Skip to main content

महोत्सव महामातेचा: वैदर्भी महालक्ष्मी सण

लेखक वृषभ खोंडे यांनी शनिवार, 29/08/2026 14:11 या दिवशी प्रकाशित केले.

लहानपणी शाळेत जायच्या वयात वडिलांनी सरकारी लायब्ररी लावून दिली होती. त्यातून उत्तमोत्तम पुस्तके आणून वाचणे आणि त्यावर त्यांच्याशी साप्ताहिक चर्चा करणे असा एक शिरस्ता लावून दिला होता. ह्यावेळी ना. धो. ताम्हणकरांची पुस्तके हाती लागली होती. गोट्या, चिंगी, खडकावरला अंकुर ह्यांच्याशी ओळख झाली होती. ह्यात एक मजेशीर भाग वाचला होता, गोट्या त्याची बहीण आणि दादा वहिनी दिल्लीला दाबके नावाच्या एका गृहस्थांकडे जातात तेव्हा गौरी गणपतीचा सीझन असतो, दाबक्यांचा तरुण गोष्टीवेल्हाळ जावई आलेला असतो आणि त्याची गोट्याने उडवलेली भंबेरी असा काहीसा त्या कथा भागाचा प्लॉट होता. 

नमनाला घडाभर तेल टाकण्याचे कारण म्हणजे येऊ घातलेली गौरी गणपतींची लगबग. खरं सांगता प्रमाण भाषेचा प्रामाणिक वापर म्हणून गौरी गणपती म्हणायचे पण जिभेच्या वळणाला प्रामाणिक रहायचे ठरवले तर म्हणायचे गणपती आणि महालक्ष्म्या (लक्ष्मी सुद्धा नाही बरंका). ह्या सणाच्या वेळी बहुतेक जसे वातावरण वरील गोट्याच्या कथेत वर्णिले आहे तसेच असते. म्हणले तर रिपरिप पाऊस, म्हणले तर आल्हादायक ऊन आणि हे सगळे हिरव्याकंच श्रावणाच्या पार्श्वभूमीवर. 

अधिकृत कालनिर्णय कॅलेंडरची भाषा वापरता भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मीचे (गौरीचे) घरी आगमन होते. विदर्भात या सणाला विशेष महत्त्व असून अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या (काही ठिकाणी १०० ते ३५० वर्षांपासून) ही परंपरा सुरू आहे. आमच्या ओळखीतील एका कुटुंबांत दरवर्षी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवला जाणाऱ्या चांदीच्या थाळ्या प्रत्येक अडीच किलो वजनाची एक अशा भारदस्त आहेत.

गणपतीचे आगमन झाले की त्याच दिवशी पासून महालक्ष्मी आगमनाची तयारी सुरू होते. साफसफाई तर गणपती आगमनाच्या अगोदरच युद्धस्तरावर झालेली असते. आता मग महालक्ष्मी आगमनाची तयारी काय ? तर सज्जावर ठेवलेल्या काही पेट्या काढणे, ह्या पेट्यांमध्ये ठेवलेला असतो आत्मा एका सांस्कृतिक ठेव्याचा. अलगद खाली उतरवून पहिले पेट्यांवरची धूळ झटकली जाते. सहसा ह्या पेट्या बाहेरून मजबूत आणि आतून मखमली आच्छादन असणाऱ्या असतात. आत मधे व्यवस्थित पेपर, कापड आणि थर्माकोल मधे गुंडाळून ठेवलेले असतात ते मुखवटे - महालक्ष्मींचे मूर्त स्वरूप. नाजूक, माती + प्लास्टर ऑफ पॅरिस + रंगाची कलाकारी वापरून रंगवलेले हे मुखवटे तसे हातात धरता निर्जीव मातीचे पुतळे वाटतात, ते बदलतात आवाहन झाल्यावर. काहींच्या घरी पिढीजात शेकडो वर्ष जुने पितळी मुखवटे असतात जड. ते पण सुबक अन् सुंदर असतात पण मला आवडतात ते मातीचे घडवलेले चमकदार रिअल लाईफ सारखे दिसणारे मुखवटे. मुखवट्याच्या पेटीतच त्या मुखवट्यांना साजेसे श्रृंगार साहित्य पक्षी दागिने, टिकल्या, कानातली, नथ, बांगड्या पाटल्या बिलवर इत्यादी साहित्य असते, कुंकू - गंध असते. 

हा ऐवज घरीच एखाद दिवाण सेट खाली हलकेच सरकवून ठेवला जातो तोवर दुसरी मोठी पेटी खाली काढली जाते. त्या पेटीत असतो एक वेगळाच जामानिमा पक्षी कापड आणि कापूस वापरून बनवलेली महालक्ष्मीची धडे आणि त्यांना सपोर्ट द्यायला मजबूत पत्र्याच्या किंवा लोखंडी सळईच्या कोथळ्या. 

 

mahalaxmi gauri fiber stand 2221804719 n8p4nz0f 2 मुळात कोथळीत (पोटात) धान्य भरून त्यावर धड सेट करून त्याच्यावर मुखवटे सेट करून नंतर त्याला शालू/ साडी नेसवणे आणि आभूषण आदी श्रृंगार केले की दोन जिवंत स्त्रिया आणि त्यांची दोन मुले (एक मुलगा एक मुलगी) बसलेले दिसतात. प्रत्येक घरच्या अनुभवी स्त्रिया महालक्ष्मी बांधणे ड्युटी वर नियुक्त असतात. त्यांच्या हाताखाली घरातली लहानगी सेना सेलो टेप, नाडी, सेफ्टी पिन, काजळ, कात्री, क्रेप फुले, सजावटी माळांचे विद्युत पुरवठा विभाग थोडे मोठे कर्मचारी नियुक्त करून तयार असतो. 

महालक्ष्मी आगमनाचा भाव अतिशय सुंदर आहे , महालक्ष्मी घरी माहेरवाशीण म्हणून येते अशी श्रद्धा आहे. ती कधीही येऊ शकते, तिचे स्वतःचे घर आहे पण येईल तेव्हा तिला तिचे घर झकपक दिसायला हवे ह्या भावातून घरची स्वच्छता एक विशेष कार्यभाग असतो महालक्ष्मी, आवाहन, स्थापना आणि पूजनात. एकंदरीत अडीच दिवस चालणारा सण पहिला दिवस आवाहन, दुसरा दिवस महापूजन + महाप्रसाद (इंपॉर्टन्ट काम) आणि तिसरा दिवस उद्यापन + हळदी कुंकू.

पहिल्या दिवसाचे ढोबळ तीन भाग असतात. पहिल्या भागात मखर बांधणे हा प्रकार होतो. मखर म्हणजे देवीपुढे मांडायची सजावट, जुन्याकाळी घरातील एक जास्तीचा पलंग घेऊन त्याच्या चारही टोकांना असलेल्या खोबणीत मच्छरदाणीच्या लोखंडी काड्या रोवून त्यांच्यावर मखमली साड्या, पातळ इत्यादी आच्छादून एक मंडप तयार करणे, त्याच्याजवळ एखाद इलेक्ट्रिक पॉईंट असावा, तिथून सप्लाय घेऊन चार दांड्यावर फिरवून माळांची आरास करणे खाली मोठी सतरंजी अंथरुन दोन बाजूला दोन कुंड्या ठेवणे. आता दुसरा भाग सुरू होई.

दुसऱ्या भागात देवी स्थापन करणे. महालक्ष्मी म्हणजे फक्त दृष्य असतात तितक्याच नाही तर ज्या ज्या स्वरूपात घरी लक्ष्मी असेल ती ती तिथे स्थापन केली जाते. पहिले घरात हळद आणि कुंकू पाण्यात कालवून मुठी मुठीने त्याचे ठसे घरभर छापून "पाऊले" रेखाटली जातात लक्ष्मीची. मग होतो गंगागौर आणायचा कार्यक्रम म्हणजे आई/ काकू त्यांच्या सोबती असणाऱ्या स्त्रियांपैकी एक जणीच्या हातात चांदीचे तबक असते त्यात महालक्ष्मींचे सिरॅमिकचे मुखवटे असतात, महिनाभर अगोदर पासून घरात देवघरात स्थिरावलेली ज्येष्ठगौर असते, असे सगळे घेऊन सोबत एक श्रीफळ, चार आंब्याची पाने अन् एक कलश घेऊन घरच्या पाणवठ्यावर जातात. तिथे कलशात घरच्या विहिरीचे पाणी भरून कलश तयार केला जातो त्यावर नारळ बाजूने आंब्याची पाने लावून कुंकवाने शुभचिन्हे रेखाटली जातात. सोबतीला कलशात पाणवठ्याजवळचे पाच खडे घालून आणतात. मला अजूनही आठवते आमच्या वावरातील विहिरीला आजूबाजूने काँक्रिट चे उतार काढले त्यानंतर प्रत्येक वर्षी पूजेला विहिरीच्या वरंबीवर पाच खडे आणून ठेवायची ड्यूटी माझ्या एका चुलत भावाची होती, ज्याचे नंतर प्रेमाने टोपणनावच दगड्या ठेवले आम्ही.

हा सगळा जामानिमा घेऊन सवाष्ण घरच्या उंबरठ्यावर आली की आई काकू पहिले पाट घालत. तिथे ज्येष्ठा, गंगा, मुखवटे घेतलेल्या ह्या सवाष्णीचे पाय धुतले जात आणि माहेरवाशिणी उंबरा ओलांडून घरात येत. घरात ती सवाष्ण पुढे आणि आई काकू मंडळी मागे फिरत. मग होई सोहळा देवीला पूर्ण घर दाखवण्याचा. ज्या घरात गेले तिथले नाव घेतले जाई उदा. स्वयंपाकघरात गेले की आई प्रश्न करी गौर कशाच्या पायी आली ? त्यावर काकू उत्तर देई सोन्या रूप्याच्या पायी आली, मग काकू प्रश्न विचारी इथे काय आहे ? अन् आई उत्तर देई इथे रांधवडा आहे इथे उदंड आहे. असे शेजघर, माजघर, कणगी, पेव, जनावरांचा गोठा, शस्त्रागार, पाहुण्यांची खोली सगळे फिरत असे असे फिरून शेवटी ती जिथे महालक्ष्मी स्थापन होणार आहे तिथे येई. 

आता सुरू होई दुसरा भाग, महालक्ष्मी मांडणे, पहिले तर कोथळ्या शिगोशिग धान्याचे भरल्या जात, घरची ज्वारी, बाजरी किंवा गहू जे पीक त्यावर्षी जगदंबेच्या कृपेने भरपूर आलेले असेल ते कोथळीत भरले का त्यात दाबून चापून चोपून कापडी धड बसवले जात असे, असे ज्येष्ठा कनिष्ठा आणि दोन बाळे सगळ्यांसाठी. ते अर्धवट स्ट्रक्चर उभे राहिले की तबकातले मुखवटे त्यांच्यावर अलगद फीट करणे, मग त्यांना साड्या नेसवणे इत्यादी झाले की ढोबळमानाने महालक्ष्मी घरी आल्याचे हलके हलके फिलिंग येऊ लागे.

आता सजावट सुरू होई. सजावट म्हणजे देवीला आभूषणे पेहेरावणे, पदराचा शेव ऍडजस्ट करणे, उंची वगैरे नीट मॅनेज करणे हे होई. मग त्यांच्यासोबत आलेल्या ज्येष्ठा गौर (तांब्यावर रंगवलेली श्रावणातील ज्येष्ठा गौर) गंगागौर आणि चतुर्थीला आलेला गणपती सोबतच एका मांडवात विराजमान होत.

ते झाले की समोर आरास मांडली जाई, अनारसे, लाडू, पाच प्रकारची फळे, दोन प्रकारच्या धान्यांची आरास (शक्यतो ज्वारी आणि गहू असत घरचे) मग त्यात मिसळून जंगली लाल बोरे त्यांच्यावर एक एक काकडी एक मक्याचे कणीस आणि एक एक सफरचंद ठेवण्यात येत असे. इतके करून परसदारातील ताज्या फुलांचे हार घातले का त्या निर्जीव बांधलेल्या बाहुली सारख्या मूर्तींत एकदम प्राण आल्यासारखे, संतुष्टीने आई जगदंबा आपल्याला पाहत असल्याचे भाव मनात येत असत. 

IMG 20260828 WA0014 

मग देवीचे रूप डोळा भर साठवत गौर आणणाऱ्या सवाष्णींना हळदी कुंकू सोबत चहा कॉफी देऊन बोळवण होत असे दुसऱ्या दिवशी प्रसादाला सहकुटुंब येण्याच्या आमंत्रणासह. अशा प्रसंगी स्त्रियांच्या गप्पा रंगत, आमच्या महालक्ष्मी कशा त्रास न देता बसतात, अमक्यांच्या घरी मागच्यावर्षी एक साडी बांधायलाच कसा दीड तास गेला. सगळे साग्रसंगीत झाल्यावर कसे कुठली मूर्ती ज्येष्ठा वाटते (जराशी पोक्त) अन् कुठली कनिष्ठा वाटते ह्या गप्पा पण रंगत. ह्या नंतर सुरू होत असे प्रसादाची तयारी.

आता माहेरवाशिणी अवचित आल्या, घरी गोडधोड तयार कोण ठेवणार म्हणून का तिला आज उपाशी ठेवणार ? हा भाव बाळगून पहिल्या दिवसाचा नैवेद्य केला जातो तो कुटुंबपरत्वे बदलतो, आमच्याकडे भाजी भाकरी असते. शेपूची लोखंडी तव्यावर भाजून फक्त मीठ घालून केलेली भाजी सोबतीला ज्वारीची भाकरी/ दशमीचा तुकडा अन् त्यावर गुळाचा खडा आणि तुपाचा चमचा असा साधासुधा प्रसाद पहिल्या दिवशी असतो. भाव तोच, बाई माहेरवाशीण आलीस आज घरी जे ओले सुके आहे ते खा उद्या तुझा गोडधोड पुरणपोळीचा पाहुणचार करू. 

दुसरा दिवस म्हणजे महापूजन व महाप्रसाद दोन्हीची तयारी सोबतच चालू होते. एकंदरीत दोन्ही सणसणीत प्रकार असतात विदर्भात. पूजनाची सुरुवात आदल्या दिवशी स्थापन केलेल्या सुपारीच्या गणपतीच्या पूजनापासून सुरू होते. गणपती (सुपारीचा), आणि त्या दिवसापुरते देवघरातून आणलेले देव ह्यांचे सोबत पंचामृत, शुद्धोदक आणि अत्तराने स्नान होते, अभिषेक होतो आणि सोबतच महालक्ष्मीचे आवाहन होऊन श्रीसुक्त पठण होते. कित्येक घरांत महापूजनाला पौरोहित्य करणारे गुरुजी खास बोलवले जातात. हारतुरे एक एक आठवडा अगोदर बुक करून ठेवले जातात. असेच सगळे लगबगीचे काम असते महाप्रसादाला. 

जुन्याकाळी विदर्भ त्यातही पश्चिम विदर्भ - वऱ्हाड प्रांताला "वऱ्हाड वऱ्हाड अन् सोन्याची कराड" म्हणत (कराड म्हणजे नदीचे तीर) अर्थात वऱ्हाडचा तीर म्हणजे सोन्याची भूमी. प्रचंड सुपीक काळी जमीन, कापूस, हरबरा, तूर, ज्वारी, गहू इत्यादी नगदी पिके भरपूर जंगले प्रचंड मोठी सरासरी कमाल जमीन धारणा इत्यादी सगळ्यांचा प्रभाव वऱ्हाड प्रांताच्या खानपान संस्कृतीवर दिसून येतो. 

वऱ्हाडी मनोवृत्ती बऱ्यापैकी रिलॅक्स, घाई गडबड नसणारी अन् आरामशीर चालणारी असते, जेवणात सुद्धा त्यामुळे फास्ट फूडला स्थान अन् पसंती कमीच, तब्येतीत निगुतीने केलेल्या पाककृती अन् तितकेच मनापासून दाद देणारे यजमान हा एक खास गुण. 

साहजिकच महालक्ष्मीच्या नैवेद्यात सुद्धा ह्याची झलक दिसतेच. म्हणले तर महाप्रसाद इतर महाराष्ट्रात असतो तसाच पुरणपोळी आणि भाज्या चटण्या कढी आणि आमटीने परिपूर्ण असतो पण प्रमाण अन् व्हरायटी अतिप्रचंड. एकीकडे घरची पुरुष मंडळी जगद्जननीचे आवाहन करत असताना, घरच्या सुगरणी वऱ्हाडी रीतीला अनुसरून असलेल्या पाकसिद्धीला अक्षरशः वॉर फुटिंग वर सोवळ्याचे पदर खोचून लागतात. आमच्याकडील महालक्ष्मी पूजनात महाप्रसादासाठी १६ प्रकारच्या भाज्या आणि १६ प्रकारच्या चटण्या (कोशिंबीर/लोणचे) बनवण्याची विशेष परंपरा आहे. महालक्ष्मीला निसर्गाची समृद्धी अर्पण करण्यासाठी या ऋतूतील सर्व भाज्यांचा यात समावेश केला जातो. भाज्या म्हणजे 1. अंबाडीची भाजी (वऱ्हाडी पद्धतीतील सर्वात महत्त्वाची भाजी) 2. माठ (हिरवाच/ तांदुळजीरा) 3. मेथी 4. पालक 5. चाकवत (मिक्स पातळभाजी) 6. चवळीची भाजी (पालेभाजी किंवा शेंगा) 7. भेंडी 8. गवार 9. कारले 10. तोंडली 11. पडवळ / दुधी 12. लाल भोपळा 13. वांगे 14. बटाटा 15. कडधान्य (चणा किंवा मूग) 16. अळूची भाजी (किंवा अळूचे फदफदे/वडी), ज्यांच्यासोबत चटण्या आणि लोणची म्हणजे 1. जवस (अळशी) चटणी 2. कारळ्याची (खुरसणी) चटणी 3. तीळ चटणी 4. शेंगदाणा चटणी 5. खोबऱ्याची चटणी 6. कढीपत्ता चटणी 7. पुदिना चटणी 8. हिरव्या मिरचीचा ठेचा (बिना लसूण फक्त जिरं मीठ घालून) 9. चिंचेची आंबट-गोड चटणी (ब्राह्मणी पद्धतीचे शेंगदाणे घातलेले पंचामृत) 10. काकडीची कोशिंबीर 11. टोमॅटोची कोशिंबीर / चटणी 12. मुळ्याची कोशिंबीर 13. वाटलेल्या चणा डाळीचा चटका 14. लिंबाचे लोणचे 15. कैरीचे लोणचे / तक्कू 16. मिरचीचे लोणचे. त्याशिवाय साध्या घडीच्या पोळ्या, पुरणपोळ्या, कणकेचे दिवे, कढी, आमटी/ कटाची आमटी, मिश्र डाळींचे वडे, बटाटा भजी, वावडिंगाच्या पानाची भजी, पिकलेल्या केळ्याची भजी, कुरडई पापड हे तळण असते. स्वयंपाक झाला की पहिले आरती आणि नैवेद्य दाखवला जातो, नैवेद्याचे एक ताट बाजूला झाकून ठेवले जाते (रात्री देवी प्रसाद ग्रहण करते ही श्रद्धा असते लोकांची) त्यानंतर पहिली पंगत सवाष्ण ब्राह्मण ह्यांची. नंतर आलेले पै पाहुणे ह्यांच्या जेवणावळी अन् शेवटी घरचे यजमान अन् स्त्रिया अशा जेवणावळी उठतात. हे झाले घरगुती महोत्सवाचे. सामान्यतः घरगुती पद्धतीत किमान २०-२५ व कमाल १५० लोकांच्या पंगती उठतात. महालक्ष्मी हा सण विदर्भात कटाक्षाने सगळ्या कुटुंबाने एकत्र यायचा सण असतो. सगळे भाऊ, ज्यांच्या सासरी महालक्ष्मी नाहीत अशा बहिणी असा सगळा गोतावळा गोळा होतो, कधी कधी ३०-३५ माणसे तर घरचीच होतात. आळी मधली सगळी घरे, ओळखीचे पाहुणे एकमेकांच्या घरी दर्शनाला येणारी माणसे असे मोठे लटांबर तयार होत जाते.

काही काही मातब्बर घराण्यात तर ३५० - ४०० वर्षांपासून महालक्ष्मी महोत्सव साजरा होतो. वर सांगितल्या प्रमाणे आमच्या ओळखीत एका परिवारात तर शेकडो वर्ष जुने पितळी मुखवटे आज पण वापरले जातात. कैक घरच्या महालक्ष्मी सिद्ध मानल्या जातात त्यांना लोक नवस बोलतात, पूर्ण झाले की पुढील वर्षी ते नवस भक्तिभावे फेडतात. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील एका घरी तर जवळपास दीड हजार लोकांच्या पंगती महाप्रसादाला उठतात. लोकांची ती सामूहिक आस्था आहे आणि हा खरा वऱ्हाड प्रांताच्या सामायिक उत्सवप्रियतेचा एक नमुना आहे. 

मोठ्या प्रमाणात जेव्हा महालक्ष्मी साजऱ्या होतात तेव्हा प्रसादाचे स्वरूप थोडे भंडाऱ्या सारखे होते, अशावेळी महाप्रसाद पूर्णतः बिना कांदा लसूण तयार करणे एक कसब असते ज्यात जिल्ह्यातील काही जुने नामवंत आचारी वाकबगार असतात. अशा आचारी मंडळीला सहा सहा महिने आधी यजमान मंडळी भेटून शाल श्रीफळ पानाचा विडा सुपारी आणि उपरणे (वऱ्हाडी मध्ये शेला/ साफा) घालून बुकिंग फायनल केले जाते. 

ह्या मोठ्या प्रसादासाठी कोहळ्याची (लाल भोपळ्याची) साल न काढता फोडी करून बाकर काढून केलेली वऱ्हाडी स्टँडर्ड ने झणझणीत तरी असणारी सरसरीत भाजी, साधे तुरीचे गुळ व मीठ घालून केलेले वरण त्यावर तुपाची धार, बेसनाची वडी, मेथीचा खुडा, मोठाल्या चपात्या, तूप व मीठ घालून उकडलेला घट्ट भात, बटाटा गिलकी (घोसावळी) भजी, मठ्ठा हे सगळे असते. बाकर म्हणजे बिना कांदा लसूण वापरता फक्त खोबरे किस, खसखस, तिळ, लाल तिखट, हळद, धणेपूड, जिरे पूड, काळी मिरी कडीपत्ता, चिंच /आमचूर इत्यादी मिसळून केलेली ओलसर पूड. 

अशा मोठ्या जागी ओळखीने नाही तर आस्थेने लोक येतात, जात पात पंथ भेद प्रसंगी धार्मिक भेद विसरून सुद्धा लोक मनापासून मातेच्या दर्शनाला येतात, नवस बोलतात, फेडतात, येणारी प्रत्येक स्त्री देवीला हळदीकुंकू वाहते, समोरच्या राशीवर ऐपतीप्रमाणे कोणी किलोभर धान्य टाकते, कोणी पायली भर तर कोणी मणभर धान्य वाहते. हळूहळू रास क्विंटल भरापर्यंत जाते. ही शिकवण असते यजमानाला मनापासून कणगी उघडता देवी पेव भरून देते हीच ती शिकवण. यजमानाचा राशीतील एकही दाण्यावर हक्क नसतो, रीतच नाही ती, मग आता जमा झालेली क्विंटल भरून आलेली श्रद्धेची शिदोरी करायची तरी काय ? 

ह्यातून होतात राशीचे भंडारे, आलेल्या धान्याच्या भरड चपात्या, भाकरी, सोबतीला यजमानाने पदरमोड करून केलेली बटाटा वांग्याची रस्सा भाजी, वरण, भात, गोड बुंदी/ जिलबी, मठ्ठा असा हा भंडारा असतो, ज्या लोकांना वेळेवर देवीच्या दर्शनाला येण्याचा योग साधला नाही त्यांना किमान प्रसादाचा घास लाभावा म्हणून केलेली ही सोय आहे/ असते. 

महापूजा आणि नैवेद्य झाल्यावर जे आदीमायेचे स्वरूप त्या मुखवट्यांवर विलसत असते त्याचे विसर्जन करण्याची ईच्छा होत नाही. मग लोक जड मनाने देवीचे स्थान थोडे हलवून नाममात्र विसर्जन करतात. संध्याकाळी वेटाळातील स्त्रिया एकत्र येऊन हळदीकुंकू आदानप्रदान करतात ह्या वर्षी महालक्ष्मा फारच उत्तम झाल्याची पावती यजमानीण बाईंना देतात आणि तृप्त मनाने आपापल्या घरी जातात. 

हळूहळू रात्र होते, जड अंतःकरणाने पहिले हारतुरे उतरवले जातात, गणपती पाच दिवसांचा असला तर तो आधी संध्याकाळीच प्रस्थान ठेवून गेलेला असतो परत कैलासाला, नसल्यास पुढील पाच दिवसांसाठी तो आणि इतर देव परत देवघरात जातात. हळूहळू धड, मुखवटे, कोथळ्या वेगळ्या होतात काढल्या होत्या त्याच मखमली आच्छादनाच्या पेटीत ठेवल्या जातात, घरातली तरणी पोरे परत शिड्या लावून माळवदावर चढून पेट्या डांबराच्या गोळ्या टाकून नीट ठेवतात त्या पुढील वर्षीच खाली काढण्यासाठी आणि अशाप्रकारे एक महा सोहळा सफल संपूर्ण होऊन महालक्ष्मी माता वर्षभरासाठी संपन्नता आणि सुखशांतीचे आशीर्वाद देत आपल्या धामाला निघून जातात, भक्तांवर कायम कृपा मागे ठेवत. 


वाचने 411
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

खूप छान पहिलाच लेख लिहीलात वृषभ भाऊ 👌 माझ्या आठवणी आणि अनुभवांवर नंतर सविस्तर प्रतिसाद देईन 👍️


आमच्याकडे उभ्या गौरी,दिड पावणे दोनशे  वर्षाहून अधीक जुनी परंपरा. गौरायांचे मुखवटे पितळी धातूचे. आई साग्रसंगीत पुजा अर्चा, नैवेद्य करत असे. तीस एक वर्षापुर्वी  हा वारसा माझ्या सौं. कडे आला. 

सैन्यात होतो,अनेक अडचणी,उत्सव परंपरा, श्रध्दा अंधश्रद्धेच्या मर्यादा  ओलांडून सामाजिक झाला.सैन्यात बहुभाषिक , बहुप्रांतीय सहकारी या दिवसाची वाट दरवर्षी  बघायचे. पुरणपोळी मोठे आकर्षण होते.   

 


In reply to by कर्नलतपस्वी

मस्त स्वरूप आहे आपल्या महालक्ष्मींचे, आवडले ! छावणीत राहून आलेल्या पहिल्या माहेरवाशिणी बघण्यात आल्या माझ्या एकंदरीत !


In reply to by कर्नलतपस्वी

सुरेख 🙏. महाराष्ट्राबाहेर हा सण करणे विशेष कौतुक आणि मेहनतीचे काम आहे.


माहेरी पश्चिम महाराष्ट्र आणि सासरी मराठ्वाड्यात महालक्ष्मी रीतीरिवाजात फरक आहे.सुरुवातिला वेगळ वाटायच.मराठ्वाड्यात लक्ष्मी संध्याकाळी जेवतात,तर तिसऱ्या दिवशी निवांत हळ्दी कुंकू.तर इकडे दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण संध्याकाळी हळदी कुंकू झट्पट !!

पण माहेरी सांगतात की आप्ल्याकडेही संध्याकाळी जेवायच्या पण जशा घरातल्या इतर सुना नोकरी करु लागल्या,इतर शहरात मुले स्थायिक झाले की सर्वाना सोयीचा हा दुपारचा बद्ल झाला.

आमच्या सासुबाई ऐकत नाही ,लक्ष्मी संध्याकाळीच जेवणार म्हणतात .😅खुप धावपळ होते.बाकी सोवळ्याच्या स्वैपाकात मी एकदम प्रो झालेय😇सोळा भाज्या,चटण्या,पंचामृत,पुरण पोळी!!

खीर काणवले माझी जाऊ भारी करते.

माझ्या सासुबाई नवस करुन एक एक डैकोरेशन वाढ्वतात जसा गालिचा,पड्दे,नवीन कोठ्या...त्यांचे नवस खुप भारी असतात.अम्क्याचे लग्न होउ दे,तम्क्याला नोकरी लागू दे,त्याला बाळ होऊ दे...जे हमखास पुर्ण होतात🙃


In reply to by Bhakti

आमच्या महालक्ष्मी संतती नवसाला पावणाऱ्या अन् मॅच मेकर आहेत.


"महालक्षुम्या आल्या",

"कशाच्या पायी?"
"सुख समृद्धीच्या पायी"
महालक्षुम्यांना घरात घेताना तुळशीपासून ताम्हणात हळद-चुना मिसळलेल्या पाण्यात एकीने हाताचे तळवे बुडवून हात उमटवायचे, दुसरीने मुखवटे हातात घेतलेलं ताट त्यावर ठेवायचं आणि महालक्षुम्या कशाच्या पायी आल्या आहेत ते सांगत राहायचं. देवघरापाशी, तुळशीपाशी "देवाधर्माच्या पायी", कपाटापाशी "सोन्यारूप्याच्या पायी" "हिऱ्या माणकाच्या पायी", स्वयंपाकघरात "धनधान्याच्या पायी" असं करत करत शेवटी त्यांना स्थानापन्न करण्याच्या जागी आणलं की सुखसमृद्धीच्या पायी त्या तेथे विसावत!
 
गौरी-गणपती म्हणजे आठदहा दिवस आधीच लगबग सुरु. घराची स्वच्छता, फराळाची तयारी. मी शाळेत असताना सजावटीसाठी काहीतरी नवीन वस्तू घरी बनवत असे. पितळेचे मुखवटे घासून लख्ख करून त्यांना भुवया, डोळे, ओठ, गंध काढत असे. पूर्वी आमच्याकडे गौरींचे धातूचे तीन पाय असलेले स्टॅन्ड होते. त्यामध्ये सर्वात खाली एक मोठा डबा, त्यावर एक लहान डबा आणि त्यावर गडवा असे ठेवायचे. त्यावर स्टँड बसवून त्याला साड्या नेसवून गडव्यावर मुखवटा बसवायचा. डब्यांमध्ये धान्य, बदाम, सुपारी, हळकुंड, रुपया, खारीक असं सवाष्णीची ओटी भरताना ठेवतात ते साहित्य ठेवलं जाई. एका डब्यात फराळ केलेल्यातले गोड पदार्थ लाडू करंज्या वगैरे ठेवलं जात असे. मला स्वतःला पूर्वीपासूनच गोड आवडत नसे आणि आई सांगे या गौरी म्हणजे माहेरी आलेल्या लेकी असतात. तेव्हा मी आईला म्हणे अगं मग त्यामध्ये लाडू करंजी ऐवजी चकली चिवडा भर. आई म्हणे तू बसवशील तेव्हा कर तसं, मला बाई गोडाचंच देऊदेत. आता त्या स्टॅन्ड ऐवजी तयार फायबरचे पाय आणि मुखवटे आईने आणले आहेत. फराळ सगळा पोटात जाण्याऐवजी समोर असतो. आईचं हे एक मला आवडतं. बदलत्या काळाप्रमाणे आपणही बदलायचं तरी मनी भाव तोच. उगीच कर्मकांडाला चिकटून बसायचं नाही.
 
पूर्वी घरातलं आवरणे, गौरींसाठी मागची आरास वगैरे यात वेळ जात असल्याने आई संध्याकाळी गौरींना आणायची. दुपारी आवरून झालं असलं तरी भर उन्हात नको त्यांना आणायला, संध्याकाळचं येऊदेत म्हणायची. मी खूप लहान असताना आई एकटीच दोन्ही गौरींचं आवरायची. एकदा मी तिला एका गौरीला या वेळेस मी साडी नेसवते म्हणाले आणि छान जमली तेव्हापासून एक गौर ती आणि एक मी तयार करतो. आत्ता मुखवटे असणाऱ्या गौरी साक्षात देवीचं रूप धारण करतात, त्यांच्या हातांवर हळदीकुंकवाचे करंडे दिल्या बरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जिवंत होतात. बहुतेक घरात मध्ये गणपती आणि पुढे बाजूला दोन गौरी असतात, पण आमच्याकडे आजी म्हणायची गौरींच्या मध्ये गणपती बसवू नये, कारण माहिती नाही पण आमच्याकडे गणपती बाजूला असतो. पहिल्या दिवशी आमच्याकडे मेथीची भाजी, बाजरीची भाकरी आणि वरण भात हा नैवेद्य असतो.
 
दुसऱ्या दिवशी गौरींना पुरणाचा नैवेद्य असतो. आजी होती तेव्हा सोळा भाज्यांचा असायचा, आता पाच भाज्यांचा असतो. लहान असताना नुसत्या सजावटीची जबाबदारी घेणारी मी स्वयंपाकात कधी मदत करायला लागले समजलंच नाही. आता पाच भाज्या, तिखट पंचामृत, कढी, पाच चटण्या कोशिंबिरी यांची जबाबदारी माझी, पुरणपोळ्या आमटी मात्र अजूनही आईच बनवते. गौरींना नैवेद्य दाखवून सवाष्णी जेवू घालते. म्हणायचं सवाष्णी पण लहान, मोठे, म्हातारे असे सगळेच असतात त्यात. जेवणाच्या पंगती अजून आहेत तोवरच हळदीकुंकवासाठी गौरींच्या आराशीची तयारी सुरु होते. हळदीकुंकवाला येणाऱ्या बायका आईने कोणती गौर केली आणि मी कोणती केली ते ओळखतात. माझ्या लग्नानंतर नवऱ्याला पण हे कोडं घातलं, इतक्या दोन्ही गौरी एकसारख्या दिसून पण तोदेखील दर वेळेस बरोबर ओळखतो. हा दुसरा दिवस फारच लगबगीचा असतो. मी एक वेळ दमून जाते पण आई अजूनही हा लगबगीचा दिवस कसा न दमता पार पाडते याचं कौतुकच वाटतं.
 
तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन असतं. दही-साखर-भात आणि कानवल्यांचा नैवेद्य दाखवून आई मुखवटे थोडे हलवून ठेवते. पण तसं केल्याबरोबर त्या मूर्तींचे जिवंत भाव नाहीसे होतात. खूप भक्तिभावाने आईने प्रतिकूल परिस्थितीत देखील गौरींचं कधी काही कमी नाही पडू दिलं, आज त्यांनी तिला काही कमी ठेवलेलं नाही. आदल्या दिवशी रात्री आईने कुंकवाचे सपाट करंडे झाकण लावून देवींच्या पुढे ठेवलेले असतात. दुसऱ्या दिवशी ती ते उघडून त्यामध्ये बोटे उमटली आहेत का ते बघते. त्या करंड्यांमध्ये पुसटशा रेषा दिसतात तिला समाधान वाटते. 

२-३ गोष्टी विसरल्यात की माझ्या नजरेतून सुटल्या? आंबील आणि फुलोरा? फुलोरा परत 16 गोष्टींचा असतो, जसे लाडू, करंजी, मोदक, साटोऱ्या इत्यादी. तसेच महालक्ष्मी घरी आणली की संध्याकाळी (बहुतेक) एक सूत बांधण्याचा पण कार्यक्रम असतो, 16 आणि मुलांना 8.

बाकी लेख छान झालाय. 


In reply to by टीपीके

पण सजावट (मच्छरदाणी काड्या) + मखरात मध्ये फुलोरा मी जास्तच assume करून बसलो एकंदरीत. आणि पोते/ पावते मात्र पारच विसरलो.


In reply to by वृषभ खोंडे

पोते, पावते म्हणजे काय? 

दरवर्षी ठरवतो की या वर्षी आंबील नक्की शिकायचे, पण दरवर्षी राहून जाते. बघू कधी जमून येते. 


हा फोटो खुप जुना आहे. नवस केला मग गालिचा आला नंतर मागे पडदा आला वगैरे गोष्टीं वाढत गेल्या.यांच्या मुखवटा सुघट रंगवून बनवला आहे. जवळपास सत्तर वर्षे जुने मुखवटे आहेत.पुढल्या वर्षांत नवीन सुन येईल तेव्हा तिच्याकडूनच पितळे मुखवटे येतील बहुतेक!

 बाळांना पिलवंड म्हणतात. इकडे बाळ नव्हते. माझी आजी दरवर्षी चिट्ठी टाकायची हात करू का उत्तर "नाही"असच यायचं मग तिने नंतर तो नादच सोडला.