मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अवकाळी

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:

कंच हिरव्या, ओलेत्या
ओळी तुझ्या पावसाळी
गारपीट उंबऱ्याशी
शिवारात अवकाळी

सांग कशी पावसाची
मला पडावी रे भूल?
चंद्रमौळी घरातली
कशी पेटणार चूल?

तुझ्यासाठी आभाळीचा
थेंब शिंपलीत मोती
माझ्या पापणीत पूर
उभ्या पिकाची रे माती

लेखणीला फुटो तुझ्या
इंद्रधनूचा धुमारा
झुंजण्यास अस्मानीशी
तेवढाच मला थारा


वाचन 64 प्रतिक्रिया 3
Permalink

शेवटचे कडवे अस्थानी वाटले (तसंही मला पद्यात गती नाही)!

- (गद्य) सोकाजी

Permalink

वाह .... सुंदर ... चित्रदर्शी !
पावसाची वाट पाहणारा बळीराजा आणि कवि.... साधी सोपी रचना, आशय ही समर्पक !

शेवटचे कडवे विशेष आवडले.