Skip to main content

हिमाचल प्रदेश भटकंती-चंदिगढ-शिमला

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 19/06/2026 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
प१

 https://www.misalpav.com/tourism/53715 -१

https://www.misalpav.com/tourism/53727 -२

आम्हांला आता पिंजोर गार्डन  कडे प्रस्थान करायचे होते........

आता पुढे.

राॅक गार्डनपासून पिंजोर गार्डन वीस किलोमीटर अंतरावर आहे. वरिष्ठ नागरिक म्हणून का कुणास ठाऊक मला कुटुंबासोबत इनोव्हा टाईप छोटी गाडी मिळाली. इतर पर्यटक टेंम्पो ट्रॅव्हलर्स मधे बसले.गाड्या पिंजोर गार्डनकडे निघाल्या. 

चालक गब्रू जवान, त्याच्या बोलण्यात हिन्दी कमी आणी पंजाबी शब्दच जास्त येत होते.डेकवर टपोरी,"जुगनी"चे गाणे ऐकू होते. 

चार वर्ष पंजाबमधे कार्यरत होतो.पंजाब मधला सर्वात कठीण   समय होता.राज्यातली पुर्वस्थिती आणी मुख्य स्वर्णमंदिरावर झालेल कारवाई जवळून अनुभवली होती. प्रदीर्घ वास्तव्यामुळे   थोडीफार पंजाबी भाषा समजते.गाण्याचे काही शब्द समजत होते. चालकाला म्हणालो गुरदास मानचे गाणे लाव.पंजाबीत उत्तर देत त्याने चॅनेल बदलला,म्हणाला "साढा प्यों भी माण(गुरूदास) दे ही गाने सुन्दा है गा". म्हणजे माझे वडील पण गुरदास मान चे च गाणे ऐकत असतात. "जुगनी",एक फार जुना आणी लोकप्रिय पंजाबी लोकसंगीताचा प्रकार आहे. याला खुप मोठा इतिहास आहे.चला,आता विषय निघालाच आहे तर  याबद्दल जाता,जाता चार शब्द  सांगतो..... 

"जुगनी",म्हणजे जुगनूची बायको (काजवा, Female Firefly).  पंजाबी लोकसंगीतातली "जुगनी", स्वतंत्र विचारांची, विद्रोही, बिनधास्त,बंडखोर प्रतीकात्मक लोकनायिका आहे.समाजीक   राजकिय,अध्यात्मिक,प्रेम इ.विषयांवरी गाण्यात "जुगनीचा ". नायिका म्हणून वावर लोकांना खुप भावतो. 

स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी देशभक्तांनी या लोकनायीकेचा आपले विचार जनमानसात पसरवण्यासाठी उपयोग केला. (जसा बहिर्जी नाईक यांनी अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी केला होता. त्यांचे गाणे होते, "बाजीराव नाना तुम्हीं लग्नाला चला,तुम्हीं लग्नाला चला....")

१८५७ मधे रावी नदीच्या काठावर स्वातंत्र्या सैनिकांना ब्रिगेडियर जाॅन निकोलसन बरोबर लढताना विरगती प्राप्त झाली.त्यांच्या शौर्य गाथा याच लोकसंगीतातून गुंफून गायल्या गेल्या होत्या.

१९०८ मधे सरकारने या लोकसंगीतावर बंदी आणली होती. १९६० मधे "आलम लोहार", या सुफी गायकाने  लोकसंगीतावर अधुनिक साज चढवून नवे रूप प्रचलित केले. "जुगनी",चा इतिहास बराच मोठा आहे.सध्या दलजीत दोसांज,रब्बी शेरगिल सारखे आघाडीचे गायक हे लोकसंगीत अधिक लोकप्रिय करत आहेत. 

"जुगनी",ची जशी प्रेमगीते,सुफी गाणी आहेत तशीच XXX गाणी पण प्रसिद्ध आहेत. भाषा अतीशय खडी आणी अश्लील असल्याने इथे गाण्याचे बोल देऊ शकत नाही.(सैन्यात सर्व भाषिक सैनिक असल्याने सर्वच भाषातले थोडे थोडे शब्द परिचयाचे होतात.(विशेष करून शिव्या,टपोरी शब्द पटकन आत्मसात होतात.) असो, "जुगनी", पुराण इथेच थांबवतो कारण आपण पिंजोर गार्डन  जवळ आलो आहे.

राॅक गार्डन सोडल्या पासून भोवतालच्या भौगोलिक परिस्थितीत हळूहळू बदल होत होता.सपाट प्रदेश मागे पडून डोंगराळ भागा कडे प्रवास सुरू झाला.हिरव्यागार शिवालिक डोंगररागां कडक उन्हात दिलासा देत होत्या. 

पिंजोर गार्डन. 

मुघल सम्राट औरंगजेबाचा भाऊ,फिदाई खान कोका,सरहिंद प्रदेशाचा नबाब, वास्तुविशारद,याला हिरव्यागार जंगलातली जागा आवडली. त्याने या ठिकाणी पर्शियन "चहारबाग",शैलीत भव्य महाल १६६९ मधे बांधला व त्याचे बाग- ऐ'-फिदाई खान असे नाव दिले. 

(चहार बाग शैलीबद्दल मिपाकर "मनो", यांनी विस्तृत माहिती दिली आहे.

https://www.misalpav.com/comment/1129983#comment-1129983)

हे उद्यान १०० एकर क्षेत्रात पसरलेले असून ते उत्तरेकडून दक्षिण दिशेने जाणाऱ्या उतारावर सात टप्प्यावर बांधले आहे.प्रत्येक टप्प्यावर वेगळा महाल आहे.महालांची नावे अनुक्रमे शिश महाल, हवा महल,रंग महल, जल महल, दिवाणे खास, दिवाणे आम आणी सातव्या टप्प्यावर मोठी बाग आहे.महालांच्या मधोमध एक पाण्याचा पाट व त्यामधे थोड्या थोड्या अंतरावर कारंजी आहेत. पर्शियन मुघल शैलीचे  मिश्रण आहे.श्रीनगर मधील शालीमार, निशात  बागा याच शैलीत बांधल्या आहेत.नैसर्गिक संसाधनांचा भरपूर उपयोग केल्याने महाल सुंदर,अल्हाददायक आहेत.महाल एका सरळ रांगेत आहेत.दोन्ही बाजूस मोठे पामचे वृक्ष आहेत.या वृक्षांवर खुप सारी वटवाघळे उलटी लटकलेली दिसली.अक्षय कुमारचा भूतबंगला  या चित्रपटाची आठवण झाली. गार्डनमधे रात्री काय होत असेल याचा विचार करून अंगावर काटा आला.

 

मुघलांकडून महाराजा रणजित सिह यांनी हा भूभाग जिंकून घेतला. पटियालाचे महाराजा अमर सिंग,महाराजा भूपिंदर सिंग आणि  महाराजा यादवेंद्र सिंग या शीख शासकांनी या बागेचे नूतनीकरण आणि विस्तार केला.पटियालाचे शेवटचे शासक महाराजा यादवेंन्द्र सिह यांच्या नावावरून बागेचे नाव बदलून 'यादवेंद्र गार्डन' असे ठेवले. प्रचलित नाव मात्र "पिंजोर गार्डन ", असेच आहे.

गाडी पार्किंगमधे येवून थांबली.समोर महालाचे प्रवेशद्वार,गोल पुष्करणी भोवताली मऊ गवत,फुलांच्या ताटवे,चहूबाजूला भक्कम तटबंदी आणी पूर्वेच्या अंगाला एक मोठी मशीद असे प्रथमदर्शनी दृष्य दिसले.मुलांसाठी पुष्करणी भोवती फिरणारी  टाॅय ट्रेन आहे.१९७६ मधे हे उद्यान हरियाणा सरकारने सर्वासाठी खुले केले.प्रवेश शुल्क अगदी नाममात्र आहे. त्या मानाने ऊद्यानाचा रखरखाव अतिशय सुरेख आहे.

प२

-.प५

 

प४

 

 

प७

 

प३

 

उन कडक होते,पर्यटकांचा उत्साहही तेव्हढाच कडक होता.आत गेल्यावर वास्तूची भव्यता लक्षात आली.आम्हीं पहिले दोन महाल बघीतले आणी परत फिरलो.एका महाला पासून दुसर्‍या महाला पर्यंतचे अंतर किती आहे हे प्रचि बघून वाचकांना अंदाज येईलच. भरदुपारी कडक उन्हात एवढे चालणे शक्य नव्हते आणी गरज वाटली नाही.परत फिरलो. प्रेक्षणीय स्थळांमधे इतिहास,वास्तू कलाकुसर, तांत्रिक गोष्टीं आणी निसर्ग असे बरेच काही बघण्या सारखे असते.यात फार कमी प्रमाणात पर्यटकांना इंटरेस्ट असतो. प्रत्येक ठिकाणी जाऊन तोंडे वेंगाडून सेल्फी,फोटो,व्हिडिओ काढणे एवढेच बरेच जण करतात. एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात आली की राॅक आणी पिंजोर गार्डनमधे लैला मजनूनीं आपल्या पाऊलखुणा सोडलेल्या दिसल्या नाहीत.कुठेही कोळशाने, तीक्ष्ण शस्त्राने खरडलेले दिसले नाही. त्यामुळे  समाधान  वाटले.

 

मुख्य प्रवेशद्वारावर इतर सहप्रवासी येण्याची वाट बघत बसलो. तीथेच हरियाणा पर्यटन विभागाचे छोटेसे कार्यालय दिसले.सहज आत गेलो.एक स्मार्ट जाट तरूण बसला होता. पिंजोरचा इतिहास व आसपास  आणखीन काही बघण्यासारखे आहे का म्हणून विचारले. माहिती देताना तो म्हणाला,"मुघल कालीन माहिती नोटीस बोर्डवर दिलि आहे ती तुम्हीं वाचली असेलच.पुढे माहिती देताना म्हणाला,

महाभारत काळात  पांडव वनवासी असताना एक वर्ष इथे राहीले होते.त्या काळात भिमेश्र्वर महादेव मंदिर द्रौपदीकुंड, धाराकुंड इ. वास्तू  बांधल्या अशी अख्यायीका आहे. तेंव्हा या गावाचे नाव पंचपूरा असे होते.(त्याचा अपभ्रंश पिंजोर झाला असावा. )

आठव्या, नवव्या शतकात पंचपूरा, भीमानगर म्हणून ओळखला जाऊ लागला.प्रतिहार,गुर्जर सम्राटानी राज्य केले.राज्यकर्त्यांनी त्या  काळात भीमादेवी मंदिर संकुल पंचायतन शैलीत  बांधले.पुढे तेरा ते सतराव्या शतका मधे  मुघल राजांनी सर्व मंदिरे क्षतिग्रस्त केली. नबाबाने या भग्न हिंन्दू मंदिराचे कलात्मक दगड महालाच्या बांधकामात वापरले.१९७४ मधे हरियाणा पुरातत्व विभागाने इथे खुदाई काम करून शंभर पेक्षा जास्त मूर्त्या बाहेर काढल्या. 

प८

पंचायतन शैलीत बांधलेल्या मंदिर संकुलात मध्यभागी मुख्य मंदिर व चार बाजूस कोपर्‍यात इतर देवतांची मंदिरे अशी ढोबळ माहिती आहे.सॅण्डस्टोन मधली ही मंदिरे खजुराहो मंदिरांच्या समकालीन असून या ठिकाणाला उत्तर भारता मधले खजुराहो म्हंटले जाते.

( प्रचेतस  यावर अधिक प्रकाश टाकू शकतात)

तुम्हीं जास्त माहिती साठी इंटरनेट आणी ASI च्या वेबसाईट बघा असे तो  उत्साही तरूण म्हणाला. त्याला भेटून आनंद  झाला. धन्यवाद  देत बाहेर  पडलो. 

टुर लिडर  लवकर  चलण्याची घाई करत होता. अंतर राज्य सिमा नाक्यावर तपासणी साठी वेळच लागणार  होता. 

काही मिनीटांच्या अंतरावर भिमा देवी मंदिर संकुल जे की आता पुरातत्व विभागाचे संग्रहालय आहे ते न बघता आल्याने अतिशय चुटपुट लागली.पण"किस्मत ज्यादा आणी समय से पहले कुछ भी नही मिलता",असा विचार करून मनाचे समाधान केले.

आमची मोठी बस पार्किंग मधे दाखल झाली. एक एक पर्यटकांनी आपपाल्या सीटवर बसून घेतले.उन खुप ,पायपीटही भरपूर  झालेली. तहानलेल्या जीवानीं बिसलेरीचे घोट भरायला सुरवात केली. नाष्टा तर केंव्हाच जिरला होता.फाड,फाड स्नॅक्सची पाकिटे फोडण्याचा आवाज  येवू लागला. ट्रिप मॅनेजरनी, सर्व पर्यटक आल्याची खात्री करून घेतली व पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करण्याचा हुकूम  चालकाला दिला. पर्यटक पुन्हा गप्पात रंगले.

मी अंतरजालावर मंदिर संकुलाची माहिती शोधू लागलो.  बरीच माहिती मिळाली

 

चंदिगढ शिमला हे अंतर फक्त एकशे बारा कि. मी.आहे सगळा घाटरस्ता,गती सीमा चाळीस कि.मी.साधारण साडेतीन तासाचा प्रवास,मधे तासभर जेवण्यासाठी व थोडा वेळ चहा पाना साठी जाणार होता.दुपारचे बारा वाजून गेले होते.व्यवस्थित योजनाबद्ध प्रवास झाल्यास  पाच वाजेपर्यंत  शिमल्याला पोहोचण्याची शक्यता होती.

पिंजोर वरून गाडी निघाली.राष्ट्रीय महामार्ग नंबर पाच, पुढे बावीस,दोनशे पाच अश्या वेगवेगळ्या महामार्गवरून गाडी धावणार होती. चंदीगड → परवाणू → धरमपूर → सोलन → कंडाघाट → शिमला असा प्रवास. महामार्गाचा मेन्टेनन्स,साईन पोस्ट्स, शिस्त  वाखाणण्याजोगी आहे.वहाने एका ओळीत शिस्तबद्ध चालली होती. ओव्हरटेक ओव्हरस्पिडिंग करताना अजीबात आढळली नाहीत.अर्थातच,केवळ आणी केवळ घाट रस्ता असल्याने सर्व चालक सजग,सतर्क होते.परिणाम सर्व विदीत असल्याने स्वयंशिस्त पाळत होते. "अती  घाई संकटात  नेई,लवकर निघा,सुरक्षीत पोहचा,मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक",व तत्सम घोषवाक्ये लिहीलेली आढळली नाही. उलट परवाणू सिमावर्ती गावाजवळ हिमाचल प्रदेशात पेट्रोल, डिझेल  पंजाब, हरियाणा पेक्षा स्वस्त मिळेल अशीच पाटी लावलेली दिसली.

 

प११

प्रवास चालू होता. मी खिडकीतून बाहेर  बघत होतो. महिला मंडळ स्वमग्न होते तर काही पुरूष डुलक्या मारत होते. एका बाजूला डोंगर दुसर्‍या बाजूला दरी,जागोजागी भूस्खलनाच्या खुणा दिसत होत्या.भूस्खलन थाबवण्या करता सुरक्षा जाळी, कठडे,भिंती बांधणे,शक्य तिथे भराव टाकून रस्ता रुंदीकरण व अन्य सुरक्षा विषयक दुरस्तीची कामे चालू होती.डोंगरांची उंची आणी दरीची खोली वाढत होती.उंचावर जात असल्याचे लक्षात येत होते.खुप दिवसा नंतर निसर्गरम्य वातावरणात प्रवास होत होता.आठवणीतल्या एका कवीतेचे शब्द  कानात घोळू लागले.

अल्याड डोंगर,पल्याड डोंगर, 

मधेच खोल खोल दरी...

या दरीतून वाहे नदी, 

जशी चांदीचीच सरी..."

प९

अगदी असेच दृष्य होते. पंडोह धरणातून बाहेर पडणारे बियास नदीचे (व्यास नदी) पाणी,स्टेप फार्मिंग,डोंगरात वसलेल्या छोट्या टुमदार वस्त्या व घरावर हिरव्या,लाल रंगाची उतरती छप्परे बघून एकंदरीत वातावरण मिपाकर  चित्रगुप्त किंवा आमचे चौको भाऊ यांनी कॅनव्हासवर काढलेली निसर्गचित्रे वाटत होती.प्रचि बघून वाचकांच्या लक्षात येईल.

प१० 

प११

"परवाणू", हरियाणा-हिमाचल प्रदेश सीमेवरचे गाव.इथे वाहनांचे चेकिंग होते.गाडी नाक्यावर थांबली चालक गाडीचे कागद घेऊन ऑफिस मधे गेला.खिडकीतून बाहेर रानमेवा विकणारे लोक दिसत होते.मला जुन्या खंबाटकी घाटाची आठवण आली.जसे तिथे स्ट्राॅबेरी विकणारे तसेच इथे चेरी आणी खुरमानी विकणारे होते. फार गर्दी नसल्याने चेकिंग सोपस्कार लवकर पूर्ण झाले व गाडी पुढे निघाली.

 

तासाभरा नंतर गाडी धरमपूर गावातील "हाॅटेल हवेली",च्या पार्किंग मधे थांबली दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती.गाडी मधे पुन्हा एकदा हलचल तेज झाली. सर्वच जण खडखडले होते. शाकाहारी,सामिष भोजनावर तुटून पडले.गोड पदार्थात गुलाब जाम व मुंग दाल चा हलवा होता.भरपूर जेवण झाले. "आता गाडी सोलन मधे चहा साठी थांबणार आहे असे मधे अजीबात थांबणार नाही. गाडी मधे बसण्या आगोदर वाॅशरूमचा जरूर वापर करा", अशी प्रेमळ सुचना टुर लिडर ने सर्वांना केली. 

सामिष, गोड जेवणाने सर्वानाच झिंग चढली. थोड्याच वेळात बऱ्याच जणांची ब्रह्मांनंदी टाळी लागली.मी मात्र बाहेरचा निसर्गरम्य परिसर डोळ्यांत, कॅमेर्‍यात, भ्रमणध्वनीवर साठवून ठेवत होतो. गाडी धावत होती,डोंगर, दर्‍या, गाव मागे पडत होती. वळणावळणाचे रस्ते, वळणावळणावर छातीत धडकी भरत होती.

 

प१२

गाडी आता सोलन जवळ आली. मी जरी सोलन या गावाला पहिल्यांदाच भेट देत असलो तरी या गावाबद्दल  खुप सार्‍या जुन्या आठवणी जागृत झाल्या.जसे,मोहन मिकिन्स, सोलन नंबर  वन, ओल्ड माॅकं, गोल्डन इगल वगैरे. कायप्पावर मित्रांबरोबर या विषयावर गप्पा मारल्या.अगदी ऑफिसातले काम सोडून मिपाकर मित्रांनी हिरीरीने गप्पात भाग घेतला.सोलन पासून तीन किलो मीटर पुढे आल्यावर व्हॅली व्ह्यू शाॅपिंग काॅम्प्ल्याक्स समोर गाडी थांबली.डोंगर कड्यावरच्या  छोटेखानी हाॅटेल मधून खोल दरीचे रौद्र रूप दिसत होते. सर्वांनीच चहा,समोसा व सेल्फीचा आनंद  घेतला.जवळच असलेल्या स्नॅक्स सेंटर मधे फेरफटका मारला. दुकानदारांवर बरोबर डिस्टिलरी बद्दल चौकशी केली. फ्रुट वाईन चाखायला दिली.मग लाजेकाजेस्तव थोडी खरेदी केली.

गाडी पुन्हा शिमल्याकडे धावत निघाली.......

प१४

शिमल्याच्या वेशीवर आल्या नंतर गाडी रस्त्या लगत थांबली. इथून पुढे "हाॅटेल इस्ट बाॅर्न", राहाण्याचे ठिकाणा पर्यंतचा प्रवास छोट्या गाडीने झाला. सामान टेम्पो मधे मागाहून आले. 

संध्याकाळ झाली होती,हिरण्यकश्यपूचा वध झाला तीच वेळ.उंच देवदार वृक्षांच्या सावल्या घनदाट जंगलात एकमेकात मिसळून गेल्या होत्या.हाॅटेलच्या प्रवेशद्वारावर चौकिदार, मॅनेजर,वेटर्स आमच्या स्वागतार्थ उभे होते. रहाण्याचे ठिकाण बघून मन खुश झाले. घनदाट झाडीत लपलेल्या किलबिलाटाने लक्ष वेधून घेतले. सभोवार नजर भिरभिरत असताना समोर ब्ल्यू व्हिसलिंग थ्रश (पहाडी कस्तुरचंद,शिळकरी कस्तूर) आणी स्ट्रिक्ड लाफिंग थ्रश (कशमिरी नाव छोटा पेंगा, स्थानिक नाव शिना पिपाणी,याकूर) हे दोन पक्षी दिसले. प्रवासाचा थकवा निघून  गेला....

 

प१६

 

प१५

उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा समजून घेतली व रूम मधे गेलो.रात्रीचा मेन्यू मस्त होता. जेवल्यानंतर निद्रादेवीने अलगद कुशीत घेतले.........

 


वाचने 310
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

भ्रमणध्वनीवर टंकाळून प्रचिसह लेख  डकवण्यासाठी दिवसभर झुंज दिली पण लेख डकवता आला नाही. कधी लेख अदृश्य तर प्रचि गायब,कधी दोघेही. शेवटी फक्त  लेख डकवला आहे. लॅपटॉप वर प्रचि सह संपादित करतो मगच बघावा. प्रचि भरपूर आहेत. 


पण प्रचि शिवाय मजा नाही असे म्हणायला आलो होतो तितक्यात एक प्रचि दिसले. बहुतेक एडिटिंग चालु आहे. थोड्या वेळाने बघतो पुन्हा.


तुम्ही जे प्रवासवर्णन लिहिताय ना तशी शैली कुणाचीच नाही. म्हणजे चांगली तर आहेच पण एकमेव आहे. 

सैनिक असतांनाचा अनुभव ही छानच.


पाभे ऊर्फ 'दगडफोड्या' ने दिलेल्या -  "तुम्ही जे प्रवासवर्णन लिहिताय ना तशी शैली कुणाचीच नाही. म्हणजे चांगली तर आहेच पण एकमेव आहे."  या अभिप्रायाशी सहमत. असेच  लिहीत रहा.

(अजून प्रचि डकवायची आहेत असे वाटते. जीर्णोद्धारानंतरच्या मिपावर अजून मी काही लिहीलेले नसल्याने आता प्रचि कशी डकवावी वगैरेंबद्दल अजून अनभिज्ञ आहे)


 


In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी,

 

इतर प्रवासवर्णन हे जास्ती प्रोफेशन वाटतात. कर्नल साहेबांच्या प्रवासवर्णनात ते आपल्याला तेथे घेऊन मातीच्या गोष्टी सांगत सांगत फिरवून आणतात. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत घडलेला प्रवास वाटतो. एकसुरी नाही, की इकडे गेलो, हे पाहिले, ते पाहिले, गाडीत बसलो, पन डायवर काय फास मारत नव्हता.

 

पक्षांची छायाचित्र काढतांनाचा संयम, अनुभव कामास येतो.


In reply to by पाषाणभेद

मनमोकळ्या व विस्तृत प्रतिसादाबद्दल  धन्यवाद. 

 

मला वाटते पर्यटन म्हणजे टू प्लस टू कधीच  नसते .प्रत्येक वेळेस नवीन  अनुभव येतात.  सर्वसाधारण माहिती आजकाल  अंतरजालावर भरपूर उपलब्ध असते. आयोजन ,नियोजन  सोपे झाले आहे. 

 

नोकरीमुळे बरेच ठिकाणी रहिवासी  म्हणून  राहिलो,फि  रलो ,स्थानिक लोकांबरोबर संबध आले. त्यांच्या कडून जी माहिती मला कळाली ती  निव्वळ पर्यटन करणाऱ्यास मिळणे संभव नसते. पर्यटन  करताना जुन्या आठवणी जाग्या होतात.  त्यात  प्रसंगानुरूप भर पडते. ती इतर लोकांना  सागंण्यात मला मजा येते.

आपल्याला आवडली लेखाची फलश्रुती मिळाली.

 


या बाबतीत माझे ज्ञान  एल के जी च्या विद्यार्थ्यां सारखे.

सत्तावीस वर्षापुर्वी एच टी एम एल प्रोग्राम लिहीले होते पण तेव्हां फ्रंटऐण्ड चा सपोर्ट होता.

 

आत पाटी कोरी झालीय. 

मिपा मुळे नवीन  तंत्रज्ञानात काम करायला मिळते हे अहोभाग्य. 

 

प्रतिसादाबद्दल पाभे,चित्रगुप्त मेहेंदळे मनापासून आभार. 

 


मताशी काही अंशी सहमत आहे. परंतू पॅकेज ट्रिप  पण चांगली असते. या मधे वेळ,उद्देश, शक्ती  इत्यादी हे महत्त्वाचे फॅक्टर आहेत.


सुंदर वर्णन!

जुगनुची बायको जुगनी अस माहितच नव्हत,ती सुद्धा बिनधास्त,बंडखोर असते तर..भारीच!!

ओ जुगनी ओ… पटाखा गुड्डी ओ नशे में उड़ी घेणे रे 

हाय रे सज्जे खब्बे धब्बे किल्ली 

हे गाण खुप आवडत पण आता समजल ☺️

पर्शियाला कधी जाणार माहिति नाही पण ते छतावरचे नक्षीकाम पर्शियासारखेच आहे,ते पाहायला इथे जावेच लागेल!

 


उजवे डावे,गाणे ऐकतो. चाल,रिदम डोक्यात पक्के बसते पण शब्दांचे अर्थ  जर कळाले तर सोन्याहून पिवळे.

 

धन्यवाद भक्ती


भीमानगरचे भग्न संकुल आवडले. शिव,  वरुण(किंवा इंद्र) हे ओळखू आले. त्या संकुलाची छायाचित्रे अजुन हवी होती.

बाकी हाही भाग तुमच्या लेखनशैलीमुळे वाचनीय झाला आहे.


शिमला म्हटल्यावर मला तेथला कुफरी पॉईंट , मॉल रोड आठवले . बहुतेक पुढच्या भागात उल्लेख येईल