✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सर्वोच्च झेप

श
श्रीरंग_जोशी यांनी
Tue, 10/09/2012 - 10:55  ·  लेख
लेख

काही माणसे जगावेगळे करून दाखवायलाच जन्माला आली असतात. साहसी वृत्ती त्यांच्या रक्तातूनच वाहत असते. अश्या वृत्तीला जर दुर्दम्य इच्छाशक्ती, जीवापाड मेहनत करणे, झोकून देण्याची तयारी, खंबीरता, संयम व त्याग या गोष्टींची साथ लाभली तर पूर्वी कधीही न घडलेले घडवून आणता येते.

अशीच माणसे सर्वप्रथम माउंट एव्हरेस्ट च्या शिखरावर पोचू शकतात, इंग्लिश किंवा तत्सम खाडी पोहून जाऊ शकतात, उत्तर व दक्षिण धृवावर झेंडा फडकवू शकतात, मारियाना गर्त्याच्या तळाशी पोचू शकतात. असाच एक माणूस आहे फेलिक्स बॉमगार्टनर. ऑस्ट्रियाचा रहिवासी असलेला फेलिक्स ४३ वर्षे वयाचा आहे व काही तासांतच त्याच्या आजवरच्या सर्वात महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या यशस्वितेसाठी तो झेपावणार आहे. त्याला पाठबळ आहे विज्ञानातील विविध शाखांच्या तंत्रज्ञांचा समावेश असलेल्या त्याच्या टीम चे.

तर हि मोहीम आहे भूपृष्ठापासून १ लक्ष २० हजार फूट (३६.५ किमी) उंची वरून स्काय डाइव्ह करणे. मौजमजेसाठी स्कायडाइव्ह करणारे अंदाजे १०-११ हजार फुटांवरून उडी मारतात व ५ हजार फुटांच्या आसपास पॅराशूट उघडतात. या उंचीच्या जवळ जवळ १२ पट उंचीवरून फेलिक्स जमिनीकडे झेपावणार आहे. हा प्रश्न केवळ पटींचा नाहीये कारण भूपृष्ठापासून जितके उंच जाल तितके तापमान कमी व वातावरणाचा अधिक दाब असे गुणोत्तर असते. एवढ्या उंचीवरून आजवर कुठल्याही मानवाने उडी मारलेली नाहीये. याअगोदरचा सर्वोच्च विक्रम आहे जोसेफ किट्टिंजर यांच्या नावावर - १ लक्ष २ हजार ८०० फूट (३१.३३ किमी). अन हा विक्रम १९६० साली करण्यात आला होता.

स्ट्रॅटोस

अगोदरच्या चाचणीच्या वेळी काढण्यात आलेले छायाचित्र

फेलिक्सच्या या प्रकल्पाचे नाव आहे स्ट्रॅटोस. एनर्जी ड्रिंक बनवणारी रेड बुल ही कंपनी याची प्रायोजक आहे. यामध्ये वापरली जाणारी महत्त्वाची संसाधने म्हणजे एक कुपी जी हिलियम वायू भरलेल्या बलूनच्या साहाय्याने फेलिक्सला आकाशात नेईल. या मोहिमेसाठी विशेष बनविला गेलेला स्पेस सूट, पॅराशूट व इतर अनेक तांत्रिक उपकरणे. स्थळ असणार आहे, अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील रॉसवेल. तेथील स्थानिक वेळेनुसार ९ ऑक्टोबर च्या सकाळी ६ वाजता मोहिमेला सुरुवात होईल. अर्थात हवामानात प्रतिकूल बदल न झाल्यास.

उपकरणे

या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फेलिक्सचा वेग आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक असणार आहे. अंदाजे अकराशे दहा किमी / तास. आंतरखंडीय प्रवासी विमाने या वेगापेक्षा अधिक वेगाने सहसा चालविली जात नाही. हि मोहीम यशस्वी झाल्यास नवा विक्रम तर बनेलच पण कितीतरी महत्त्वाची शास्त्रीय माहिती हाती लागेल. त्याचा उपयोग अवकाश मोहिमांमध्ये आणीबाणीच्या प्रसंगी करता येईल.

पण या सर्व बाबी कितीही आकर्षक वाटत असल्या तरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हि मोहीम यशस्वी होईलच याची संपूर्ण खात्री कोणीच देऊ शकत नाही. कुठलाही बिघाड, फेलिक्सच्या हातून घडलेली चूक वा अनपेक्षित आव्हान याची परिणिती सरळ फेलिक्स च्या मृत्यूमध्ये होवू शकते. उदा. वातावरणाचा दाब वा फ्रीफॉल चा वेग फेलिक्सच्या स्पेस सूटला सहन न झाल्यास फेलिक्सच्या शरीरातील रक्त व इतर द्रव्यात अत्यंत धोकादायक बुडबुडे निर्माण होवू शकतात किंवा मेंदूचाही स्फोट होवू शकतो. अर्थात असे होवू नये म्हणून फेलिक्स व त्याच्या टीमने जवळ जवळ तीन वर्षे राबून मोहिमेची आखणी केली आहे व कमी उंचीच्या दोन चाचण्याही केल्या आहेत. पण एवढ्या उंचीवरून हि पहिलीच उडी असणार असल्याने सर्वच बाबी अचूक असतील याची खात्री कुणीच देऊ शकत नाही.

प्रोजेक्ट स्ट्रॅटोस

फेलिक्स ने आजवर पार पाडलेल्या मोहिमांपैकी काही मोहिमा पाहिल्यास आपल्यालाही या मोहिमेच्या आश्वासकतेबाबत अधिक विश्वास वाटेल.

१. पेट्रोनस टॉवर्स, कौलालंपूर व तायपेयी १०१, तैवान अश्या अती - उंच इमारतींवरून यशस्वी बेस जंपिंग

२. ओमान मधील एक कमी व्यासाची दरी व ब्राझील मधील ख्रिस्ताच्या पुतळ्यावरून बेस जंपिंग

३. विमानातून उडी मारून ब्रिटिश खाडीवरून कार्बन फायबर विंग्ज (हे पॉवर विंग्ज नाहियेत) च्या साहाय्याने ३५ किमीची ब्रिटिश खाडी पार करणे.

४. सध्याच्या मोहिमेसाठीच्या चाचण्यांसाठी प्रथम ७१,५८१ व नंतर ९६,६४० फूट उंचीवरून यशस्वी स्काय डाइव्ह केले आहे. त्यात आज वापरली जाणारीच उपकरणे वापरली गेली होती.

या मोहिमेमागे वर्षानुवर्षांची अवघड तपस्या आहे. फेलिक्स व त्याच्या टीमचे अनेक महिन्यांपासून दिवस रात्र सुरू असलेले परिश्रम आहेत. अन जगभरातील चाहत्यांचा सदिच्छा आहेत. चला तर मग आपणही या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रार्थना करूया.

या मोहिमेचे आंतरजालावर व जगातील अनेक देशांतील वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण होणार आहे.

स्रोत - प्रोजेक्ट स्ट्रॅटोस चे संस्थळ, विकी व जालावरील बातम्या.

सर्व माहिती व चित्रे जालावरून साभार.

प्रोजेक्ट स्ट्रॅटोसचा दुवा - रेड बुल स्ट्रॅटोस;  यावर उलटगणतीचे घड्याळ सुरू आहे.

बातम्या - १, २, ३

चित्रफीत - फेलिक्सचे निवडक कारनामे.

अवांतर -

१) हॉट एअर बलूनने सर्वोच्च उंची गाठण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर आहे. रेमंड कंपनीचे संस्थापक श्री विजयपत सिंघानिया यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये ६९००० फुटांची उंची गाठली होती.

२) शीतल महाजन यांनी उत्तर व दक्षिण धृवावर यशस्वी पॅरा जंपिंग करण्याचा विक्रम केला आहे. गैर-व्यावसायिक गटात मोडणाऱ्या एकाच स्त्रीने या दोन्ही मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडणे हाही एक विक्रम आहे.

टिप: या मोहिमेस भारतीय प्रसारमाध्यमांनी विशेष प्रतिसाद न दिल्याने मराठी आंतरजालाच्या वाचकांसाठी हा लेखनप्रपंच ऐन वेळी हाती घेतलाय. वर लिहिलेली सर्व माहिती व तिचे विश्लेषण अचूक असेलच याची खात्री प्रस्तुत लेखक देऊ शकत नाही.

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
16899 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

वा.. उत्तम .. अभिनंदन! त्याचे

ऋषिकेश
Mon, 10/15/2012 - 11:42 नवीन
वा.. उत्तम .. अभिनंदन! त्याचे फिलिक्स कसला फिनिक्स असे नाव ठेवायला हवे! श्रीरंग जोशी यांचे विशेष आभार!
  • Log in or register to post comments

जाम भारी माहिती, माझ्या

५० फक्त
Mon, 10/15/2012 - 11:50 नवीन
जाम भारी माहिती, माझ्या वजनाचा विचार करता मला अशी संधी मिळाल्यास मी यापेक्षा दुप्पट वेगाने खाली पडेन, आणि मिनी / मायक्रो लोणार निर्माण होईल असं वाटतं.
  • Log in or register to post comments

हा हा...

दादा कोंडके
Mon, 10/15/2012 - 12:56 नवीन
माझ्या वजनाचा विचार करता मला अशी संधी मिळाल्यास मी यापेक्षा दुप्पट वेगाने खाली पडेन
दोन वेगवेगळं वस्तुमान असणार्‍या गोष्टी एकाच उंचीवरून सोडल्या असता एकदमच खाली पोहोचतील असं वाचल्याचं स्मरतं. अर्थात धोतर किंवा लुंगी घालून उडी मारल्यास फरक पडेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पुढच्या

चिरोटा
Mon, 10/15/2012 - 11:57 नवीन
पुढच्यावेळी हिलियन बलून मध्ये रॉबर्ट,खुर्शिद्,गडकरी,मनमोहन,पवार ह्यांना बसवा.
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Mon, 10/15/2012 - 13:51 नवीन
एका थरारक प्रयोगाच्या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद! फिलिक्सचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

+१

मी_आहे_ना
Mon, 10/15/2012 - 14:17 नवीन
असेच म्हणतो, फिलिक्सचे अभिनंदन आणि जोशीबुवांना धन्स.... 'थेट' प्रक्षेपण नाही बघितले, आता क्लिप्स बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+२

मूकवाचक
Tue, 10/16/2012 - 13:21 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जबरदस्त

निशदे
Mon, 10/15/2012 - 19:02 नवीन
नुसते प्रक्षेपण बघतानाच अंगावर काटा आला होता. असल्या साहसाला मुजरा..........
  • Log in or register to post comments

श्रीरंग, मस्त लेख,

संजय क्षीरसागर
Mon, 10/15/2012 - 23:18 नवीन
पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत विनम्रपणे फिलिक्सने सांगितले की अश्या आत्यंतिक उंचीवर पोचल्यावर सर्वप्रथम होणारी जाणीव म्हणजे विश्वाच्या अनंततेपुढे आपले अस्तित्व किती क्षुल्लक आहे
हे सहाजिक आहे, पण
प्रेशर सूटमुळे व अवकाशातील जवळ जवळ निर्वात पोकळीमुळे व तुलना करण्यासाठी कुठलेच दुवे नसल्याने शरीराला वेगाच्या तीव्रतेची अनुभूती होत नव्हती परंतु डोक्यात चालणाऱ्या विचारांद्वारे मात्र विचित्र अवस्था होत होती जी शब्दांत मांडणे अवघड आहे.
ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

एकदम साहसी उडी. फार धैर्यवान

पाषाणभेद
Tue, 10/16/2012 - 08:23 नवीन
एकदम साहसी उडी. फार धैर्यवान आहे फिलीक्स. माहीतीबद्दल श्रीरंगाचे आभार.
  • Log in or register to post comments

मस्त माहिती. अचाट साहस असेच

अमोल केळकर
Tue, 10/16/2012 - 10:28 नवीन
मस्त माहिती. अचाट साहस असेच म्हणावे लागेल . अमोल केळकर
  • Log in or register to post comments

कुपीचेही यशस्वी लँडींग

श्रीरंग_जोशी
Tue, 10/16/2012 - 11:37 नवीन
फिलिक्स यशस्वीरीत्या जमिनीवर पोचल्यावर नियंत्रण कक्षातील टीमने लगेच कुपीला परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी हिलियम बलूनपासून वेगळे कसून एका विशेष पॅराशूटच्या साहाय्याने कुपीला जमिनीवर परत आणण्यात आले. उड्डाणाच्या ठिकाणापासून अंदाजे ७० मैल व फिलिक्सचे लँडिंग जेथे झाले त्या स्थानापासून ५५ मैल पूर्वेला एका शेतात कुपीचे लँडिंग झाले. लँडिंगच्यावेळी होऊ शकणाऱ्या आघातापासून आतील उपकरणांचे रक्षण करण्यासाठी कुपीच्या रचनेत विशेष काळजी घेण्यात आली होती. जसे कुपीच्या खालच्या बाजूला २ इंच जाडीचे ऍल्यूमिनियमचे क्रश पॅडस लावण्यात आले होते. हि कुपी पुन्हा पुन्हा वापरण्यायोग्य आहे.
  • गार्डियन वृत्तपत्रात छापून आलेली प्रश्नोत्तरे
  • कुपी लँड झाल्यानंतरचे चित्रीकरण
  • रेड बुल स्ट्रॅटोस गॅलरी
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments

सुधारीत आकडेवारी

श्रीरंग_जोशी
Wed, 02/06/2013 - 02:12 नवीन
फिलिक्सच्या या कामगिरीला चार महिने होत आल्यावर सुधारीत आकडेवारी जारी करण्यात आलेली आहे. या विषयाशी संबंधीत आंतरराष्ट्रीय संस्थेने अजूनही यासंबधीचे प्रमाणपत्र फिलिक्सला प्रदान केलेले नाही. परंतु लवकरच ते केले जाईल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

गूगलच्या अ‍ॅलन युस्टेस विषयी वाचल्यावर आठवण झाली

बहुगुणी
Sat, 10/25/2014 - 09:49 नवीन
गूगलच्या अ‍ॅलन युस्टेस विषयी ही बातमी वाचल्यावर या धाग्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

फिलिक्स बॉमगार्टनर यास भावपूर्ण श्रद्धांजली

श्रीरंग_जोशी
Sat, 07/19/2025 - 21:24 नवीन
Felix Baumgartner, man who jumped from space, dies after paragliding accident in central Italy Image removed. सदर लेख ज्याच्या विक्रमी मोहिमेबद्दल आहे त्या फिलिक्स बॉमगार्टनरचा पॅराग्लायडींग करताना अपघाती मृत्यू झाला. फिलिक्स यास भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

अरेरे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/20/2025 - 08:44 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

ओह, खुप वाईट.३ तासांपूर्वी मी

Bhakti
Sun, 07/20/2025 - 20:03 नवीन
ओह, खुप वाईट.३ तासांपूर्वी मी त्याचा अंतराळातून उडी मारण्याचा व्हिडिओ फेबुवर पाहिला होता.कदाचित या दुःखद घटनेमुळे तो व्हिडिओ पुन्हा नव्याने पाहिला जात असावा.साहसी लोकांना जीवावर उदार होतच असे धाडस करावे लागते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अरेरे!!

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 07/21/2025 - 12:13 नवीन
वाईट झाले. फेलिक्स यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जगभरात प्रसिद्ध मॅरेथॉन रनर फौजा सिंग गावातच एका अपघातात गेले. फेलिक्स पॅराग्लायडिंग मध्ये, मगरींशी खेळणारा स्टिव्ह आयर्विन स्टिंग रे च्या चाव्याने तर एखादा रेसिंग कार चालक साध्याशा अपघातात मरतो. दैव दुर्विलास, आणखी काय?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा