Skip to main content

धर्म, लोकशाही आणि आग

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 23/07/2026 18:02 या दिवशी प्रकाशित केले.

मी 'मुलगा' आहे. मी भारतीय आहे. मी 'हिंदू' आहे. मी 'मराठी' आहे. मी 'एका' राजकीय पक्षाचा पाठीराखा आहे. माझ्यात थोडा माणूसही बाकी आहे. तो माणूस आता संपत चालला आहे...

यातले मुलगा, हिंदू आणि मराठी या ऐवजी जे तुम्हाला लागू होतील असे शब्द टाकले की वरील उतारा ही तुमची सुद्धा ओळख असू शकते.

ही ओळख तुम्हाला लागू होत असेल तर राजधानीत शिरस्त्राणधारी शस्त्रसज्ज पोलिसांनी देशाचे भविष्य असणाऱ्या युवक युवतींना पिसाळल्यासारखे काठ्यांनी रक्तबंबाळ केल्याच्या चित्रफीती पाहिल्यावर तुम्हाला हळहळ वाटण्यात काहीच अडथळा नाही. मात्र पहिल्या उताऱ्यात 'एका' ऐवजी विशिष्ट पक्षाचे नाव टाकले तर ही हळहळ वाटलेल्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होईल, हे आजचे वास्तव आहे.

तो पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याचे बगलबच्चे पक्ष आहेत हे नमूद करायला हवे. आताच्या राजकारणाबद्दल जरा उशिराने बोलू. त्याआधी थोडं मागे जाऊ. २०१४ मध्ये मोदींनी देशाला अक्षरशः संमोहित केले होते, हे नाकारण्यात अर्थ नाही. त्यांच्यासोबत संपूर्ण देशाने विकासाची खूप सारी स्वप्ने पाहिली. त्यातली काही निर्विवादपणे प्रत्यक्षातही आली. सत्तेसारखी दुसरी नशा नाही म्हणतात. मोदी त्याला अपवाद कसे ठरतील.‌ त्यांच्या विकासाच्या घोड्याने अंगावर भगवी वस्त्रे कधी टाकली आणि आणि स्वातंत्र्यानंतर स्वतःला उघडपणे हिंदू म्हणवणारे सरकार सत्तेत असताना चक्क "हिंदूच खतरे में" कसा आला हे कुणालाच कळले नाही. आजच्या काळात राजकारण हा लबाडांचा धंदा आहे, हे सत्य स्वीकारले की एक वेळी निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा आधारही तितकासा चुकीचा वाटत नाही. मग पुन्हा सत्ताही येते. पुन्हा काही चांगली कामे होतात.

पण पुढच्या निवडणुकांपर्यंत गेली दहा वर्षे हिंदू सरकार सत्तेत असूनही हिंदू इतका 'खतरे में' येतो की अक्षरशः काँग्रेसचे नेते फोडून भाजपात घ्यावे लागतात. हिंदू रक्षणासाठी! 'आदर्श' घोटाळ्यात ज्या अशोक चव्हाणांना राजीनामा देण्यास भाजपने भाग पाडले, त्यांनाच स्वतःच्या मुली सहित उमेदवारी देऊन निवडून आणले जाते. ज्यांच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे होते त्या अजितदादांचा वाढदिवस शासकीय कार्यालयांतून थोरपुरुषांची जयंती म्हणून साजरा होतो! पण हिंदूंचा धोका काही संपत नाही. धोकाच तितका मोठा आहे. तोच धोका सध्या सत्तेत आहे. आणि सत्ता म्हणजे भाजप नाही. सत्ता म्हणजे सर्वपक्षीय नेते. त्यांची खरी सत्ता म्हणजे आपल्या मनातले त्यांचे स्थान. आणि जोपर्यंत आपण मनातून घाबरत राहू तोपर्यंत तुम्ही ज्या धर्माचे असाल तो धर्म तुम्हाला धोक्यातच वाटेल. हिंदूंना हिंदू, मुसलमानांना मुसलमान आणि ख्रिस्तींना ख्रिस्ती धोक्यात वाटत राहील.

राजकारण कधी खराब होत नाही. समाज खराब होतो. आपले नेते म्हणजे फक्त आपला आरसा आहे. आपण स्वतः सुधारल्याशिवाय नेते बदलण्याची अपेक्षा धरू नका. आपण समाज म्हणून अत्यंत दुय्यम... नाही कदाचित सातव्या आठव्या दर्जाचे नागरिक झालो आहोत. जोपर्यंत स्वतःच्या गळ्याशी काही येत नाही तोपर्यंत आपण कशावर व्यक्त व्हायला सुद्धा दहादा विचार करतो. "मला काय त्याचे?"

भाजप म्हणते हिंदू धोक्यात आणि आपण माना डोलावतो. भाजप म्हणते "हिंदू राष्ट्र करू" आणि आपण हो म्हणतो. या देशात स्वतः श्री राम कृष्णांचे अवतार झाले, तेव्हा सुद्धा भारत भाजपच्या व्याख्येतला 'हिंदू राष्ट्र' झाला नाही. या पृथ्वीवर स्वतः येशू ख्रिस्त, अल्लाचे प्रेषित मुहम्मद पैगंबर अस्तित्वात होते, तेव्हा सुद्धा 'हिंदू धोक्यात' आला नाही. मग २०१४ नंतर हिंदू धर्माला अचानक असा कोणता जीवघेणा आजार झाला की तो धोक्यात आला? तो आजार म्हणजे हिंदूंनी हिंदू म्हणजे काय, हा विचार करायचे सोडून दिले.  हिंदू हा उच्चतम विचार आहे. एक श्रेष्ठ जीवन पद्धती आहे. तुलनात्मक दृष्ट्या मला तो नेहमीच अतुलनीय, आधुनिक आणि चिरंतन भावतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंसारखा माणूस भगवे कपडे घालून 'हिंदूहृदयसम्राट' होऊ शकत नाही, आणि कालपरवाचे टुकार नेते 'हिंदूरक्षक' होऊ शकत नाहीत, हे मी उघडपणे बोलू शकतो. कुणी हिंदूंचे सम्राट व्हावे किंवा रक्षण करावे एवढा लेचापेचा हा धर्म नाही‌. तो स्वयंभू आहे. तो आपण विसरलो आहोत. घरांतून धर्म शिकवला जात नाही... ज्या मंत्रोच्चारात लग्ने लागली, राहत्या घराची वास्तुशांती झाली त्यातला एक मंत्रही आपल्या लक्षात राहत नाही आणि आपण धर्मरक्षणासाठी मतदान करणार का? काय मोठा विनोद आहे! आपण तेवढेच धार्मिक आहोत जेवढे आत्ताचे तिकीट-भिकमागे छत्रपती, छत्रपती आहेत.

धर्माच्या बाबतीत लोक थोडे भावनिक असतात. त्याचा पुरेपूर फायदा समाजातील नतद्रष्ट लोक नेहमीच घेतात. जेव्हा पाकिस्तानात एखादं लेकरू जन्माला येतं तेव्हा त्याच्या आईला काय असं वाटत असेल का, की याने मोठा होऊन भारतावर बॉम्ब टाकावा? पण त्या बॉम्ब टाकण्यात कुणाचा तरी प्रचंड आर्थिक फायदाही असतो. या बॉम्बचे कारखाने दोन्हीकडच्या धार्मिक लोकांचे असतात. आपण इतके स्वतंत्र आहोत की त्याची थोडीशी जाणीव झाली तरी काही क्षण आपल्याला प्रचंड मोठा शक्ती-संसर्ग होऊन आता याचे काय करावे हा प्रश्न पडेल. राजकीय पक्ष तुम्हाला याच विचारापर्यंत पोहोचू देत नाहीत. तुम्ही पोहोचायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला जात-धर्म-प्रदेश यांची भिती दाखवली जाते.

ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडिलांना जिवंत देहदंड देणारा समाज हिंदूच होता. तोच समाज आता माऊलींच्या नावे वाऱ्या करतो. चंद्रभागेच्या वाळवंटात सगळं काही विसरून समोर जो दिसेल त्याला 'माऊली' म्हणत त्याच्या पाया पडतो. तोच समाज पुन्हा घरी आला की जातीत रमतो. तो मराठा असेल तर भोसले राजघराण्याच्या वंशजांवरती टीका त्याला सहन होत नाही, माळी भुजबळांसाठी ढाल घेतो आणि वंजारी धनाभाऊसाठी काहीही करायला तयार होतो. याचा फायदा फक्त नेते घेतात. तुम्ही मरेपर्यंत पिढीजात कार्यकर्ते. हाडाचे कार्यकर्ते, ज्याने 'हाड' म्हटलं तर गल्लीतलं कुत्रंही ढुंकून पाहत नाही. दिल्लीत ती अनोळखी पोरं कुत्र्यासारखा मार खाताना पाहिली आणि काळीज पिळवटून निघालं. त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या आईबापासाठी. दोन दिवस सर्दीने नाक फुरफुरलं तर तिसऱ्या दिवशी घरचे आपल्याला बळजबरी दवाखान्यात नेतात. इथे या तरुणांच्या पालकांनी आपल्या हृदयाचे तुकडे देशासाठी दिल्लीकडे पाठवून दिले. देशाच्या सुरक्षेची शपथ घेतलेले हात या तरूणांचा जीव घेण्यासाठी तुटून पडले. मारता मारता सत्तेचे हात तुटले पण तरुणांची एकसाथ सुटली नाही. आपला महान नेता काही वर्षांनी 'भारतरत्न' सुद्धा शंभर टक्के होणार. किंवा 'भारतरत्ना'लाच मोदी दिले जातील. आपण फक्त एक लक्षात ठेवायचं. आग लागली असेल तर ती विझवायची. माणूस असो की लोकशाही!


वाचने 223
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

देशाच्या सुरक्षेची शपथ घेतलेले हात या तरूणांचा जीव घेण्यासाठी तुटून पडले. 

 

हे अत्यंत बेजबाबदार विधान आहे. 

 

कोणत्या ही पोलीसाला  मुळात कुणालाही बेदम मारहाण करून आंनद  मिळत नाही. पोलीस काय उगाच उठतात आणि कुणालाही मारहाण करतात असे असते का?

संसदेवर चालून जाणारे तरुण हे आपण काय करत आहोत  याचा विचार न करता तेथे चालून गेले.

संसदेवर चालून जाणे हे देशाशी युद्ध छेडण्यासारखा गंभीर गुन्हा आहे हे त्यांना त्यांच्या नेत्यांनी सांगितले नाही.

Yes, an attack on the Parliament of India is an extremely serious offense. It threatens national security, challenges the sovereignty of the state, and targets the supreme symbol of Indian democracy.

Legal Gravity and Charges Acts of Terror: Such an assault falls directly under strict anti-terror laws and provisions criminalizing acts that threaten the unity, integrity, and security of India.

Waging War: It amounts to waging war—or conspiring to wage war—against the Government of India, which is one of the highest penal offenses.

Severe Punishment: Convictions for these acts carry maximum penalties, including capital punishment (the death penalty) or rigorous life imprisonment.

आणि या झुरळांनि सर न्यायाधीशाच्या वक्तव्याचा आधार घेऊन हा झुरळ हा शब्द उपयोजला आहे.  मग त्यांना न्यायालयाकडून सहानुभूती मिळण्याची सुत राम  शक्यता नाही  

अडथळे पडून पोलिसांवर  हल्ला करून हे तरुण पुढे जाऊ लागले तर किमान बळाचा वापर करून त्यांना थांबवायचे असे आदेश पोलिसांना दिलेले होते.

या तरुणांच्या असून जर दोन दहशतवादी आत घुसले असते आणि एखादा बॉम्बस्फोट घडवला असता तर देशभर आग लागली असती. 

आपणसुद्धा सुरक्षा संस्था काय झोपल्या होत्या का असे आरोप करायला पुढे आला असतात.

अगदी दहशवादी नाही पण एखाद्या तरुणाने डॉ आंबेडकरांच्या महात्मा गांधी यांच्या तसबिरीची विटंबना केली असती तर भारतभर दंगे  झाले असते. 
 
याना थांबवले नसते तर तरुण कोणत्या थराला जाऊ शकले असते हे सांगता येत नाही.

मोर्चाची सरासरी अक्कल ती त्यातील सर्वात बेअक्कल माणसाच्या इतकी असते.            

एकदा एक तरूण  दगडफेक करायला लागला कि इतरही त्यात सहज गम्मत म्हणून सामील होतात .

 

मारता मारता सत्तेचे हात तुटले पण तरुणांची एकसाथ सुटली नाही. 

 

यासाखे भंपक वाक्य दुसरे नसेल.

 

किती मोर्चे करी होते?  तीन साडे हजार? याना नियंत्रणात आणायला काही लष्कराची गरज पडली नसती. नुसते उत्तर प्रदेशच्या पोलिसासारखे पायावर गोळ्या घातल्या असत्या तर अर्धे लोक आयुष्यभरासाठी पांगळे झाले असते.

( उत्तर प्रदेश पोलीस आता अनेक गंभीर गुन्हे असलेल्या गुंडानी गुंडगिरी केली तर पायावर  गोळ्या मारून दोन चार वर्षांसाठी त्यांना जायबंदी करायचा उपाय योजला आहे.) 
माणूस मरत नसल्याने मानवी हक्क संघटना त्यात लक्ष देत नाहीत  आणि त्याच्या बातम्या पेप्रात येत नाहीत. सामान्य माणूस याबद्दल अत्यंत समाधानी आहे.    

उगाच अशी बेफाट विधाने करू नका. कुणीही उठावे नि पोलिसांना शिव्या द्याव्या.

 

११८  पोलीस जखमी झाले त्याबद्दल कोणीही बोलत नाही. कशासाठी? तर आपले कर्तव्य बजावताना?   २० पोलिसांच्या गाड्याची नासधूस केली ती कशासाठी?  

त्यांना ज्या तर्हेने शिव्या देणे चालू होते ते पाहिले तर  आपले पण डोके फिरेल.  झुरळांच्या नेत्यांचा तोच तर डाव होता. तरुणांची माथी भडकावून पोलिसानं हिंसा करण्यासाठी उद्युक्त करायचे आणि त्यावर देशभर असंतोषाचा आगडोंब उठवायचा,

जरा जपून विधाने करा अशी विनंती  आहे  
   

 

 


In reply to by सुबोध खरे

आपणसुद्धा सुरक्षा संस्था काय झोपल्या होत्या का असे आरोप करायला पुढे आला असतात.

 

 

डॉक्टर साहेब.. हे तर अनेक जण आताही म्हणत आहेतच. लोकसत्ता अग्रलेखात पहिल्या अर्ध्या भागात सुरक्षा व्यवस्था झोपली होती काय असाच टोन आहे. तिसऱ्या आतल्या बॅरिकेडपर्यंत आंदोलक पोचलेच कसे..असं. आणि त्याच अग्रलेखात पुढे मग मारहाण आणि चुकीची हाताळणी यावर नेहमीची टीका आहेच. विरोधाभास कळण्याच्या पुढे गेले आहे. विद्यार्थ्यांची गर्दी जमाव बनून कडे तोडून घुसू लागली तर त्याचा फायदा घेऊन टपून बसलेले कोणी अतिरेकी निश्चित फायदा घेऊ शकतात. आणि तसे झाले नाही तरी संसदेत अनधिकृत प्रवेश यासाठी एक रेड लाईन आहे. ती बळेच ओलांडू गेल्यास विद्यार्थी, तरुण, महिला, वृद्ध इतकेच काय लहान मुले असली तरी सुरक्षा व्यवस्थेला निर्णायक पावले उचलावीच लागतात. अशा वेळी लाठीमार किंवा अश्रुधूर वापरला त्यावर आक्षेप अनाकलनीय. अर्थात त्यात खिळे वगैरे क्रूर झाले आहे यावर आक्षेप ठीक. पण त्यांना अश्रुधूर किंवा लाठीमार न करता आवरावे कसे याविषयी कोणीच काही बोलताना दिसत नाही. पहिल्याच दिवशी बोलणी करून किंवा मागण्या मान्य करून हे चिघळू न देणे हाच उपाय सगळे सांगत आहेत. पण तसं केलं तर आर्म ट्विस्टिंग टॅक्टिक्सला सरकार बळी पडते असा पायंडा पडेल. सरकारने आगोदर किमान चर्चा सुरू करायला हवी होती हे पटते मात्र.


In reply to by गवि

सरकारने आगोदर किमान चर्चा सुरू करायला हवी होती हे पटते मात्र.

हि गोष्ट सर्वाना मान्य आहेच.

मुळात श्री सोनम वांगचुक यांचे उपोषण झाले नसते तर CJP ला एवढा पाठिंबा मिळाला असता का हि शंकाच  आहे.

येथे सरकारचा हिशेब चुकला असे म्हणावे लागते.

अर्थात पश्चात दृष्टी हि ६/६ इतकी उत्तमच  असते.      


नमस्कार सुबोधजी,

कृपया लेखातील एक 'अत्यंत बेजबाबदार' आणि एक‌ 'भंपक' वाक्य वगळून उर्वरित लेख वाचा.


In reply to by अनुस्वार

😂😂😂😂😂😂

 

सॉलिड अप्रोच आहे तुमचा, लगे रहो मुन्नाभाई मधील रोज घराबाहेर पानाची पिंक साफ करणारा तो दादा आठवला, तुम्ही पण आठवा बऱ्याच पिका साफ कराव्या लागणार आहेत 


शिरस्त्राणधारी शस्त्रसज्ज पोलिसांनी देशाचे भविष्य असणाऱ्या युवक युवतींना पिसाळल्यासारखे काठ्यांनी रक्तबंबाळ केल्याच्या चित्रफीती पाहिल्यावर तुम्हाला हळहळ वाटण्यात काहीच अडथळा नाही.

११८ पोलीस जखमी झाले. त्यांचे व्हिडीओ काढायला कोणी येत नाही. यातला एखादा जायबंदी झाला आणि नोकरीतून बडतर्फ झाला तर त्याची जबाबदारी कोण घेतं? सरकार पैसे आणि निवृत्तीवेतन देतं. (हां आता तुम्ही म्हणाल कि पोलीस मध्ये भरती व्हायला कुणी सांगितलं होतं?).

एकतर्फी बाजू घ्यायला मला तरी जमणार नाही. जंतर मंतर वर लाठीचार्ज का झाला नाही? कि तेंव्हा पोलीस पिसाळलेले नव्हते?  

 

या पृथ्वीवर स्वतः येशू ख्रिस्त, अल्लाचे प्रेषित मुहम्मद पैगंबर अस्तित्वात होते, तेव्हा सुद्धा 'हिंदू धोक्यात' आला नाही. 

 

अटके  पासून ते लाहोर आणि श्रीनगर पर्यंत चे हिंदू कुठे गेले आणि कालकात्यापासून आगरताला पर्यंतचे हिंदू कुठे गेले?    

बांगला देश मध्ये २३ टक्के असलेले हिंदू आता ८ टक्क्यावर कसे आले?        


In reply to by सुबोध खरे

प्रणाम सुबोधजी,

मी एकतर्फी बाजू घेतली नाहीये आणि कधी घेतलीच तर बलाढ्य सरकार विरोधात मी आपल्यासारख्या जागरूक नागरिकाचीच बाजू घेईल. श्रीकृष्णाने 'सर्वधर्मान्परित्यज्य' (गीता १८:६६) हा संदेश दिला त्यात हिंदू धर्मही आलाच ना, की योगेश्वराने सुद्धा अर्जूनाला काही भंपक सल्ला दिला?

ता.क. कोकणस्थ म्हणून एक दुय्यम दर्जाचा परंतु उत्कृष्ट विषय निवडलेला मराठी चित्रपट पाहा. कदाचित माझे म्हणणे अधिक स्पष्ट होईल.