तांबडा भट चंडोल, Indian bushlark. Burst shot.
गावात पहिला फोटो स्टुडिओ मित्राच्या भावाने उघडला आणी छायाचित्रणाची पहिली ओळख झाली.शाळा सुटली की स्टुडीयोत थोडा वेळ रेंगाळायचो.पहिला कॅमेरा हाती आला तोअग्फा कंपनीचा क्लिक थ्रीआणी नंतर अग्फा आयसोली.कॅमेर्यात रोल घालायचा,मोजके फोटो बारा,चोवीस छत्तीस,काढतायेत असल्याने फोटो काढताना विचार पूर्वक काढावे लागत.कधी कधी पहिला फोटो ते शेवटचा फोटो लांबचा प्रवास असायचा. सर्व फोटो काढून झाल्यानंतर ते स्टुडिओमधून प्रिंट करुन घ्यायचे.वेळखाऊ प्रक्रिया त्यामुळे प्रत्यक्ष फोटो मिळेपर्यंत उत्सुकता शिगेला पोहचायची आणी फोटो पाहिल्यावर भ्रमाचा भोपळा फुटायचा.फारच खर्चीक उद्योग होता,म्हणतात ना! हौसेला मोल नसते.बरेच वेळा फोटो खराब येत असत.बिना मुंडीचे,आऊट ऑफ फोकस.असे फोटो आले कीखुप हळहळ वाटायची.फोटो संभाळून ठेवणे,देखरेख करणे ही एक वेगळी डोकेदुखी.
सन ऐंशीच्या मे महिन्यात अमरनाथ ड्युटी कम यात्रेला गेलो होतो तेंव्हा फोटो काढले.युनिट उच्चतुंगता क्षेत्रात असल्याने एक्सपोज करण्याची सोय नव्हती.तब्बल पाच महिन्यानंतर सप्टेंबर मधे सुट्टीवर गेल्यानंतर पुण्यात रोल डेव्हलप केला. सुट्टिवरून परत गेल्यानंतर मित्रांनी ते फोटो डिसेंबरमधे बघीतले.लग्न, घरगुती कार्यक्रम,सामाजिक उपक्रम, उत्सव, गरवार बायकांचे चंद्रकोरीवर हातात धन्युष्य बाण घेऊन, लहान बाळांचे,जत्रेतले मोटार सायकलवर,आवडत्या नट नटी बरोबर फोटो अशाअनेक कल्पक गोष्टीनी फोटोउद्योग भरभराटीस आला.फोटोफास्ट,फोटोलॅब सारखी अत्याधुनिक,फोटो डेव्हलप करणारी दुकाने ऊघडली.
पुढे तंत्रज्ञान विकसित झाले.डिजीटल कॅमेर्यां मुळे रिळ,फोटो प्रिंटपासून सुटका झाली. एकदाच जास्त पैसे खर्च करून वाटेल तेव्हढे फोटो काढता येवू लागले. हवे तेंव्हा हवे तीथे फोटो बघता येवू लागले.फोटो तंत्रज्ञानात क्रांती झाली.मी ही पॅनासोनीक डिजीटल कॅमेरा घेतला.अवाढव्य खर्चाची बचत होऊ लागली.झटपट फोटो काढता येऊ लागले. आवडला नाही तर डिलीट मारायची सोय.स्टोरेज,मेन्टेनन्स झिरो.पण काही म्हणा!,ॲनालाग फोटोग्राफी म्हणजे कला होती तर डिजीटल तंत्र एक सोय,"चट मंगनी पट ब्याह." डिजीटल कॅमेर्यामुळे फोटो स्टुडिओची गरज कमी झाली. दुकानांचे शटर खाली आले.
असो,पुढे कार्यबाहुल्यामुळे आणी मुले मोठी झाली त्यामुळे भटकंती मधला छायाचित्रण विभाग हस्तांतरित झाला. यथावकाश मुले मोठी झाली. आपआपल्या भविष्यातील चिंतामधे गुरफटून गेली व कॅमेरे कपाटात धुळ खात पडले.यथावकाश मी सेवानिवृत्त झालो. पक्षीनिरीक्षणाचे व्यसन लागले. कॅमेरे पुन्हा ॲक्शन मोडवर आले.निकाॅन ४२ एक्स स्वयंचलित व डि एस एल आर डी चौतीसशे दोन्ही कॅमेरे झाडून पुसून स्वच्छ केले.दररोज भटकंती मधले मित्र बनले. पक्षीनिरीक्षणास छायाचित्रण पुरक. म्हणजे एका दगडात दोन पक्षी.गेल्या चार वर्षांत जवळपास तीनशे पक्षांचे डॉक्युमेंटेशन संग्रही जमा केले.
"मन माझे चपळ, न राहे निश्र्चळ||
-संत तुकाराम
वाढत्या वयात मनाच्या वेगात राॅकेट स्पिडची भर पडली आहेजेंव्हा पहावे तेंव्हा सदानकदा भूतकाळात पळते. कधी कधी वाटते म्हणावे,
माझीया मना जरा थांब ना,
पाऊली तुझ्या माझीया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना.....
-सौमित्र
असो, वर्तमानात येतो........
"वर्षाराणी जरा जमके बरसो",
यावर्षी पाऊस काही वेगळे रूप घेऊन आलाय. अधीक मास आल्यामुळे जून मधे ओढ दिली आता आषाढ,श्रावणात ढील देतोय. चांगला पाऊस पडतोय.एकंदरित वातावरण कातिल,जणू बालकवींची कवीता अवतरली आहे असे वाटते.जंगलही अपवाद नाही.कधी छत्री,कधी रेनकोट तर कधी नखशिखांत चिब भिजत भटकणे हा सर्वात मोठा विरंगुळा.या काळात बरेच पक्षी प्रजननात दंग असतात तरीही पक्षीदर्शन होतेच."फुलपाखरं""चतुर" व इतर किटक भर ज्वानीत पदार्पण करत आहेत.त्यांची उपस्थित विशेष जाणवते.सहाजिकच, किटकभक्षीपक्षी जसे वेडा राघू,निलिमा,स्वर्गीय नर्तक,छोटा शिक्रा, इत्या. अनेक हमखास इथे तीथे बसलेले,उडताना दिसणे नेहमीची बाब झाली.
यावर्षी महादेववाडी जंगलाने कात टाकली. ग्लिरिसिडिया,उंदिरमारी निरूपयोगी वृक्षांचे समूळ उच्चाटन करून स्थानीक वड,पिंपळ, बाभळ, बेल, खैर, पळस, बहावा,आवळा अशा अनेक झाडांची लागवड झाली.नवीन लागवड,छोटी पाचसहा फुटांची रोपटी असल्याने घरटे बांधण्यासाठी उपयुक्त ठरेल आशी सुरक्षीत जागेचा वाणवा म्हणून बुलबुल,शुभ्रकंठी, कोतवाल,माळमुनीया,फुलचुखी,लाल गोमेद,हळद्या सारखे पक्षी स्थलांतरीत झाले.जंगलातून गायब जरी झाले नसले तरी त्यांची संख्या मात्र रोडावली आहे.बहूतेक आसपासच्या जंगलात स्थलांतरित झाले असावेत. यावर मिपावर एक जिल्बी पाडली आहे याची लिंक दिली आहे. इच्छुक वाचक वाचू शकतात.
https://www.misalpav.com/story/53817
गवत भरपूर वाढल्याने चिमण चंडोल,भट चंडोल,टिटवी,शिंपी,प्रिनीया,फ्रॅकोलीन,रेन क्वेल सारखे पक्षी जमीनवर किटक,गवताच्या कणसातले दाणे टिपताना जरूर दिसतात. महादेववाडीतले सार्वकालिक व स्थलांतरीत पक्षांचे छायाचित्रण करून झाले आहे.एकशे वीसतीस पक्षी वर्ष भरात दिसतात त्यांच्या आवडत्या जागा, वेळ,सवयी, रंग, रूप,आकार वगैरे तोंडपाठ झाले असल्याने आता फक्त एक नजर टाकून पुढे जाणे,कधी कधी काही विशेष क्षण दिसण्याची शक्यता असल्यास थांबून निरिक्षण करणे एवढेच.....
जंगल कात जरी टाकत असले तरी रोजची भटकंती मात्र चालूच असते.फरक एवढाच की पक्षांसोबत चंचल,चपळ रंगबिरंगी फुलपाखरेआणी चतुर यांचे आकर्षण आहेच.टणटणी (Lantana) च्या झुडपांवर लाल,गुलाबी,पांढरे पिवळ्या फुलांचे गुच्छच गुच्छ लगडले आहेत,ही फुले फुलपाखरांच्या सर्वाधिक आवडती,फुलांतले मध चोखण्यासाठी सतत घिरट्या घालताना दिसू लागलेत.त्यांच्या संख्येत वाढ झालीय.
रंगबिरगी फुलपाखरांचे छायाचित्रण करण्याची प्रखर इच्छा झाल्याने सध्या फोकस त्यांच्यावर आहे.फुलांचा कालावधी थोडा असतो जंगलात फुलांची फळे झाली की फुलपाखरे दिसेनाशी होतात. कुठे जातात कळत नाही. कुतूहल जागृत झाले व सहाजिकच त्यांच्या बद्दल माहिती जाणून घेणे क्रमप्राप्त झाले.अंतरजालीय माहितीनुसार देशात पंधराशे तर महाराष्ट्र राज्यात दोनशे ऐंशी फुलपाखरांची नोंद झाली आहे. आमच्या महादेववाडीत आतापर्यंत मला बरीच फुलपाखरे दिसली त्या पैकी तीस फुलपाखरांची प्रकाश चित्रे माझ्या संग्रही दाखल झाली आहेत.काही प्रची वाचकांच्या नेत्रसुखासाठी.......
भटकत असताना एका ठिकाणी कृष्णकमळ वेल दिसली. पाऊस भरपूर झाल्याने तीला फुलेही भरपूर आली आहेत. कृष्ण कमळाचे फुल खुपच सुंदर असते.मी दुरूनच बघीतली. औषधी आहे असे ऐकले आहे. याच्या आसपास "टोनी कोस्टर" नावाची तपकीरी रंगाच्या पंखावर काळे ठिपके सुदंर फुलपाखरे बागडताना दिसली.हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.
कृष्णकमळ टोनी कोस्टर, कृष्ण कमलिनी
एके ठिकाणी‘ईविनिंग ब्राऊन",नावाचे पुर्ण विकसित फुलपाखरू दिसले,सांजपरी’.ही पाकोळी संध्याकाळच्या वेळात खुप क्रियाशील असते.
ईविनिंग ब्राऊन ,सांजपरी
ब्लू मॉरमॉन (Papilio polymnestor) मराठी नाव "निलवंती किंवा राणी पाकोळी", असे आहे. हे महाराष्ट्राचे 'राज्य फुलपाखरू' आहे.
ब्लू मॉरमॉन, निलवंती किंवा राणी पाकोळी
महादेववाडीत स्ट्राईप्ड टायगर(पट्टेरी रुईकर) व प्लेन टायगर(रूईकर) या प्रकारची फुलपाखरे भरपूर आहेत.
स्ट्राईप्ड टायगर,पट्टेरी रुईकर.
एक अद्भुत गोष्ट दिसली.दोन भिन्न रंगाच्या पाकोळ्या एकमेकींचा पाठलाग करत होत्या. "Diadem Eggfly ",मराठी नाव "छोटा चांदवा", पाकोळ्या आहेत असे कळाले . कन्फ्युजन झाले.या प्रकारच्या पाकोळीचे नर व मादीचे रूप भिन्न असते हे महाराष्ट्र राज्य जैवविवीधता मंडळ, नागपूर यांनी २०१९ मधे प्रकाशित केलेल्या पुस्तका वरून कळाले .प्रचि बघा तुम्हांलाही आश्चर्यच वाटेल.
Great Eggfly Male, मोठा चांदवा आणी "Great Eggfly Female
Common Baron ,सरदार
Common Leopard, बिट्टी
Common Crow, हबशी
Lemon Pansy, पितनेत्री भिरभिरी
Common Castor,एरंडक
Red Pierrot,लाल कवडा.
Common Jezebel, हळदीकुंकू".
Common Mormon Male and female, बहुरूपी
Gram Blur, निलय
White Orange Tip, पांढरा शेंदूर टोक्या
Common Emigrant, भटक्या
Common Lime Butterfly,लिम्बाळी
Blue Tiger,निल रुइकर
पाकोळ्यांचे छायाचित्रण मला आव्हानच वाटते कारण...
फुलपाखरे क्षणात उडून जातात. किरकोळ वाऱ्यानेही फुलांसोबतहलतात,खूप जवळून फोटो काढताना बॅकग्राउंड अंधुक होते.पूर्ण फुलपाखरू फोकसमध्ये आणणे कठीण जाते.फुलपाखरे अतीशय जागरूक असतात. छोटी कंपने,सावली,आवाजांमुळे असुरक्षित वाटते आणी सावध होत उडून जातात.या कारणां मुळे फोकस बिघडतो,प्रचि नीट येत नाहीत.
त्यांचे फार जवळून फोटो काढणे शक्य होत नाही.सुर्य उगवल्यावर खुपच चपळ होतात. चतुर तर फुलपाखरां पेक्षाही जास्त चपळ असतात.ते तर हवेतच कामक्रिडा करताना दिसतात. चुकून कधी कुठे बसले तर बसले.
फुलपाखरे ओळखणेअतिशय अवघड. पंख मिटल्यावर वेगळी,उघडल्यावर वेगळी,डायरेक्ट सुर्यकिरणे पडल्यानंतर त्यांच्या रंगात एक वेगळीच चमक व पारदर्शकता येते.यांची ओळख व्हायला मला मात्र भरपूर वेळ द्यावा लागणार आहे.अर्थात तज्ञ,अभ्यासू लोकांची गोष्ट वेगळीच आहे.
छायाचित्रक निकाॅन डि एस एल आर व लेन्स ७०-३०० एम एम असल्याने दूर उभे राहून सुद्धा छायाचित्रण करणे सहज शक्य होत गेले.सुरूवातीला परीणाम निराश जनक होते. डिजीटल छायाचित्रक असल्याने कितीही फोटो काढा व डिलीट करा,बिन खर्ची काम असल्याने वाईट वाटत नाही. उलट प्रचि चांगले आले की कष्टाचे फळ मिळाल्याचा आनंद. छायाचित्रक फुल झूम करून ॲटो,बर्स्ट मोड वर टाकून सुरवातीला काही प्रचि काढले. आता मॅन्युअल मोडवर प्रचि काढणे बऱ्यापैकी जमू लागले आहे. तसा या कलेबाबत मी एकलव्यपण गुरू कोणी नाही.एक मिपाकर मिपाप्रेमीयोगेश,मिपामुळे संपर्कात आले. ते अद्भुत छायाचित्रकार आहेत बरेच वेळा त्यांचे मार्गदर्शन घेत असतो.
असो,फुलपाखरे बघीतली की लहानपणी शाळेत शिकलेली कवी श्री गणेश हरी पाटील यांची कवीता आठवते.
"छान किती दिसते फुलपाखरू".
कविवर्य आमच्या भागात छोट्या पिंपळवंडी गावात जन्मले,प्रख्यात साहित्यिक,शिक्षणतज्ञ म्हणून नावा रूपास आले.बर्याच कवीता शालेय शिक्षणात अभ्यासात होत्या.काही कवीतांची गाणी सुद्धा झाली.माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला त्या दिवशी शाळेत प्रार्थना ऐकली,पुढे ती मुखोद्गत झाली.
"देवा तुझे किती सुंदर आकाश ",
ही प्रार्थना पण कविवर्य ग. ह. पाटील यांचीच. ती आजतागायत लक्षात आहे.
मराठी विषयाचे मन्वंतर वाचनमाला भाग एक या इयत्ता पाचवीच्या पुस्तकातील,
"शर आला तो धाऊनी आला काळ,
विव्हळला श्रावण बाळ ",
श्रावण बाळाच्या गोष्टीवर लिहीलेली कवीता कविवर्य ग. ह. पाटील यांचीच.कवीता शिकत आणी शिकवत असताना शिक्षकांसह संपुर्ण वर्ग मुसमुसून डोळे पुसत होता.
कवि ग. ह. पाटील यांचा जन्मदिवस एकोणीस ऑगस्ट १९०६ सालचा.या निमीत्ताने लेखाद्वारे सादर स्मरण.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
महादेववाडीतील रंगबिरंगी फुलपाखरे....
सध्या फुलपाखरांचा सिझन आहे. बरीच फुलपाखरे बागडत आहे. काही प्रची बघायला मिळतील.
अरे वा!!
पक्ष्यांची आवड माहीत होती, हे नवीन फुलपाखरांचे वेड लागलेले आत्ताच समजले. मस्त लेख आणि प्रचि.
असेच भटकत रहा नी लिहित रहा.
फुलपाखरांचे वेड....
In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे
हे वेड प्रत्येक वयात कमी जास्त प्रमाणात सर्वाना असते.
हल्केच घ्या.
पक्षीदर्शन करताना फुलपाखरांचे खेळ डोळ्यासमोर होतेच पण त्यांचे मराठीतून केलेले नामकरण आणी काही फुलपाखरांची मजेशीर माहीती वाचायला मिळाल्याने कुतूहल वाढले. तसेच यांचे चित्रीकरण अव्हानात्मक वाटले.
जसे,Nymphalidae या कुळातील फुलपाखरांना सहा पाय असतात पण ते चारच पाय वापरतात. पुढच्या दोन पाय अखंड आणी केसाळ असतात. त्यांना ब्रश फुटेड बटरफ्लाय असेही म्हणतात.
असो अभ्यास चालू आहे.
टंकाळ्याचा रंकाळा...
In reply to फुलपाखरांचे वेड.... by कर्नलतपस्वी
पुढच्या दोन पाय अखंड....
हे वाक्य
पुढचे दोन पाय अखुड आणी केसाळ असतात असे वाचावे.
मुंबईत महाराष्ट्र…
मुंबईत महाराष्ट्र निसर्गौद्यान हे एक बटरफ्लाय सॅंक्चरी आहे.
नवरात्रात बरीच फुलपाखरे असतात.
येताय का एक मस्त सफर करुयात . कट्टा ही होईल सकाळचा.
@विजुभाऊ,
In reply to मुंबईत महाराष्ट्र… by विजुभाऊ
एक दिवस नक्कीच भेटायला आवडेल. नाहीतरी आपण एकमेकाला हुलकावण्या देत आलोय.
मस्त फोटो आणि माहिती. पांढरे…
मस्त फोटो आणि माहिती. पांढरे कृष्णकमळ आवडले. माझ्याकडे जांभळ्या कृष्णकमळाची वेल होती. फुलाचा गंध मात्र जरासा उग्र असायचा.
मस्त
ब्ल्यू मॉरमोन भीमाशंकरला सर्रास दिसतात. सह्याद्रीच्या त्याजवळील भागातल्या जंगलातही मोठ्या संख्येने आहेत. लाल कवडा आंबा घाटातल्या जंगलात मोठ्या संख्येने दिसतो.
वाह!!फुलपाखरांना कॅंमेरात…
वाह!!
फुलपाखरांना कॅंमेरात टिपणे खुप सावधानतेने करावे लागते.इवली इवली ऱंगेबेरंगी ,स्वछन्दी उडतांना डोळ्यांनी पाहतांना मन मात्र पंखांसारखे रंगीत अन मखमली होते.माझे डोळे तर लगेच फुलपाखरांना टिपते.बाइखुन ऑफिसला जाताना रोज पाच सहा विविध फुलपाखरु अशी सुंदरपणे समोरुन उडत जातात.
कृष्णकमलिनी आणी कृष्ण कमळ
सुंदर!
In reply to कृष्णकमलिनी आणी कृष्ण कमळ by कर्नलतपस्वी
सुंदर!
जबरदस्त फोटो आणि लेखन. आमुचा साष्टांग दंडवत स्वीकारावा.
जबरदस्त फोटो आणि लेखन. आमुचा साष्टांग दंडवत स्वीकारावा.
छान
शीर्षक वाचून ग.ह.पाटलांच्या कवीतेबद्दल लेखन आहे असे वाटले.
बाय द वे छायाचित्र सुंदर आहेत.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद बिरूटे सर
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविवर्य ग ह पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून व कुतुहलापोटी फुलपाखरांचे निरीक्षण नव्याने सुरू केल्याने हा धागा टाकला आहे.
कविवर्य आमच्या पिंपळवंडी चे. जवळचेच कळंब गाव यांचे आजोळ (मा. दिलीप वळसे पाटील यांचे). कवितांमधून आजोळ, आजोबा, गाव,नदी यावर सुंदर कवीता केल्या आहेत. लिंबोळ्या कवितासंग्रह आजही वाचताना आनंद होतो.
ग.ह.पाटील....
In reply to धन्यवाद बिरूटे सर by कर्नलतपस्वी
कविवर्य आमच्या पिंपळवंडी चे. जवळचेच कळंब गाव यांचे आजोळ (मा. दिलीप वळसे पाटील यांचे). कवितांमधून आजोळ, आजोबा, गाव,नदी यावर सुंदर कवीता केल्या आहेत. लिंबोळ्या कवितासंग्रह आजही वाचताना आनंद होतो.
छान.
ग.ह.पाटील यांच्या निवडक कविता शिकवायला होत्या. कधी तरी लिहीन त्या कवितांवर. ग.ह. पाटील यांचे चिरंजीव आमच्या नियमित परिचयातील आहेत. छ. संभाजीनगरला भेटतात. 'देवा तुझे किती, सुंदर आकाश' ही कविता नेहमीच आवडते.
देवा, तुझे किती, सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो .
आणि शेवटी
इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील
या ओळी आठवून ' जीसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा' या भजनाची आठवण होते.
असो अवांतराबद्दल क्षमस्व.
-दिलीप बिरुटे
लेख व प्र चि आवडले
"देवा तुझे किती" आणि "छान किती दिसते फुलपाखरू" याच खऱ्या कविता असं वाटायचं ते दिवस आठवले.