Skip to main content

कुलंग... जेथे आकाश ठेंगणे वाटते...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 25/09/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
"येत्या विकऐंडला कुलंगला जायचा बेत आहे... येतोस का?" असा राहुलदादाचा SMS आला... खूप दिवसांपासून मला कुलंगला जायच होतं... कळसुबाईच्या कुशीत अलंग, मदन आणि कुलंग विसावले आहेत... इगतपुरीच्या परिसरात अजीबात भटकलो नव्हतो... तिकडच्या डोंगररांगा जरा वेगळ्याच आहेत... आकाश सुद्धा ठेंगण वाटावं असे उंच डोंगर आहेत... मग शुक्रवारचं काम संपवून मी बदलापुरला राहुलदादा कडे पोचलो... रात्री सगळी तयारी करुन झोपी गेलो... पहाटे ५.४६ च्या लोकलने कल्याणला पोचलो आणि मग कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलमधे चढलो... राहूलदादा, अरुण सर, निलीमा मँडम, अवळे सर आणि मी असे आम्ही पाचजण कुलंगला चाललो होतो... कसाऱ्याला वडापाव-चहा घेतला आणि जीप ठरवून काळुस्त्याला पोचलो. गावकऱ्यां सोबत थोड्या गप्पागोष्टी झाल्यावर कुलंगवाडीच्या (कुरुंगवाडी) वाटेवर चालायला सुरुवात केली. शेताच्या बांधावरुन ही वाट जात होती. दूरवर एका डोंगराच्या मागून कुलंग आणि त्याचा धाकटा भाऊ - छोटा-कुलंग मान वर काढून आमच्याकडे बघत होते. कुलंगवाडीहून दळणासाठी काळुस्त्याला चाललेले काही गावकरी वाटेत भेटले. त्यांच्या मते, "आम्ही काळुस्त्याला न येता, आंबेवाडीला जायला हवं होतं" कारण ते जवळ पडलं असतं, पण भटकायला निघाल्यावर जवळ-दूरचा सवालच नव्हता. ह्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भाताची शेतं जरा वाळली होती; रोपं जरा पिवळी पडली होती. शेताच्या कुंपणावर घाणेरी फुलली होती. दीड तास चालल्यावर कुलंगवाडीच्या पठारावर पोचलो. समोर छोटा-कुलंग पासून सुरु झालेली डोगंररांग डाव्या हाताला दूरवर कळसुबाई पर्यंत पसरली होती. अंगा-पिंडानं धष्टपुष्ट असलेला कुलंग अगदी उठून दिसत होता. (उजवी कडून दुसरा डोंगर म्हणजे कुलंग) हिरव्यागार पठारावर नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या पायवाटेवरुन आम्ही पुढे सरकत होतो. दुपारच्या उन्हाचे चटके आता जाणवत होते. थोडावेळ आराम करण्यासाठी एका ओढ्याकाठी विसावलो. थोडंफार खाल्लं, पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या आणि कुलंगच्या दिशेने चालायला लागलो. पठार सोनकीच्या फुलांनी बहरलं होतं. बाळाला जशी आईची ओढ असते, अगदी तशीच सोनकीला उन्हाची ओढ असते. दुपारच्या उन्हात सोनकीचं सौंदर्य जास्तच खुलून दिसतं. सोनकीला 'सोनावळी' असं सुद्धा नाव आहे. गळ्यातली घंटा वाजवत, पठावरचं कोवळं, लुसलुशीत गवत खात गुरं भटकत होती आणि त्यांचा गुराखी एका झाडाच्या सावलीत हाताची उशी करुन निवांत पहूडला होता. काय ते सुख!!! मन संतुष्ट असेल तर उपाशी पोटी सुद्धा छान झोप लागते. पठारावर अनेक पायवाटा फुटल्या होत्या. आता पायवाटेकडे जास्त लक्ष न देता, कुलंग आणि मदन मधल्या खिंडीच्या दिशेने सुटलो. दुपारी १.३० च्या सुमारास एका ओढ्यात जेवणासाठी थांबलो. वाहत्या पाण्याचा खळखळाट ऐकत, ओढ्यामधल्या दगडावर बसून जेवायला (ठेपले, छुंदा आणि लाडू) सुरुवात केली. तहान लागली की बसल्या जागीच जरा वाकून ओढ्यातलं पाणी प्यायचो. जेवणा नतंर थोडावेळ आराम केला आणि पुन्हा चालायला लागलो. (मी...) खूप जंगलतोड झाल्यामुळे पावसानंतर सुद्धा जंगल जरा विरळच भासत होतं. जंगलात गुरांच्या वाटा, लाकुडतोड्यांच्या वाटा आणि गडावर जाणाऱ्या वाटांच जाळं पसरल होतं. ह्या गोंधळात आम्ही वाट चुकलो आणि कुलंगच्या ऐवजी मदनच्या वाटेने बरच चढलो. चढत असताना, "आपण वाट चुकलोय... जरा खालूनच उजवीकडे वळायला हवं होतं..." असं सारखं राहुलदादा सांगत होता. आम्ही धरलेली वाट एका लहानश्या धबधब्यात संपली. मग मागे वळलो आणि बरच खाली गेल्यावर उजवीकडे कुलंगच्या दिशेने जाणारी वाट सापडली. ही वाट ओढा पार करुन कुलंगकडे जाते आणि ओढ्याला पाणी असल्यामुळे मगाशी वर चढत असताना ह्या वाटेचा अंदाज नाही आला. ओढ्यातल्या पाण्याने जरा ताजेतवाने झालो आणि कुलंगच्या वाटेला लागलो तेव्हा ३.३० वाजले होते. थोड्याच वेळात वरच्या पठारावर पोचलो. समोर मदनगड आणि त्याचं नेढं लक्ष वेधून घेत होते. मदनगड मागे आणि कुलंग डाव्या हाताला ठेवून आडवं चालायला लागलो. अर्ध्या तासात, कुलंगवर चढणारी धार लागली. धारे वरुन चढायला सुरुवात केली. खूप तीव्र चढ होता आणि धारेवर कारवीचं जंगल माजलं होतं. दीड माणूस उंच कारवी आणि बांबूमुळे पायवाट पूर्णपणे झाकली होती. पावसानंतर गडावर जाणारे आम्हीच पहिले होतो. मग एका सुकलेल्या कारवीचा बुंधा उपटला आणि त्याने कारवीचं जंगल झोडपत वाट शोधत झपाझप चढायला लागलो. घामाने संपूर्ण न्हाऊन निघालो होतो. दमलो की काही क्षण थांबायचो आणि मग परत कारवी झोडपत चढायचो. तासभर चढल्या नंतर, जरा अवघड कातळ-टप्प्याच्या पायथ्याशी जरा विसावलो. (शेवाळं असलेला भाग फोटोत नाही आला...) पावसामुळे शेवाळं साचलं होतं आणि पाठीवर अवजड पीशव्या घेऊन कातळ-टप्पा पार करणं जरा अवघड वाटत होतं. घसरण्याचा सवालच नव्हता कारण घसरलो तर गेलो ह्यात काही शंकाच नव्हती. तितक्यात निलीमा मँडमला एक भन्नाट युक्ती सुचली. आम्ही जवळ असलेले कापडी रुमाल शेवाळ असलेल्या ठीकाणी टाकले आणि त्यावरुन चालत तो टप्पा पार केला. सगळ्यात शेवटी एक-एक रुमाल उचलत मी तो टप्पा पार केला. आता पुढची वाट पण जरा बिकटच होती. नीट लक्ष देत चढत होतो. कातळात खणलेल्या उभ्या पायऱ्या चढून गडावर पोचलो तेव्हा संध्याकाळचे ६.१५ वाजले होते. गड दाट धुक्यात बुडाला होता. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या हाताला हाकेच्या अंतरावर गुहा आहे. दगड फेकून, जरा आवाज करुन गुहेची नीट पडताळणी केली. गुहेच्या एका भागात पाणी साठलं होतं आणि उरलेल्या भागात जरा ओलावा होता. ओलावा असलेल्या भागात सगळं सामान पसरलं. आम्ही गडावरच्या टाक्यातून पाणी आणे पर्यंत, अरुण सरांनी गँस पेटवून सूप तयार केलं. दिवसभराच्या मेहनती नंतर गडावरच्या गारव्यात गरम-गरम सूप पिण्या सारखं दूसरं सूख नाही. त्यानंतर सगळेजण रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले. व्हेज-पुलाव, पापड आणि आंबा-बर्फी असा जेवणाचा बेत होता. जेवण आटपून, अंथरुण-पांघरुण पसरुन झोपायला रात्रीचे १० वाजले. दिवसभर खूप दमछाक झाली असल्यामुळे नीटशी झोप लागली नाही. मधेच उठून टॉर्च लावला तर एक भला मोठ्ठा खेकडा राहुलदादाच्या उश्याशी बसला होता. त्याला फास लावून पकडला आणि गुहेच्या बाहेर सोडून दिला. परत जरा वेळ अंथरुणावर पडून राहिलो. झोप काही लागत नव्हती, मग मी पहाटे ५.३० ला उठून गुहेच्या वर जाऊन सुर्योदयाची वाट बघत बसलो. गार वाऱ्यामुळे खूप थंडी पडली होती. पहाटेच्या मंद तांबड्या प्रकाशात डोंगर सुद्धा झोपी गेल्या सारखे भासत होते. (मदन, अलंग आणि कुलंग) थोड्याच वेळात तांबडं-केशरी सुर्यबिंब कळसुबाईच्या मागून वर आलं आणि कोवळं उन्ह खाली झिरपू लागलं. कोवळ्या उन्हाचा स्पर्श होताच पक्ष्यांना जाग आली आणि खालचं जंगल जिवंत झालं. डोंगर सुद्धा कोवळ्या उन्हात न्हाऊन ताजे टवटवीत झाले. भान हरपून मी सृष्टीच चैतन्य अनुभवत होतो. अशा काही क्षणांनीच आपलं आयुष्य सजलेलं असतं. सकाळच्या नाष्त्याला नूडल्सचा उपमा आणि चहा होता. ते आटपून गडावर भटकायला निघालो. सारा गड वेगवेगळी फुलं माळून नटला होता. सोनकी, तेरडा, निसूर्डी, नभाळी, पांडा, श्वेतांबरा आणि असंख्य फुलांनी गड सजला होता. सोबत अवळे सर असल्यामुळे प्रत्येक फुलाबद्दल छान माहिती मिळत होती; वेगवेगळ्या फुलांची नावं त्यांच्यामुळेच कळाली. (काळी निसूर्डी) (नभाळी) (पांडा) (श्वेतांबरा) (पान-तेरडा) (शेपुट हबेनारीया... ground orchid) हिरव्यागार रंगात सजलेला छोटा-कुलंग फारच छान दिसत होता. आज पर्यंत छोटा-कुलंगवर कोणा माणसाचे पाय पडले नाहीत. "एखाद्या डोंगरावर आजपर्यंत माणूस पोचलाच नाही" हे ऐकायला जरा विचीत्रच वाटतं ना?... कुलंग वरुन तळकोकणात थेट १४०० मीटर खाली डोकावता येतं. इगतपुरीच्या परिसरातले जवळ-जवळ सगळेच डोंगर कुलंगच्या माथ्यावरुन ओळखता येतात. गडावर फारसं बांधकाम नाही, पण कातळात खणलेली अनेक पाण्याची टाकी आहेत. (नागाच्या फण्या सारखा आकाशात घुसलेला छोटा-कुलंग ) दुपारच्या जेवणाला अरुण सरांनी चायनीज राईस बनवला होता. सोबत सोया सॉस, टोमँटो सॉस आणि चायनीज जेवणाकरता लागणारे सगळे जिन्नस होते. पोटाचे इतके लाड तर घरी सुद्धा होत नाहीत. जेवणा नंतर थोडावेळ गप्पागोष्टी झाल्या, चहा झाला आणि परत हुंदडायला निघालो. कातळात खणलेल्या नितळ पाण्याच्या टाक्या जवळ बसून, बराच वेळ खालचं कोकण न्याहाळलं. संध्याकाळ होताहोता धुकं पडायला सुरुवात झाली. धुक्यामुळे सुर्यास्त दिसला नाही, पण धुकं जरा विरळ झालं की काळ्या ढगांमधून पाझरणाऱ्या संधीप्रकाशामुळे सारा आसमंत सोनेरी भासत होता. भटकून गुहेत पोचलो तेव्हा अंधारलं होतं. मस्त पालक-कॉर्न सूपचा आस्वाद घेत गुहेच्यावर बराच वेळ बसून राहिलो. आता धुकं अजीबात नव्हतं... एक-एक करत कोकणातले दिवे पेटत होते आणि वर आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. दोन दिवसापूर्वीच अमावस्या झाली होती, त्यामुळे काळ्या आकाशात चांदण्या जास्तच उठून दिसत होत्या. आजुबाजूला गुडूप काळोख आणि वर-खाली टिमटीमणारा प्रकाश असा वेगळाच अनुभव होता तो. भात, आमटी आणि बटाट्याची भाजी असं रात्रीच जेवण होतं. जेवण उरकून लवकरच झोपी गेलो. आज फारच वेगळा दिवस जगलो. कसलीच घाई नव्हती; चिंता नव्हती... केवळ स्वच्छंदपणा, निवांतपणा होता. आज रात्री मस्त झोप लागली. पहाटे लवकर उठून परत सुर्योदयाची वाट बघत बसलो. कितीही वेळा सुर्योदय पाहिला तरी दरवेळेस तो वेगळाच जाणवतो. उजेडल्यावर कुलंग आणि आजुबाजूचे डोंगर ढगाच्या सागरातून मान वर काढून एकमेकांकडे बघत होते. चहा आणि फोडणीचा भात खाल्ला आणि निघण्याच्या तयारीला लागलो. गुहा होती तशी स्वच्छ केली, केलेला कचरा पिशवीत भरुन सोबत घेतला आणि सकाळी ८.३० ला उतरायला सुरुवात केली. (ह्या गुहेत २ दिवस राहिलो...) चढण्यापेक्षा उतरणं नेहमीच अवघड असतं, त्यामुळे जपूनच उतरत होतो. अवघड कातळ-टप्पा पार केल्यावर जरावेळ आराम केला. आता कारवीच्या जंगलातून उतरताना सारखं घसरायला होत होतं. उतार संपल्यावर जरा निवांतच चालत कुलंगवाडीच्या पठारावर पोचलो. (उतरताना काढलेला कुलंगचा फोटो...) दुपारच्या उन्हामुळे खूप दमायला होत होतं. थोडावेळ थांबलो आणि सोबत असलेलं खावून घेतलं. परत काळुस्त्याच्या वाटेला लागलो. बरेच गावकरी लाकडाची अवजड ओझी घेऊन काळुस्त्याला चालले होते. त्यांच्याशी बोलल्यावर कळालं, की आता काही दिवसात काळुस्त्याला धरण बांधणार आहेत; पावसाचं पाणी साठवून ठेवायला. म्हणजे काही महिन्यानंतर काळूस्त्याहून कुलंगला जाता येणार नाही. आंबेवाडी वरुन मात्र जाता येईल. भर उन्हात चालत सुमारे ४.३० वाजता आम्ही काळुस्त्याला पोचलो. पोचल्यावर काही क्षणातच आभाळ भरुन आलं आणि मुसळधार पाऊस कोसळायला लागला. "संपूर्ण पावसाळ्यात असा पाऊस पडला नाही", असं गावकऱ्याचं म्हणणं होतं. एक तास पाऊस कोसळत होता. पाऊस थांबल्यावर वातावरणात मस्त गारवा पसरला. टमटम ठरवली आणि घोटीच्या दिशेने निघालो. उन्हामुळे सुकलेली शेतं, आत्ताच्या पावसात पाणी पिऊन टवटवीत झाली होती. डोंगरावरून गढूळ पाण्याच्या धारा खाली कोसळत होत्या. अनपेक्षीत पणे पडलेल्या पावसामुळे सगळेच सुखावले होते. गेल्या तीन दिवसात जे काही अनुभवलं त्यामुळे सर्वजण खूप खूष होते. अर्ध्या तासात घोटीला पोचलो. मी घोटीला उतरुन सीन्नरला जाणाऱ्या ट्रक मधे बसलो. राहुलदादा, अरुण सर, निलीमा मँडम आणि अवळे सर त्याच टमटमने कसाऱ्याला निघाले. घोटी वरुन सीन्नरला जाणारा रस्ता फारच रमणीय आहे. एक तासात सीन्नरला पोचलो आणि पुण्याला जाणारी बस धरली. घरी पोचायला रात्रीचे १२ वाजले. गेल्या तीन दिवसात बरीच धडपड केली होती, पण जे काही अनुभवलं ते केवळ स्वप्न होतं. बऱ्याच नवीन लोकांशी ओळखी झाल्या, नवीन प्रदेश बघितला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीन दिवस मनसोक्त भटकलो...
लेखनविषय:

वाचने 18526
प्रतिक्रिया 60

प्रतिक्रिया

हे सगळं वाचताना जणु प्रत्यक्षच पाहतोय असा भास झाला.फोटो पण फार सुरेख आहेत्.जगण्यातल्या सार्‍या चिंता सोडुन असंच भटकावसं वाटतं.असाच भरपुर भटकत रहा अन भरभरुन लिहीत जा.

जळव मेल्या ! :-) पण काय मजा आली असेल ना रे? जबरा अनुभव असेल हा ! बाकी तो खेकड्याचा फोटो कल्लाच ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

बाबा रे ..... जरा फोन नंबर ठेव माझा तुझ्याकडे ... ९९६०४१७०२१ ... बाईकवर जाणार असशील तर कळवत जा :) काय झकास फोटो आहेत .,.. मजा आली

In reply to by टारझन

विमुक्ता, तु खरचं विमुक्त आहेस रे बाबा.....तुला दंडवत.... :) माझाही नं ठेव रे.. ९८६७२९२४११ फोटू तर के व ळ अ प्र ति म!!!! बाबा... :) --प्रभो

अ प्र ति म ...शब्दच संपले. अदिती

अलंग .. मदन ... कुलंग बद्दल ऐकुन आहे, अजुन गेलो नाही. आत्ता "माहुली" करुन आलो. फोटो नाही टाकले :P पिकासाचा दुवा फुलांची माहीती खरेच छान, एवढे निसर्ग वैभव अनुभवतो पण ओळख नाही :( , खुप वाईट वाटायचे, पण आता ओळख आणि म्हणुन उत्सुकता वाढते आहे.

अवर्णनीय दृश्य आणि छायाचित्रे!!! @) तुमच्या मुळे खुप सुदंर अशी रानफुले बघायला मिळताहेत आणि त्यांची नावे सुदधा कळताहेत. बाकी तुमची भटकंती हि हेवा वाटायला लावणारी आहे.

विशाल नी म्हणल्या प्रमाणे खेकडा मस्तच खेकड्याचे एवढ्या जवळून दर्शन आत्ताच घेत आहे ;;) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आयशप्पथ.. शब्दच नाहीत.. आपण आजपासुन तुझा पंखा...

खुप सुंदर वर्णन आणि फोटोस पण....... आता खरच जाणवत आहे की आपल्या महाराष्ट्रामधे पण खुप सुंदर जागा आहेत, आणि मी कधीच नाही पाहिल्या.... :( असच नविन प्रवास वर्णन वाचायला आवडेल....

खुप सुंदर वर्णन आणि फोटोस पण....... आता खरच जाणवत आहे की आपल्या महाराष्ट्रामधे पण खुप सुंदर जागा आहेत, आणि मी कधीच नाही पाहिल्या.... :( असच नविन प्रवास वर्णन वाचायला आवडेल....

तुझ्या फोटुत दिसणार्‍या पायावर डोक ठेवल बघ मी. :) मदन, अलंग आणि कुलंग हा एक फाटु ट्रेक आहे. त्या कातळाची थरारता तुझ्या फोटुत लक्षात येत नाही. मला एक मेल आली होती त्यातले फोटु बघुन लक्षात आल होत की मी कदाचित अख्ख्या आयुष्यात असला खतरा ट्रेक नाही करु शकणार. बाकी सगळे फोटु क्लासच. :)

In reply to by झकासराव

एक विचारायच राहिलच रे. साबण कोणता लावतोस?? :) एवढा भटकुनपण तु गोराच दिसतोयस. रापलेला नाहीस???

काय वर्णन ..... वाचताना खरोखरच भटकन्तिची अनूभुती येतेय. खूपच सुन्दर ..... कारवीच वर्णन वाचताना दाजीपुरच्या सहलीची आठवण झाली.

मस्त फिरवुन आणलसं धन्यु.

विमुक्त, छायाचित्रे फार सुंदर आली आहेत. मी पण नुकताच कार्यालयातील मंडळींबरोबर "केंजळगड रायरेश्वर" करुन आलो. त्याचा दुवा - संताजी धनाजी

मस्तरे विमुक्ता, खरच भाग्यवान आहेस.

प्रकाशचित्रे सुरेखच. खेकड्याची नजर भारी आहे.

खेकड्याचा फोटो आवडला. रागावल्यासारखा दिसतो आहे.

सू हा स...

तुझा हेवा करुनही थकलो बाबा... फोटूच एवढे सुंदर आलेत तर अनुभवायला किती मजा आली असेल... परत एकदा दंडवत तुला! -अनामिक

सुंदर वर्णन ,मस्त फोटो. या ट्रेक मधे अरूण सर नसते तर तो ट्रेक इतका मस्त झाला नसता अस वाटत. रूचकर जेवण आणि फुलांचे माहिती यांनी त्या निसर्गाच्या सौंदर्याचा पूरेपूर अस्वाद घेऊ दिला तुम्हाला. मराठी नाव त्या फुलांना किती अनुरूप आहेत. म्हणूनच सहज लक्षात राहाणाजोगी. ईंग्रजी नाव पाठ करूनही विसरायला होतात. असच लिहीत रहा. मला लेखनातलं personification आवडलं. मीनल.

नेहमीप्रमाणे मस्त फोटू व वर्णन! खेकडा कसला भारी आहे. डोंगरांची नावे ही भावांची नावे असावीत अशी आहेत. दूरवर एका डोंगराच्या मागून कुलंग आणि त्याचा धाकटा भाऊ - छोटा-कुलंग मान वर काढून आमच्याकडे बघत होते. मस्त! छोटी मुले एखादी नवीन गोष्ट जशी डोकावून बघत असतात तसे वाटले. रेवती

अप्रतिम! अतिशय रंजक लेखन आणि सगळीच रमणीय प्रकाशचित्रे. खेकडा कसला जबरी आहे, एखाद्या कार्टून फिल्ममधला कॅरॅक्टर वाटतोय! B) असं वाटतंय की आत्ता आठ दिवसांची सुट्टी काढून यावं आणि असेच दोन तरी झक्कास ट्रेक तुझ्याबरोबर करावेत. (खुद के साथ बातां : रंग्या, शेवटला ट्रेक करुन १६ वर्ष होऊन गेली आहेत! सध्या वजन कमी करायचं बघा, ट्रेकला निघालाय सोद्या! ;) ) (माजी ट्रेकर)चतुरंग

श्वेतांबरा नावासारखंच फूल सुरेख आहे. बाकी अनुभव, फोटो आणि लेखन नेहमीप्रमाणेच अफाट! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

किती सुरेख लिहिलं आहेस रे!! तू खरंच विमुक्त आहेस!!! प्रत्येक फोटोगणिक तोंडातून "व्वा!!" असं येत होतं. किती सुरेख फुलं आहेत ती.. नावं तरी किती वेगळी आहेत!! खरंच्...मन भरून आलं सगळं वर्णन आणि फोटो बघून. असच भटकत रहा दर्‍याखोर्‍यातून आणि आम्हाला तुझ्या लिखाणातून त्यांना भेटवत रहा..! "उजेडल्यावर कुलंग आणि आजुबाजूचे डोंगर ढगाच्या सागरातून मान वर काढून एकमेकांकडे बघत होते." हे वाक्य अतिशय आवडलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शब्द संपले. अति सुंदर. खरोख्रर तुमचा प्रचंड हेवा वाटतोय.......... नागाच्या फण्या सारखा आकाशात घुसलेल्या छोटा-कुलंगचा फोटु अप्रतिम. नंदू

लैच भारी रे विमुक्ता. सगळ्यांनी एवढं लिहिल्यावर अजून काही लिहायला उरलंच नाही.

अप्रतिम.... :) अवांतरः---श्वेतांबरा हे नाव वाचुन आमच्या टाळक्यात मोहन गोखल्यांनी काम केलेली (१९८४) मालिका आठवली...सध्या भुतनाथ सप्ताह चालु हाय ना... ;) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. आम्ही मार का खातोय ? http://www.timesnow.tv/videoshow/4328180.cms

सुंदर वर्णन तसेच सुंदर फोटो...आताच जावेसे वाटले कुलंगला... दिपाली :)

वर्णन आणि फोटो दोन्ही! (भटक्या)बेसनलाडू

काय सुरेख फोटो.. तू इतक सोप असल्यासारख लिहिलय तरी तो कातळ बघीतल्यावर हे इतक सोप काम नाहि हे जाणवतय. मलातर त्या खेकड्यानेपण तुला डोळे वटारुन नमस्कार केलाय अस वाटतय. B) आहेस बाबा

काय बोलु??? भावा, जाम ऐश करत आहेस :-) जबरा वर्णन. --टुकुल

भटक्या, तुझे भविष्य उज्वल आहे. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

सुरेख शब्दचित्र आणि सोबतची छायाचित्रे वाचनाची रंगत वाढवत होती. संपूर्ण वाचनात आपण अलिप्त राहूच शकत नाही. आपणही ह्या सहलीचा एक भाग आहोत असाच भास होत राहिला. इमारतीचे ४ जीने चढवत नाहीत (लिफ्ट बंद असली की) त्यामुळे गड किल्ले चढणं हे माझ्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडे आहे. त्यामुळे ती हौस तुमच्या सहलवर्णनातून भागविता आली. धन्यवाद. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

लेख - नेहमीप्रमाणेच उच्च. छायाचित्रं - नेहमीप्रमाणेच अप्रतिम. खेकडा मात्र अशक्य आहे अगदी. कसले डोळे आहेत!!! बिपिन कार्यकर्ते

अक्षरशः ट्रीट आहे हा लेख म्हणजे. अप्रतिम.

सु रे ख...! तात्या.

सुरेख वर्णन आणि सुंदर फोटो. वाचताना मला माझा भुतकाळ आथवला. १९८९-८९ ला मी कुलंगमदनगड आणि मदनगड केला होता. त्यावेळी उतरताना मदनगडाच्या शेवटच्या ट्प्यात मी घसरलो आणी माझ्या उजव्या पाउलाची दोन बोटे फ्रॅकचर झाली . संदीप नारायण

In reply to by विमुक्त

पण मदनगड ला म्हणे प्रस्तरारोहण करावच लागतं.... All the best!

In reply to by स्वानन्द

हो... शेवटच्या टप्प्यासाठी प्रस्तरारोहण करावच लागतं... कोणी जाणकार हवाच असल्या भटकंती साठी... आणि अलंगला पण प्रस्तरारोहण करावं लागतं...

विमुक्ता, तुझ्या बाकीच्या लेखांनाही प्रतिक्रिया द्यायची होती. खरंच खूप मस्त भटकंती, लेखन आणि छायाचित्रे. या सगळ्या लेखांचे छान पुस्तक काढू शकशील तू. - ओंकार

कल्ला लेख टाकला आहे! उत्तम!

देवा (तेहत्तीस कोटीत कुणीच कसा रे कस्टमर फोकस्ड नाही ? शेम ऑन यू ! हाऊ डू यू क्वालिफाय अ‍ॅज अ सर्विस ऑर्गनायझेशन?), भाड्या, तुझ्या बग ट्रॅकिंग सिस्टम वर टिकेट टाकले होते की गेल्या वेळी ! प्रायोरिटी-१, सिव्हेरिटी-१ ! पुढच्या जन्मी मला विमुक्तच्या जन्माला घाल ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

वाण्याकडून सामान यायला उशीर व्हायला लागला.तक्रार करायला गेलो तर वाण्याचा बाप गल्ल्यावर बसला होता. "क्या करेगा सेठ .लेट तो होयगा ना.रोकडे वालोंको पयला सर्वीस देना पडता है. आप भी सोचो आप भी तो धंदेवाला है क्या बोलता मै .." थोडक्यात .... रामदास

कुलंग चा ट्रेक करायचा असं खूप दिवसांपासून डोक्यात आहे. नुकताच कळसूबाई चा ट्रेक करून आलो. पण ढगांमुळे वरून अलंग, मदन आणि कुलंग हे त्रिकूट काही पाहू शकलो नाही. नेट वर सर्च केल्यावर मात्र जे काही फोटो मिळाले त्यापेक्षा तुझे फोटो खूपच छान आहेत... आता तर लवकरच जाणार कुलंग ला.

विमुक्त साहेब, नमस्कार! आपली ओळ्ख नाही. माझे वय आज ५५ वर्षे फक्त! १९८० ते १९९२ पर्यंत मी पण असाच तुमच्या सारखाच हुन्दडलो! खुप धम्माल केली. ते दिवस मला आज तुमच्यामुळे आठवले. खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तुम्ही केलेले वर्णन आणि काढलेले फोटो अप्रतिम आहेत. लिहिण्याची हातोटी खुप सहज पण सुन्दर आहे. अश्या प्रकारचा अनुभव तुमच्याकडून परत परत वाचायला फारच मजा येइल! धन्यवाद!

घोटी वरुन सीन्नरला जाणारा रस्ता फारच रमणीय आहे सहमत! अलीकडेच मुंबई-औरंगाबाद एकटाच कार घेऊन गेलो होतो. जाताना पूणे-नगर मार्गे गेलो. येतान सिन्नर-घोटी मार्गे आलो. सिन्नर मागे पडल्यावर विंडमील्स दिसू लागतात. तेथून घोटि सारखे दाट वस्तीचे गाव येई पर्यंत डोळ्यांसाठी पर्वणी होती. रस्तामात्र बराच खराब आहे. घोटीच्या आधी रस्ता एका मोठ्या सरोवराभोवताने जातो, ते सरोवर कोणते ते मात्र कळले नाही (विल्सन लेक का?) कोणी खुलासा करू शकेल? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by चतुरंग

आपण दाखवलेल्या नकाशातल्या पिवळ्या ट्रॅक वरून आलो. मी म्हणत असलेले सरोवर नकाशात दिसत नाही. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

एकदम बेश्ट ट्रेक नि फोटु!! लय भारी!! भटकायची आवड असली, तरी दोन-तीन दिवस सलग ट्रेकसाठी नाही काढता येत आताशा. विशेषतः शनिवारच्या सुटीची तर आमची कायमची बोंब. कुलंग-अलंग-मदन करायची बऱ्याच वर्षांची इच्छा आहे. रतनगडही राहिलाय. बघूया कधी जमतंय ते!

अतिशय सुरेख फोटो आहेत. फारच छान भ्रमंती करून आणलीत.