Skip to main content

महाराष्ट्र दिन

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/05/2026 15:08 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त मिपाकरांना शुभेच्छा.

 

कर्णकर्कश डि जे च्या आवाजाने नेहमी पेक्षा पंधरा मिनिट लवकरच झोप उघडली.कुंकवाचे कपाळ शेजारीच  ढाराढूर  झोपलं होतं.अजून दोन तासाची निश्चिंती होती. आळोखे पिळोखे देत अंगावरच्या चादरीची घडी घातली. पलंगावरची  विस्कटलेली चादर  निट केली.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे॥

पुटपुटत स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. दोन चमचे साखर टाकून दुधाचा फक्कडसा चहा बनवला.अर्ध्या सायीचे विरजण लावले आणी अर्धी चहा वर सजवली.(बायको हल्ली तक्रार करते, दुधवाला निट रतीब घालत नाही, तुप अजीबात बनत नाही.खरे कारण फक्त मला आणी आता तुम्हाला माहित आहे.)

कुठलाही दिन आसो, गल्लीतल्या दादा लोकांची दिवाळी, पहाटे उठून बिना सायलेन्सरची फटफटी उडवायची दिवस भर ढणढण्या डि जे लावायचा आणी चकाट्या पिटत कट्ट्यावर बसायचे.

डि जे वर महाराष्ट्र गीताचे रिमिक्स लावले होते. खरे तर शाहिर साबळे यांनी गायलेले सुमधूर आणी जोशपूर्ण महाराष्ट्र गीत हल्ली ऐकू येणे दुर्लभ झाले आहे. आवांतर, आमच्या गावातील डि जे च्या मालकाच्या बायकोचे नाव बहुतेक "अश्वीनी"असावे.माझा असा समज होण्या पाठिमागे एक ठोस कारण आहे. कुठलाही दिन असो,कुठलाही उत्सव आसो, गणेशोत्सव, नवरात्र, साखरपुडा,लग्न अगदी रामनवमी किवां हनुमान जयंती असो, दिवसातून किमान दहा ते बारा वेळा "अश्विनी ये ना........."हे गाणे वाजते म्हणजे वाजतेच. गावातील शाळकरी मुलांपासून ते म्हातार्‍या कोतार्‍या पर्यंत सर्वाना हे गाणे तोंडपाठ आहे. (शप्पथ, खोट नाही सांगत....अगदी गीतेवर हात ठेवून (गीता म्हणजे भगवद्गीता हो..) सुद्धा हेच म्हणेन.)

चित्रपट-गंमत जम्मू,गीतकार  -शांताराम नांदगावकर आणी नट-आशोक मामा.

आसो विषयांतर होतय. तर डि जे चा कानाला त्रास होत होता तरी एक मराठी माणूस म्हणून  महाराष्ट्र गीताने स्फुरण चढले. ठरवले,आज पुण्यापत्तनातील मराठी पाउलखुणांचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दिनाची सुरवात  करावी.

पटकन तयार झालो."पर्वती",कडे मोर्चा वळवला. सारसबाग, विश्रामबागवाडा,शनिवार वाडा,नानावाडा,कसबा गणपतीचे दर्शन करेपर्यंत खुप दमलो आणी पुढचा कार्यक्रम स्थगित करून घरी येण्यासाठी रिक्षा घेतली.नेहमीपेक्षा जास्त चालणे झाले होते.रिक्षाचालक म्हणाला,"साब किधर जानेका", मराठी मन चरफडले तरीपण संयम ठेवत घरचा पत्ता सांगीतला व संभाषण सुरू ठेवले. थोड्याच वेळात लक्षात आले चालक नक्की मराठीच आहे.मी आयुष्यातील बराच काळ उत्तर भारतात काढल्याने हिन्दी वर प्रभुत्व आहे.चालकाला सरळ मराठीत नाव विचारले. तो म्हणाला, "बबन सुतार", एकदम डोक्यातच गेला. म्हणालो "अरे,आपणच मराठी नाही बोललो तर इतर तरी कशाला बोलतील?". चालक थोडं ओशाळवाणे हसून गप्प  झाला. मी ही पैसे देऊन  घरात  शिरलो.

दोन घोट पाणी पिऊन नाष्टा करावा म्हणून गॅसवरची कढई उघडली. एव्हढ्यात आतून आवाज आला,"झालं का भटकून, गरम गरम उपमा' केलाय, खाऊन घ्या." मराठी मनाचा हिरमोड झाला."अगं,महाराष्ट्र दिन, काहीतरी मराठी पदार्थ  बनवायचा ना? निदान चिमूटभर हळद टाकली असतीस तर उपम्याला सांज्याची उपमा देता आली असती. स्वताच स्वकोटीवर खुश झालो. "इश्श्य, नाष्ट्यात कसला आलाय महाराष्ट्र दिन...,तुमचं आपलं काहीतरीच. "असेल ते विटवा आणी नसेल ते भेटवा",खणखणीत आवाजात मराठी म्हण तोंडावर  फेकून मारली.

चितळ्यांची बाकरवडी,लक्ष्मीनारायण चिवडा असले काही अस्सल मराठी, पुणेरी पदार्थ तरी नाष्ट्याला घ्यावेत म्हणून फडताळ (कपाटा साठी अस्सल मराठी शब्द) उघडले, बघतो तर फापडा,गाठी,बिकानेरी भुजिया, फरसाण सारखे परप्रांतीय पदार्थ आत पहुडले होते. "चिवडा,बाकरवडी खुप गोड असतात  बाई " म्हणून  सहसा हे पदार्थ घेतले जात नाहीत. एका कोपर्‍यात फरसाणच्या अंगाखाली चिरडलेले,केविलवाणे कोल्हापूरी भडंगाचे पाकिट दिसले.मनापासून आनंद झाला. भसाभसा भडंगगाचे ओतत "उपमा" झाकून मी माझा राग शांत  केला. (खरेतर गाडून म्हणायला हवे होते.)

आंघोळ,देवपूजा करून दिवाणखान्यात (१० बाय १० चा हाॅल असला तरी  दिवाणखानाच म्हणतो.) येवून बसलो. पेपरवाल्या पोराने नेमका आजच महाराष्ट्र टाइम्स टाकला नव्हता.मग काय करणार, टाईम्स ऑफ इंडिया चाळत बसलो.

बाजूला पडलेल्या भ्रमणध्वनीची घंटी वाजली. मुलीचा फोन होता. "बाबा,तुम्ही आणी आई दोघेही दुपारी जेवायला या." आतून आवाज  आला "कुणाचा फोन आहे?".अग,जावई बापू जेवायला बोलवत आहेत,जायचे का?" "इश्श, त्यात काय विचारायचं. हो म्हणा." आणी  हो,बबडीला (३० वर्षाची गधडी म्हणायला हवे होते) म्हणाव,आईने मदतीला येऊ का म्हणून विचारलय." पडत्या फळाची आज्ञा घेतली होकारा बरोबर सौं.चा निरोप कळवला. तर बबडी! कशी म्हणते,"काही नको, आज यांना लेबर डे ची सुट्टी आहे".

मुलीकडे जाताना मिठाई (हा शब्द  मराठीत  अगदीच रूळला आहे) घेतली. बरोबरच खारे काजू आणी भाजके शेंगदाणे पण घेतले. ते बघून बायकोने नाक मुरडले.

दुपारी थंडगार बियरचे सेशन झाले. जेवणाच्या टेबलावर "छोले भटुरे आणी बिर्याणी", सजली होती.वाटले होते,मटण किंवा चिकन असेल.... भ्रमनिरास झाला.शेवटी,स्बिट डिश म्हणून  रसगुल्ला आला.पुन्हा मराठी मनाला धक्का लागला. मुलीला बोलून दाखवलं,"आज महाराष्ट्र दिन,पुरणपोळी, कटाची आमटी असा काही बेत असेल पण तू तर सगळेच परप्रांतीय पदार्थ बनवलेस".यावर बायको न बोलेल तर नवल, "तू नको लक्ष देऊस, सकाळ पासून हिच रट लावलीय, जणू यांच्यामुळेच  महाराष्ट्र राज्य  बनले आहे असे यांना वाटते."

दुपारचा चहा झाला,जरा उन उतरल्यावर घरी निघालो.सौ. म्हणाली, तीची एक जुनी मैत्रीण इथे जवळच रहाते. आपण जाऊ या का? मनात म्हणालो,"नेकी और पुछ पूछ."
संम्मती दर्शक मान हलवत गाडीतून जावई मुलीचा निरोप घेतला.

सौ.ची मैत्रीण व तीचे श्री दोघेही ओळखीचे, गप्पांचा फड जमला. मैत्रिणीचे श्री सोवळे असल्याने,टमाटो सूपवर समाधान मानावे लागले.नूडल,(तिखटशेवया), मांचूरियन (मैद्याचे किसलेली भाजी टाकून केलेले गोळे) आणी पनीर टिक्का ( डाळीचे पिठ चोपडून भाजलेले पनीर,कांदा आणी शिमला मिर्चीचे,एकमेकास घट्ट  बिलगून बसलेले तुकडे)असा परदेशीय मेन्यू, हद्द झाली. चायनीज मला आजिबात आवडत नाही.कसेबसे चार घास पोटात  ढकलले.पुडिंग म्हणून कदाचित  कुल्फी तरी येईल असे वाटले होते पण इथेही मराठी मन निराश,हताश झाले."बटरस्काॅच",आइस्क्रीमची प्लेट पुढे आली.

निरोप घेताना हसमुख चेहर्‍यावर झरझर वहाणारा आनंद चोपडला आणी जेवणाची मनसोक्त स्तुती केली.वहिनी तुमच्या हाताला काय मस्त चव आहे,हाटेल टाकले तर बाकिची बंद पडतील वगैरे वगैरे.......

"कोंबडं झाकून ठेवलं तरी सुर्य उगवायचा रहात नाही",या म्हणीप्रमाणे सत्य बाहेर पडले. हसून मैत्रीण म्हणाली,"आहो भावजी,मी काहीच बनवले नाही. सगळे यांनीच बनवले. आज "लेबर डे"ची सुट्टी आहे ना! म्हणाले तू काही करू नकोस मी बनवतो सगळे".

घरी पोहोचलो.दार उघडण्याचा आवाज  ऐकून शेजारच्या "शर्मा भाभी",बाहेर आल्या. भोजपुरी हेल काढत  म्हणाल्या,"कहां थे भाई आप सब, सुबहसे ढुंढ रही हूं.आज वो मराठी दिन है ना,मैने भाभीजी से पुरनपोली बनाना सिखी है वही ट्राय की है.आपको देनी थी,अब ठंडी हुयी है,गरम करके लाती हूं"  

बायकोने पुन्हा एकदा नाक मुरडले........

 

(घरी दारी सगळीकडेच परप्रांतीय,परदेशीय  पदार्थ,भाषा,उत्सव पोशाख,रितीरिवाज यांनी अतिक्रमण  केले आहे.)

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 106
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

वाह वाह!!एकदम खुसखुशीत लिहिले आहे.

आमच्याकडे महाराष्ट्रादिनानिमित्त साजुक नाजुक लाप्शी होती खास😇


In reply to by चामुंडराय

चित्रफिती मधील  प्रस्तुती बरोबर सहमतच. 

 

साधारण पन्नास वर्षापूर्वी सैन्यात  गेलो. तेव्हां बरोबरच्या साहकार्यानां महाराष्ट्र आणी त्यातही पुण्याचे खुपच अप्रूप होते. 

 

लहानपणी कुणाकडेही गेल्यावर आबंरस, (आता सगळे आमरस म्हणतात,खास रसाला लोकांनी आम करून टाकले आहे.) श्रीखंड, पुरणपोळी,शेवयाची खीर असे पक्वान्न असायचे. तांदुळजा,करडई अंबाडी,ढेमसे ,राजगीरा या भाज्या घराघरांतून बनायच्या. काळे वाल, बिरड्या ,हुलग्याचं माडग ,कुळीथाचं पिठलं सोबत भाकरी....पोळी सणवार असल्यास...

 

 तसेच कंटाळा आला म्हणून चकोल्या,शेंगुळी,मुगाची खिचडी, भाजणीचे थालीपीठ ,फोडणीची भाकरी ,फोडणीचा भात आणी ताक असे चमचमीत  पदार्थ असायचे. सोबत कैरीचे, मिर्ची,लिंबू यांचे घरी केलेले लोणचे असायचे. पापड,कुरडया, सांडगे.... 

 

रवा,पोहे,ड्राय फ्रुट फक्त दिवाळीत. खजूर एकादशीनिमित्त.....

 

फळांच्या नावाने शेजारच्या बागेतील   किंवां अवती भवती असलेल्या शेतात जाऊन डायरेक्ट झाडावरून तोडायचे. प्रसंगी शिव्या आणी मार ही खायला मिळायचा.

 

निव्वळ पौष्टिक आहार. 

 

फ्लॉवर,कोबी,बटाटे,ताबांटी  सणासुदीलाच दिसायची. 

बटर,पाव तर नावही घ्यायची सोय नव्हती.

गेले ते दिन गेले..... एवढंच म्हणेन.