गाडी चालवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. अमेरिकेत आल्यावर गाडीशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच मी परवाना मिळवला आणि गाडी चालवायला लागले. गेलं दिड वर्ष मी कुठेही न धडपडता लोकांना सुखाने गाडी चालवू देते आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या तुळतुळीत रस्त्यांवरून. सांगायचा मुद्दा असा की इतके दिवस माझ्या गाडी चालवण्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही.. मात्र चालवून झाल्यानंतर गाडी लॉक करण्याबद्दल मात्र एका चायनीज माणसाने सॉल्लीड आक्षेप घेतला (त्याला आपण 'ली' म्हणू).
सांगते ... त्याने माझ्या कार लॉक करण्यावर आक्षेप घेतला कारण सेकंदाचा १० वा भाग इतका वेळ वाजणार माझ्या गाडीचा लॉक होतानाच हॉर्न. :) ज्याला हाँक असं म्हणतात.
साधारण सकाळी मुलाची बस ८.३० ला येते. बाहेर वातावरण चांगलं असलं.. म्हणजे पाऊस नसला, थंडी नसली, किंवा लख्ख सूर्यप्रकाश असला आणि लेकाचं वेळेत आवरून घरातून बाहेर पडायला उशिर झाला नसला तर मी लेकाला घेऊन त्या स्कूल बसच्या पिकअप पॉईंटवर चालतच जाते. पण साधारण इथलं वातावरण असं की, आठवड्यातले २ दिवस थंडी २ दिवस पाऊस.. त्यामुळे गाडी न्यावीच लागते. अशीच एकदा गाडी पार्क केली, लॉक केली आणि लॉकिंग हाँक झाल्यावर घराकडे निघाले. तर पाठीमागून "एक्सक्युज्मी...!" अशी हाक आली. वळून पाहिलं.. तर ली होता. माझ्याजवळ येऊन मला म्हणाला, "यू लॉक योर कार अँण्ड इट हाँक्स विच इज इरिटेटींग फॉर मी.." मी विचारलं ,.." का?" म्हणाला, "मी दचकून जागा होतो त्या हॉर्न ने.. मला वाटतं आपण हाय वे वर आहोत आणि कोणीतरी हाँक करतं आहे.." मी म्हणाले ," पण मी मुद्दाम नाही करत, गाडी लॉक केली की हाँक होते.. मी काय करू?" मग मला म्हणाला, "रिमोटचं बटन एकदाच दाबलं की गाडी लॉक होते, दुसर्यांदा दाबतेस तेव्हा फक्त हाँक होते.. तू दुसर्यांदा बटन दाबू नको.. मला खूप त्रास होतो.. मी दचकून उठतो." मी म्हणाले, "मी प्रयत्न करेन.. " झालं! विषय संपला. ही गोष्ट मी नवर्याला संध्याकाळी सांगितली. तो म्हणाला, "ठीक आहे.. सोडून दे."
हे सगळं होऊन साधारण ८-१० दिवस झाले.. आणि पुन्हा एकदा चुकून माझ्याकडून लॉक करताना हाँक झालं. मी घरात येऊन साधारण ५ मिनिटे झाली आणि हा माणूस पॅटीओच्या काचेतून डोकावून आत पाहू लागला. मी दार उघडलं. नशिबाने नवरा होता घरी अजून. त्याला बघितल्या बघितल्या नवरा मराठीतून म्हणाला, "गाढवाला हकलून लावयला पाहिजे..." त्याने असं म्हणताच फस्स्कन् आलेलं हसू मी कसं बसं दाबलं. मग येऊन नवरा त्याच्याशी बोलू लागला. आपण दोघेही सभ्य आहोत याची जाणीव ठेऊन दोघेही एकमेकाशी बोलत होते. तोही हसत हसत सांगत होता "तिला २ दा बटन दाबू नको म्हणून सांग.. कारण मी एकदम दचकून जागा होतो. मला वाटतं मी हाय वे वर आहे .. आणि माझ्याकडून काहीतरी चुकलं म्हणून कोणीतरी मला हाँक करतं आहे.. माझी झोप मोड होते." नवरा म्हणाला, " फोर्ड कंपनीनेच जर आता तशी हॉकिंक सिस्टिम ठेवली आहे तर आम्ही काय करणार? आणि फक्त आमचीच कार हाँक नाही होत, इथे बर्याच आहेत कार्स ज्या लॉक होताना हाँक होतात.. कदाचीत दुसर्या एखाद्या कार मुळेही तुझी झोप मोडली असेल.. तुला आता माहितीये की आमची कार हाँक होते म्हणून तू आम्हाला सांगतो आहेस." चेहर्यावर अतिशय हसरे भाव ठेवत आणि अतिशय मृदू शब्दांत नवरा भांडत होता. आणि तो ही तितक्याच मृदूपणे नेहमीची हाय वे ची टेप लावत होता. हे पाहून माझी मात्र सॉल्लिड करमणूक होत होती. नवरा म्हणाला त्याला, " तू असं कर कानात कापसाचे बोळे घालून झोपत जा.." तर त्याचं उत्तर असं ," मग मला फायर अलार्म वाजला तर ऐकू येणार नाही किंवा माझ्या शेजारी झोपलेला माझा लहान मुलगा खोकला तर ऐकू येणार नाही.." त्याचं हे कारण ऐकून मात्र मला हसावं की रडावं हेच कळेना. फायर अलार्म वाजायला लागला की, अख्खी बिल्डिंग जागी होते.. असो.
सहज बोलता बोलता मैत्रीणींमध्ये हा विषय निघाला. मी सांगितल्यावर आणखी एका मैत्रीणीने तिलाही त्या माणसाचा तसाच अनुभव आल्याचे सांगितले. मग मला वाटलं, हा माणूस मनोरूग्ण असावा. त्यानंतर आणखी एका मैत्रीणिकडून समजलं की, त्या लीने चिडून तिथल्या एकाची गाडीची काच फोडली होती. का?? तर.. ती गाडी हाँक होत होती. आणि नंतर स्वतःच जाऊन ती काच दुरूस्त करून घेऊन आला होता. हे ऐकल्यावर मात्र तो मनोरूग्ण आहे यावर मी शिक्कामोर्तबच केलं. पण हे ऐकल्यापासून माझं धाबं मात्र दणाणलं. काय सांगावं चुकून रिमोट्चं बटन दोनदा दाबलं गेलं आणि हा आला आणि गाडीची मोडतोड करून गेला तर???? मी गाडी लॉक करताना आणखीनच काळजी घेऊ लागले.
आजकाल जरा वातावरण चांगलं असतं. थंडी खूपच कमी झाली आहे पावसानेही जरा उसंत घेतली आहे. त्यामुळे सकाळी मुलाला चालतच सोडायला जाते स्कूलबसच्या थांब्यापाशी. आजही मस्त चालत गेले. . बस गेल्यावर मी घरी आले. येऊन बसते न बसते तोच.. ली पॅटीओच्या काचेतून आत डोकावून पहाताना दिसला. मी उठून दार उघडलं..(अरेरे!! नवरा गेला होता ऑफिसला:( आता मलाच भांडायला हवं याच्याशी तेही थोबाडावर सौजन्य ठेऊन!!). "तू आत्ता १५ मिनिटांपूर्वी आलीस का घरी?" ली. मी म्हणाले"हो.. पण मी हाँक नाही केलं. कारण मी आज कार नेलीच नव्हती बाहेर." तो म्हणाला, "आर यू शुअर?" मी, "ऑफ्कोर्स, माझी कार बघ.. इंजिन थंड आहे. कारण काल रात्री मी पार्क केली ती अजूनही काढलेली नाही." मग ओशाळून म्हणाला,"ओह!! आय एम सॉरी.. पण मी हाँक ऐकला आणि दचकून उठलो..आणि...." मी मनात म्हंटलं,'झालं!!!! याची पुन्हा टेप सुरू झाली हायवे वाली.' मी मध्येच त्याला तोडत म्हणाले, "इथे खूप गाड्या आहेत हाँक करणार्या.. तुला माझी गाडी माहिती आहे म्हणून तू माझ्याकडे येतोस. तू त्यादिवशी सांगितल्यापासून मी रिमोटचं बटन फक्त एकदाच दाबते. पण मी बाकीच्या गाडीवाल्यांना नाही सांगू शकत ना .." आज माझ्याकडे हुकुमाचा एक्का होता. :) कारण माझी गाडी मी बाहेर नेलीच नव्हती. "यॅऽऽऽह, आय नो... तू जे करतेस त्याबद्दल तुझं खरंच खूप कौतुक आहे मला. मी खूप आभारी आहे तुझा याबद्दल.. पण मग कोण करतंय ते आता कसं कळणार? आपल्याला शोधावं लागेल." यातला 'आपल्याला' हा शब्द ऐकल्यावर माझं डोकंच सणकलं तरीही मृदू आवाजात म्हणाले, "हे बघ, मी सकाळी ६ ला उठते त्यामुळे बाहेर कोणी हॉर्न वाजवला काय, किंवा आणखी काय वाजवलं काय मला दचकायला होत नाही. त्यामुळे मला कोण हाँक करतंय हे शोधून काढायची अजिबात गरज नाहीये. तूच शोध." हे ऐकल्यावर बहुतेक त्याला त्याची बोलण्यातली चूक समजली. म्हणाला," खरंय. पण मी तुझा खूप आभारी आहे.. तू अगदी लक्षात ठेऊन हाँक करणं टाळते आहेस... तुझं खूप कौतुक वाटतं मला. मी तुझ्यासाठी काय करू शकतो.. काही मदत हवी असेल तर नक्की सांग." मनांत आलं,"घरी येणं बंद कर " असं सांगावं. पण त्याचा हा पराभूत पावित्रा बघून मी पण जरा नमतं घेत म्हणाले, "हे बघ, तू काहीही करण्याची आवश्यकता नाही. जस्ट फर्गेट इट." तो पुन्हा पुन्हा 'थँक यू व्हेरी मच' असं मच्मचंत आपलं म्हणत म्हणत निघून गेला. मी जरा निश्वास टाकला आणि चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात आले. इतक्यात आई म्हणाली, "अगं तो बघ तुझा चायनीज मित्र बहुतेक मिठाई घेऊन आलाय ." मी पाहिलं तर हातात दोन कसलीशी पॅकेट्स घेऊन हा पॅटीओच्या काचेतून आत डोकाऊन पहात होता. जरा हसूच आलं. पण जाऊन दार उघडलं. ते पॅकेट्स माझ्यासमोर धरत म्हणाला, "दिस इज फॉर यू. तू इतकं करते आहेस माझ्यासाठी.. तुला थँक्स कसं म्हणावं हे कळेना.. म्हणून हे घेऊन आलो तुझ्यासाठी. तू पोर्क खातेस का? " मी म्हणाले , "नाही. मी पोर्क खात नाही." तर पुन्हा एकदा ओशाळून म्हणाला, " ओऽऽऽह...! आय एम सॉरी!! आर यू व्हेजी टेरीयन??" मला चायनीज लोकांची व्हेजीटेरियन ची व्याख्या जरा वेगळी असते हे माहिती आहे. त्यामुळे ठसक्यात मी सांगितलं, " येस्स! प्युअरली व्हेजीटेरीयन...! नो मीट." त्याला जरा दु:ख झालं.. पण पुन्हा एकदा, "आय एम सॉरी.. आय जस्ट वाँट टू अॅप्रिशियेट यू. मला तुझ्यासाठी काहीतरी करायला आवडेल.. काही लागलं तर नक्की सांग." असं म्हणाला. मी म्हणाले, "तुला हे सगळं करायची गरज नाहीये. जस्ट रिलॅक्स. त्यातून काही मदत लागली तर मी सांगेन.." असं लवकर सुटका करून घेण्याच्या दृष्टीने म्हणाले कारण माझा चहा गॅस वर उकळत होता. तर, " दॅट वुड बी माय ऑनर..थँक्स..थँक्स अ लॉट!" असं म्हणत तो निघून गेला. आमच्या मात्र हसू हसून पोटात दुखायला लागलं. आई म्हणाली.. "तू हाँक करत नाहीस म्हणून तो तुझ्यावर फिदा झालाय..तू पोर्क खात नाहीस तर कदाचीत संध्याकाळ पर्यंत तो तुझ्यासाठी काहीतरी व्हेजीटेरियन खाऊ घेऊन येणार..!!" हे ऐकून आणिकच हसू आलं. मी नंतर मात्र बुचकळ्यात पडले. म्हणजे हा माणूस खरंच मनोरूग्ण आहे की, ओव्हर वेल मॅनर्ड आहे हेच समजेना. आभार प्रदर्शन.. हे असं??? बघू आता पुढे काय काय अनुभव येतात या ली माणसाचे...!
मी भारतीय, तो चिनी आणि आम्ही राहतो अमेरिकेत. आता भारत , अमेरिका आणि चायना या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर समझोता होईल ना होईल.. पण हे आंतररष्ट्रीय सौजन्य मात्र मला अनोखं वाटलं आणि म्हणून त्याला मी शब्दबद्ध केलं!
- प्राजु
वाचने
10778
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहा
अबब,
हाहा....
म्हंटलं तर
किस्सा
तुम्ही
In reply to किस्सा by मुक्तसुनीत
चिंकी इ.
In reply to किस्सा by मुक्तसुनीत
अतिरेकी पॉलिटिकल करेक्टनेस!
In reply to चिंकी इ. by कालिन्दि मुधोळ्कर
या न्यायाने
In reply to अतिरेकी पॉलिटिकल करेक्टनेस! by हुप्प्या
'चिली चिकन'
In reply to या न्यायाने by मुक्तसुनीत
'चिली चिकन'
In reply to 'चिली चिकन' by घाटावरचे भट
मुसुरावां
In reply to या न्यायाने by मुक्तसुनीत
हा प्रश्न अतिरेकी पॉलिटिकल करेक्टनेसचा नाहीये
In reply to अतिरेकी पॉलिटिकल करेक्टनेस! by हुप्प्या
प्रकाटाआ
हा हा! भारीच!
हा हा हा...
In reply to हा हा! भारीच! by चतुरंग
अशक्य
In reply to हा हा! भारीच! by चतुरंग
हा हा
कधी कधी
रेवतीशी अगदि सहमत
In reply to कधी कधी by रेवती
अनुभवकथन
+१
In reply to अनुभवकथन by सहज
+२
In reply to +१ by मुक्तसुनीत
हॉर्न ने
knowing Praju
In reply to हॉर्न ने by मराठी_माणूस
हो संदीप,
In reply to knowing Praju by संदीप चित्रे
आता भारत ,
माझा शेजारी गाडी मागे घेताना
प्राजु,
एकदा दोनदा
हा हा हा ....
प्राजु,
In reply to हा हा हा .... by छोटा डॉन
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्तच
लै भारी
हा हा हा
अवांतर :-
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
वा! छानच लिहीला आहेस किस्सा. मात्र ऐकण्यातली मजा औरच होती.
हा हा
माझा अनुभव
In reply to हा हा by ऋषिकेश
छान
हा
झकास!!
आपल्या
वा!!!
अनुभव
मस्त लेख
मिडवेष्टात राहा
मस्त