Skip to main content
लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 07/09/2026 11:46 या दिवशी प्रकाशित केले.

निवडुंगांची सद्दी, सुकला सोन्याचा पिंपळ
भ्रमास किनखापी अंगरखा, सत्य नग्न, बेहाल
जलपर्णी फोफावे, करपे काठावर हिर्वळ
उत्सव नुरले, उधाण उरले, मंजुळ किती गोंधळ!
तर्क-बिर्क खुंटीवर आता गुद्द्यांचाच सुकाळ
डी जेचा थर्थराट, फुटला मृदंग, तुटला टाळ!


वाचने 219
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

एकसुरी ढोल, ढोलकी, डफ, केवळ एक दोन अथवा तीन स्वरातले किंचाळणे (ज्याला गाणे म्हणोत ज्यांना म्हणायचे ते बिचारे) एकतारीची टिंग टिंग हेच  बहुतांश  समाजाला आवडत असते. हेच गाणे, किंचाळणे याला देवळासमोर भजन, आरती यांची एकसुरी लय लावून दिली की धार्मिक म्हणून मिरवणे सोपे असते अथवा व्यासपीठासमोर लावणी, ठुमरी नाच यांची भ्रष्ट  नक्कल लावून दिली की रसिक म्हणून मिरवता येते... त्याला विज्ञानाच्या सहाय्याने  भोपू, कर्णा, भोंगा यांची साथ मिळाली अन ज्जे बात !! 

आपली रसिकता वा धार्मिकता कळसाला नेऊन पोचवण्याची संधी मिळाली.. वाजवा रे वाजवा !!!! 

चूक विज्ञानाची आहे.. चुकीच्या माणसांना चुकीच्या गोष्टी देऊन चूक केली.. भोगा कर्माची फळे. 

 

 

 


पण मी आशा का सोडू? चांगला बदल ही घडेलच

 

जरी ऋतु हा शुष्क भासतो, माती नाही वांझ.
उमलतील शत नवान्कुर हे, उजाडता प्रभात!
पुन्हा लाभेल सूर संथ तो, गवसेल ती तान,
तृप्त करील या धरणीला, अमृताचे गान!


कावळ्यांच्या गर्दी मध्ये, तरी हंस कुठे हरवला?
काळ्या कर्कश थव्यांनी, आभाळ सारा भरला!
भ्रमास भरजरी शेला, सत्य उभे नागडे,
हंसाच्या शुभ्र पंखी, काळे सावट दाटले!

 

जलपर्णी फोफावली, सरोवर सारे झाकले,
काठावरचे हिरवे गवत, उन्हात करपुन गेले,
उत्सव नुरला, उरला केवळ आवाजांचा मेळा,
मंजुळ स्वर हरवून गेले, कावळ्यांचा झाला सोहळा!

 

हंस म्हणे, “शांत व्हा जरा, ऐका अंतरीचा नाद,”
कावळे म्हणती, “कसला विचार? करावा  आमचाच जयजयकार!”
तर्क-बिर्क खुंटीवर आता, गुद्द्यांचा झाला सुकाळ,
शब्द हरवले गर्दीत सारे, वाढला जगी कल्लोळ!

 

डी जेचा र्थराटात, फुटला मृदंग, तुटला टाळ,
नादामधला सूर हरपला, उरला उन्माद केवळ।
कावळ्यांच्या या गर्दीत आता, हंसाचा स्वर कुठला?
कर्कश हाकांच्या मेळ्यामध्ये, मंजुळ नादच हरवला!

 

हंस कुठे?—हा प्रश्नही आताशा, कुणाही पडतच नाही,
कावळ्यांच्या या राज्यामध्ये, हंसाला किम्मत नाही ।
सोन्याचा पिंपळ सुकला, निवडुंग फोफावले,
आणि सरोवराच्या गढूळ जळात हंसबिंबही हरपले,

 

पैजारबुवा, 


In reply to by ज्ञानोबाचे पैजार

कावळ्यांच्या या गर्दीमध्ये, हंस जरी हरवला, 

सत्याचा हा उजेड, जरी काळ्या ढगांनी झाकला, 

सुकला जरी पिंपळ, निवडुंग ही फोफावला; 

कर्कश या आवाजात, मधुर स्वर थोडासा दबला, 

 

तरीही... 

 

उठेल एक ठिणगी, नि पालटेल हाही काळ, 

कावळ्यांच्या या राज्यात, जिंकेल पुन्हा हंस बाळ!

 

कर्कश  कावळा

चेतन

 


In reply to by अनन्त्_यात्री

इतके दिवस मिपा मोबाइल वर वाचावे लागत होते, पण आता पुन्हा लॅपटॉपवर उपलब्ध झालेले आहे.

त्यामुळे पुन्हा सक्रिय होइन म्हणतो.

पैजारबुवा,