Skip to main content

भीमादेवी मंदिर आणि संग्रहालय - नियोजनात नसलेली, पण नियतीने घडवलेली भेट

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 13/07/2026 16:14 या दिवशी प्रकाशित केले.

 

 

गेल्या महिन्यात आमच्या लडाख सहलीपूर्वी मिपाकर कर्नलतपस्वी यांचे चंदीगड सहलीचे लेख वाचनात आले .

 दुवा १  https://www.misalpav.com/tourism/53743

दुवा २ https://www.misalpav.com/tourism/53727

माझ्या एका प्रतिसादावर त्यांनी मला 'भीमादेवी मंदिर ' जमल्यास बघा असे सुचवले होते . 

आमच्या लडाख सहलीच्या नियोजनात खरं तर चंदीगड दर्शनाचा भाग नव्हताच. चंदीगड हे आमच्यासाठी केवळ लडाखकडे जाण्याचे आणि परतीच्या प्रवासाचे ठिकाण होते. पण काही स्थळांचे दर्शन आपल्या नियोजनाने नव्हे, तर जणू योगायोगानेच घडायचे असते! 

'नियतीच्या मनात  काय आहे कुणालाच  सांगता येत नाही.' हे वाक्यही कर्नलतपस्वींचेच. 

मुंबई आणि गुजरातमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आमची चंदीगडहून मुंबईकडे येणारी रेल्वे अचानक रद्द झाली. नवीन गाडीचे आरक्षण मिळेपर्यंत आम्हाला चंदीगडमध्येच अडकून पडावे लागणार होते. अडचण तर होतीच; परंतु या अडचणीनेच आम्हाला चंदीगड आणि आसपासचा परिसर पाहण्यासाठी एक संपूर्ण दिवस मिळवून दिला. आणि अशा वेळी सर्वात आधी आठवण झाली ती कर्नलतपस्वी यांनी सांगितलेल्या पिंजोर गार्डन आणि भीमादेवी मंदिराची! अडकून पडलेल्या सर्वांसाठी एक गाडी भाड्याने केली आणि आम्ही निघालो हरियाणातील पिंजोरच्या दिशेने. प्रसिद्ध पिंजोर अर्थात यादविंद्र गार्डनला अगदी लागूनच, गर्द झाडीच्या शांत परिसरात भीमादेवी मंदिराचे प्राचीन अवशेष आणि संग्रहालय आहे. 

प्रवेश शुल्क प्रत्येकी रु . २ ५ /- 

 येथील संग्रहालयाची मांडणीही आम्हाला विशेष आवडली. विविध शिल्पावशेष एकाच मोठ्या दालनात गर्दीने न ठेवता स्वतंत्र छोट्या दालनांमध्ये मांडलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक शिल्प निवांतपणे आणि जवळून पाहता येते.

 आज येथे पूर्ण स्वरूपातील प्राचीन मंदिर उभे नाही. दिसतात ते मंदिराचे भग्नावशेष, दगडी अधिष्ठान आणि परिसरात जतन करून ठेवलेले अनेक शिल्पखंड. पण हे अवशेष पाहताना कल्पना येते की शेकडो वर्षांपूर्वी येथे किती भव्य मंदिरसंकुल उभे असावे! या परिसरातील पुरातत्त्वीय अवशेष साधारण ८व्या ते १२व्या शतकांदरम्यानच्या मंदिरनिर्मितीशी संबंधित मानले जातात. उत्खननात येथे अनेक मंदिरांचे अवशेष आणि शेकडो शिल्पखंड सापडले. मूळ मंदिरसंकुल पंचायतन पद्धतीचे असल्याचे मानले जाते—मध्यभागी मुख्य देवालय आणि त्याच्या चार बाजूंना चार उपमंदिरे, अशी पाच मंदिरांची रचना. आज भग्न अवस्थेत असले तरी मंदिराच्या जोत्याचे अवशेष आणि आजूबाजूला ठेवलेले कोरीव दगड त्या प्राचीन वैभवाची साक्ष देतात. हिरव्यागार झाडांच्या सान्निध्यात हे अवशेष पाहताना इतिहासाशी थेट संवाद साधत असल्यासारखे वाटते. 

 

 

 

 

 

 

 

 

 

या ठिकाणाचे खरे आकर्षण म्हणजे येथील अप्रतिम शिल्पसंपदा मंदिराच्या भिंती, स्तंभ, द्वारशाखा म्हणजेच दारांच्या कोरीव चौकटी, देवकोष्ठे आणि इतर वास्तुघटकांवर विविध देव-देवता, अप्सरा, नर्तिका, संगीतकार तसेच तत्कालीन सामाजिक जीवनातील अनेक प्रसंग कोरलेले होते. मंदिर नष्ट झाले, पण त्यावरील अनेक शिल्पे काळाच्या आघातातून वाचली. संग्रहालयात शिव, विष्णू, गणेश, देवीची विविध रूपे, लकुलीश शिव यांसारखी अनेक शिल्प येथे दिसतात . 

 

 

 

 

 

 

 

 

धार्मिक प्रतिमांबरोबरच सुंदर स्त्रीप्रतिमा आणि अलंकारिक शिल्पे पाहायला मिळतात. . स्त्रीदेहाची सहज, लयबद्ध मुद्रा दगडात इतक्या सुंदर रीतीने साकारलेली पाहून त्या काळातील शिल्पकारांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

 मिपाकर प्रचेतस यांनी एका प्रतिसादात म्हटले आहे की या संकुलातील छायाचित्रे अजून हवी होती . 

@प्रचेतस , हि घ्या तुमच्या आवडीची दर्पणा ! सोबत आलस्या 

 

 

 

स्तंभ, द्वारशाखा, देवकोष्ठे आणि इतर वास्तुघटकांवर विविध देव-देवता, अप्सरा, नर्तिका, संगीतकार तसेच तत्कालीन सामाजिक जीवनातील अनेक प्रसंग कोरलेले होते. मंदिर नष्ट झाले, पण त्यावरील अनेक शिल्पे काळाच्या आघातातून वाचली.

 

 

जाता जाता कर्नलतपस्वींनी सुचवल्यामुळेच हे हे मंदिर पाहता आले तेव्हा त्यांच्या आवडीच्या छंदाची येथे घेतलेली दोन छायाचित्रे . 

 

खरं तर या ठिकाणी येण्याचे आमचे कोणतेही पूर्वनियोजन नव्हते. आमची रेल्वे वेळेवर सुटली असती, तर कदाचित आम्ही या मंदिरापासून अगदी जवळ असूनही ते न पाहताच मुंबईला परतलो असतो. पण गाडी रद्द झाली, आम्ही चंदीगडमध्ये अडकलो आणि त्यामुळेच हे प्राचीन मंदिरसंकुल पाहण्याची संधी मिळाली. गर्द झाडीच्या सान्निध्यात शांतपणे उभे असलेले मंदिराचे भग्नावशेष, दगडात गोठलेली शेकडो वर्षांपूर्वीची कला आणि संग्रहालयात जपून ठेवलेली त्या काळातील शिल्पसंपदा पाहताना एकच विचार मनात आला— काही भेटी आपण ठरवतो... आणि काही भेटी नियती आपल्यासाठी ठरवून ठेवते!


वाचने 340
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अगदी,अगदी. सौ टका सहमत.

 

तुम्हाला हे प्रेक्षणीय स्थळ दाखवायचे हे नियतीच्या मनात  होते व मी ते तिथे जाऊन बघू न आल्यामुळे जी हळहळ वाटत होती ती नियतीला कमी करायची होती म्हणून  तिने हा सर्व  प्रपंच केला.

 

खुप खुप आभार  तुमचे आणी नियतीचे.

 

माझा छंद लक्षात ठेवून तुम्ही धनेश (Gray Hornbill) व मोठा बगळा(Cattle Egrate) प्रचि डावलण्यात बद्दल विशेष आभार. 

 

प्रचि सुरेख आहेत आणी भटकंतीची वर्णनशैली  तर तुमचा  हातखंडा आहे. 

 

पुभाप्र


लेख आणि छायाचित्रे नेहमीप्रमाणेच सुंदर. नुकतेच सिमला ते चंदीगड प्रवास केला, हे मंदिर पहायचे होते, पण वेळ नव्हता.

गाडी रद्द होणे हा एक अतिशय भयानक आणि हादरवून टाकणारा प्रकार असतो. आम्हीही एकदा ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. पण तुम्हाला दोन दिवसांनंतरच्या गाडीची तिकिटे मिळाली कशी? त्या गाडीलाही वेटिंग सुरू असेल ना...


In reply to by एक_वात्रट

आम्हीही हादरलोच होतो . पण ग्रुपमध्ये दोघेच जॉब करणारे होते . आणि पुढचे दोन दिवस शनिवार -रविवारची सुटी असल्याने त्यांनाही अगदी लगेच पोहचले पाहिजे अशी घाई नव्हती .

आम्ही १ २ जणांच्या गटाची सोईनुसार विभागणी केली . जळगांवकर चार जणांना अम्बालाहून तात्काळमध्ये तिकिटे मिळाली . मुंबईच्या दोघांची RAC वेटिंग तिकिटे वरच्या लेव्हलला हालचाली होऊन कन्फर्म झाली . कशी ते माहित नाही. उरलेल्या आम्हा सर्वाना एका दिवसानंतर प्रिमिअम तात्काळमध्ये अम्बालाहून कन्फर्म तिकिटे मिळाली . तिकीट खर्च जास्त झाला पण आरामात आणि वेळेत परत आलो .


धनेश आवडला.

प्रिमिअम तिकीटे तिप्पट किंमतीला असल्यानेच उरतात आणि आपली अडचण सोडवतात.  

सहल आटपून घर गाठल्याशिवाय आनंदाने उड्या मारायच्या नसतात.

सहलीच्या सुरुवातीलाच काही लक्षणं, घडतात त्या आपल्याला थोडी सूचना देतात की छान होणार किंवा विघ्नं येणार याचा अनुभव येऊ लागला आहे.

 


छान प्रचि, एकदिवसीय भटकंतीसाठी चंडीगढ छान आहे, प्लॅन्ड सिटी आहे. काही वर्षांपूर्वीचे माझ्या भटकंतीमधील हे फोटो, आता काही बदलही झाले असतील.


In reply to by श्वेता व्यास

काहीच नाही. हेच सर्व फोटो मी ही काढले आहेत. 


सुंदर फोटो!

धनेश भारीच आहे,आपल्याकड्चा थोडा वेगळा आहे.

दुसरा बगळा आहे वाटत,मला आमच्या इथे पाण्याजवळ कायम दिसतो.@कर्नलकाका तुम्हाला याचा एक्दा फोटो ,पाठवला होता.तसाच दिसतो हा!


नाही तसाच आहे. फरक हा की तो पंजाबात असल्याने बटर चिकन  खातो. 

पुण्यातला पालक पनीर, आळूचे फदफदे खातो. त्यामुळेच आकारमानात फरक आहे.


In reply to by कर्नलतपस्वी

मला आपल्याकडे म्हण्जे महाधनेश सुचवायच होत.👍️पक्ष्यांचे डाएट यावरपण अभ्यास सुरु आहे काय???😅


धन्यवाद ह्यावर भरपूर छायाचित्रांसह सविस्तर लिहिल्याबद्द्ल.

शिल्पे अतिशय सुंदर आहेत. लकुलिशाची मूर्तीची ओळख मात्र संग्रहालयाकडून चुकलेली आहे की काय असे वाटते. मुख्य लक्षण जे उर्ध्वरेता आहे ते ह्यात दिसत नाही, शिवाय हातात लगूड नाही, तो भाग नष्ट झालाय, मात्र उभा दांड्यावरुन लगूड तिथे कदाचित असेलही किंवा भाला/त्रिशुळ इत्यादीही असू शकते.

 

लिहित राहा, वाचत असूच.