अंग मोडेस्तोवर कष्ट करुन
त्याला मातीमोल होतांना बघतांना,
कर्जदारांच्या पाया पडून
त्यांच्यासमोर दातांच्या कण्या करतांना,
अन् चाकरीत आपलं स्वत्व गमावून
आत्मसन्मान कण कण मरतांना,
खांद्यावरच्या जबाबदारीच्या ओझ्यांनी त्याचा पाय थरथरतो..
पण बाप तरी कुठं काय करतो?
आईच्या त्यागावरच्या कथा कविता वाचतांना,
पोरांच्या नजरेतली आपली किंमत जोखतांना,
‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हेडफोनवर ऐकतांना
डोळ्यात आलेलं पाणी लपवत नजर चोरतांना,
आपल्याच भावनांच्या लाटांखाली
त्याचा जीव गुदमरतो..
पण बाप तरी कुठं काय करतो?
‘मामा-मावशी चांगले, अन् काका-आत्या वाईट’
ह्या जगरहाटीत आपली नाती तुटतांना,
नोकरी व्यवसाय पोटासाठी
आपली माती माणसं पाठी सुटतांना,
त्याच्या प्रत्येक काळजी-भितीपोटी
मतलबी दुनिया त्याला लुटतांना,
तो पिंजऱ्यात अडकल्या पाखरागत भिरभिरतो..
पण बाप तरी कुठं काय करतो?
ज्यांच्यासाठी आपली स्वप्नं जाळली
तीच लेकरं त्याची पापं मोजतांना,
त्यांच्या शहाण्या जिभा
त्याच्या सुरकुतल्या थकलेल्या मनाला टोचतांना,
अन् अजून जरी आई आवडीची असली
तरी उद्या तीही डोईजड होईल, हे अनुभवातून जोखतांना,
आपल्यामागं हिचं काय होईल
ह्या विचारानं त्याचा जीव घाबरतो..
पण बाप तरी कुठं काय करतो?
आणि शेवटी कधीतरी
आपल्या सुख-दुःखांचा हिशोब करतांना,
थबकून गेलेला तो, अन् पुढं गेलेला जमाना ह्यात
आपल्याच मनाचे वेग आपल्या दुबळ्या मुठीत धरतांना,
बरंच काही बाकी असतांनाही
लढण्याची-जगण्याची आस सरतांना,
त्याच्या डोळ्यात एक शेवटचा अश्रू उरतो,
अन् मेलेलं मन वाहणारा, त्याचा थकलेला देह मरतो.
पण खरंच, बाप कुठं काय करतो?
- चिन्मय
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप कविता आहे !!
बाप कविता आहे !!
नि:शब्द 😶
नि:शब्द 😶
निशब्द मित्रा
निशब्द मित्रा
बाप रे. दारूण धगधगते सत्य.
बाप रे. दारूण धगधगते सत्य.
आई अजून 'आवडीची, कारण अजून ती 'कामाची'
In reply to बाप रे. दारूण धगधगते सत्य. by चित्रगुप्त
आई अजून 'आवडीची, कारण अजून ती 'कामाची'
'उद्या' ती डोईजड होईल ...
डोळे आहेत तोवर बघून घ्या...
का म्हून रडारड करून राहायले रे बापा ?
बाप म्हणीसन जरा दोन हात पाठी सरक ना बे...
साठीना पोरगा, दोन घास खायीसन जा ना रे,
कधी म्हइनाले का बे तुले?
"बापा, तू बी जरा जगीन पाह ना रे..."
पोट्टा-पोट्टी म्हंजे देवाघरना देनं!
काय खात्री बोले,
निघीन शहाना, का निघीन ते बेनं?
हातमां देईन काठी, का लागीन पाठी!
आखी जिनगानी काय फकस्त त्येचा साठी?
म्हनून म्हनायले , येळ शे तवरच केळ खा
पुढनं कोनी देखना, कोन कव्हा जायी मना...
भारी..
In reply to डोळे आहेत तोवर बघून घ्या... by कर्नलतपस्वी
कधी म्हइनाले का बे तुले?
"बापा, तू बी जरा जगीन पाह ना रे..."
भारीच..
कविता आवडली
अगदी वास्तवदर्शी लिहीली आहे.
खुप छान!!
खुप छान!!
बाप हा वाल्या कोळ्यासारखा असतो.
ज्या बायका मुलांसाठी तो राबला, आपले तारुण्य खर्ची घातले, तीच बायका मुले पुढे म्हणतात की "तुम्ही आमच्यासाठी काय केलेत?"
प्रचंड आवडली !
जबरदस्त ! बाप कुठं काय करतो ? ही संकल्पना प्रचंड आवडली. फारच छान. कवींनी आपल्या लेखण्या घासून टाकल्या मातृत्वावर पण पितृत्वावर कोणाची निब टेकलीच नाही कागदावर ! अनवट झाली आहे रचना.