Skip to main content

शटरस्पीड

लेखक सन्जोप राव यांनी शुक्रवार, 24/04/2026 07:12 या दिवशी प्रकाशित केले.

कित्येक वर्षांपूर्वी सुरू झालेल्या 'मायबोली', मनोगत’, 'ऐसी अक्षरे', 'मिसळपाव'  या संकेतस्थळांनी  कित्येक हौशी लेखकांना अभिव्यक्तीचे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.त्या काळात लोकांचा लेखनाचा धडाका मोठा होता आणि प्रतिसाद, प्रती- प्रतिसाद यांमुळे एकूण धामधूम असे. हिंदी चित्रपट या माझ्या आवडीच्या विषयावर त्या काळात मी बरेच लिहिले. हे लेखन रसग्रहाणात्मक- आस्वाद या वर्गात मोडणारे होते. पुढे या लेखनात भर घालून मी त्याचे पुस्तक केले आणि हे पुस्तक ‘न्यू एरा पब्लिशिंग हाऊस’ तर्फे ‘शटरस्पीड’या नावाने बाजारात आले आहे. या पुस्तकाला बाबू मोशाय यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतला हा निवडक भाग:

‘हवाहवासा वाटणारा ‘बावर्ची’ पाहावा आणि मन आनंदाने भरून यावे, असे म्हणताना लेखकाने ‘बावर्ची’चा खरा हिरो हरींद्रनाथ चट्टोपाध्याय हे आहेत, असा रास्त उल्लेख केला आहे. ‘बावर्ची’च्या निमित्ताने मला एक गोष्ट आठवली. एकतर हरींद्रनाथ हे प्रसिद्ध आंग्ल भाषेतील कवी होते आणि सरोजिनी नायडू यांचे ते धाकटे बंधू होते. ‘बावर्ची’च्या सेटवर अमिताभ यायचा, तो जया भादुरीला भेटण्यासाठी. तेव्हाचा सुपरस्टार राजेश खन्ना अमिताभची चेष्टा करायचा.राजेशला सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स होता आणि एकदा तर तो अमिताभला ‘मनहूस’ असेही म्हणाला होता. सेटवर जया भादुरी अस्तित्वात नाही, अशा थाटात तो तिची उपेक्षा करायचा. या सर्व गोष्टी मनासमोरून तरळून गेल्या...

‘चष्मेबद्दूर या सई परांजपेच्या चित्रपटाचे वर्णन लेखकाने ‘स्वच्छ निर्भेळ कॉमेडी’ या शब्दांत केले आहे. ‘सुना है इश्क में लोगों को हो जाता है धोका, यहाँ इश्क तो कोई और कर रहा है, धोका हमें हो रहा है’ यासारखे चटपटीत संवाद दाद देण्यासारखे आहेत, असे लेखकाने नेमकेपणाने नमूद केले आहे. ‘चष्मेबद्दूर’ हा फारुख शेख आणि दीप्ती नवल यांचा पहिला चित्रपट.त्यानंतर साथ साथ, कथा, किसीसे ना कहना, रंगबिरंगी, फासले असे चित्रपट त्यांनी केले. ‘लिसन अमाया...’हा या दोघांचा अखेरचा चित्रपट. डेव्हिड धवनने याचा रिमेक केला आहे, तो मात्र सुमार होता. गंमत म्हणजे, डेव्हिड, रवी वासवानी आणि राकेश बेदी हे ‘चष्मेबद्दूर’ आला, तेव्हा रूममेट होते!

लेखकाने ‘बेनाम’ या चित्रपटाबद्दल लिहिले, हे बरे झाले. माझादेखील हा आवडता चित्रपट आहे. ‘या चित्रपटात अमिताभ कमालीचा उमदा आणि रूबाबदार दिसतो. तणावाखाली असताना भसाभसा सिगरेट ओढणे आणि पार्टीत दोस्तांबरोबर ‘लेट अस बूझ’ म्हणून प्यायला पळणे त्याला तुमच्या-आमच्यातला माणूस करते’ असे अचूक भाष्य लेखकाने केले आहे. ‘बेनाम’च्या पटकथाकांरांमध्ये जयंत धर्माधिकारी यांचेही नाव होते. ते माझे स्नेही होते.त्याकाळी निघणाऱ्या ‘दिनांक’ या साप्ताहिकाचे ते प्रकाशकही होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्या समाजवादी निकटवर्तीयांपैकी जयंत हे एक. अमिताभने मौशमी चटर्जीबरोबर‘बेनाम’ आणि ‘मंझिल’ हे दोनच चित्रपट केले. त्यानंतर मौशमीला अमिताभने आपल्या करियरमधून कटच केले. आजकाल मौशमी अमिताभवर टीका करते. त्याने आपल्या कारकिर्दीचे नुकसान केले, असे बिनधास्तपणे सांगते.

लेखकाने आपल्या पुस्तकात सेहर, खोसला का घोसला, हनीमून ट्रॅव्हल्स, बधाई हो, हॅप्पी भाग जाएगी, विकी डोनर, बरेली की बर्फी,ब्लॅक, सॅम बहादूर अशा गेल्या काही वर्षांतील चित्रपटांबद्दलसुद्धा मनापासून लिहिले आहे. समीक्षणासाठी त्यांनी केलेल्या चित्रपटांची निवड उत्कृष्ट आहे. त्यांच्या चित्रपटप्रेमाबद्दल तर शंकाच नाही. त्यांची अभिरुचीही अतिशय संपन्न असल्याचे जाणवते. ‘बेमिसाल’ या चित्रपटाबद्दल लिहिताना, लेखकाने वेगळी निरीक्षणे नोंदवली आहेत. संवादलेखक डॉ. राही मासूम रझा यांच्या संवादात मुघलांचे कौतुक करणारे तुकडे आहेत. काश्मीर हे हिल स्टेशन आहे, हे मुघलांनी शोधून काढले होते, ही माहिती चित्रपटातील सुधीरला प्रशांत देतो. ‘मुघलों का तो जवाब ही नहीं. उनका म्युझिक देखिए, पेंटिंग देखिए, आर्किटेक्चर देखिए’, असे कविता म्हणते आणि ‘मुघलांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, मुघलाई खाना’, असे सुधीर म्हणतो. मुघलांची ही स्तुती त्याकाळात कोणालाही खटकली नव्हती. ज्या-त्या गोष्टीने लोकांच्या भावना दुखावल्या जात नव्हत्या, असे स्पष्ट प्रतिपादन लेखकाने केले आहे. त्यांची ही धिटाई कौतुकास्पद.‘बेमिसाल’मध्ये आरंभी रेखा ही अमिताभची नायिका होणार होती. परंतु अमिताभने तिच्याबरोबरचा रोमँटिक अध्याय संपल्यानंतर तिच्या समवेतचे चित्रपट साइन करणे थांबवले होते. त्यामुळे रेखाच्या जागी राखी आली. ‘बेमिसाल’मधून डॅनी बाहेर पडला आणि त्याजागी विनोद मेहरा आला, हे मला नक्की ठाऊक आहे.

‘कहानी’ चित्रपटाबद्दल लिहिताना,‘गोरिला फिल्म मेकिंग तंत्राचा वापर करून बहुतेकवेळा नैसर्गिक प्रकाशात ६४ दिवासंत शूटिंग पूर्ण केले गेले. ‘उंच आवाजात ‘उलू ध्वनी’ करणाऱ्या हजारो बंगाली स्त्रियांचा चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या वेळी केलेला वापर बघताना अंगावर काटा येतो’ असे उत्तम भाष्य लेखकाने केले आहे. लेखकाला सिनेमाची प्रचंड आवड आहे आणि त्याचबरोबर गाण्याची. आवडलेल्या चित्रपटाच्या गीत-संगीतावरसुद्धा मनापासून ते व्यक्त झाले आहेत. अगदी साध्या-सोप्या अनलंकृत भाषेत लेखक लिहितो. चित्रपटाची गोष्ट कथन करण्याची त्यांची शैलीही इंटरेस्टिंग आहे. चित्रपटाच्या आवडलेल्या आणि न आवडलेल्या गोष्टींवर ते थेटपणे भाष्य करतात.

‘बरेली की बर्फी’वर लिहिताना, हा चित्रपट ‘इन्ग्रेडियंट्स ऑफ लव्ह’ या चित्रपटावर काहीसा आधारलेला आहे, अशी वेगळी माहिती ते देतात. ‘लुडो’ या चित्रपटाबद्दल लिहिताना, ‘अभिषेक बच्चनचे डोळे अद्यापि पूर्वीसारखेच भावदर्शी असले, तरी आता तो जून आणि सुजट वाटतो. राग, घृणा या सगळ्या भावना दाखवण्यासाठी तो दोन्ही ओठांच्या कडा खाली खेचून डोळे वटारणे, एवढा एकच मुद्राभिनय करतो’ अशी सूक्ष्म टीकादेखील लेखकाने केली आहे.

हे पुस्तक वाचनीय आणि रोचक आहे. ते वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. आजकाल चित्रपटाची सविस्तर समीक्षा देण्यासाठी वृत्तपत्रांत तेवढी जागा नसते. काहीतरी परिचयवजा लिहिले जाते. मनात शिल्लक राहिलेले चित्रपट इतरांनीही पाहावेत, ही लेखकाची इच्छा व तळमळ आहे. लेखकाने आवडलेल्या चित्रपटांवर आणखीही पुस्तके जरूर लिहावीत. वाचक ती शटरस्पीडच्या गतीने वाचतील!

हे पुस्तक आता खालील ठिकाणी उपलब्ध आहे. 

 


 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 175
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

‘शटरस्पीड’ बद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. खरं तर, तुमचं कथा आणि इतर लेखनाचं पुस्तक फार पूर्वीच यायला पाहिजे होतं.

बाय द वे, पुस्तक खरेदी करेनच. पुन्हा एकदा अभिनंदन. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर, हे माझे सातवे पुस्तक आहे. तुमच्या शुभेच्छा पाठीशी असल्याने पहिल्याच पुस्तकाला राज्य पारितोषिक पण मिळाले आहे. 'शास्त्रकाट्याची कसोटी' आणि 'जुने जाऊ द्या मरणालागुनि' हे विज्ञानकथासंग्रह, 'डूडल्स' हा ललितलेखांचा संग्रह, 'जी ए: समजले तेवढे, समजले तसे' आणि 'जी एंच्या तीस कथा: अनुभूती आणि आस्वाद' ही दोन पुस्तके आणि 'चिपटंमापटं' हा ग्रामीण कथांचा संग्रह एवढी आजवरची कमाई आहे. धन्यवाद.      


In reply to by सन्जोप राव

क्या बात है सरजी ग्रेट. 

 

-दिलीप बिरुटे

 

 


अभिनंदन.. प्रस्तावना उत्तम. पुस्तक देखील उत्तमच असणार यात काहीच शंका नाही.

 

पुस्तक फक्त पेपरबॅक रूपात आहे की किंडल फॉरमॅट देखील देणार आहात ? किंडल देखील खूप चांगली वाचक संख्या आणि प्रसार करते असा अनुभव. छापीलपेक्षा जास्त.


अभिनंदन संजोपराव!

गविचा किंडलबद्दलचा प्रश्न माझाही आहे. 

- (किंडलप्रेमी) सोकाजी


In reply to by सोत्रि

धन्यवाद. किंडल बाबत प्रकाशकाशी बोलतो.