नुकतेच बालभारतीने इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल केले आहेत. त्यात खालील माहिती आहे:
- वेदकाळात आपले पूर्वज शाकाहार करत होते.
- वेदकाळात चार वर्ण होते. सर्व लोक आपआपली कामे व्यवस्थित करत होते. समाज गुण्यागोविंदाने रहात होता.
- आपल्याकडे उच्च दर्जाचे गणिताचे ज्ञान होते - वैदिक गणित.
- इतर अनेक पूर्वगौरव असणारा मजकूर आहे.
त्याबाबत मुंबई तक ने घेतलेली संस्कृत व इतिहास तज्ञांची मुलाखत :
https://youtu.be/v1c-BKohgOE?is=-RjJD0N5fM6CxeEx
तसेच लोकसत्ताचा याच विषयावरील अग्रलेख:
सांगलीच्या जगदीश काबरे यांचा या विषयावरील लेख खाली देत आहे. त्यांनी त्यांचे लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी दिली आहे.
वरील दोन संदर्भ व खालचा लेखात अतिशय योग्य मुद्दे मांडले आहत असे मला वाटते. बाकी शाकाहार चांगला की मांसाहार चांगला अशी चर्चा अपेक्षित नाही . मुले या वयात पाठ्यपस्तक हे संपूर्ण सत्य मानतात. मिपाकरांना या बदलांबाबत काय वाटते ते समजून घ्यायला आवडेल.
*'बाल'भारती की 'बैल'भारती? –जगदीश काबरे*
सहावीच्या इतिहासात वैदिक काळातील आहार केवळ वनस्पती आधारित होता असे असा उल्लेख करून खरा इतिहास लपवण्यामागचे कारण आजच्या उच्चवर्णीयांचे शाकाहाराचे स्तोम कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे. तसेच या इतिहासाच्या पुस्तकात जातींचाही उल्लेख वगळण्यात आलेला आहे. इतिहास समितीच्या अध्यक्षा त्याच्या समर्थनात म्हणतात की, 'शालेय मुलांना जात व्यवस्था जन्मावर आधारित होती असे सांगितल्याने त्यांच्या विचारांवर अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. मोठे झाल्यावर त्यांना गुंतागुंतीची रचना समजेल.' पण त्या हे जाणून बुजून विसरतात की, बाल मानसशास्त्रानुसार लहानपणी डोक्यात घट्ट बसवले जाते तेच कायमस्वरूपी लक्षात राहते. इतिहास शिकायचा असतो तो केवळ भूतकाळातील राजे, युद्धे आणि सनावळ्या लक्षात ठेवण्यासाठी नव्हे, तर वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्य अधिक शहाणपणाने घडवण्यासाठी. इतिहास म्हणजे समाजाने केलेल्या प्रयोगांचा, चुका-यशांचा आणि त्यांच्या परिणामांचा सामूहिक अनुभव. एखाद्या निर्णयामुळे काय घडले, एखाद्या विचारसरणीचे सामाजिक परिणाम काय झाले, अन्यायाविरुद्ध लोकांनी कसा संघर्ष केला, लोकशाही कशी विकसित झाली, स्वातंत्र्य आणि समानतेच्या कल्पना कशा रुजल्या, हे समजून घेण्यासाठी इतिहास आवश्यक आहे. त्यामुळे इतिहासाचे खरे शिक्षण हे काय घडले? या प्रश्नापेक्षा का घडले? त्याचे परिणाम काय झाले? आणि त्यातून आपण काय शिकू शकतो? या प्रश्नांकडे घेऊन जाणारे असते.
सत्य इतिहास स्वतःहून बालमन बिघडवत नाही; परंतु तो कसा शिकवला जातो याचा परिणाम नक्की होतो. मुलांना समाजातील संघर्ष, हिंसा, जातीय भेदभाव, धार्मिक संघर्ष, अत्याचार किंवा युद्धांची माहिती देताना केवळ निवडक घटना सांगून थांबणे चुकीचे आहे. त्याचबरोबर त्या घटनांची कारणे, त्या काळाची सामाजिक परिस्थिती, त्या अन्यायाला विरोध करणारे लोक, बदलासाठी झालेली चळवळ आणि त्यातून निर्माण झालेली मूल्येही सांगितली पाहिजेत. अशा पद्धतीने शिकवलेला इतिहास मुलाला द्वेष शिकवत नाही; उलट अन्याय ओळखण्याची आणि त्याला विरोध करण्याची नैतिक जाणीव देतो. त्या ऐवजी वैदिक काळात समाजात चार वर्ण व्यवसायानुसार होते. ते एकमेकांशी सहकार्याने आणि सामंजस्याने राहत होते, असे खोटे सांगणे म्हणजे मुलांपासून सत्य लपवणे होय. खरेतर हेच त्यांच्या बालमनासाठी अधिक धोकादायक ठरू शकते. कारण लपवलेला इतिहास नंतर दुसऱ्या टोकाच्या प्रचारातून त्यांच्या समोर येऊ शकतो.
इतिहासाचे शिक्षण मुलाला ‘आपले लोक विरुद्ध परके लोक’ या मानसिकतेत अडकवण्यासाठी नसते. उलट, माणसाच्या अनुभवांची व्यापकता समजण्यासाठी असते. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचा अभिमान बाळगता येतो; पण त्यांनी केलेल्या चुका मान्य करण्याची प्रामाणिकताही असली पाहिजे. आपल्या समाजातील अन्यायाची कबुली दिल्याने समाजाचा अपमान होत नाही. उलट, चूक मान्य करून ती पुन्हा होऊ न देण्याची क्षमता ही प्रगल्भ समाजाची खूण आहे. व्यक्ती, समुदाय आणि त्यांच्या कृती यांच्यातील फरक समजणे हीच इतिहासाच्या चिकित्सक शिक्षणाची सुरुवात आहे.
इतिहास मुलांना भूतकाळाचा कैदी बनवत नाही; वर्तमानाचा जबाबदार नागरिक बनवते. इतिहासातील दुःखद आणि अनिष्ट प्रथा सांगणाऱ्या घटना लपवून मुलांचे बालपण ‘सुरक्षित’ ठेवता येईल, अशी कल्पना चुकीची आहे. मुलांना असत्यापासून नव्हे, तर असत्य, द्वेषपूर्ण प्रचार आणि अर्धसत्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे शिकवणे अधिक महत्त्वाचे आहे. सत्य इतिहास जर पुराव्यांच्या आधारे, संवेदनशीलतेने आणि चिकित्सक दृष्टीने शिकवला, तर तो बालमन खराब करत नाही उलट ते अधिक समंजस, सहिष्णू, प्रश्न विचारणारे आणि जबाबदार बनवतो, हे आजच्या इतिहास अभ्यासक समितीच्या विद्वानांना माहित नाही काय?🤔JK
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र…
इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी हे विषय शालेय अभ्यासक्रमातून आणि समाजशास्त्र, राजकारणशास्त्र, मानववंशशास्त्र हे विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून संपूर्ण काढून टाकून त्याऐवजी संगणक, कला, क्रीडा, कृबु, कौशल्य, एखादी परकय भाषा या विषयांचा समावेश करायला हवा.
धडकी
In reply to इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र… by श्रीगुरुजी
सध्या जो काही मोडका तोडका इतिहास शिकवला जातो तसा असतानाही बस नाम रहेगा अल्लाका म्हणजे अहं तत्त्वमसि म्हणणारे मोठे मोठे विद्वान प्राध्यापक लोक इथे मिपावर आहेत. त्या अश्लाघ्य प्रकाराचे समर्थन करणारे अनेक प्राडॉ मिळतील. तो पण इतिहास शिकवणे बंद झाले तर काय होईल? बापरे धडकीच भरते.
असो.
चुकीचा इतिहास…
In reply to धडकी by चंद्रसूर्यकुमार
चुकीचा इतिहास शिकविण्यापेक्षा काहीही न शिकवलेलं बरं हे बरोबर आहे पण काव्य समजण्यासाठी किंवा बुद्धी आणि समजुतीचा व्यास वाढविण्यासाठी इतिहास, भाषा आणि टीकात्मक बुद्धीची गरज आहे. त्यांची गरज किंवा आवड नसेल तर त्यांनी शाखेवर जावे.
AI Start
फैझ अहमद फैझ यांच्या ‘हम देखेंगे’ कवितेतील ‘अनल हक’ चा संदर्भ आणि भारतीय तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी थोडा इतिहास तपासणे गरजेचे आहे:
१. ‘अनल हक’ आणि मन्सूर अल-हल्लाज:
ही घोषणा १० व्या शतकातील सुफी विचारवंत मन्सूर अल-हल्लाज यांची होती. मन्सूर यांनी इ.स. ९०५ च्या सुमारास भारताचा (विशेषतः सिंध, गुजरात आणि काश्मीर) विस्तृत प्रवास केला होता. त्यांनी भारतीय साधू-संतांच्या भेटी घेऊन उपनिषदे, अद्वैत वेदांत व भारतीय दर्शन परंपरेचा सखोल अभ्यास केला होता.
२. ‘अहं ब्रह्मास्मि’ आणि ‘अनल हक’ मधील अद्वैत:
उपनिषदांमधील "अहं ब्रह्मास्मि" (मीच परब्रह्म आहे) आणि मन्सूर यांचा "अनल हक" (मीच अंतिम सत्य/ईश्वर आहे) या दोन्ही एकाच अद्वैतवादी विचाराची रूपे आहेत. जीव आणि ब्रह्म वेगळे नसून एकच आहेत, हाच भाव यात आहे.
३. कट्टरपंथीयांकडून हत्या:
बगदादमध्ये परतल्यावर जेव्हा मन्सूर यांनी ‘अनल हक’चा विचार मांडला, तेव्हा तत्कालीन सनातनी कट्टरपंथी मुल्ला-मौलवी आणि अब्बासी राज्यकर्त्यांनी याला ईशनिंदा मानले. या अद्वैतवादी विचारासाठी इ.स. ९२२ मध्ये मन्सूर यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.
४. फैझ यांचा संदर्भ:
फैझ यांनी झिया-उल-हक यांच्या लष्करी हुकूमशाहीविरोधात हेच रूपक वापरले:
"उठ्ठेगा 'अनल हक' का नारा, जो मैं भी हूँ और तुम भी हो"
म्हणजेच हुकूमशहा अंतिम सत्य नसून ईश्वरी अंश आणि खरी सत्ता ही सामान्य लोकांमध्ये (तुम्हा-आम्हामध्ये) आहे.
त्यामुळे या ओळींमागे सनातनी किंवा कट्टरतावादी विचार नसून, भारतीय उपनिषदांशी नातं सांगणारा आणि कट्टरपंथीयांच्या विरोधात हौतात्म्य पत्करलेल्या मन्सूरचाच अद्वैतवादी इतिहास आहे.
AI End
फक्त एक ओळ घेऊन
In reply to धडकी by चंद्रसूर्यकुमार
फक्त एक ओळ घेऊन व इतर तात्कालिन संदर्भ विचारात न घेता काढलेला निष्कर्ष वाटतोय. समग्र कविता व त्यावेळची परिस्थिती लक्षात घेतली, तर तुंम्हाला असा संकुचित अर्थ लागणार नाही.
+१ हे विषय का शिकवले जातात…
In reply to इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र… by श्रीगुरुजी
+१
हे विषय का शिकवले जातात हे मला आजपर्यंत कळले नाही. समजा भारताच्या दक्षिणेला श्रीलंका आहे नी उत्तरेला मंगोलिया आहे हे मला माहीत झाले तर त्याचा मला काय रोजगार मिळणार? इतका वेळ, मनुष्यशक्ती हे फालतू विषय शिकवण्यात का घालवले जातात? मला वाटते, त्या ऐवजी मी वेल्डिंग, सुतारकाम किंवा आणखी काही शिक्लोनस्तो तर जास्त समृद्ध असतो.
आठवी पासून आम्हाला शाळेनंतर “टेक्निकल विषय होता, आठवड्यातून दोन वेळा संपूर्ण दिवसासाठी म्हणजे सकाळ नेहमीची शाळा + दुपार टेक्निकल शाळा असे जावे लागे. टेक्निकल शाळेतही अतिशय पांचट शिक्षण दिले जायचे म्हणजे काय तर स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग हातोडी म्हणून करू नये प्रकारचे!
पाठ्यपुस्तकासाठी लिहिणारे किंवा त्याचे संपादन करणारे
दबावाखाली कामं करतात. लेखन करतात. नोकरीवर परिणाम होतो.
परीक्षेत गुण मिळवायचे असतील तर पुस्तकातील धड्यातील वाक्ये लिहून काढा - विद्यार्थ्यांसाठी.
नवे शैक्षणिक धोरण २०२०
चांगला विषय.
जगदीश कांबरे यांनी योग्य विचार लेखनात मांडले आहे. इतिहासातील गोष्टी वर्तमानात येताना सत्य घेऊन आले पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरण २०२० मधे सद्य सरकार, आपलं धोरण राबवू पाहात आहे, त्यामुळे शिक्षणाचं नव्हे तर नव्या पिढीचं नुकसान होत आहे. शाळांमधे आणि उच्चशिक्षणामधे 'भारतीय ज्ञान परंपरा' नव्या बदलांसहित मुलांच्या डोक्यात उतरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. खोटी तथ्य, सत्त्य म्हणून मांडणे सुरु आहे. प्राचीन विज्ञान, गणित, आयुर्वेद, योग, दर्शन आणि कला यांसारख्या समृद्ध वारसा भारताकडे आहे, पण त्याची सोयीने मांडणी सुरु आहे. या विषयांची आपल्याला ओळख नव्हती का ? तर होती. पण, आताच्या या प्रक्रियेमुळे आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन, ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि घटनात्मक मूल्ये धोक्यात येण्याची भीती व्यक्त शिक्षण व्यवस्थेत व्यक्त होत असते.
सरकार आणि त्याची विचारसरणी यांचा शिक्षणाशी खूप जवळचा संबंध असतो. कारण शिक्षण हे समाज आणि येणारी पिढी घडवण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे. सरकार बदलले की शिक्षणातील धोरणे कशी बदलतात, सरकार आपल्या विचारसरणीनुसार इतिहासातील काही घटना, व्यक्तींचे, महत्त्व वाढवू शकते किंवा कमी करू शकते बदल करुन मांडू पाहत असते. शाळा, विद्यापीठे, अभ्यास मंडळे आणि शिक्षण मंडळांच्या प्रमुख पदांवर सरकार आपल्या विचारसरणीशी सुसंगत असलेल्या तज्ज्ञांची नेमणूक करते, आणि मग ते असे वेगवेगळे बदल करु पाहतात.
नव्या पिढीला केवळ पोपटपंची करणारे शिक्षण नको, तर त्यांच्यात नवा दृष्टिकोन बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणारे शिक्षण हवे, हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या आधुनिक जगाची गरज पाहता, शिक्षणात तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, कौशल्यांवर भर, रोजगार देणारे, देश आणि समाजाविषयीची संवेदनशिलता, त्याची बांधणी शाळेपासून केली पाहिजे. दुर्दैवाने शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षण नव्या शैक्षणिक धोरणाने संकटात सापडले आहे.
-दिलीप बिरुटे
परीक्षण
- वेदकाळात आपले पूर्वज शाकाहार करत होते. == चूक
- वेदकाळात चार वर्ण होते. सर्व लोक आपआपली कामे व्यवस्थित करत होते. समाज गुण्यागोविंदाने रहात होता. == बरोबर
- आपल्याकडे उच्च दर्जाचे गणिताचे ज्ञान होते - वैदिक गणित. == बरोबर
- इतर अनेक पूर्वगौरव असणारा मजकूर आहे. == बरोबर
७५% बरोबर आहे, २५% चूक आहे. जे चूक आहे ते सुधारायला हवे; जे बरोबर आहे ते वाढवायला हवे.
- (सुधारणावादी) कांदा लिंबू
खरंच?
In reply to परीक्षण by कांदा लिंबू
>> - वेदकाळात चार वर्ण होते. सर्व लोक आपआपली कामे व्यवस्थित करत होते. समाज गुण्यागोविंदाने रहात होता. == बरोबर
प्राचीन काळी:
- एकलव्याला शिकवायला नकार देणे व त्याचा अंगठा कापणे.
- रामाने शंबुकाचे शीर उडवणे
- कर्णाला द्रौपदीने स्वयंवरात भाग घेण्यापासून रोखणे
गेल्या काही शतकात:
- स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नसणे (सावित्रीबाई फुलेंवर दगड व शेण फेकणे)
- अस्पृशांना गळ्यात मडके व मागे झाडू बांधण्याची सक्ती असणे
- अस्पृश्यांची वस्ती गावाबाहेर असणे.
अशा काही तात्कालिन वस्तुस्थितींचा विचार केला तर समाज गुण्यागोविंदाने रहात होता असे दिसत नाही.
सध्याच्या जन्मात आपण ज्या समाजगटातून (वर्णातून) येतो, त्यामुळे तर 'समाज गुण्यागोविंदाने रहात होता.' अशी समजूत होत नाही ना, याचा विचार जरूर करावा अशी विनंती करतो. खूप कमी लोक इतरांच्या दृष्टीकोनातून विचार करू शकतात (एम्फथी) त्यामुळे ठीकच.
व्हिडीओमध्ये वैदिक गणित ही कल्पना कशी तयार झाली व त्यास पुरावा कसा मिळत नाही ते सांगितले आहेच.
इतिहास शिकायचा असतो तो केवळ…
इतिहास शिकायचा असतो तो केवळ भूतकाळातील राजे, युद्धे आणि सनावळ्या लक्षात ठेवण्यासाठी नव्हे, तर वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्य अधिक शहाणपणाने घडवण्यासाठी. इतिहास म्हणजे समाजाने केलेल्या प्रयोगांचा, चुका-यशांचा आणि त्यांच्या परिणामांचा सामूहिक अनुभव.
बरोबर आहे. इस्लामवादी आक्रमकांनी आणि त्यांच्या अनुयायांनी हजारो हिंदूं-ख्रिश्चनांची कत्तल केली, स्त्रियांवर बलात्कार केले, संपत्ती लुटली, देवळे-चर्चेस उद्धस्त केले, स्त्री-पुरुष-बालके यांना गुलाम केले हे सर्व समजून घेऊन वर्तमानात अश्या प्रव्रुत्तींपासून कसे सावध राहावे, त्यांचा वेळीच कसा बीमोड करावा, आणि व्यक्ती व समाज म्हणून आपले भविष्य अधिक शहाणपणे कसे घडवावे याचा बालभारतीच्या इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र अभ्यासक्रम असायला हवा. त्याकाळी समाजाने, नेत्यांनी केलेल्या चुका कश्या टाळाव्यात म्हणजे अपेक्षित परिणाम कसा दिसून येईल याचे मार्गदशनात्मक विवेचन असायला हवे.
अर्थात हे सर्व त्या-त्या इयत्तांतील विद्यार्थ्यांचे मानस, बौद्धिक क्षमता तसेच शारीरिक मर्यादा लक्षात घेऊनच करायला हवे. नुसतेच बालभारतीला बैलभारती म्हणून समस्या सुटणार नाही, त्यासाठी सर्वांगीण उपायोजना सर्वंकषपणे लागू करायला हव्यात.
- (न-शिक्षणतज्ज्ञ) कांदा लिंबू
लेखकाशी सहमतच.
या पार्श्वभूमीवर मी माझे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण बघता आम्हांलाही असाच काही बाही इतिहास शिकवला गेला.
मुघल आणी इंग्रजांचा इतिहास जास्त शिकवत असत.
सातवाहन, चाल्युक्य, राष्टकुट इत्यादीबद्दल आमच्या आवांतर वाचनाने ज्ञानात भर पडली होती.
इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र व तत्सम विषय विषय पूर्वग्रहदूषित भावनेने शिकवले गेले पाहिजेत.
जगदीश कुबेर यांच्याशी सहमत आहे.
ललांबली साधक बाधक चर्चा होताना बघून बरे वाटले.
विषय विषय पूर्वग्रहदूषित
विषय विषय पूर्वग्रहदूषित
विषय विना पूर्वग्रहदूषित
असे वाचावे.
शिक्षण व भावी पिढीला राजकिय पचड्यात गुंतवून आपल्वूयआपल्या पोळीवर तूप ओढून घेऊ नये. मग सरकार कुणाचे ही असो.
अगदी बरोबर आहे.
In reply to विषय विषय पूर्वग्रहदूषित by कर्नलतपस्वी
जे होते ते सांगणे अधिक महत्वाचे आहे.