Skip to main content

दुध 'उतू' गेले .....

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 12/05/2026 18:29 या दिवशी प्रकाशित केले.

 

पिशव्या शोधून काढून चावी घेतली...

येताना दोन किलो 'एक्स्ट्रा गोल्ड' घेऊन या...आणि हो, कारमधेच जा, ऊन खूप आहे. नाहीतर पेट्रोल वाचवायचे म्हणून जाल (बोंबलत) स्कुटीवर...

मी समजलो, ती सफोला गोल्ड तेला बद्दल बोलत होती. लोणचे घालायचे दिवस आहेत ना... 

लिफ्टमधे दहाव्या माळ्यावरच्या आजी भेटल्या. मोबाईलवर कुठलीतरी चित्रफित बघत होत्या. मला न बघता म्हणाल्या, "बरे झाले आगोदरच म्हाताऱ्यासाठी गुंजभर घेऊन ठेवलय!"

"ऑं?",  माझा प्रश्नार्थक चेहरा बघून पुढे म्हणाल्या, "आहो, मेल्यावर तुळशीपत्रा बरोबर तोंडात गोल्ड घालायला लागते ना! 

 मनात म्हणलो, केवढा हा कॉन्फिडाॅन्स....!

उदवाहकातून खाली उतरलो तर लॉबीमधे "रॉक्स" भेटला. हातावर त्याने पेढा ठेवला. मी विचारले कशासाठी?

"साहेब, इ-स्कूटर घेतली आहे. ट्युबलेस टायर्स वाली" रॉक्स आमच्या सोसायटीत येणारा डिलिव्हरी बॉय. बहुतेक दररोजच भेटतो.

"आणि जुनी मोटरसायकल?"

रॉक्स म्हणाला, "विकली साहेब! इराण युद्ध सुरू आहे, इकडे पेट्रोल शंभरी पार गेलंय. तेल वाचवायला पाहिजे ना... आणि तसंही सध्या 'हवा' फक्त भाषणात उरलीये, टायरात भरायला पण पैसे लागतात!" रॉक्सची जागतिक जागरूकता आणि देशप्रेम,अर्थिक नियोजन  बघून उर भरून आला. 

एवढ्यात जावईबापूंचा फोन आला."बाबा,यावर्षी ॲपल पिकिंगला जरूर यायचे आहे. तुमचे आणि आईचे तिकीट लवकर काढा. डेल्टाची फ्लाईट चांगली असते. आम्हांलाही सोपे पडते..."

-

-

-

-

-🥵

अचानक हाताला चटका बसला. भानावर आलो.कानावर एक कर्कश्श आवाज पडला...

"आहो लक्ष कुठंय तुमचं? सगळं दूध उतू गेलं! आता तेवढा ओटा आणि गॅस स्वच्छ पुसून घ्या..." — इती सौभाग्यवती.

भानावर आलो. वेळ चहाची होती. दूध तापण्याची वाट बघत असताना 'मिपावर'  शशक लिहिण्यासाठी तंद्री लागली होती.

 

बाकी काही म्हणा, मिपाचा नादच खुळा


वाचने 527
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

पंप्रनांचे देखील ऐकत नाही. कसले देशभक्त तुम्ही?

 

आमचे पहा, पंप्रनांनी आवहन केले की सोने घेऊ नका. मी नाहीच घेतले सोने. फक्त चांदी घेतली आणि घरी आलो. 


या गोल्डला ही नाही म्हटलं नाहीय!