Skip to main content

मिपा खरडफळा

लेखक कांदा लिंबू यांनी मंगळवार, 18/08/2026 10:23 या दिवशी प्रकाशित केले.

मिपाच्या खरडफळ्यावर अनेकदा अत्यंत छान चर्चा रंगतात. एखाद्या विषयावर सविस्तर माहिती, अनुभव, संदर्भ, किस्से मतमतांतरे आणि कधी कधी मुख्य धाग्यापेक्षाही अधिक उपयुक्त चर्चा खरडीतून पुढे येते. विशेष म्हणजे, अनेक खरडी अगदी सहज, अनौपचारिक वातावरणात लिहिल्या जात असल्यामुळे त्यातला माहितीचा ओघही छान असतो आणि भाषाही बहुतेक वेळा संयत असते.

पण खरडफळ्याची एक अडचण आहे, खरडी कायमस्वरूपी जतन होत नाहीत. काही काळानंतर त्या मागे पडतात आणि नंतर त्या पुसल्या जातात. त्यामुळे एखाद्या चर्चेतून निर्माण झालेली एखादी उत्कृष्ट, माहितीपूर्ण आणि अभिनिवेशरहित खरड पुढे शोधूनही सापडत नाही.

म्हणून खरड फळ्यावरच काल मी एक कल्पना मांडली होती "मिपा खरडफळा" किंवा अशा एखाद्या नावाचा एक स्वतंत्र धागा काढायचा का?

या धाग्यावर खरडफळ्यावर आलेल्या अशा निवडक खरडी किंवा चर्चांचे संकलन करता येईल.‌ अर्थात, त्या त्या खरडींच्या लेखकांच्या सहमतीनेच हे करता येईल. याचा फायदा असा की खरडफळ्याची सुलभता आणि मोकळेपणा कायम राहील, पण त्यातून निर्माण होणारी चांगली माहिती अक्षरशः "क्षणभंगुर" राहणार नाही. एका अर्थाने ती "अक्षय" राहील!


हे मी काल माझ्या नोटपॅडमध्ये लिहुन ठेवलं होतं. आता (तात्पुरता की कायमचा?) खरडफळा उडाला आहे. म्हणून हा धागा काढत आहे. 

चला, इथे खरडी लिहूयात. इथे राजकीय हाणामाऱ्या, एकमेकांची उणीदुणी काढणं, लिखाणावर चर्चा करण्यापेक्षा आयडीला टार्गेट करणे असे प्रकार टाळावेत. सकारात्मक प्रकारे लिहावे ही अपेक्षा.‌ 

 

गरज वाटल्यास या धाग्याला इतर कोणते, अधिक चांगले शीर्षक सुचवावे. 

 

- (खफ पंखा) कांदा लिंबू


वाचने 1188
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

खरडफळा परत सुरू झाल्याबद्दल कालच्या मोर्च्यात सामील झालेल्या सगळ्यांनी नीलकांत, प्रशांत आणि मिपा प्रशासनाचे आभार मानले.

आभार

 

आणि हो... एक मस्तपैकी पार्टी पण केली.