Skip to main content

आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !

लेखक kvponkshe यांनी गुरुवार, 05/02/2026 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
सायबर सेक्युरिटी मध्ये मी आणि माझ्या वयाचे म्हणजे ५०शी च्या आसपासचे लोक एक नवीन आव्हान झेलत आहोत. पूर्वी म्हणजे २००० ते २०१० बिग ४ कंपनीत जॉब मिळणे म्हणजे एक शान होती. तिथे जॉब मिळाला तर उमेदवार उत्तम प्रतीचे कौशल्ये असणारा असणारच असे मानले जात होते. मी अनेकदा बिग ४ मध्ये प्रयत्न केला पण एकदाही यश आले नाही. २०११ नंतर बिग ४ ने बहुदा कॉस्ट कटिंग साठी आणि ताज्या दमाचे उमेदवार जे अधिक करियर केंद्रित व्यक्तिमत्वाचे असतील अशाना जॉब द्यायला सुरवात केली. सुरुवातीलाच बिग ४ सारख्या कंपन्यांतून कामाचा अनुभव मिळाल्याने आज ते उमेदवार सायबर सेक्युरिटी किंवा इतर सर्व डोमेन्स मध्ये उत्तम कौशल्ये घेऊन मार्केट मध्ये उतरलेत. माझी पिढी जी " छोट्या कामातून अनुभव घेत घेत कौशल्ये वाढवत मोठ्या कंपनीत / कॉर्पोरेट मध्ये जावे" अश्या शिकवणीत घडली त्यांच्या पुढे ही बिग ४ अनुभवाचे मटेरियल असलेली पिढी आमच्यापेक्षा जास्त कौशल्ये घेऊन जॉब मार्केट मध्ये आहे. अशा लोकांचे मी इंटरव्यू घेतो तेव्हाच त्यांच्यातले पोटेन्शियल दिसून येते. सायबर सुरक्षेतील तांत्रिक कामे, कौशल्ये प्रत्येक महिन्याला बदलत आहेत. नवीन नवीन अटॅक सर्फेस आणि थ्रेट व्हेक्टर निर्माण होत आहेत. त्यामुळे आज जे माझ्या पिढीतील आहेत त्यांच्या पुढे एकतर स्वतःला या पिढीला तोंड देता येईल इतके कॉम्पिटन्ट बनवावे लागेल किंवा दुसऱ्या डोमेन मध्ये [किंबहुना IT व्यतिरिक्त] काम शोधावे लागेल असे दिसत आहे. या शिवाय अत्यंत वरच्या व्यवस्थापनाला थोडक्यात पण त्यांना इंटरेस्ट असलेली माहिती [KPI / KRI] एक किंवा दोन स्लाईड्स मध्ये ३ ते ४ मिनिटात प्रभावीपणे मांडणे हा एक महत्वाचा स्किलसेट मुलाखतीत तपासला जात आहे.

वाचने 18638
प्रतिक्रिया 188

प्रतिक्रिया

मी ही तुमच्याच बोटीतुन प्रवास करत आहेत. कृत्रिम बुध्दिमत्ता हे आपल्यापुढे सगळ्यात महत्वाचे आव्हान आहे. जी छोटी मोठी कौशल्ये आजपावेतो मिळवली ती ए.आय ने एका झटक्यात प्रभावहीन केलेली आहेत.मुळात आपली अवस्था आता सर्कशीतल्या पिंजर्यातल्या सिंहासारखी झाली आहे.शिकारीची कौशल्ये विसरली गेली आहेत आणि मिळेल त्या तुकड्यावर थोड्याफार कसरती दाखवुन गुजराण करण्याची सवय लागली आहे.

मी सुरुवातीपासुन नेटवर्क इन्फ्रा मध्ये काम करत आहे. त्यात बर्‍याचदा ऑपरेशनल सिक्युरिटी(फायरवॉल्,वॅफ, प्रॉक्सी,लोड बॅलन्सर्स्, ऑथेंटिकेशन /आइस किवा रेडियस्/टॅकॅक्स) चे कॉम्पोनंट्स असतातच. मला कायम असे वाटत आलेय की इन्फॉर्मेशन सिक्युरिटी,पॉलिसी क्रिएशन्,ऑडिट हे आमच्या वरच्या पायरीवर आहे. म्हणजे तुम्ही ठरवणार आणि आम्ही फक्त आदेशाचे पालन करणार. आणि तुमच्याही वर सिक्युरिटी आर्किटेक्ट वगैरे लेयर असणार. जो सी एक्स ओ लेव्हलशी कनेक्टेड असणार. आता तुमच्याच पातळीला काय पण आर्किटेक्ट लेव्हललाही धोका निर्माण झाला आहे असे वाटते. कालच एक मित्र सांगत होता की पुण्यातील एका प्रथितयश बी एफ एस आय कंपनीत आर्किटेक्ट लोकांना एच आर केबिनमध्ये बोलवुन तिथेच लेटर हाती देउन बाहेर काढायच्या घटना घडताहेत, डेस्क वर परतही जाउ न देता. लिंक्ड इन वर रोजच अमेझॉन मधुन हाकललेल्या लोकांच्या पोस्ट दिसताहेत. ज्युनिपर नेटवर्कला एच पी ने टेक ओव्हर केलेय. अँथ्रोपिक् ने नुकत्याच लाँच केलेल्या प्लगिन्स मुळे आय टी कंपन्यांचे शेअर्स धाडकन खाली आलेत. आय टी क्षेत्रातील त्यातही इन्फ्रा मधील प्रिमियम कधीच गेलाय आणि काप गेला नी भोके उरली अशी परिस्थिती येउ घातलीय. (कानडाऊ योगेशु यांनी वर म्हटल्याप्रमाणेच). त्यामुळे मलातर पुढच्या काही वर्षात चितळे किवा अग्रज किवा तत्सम फ्रेंचाईसी घेउन एक दुकान टाकुन बसावेसे वाटु लागले आहे. जमत असेल तर ५०/५० करुया. बाकी जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत...........

४५ वर्च्या आपल्या सगळयांनाच आता पुढे काय याचं प्लॅनिंग कराय्ला लगेल आता, मी पण पी एम आणी डीलीवरी सोबत अजुन काय करता येईल ते बघतोच आहे

मी Big 4 सारख्या मोठ्या कंपनीत काम करत असलो, तरी मनापासून सांगायचं झालं तर हे IT हे क्षेत्र मला कधीच खऱ्या अर्थाने आपलंसं वाटलं नाही. मी IT वाला शोभत नाही असे मला वाटते कायम.. No पॉलिटिक्स.. No बकवास.. फक्त माझी नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि थोडे शिकण्याची तयारी या आधारावर मी या क्षेत्रात टिकून राहिलो, असं माझं प्रामाणिक मत आहे. Big Data हे database प्रमाणेच तुलनेने सोपं वाटल्यामुळे थोडं निभावून गेलो, एवढंच. आधीच २०१९ ला मनाशी ठरवलं होतं की ४५–४७ वयानंतर नोकरी करत बसायचं नाही. त्यामुळे लवकरच लोन संपवत आणली आहेत (mainly home loan), आर्थिक नियोजन नीट केलं आणि दीर्घकालीन गुंतवणुकीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं. २०१९ पासून केलेली planning आज मागे वळून पाहताना खूप योग्य वाटते. Technical analysys आवडत आणि येत असले तर long term हा एकच fundamental base निकष ठेवला. गेल्या चार-पाच वर्षांपासून मी एक छोटासा side business करतोय, जो मला मनापासून आवडतो. कोनी नावे ठेवू वा नाही, शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम केल्यामुळे आज मला समाधान आहे, ग्राहकांचा एक चांगला base तयार झाला आहे. खरं तर ते ग्राहक नाहीत, तर कुटुंबासारखेच आहेत. आणि त्यातून महिन्याला साधारण ५० हजार रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळतं. Share market मधील माझा technical अभ्यास वापरून, ग्रॅच्युटीमधून मिळालेल्या (सुमारे १५ लाख) रकमेवर short-term ट्रेडिंग करून महिन्याला ३०–४० हजार रुपयांचं उत्पन्न मिळवता येईल, अशी मला आशा आहे. त्यामुळे निवांतपणे, कोणताही ताण न घेता IT क्षेत्रातून बाहेर पडण्याचा माझा विचार आहे. शहरात राहत असलो, तरी गावाच्या मातीची ओढ मनात कायम आहे. त्यामुळे खर्च कमी राहील, मन रमेल. गावाकडे जाऊन शेती करीन असं मी म्हणत नाही, पण वर्षातील किमान ५-६ महिने तरी तिकडे राहायचं नक्की. भरपूर फिरायचं आहे,अनुभव घ्यायचे आहेत. आयुष्याकडून फार काही अपेक्षा नाहीत निवांतपणा, स्वातंत्र्य, समाधान… आणि उरलेलं आयुष्य स्वतःसाठी जगण्याची संधी, एवढंच बाकी काय पाहिजे आयुष्या कडून? IT वगैरे सगळी मोहमाया आहे.. असे माझे वयक्तिक मत आहे आणि आयुष्याच्या या वळणावार आपण आत्मनिर्भर हवेच असे वाटते.. त्यातून अजूनही, लहानपनी चे..शाळेतील..कॉलेज चे (२५ वर्षे जूने )मित्र भेटणारे आहेत, virtual किंवा corporate मित्रां पेक्षा हि नाती अगदी घट्ट आहेत, त्यामुळे त्यातील ३-४ जण मिळून करू काही तरी नंतर असे बोलत असतो, बघू त्याबद्दल काही ठरवले नाही... आता तर मला, रिडींग बरोबर गार्डनिंग ची आवड लागली आहे, मस्त enjoy करतोय.. नव नविन प्रॉडक्ट(IT नाही) बनवायचे ठरवले आहे त्यात किती यश येते बघू... बाकी काही नाही केले तरी फिरत राहीन हे मात्र नक्की... बाकी main: हे big ४ मध्ये काम केलेल्या लोकांची कौशल्य चांगली असतात हा मला भ्रम वाटतो, उलट छोट्या छोट्या कंपनीत कौशल्य वाढवलेली माणसे खुप चांगले काम करतात.. हा interview ला फेकाफेकी करणार्या कडे कौशल्य असतेच असे मला वाटत नाही - गणेशा.

In reply to by गणेशा

Share market मधील माझा technical अभ्यास वापरून, ग्रॅच्युटीमधून मिळालेल्या (सुमारे १५ लाख) रकमेवर short-term ट्रेडिंग करून महिन्याला ३०–४० हजार रुपयांचं उत्पन्न मिळवता येईल, अशी मला आशा आहे. त्यामुळे निवांतपणे, कोणताही ताण न घेता IT क्षेत्रातून बाहेर पडण्याचा माझा विचार आहे.
मला पण सांगा आयडीया...

In reply to by खटपट्या

मला पण सांगा आयडीया...
. असे विचारणारे लोक जमा करणे हीच तर आयडीया आहे.... सत्तर रुपये पडतील. हे उत्तर देणारे गणेशा. . (हल्के घे रे गणेशा, तू व्य्वस्थित कमावशील आणि सुप्यातसुध्दा निवांत राहशील ह्याची पूरेपूर कल्पना आहे)

In reply to by खटपट्या

नक्कीच, सध्या मात्र फक्त long term चालू आहे.. मागे, अर्थजगत मध्ये थोडेसे मी सांगितले होते येथे, share market ची बाराखडी या धाग्यात.. जेंव्हा पुन्हा सुरु करेल तेंव्हा नक्कीच सांगेल. Technical मला जास्त आवडते, पण job सोडूनच करेल, technical म्हणले तरी positional, monthly +. Speculative नाही, options तर नाहीच नाही.. मागे २ वर्षे मध्ये मिळून option साठी bot बनवला, सर्व indicator mathematical calculations ने bot मध्ये implement केले, परंतु bot सुद्धा कायम नीट output (profit) देऊ शकत नाही, so options and bot दोन्ही ला पुन्हा हात लावला नाही.. Option bot बनवताना manually केले होते, आणि profit चांगला कमावला, पण त्यात stress आहे खुप आणि हरण्याची शक्यता खुप, so stress वाल्या गोष्टी करायच्याच नाहीत.. अभ्या, :)

वाचतो आहे. एकाच बोटीत तरंगणारे इतर जुने खलाशी बघून हायसे वाटले. हा धागा वाचत राहीन आणि सवडीने त्यात भर देखील घालण्याचा प्रयत्न करेन. प्रतिसाद रूपाने. महत्वाचा विषय. धन्यवाद.

पन्नाशीतल्या पिढीएवढीच (किंबहुना थोडी जास्त), जेन झी बद्दल काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

जिव्हाळ्याचा विषय आहे; अनुभवी लोकांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा. जमेल तशी मीही भर घालीन. ‌ - (एकेकाळचा कोडफोड्या) कांदा लिंबू

मी देखील तुमच्यासारखाच सहप्रवासी आहे. माझ्या पूर्वीच्या कंपनीने काही वर्षापूर्वी अचानक निवृत्तीचे वय ५८ वरून ५४ केले आणि ५४ + च्या लोकाना एका फटक्यात हद्दपार केले. तसेच हळुहळू ५०+ वाल्यानाही काहीनाकाही कारण देवून गुलाबी चिट्।ठ्या दिल्या. सतत नवीन शिकावे लागणे याचा कंटाळा केला तर डायनॉसॉर व्हायला वेळ लागणार नाही हे माहीत आहे. पण या गदारोळात स्वतःसाठी जगणे राहूनच जाते. आपण एक हमाल इतकेच काय वारंवार सिद्ध होते. या वयात असताना मुलांची जबाबदारी तशी पुर्ण संपलेली नसते , पण वृद्ध पालकांची जबाबदारी वाढलेली असते. या शिवाय इतक्या वर्षाच्या शारीरीक / मानसीक आबाळीमुळे स्वतःला बीपी / शुगर इत्यादी भेटवस्तू मिळालेल्या असतात. सोबतचे बँकेत , पालीकेत एल आय सी मधे कम करणारे मित्र निवान रीटायर्ड लाईफ जगत असतात, कुठेकुठे फिरायला जात असतात तेंव्हा आपण आयटी त आहोत याचा कधीतरी केलेला माज आठवून दु:ख होते.

बिग ४ जाउ द्या , सध्या ४० नंतर आय टी मध्ये नोकरी टिकवणे अवघड झाले आहे . आयटी वाल्यांनी एखादा तरी इतर धंदा बघावा. मी ज्योतिष सांगणार आहे . फुल्ल बोल बच्च्चन

In reply to by कपिलमुनी

४० नंतर आय टी मध्ये नोकरी टिकवणे अवघड झाले आहे
सहमत आहे. ए आय मुळे पुढच्या दोन तीन वर्षानंतर कोडर / टेस्टर ही जमात दिसेल का ते ही सांगता येत नाहीय्ये

एका कंपनीत साडे आठ वर्षे इंनजिनिअरिंग मेनेजर म्हणुन काम करुन सुद्धा डच्चु(२०१९) मिळाला होता... तेव्हा पासुन लोयल टु कंपनी चा अर्थ समजला आहे. यु आर आवर फेमिलि असले काही नसते हे हि समजले आणि पुन्हा ह्यात तग धरायची असेल तर कसुन अभ्यास (टेक्नीकल चा) ला पर्याय नाही हे ही उमगले. तेव्हापासुन ४ कंपन्या बदलल्या आणि पेकेज दुप्पट केले. करंट कंपनीला आपल्यापेक्शा चांगला मिळणार नाही तोवर ठीक चालेल .

चाळीशी पन्नाशी च्या पुढचे अनेक आय टी तंत्रज्ञ/ अभियंते माझ्याकडे रुग्ण म्हणून येत असतात. अशा पैकी अनेक लोक आता या स्थितीत नोकरी गेली तर अर्ध्या पगाराची सुद्धा नोकरी मिळणार नाही अशी स्थिती झालेली असल्याने चिंताग्रस्त झालेले आढळतात. यामुले अनेक लोकांना नीट झोप लागत नाही, कुणाला पचनाची तक्रार सूर झालेली असते. कुणाला घाबरायला होत असते. कुणाचे सेक्स लाईफ बिघडलेले असते दुर्दैवाने बरेचसे पुरुष हि स्थिती आपल्या कुटुंबाला नीट पणे सांगू शकत नाहीत. कारण आपल्या ताणतणावात बायको मुलांना/ कुटुंबाला कशाला ओढायचे या विचाराने गप्प राहतात. अर्थात त्यांच्या नोकरीबाबत मी काहीच करू शकत नाही हे मला आणि त्यांनाही माहित असते. पण कुठेतरी आपले मन मोकळे करायला मिळते म्हणून त्यांच्या आणि माझ्या गप्पा होतात. त्यांनी काय करावे हे मी काही सूचित करत नाही कारण तो आगाऊपणा असतो. अशा वेळेस अनेक लोक आपल्याला कोणताही गंभीतर आजार नाही हे जाणून थोडेसे सुस्कारा सोडतात कारण या स्थितीत गंभीर आजारपण म्हणजे मोठे संकट असू शकते हे त्यांना माहिती आहे. यामुळे या स्थितीत जर आपला आरोग्य विमा उतरवलेला नसेल तर तो जरूर उतरवून घ्या कारण कंपनीतून काढले कि कंपनीचा विमा आपल्याला संरक्षण देणार नाही हे मी आवर्जून सांगतो. स्त्रिया त्यामानाने थोड्या बऱ्या स्थितीत असतात. कारण बहुसंख्य स्त्रियांनी आपले प्रश्न नवऱ्याला सांगितलेले असतात आणि नवऱ्याची नोकरी शाश्वत असेल तर हि चिंता बरीच कमी असते. अशा लोकांना माझा अनाहूत सल्ला एवढाच असतो कि आपण आपल्या बायको किंवा मुलांना विश्वासात घेऊन आपली स्थिती नक्की सांगा कारण त्यामुळे इतके दिवस लाड करणारा आपला बाप हात आखडता का घेतो हे मुलांना समजून घेणे सोपे जाते. किंवा बायकोला सुद्धा आपण खर्च जपून करायला हवा हे सहज समजून येते. शक्य असेल तर या स्थितीबद्दल आपल्या आई वडिलांशी सुद्धा विचार विनिमय करा. ते बहुसंख्य वेळेस मोलाचा सल्ला देऊ शकतील. अगदीच काही नाही तरी मनावरचे ओझे हलके करण्यात आपल्याला नक्की मदत मिळेल. बऱ्याच लोकांचा आपल्या आईवडिलांशी संवाद तुटलेला आहे हे सुद्धा या वेळेस लक्षात येते. आपण कालबाह्य होत चाललो आहोत हा विचार फार त्रासदायक असतो. मी स्वतः;बदल सांगतो आहे. मी गेली १५ वर्षे फक्त सोनोग्राफी करतो आहे त्यामुळे सिटी स्कॅन एम आर आयसारख्या तंत्रज्ञानांपासून मी लांब होत चाललो आहे हा विचार मला सतावत होता. एक दिवस पहाटे झोपेतून उठून मी विचार करत असताना मला एक विजेचा लोळ चमकून गेला. एम बी बी एस झालो तेंव्हा रेडिओलॉजीचा गंध सुद्धा नव्हता एम डी करून मी हा विषय पूर्ण शिकलो त्याला तीन वर्षेच लागली मग आता इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे आपल्याला हेच तंत्रज्ञान शिकायला किती वेळ लागेल फार तर दीड वर्षे. या विचारानंतर मला शांत झोप लागली अर्थात माझा सोनोग्राफीचा व्यवसाय उत्तम चालू आहे आणि माझ्या दोन्ही मुलांची लग्नं झालेली असल्याने मी संसाराच्या जबाबदारीतून मोकळा झालो आहे आणि आर्थिक विवंचना तर नाहीच. पण हाच विचार मी एक दोन आय टी मधील लोकांना बोलून दाखवला. त्यांना हेच विचारले तुम्हाला ए आय/ एल एल एम किंवा तत्सम तंत्रज्ञान नव्याने शिकायला किती वेळ लागेल? त्यांना पण एकदम लक्षात आले कि अरे इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर हे आपण साधारण एक वर्षात शिकू शकतो. आता मला त्या तंत्रज्ञानाबद्दल काहीही माहिती नसली त्यामुळे त्यांनी काय करावे हे मी त्यांना अजिबात सांगू शकलो नसलो तरी तरी त्यांना स्वतःबद्दल एकदम हुरूप आणि आत्मविश्वास वाटू लागला. ज्यांना आपण कालबाह्य झालो आहोत असे वाटत असेल त्यांनी असा विचार करून पाहायला हरकत नाही.

In reply to by सुबोध खरे

फरक फक्त तंत्रज्ञानाचा नाहीये. स्वस्त लेबर उपलब्ध आहे. हे पिरॅमिड सारखे आहे, वरती जागा कमी आहे. त्यात सध्या जागतिक वातावरण ठीक नसल्याने मोठ्या गुंतवणुकी होत नाहीये. भारतात सर्व्हिस बेस इंडस्ट्री आहे. मला ह्या माणसाच्या तासाचे ३० डॉलर मिळाले तर मी त्याला २० देऊ शकतो. मग त्याचा पॅकेज चे तेच लिमिट आहे. या टाईप हिशोब असतो. शिवाय दर वर्षी वाढ आणि नोकरी बदलतील वाढ यामुळे रिसोर्स झेपेंना होतो. मग त्याची चूक नसली तरी काढावा लागतो. त्या पगारात 4 टाळकी येतात . जास्त तास बिलिंग मिळते

In reply to by सुबोध खरे

त्यांना स्वतःबद्दल एकदम हुरूप आणि आत्मविश्वास वाटू लागला.
डॉक, ~५० वर्ष वयाचे, आयटीत २५-३० वर्ष करीयर असणारे प्रोफेशनल्स यांना फक्त आत्मविश्वास नाहीयेय आणि तो कोणीतरी द्यायला हवा इतका जनरलाइझ करण्याइतका हा सोपा इश्यु नाहीयेय, तसं समजणं हे एकदम 'नाइव्ह' आहे. भारतातलं 'आयटी इंडस्ट्रीचं' स्ट्रक्चर आणि ऑपेरेशन्स समजावून घेणं त्यासाठी गरजेचं आहे. लेखाच्या गाभ्याशी जाण्यासाठी ते समजणं गरजेच आहे. - (आयटीग्रस्त) सोकाजी

In reply to by सोत्रि

"यांना फक्त आत्मविश्वास नाहीयेय आणि तो कोणीतरी द्यायला हवा इतका जनरलाइझ करण्याइतका हा सोपा इश्यु नाहीयेय, तसं समजणं हे एकदम 'नाइव्ह' आहे." तसं मी अजिबात समजत नाही जर माझ्या या लेखनामुळे आपला असा गैरसमज झाला असेल तर ती माझ्या लेखनाच्या क्षमतेची मर्यादा आहे. आपले आईवडील आपल्या क्षेत्राबद्दल काहीही जाणत नसतील तरी आईवडिलांनी दिलेला दिलासा हा जसा मनाला थोडा उभारी देणारा ठरतो तसेच आहे. जखमेवर फुंकर घातल्यामुळे जखम बरी होते असे नव्हे पण थोडेसे समाधान होते. "आयटी इंडस्ट्रीचं' स्ट्रक्चर आणि ऑपेरेशन्स " या बद्दल मला काहीही माहिती नाही त्यामुळे मी त्यांचा प्रश्न सोडवू शकेन अशी सुतरामही शक्यता नाही किंवा तसा माझा दावा हि नाही. असे माहिती असताना सुद्धा लोक माझ्याकडे मन मोकळं करतात याचं कारण माणसाला आपला ऐकून घेणारा सुद्धा कुणी तरी हवा असतो. शेवटी हा प्रश्न ज्याचा त्यानेच सोडवायचा असतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारे स्वामी समर्थ सुद्धा प्रत्यक्ष मदत करायला येत नाहीत पण आपल्या पाठीशी कोणीतरी आहे हा दिलासाच असतो. माणसाला आपल्याला आपली कौशल्ये मिळवायला फार कष्ट लागणार नाहीत एवढे णूस्टॅ सांगण्या मुळे सुद्धा असाच "केवळ दिलासा" मिळतो.

जिव्हाळ्याचा धागा. सध्या निव्रुत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने सर्व प्रतिसाद मनाला भावले. खरे तर आय टी क्षेत्र हे प्रचंड बौध्दीक दमछाक करणारे आहे हे मागील १० वर्षात प्रकर्षाने जाणवू लागले. एखादे सर्टीफिकेशन केल्यावर त्यात काम करुन दोन वर्षे होत नाहीत तो पर्यंत ते तंत्रज्ञान कवडीमोल होते. परत दुसरे शिका, त्यात सर्टिफिकेशन करा आणि सिध्द व्हा, थोडे दिवसात मी वैतागलो आणि सर्टिफिकेशन करायचे थांबवले आणि युटुयुब वर बघुन काम करु लागलो. माझे बेसिक पक्के असल्याने युटुब आणि बाकीच्या साइट्स काम करण्याएवढे ज्ञान देउ लागल्या. पण तरीही पोंक्षे सर म्हणतात तसे नवीन पोरं येउन काही कामे लिलया करत असत ते पाहुन न्युनगंड येवु लागला. आता मी परीस्थीती पुढे हात टेकले. माझ्या सोबतच्या काही लोकांनी मानेजमेंट मध्ये जाउन आपले जॉब वाचवले (म्हणजे माझ्या द्रुष्टीने उंटावरुन शेळ्या हाकणे होते) काही दिवस मी ते केले आणि नंतर मी काही महीन्यांनी मागे वळून पाहीले तर गेल्या दोन वर्षात मी फक्त पीपीटी, एक्सेल आणि तत्सम कामे करुन फक्त मानेजमेंट करण्याचा आव आणतो आहोत हे जाणवले. डेजिगनेशन बदलुन फक्त पगार फुगत होता पण मी काय आहे आणि करतोय काय ही रुखरुख मनाला खात राहीली. मी कलाकार असल्याने आता कलेत आणि अध्यात्मात माझे मन रमवत आहे. निव्रुत्त झाल्यानंतर मी कलेला वाहीलेला एखादा जॉब घेइन. ये आय टी हमे रास नही आयी ...

In reply to by खटपट्या

मी कलाकार असल्याने आता कलेत आणि अध्यात्मात माझे मन रमवत आहे. निव्रुत्त झाल्यानंतर मी कलेला वाहीलेला एखादा जॉब घेइन.
एक job सोडून पुन्हा job च का करायचा? कलाकाराचा खरा आनंद निर्मिती मध्ये असतो.. Job मध्ये कलेला अडकवून तितकासा आनंद मिळेल? जास्त बोलत नाही, कारण कला आणि कलाकार यांचा respect आहेच..

In reply to by गणेशा

जॉब म्हणजे स्वयंरोजगार म्हणायचे आहे मला. छंदातून पैसा. नाही मिळाला तरी चालेल पण आवडीचे काम केल्याचे समाधान.

सर्वच क्षेत्रांत सोपे करणे, लवकर करणे प्रक्रिया घुसल्याने कर्मचारी कमी करणे किंवा त्यांच्यावर अवलंबून न राहणे हे सुरू आहे. कर्मचाऱ्यांना कायमचे ठेवून घेण्याची गरजच कमी होत आहे. शिक्षण असो की शेती. उलट आरोग्य क्षेत्रात मात्र रुग्णांना घाबरवून पैसे काढणे वाढत आहे. खाद्यपदार्थ खरेदी विक्री ( रेस्टॉरंट्स धंदा)वाढत आहे. तसेच करमणूक आणि पर्यटन व्यवसायही. बाजारात माल खपवणे ही कला ( मार्केटिंग)- यांची गरज वाढते आहे. त्यातील सल्ले देणे वगैरे.

हा माझा अत्यंत जिव्ह्याळ्याचा विषय आहे, त्या अनुषंगाने माझे २ सेंट्स. साधारण १३-१४ वर्षांपूर्वी आयटीची 'सर्व्हिस इंडस्ट्री'सोडून 'कॅप्टीव्ह इंडस्ट्री' जॉइन केली. सातत्याने कमी होत जाणार्‍या बिलींग रेट्समुळे आयटी कंपन्यांची कट थ्रोट कॉम्पीटीशन, त्यामुळे बिलेबल राहण्यासाठीची कसरत (हुजुरेगीरी), सतत अपडेट होत असलेल्या technology च्या बदलाचा पेस पकडून, बाजारात येण्यार्‍या तरूण रक्ताशी कॉम्पीट करत राहण्याची अपरिहार्यता आणि त्याने वाढत्या वयामुळे येणारा तणाव, वाढत्या अनुभवाच्या तुलनेत पिरॅमीड स्ट्रक्चरमुळे कमी होत जाणार्‍या वरच्या पोजिशन्स ही काही महत्वाची कारणं त्यामागे होती. साधारण ७-८ वर्षांपूर्वीच, ह्या सगळ्या कॉर्पोरेट गदारोळातून लवकरच बाहेर पडायचे असे मनाची ठरवले होते. आयुष्यभर शिकत रहायला हवे, शिकणं थांबलं की मनुष्य थांबला, हे सगळं खरं असलं तरीही ते बाय चॉईस असायला हवं न की बाय फोर्स. कॉर्पोरेट मधलं शिकणं हे माझ्यासाठी बाय फोर्स आहे हे लक्षात आल्याने त्यातली गंमत माझ्यासाठी संपली. आणि, आयुष्याची दुसरी इनिंग लवकरच चालू करायला हवी हे लक्षात आलं. त्यासाठी 'फायनॅन्शियल इन्डीपेन्डन्स' असणं गरजेच असल्याने त्यासाठी लागणारं आर्थिक नियोजन अग्रेसीव्हली सुरू केलं. सुदैवाने इक्वीटी मार्केटचं महत्व समजावून देणारे मित्र योग्य वेळी भेटल्याने वयाच्या ५० व्या वर्षी रिटायर (FIRE) होण्यासाठीचं प्लानिंग योग्यवेळी सुरू केलं. मोस्टली तो गोल ऑल्मोस्ट पूर्ण होत आलाय. धाकट्याचं इंजीनीयरींग पूर्ण होइपर्यंत ३ ते ४ मिनिटात प्रभाव पाडणार्‍या स्लाईड्स करता येण्याचं स्कील वापरून जितकी वर्ष रेटता येतील रेटायची असा तूर्ताचा प्लॅन आहे. त्यानंतर, टीयर ३-४ सीटीत, निसर्गाच्या सानिध्यात आयुष्याचा उत्तरकाळ, शांतपणे शरिराचे स्वास्थ्य सांभाळत, शांततापूर्ण मार्गाने व्यतीत करायचा हे ठरवून एक शेतजमीन घेऊन ठेवली आहे. त्यातुन उत्पन्न अजिबात अपेक्षित नाही. जे खायचं ते ऑर्गॅनिक पिकवून खायचं आणि शरीराची हालचाल होउन, व्यायाम होऊन तब्बेत धडधाकट राहवी हा हेतू. उरलेल्या वेळात गणेशा म्हणाला तसं थोडसं ट्रेडींग करून थोडाफार कॅशफ्लो मिळवणं (त्यासाठी सतत शिकणं, बाय चॉइस) , वाचन-लिखाण करणं, विपश्यना ध्यान शिबीरांमधे सेवा देऊन समाजाचे जे देणं लागतो त्यातुन ऊतराई होण्याचा प्रयत्न करणं असा भरगच्च रिटायरमेंट प्लॅन आहे. सध्यातरी तो ऑनपेपर आहे जो धाकट्याचं इंजीनीयरींग पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष अमलांत आणायचा आहे. AIच्या कृपेने जर त्याधिच तो अमलांत आणण्याची गरज निर्माण झाली तर त्यासाठीची मानसिक आणि आर्थिक तयारी करून ठेवली आहे. रिटायरमेंट आयुष्याचा 'मिनिमलीस्टीक लाईफस्टाईल' हा मूलमंत्र ठरवून ठेवला आहे. पुढे जशी चर्चा सरकेल तशी भर घालत राहिन. - (पन्नाशीतला आयटीग्रस्त) सोकाजी

पण महत्वाचा विषय असल्याने धाग्यावर पुन्हा चक्कर मारुन प्रतिसाद बघितले. आय टी कंपन्यांमध्ये साधारण ५ प्रकार अहेत सर्विस ईंडस्ट्री- विप्रो, ईन्फोसिस्,टी सी एस कॅप्टिव्ह कंपन्या- अनेक मेन्युफॅक्चरिंग, बी एफ एस आय किवा तत्सम नॉन आय टी सेक्टरमधल्या परंतु आय टी वर अवलंबुन असणार्‍या आणि म्हणुन ईंटर्नल स्टाफ बाळगणार्‍या प्रॉडक्ट कंपन्या- सिस्को, पालो अल्टो, ज्युनिपर वगैरे अजुन एक प्रकार म्हणजे क्लाऊड किवा क्लाउड बेस्ड सर्विस देणार्‍या- गुगल,मायक्रोसॉफ्ट्,अमेझॉन्,ओरॅकल वगैरे आणि पाचवा म्हणजे ईंटर्नेट सर्विस प्रोव्हायडर किवा आय एस पी उदा. एअर्टेल,टाटा, बी टी, ए टी अँड टी आता यात सगळेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत कारण निव्वळ प्रॉडक्ट कंपनी किवा निव्वळ सर्विस कंपनी असे राहीले नाही. उदा. सिस्को किवा आय बी एम प्रॉडक्ट विकतेच पण त्याबरोबर सर्विसेस ही पुरवते. ईन्फोसिस सर्विसेस देते पण त्यांचे फिनॅकल हे लोकप्रिय प्रॉडक्टही आहे. टाटा किवा बी टी ईंटर्नेट पुरवते पण त्याबरोबर सर्विसेसही देते. अजुन गोंधळ म्हणजे हे सगळे एक मेकांचे ग्राहक सुद्धा आहेत. म्हणजे गूगल भारतात बॅकबोन किवा इंटरनेट साठी टाटा किवा जिओ वर अवलंबुन आहे (कोणताही लोकल प्रोव्हायडर) तर हार्डवेअर प्रॉडक्ट साठि गूगल किवा टाटा हे सिस्को, ज्युनिपर वर अवलंबुन आहेत. सिस्को क्लाऊड बेस्ड ऑफरिंग साठी यातीलच कोणत्यातरी क्लाऊडवर अवलंबुन आहे. विप्रो/टी सी एस एकाच वेळी सिस्को पार्टनर आहेत आणि स्पर्धकही आहेत. आता आपल्यासाठी मुद्दा असा की कोणाची नोकरी जास्त सुरक्षित आहे? सर्विस कंपनी कडे नेहमीच काही ना काही काम असते त्यामुळे पगार वाढला नाही तरी (शक्यतो) नोकरी चालु राहते. प्रॉडक्ट कंपनीचे प्रॉडक्ट चालेनासे झाले किवा मर्जर झाले तर नोकरी धोक्यात येउ शकते. कॅप्टिव्ह मध्ये तर हायर मॅनेजमेंट बदलली की उलथापालथ ठरलेलीच. क्लाउड कंपन्यांच्या बातम्या तर आपण रोजच पेपरात वाचतो. ईतके हजार काढले नी काय काय. आणि ईंटरनेट मधील मार्जिन कधीच कमी झालाय नी त्यात सरकारी नियम स्पेक्ट्र्म वगैरे घोळ आहेतच. बापरे---लिहुन लिहुन दमलो. काय करावे बुवा या पुढे?

मी नॉन आयटी वाला आहे, आयटीत नेमके काय काम चालते हे समजत नाही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी. पण इतकी माहिती आहे की आयटीत प्रचंड पैसा आहे २४ नी ३० लाख पॅकेज मिळवांरे अनेक आहेत. २०१४ साली एकाने सांगितले होते की आयटी आणी मॉडेलिंग क्षेत्रात प्रचंड पैसा असतो इतका की इतर इंडस्ट्रीत तुम्ही आयुष्यभर कमवाल तेवढा आयटीत १० वर्षात कमावला जातो. असे असेल तर आयटी वाले अजून जास्त पैसे कमावण्याची धडपड का करतात?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इतर इंडस्ट्रीत तुम्ही आयुष्यभर कमवाल तेवढा आयटीत १० वर्षात कमावला जातो. असे असेल तर आयटी वाले अजून जास्त पैसे कमावण्याची धडपड का करतात?
खरं तर समाधान असेल, तर IT आणि Non-IT असा कोणताही भेदच उरत नाही. समस्या पैशात नाही, तर पैशानंतर अंगावर चढणाऱ्या लाईफस्टाईल नावाच्या मुखवट्यात आहे. पैसा आला… आणि त्याच्यासोबत मोठं घर, भारी गाडी, महागडं स्कूल, मोठ्या बाता यांची हौस लागली, की मग माणूस नकळत रेसमध्ये उतरतो. आवड म्हणून नाही, तर लोकांना दाखवण्यासाठी जगायला लागतो. बायको किट्टी मध्ये असेल तर ह्या ठिकाणाला भेट देऊन फोटो टाकले नाहीत तर कमीपणा असतो.. मग प्रवास अनुभवण्यासाठी नाही, तर “आम्ही कसे फिरतो” ह्या मुखवट्यात राहण्यासाठी सुरु होतो.. दोघं कमावत असतील तर, “मला माझ्या पैशांचं वेगळं घर घ्यायचंय”, “हे आपल्या पोराच्या भविष्यासाठी आहे”, “रिटायरमेंटनंतर उपयोगी पडेल”… आणि समोरच्याला “तुला हे कधी कळणारच नाही.” असे भासवून भविष्य वादी गुंतवणूक दाराचा मुखवटा चढवला जातो.. या साऱ्या race मध्ये आपल्यावरच तर खर्च करतोय ना, ह्या अहंकाराच्या मुखवट्यात जगत जगत जास्त पैसे कमावणाऱ्याला अजून पैसा हवा वाटतो… गणेशा

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अबा या विधानाला हसावे की रडावे कळत नाहीये. पहीले तर मला वाटत नाही की ईतर ईंडस्ट्री आणि आय टी वाल्यांच्या पगारात ईतका फरक असेल. एकतर आय टी हा फारच जेनेरिक शब्द आहे. त्यात ८० टक्के पाट्या टाकणारे आणि २० टक्केच काहीतरी चॅलेंजिंग काम करणारे असतात. त्यातही तुम्ही जे काम करता ती टेक्नॉलॉजी किती निश आहे आणि ती किती काळ निश राहणार आहे हाही मुद्दा आहेच. आजची निश टेक उद्याची कमॉडिटी आणि परवा रिडंडंट व्हायला वेळ लागत नाही. त्यातही परदेशात तुम्ही पन्नाशी पर्यंत आपापल्या टेक्नॉलॉजी मधे कन्सल्टंट किवा कॉट्रॅक्टर म्हणुन काम करु शकता पण भारतात ते रोल फारच कमी. मग १० वर्षे अनुभव झाला की तुम्हाला जबरदस्तीने पीपल /प्रोजेक्ट मॅनेजमेंट करावी लागते. नाहीतर मग आपल्या पेक्षा वयाने लहान मॅनेजर ला रिपोर्ट करावे लागते. आणि दोन्हीकडे मिड लाईफ क्रायसिस ठरलेलाच. अजुन एक--फक्त पैसा हाच विषय नाहीये. उदा. आर्मी नेव्ही किवा काही सरकारी नोकर्‍यांत ईतर फायदे (मेडिकल, हाउसिंग, मुलांना शिक्षणात आरक्षण वगैरे) आणि काही ठिकाणी वर्क लाईफ बॅलन्स मिळतो त्याची किंमत मोजता येत नाही. या एकदा बसुया!!!

गणेशाजी, हा मुखवटा प्रत्येकाचा फुगलेलाच असेल असे नाही. पहीले तर मला वाटत नाही की ईतर ईंडस्ट्री आणि आय टी वाल्यांच्या पगारात ईतका फरक असेल. आहे! माझ्या ओळखचीचे नी वयाने लहान असलेले अनेक जण २०-२४ लाख वार्षिक कमावताहेत आयटीत. दुसरी गोष्ट मिपावरच अनेक लोक ४५ च्या आसपास आयटीतून भरपूर पैसा कमावलेले निवृत्त झालेले आहेत. प्रश्न हा आहे की आयटीत प्रचंड पैसा आहे, कमावलेलाही भरपूर असतो तरीही आयतो वाले ४५-५० मध्ये जॉब जायला घाबरतात का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कमावलेलाही भरपूर असतो तरीही आयतो वाले ४५-५० मध्ये जॉब जायला घाबरतात का?
आता याचे काय उत्तर द्यायचे? १. पैसा कमावला आहे, पण सर्व अतिरिक्त किंवा जागा - घर यात टाकून emi मध्ये असेल म्हणून. २. Invest / save करून न ठेवल्या मुळे असेल.. आणि असे नसून पैसा असून दुसऱ्याच कामच करायचं असेल तर त्यांच्या भाषेत passion आणि माझ्या भाषेत मानसिक गुलामी. बाकी काय? तुम्हाला कायम खुप प्रश्न पडत असतात.. मला तर वाटते उत्तरे पण तुम्हाला येत असावीतच :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आयतो वाले ४५-५० मध्ये जॉब जायला घाबरतात का?
फीयर ॲाफ अननोन! दरमहा येणाऱ्या पगाराचं सेफ्टीनेट इतकं तगडं असतं की ते बंद झालं तर काय ही कल्पनाच करवत नाही. त्याची भिती असते. - (सेफ्टी नेट मधे अडकलेला) सोकाजी

छाम.. बाजारात अजून नवीन रोजगार उपलब्ध होणार म्हणजे.... आयटीवाल्यांनी खरोखर धंंद्यात किंवा नवीन क्षेत्रात स्विच करायचे ठरवले तर मार्केटमध्ये तुफान तेजी येऊ शकते. प्रचंड रोजगार निर्मीती होऊ शकते. गरज आहे भारताच्या मार्केटला त्याची. . ही बूम संपल्यानंतर मात्र फ्लो उलटा वाहील तो मात्र आजच्यापेक्षा सिरियस असेल.

आय टी क्षेत्र येत्या २-४ वर्षात बंद पडेल असा सल्ला मला एकाने २०१० साली दिला होता. तेव्हा आयटी हा काय प्रकार आहे हेच माहीत नव्हते, इलेक्ट्रिनिक, मेकॅनिकल, कंप्यूटर ज्याला एडमिशन मिळेल त्याला घ्या असा प्रकार तेव्हा होता, खरे तर डिप्लोमा पास होणार की नाही? हा प्रकार तेव्हा असायचा प्रचंड प्रमानात नापास झालेले नी वर्षानुवर्षे विषय देणारे आजूबाजूला फिरत असायचे. १ ल्या वर्षी ६० ची बॅच असेल तर सेकंद ईयर ला २५ जायचे, थर्ड ला १५ असायचे. अश्या वेळी आम्ही १२ लोक डायरेक्ट सेकंद ईयर ला एडमिशन घेतले त्यातले आंही दोनच थर्ड ईयर ला गेलो मी आणी माझ्या मागे बसणारा, तो ही १० विषयाना पाचची एटीकेटी होती म्हणून. माझे ऑल क्लिअर होते. तेव्हा आयटी हा प्रकार माहीत असता तर नक्कीच घेतले असते, प्रचंड पैसा ह्या क्षेत्रात आहे हे माहीत असते तर नक्कीच!

चांगला आणि फार महत्वाचा विषय आहे. गेल्या 3 वर्षात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ने चांगलीच मजल मारली आहे. ३ वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही स्वतः कोडींग करत होतो. मग हे GitHub copilot आले. सुरवातीला फक्त टेस्ट केसेस साठी थोडीफार मदत म्हणून GitHub copilot चा वापर कंपनीने सुरु केला. पण गेल्या वर्षापासून GitHub Copilot chat चा वापर सुरु केलाय आणि आता कोडींग मध्ये देखील Copilot is must असे झालेय. Github copilot जर Visual Studio code मध्ये वापरले तर एकदम चांगले काम करतोय. त्यामुळे येत्या १-२ वर्षात कोडींगचे काम देखील किती उरेल ह्याची शंका आहे. कारण सतत नवीन नवीन advanced agents येतच आहेत. गेली बरेच वर्षे मॅनेजर असून देखील मी जास्त वेळ technical कामे करण्यात घालवत होतो. उद्देश एकच होता की टेक्निकल स्किल्स विसरले जाऊ नयेत. पण आता GitHub Copilot सगळे करणार असेल तर कोडींग स्किल्सच्या जीवावर काही टिकता येणार नाही. त्यामुळे २-३ वर्षात रिटायरमेंट घेण्याची वेळ येईल असेच वाटतेय. बाकी ह्या ऑटोमेशनमुळे मुलांनी नक्की कुठले उच्चं शिक्षण घ्यावे हे पण कळत नाहीये. कारण ते जे शिक्षण घेतील ते पूर्ण होईपर्यंत कदाचित त्यांनी घेतलेले शिक्षण कालबाह्य झालेले असेल. आणि ह्याच मुळे मी देखील गेली २ वर्षे कुठलेच सर्टिफिकेशन वगैरे देखील केलेले नाही. बाकी एखादा दुकान गाळा घेऊन ठेवणे अथवा थोडी शेतजमीन घेणे हा एक चांगला पर्याय वाटतोय.

In reply to by अभिजीत अवलिया

महत्वाचा विषय आहे. copilot किवा ग्रोक सारख्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सहय्याने कोड लिहिला जातोय. त्याचा वापर वाढला आहे हे नक्की. परंतु त्यामुळे भविष्यात एक नवीन समस्या उभी राहु शकते. ती म्हणजे तांत्रीक भाषेत बोलायचे तर "टेक्नीकल डेब्ट". समोर चालता बोलता कोड आहे परंतु जो ईंजीनोयर त्याला सपोर्ट करतो आहे त्याला त्याची माहीती नसणार आहे. मग जेव्हा काही गडबड होईल तेव्हा तो प्रोब्लेम फिक्स करायला ईंजीनोयर ची फे फे उडणार आहे. मागच्याच अठवड्याची गोष्ट सांगतो. माझ्या कंपणीत एका ग्रुप ने एक प्रोटोटाईप सादर केला. तो व्यवस्थीत चालला. परंतु ज्या ईंजीनोयर ने तो लिहीला किंवा लिहुन घेतला त्याला तो कोड कसा काम करतो आहे हे सादर करताणा प्रचंड गोंधळ उडाला. त्याला तो कोड का लिहिला किण्वा कसा काम करतोय, तसेच त्याची ईतर कोड साठी कंपॅट्बीलीटी कशी राहील सांगता येत नव्हते. ऑटोमेशनमुळे कामे नक्की होतील. परंतु माहीती तंत्रज्ञानातले ऑटोमेशन हे उत्पादन क्षेत्रातल्या ऑटोमेशन पेक्षा वेगळे असल्यामुळे भविष्यात सावळा गोंधळ उडणार आहे हे नक्की.

२००१ ते २०१२ मी मा तं कंपन्यांत पूर्णवेळ नोकरी केली. नंतर काही वर्षे consulting केली. मागच्या आठ-दहा वर्षांपासून मा तं प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे. ‌पोटापाण्यापुरते पैसे मिळतात. वर्षभरात कमाल १५० दिवस काम करतो, इतर दिवशी आयुष्य जगतो. मतभिन्नतेच्या आदरासहित - "मला काम मिळेल का?" , "मला कामाचे पुरेसे पैसे मिळतील का?" असे प्रश्न better-than-average कौशल्य पातळी असलेल्या लोकांना पडू नये असे मला वाटते. ज्ञात मानवी इतिहासात आजच्याइतका रोजगार पूर्वी कधीही उपलब्ध नव्हता, आजच्याइतकी रोजगारक्षम होण्याची साधने पूर्वी कधीही उपलब्ध नव्हती, आजच्याइतका चढा रोजगार मोबदला पूर्वी कधीही मिळत नव्हता. (सध्या वेगाने पडणारी) काळाची पावले ओळखून उद्या कोणत्या कौशल्याचे गरज असेल ते कौशल्य आज प्राप्त करून तयार ठेवणे हा अर्थप्राप्तीचा, किमान relevant तरी राहण्याचा मूलमंत्र आहे. मी कॉलेजात असताना STD PCO चा धंदा प्रचंड प्रमाणात चालायचा.‌ त्याची एक CPD नावाची मशीन असायची.‌ तिची दुरुस्ती-देखभाल वगैरे कामे तेव्हा फावल्या वेळात करायचो. त्या कामाची तेव्हा बरीच मागणीही असायची. आज त्या कौशल्याचा काय उपयोग आहे? पण त्याचबरोबर Co-pilot या कौशल्यास आज मागणी आहे ज्याची त्यावेळी कुणी कल्पनाही केली नव्हती. त्याचप्रमाणे SQL, PL/SQL, HTML, CSS वगैरे पासून Java JavaScript ते microservices वगैरे मधील कोडींगचं काम माणसांसाठी संपुष्टात येऊ घातलं आहे, ते काम AI टूल्स् अधिक चांगल्या प्रकारे व कमी खर्चात करायला लागली आहेत. ‌ सध्याची गरज आहे ती AI कडून ही कामे करवून घेणे. ‌हे कौशल्य असलेल्यांना आज-उद्या रोजगार असेल, परवाच्या रोजगाराचे चित्र वेगळे असेल पण रोजगार असेल हे नक्की. अनुभवाधारित कौशल्य हवे असलेल्या क्षेत्रात उदा वैद्यकीय क्षेत्रात अधिक अनुभव म्हणजे अधिक मोबदला हे कदाचित बरोबर असेल. पण मा तं क्षेत्रात, जिथे एखादं टूल उदा cloude नुकतंच निर्माण झालं आहे तिथे २५-३० वर्षांच्या अनुभवाची काय गरज असणार? आणि त्या अनुभवाला काय म्हणून अधिक मोबदला मिळणार? मी माझ्या मर्यादित माहिती-समजुतीच्या आधारे हे लिहीत आहे. "नजीकच्या भविष्यात मागणी असणारी मा तं कौशल्ये" अशी चर्चा तज्ज्ञ मिपाकरांनी करावी ही अपेक्षा.

आमच्या घरात आयटी सदस्य आहे, दोन तीन वर्ष झाले की कंपनी आणि त्यांचं वेतन आणि काम यावरुन कंपनी बदल होत असायचेच. पण पुढें सहा सात वर्ष एका परदेशी बॅंकेच्या कामात होता ऑनलाइन एरर- सुविधा सुरुवातीला चांगलं चाललं. पॅकेज आणि नंतरही वाढवून मिळत होते. त्यांच्या कंपनीने आणखी कामे घेतली आणि यांच्यावर कामाचा ताण वाढला. करोना काळात तर फार वाढला घरात असून सारखा लॅपटॉपवर पडिक. जेवतांना 'मेल' आला तरी चालला, काम सुरु. सुरुवातीला काही वर्ष आनंदी दिसणारा चेहरा कालवंडत गेला एक दिवस दोघे बोललो. नोटीस वगैरे देऊन सोडायचं सुद्धा दडपण घेऊ नको. नाही दिलं अनुभवाचं प्रमाणपत्र तरी सोडून दे, पुढचं पुढें पाहू. आता मनमर्जीने स्वत:च पार्टली काम करतो. काही प्रमाणपत्र कोर्स केले. बंधनाशिवाय काम सुरु..,हा थोड़ी मिळकत कमी झाली तरी आनंद आहे. -दिलीप बिरुटे

सध्या आयटी हमाल एका निर्णायक परिस्थीतीत आहेत. एक तर कसे तरी अजुन काही काळ निभावतील किंवा एक तर कंपनी त्यांना काढेल किंवा स्वतःच राजिनामा देउन बाहेर पडतील. आयटी मध्ये इतर इंडस्ट्री पेक्षा चांगले पॅकेज मिळते पण सगळ्याच काम करणार्‍यांना मजबुत पॅकेज मिळत नसते. इथे शारिरिक मेहनत शून्य पण बैद्धीक कसरत प्रचंड! या इंडस्ट्री मध्ये नसलेल्या लोकांना आणि असलेल्या अनेकांना एक गोष्ट लक्षात येत नाही, ती म्हणजे आयटीवाले मल्टिटास्किंग करतात, काही काळ काम करुन ते या मल्टिटास्किंग मध्ये मास्टर बनतात. हीच गोष्ट त्यांच्या वयाच्या आणि बुद्धीच्या विरोधात जाते. सातत्याने मल्टिटास्किंग केल्याने त्यांच्या मेंदुची एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करुन ती त्याच गोष्टीवर ठेवण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. याचा परिणाम स्वरुप त्यांची नविन गोष्ट शिकण्याची क्षमता जवळपास पूर्णपणे नष्ट होते. अत्यंत स्ट्रेस, क्लिष्ट तांत्रिक दोष निवारण करणे यात सातत्याने राहिल्याने त्यांचा मेंदू इतर वयाच्या लोकांच्या मानाने फार कमी वयात थकतो. कमी वयात बर्न आऊट होणे हे या क्षेत्रात होते किंवा पहायला मिळते. या शिवाय जर असा व्यक्ती २४X७ शिफ्ट मध्ये काम करत असेल आणि असे शिफ्ट लाईफ त्याने अनेक वर्ष घालवले असेल तर त्या व्यक्तीचे सोशल लाईफ आणि आरोग्य दोन्ही अत्यंत वाईट पद्धतीने खराब होते. तुमच्या वय वाढण्याला तुम्ही काहीच करु शकत नाही, तुम्ही स्लो होतात, लर्निंग स्लो होते आणि आयुष्य तुम्हाला तुमचे वृद्ध आई-वडिल, बायको-मुले आणि नोकरी यांच्या मध्य स्थानी आणुन उभे करते. सगळ्या प्रकारच्या जवाबदार्‍या आणि त्या निभावताना जी प्रत्येक व्यक्तीची या वयात हालत होते तीच आयटी हमालांची देखील होते. आता कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना मोठ्या वेगात काढत आहे आणि येत्या काळात हा वेग अजुन वाढेल. कंपन्यासाठी आयटी हमाल केवळ एक बिलेबल किंवा नॉन-बिलेबल रिसोर्स असतात. नॉन बिलेबल आधी बेंचवर जातात मग तिथे काही काळ राहुन जर कुठला प्रोजेक्ट मिळाला तर तरतात किंवा काढले जातात. बिलेबल रिसोर्स जर या धाग्यातील वयोगटातील असेल तर बर्‍याच वेळी त्याच्या पॅकेज मध्ये २-३ नविन पास आऊट रिसोर्स सहज वापरले जाऊ शकतात व त्या वयस्क रिसोर्सला नारळ दिला जातो. प्रोजेक्ट क्रिटीकल असेल,सर्व काही नीट चालत असेल आणि क्लायंटशी रिसोर्स चा चांगला रॅपो असेल तर वयस्क रिसोर्स तग धरुन राहतात. कंपन्या सातत्याने नव नवे कोर्स त्यांच्या संकेतस्थळांवर ठेवत असतात आणि आयटी हमाल त्यांना दिले गेलेले कोर्स करत असतात, याच बरोबर क्लायंट साईडचे कोर्स आणि इतर काही टास्क असेल तर त्या देखील पास कराव्याच लागतात, कारण कंप्लायन्स. या व्यतिरिक्त इतर जगमान्य कोर्स करण्याचा दबाव हमलांवर असतोच. आत्ताच्या घडीला आयटी कंपन्या अश्या परिक्षांचा वापर करुन त्यांच्या कर्मचार्‍यांना मानसिक ताण देऊन आणि त्याला नालायक ठरवुन कंपनीतुन बाहेर कढण्यासाठी शस्त्र म्हणुन वापरतात. कठीण कोर्स असाइन केला जातो,मग त्यात वेळेचे बंधन असते आणि त्यावेळेत पूर्ण न होऊ शकणार नाहीत इतके प्रश्न अश्या परिक्षेत ठेवलेले असतात, जेणे करुन त्या परिक्षेत पास होण्याची शक्यता जवळपास नसते. मग तु कसा योग्य नाहीस हे त्याला सांगुन नारळ दिला जातो. एआय च्या कथा वाचाव्या तेव्हढ्या कमी, याचे कोर्स देखील कंपनी त्यांच्या कर्मचार्‍यांना देते असते. एका मापाची पॅंट सगळ्यांना कशी फिट होईल? :))) प्रत्येक व्यक्ती वेगळा, त्याचे नशिब वेगळे, त्याची बुद्धीमत्त्ता वेगळी, तरी सर्वांना सर्व काही आलेच पाहिजे? आणि शिकलेच पाहिजे? आपल्या इथे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या त्यामुळे माणसांना आता तशीही किंमत नाही, आणि वयस्क झालेल्यांची तर त्याहुन कमी. ज्या प्रमाणे अनेक वर्ष मेंदुची शत्रक्रिया करणारा तज्ञ डॉक्टर किडणीची शत्रक्रिया करु शकत नाही, तसेच काहीसे आयटीवाल्यांचे झालेले असते आणि वरती सांगितल्या प्रमाणे मल्टिटास्किंग मध्ये पारंगत असल्याने नविन काही शिकण्याची क्षमता गमावलेली असते. माझ्या पुरते मी घरी सांगुन ठेवलेले आहे, येणारा प्रत्येक दिवस मी परमेश्वराचा आशिर्वाद समजुन चालतो आहे, अजुन किती काळ मी तग धरु शकेन ते सांगता येत नाही, एक तर कंपनी मला काढेल किंवा मलाच ती सोडण्यास भाग पडेल. मी आनंदी राहतो, गाणी ऐकतो, चित्रपट, वेब सिरीज पाहुन ताण विरहीत राहण्याचा प्रयत्न करतो... जे होईल त्याला सामोरे जावेच लागेल, चिंता करुन काही समोर उभी असलेली परिस्थीती बदलणार नाही. इथल्या सगळ्या आयटी हमालांना पुढील चिंते मधुन मुक्ती मिळावी, त्यांना योग्य ती संधी मिळावी आणि कुठलाही आर्थिक ताण त्यांच्या आयुष्यात येऊ नये अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. [वयस्क आयटी हमाल ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sahiba... : | Aditya Rikhari, Ankita Chhetri |

In reply to by मदनबाण

प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोग्रॅम मॅनेजर, ग्रुप मॅनेजर अशी बिरूदे मिरवणारे, पण वृत्ती आणि व्यावसायिक कौशल्ये या बाबतीत बांधकामाच्या साईटवरच्या 'मुकादमाशी' स्पर्धा करणारे आयटी मधले (आठवड्याला ७० तास/ ९० तास काम फेम) लीडर्स हा स्वतंत्र धाग्याचा विषय होईल. असो.

In reply to by मदनबाण

सातत्याने मल्टिटास्किंग केल्याने त्यांच्या मेंदुची एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करुन ती त्याच गोष्टीवर ठेवण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. याचा परिणाम स्वरुप त्यांची नविन गोष्ट शिकण्याची क्षमता जवळपास पूर्णपणे नष्ट होते.
असहमत... अतिशय चुकीचे वक्तव्य... मी किंवा माझ्या पाहण्यातील कोणीही असे झालेले नाही.. आणि आता मी IT व्यतिरिक्त ३ new model वर काम करतोय, त्यातील १ तर त्या सदृश्य model डायरेक्ट जयंत नाराळीकर यांच्या समवेत काम केलेल्या शास्त्रज्ञाने बनवले आहे.. त्यांची मग रीतसर सांगून पुन्हा काम पुढे चालू केले आहे.. Science किट मध्ये असे product टाकूयात असे नाशिक-पुणे स्तिथ कंपनीची विचारना आहे.. त्या व्यतिरिक्त, मी आणखीन २ model वर काम करतोय, गार्डनिंग, वाचन हे तर मन लावून चालू आहेच.. याशिवाय share market indicator त्याचे mathematical conversion वेगळे चालू आहे, असे असंख्य.. गार्डेनिंग च्या कुंड्या रंगवने, कुठल्या झाडाला कसे कोणते खत, माती, पाणी द्यायचे हे माहीत आहे, सध्या वाढवतोय झाडे, ४० आहेत.. या व्यतिरिक्त, running, trekking, ect चालू आहे.. IT आवडत नाही म्हंटले म्हणजे मेंदू कामातून चालला आहे, हे अतिशय baseless म्हणणे आहे..

In reply to by गणेशा

असहमत... अतिशय चुकीचे वक्तव्य... जरा एआयला विचारु बघ! IT आवडत नाही म्हंटले म्हणजे मेंदू कामातून चालला आहे, हे अतिशय baseless म्हणणे आहे.. मी माझ्या संपूर्ण प्रतिसादात मला आयटी आवडत नाही असे कुठेही म्हंटलेले नाही, मी तर नॉन आयटीवाला होतो स्वीच करुन आयटीत आलो, मग नंतर टेक्नॉलॉजी देखील स्वीच केली. फार कमी व्यक्ती असतात ज्यांना जे आवडते ते करायला देखील मिळते त्यात यश देखील मिळते आणि पैसा देखील. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्याला येणारे अनुभव देखील वेगळे असतात. एकाच कंपनी बद्धल एक व्यक्ती चांगले बोलु शकतो आणि त्याच कंपनी बद्धल दुसरा व्यक्ती वाईट देखील बोलु शकतो, कारण त्यांचा त्या कंपनी बद्धल त्यांना आलेला "अनुभव" वेगळा असतो. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Отключаю телефон... : INSTASAMKA

In reply to by मदनबाण

Ok noted. असो थांबतो. दुसऱ्या विचारांचा respect आहेच..तुमचाही आहेच..
सातत्याने मल्टिटास्किंग केल्याने त्यांच्या मेंदुची एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करुन ती त्याच गोष्टीवर ठेवण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. याचा परिणाम स्वरुप त्यांची नविन गोष्ट शिकण्याची क्षमता जवळपास पूर्णपणे नष्ट होते.
परंतु तुमच्या या वरील अधोरेखीत मताला मी वयक्तिक रित्या कायम असहमत राहिल.. आणि AI जर तसेच म्हणत असेल तर मी त्या पूर्ण AI आणि त्याचा source असलेल्या सर्व जणांशी असहमती दर्शवितो.. मला तर multitasking मुळे dyanamic personality लाभलेली आहे. असो AI ला विचारले..त्याचा AI ने दिलेला शेवटचा सांराश खाली देतो : आणि AI बद्दल… AI कुठल्याही एका मताचा प्रचार करत नाही. तो उपलब्ध संशोधन, लेख, डेटा यावर आधारित सरासरी निष्कर्ष सांगतो. तुम्ही त्या निष्कर्षाशी असहमत राहू शकता — आणि ते पूर्णपणे योग्य आहे. विचारांमध्ये मतभेद असले म्हणजे शत्रुत्व नसतं — तेच तर बौद्धिक प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. - गणेशा

In reply to by गणेशा

परंतु तुमच्या या वरील अधोरेखीत मताला मी वयक्तिक रित्या कायम असहमत राहिल.. हरकत नाही, मी मांडलेले मत केवळ व्यक्तिगत अनुभवा वरुन दिलेले नाही,तर जितकं मी या विषयावर जमेल तसे वाचले आहे व व्हिडियो पाहिले आहेत तसेच डॉक्टरांचे मत देखील विचारात घेऊन मी तसे लिहले आहे. बाकी तुम्ही आयटीवाले आहात म्हणुन एआयला विचारायला सांगितले! Does multitasking affects concentration & learning ability? असा साधा सोपा प्रश्न एआयला विचारुन पाहिला तरी चालेल. बाकी एआयचाच [ Claude AI ] वापर करुन व्हेनाझुएलाच्या मादुरोला अमेरिक मेलिटरी ने पकडले होते. दुसर्‍याच्या मताचा आदर असला आणि जरी ते मान्य नसले, तरी त्या मताची किमान पडताळणी करणे हे देखील बौद्धिक प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. असो... मी आता इथेच थांबतो. जाता जाता: वाचकांसाठी काही दुवे देवुन जातो. How Multitasking Drains Your Brain Digital multitasking and hyperactivity: unveiling the hidden costs to brain health Multitasking is the Mindkiller | Dr. Lindsay Blooms | TEDxGrandJunction Key Facts on Attention Spans Over Time

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye - Afrobeat X Kalyani Priyadarshan (Video) | The Independeners | Aa Raathri | S Janaki

In reply to by मदनबाण

मदनबाण : मी माझे मत पूर्ण आदराने आणि वैयक्तिक अनुभवातून मांडले होते. त्यामुळे त्याची AI किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पडताळणी करून त्यावर “बौद्धिक प्रामाणिकपणा” अशी शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही. मत मांडणे आणि मताशी असहमत राहणे या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आणि वैध आहेत. ज्याला खरोखर थांबायचे असते, तो दुसऱ्याला अक्कल शिकवून थांबत नाही; तो विषयाला गालबोट लागू नये म्हणून थांबतो. AI पडताळणी करून काय मिळते हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणी ती करेल, कोणी करणार नाही. पण मी वैयक्तिक रित्या असहमत आहे आणि माझ्यासाठी तेवढ्यावर विषय संपतो. मला इथे-तिथे पाहा, हे करा, ते करा असा शहाणपणा अपेक्षित नव्हता.. हे म्हणजे तुम्ही असहमत आहात वयक्तिक तरी हे मत इथं बघाच हा शुद्ध हेकेखोर पणा आहे.. आणि इतके करून मग तुमच्या मताला हो असे होते म्हणायचे काय? बर करून पाहिलं, आणि तसे जरी मत आले तरी वयक्तिक मी असहमत आहे.. कृपाया प्रामाणिक पणा पण आता AI वर पडताळू नका.. आणि तुम्ही खरे माझी चूक झाली असहमती दर्शवून बास? आणि कृपा करून थांबा. आणि या उपर हि मला तुम्हाला सल्ले द्यायचे असतील तर ९९८७६७३३३२ हा नं आहे त्यावर द्या.. तुमच्या विधानाचा AI चा अहवाला : तुम्ही दिलेलं विधान पुन्हा पाहूया — “
सातत्याने मल्टिटास्किंग केल्याने एका गोष्टीवर लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते… नविन गोष्ट शिकण्याची क्षमता जवळपास पूर्णपणे नष्ट होते.”
मी याला संतुलित उत्तर देतो: १️⃣ “पूर्णपणे नष्ट होते” — हा शब्द वैज्ञानिकदृष्ट्या अचूक नाही आजवरच्या संशोधनात असा ठोस पुरावा नाही की मल्टिटास्किंगमुळे मेंदूची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. हो — पण काही परिणाम दिसतात. २️⃣ काय परिणाम होऊ शकतात? सतत task switching केल्याने deep focus कमी होऊ शकतो working memory वर ताण येऊ शकतो complex learning करताना जास्त वेळ लागू शकतो पण हे reversible असते. Brain plastic आहे — म्हणजे सवयी बदलल्या तर क्षमता परत सुधारते. ३️⃣ शिकण्याची क्षमता “नष्ट” होते का? नाही. Learning ही एकच गोष्ट नसते. जर तुम्ही सतत notifications, distractions मध्ये शिकत असाल — retention कमी होऊ शकतो पण structured focus दिल्यास शिकण्याची क्षमता टिकून राहते म्हणजेच — समस्या मल्टिटास्किंगमध्ये नाही, समस्या अनियंत्रित distraction मध्ये आहे.

In reply to by गणेशा

पूर्णपणे नष्ट होते ओके. पूर्णपणे नष्ट होते हा शब्द प्रयोग योग्य नाही हे मान्य. मला माझी चूक मान्य करण्यास कधीच लाज वाटत नाही. - मी इथे कोणाला काहीही शिकवायला येत नाही, अक्कल तर अजिबात नाही. तुम्ही माझ्या प्रतिसादास उद्देशुन प्रतिक्रिया दिलीत म्हणुन मी व्यक्त झालो, तेव्हा तसे व्यक्त झालो ही चूक असावी, यापुढे ही चूक करणार नाही! तुम्ही माझ्याशी सहमत व्हा किंवा नका होऊ त्याने मला काडीचाही फरक पडत नाही, तसेच मी फुकटचे सल्ले देत नाही! तुमच्या मता नुसार समस्या मल्टिटास्किंगमध्ये नाही, हे सांगीतलेत ते उत्तम झाले, त्यावरुन तुम्ही किती शहाणे आहात हे समजले. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye - Afrobeat X Kalyani Priyadarshan (Video) | The Independeners | Aa Raathri | S Janaki

In reply to by मदनबाण

हे शेवटचे वाक्य कशासाठी मग? पहिले प्रथम ते AI चे मत आहे जे तुमच्या मुळे मी येथे दिले.. बस करा... या नंतर एकाहि COMMENT माझ्या वर वयक्तिक लेवल वर आल्यास मी खपवून घेणार नाही... मी माझ्या विचारावर ठाम आहे, आणि मला शब्द माघे घ्यावा लागला नाही.. मी असहमती खालील विधानाला दिली होती आणि त्या साठी वयक्तिक अनुभवा वरुन मी सांगितले होते.. तुम्ही तुमच्या दोन्ही प्रतिसादा मध्ये शेवटी बौद्धिक प्रामाणिक पणा आणि शहाणे हे लिहिले आहे, आणि तुम्हाला फरक पडत नसला तर तुम्ही वयक्तिक लेवल वर असल्या छटाक भर मता साठी माझ्याशी का बोलता आहात? कृपया थांबवा, आणि असे शेलके शब्द वयक्तिक पणे पुन्हा वापरणे बंद करा..
सातत्याने मल्टिटास्किंग केल्याने त्यांच्या मेंदुची एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करुन ती त्याच गोष्टीवर ठेवण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. याचा परिणाम स्वरुप त्यांची नविन गोष्ट शिकण्याची क्षमता जवळपास पूर्णपणे नष्ट होते.

सोकाजी यांनी म्हटल्याप्रमाणे आयटी तून निवृत्त होऊन तिसर्‍या स्तरातील शहरात शेती करत निवृत्त आयुष्य घालवावे असा विचार माझाही आहे. माझी आकर्षणाची बाजू म्हणजे भारतातील कोणत्याही छोट्या शहरात पैसे कमवण्याची मजबूरी नसेल, तर करण्यासारखी खूप उत्पादक कामे (समस्या सोडवण्याच्या संधी) दिसतात. उदा. कोणत्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे घालणार्‍या गावकर्‍यांना मदत करणे, शाळेतल्या मुलांची गणित व इंग्रजीची भीती कमी करणे इ. लोक अक्षरश: सर्व बाजूंनी नाडले जात आहेत आणि सरकारी अधिकारी ढिम्म काम करत नाहीत. असे वाटते की आपल्यासारख्या विश्लेषणात गती असलेल्या माणसाला चांगले जगता येईल. फक्त गावातले लोक अतिशय वेगळ्या वातावरणात मोठे झाल्याने त्यांच्याकडून आपल्याला सुयोग्य जगण्याचा अनुभव (कंपनी) मिळेल की नाही असे वाटते. काही बदलावे याला प्रचंड विरोध व निरुत्साह, वेळ अजिबात न पाळणे व कामाच्या बाबतीत फुटात बारा इंचाचा फरक असे अघळपघळ व्यवहार. आपल्या आयटी व इंडस्ट्रीतील अनुभवात असे नसते व असा टीम मेंबर असेल तर ताबडतोब बाजूला केला जातो. तसे गावात होत नाही. गावातले लोक बेरकी व संकुचित मनोवृत्ती असलेले असू शकतात पण जवळचे व हक्काचे मित्र होऊ शकतील. गावात शांत स्थिर आयुष्य आपल्याला आवडेल असे अ‍ॅझम्पशन आहे, पण आपल्याला आवडते ते करण्याच्या मागे जाणे व ज्यात क्षमता आहे ते करणे यात दुसरे निवडणे योग्य राहील असे वाटते, कारण आवड निवड बदलू शकते, पण क्षमता बर्‍यापैकी स्थिर असतात.

In reply to by स्वधर्म

आयुष्य शहरात काढून काही दशकांनी तालुक्याच्या गावी किंवा खेड्यात जाऊन स्थायिक होणे हे डिझास्टर ठरण्याची शक्यता ९९%. गोड स्वप्न. एका महिन्यात परत येण्याची ग्यारंटी. आता काही उदाहरणे देता येतात. दाम्पत्य कसे कोंकणातल्या गावी जाऊन परसदारी उगवणाऱ्या भाज्या खातात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कचऱ्याचे खत बनवतात. पण हे अत्यंत दुर्मिळ अपवाद असतात हे लक्षात ठेवलेलं बरं. गावाकडे आपलं निसर्गाच्या कुशीतलं घर.. अशा स्वप्नाला विकत घेऊन अनेकांनी घरे बुक करून ठेवली आहेत. ओसाड पडलेल्या अशा रिकाम्या कॉलन्या बऱ्याच गावांत सापडतील. स्वयंपूर्णतेचे प्रयोग बहुतांश वेळा फसलेले आहेत. शहरी मेट्रो झाड असे उपटून गावात रोवता येत नाही.

In reply to by गवि

खेड्यात जाऊन स्थायिक होणे हे डिझास्टर ठरण्याची शक्यता ९९%. एवढे सोपे मुळीच नाही, लोकांनी रेण्ट करावे अनुभव घ्यावा मग इन्वेस्ट करावे

In reply to by कपिलमुनी

+१ मेट्रो सिटीत आयुष्य काढलेल्याना आपण फार टॅलेंटेड/श्रीमंत/पुढारलेल्या विचारांचे नी गावाकडची लोक साधीभोळी/गरीब/मागास विचारांची असा गोड गैरसमज असतो, तो खाडकन उतरतो, नी मोठा कल्चरल शॉक बसतो.

In reply to by गवि

आयुष्य शहरात काढून काही दशकांनी तालुक्याच्या गावी किंवा खेड्यात जाऊन स्थायिक होणे हे डिझास्टर ठरण्याची शक्यता ९९%
परसेंटेज देऊन इतक्या खात्रीने मत मांडलं आहे त्याअर्थी त्याला काही आधार नक्कीच असावा. असं डिझास्टर होण्याची कारणं काय असावीत? असं होणार नाही असं मत असणाऱ्यांचे, लक्षात न घेतलेले मुद्दे समोर येऊन त्याने परस्पेक्टीव्हमधे बदल होण्यास मदत होईल. - (गावात रोवलं जाण्यास उत्सुक मेट्रो झाड) सोकाजी

In reply to by सोत्रि

असं होणार नाही असं मत असणाऱ्यांचे, लक्षात न घेतलेले मुद्दे समोर येऊन त्याने परस्पेक्टीव्हमधे बदल होण्यास मदत होईल.
अवश्य. कोणी तसा प्रयत्न करून वर्षभर रहात असतील तर अनुभव ऐकायला आवडेल. आणि उलट न जमलेले लोक असतील त्यांची संख्या आणि अनुभव देखील आल्यास उत्तमच.

In reply to by सोत्रि

पुर्ण खेड्यात रहण्यापेक्षा जवळच्या तालुका प्लेस जवळ रहावे , जिथून शहर ५-६ किमी आहे , माझे चार आणे - खेड्यात घरकामाला बायका मिळत नहीत . मिळाल्या तरी शेती , मयत , लग्न इत्यादी कामाला १०-१० दिवस सुट्टि घेतात.

In reply to by कपिलमुनी

खेड्यात/ छोट्या शहरात कामे पैशाच्या बळावर नाही तर संबंधांच्या बळावर होतात, तसेच काम चालू असताना त्याना सतत एंटरटेन करत रहावे लागते, अन्यथा ते बोर होऊन पळ काढतात, पैसा फेकतोय म्हणजे काम होईल असे तिकडे नसते.

In reply to by कपिलमुनी

खाली एका प्रतिसादात अशाच आशयाचा मुद्दा मांडला आहे. सहमत आहे. तालुका किंवा जिल्हा बेटर.

In reply to by गवि

खेड्यात जाऊन स्थायिक होणे हे डिझास्टर ठरण्याची शक्यता ९९%. गोड स्वप्न. एका महिन्यात परत येण्याची ग्यारंटी
माझ्या माहितीतल्या एकाने पश्चिम महारष्ट्रात गावी घर बांधले तो तिथे रीटायर्ड लाईफ जगायला गेला होता. काही दिवस लोकानी ओळखी करून घेतल्या त्या नंतर मात्र लोक त्याच्याकडे पैशे उसने मागायला येवू लागले. त्याला कंटाळून त्याने ते गाव सोडले.

In reply to by गवि

>> डिझास्टर ठरण्याची शक्यता ९९% माझ्या बाबतीत मी जिथे पहिली वीस वर्षे वाढलो तिथेच जाणार आहे. शेत नंतर घेतले जे लहानपणच्या सांगलीतील घरापासून १० किमीवर आहे. शहर फार मागास किंवा फार लांबही नाही. त्यामुळे बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स असे असू शकेल. सेंद्रीय शेती अभ्यास गटातील लोकांकडून थोडे फार शिकून अन्न पिकवता आले तर चांगले. त्यात बाजूच्या शेतकर्‍यांपासून काहीसा त्रास/ विरोध होण्याची शक्यता आहे. अजूनही हळव्या करणार्‍या आठवणी व मित्र २५ पर्यंतचेच आहेत. २५ - ३० वयानंतरची कार्पोरेट मधली सगळी नाती सेलो टेप रिलेशन्स असतात असा अनुभव आहे. नोकरी बदलली की एक दोन वर्षात विरून जातात. घरचे लोक मात्र तिकडे येणार नाही असे म्हणत आहेत. त्यांचे सगळे मैत्रीसंबंध पुण्यासारख्या मोठ्या शहरात आहेत. त्यामुळे एकटे राहणे हाही एक घटक आहे. पण मला स्वतःला तिथे कसे वाटेल हे काही महिने राहिल्याशिवाय समजणार नाही. तो प्रयत्न नक्की करणार.

In reply to by स्वधर्म

सांगली, कोल्हापूर, बेळगाव, सातारा इथे किंवा इथून दहा किलोमीटर्सवर म्हणजे खेडेगाव मुळीच नव्हे हल्ली. शहरातच राहण्यासारखे आहे. सारखे काय, शहरात राहणेच आहे.

In reply to by गवि

सांगली सातार्‍यात अजूनही शांतता आहे व वाहतूक कोंडी नाही. लोकांना संबंध ठेवण्यासाठी संध्याकाळी भेटणे सहज शक्य असते. सगळी कामाची ठिकाणे १५ मिनीटांवर असतात. ओळखी वर खूप कामे होतात. यामुळे ताण खूप कमी होतो असे तिथल्या लोकांच्या जीवनशैलीवरून जाणवते. उदा. त्यांना संगीत किंवा बागकामासाठी वेळ असतो. पण जाऊन काही महिने राहिल्याशिवाय खरे समजणार नाही हे मान्य आहे.

In reply to by स्वधर्म

बरेच दिवस तुम्ही तिकडे गेला नाहित बहुतेक .या शनिवारीच एका लग्नाला गेलो होतो. कोयनानगर (कराड) वरुन कोकरुड फाट्याला जायला ३ तास लागले.

In reply to by धर्मराजमुटके

डिसेंबर मध्ये गेलो होतो. छान वाटले. तुंम्ही म्हणता तसा अनुभव क्वचित कधीतरी येतो. धार्मिक कार्यक्रम, राजकीय निवडणूक वगैरे असेल तर असे होऊ शकते. पण पुण्या मुंबईत वाहतूक कोंडी रोजचीच आहे. हिंजवडीला जाऊन येऊन अनुभव आहे. पुण्यात सुट्टी काढली तरी सकाळी एक आणि दुपारी एक एवढेच बाहेरचे काम होऊ शकते असा अनुभव आहे. शक्यतो ५ किमी च्या पुढे कुठेही वेळेत पोहोचणे अवघड असते. तुंम्हाला त्यादिवशी एवढा वेळ लागला, पण का लागला? काही नैमित्तिक कारण होते की प्रत्येकालाच नेहमी एवढा वेळ लागतो?

आमचे काका आमच्या कोकणातील वडिलोपार्जित घरी जाऊन राहण्याचा सहा महिने प्रयत्न करून आता डिसेंबर २५ मध्येच मुंबईत परत आले. त्यांचे काही अनुभव-- पावसाळ्यात वीज गेली तर तीन चार दिवस कोणी फिरकत सुद्धा नाही. तेंव्हा इंटरनेट सोडाच मोबाईल सुद्धा रिचार्ज करणे कठीण होते. विजेचे वोल्टेज कमीजास्त होत असल्याने मुळे ट्यूबलाईट फार लवकर जातात साधी साधी कामे करण्यासाठी लोक अव्वाच्या सव्वा पैसे मागतात त्यातून तुम्ही मुंबईचे पैसेवाले लोक थोडेसे पैसे आम्हाला मिळाले तर काय बिघडते हा ऍटीट्युड. आमचे गाव मुंबई गोवा हमरस्त्यावर अतिशय प्रसिद्ध म्हणजे श्री क्षेत्र परशुराम आहे. आजारी पडलात तर सर्वात जवळचा डॉक्टर १३ किमीवर चिपळूण येथे. पडला झडला तर तुम्हाला उचलून दवाखान्यात नेणे हि सोपी गोष्ट नाही. साध्या साध्या आजारपणासाठी लागणारी औषधे सुद्धा चिपळूण हुन आणावी लागतात. वृत्तपत्रे वेळेत येत नाहीत. इंटरनेट खात्रीशीर चालत नाही. दोन मिनिटे इंटरनेट चालत नसल्यास चिडचिडी होणारी शहरी माणसे तेथे कशी टिकाव धरणार. हवा आणि पाणी शुद्ध आहे पण बाकी पायाभूत सुविधा यांची स्थिती अजून सुधारलेली नाही. संध्याकाळी किडे, साप घुसण्याची शक्यता भरपूर. गॅस सिलिंडर चिपळूणला स्वतः जाऊन आणायला लागतो वानरांचा त्रास होत असल्याने आम्ही घराला GI पत्रे लावले आहेत. त्याचा पावसाळाभर ताशा वाजत राहतो. गावात कुणाची हळद, बारसं, लग्न असेल किंवा कुठचाही उत्सव असेल तर दिवसभर बोम्बल्या (लाऊडस्पिकर वाजत राहतो) गावच्या शांत वातावरणात हा आवाज अतिशय त्रासदायक असतो. तक्रार करण्याची सोय नाही कारण तुमचे १२५ वर्ष जुने घर असले आणि तुमचे (काकांचे) बालपण तिथे गेले असले तरी तुम्ही उपरेच असता. तुमच्या बरोबरचे अर्धे लोक वर गेलेले असतात किंवा आता संसाराची जबाबदारी मुलांच्या खांद्यावर जाऊन दात पडलेल्या सिंहा सारखे जगत असतात. परशा सुताराचा मुलगा रामचंद्र आता तुम्हाला भीक घालत नाही. कारण तुमच्या छोट्याशा कामासाठी त्याला वेळ नसतो. मोठे काम काढले तर मोठ्या उत्साहाने येतात. ऍडव्हान्स म्हणून पैसे घेतात आणि दुसरीकडे काम चालूच ठेवतात. मग तुम्ही त्याच्या मागे बाबापुता करत राहा. ठाणे ते चिपळूण रेल्वेचे भाडे १७० रुपये आहे. चिपळूण स्टेशन ते परशुराम रिक्षावाले २५० रुपये घेतात. हि सर्व परिस्थिति हमरस्त्यावर असलेल्या गावाची आहे. आडमार्गी असलेल्या गावात जेथे दिवसात दोनच एस ट्या जातात तेथील स्थिती तर अजूनच वाईट आहे. एक ना दोन अनेक कारणे आहेत चार दिवस उत्सवासाठी गावात जाणे आणि कायमचे जाऊन राहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ते आमच्यासारखाय मुंबईत जन्माला आणि वाढलेल्या लोकांना अशक्य आहे. स्वप्नरंजन म्हणून ठीक आहे

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरांनी परफेक्ट मांडले आहे . उपरेपणा जाणवतो , कितिहि प्रयत्न केलात तरी कायम स्वरुपी वास्तव्य असले कि वेलकम नसते . शहरात ज्या गोष्टी गृहीत धरलेल्या असतात , त्या तिथे मिळत नाहीत , आयुष्य संथ असते , पैसे दिले की पटकन काम होइल याची खात्री नसते, त्यामुळे शहरी माणसांनी मूळ गावी जायचे तर बरच मानसिक त्रास सोसायची तयारी ठेवावी आणि खिसा कोणाला दाखवू नये , लोक लुबाडतात . अमच्या एका परीचितांनी देउळ जीर्णोद्धार , उत्सव देणगी , शाळेला मदत वगैरे केली जेणे करून मुख्य प्रवहात सामील होता येइल , पण लोकांनी योग्य वेळेस हिसका दाखवलाच.