मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेवटचा तुकडा..

गवि · · जनातलं, मनातलं
जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.  पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?  लोकांना काही अंदाज येणं शक्य नव्हतं. आणि मुळात तसं जाणून घेण्याची इच्छा लोकांना व्हावी इतपत गॉसिप पोटेन्शियल पण आता जतिनच्यात उरलं नव्हतं.  बायको आणि पोरांपासून वेगळा राहायला लागूनसुद्धा काही महिने उलटले होते.  म्हणजे बायकोच पोरांना घेऊन घर सोडून गेली होती. पण त्यानंतरच्या काळात एखाद्या दुसऱ्या स्त्रीचं त्याच्या घरी येणं जाणं किंवा अन्य काही प्रकरणे असं काही काही दिसत नसल्याने लोकांना तरी त्याच्या स्टोरीत का रस असावा ? तो त्याच जुन्या बिल्डिंगच्या जुन्या फ्लॅटमध्ये रहात होता.  याच तीन खोल्यांत एकेकाळी त्याच्या आईचा आवाज भरून राहिलेला असायचा. सकाळपासून रात्रीपर्यंत. आता ना तिच्या त्या जुनाट रेडिओची खरखर, ना तिच्या पदराला येणारा दुधातुपाचा वास, ना तिचा घोगरा आवाज. तिची किरमिजी शाल अजूनही तिच्या खुर्चीवर तशीच टांगलेली होती.  ती शेवटचे काही श्वास पुरवून पुरवून बोलताना ती म्हणाली होती, “माझं शेवटचं कर्तव्य मी पूर्ण केलं. मी तुझा संसार पुन्हा उभा केला.” जतिनने मान हलवली होती. त्या वाक्याचे प्रतिध्वनी आपलं पुढचं आयुष्य व्यापून राहतील किंवा खरं तर रिकामं करत जातील याची भयंकर जाणीव त्याला त्या वेळी होणं शक्य नव्हतं.   जतिनची आई आणि जतिन.  जतिनचे बाबा त्याला आठवत नाहीत.  तो एक दीड वर्षांचा असतानाच त्यांनी एक्झिट घेतली होती.  अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही.  तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो.  कायमचे बरे होणारे जे एक दोघे असतात त्या नशीबवान लोकांपैकी जतिनचे बाबा नव्हते.  मुळात जतिन हा त्यांना लग्नानंतर पंधरा वर्षांनी झाला.  आणि लगेचच वर्षभरात जतिन आणि आई यांच्यावरचं बाबांचं सावट सुटलं.  ईश्वराचे त्यासाठी कोणीच आभार मानले नाहीत पण ईश्वर निरिच्छ बुद्धीने काही गोष्टी करत असावा. तर अशा रीतीने आई जतिनच्या अगदी लहानपणीच विधवा झाली. जतिन आणि ती, दोघे एकमेकांना धरून राहिले. जगले.  आईसाठी ते वैधव्य म्हणजे मोकळा श्वास होता.  तिने मिळेल ती नोकरी करून, तिथेच चिकटून राहून घर चालवलं.  जतिनने आईच्या सावलीत मोठं होत होत बऱ्यापैकी नोकरी लागेल इतपत शिक्षण घेतलं.  अगदी सावधपणे आणि मोजून मापून आपल्या आयुष्याची आखणी केली.  व्यसनांच्या मागेही तो याचमुळे गेला नाही.  कुठेही सैल होणं त्याच्यासाठी अशक्य होतं.  अर्थात त्याला त्यामुळे आपल्या बाबांच्या वाटेवर जावं लागलं नाही हेही खरंच. तर.. अशा जतिनचं लव्ह मॅरेज होणं अशक्य नसलं तरी कठीणच होतं.  आईने तीन चार मुली नीट, रीतसर बघून जातीतली आणि दिसायला छानशी मुलगी त्याच्यासाठी पसंत केली.  जतिनने हो म्हटलं.  एक मोठ्ठा निर्णय घेण्याचा ताण त्याच्यावर येणं टळलं होतं.  आई आहे ना? ती करेल सगळं नीट. वीणा घरात आली. रुळली.  पण जतिन आणि त्याची आई यांच्यात जी घट्ट वीण होती ती तिला अस्वस्थ करायची.  तिलाही स्वतःचं नवीन आयुष्य सुरू करायचं होतं.  पण जतिन आणि आई या दोघांच्याही जगण्याला आधीच घट्ट पीळ बसले होते.  अगदी भांडी कशी लावावीत इथपासून ते कपड्यांच्या घड्या कशा टोकाला टोक जुळवून असाव्यात, इथपर्यंत अगदी बारीकसारीक गोष्टींवर फक्त वादच व्हायचे.  बारीकसारीक गोष्टी याच संसारात सर्वात मोठ्या असतात हे आईला लक्षात आलं नसावं.  जतिनला ते कळण्याचा प्रश्नच नव्हता.  त्यामुळे वीणाला काही आशाच उरली नाही.  पती पत्नी यांच्यातलं बायोलॉजिकल नातंसुद्धा या वातावरणात फुलणं शक्य होईना.  बाहेरून कितीही छान दिसत असलं तरी चार भिंतींच्या आत काय घडतं हे बाहेर कोणालाच दिसत नाही.  भिंतींना कान नसतात.  भिंतींना तोंड नसतं.  मुख्य म्हणजे हात नसतात.  त्या कशाच्याही मधे पडत नाहीत.  भिंतींना मन देखील नसतं. भिंती फक्त प्रायव्हसी पुरवतात. घरात ताण कायमचा वस्तीला आलेला होता.  पेईंग गेस्ट किमान काहीतरी रक्कम देऊन घरात राहतो. पण हा ताण घरात राहून सर्व काही घेणारा होता.  एकदा बिनसलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टीत देखील विष मुरतं.   वीणा नवीन पिढीची होती.  कुचमत राहणारी नव्हती.  मूलबाळ होऊन या चक्रात आणखीच फसण्याआधी तिने स्पष्ट शब्दात मोकळीक मागितली.  प्रत्यक्ष कायदेशीर प्रोसिजरची वाट न पाहता ती आपल्या घरी निघून गेली.  तिच्या घरानेही तिला परत कुशीत घेतलं.  सुटली.  पुढे यथावकाश सगळं कायदेशीर केलं गेलं.  शिक्के मिळाले.  देणं घेणं काही नाही. जतिनच्या आईला मात्र हे खोल घावासारखं लागलं.  आपल्यामुळे मुलगा एकाकी पडला.  त्याचं घर मोडलं.  आपण मेलो की तो एकटाच राहणार.  त्याचं सगळं कोण पाहणार? हा एकच विचार तिला तिच्या आत बसून दिवसरात्र कुरतडत बसला.  खूप वर्षं गेली.  आईने खूप ठिकाणी शब्द टाकला, खूप ठिकाणी पदर पसरला.  पण एकदा मोडलेल्या संसाराचा शाप खूप वर्षं टिकतो.  त्यातून नात्यागोत्यात नाट्यमय कथा पसरल्या होत्या.  त्यात जतिन पण बापाच्या वळणावर जाऊन व्यसनी बनला होता.  बायकोला त्याने सिगारेटचे चटके दिले होते.  तो नपुंसक होता.  आणि जे काही चमचमीत चटकदार वाटेल ते. अशात पुन्हा लग्न होणं.. आणि तेही प्रथमवधूशी.. अवघडच होतं. तरीही आईने खूप टाचा झिजवल्या.  ऑनलाईन वगैरेही सगळं शिकून घेतलं.  कारण जतिन तसाही पूर्ण नीरस झाला होता.  ऑफिसात जाणं आणि घरी येऊन जेवून टीव्ही मोठ्या आवाजात लावून झोपणं इतकंच तो करत होता.   आईचं शरीर झिजत होतं.  जतिन तिला खूप उशिराने झाला होता त्यामुळे त्याला आईचं छत्र इतर मुलांपेक्षा कमीच मिळणार आहे ही नियतीची लिहिलेली ओळ होती.  आईकडे वेळ कमी उरला होता. शेवटी एकदाची आईला मेघा सापडली.  खूप वर्षांपूर्वी तिचाही घटस्फोट झालेला.  नाममात्र घटस्फोटित असं वर्णन जाहिरातीत होतं.  लग्नानंतर सहाच महिन्यांत ते वेगळे झाले होते. त्यानंतर तिच्या जखमा भरायला इतकी वर्षं लागली होती.  तिलाही अशीच कोणीतरी एक आई होती.  दोन्ही आयांनी आपले थरथरते हात एकमेकींच्या हातात घेऊन हे लग्न ठरवून टाकलं. लग्न झालं आणि त्या लग्नात स्टेजवर आईच्या चेहऱ्यावर नाचायला खूप वर्षांनी आनंद हजर झाला.  ती सर्वांना सांगत होती.  माझी ड्यूटी मी केली.  जतिनचं पुन्हा लग्न लावलं.  तिने मंगलाष्टकात पण तसे शब्द जुळवले होते.  जतिन ऐकत होता. त्याने आंतरपाट दूर झाल्यावर समोरच्या मुलीच्या गळ्यात माळ घातली.  त्याचे डोळे भरून आले होते. लग्नाच्या आनंदाने नाही. आईबद्दलच्या कृतज्ञतेने.   जतिन आणि मेघा यांचा संसार सुखाचा आणि फळणारा फुलणारा व्हावा, आणि लोकांना तो तसा दिसावा, ही आईची पुढची ड्यूटी होती.  जतिनबद्दलच्या सगळीकडे पसरलेल्या कुचाळक्यांना यातून परस्पर उत्तर जाणार होतं. आईचं शरीर आता मात्र शेवट जवळ आल्याच्या खुणा दाखवत होतं.  शरीराचा सापळा झाला होता.  पोटच्या पोराची जगातली प्रतिमा स्वच्छ करणं हे मरण्यापूर्वीचं उरलेलं एकमेव कर्तव्य होतं. जतिनला लग्नानंतर पहिल्याच वर्षात बाप होण्याची चाहूल लागली.  नऊ महिन्यांनी नॉर्मल डिलीव्हरी होऊन कबीर जन्माला आला.  आईला खूप आनंद झाला.  आयुष्यातले सर्व कष्ट आणि ताप पीडा ती विसरून गेली. नातवाशी खेळण्यात आणि त्याची दुपटी बदलण्यात तिच्या हडकुळ्या कुडीने चक्क उभारी धरली. मधे दीडच वर्ष गेलं आणि मीरा जन्माला आली.  एक मुलगा, एक मुलगी.  तीही जतिनसारख्या स्थितप्रज्ञ मुलाला.  आईला तिच्या आयुष्यावरचं सगळंच ग्रहण सुटल्यासारखं वाटलं.   साठलेली, दाबलेली वाफ एकदम सुटावी तसं झालं आणि तिचं शरीर एकदम निवृत्त झाल्यासारखं वागायला लागलं.  तिने पूर्णवेळ अंथरूण धरलं.  फार वेळ न घालवता शेवटचा आठवडा जवळच्या आशा नर्सिंग होममध्ये काढून एक दिवस ती विझली.  जाता जाता जतिनचा हात हातात घेऊन थोपटत आई त्याला पुन्हा शेवटचं म्हणाली,"मी माझं शेवटचं कर्तव्य केलं. तुझा संसार पुन्हा उभा करून दिला.  स्वतःला सांभाळ." डेथ सर्टिफिकेट मिळालं.  आसपासचे चार लोक आईच्या पुण्याईवर स्मशानापर्यंत आले.  जतिनने न रडता भेकता विधी पार पाडले. जो कोणी भटजी सोसायटीतल्या लोकांनी पकडून आणला होता, तो जसं सांगेल तसं जतिन करत गेला.  नंतर घरी येऊन झोपला.  मेघा रात्रभर जागी होती. एरवी शांतच असलेला जतिन त्यानंतर गडद शांत झाला. काळ्याशार डोहाची खोली मोजणं कठीणच.  मेघाने ते करण्याचा नाद सोडला आणि दोन लहान मुलांना मोठं करत जगत राहिली. मेघा आणि दोन्ही मुलांनी शांततेची सवय करून घेतली. जतिन कधी त्यांच्यावर रागावला नाही, कधी ओरडला नाही.   घरात त्याचं अस्तित्व म्हणजे.. एक सोफा, तीन खुर्च्या, एक टीव्ही, एक फ्रीज आणि एक जतिन.  स्थिर, निर्विकार. मुलं आजारी पडली तरी तो विचलित व्हायचा नाही.  छोट्या मीराकडे तो बघायचा देखील नाही, तर जवळ घेणं किंवा बोलणं फारच दूर. मेघाच्या बाबतीत पण तो अगदी थंड आणि अलिप्त झाला होता. दोन मुलं पदरात असल्याचं ओझं म्हणा किंवा लग्नाच्या गाठींतल्या दोन वाढीव निरगाठी म्हणा.. मेघाने काडीमोड मागितला नाही.  पण एका दुपारी जतिन ऑफिसात गेलेला असताना दोन्ही मुलांना घेऊन ती आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी राहायला गेली.  मोठी बहीणसुद्धा घटस्फोटित होती.  मेघा स्वतः पूर्वाश्रमीची घटस्फोटित, तिची बहीण तशीच.. म्हणजे एकूण पिढीलाच काहीतरी शाप असावा. अर्थातच आता हे दुसरं लग्न कायदेशीररित्या आणि जाहीररित्या मोडू नये याचं आणखी एक वेगळं प्रेशर मेघावर होतंच.  जतिनच्या घरात राहणं हे असह्य एकाकीपणाचं होतं, म्हणून केवळ आधाराला ती तिच्या ताईकडे आली होती. जतिन तिला परत न्यायला आला नाही.  कशी आहेस, कुठे आहेस हेही त्याने विचारलं नाही तर? या भीतीपायी मेघानेच घर सोडताना डायनिंग टेबलवर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.  जतिन रात्री घरी आला.  चिठ्ठी वाचली, घडी घालून ठेवली आणि स्वतःसाठी खिचडीचा कुकर लावून घेतला.  मग झोपून गेला. दिवस जात राहिले.  जतिनचे काही फारसे हाल झाले नाहीत.  कारण तो स्वतःपुरता स्वैपाक करायला पूर्वीच शिकला होता.  कपड्यांना इस्त्री करायला त्याला सहज जमत होतं.  झोपण्याची खोली आणि किचन, या दोन नेहमी लागणाऱ्या खोल्या तेवढ्याच तो रोज झाडून देखील काढत असे.  त्याला बाकी कशाची गरज नव्हती.  साचेबद्ध आयुष्य चालू राहिलं. तिकडे मेघा दर वाढत्या दिवसानिशी आणखी आणखी अस्वस्थ होत होती.  वाट बघणं सुटत नव्हतं.  असेच सहा महिने गेले.  ती न राहवून एक दोन वेळा दुपारी जतिन घरात नसताना तिच्या किल्लीने घर उघडून तिथे जाऊन आली.  तिच्यावाचून घराची अवस्था फार वाईट असेल असं तिला वाटत होतं.  पण सर्व ठीक आणि जागच्याजागी दिसत होतं. प्रत्येक वेळेला बधीर मनाने ती परत आली.  जतिन आलाच नाही. एक दिवस कबीरला फणफणून ताप आला.  वाढता वाढता संध्याकाळी तो एकशे पाच अंशांवर पोचला. थर्मामीटर बघून मेघाचा थरकाप झाला.  तिने कापत्या हातांनी जतिनला मेसेज केला, ताबडतोब लीनाकडे या.  कबीरला खूप ताप आहे. मला काही सुचत नाहीये.  त्याला कुठे घेऊन जाऊ? हॉस्पिटलमधे जायचं का? जतिनने तिचा मेसेज वाचला नाही.  कारण त्याने फोनचा स्क्रीन पहिलाच नाही.  फोन सायलेंट मोडवर असायचा. तो तसाच होता.  जतिन घरी आला.  ऑमलेट ब्रेड खाऊन, दूध पिऊन झोपला. जतिन ऑफिसात कामाच्या बाबतीत मात्र अगदी नियमित होता.  परफॉर्मन्स उत्तम.  अचूक, नम्र वगैरे.   लोक त्याला आईस क्यूब म्हणायचे.  कूल. कूल आणि कोल्ड हे त्यांच्या नजरेतून एकच होतं. रात्री कधी कधी घरी परत येताना कारची दिशा वळवून तो आशा नर्सिंग होमसमोर जाऊन थांबायचा. तो आत मात्र कधीच गेला नाही.  तो फक्त त्या निळ्या कॉरिडॉरच्या लाईट्सकडे बघायचा, थबकायचा आणि पुढे जायचा. जणू काही तो निळसर प्रकाश अजूनही आईचा जीव धरून थांबला होता.  त्या प्रकाशाच्या हलण्यात त्याला श्वासाची लय जाणवायची. आईची किरमिजी शाल अजूनही तिच्या खुर्चीवर तशीच होती. त्या खुर्चीतून आई उठून आशा नर्सिंग होममध्ये जायला अँब्युलन्समध्ये आडवी झाली त्या दिवसापासून जशी होती तशी. अगदी एकदाही स्पर्श न केलेली. एका दुपारी, ऑफिसची एचआरतर्फे नेमणूक झालेली कौन्सिलर प्रिया त्याच्या डेस्कजवळ आली. ती आठवड्यातून एकदा व्हिजिट करायची.  एम ए सायकॉलॉजी. “मी थेरपीसाठी नाही आले,” ती म्हणाली, “फक्त विचारायला, आर यू ओके? आर यू ऑलराईट?” “मी.. ऑल ओके. ठीकच आहे,” तो शांत स्वरात पण आतून अस्वस्थ होत, चुळबुळ कंट्रोल करत म्हणाला. “सर्व ठीक आहे, की फक्त तुला आता सवय झाली आहे?”, तिने किंचित हसून विचारलं. तो थोडा वेळ शांत राहिला. “कधी कधी माणूस आपलं टार्गेट संपल्यावर जगणं थांबवतो”, तो अचानक म्हणाला. ती उत्तरली, “कधी कधी थांबणं म्हणजे खरंच थांबणं नसतं.  आपण पुन्हा सुरू करायला विसरतो, इतकंच असतं.” "मी सेटल्ड आहे, माझ्या आईचं टार्गेट हेच होतं. आता मी त्यात काय करू आणखी?", जतिन बोलून गेला आणि एकदम थांबला. तिनं त्याला खांद्यावर किंचित थोपटलं, “जतिन, दुसऱ्या कोणाचं टार्गेट पूर्ण झालं म्हणजे आपलं जगणं थांबत नाही. आपण कोणाचं टार्गेट नसतो. हवं तर कधीतरी ये. बोलूया.  तुला वाटलं की. माझं कार्ड ठेवते.  क्लिनिकवर आलास तरी चालेल." तो अस्वस्थ झाला. तात्पुरतं ओके म्हणाला.  त्यामुळे तिचा हात खांद्यावरून हटला.  जतिनला सुटल्यासारखं झालं. ती गेली.  त्याने कार्ड वॉलेटमध्ये ठेवलं. अशाच एका मधल्याच वारी मेघाने त्याला फोन केला.  आणि मुख्य म्हणजे फोन सायलेंट मोडवर असूनही टेबलवर पेटलेला स्क्रीन जतिनला दिसला.  त्याने फोन उचलला देखील. पलीकडून ती म्हणाली की कबीरच्या शाळेकडून एक फॉर्म आलाय.  आम्ही तो भरून प्रिंट केलाय.  पण त्यावर दोन्ही पालकांची सही हवी आहे. त्या दिवशी कसा कोण जाणे ऑफिसातून परतीच्या वाटेवर त्याने स्टिअरिंग व्हील वळवलं आणि लीनाच्या घराकडे, मेघा आणि मुलांकडे, गेला. कबीरने दरवाजा उघडला.  बाबांना बघून नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे त्याला कळेना. तो बऱ्याच दिवसांनी मुलांना बघत होता.   तो आत आल्यावर लगेच कबीरने फॉर्म पुढे केला. जतिनने तो नीट वाचला, सही केली. मग विचारलं, “आणखी काही हवं का?” मेघा फक्त बघत राहिली. तेवढ्यात छोटी मीरा म्हणाली, “बाबा, हे बघा ना, माझं पझल जमत नाहीये” तो तिच्या जवळ जाऊन बसला. मन एकाग्र करून जिग सॉ पझलच्या तुकड्यांच्या ढिगातून एकेक तुकडा काढून तपासत राहिला.  अनेक कोड्यांचे तुकडे मिसळले गेले होते.  त्यामुळे सोडवणूक आणखीच गुंतागुंतीची झाली होती.  मीराने बाकीचं चित्र जवळपास जुळवत आणलं होतं. पण समुद्राचा एक मधलाच तुकडा सापडत नव्हता. शेवटी त्याला तो हरवलेला तुकडा सापडला आणि त्याने तो मीराच्या हातात दिला.. “आता समुद्र पूर्ण होईल.. मी लावू तिथे हा पीस?,की तुम्ही लावता? तुम्हाला सापडला ना तो.. ”, ती म्हणाली. “तो शेवटचा तुकडा तू खिशात ठेव,” तो म्हणाला, “म्हणजे समुद्र वाट बघेल.”, तो किंचित हसला. मेघा दचकली , मीरा हसली. मग मेघासुद्धा काही न बोलता थोडीशी हसली.  पहिल्यांदा बऱ्याच वर्षांनी. त्या रात्री तो घरी आला.  प्रियाने दिलेलं कार्ड काढून बघितलं.  लगेच फोन केला नाही.  पण त्या रात्री तो दिवे न विझवता झोपला.  थोडा अस्वस्थ होता.  हे काहीतरी वेगळं होत होतं.  सुरुवात करण्याची आठवण झाल्यासारखं.. दोन तीन दिवसांनी ऑफिसमध्ये कोणीतरी प्रेझेंटेशन करताना प्रोजेक्टर बंद पडला. सर्वजण त्रासले. आळीपाळीने रिमोटची बटणं दाबायला लागले.  रिमोटला थपडा मारायला लागले.  जतिन उठला. सगळे बघतच राहिले. तो असा कधीच कामाच्या चर्चेखेरीज कशात मधे पडत नसे. जतिन वाकून चक्क टेबलाखाली शिरला आणि वायर पकडत पकडत तिच्या मुळाशी गेला.  ती सॉकेटमधून थोडी बाहेर येऊन लूज कनेक्शन झालं होतं.  त्याने वायर मुठीत धरून प्लग आत घट्ट दाबला.  इकडे प्रोजेक्टरचा स्क्रीन उजळला. मीटिंग रुममधले सगळे लोक हसले. कुणीतरी टाळी दिली. कोणी शिट्टी मारली. जतिन शर्ट झटकत पुन्हा उभा राहिला आणि हलकेच हसला. त्या संध्याकाळी त्याने प्रियाला फोन केला. तीन सेशन्स झाल्यावर चौथ्या वेळी प्रियाने त्याला फक्त एकच प्रश्न विचारला. “तुझ्या आईची शाल अजून तशीच आहे?” “हो.” “कधी हातात घेतोस का?” “नाही.” “या आठवड्यात एकदा घे. पाच मिनिटं फक्त. तसाच बसून राहा. काही जाणवलं किंवा नाही जाणवलं तरी चालेल. एवढं करून मला सांग.” त्याने केलं. पहिल्या मिनिटाला काही नाही. दुसऱ्या मिनिटात थोडी अस्वस्थता, तिसऱ्या मिनिटाला थोडी चीड.. नशिबाची चीड.  मग एकदम जीवघेणं रडू येईल अशी भीती.. त्याला पाच मिनिटं पूर्ण करता आली नाहीत. त्याला आठवलं, आई नेहमी शाल त्रिकोणात दुमडायची.  कोपऱ्याला कोपरा अचूक जुळवून. त्याने दीर्घ श्वास घेतला. अचूक घडी घालून शाल परत खुर्चीत ठेवली. मग बाथरूममध्ये जाऊन त्याने हात धुतले. काहीतरी बदललं होतं.  फार सूक्ष्म, पण खरं. दुसऱ्या दिवशी त्याने सोसायटीतल्या नोटिसबोर्डचा निखळलेला सैल स्क्रू घट्ट पिळून दिला.  आणि वॉचमनच्या मुलाला कॉलेजचा फॉर्म भरून दिला. मग एक दिवस कबीरला शाळेतून सायन्स प्रोजेक्ट आला. लाईटहाऊस बनवायचं आहे. तो रजा टाकून लीनाच्या घरी गेला. कबीरसोबत तो कामात बुडाला. त्याने लाईट हाऊसच्या आत एक छोटा बल्ब लावला.  दर दोन सेकंदांनी चालू बंद होणारं एक सर्किट जोडलं.  दिवा ब्लिंक व्हायला लागला. “हा बघ आई लाईट परत परत जातो येतो,” कबीर मेघाला सांगत होता. मेघाने जतिनला चहा दिला. “मी परत अगदी पूर्वीसारखा होऊ शकत नाही.  खरं तर पूर्वीही मी असाच होतो.  तो लाईट मधेच येत जात होता.,” तो म्हणाला. “पूर्वीसारखं नको मला.", ती म्हणाली, “आताचं आहे हे पुरेसं आहे.” त्याने मान डोलावली. थेरपीत प्रिया कधीच जास्त बोलत नाही. ती म्हणते, “दुःख संपत नाही, पण त्यामुळे आपण स्वतः फर्निचर व्हायचं नाही.  दुःखाला फर्निचर बनवायचं. कुठल्या खुर्चीत कधी बसायचं ते ठरवायला शिकायचं.” त्याने हल्लीच एकदा आशा नर्सिंग होमसमोर शेवटच्यांदा कार थांबवली. पण या वेळी मात्र तो आत गेला. कॉरिडॉरच्या काचेवर हात ठेवून हळू आवाजात म्हणाला, “आई, शाल आता ड्रॉवरमध्ये ठेवलीय.” घरी येऊन त्याने मेघाला फोन लावला. मग फोन छोट्या मीराकडे द्यायला सांगितलं. "ए, तू तो शेवटचा तुकडा लावलास का पझलमधे?" "नाही लावला. तुम्ही म्हणालात ना लपवून ठेव म्हणून." "लावून टाक आता तो.. समुद्र त्यासाठी थांबणार नाही.." "काय?" "अगं बेटू.. लावून टाक तो तुकडा.. असं म्हटलं मी." त्याने फोन ठेवून दिला. सगळं संपलं नाहीये.  सगळं थांबलं नाहीये.  आणि तेवढं पुरेसं आहे.

वाचने 2083 वाचनखूण प्रतिक्रिया 24

कांदा लिंबू गुरुवार, 03/12/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव गुरुवार, 03/12/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

सुक्या गुरुवार, 03/12/2026 - 23:50
वा. वा. ओघवते विचार करायला लावणारे ... असेच लिहिते रहा ...

प्रचेतस Fri, 03/13/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:34
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:35
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि Fri, 03/13/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री Sat, 03/14/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ Sat, 03/14/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा Mon, 03/16/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.