्तक वाचले, त्यात बुश-४३ नं (किंवा त्याचा "बोलविता धनी" किंवा "असली बादशाह" डिक चेनीनं) रेगनचंच अदूरदर्शी धोरण पुढं चालवून खोट्या-नाट्या प्रचारानं अमेरिकेला इराकच्या युद्धात कसं लोटलं याचा खूप विस्तृतपणे उहापोह केलेला आहे. (Craig Ungher चेच House of Bush, House of Saud" हे पुस्तकही वाचनीय आहे. या पुस्तकावर आधारलेला Fahrenheit 9/11 हा चित्रपट बर्याच लोकांनी पाहिला असेल.)
Nuclear Deception हे पुस्तक वाचून संपल्यावर या दोन्ही पुस्तकांवर आधारित एक जास्त सविस्तर लेख लिहिण्याचा विचार मात्र पक्का आहे.
वाचने
3807
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
या दोन्ही
हम्म्
In reply to या दोन्ही by अवलिया
लिहायचा विचार तर आहे!
लय भारी म्हाइती कळली!
बरीच नवीन माहिती कळली या लेखावरून!
मस्त लेख
अभास्यपुर्ण लेख्
लेख लिहिण्याचा विचार
पाकिस्तानात कोण राज्य करतो - त्यांचं सरकार की ISI
असे वाचले कीं.....
In reply to पाकिस्तानात कोण राज्य करतो - त्यांचं सरकार की ISI by सुधीर काळे
काळे साहेब्..........अजुन एक अभास्यपुर्ण लेख्....खुपच छान !
धन्यवाद
कधी-कधी
लेख आवडला
अमेरिकेला रेगन/बुश४१/बुश४३ यांनी केलेली पापे फेडावी लागतील?