घनदाट जंगल, मध्यरात्र उलटून गेली होती. ती रात्र नुसती अंधारी नव्हती, काळाकुट्ट अंधार, डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही, असा तो गडद अंधार, आकाशात चंद्र नव्हता आणि ता-यांचे अस्तित्व ढगाआड होते. स्मशानाकडे जाणाऱ्या त्या वाटेवर भयाण शांतता पसरलेली होती. हवेतील गारठा वाढत होता, वारा नव्हता, तर धारदार शस्त्रासारखा तो वारा बोचत होता. झाडांच्या फांद्या एकमेकांना घासून विचित्र आवाज येत होता. मधूनच घुबडांचा आवाज घूं घूं आवाज आणि लांडग्यांचे रडण्याने काळजाचा ठोका चुकावा अशी ती रात्र. वाळलेल्या पानांवरून चालताना होणारा कड-कड आवाज जसे काही कोणीतरी अदृश्य शक्ती, राजा विक्रमदित्याचा पाठलाग करीत असावी.
![]() |
विक्रम आणि वेताळ |
जस जसा राज़ा विक्रमादित्य स्मशानाजवळ पोहचला तसे ते दृश्य अधिकच भितीदायक झाले. जळणाऱ्या चितांचा लालसर-पिवळा प्रकाश अंधाराला चिरत होता, पण तो प्रकाश दिलासा देण्याऐवजी भिती वाढवत होता. स्मशानात फुटणाऱ्या कवट्यांचा आवाज जीवघेणा होता. कवट्या नुसत्या फुटत नव्हत्या, कवट्या चालत होत्या, उड्या मारुन राजा विक्रमादित्याच्या पाठीमागे वाटेल तशा घरंगळत होत्या. जंगलात काहीतरी जळल्याचा एक उग्र वास पसरला होता. वडाच्या झाडावर टांगलेला वेताळ त्याचे लाल डोळे आग ओकत होते. वेताळाच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य, कपाळावर वृद्धत्वाच्या आणि अनुभवी रेषा स्पष्ट दिसत होत्या. मांत्रिकाच्या कटामुळे राजा विक्रमादित्या इथपर्यंत पोहचला हे वेताळाला कळले होते. वडाला उलटे लटकलेल्या वेताळाला घेऊन राजा विक्रम अंधाऱ्या वाटेवरून घेऊन निघाला तेव्हा वेताळाच्या थंड स्पर्शाने राजा विक्रमाच्या शरीरात शिरशिरी भरली. वेताळ खांद्यावर स्थिर होता, पण त्याची वाचा शांत राहिली नाही.
"राजा विक्रमा, तू मोठा धीरगंभीर आहेस यात शंका नाही, पण तू इतका थकलेला दिसतोस की, तुला थोडा विरंगुळा मिळावा म्हणून मी तुला आज ‘मिपानगरीच्या ‘ अनेक अनोख्या वादापैकी एका वादाची गोष्ट सांगतो. पण नियम आठव, जर तू मौन सोडलेस आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस, तर तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील. आणि जर तू उत्तर माहीत असूनही दिले नाहीस, तर तुझ्या वंशाचा नाश होईल."
विक्रमाने केवळ मान हालवली, आणि वेताळ गोष्ट सांगू लागला. "प्राचीन मिपानगरी राज्यात राजा नीलसेन आणि प्रशानसेन नावाचे दोन भाऊ मिळून राज्य करत होते. सोबतीला चतुर, विद्वान सल्लागारही होते, दरबारात, सल्लागारांचा मोठा दबदबा होता. हे राज्य समृद्ध आणि शांत होते, पण अलीकडे तेथे एक मोठे सामाजिक आणि धार्मिक वादळ उठले होते, ज्याचे केंद्रस्थान होते - जानवं."
तर, मिपानगरीत परंपरावादी या गटाचे नेतृत्व 'ऋषी तपस्वी' करत होते. हिमालयामध्ये त्यांनी एका पायावर उभे राहून 'द्राक्षासव' घेत राज्याचं रक्षण केलं होतं, म्हणून लोक त्यांना 'तपस्वी' म्हणायचे. हजारो वर्षापासूनचा धर्म केवळ 'तपस्वीमुळे' टिकला अशी वंदता होती. तपस्वी यांचा आग्रह होता की, जानवं ही केवळ पवित्र धाग्याची गोष्ट नाही, तर ती हजारो वर्षांपासून चालत आलेली वर्णव्यवस्थेची आणि शुद्धीकरणाची अनिवार्य खूण आहे. त्यांचे म्हणणे होते की जानव्याचे नियम, ते कोणी घालावे आणि कोणी घालू नये, हे शास्त्रात स्पष्ट दिले आहेत आणि त्यात कोणताही बदल करणे म्हणजे धर्माचा आणि परंपरेचा अपमान आहे, अशा वेळी टिंगल टवाळी टाळली पाहिजे आणि अशा टींगलबाजांना आवरलं पाहिजे अशी त्यांची मागणी होती.
'अबे फोकलीच्या, तुझ्या शेण-गोमूत्राचे आणि अध्यात्माचे 'पो' कुठेही नेऊन टाक, पण इकडे टाकू नको' अशीही एका पक्षकाराची या वादात मागणी होती. पण, दोन पक्षकारांच्या वादात आम्ही तिस-या पक्षकारांचे म्हणने आम्ही ऐकून घेणार नाही, अशी तंबी दोन बेंचच्या खंडपीठाने दिली होती. त्यामुळे तुम्हाला काही सांगायचं असेल तर स्वतंत्र दाद मागा असे न्यायविभागाचे मत होते. त्यामुळे, तटस्थ तिस-या पक्षास गप्प बसावे लागले होते.
आधुनिक विचारवंत, वाटणारे आणि आपल्या मतावर ठाम न राहणारे आणि ज्यांच्यामुळे हा वाद निर्माण झाला ते प्रकाड विद्वान पंडित प्रकाश अंधारदिवे होते. अंधारदिवे यांचा युक्तिवाद होता की, जानवं हे मुळात बंधन होतं, ते एका एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित ठेवणे म्हणजे भेदभाव आणि अन्याय आहे. जानवं ज्ञानाचे आणि पवित्रतेचे प्रतीक असेल, तर ते प्रत्येकाला मग स्त्री-पुरुष, कुठल्याही जाती-धर्माचे असो, परिधान करण्याचा समान अधिकार असावा. ज्याला ते शुद्धतेने आणि नियमानुसार धारण करण्याची इच्छा असेल त्याने 'प्लासिबो' इफेक्ट म्हणून जानवं नव्हे तर, काय गंडे, ताडे, तोडे, लिंबू-मिरच्या घालायचे ते घालावे असे त्यांचे म्हणणे होते. 'प्लॅसिबो' इफेक्टपेक्षा बियर इफेक्ट जास्त आहे, असे कोणी तरी दरबारात हळू आवाजात बोललं होतं.
"हा वाद इतका वाढला की, रोज राजदरबारात याच विषयावर चर्चा झडे. परंपरावादी म्हणायचे, की 'धागे आणि दोरे' कोणतेही असले तरी टिंगल करू नये, अशा टीका चर्चा धर्माला भ्रष्ट करत आहेत !' तर आधुनिक विचारवंत म्हणायचे, ' ऋषी तपस्वी, जुने आणि अजागळ असल्यामुले ते लोकांना जुन्या बेड्यांमध्ये बांधून ठेवत आहेत. अंधश्रद्धा पसरवत आहेत, अशा लोकांना तडीपार करून एखादी गावाबाहेर 'सनातन' नावाची पाच पन्नास हेक्टर जागा द्यावी आणि तिकडेच तो प्रचार करावा, असे ते मत होते.
राजा निलसेन आणि प्रशानसेन या वादामुळे गोंधळात पडले. गोंधळ, वाद, कोर्टकचे-या, व्यनी-मनी या राज्यात तसा नवे नव्हते. प्रशासन आतून परंपरावादीच आहेत, अशी शंका काहींना होती, आतल्या गोटात कायम तशी कुजबूज होती. परंपरा, धर्म उत्सवाच्या बेड्या यांनाही तशा मोडायच्या नव्हत्या, पण दरबारी सल्लागार, चतुर विद्वानाच्या दडपणामुळे निर्णय घेता येत नव्हते. अधून-मधून अशा धर्म बुडव्या लोकांना आठ पंधरा दिवस जेलात टाकले जायचे. अर्थात, समानता आणि न्याय ही तत्त्वेही प्रशासनास 'कधी-कधी' महत्त्वाची वाटत असली तरी, परंपरा, वगैरेचे ते अभिमानीच होते, असे आता मागे वळून पाहता म्हणता येते. मागे वळून पाहता येते म्हणाल्यावर, राज्या विक्रमादित्य मागे वळून पाहणार तोच वेताळ म्हणाला ''अरे, विक्रमा ही बोलायची गोष्ट असते, असे लगेच मागे वळून पाहिल्यावर काही दिसत नसते. सगळं डिलिट झालेलं असतं; अगदी खात्यासहित आणि लेखनासहित'' दोघांच्याही चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं होतं.
एके दिवशी ऋषी तपस्वी यांनी जाहीर केले की, मला राज्यातून काढून टाकावे. सारखा धर्माचा अपमान मला सहन होत नाही. आपलं राज्य परंपरावादी, सनातनी, आहे तसं देवाळु राहिलं पाहिजे. वाटल्यास थंडीच्या दिवसात माझ्या हाडाची काडं शेकोटीला देईन, पण अधर्मी लोक सहन करणार नाही. प्रशासन आणि राजाला धमकी दिली की, 'जर हे असेच चालत राहिले तर, सर्व परंपरावादी मिपानगरी सोडून जातील आणि राज्यावर मोठं संकट येईल. धार्मिक प्रकोप होईल. सूर्य उगवणार नाही. समुद्राला भरती येऊन पृथ्वी जलमय होऊन जाईल. अशा, अधार्मिक लोकांमुळे लोक मिपानगरीत येत नाहीत. परंपरावाद्याचं एक दडपण प्रशासनावर आलं. राजा निलसेन आणि प्रशानसेन सारखे मिपानगरीत येरझारे, मारत असायचे. दरबारातले चतुर सल्लागार अशावेळी नेमकं, 'सध्या ट्राफिकमधे आहे, नंतर बघतो' 'खासगी कामात व्यग्र आहे' अशी कलटी मारायचे आणि 'राजा जो निर्णय घेईल ते मान्य' असे म्हणून सुटका करून घ्यायचे. राजास दोन्ही गट शांत करायचे होते, पण प्रजा कशा प्रकारे शांत करावी हे त्यांना कळत नव्हते.
वेताळाने गोष्ट इथेच थांबवली. त्याने राजा विक्रमाकडे तिरकस नजरेने पाहिले आणि विचारले, "राजा विक्रमा, मला सांग. राजा निलसेन आणि प्रशानसेन यांनी न्याय,समता आणि पारंपरिक विचारांचा मध्य साधण्यासाठी काय निर्णय घ्यायला हवा ? परंपरावाद्यांची बाजू घेऊन जानव्याचा धागा अप्रकाशित करावा ? की चर्चा पुढे चालू ठेवावी ? कोणता निर्णय मिपानगरीला शांती देईल आणि धर्म आणि आधुनिकतावादी एकत्र नांदतील ?
राजा विक्रमाचे मौन तुटले, तो शांतपणे म्हणाला, "वेताळा, राजा नीलसेन आणि प्रशानसेनचा प्रश्न केवळ जानव्याचा नव्हता, धर्मावर होणारी टीका छुप्या मार्गाने थांबवायची की आधुनिक जगाबरोबर जायचं याचा निर्णय होत नव्हता. राजा नीलसेन आणि प्रशानसेन धर्मवादी असले तरी, राज्यात गोंधळ नको या मताचेही ते होते. मिपानगरीत शांती तेव्हाच नांदेल, जेव्हा वादांचे धागे अप्रकाशित होतील आणि मिपा धर्माची तत्त्वे धोरणानुसार जपली जातील, त्याचबरोबर आधुनिक विचारांचेही लोक 'सामाजिक विषमतेच्या' भिंती तोडताना कोणाला दुखावणार नाहीत, आधुनिक जगात मिपानगरीच्या संविधानाचे पालन व्हावे हाच खरा धर्म आहे."
राजा विक्रमदित्याचं उत्तर ऐकून वेताळ हसून म्हणाला, "राजा विक्रमा, तू खरंच हुशार आहेस आणि अगदी न्यायपूर्ण उत्तर दिले. पण म्हणून तू नियम तोडला आहेस !" आणि 'धम्म' असा आवाज झाला. राजाच्या खांद्यावरून वेताळ निसटला आणि वेगाने आपल्या आवडत्या वडाच्या झाडाकडे विराट हास्य करीत निघून गेला.

प्रतिक्रिया
हा हा हा हा हा हा हा
बाई.. सकाळी सकाळी खो खो हसत
एक मिपाकर म्हणून खेद वाटला.
ते स्मशान
झकास लेख आहे सर...
बाय द वे : आपला लेख असा
बाय द वे : आपला लेख असा मोठ्या टाईपात येण्यासाठी कुणाकडे अर्ज करायचा?
धडा मिळाला, धडा घेतला, धडा
With no regrets...
हॅ हॅ
खिक्क! धागा उडाला हे लक्षात
आतापर्यंत च्या माझ्या उपक्रम
धार्मिक भावना, गळवे वगैरे ...
काही तटस्थ लोकांना मोदींयुगात
हॅ हॅ हॅ हॅ
तेथे पाहिजे जातीचे
आभार.
हा हा हा...
नवीन डेटा पॅक दे रे!
इथे पण याचना ?
सलील कुलकर्णी यांना विचारा...
सन्मानाने जगण्यासाठी माणसाला
आभार...
हा लेख योग्य की ती प्रतिज्ञा योग्य
आभार...
मिपाकरांनी हा लेख योग्य
बाकी, वस्तुनिष्ठ प्रश्न
नव्या वर्षात नवीन रूपात
Yes