✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स

प
प्रसाद गोडबोले यांनी
Mon, 01/20/2025 - 00:47  ·  लेख
लेख
प्रस्तावना : १. सर्वच लोकांची बुध्दीमत्ता समान नसते. हे अगदी वैश्विक सत्य आहे. आणि आपल्याला हे अगदी लहानपणापासुन माहीती आहे. त्यामुळे सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे , अनुभवाला आलेच पाहिजे असा आपला हट्ट किंवा दुराग्रह नाही. २. मुळात कोणाला काही तरी कळावं ह्यासाठी काहीही खटाटोप करणे ह्यात आपला काय फायदा ? आपण आपल्या स्वानंदासाठी लिहावं . आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम ! ३. स्वान्तःसुखाय म्हणतात ते हेच ! ___

सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स

वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये। जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥
शब्द आणि अर्थ ज्याप्रकारे एकामेकात संपृक्त आहेत , ओतप्रोत भरलेलेआहेत , एकामेकापासुन वेगळेच काढता येत नाहीत तसेच जे जगताचे माता आणि पिता आहेत शिव आणि शक्ती ह्यांना मी माझ्या शब्दांना अन त्याद्वारे मला व्यक्त करायच्या अर्थाला सिध्दता प्राप्त व्हावी ह्यासाठी वंदन करतो !
१.स्थुल
What exactly assigns the meanings to the words ? शब्दांना त्यांचे अर्थ कोण जोडतं ? म्हणजे कसं की मी पुरणपोळी म्हणालो की तुमच्या डोक्यात पुरणपोळीच येणार आहे . अशी मस्त टम्म पुरण भरलेली गुळाची पुरणपोळी , त्यात तो जायफळाचा सुप्त सुगंध . त्यावर तुपाची धार . अगदी पुरणपोळी चिंब भिजुन निघेपर्यंत . अहाहा . अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते ना ! आता पुरणपोळी म्हणल्यावर किती लोकांच्या मनात अमेरिकन चीज बर्गर आला ? किंवा किती लोकांच्या मनात जॅपनीज सुशी आली ? शक्यच नाही ! कारण पुरणपोळी हा शब्द आणि पुरणपोळी हा अर्थ अगदी अगदी एकामेकांत सामावलेले आहेत . अभिन्नपणे ! तसेच सर्व नामांचे. त्यात सामान्य नामेही आली आणि विशेष नामेही आली . आणि फक्त नामेच का , सर्वनामांचेही तेच ! तो असे म्हणल्यावर मनात डोळ्यासमोर तोच येतो , ती म्हणल्यावर तीच येते आणि ते म्हणल्यावर तेच येते . मग आता ते LGBTQIA+ वाल्यांनी कितीही गजहब माजवला तरी काही फरक पडत नाही. कारण हे शब्द आणि अर्थ मॅपिंग हे लोकोत्तर आहे. ज्यांना Zie/zir/zirs /Co/co/E/em/eir/ They/them/theirs वापरायचे आहे त्यांना वापरु दे बापडे. आजारी माणसांना जास्त त्रास देऊ नये. हेच सर्व किर्यापद , विशेषण, क्रियाविशेषण अव्यय, केवलप्रयोगी अव्यय , शब्दयोगी अव्यय , उभयान्वयी अव्यय सर्वच बाबतीत हे सत्य ! "आणि" ह्या शब्दाचा अर्थ "आणि" असाच आहे , "किंवा" ह्या शब्दाचा अर्थ "किंवा" असाच राहतो. तुम्हाला पटत नाहीये का ? तुम्ही एकदा AND च्या ऐवजी OR लाऊन तुमची SQL Query रन करुन पहा , लगेच पटेल तुम्हाला. ( सर्व्हर क्रॅश होऊन बॉसच्या शिव्या पडल्यास आमची जबाबदारी नाही. ) कर्ता , कर्म , क्रियापद , कर्तरी प्रयोग , कर्मणी प्रयोग , भावे प्रयोग ह्यांना त्यांचे असे विशिष्ठ अर्थ आहेत. आणि ते त्या शब्दांपासुन भिन्न करता येत नाहीत. एकवेळ शब्द नामशेष होईल, विस्मरणात जाईल , एकवेळ भाषा नष्ट होईल पण "शब्द : अर्थ" हे मॅपिंग नष्ट होऊ शकत नाही.
२. सुक्ष्म
आणि हे मॅपिंग केवळ जड स्थूल वस्तुंबाबतच आहे असं नाही . हे सुक्ष्म वस्तुंबाबतही आहे. ओडीसामध्ये छेनापोडा नावाचा एक नितांत सुंदर गोड पदार्थ बनवतात , मी त्यावर खंडीभर लेख लिहिले तरी त्याची चव कशी गोड कशी , त्याचा सुगंध कसा होता , त्याचे टेक्श्चर कसे, हे समजाऊन शकत नाही. कस्तुरी म्हणाल्यावर कस्तुरीच आठवते , पारिजातक आठवत नाही ! रोमॅन्टिक जॅझ म्हणल्यावर मनात सॅक्सोफोन व्हायोलीनचे च सूर येतात , राग मारवा नाही येत की तांबडी चामडी चमकते उन्हातनं लकालकालकालकालका हे ही येत नाही! आणि हे मॅपिंग इतकं सटल आहे की तुम्हाला "त्याचा" प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय "ते" नक्की काय आहे कळुच शकत नाही. तुम्ही एकवेळ उपमा अलंकार वापरु शकाल पण तो केवळ निर्देशक असेल , प्रत्यक्ष नव्हे ! आता उकडीचे मोदक म्हणजे काय असं विचारल्यावर काही लोकं "स्वीट कोकोनट जॅगरी राईस स्टीम्ड मोमो " असं वर्णन करुन सांगतात. काय बोलणार ! असो.
३. अतिसुक्ष्म
आणि हे शब्दः अर्थ मॅपिंग सुक्ष्माच्याही अजुन खालवर अतिसुक्ष्मातही आहे. प्रेम , राग , लोभ , क्रोध , आणि सर्वच मानवी भावना परफेक्टली मॅप्प्ड आहेत त्या त्या शब्दांशी . आणि इथे तर उपमा अलंकारही पांगळा पडतो . हा सारा अनुभवाचा मामला आहे ! मी कालिदासाप्रमाणे तिच्या नाभीला
"आवर्त मनोज्ञ नाभि:"
अशी उपमा देऊ शकतो , अर्थात भोवर्‍यासारखी खोलवर नाभि: - की जसे भोवर्‍यामध्ये अडकलेला त्यातुन बाहेरच पडू शकत नाही तसे तिच्या नाभि मध्ये गुंतलेले माझे मन बाहेरच पडु शकत नाही असे काहीसे ! असं म्हणु शकतो ... पण त्याच मनोज्ञ आवर्ताचा मी तळ शोधताना तिच्या रोमरोमातुन उभारलेल्या रोमांचाला काय उपमा देऊ ? कसं सांगु ? आणि मी तरी काय सांगणार ? ती स्वतःच सांगु शकणार नाही शब्दात ! इतकं अतिसुक्ष्म आहे हे ! अर्थात There are things that are beyond words.
४. इव्हेंट होरायझॉन
इव्हेंट होरायझॉन म्हणजे काय ? ही एक फिजिक्स मधील ब्लॅकहोल संदर्भातील कन्सेप्ट आहे. ब्लॅकहोलची ग्रॅव्हिटी इतकी प्रचंड असते की महाप्रचंड वेग असलेला प्रकाश देखील त्यातुन सुटु शकत नाही. जिथेपर्यंत प्रकाश गुरुत्वाकर्षणाच्या तावडीतुन सुटु शकतोय तिथे हे इव्हेंट होरायझॉन तयार होईल . त्याच्या पलीकडुन प्रकाशही बाहेर पडू शकत नाहीये , मग त्याविषयी काय बोलणार आपण . ती झाली सिंग्युलॅरिटी ! bh https://ritholtz.com/wp-content/uploads/2019/04/eso1907h.jpg असो. तुर्तास टेक्निकल गोष्टी बाजुला ठेवा , आपल्याला फिजिक्सचा क्लास घ्यायचा नाहीये , आपण शब्दांच्या सिंग्युलॅरिटी विषयी बोलत आहोत! हां तर कुठे होतो आपण ? तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ह्या शब्दांच्या एव्हेंट होरायझॉन वर आहेत , तुम्ही निर्देशक अशा खंडीभर उपमा वारु शकता पण त्या सार्‍या केवळ निर्देशक आहेत , प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज ते नक्की काय आहे तुम्हाला कळुच शकत नाही . आता तुम्ही थोडं ह्या इव्हेंट होरायझॉनच्या आत उतरा , प्रयत्न तरी करा . तुम्हाला फ्लॅशेस दिसायला लागतील अशा अनेक गोष्टींचे ज्या तुम्ही शब्दात वर्णनच करु शकत नाही. केवळ निर्देशक म्हणुन शब्द तयार केलेले आहेत बस्स... झोप जाग येणे बेशुध्द होणे वेदना सुख परमोच्च सुख ऑर्गॅझम बस शब्द आहेत , प्रत्यक्ष अनुभुती ह्या शब्दांच्या आवाक्याच्या पलीकडे आहे ! Are you getting what I am tying to say ? अजुन थोडे आत उतरु अन सिंग्युलॅरिटीकडे जाऊ... जन्मला येणे मृत्यु ध्यान समाधी विदेहस्थिती जीवनमुक्तावस्था आपल्याला बस शब्द म्हणुन माहीती आहेत ... प्रत्यक्ष अनुभुती कुठाय ? अजुन खोल काहीतरी "त्या" तिथे आहे जे शब्दांच्या परे आहे .... पण नक्की काय आहे "ते" ? काय आहे ते जे की काहीही केल्या शब्दांच्या आवाक्यातच येत नाहीये आत्मा ब्रह्म आणि स्वरुप ...जीव शिव आणि ईश्वर ... विश्वरुप विश्वंभर ... हेही नुसतेच शब्द ... आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हें मायेचेंची रूप । रूप आणि अरूप । सकळ माया ॥ १६ ॥ जीव शिव आणि ईश्वर । हाही मायेचा विस्तार । विश्वरूप विश्वंभर । अवघी माया ॥ १७ ॥ - आत्माराम - समर्थ रामदास हे शब्द नुसतेच क्षितीजावर रेंगाळात आहेत , नुसताच निर्देश करत आहेत त्या सिंग्युलॅरिटीकडे ! पण नक्की काय आहे "ते " ? सत् ... चित् ... आनंद... हे ही केवळ निर्देशक ... एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु । अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ हिरण्यगर्भ ... भर्ग ... सवितृ ... ओमित्येकाक्षर ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि ! तत्वमसि ! तो तूच आहेच ! (ॐ)
५. सिंग्युलॅरिटी
सोऽहम् (ॐ) आता ? आतां होणार तें होईना कां । आणि जाणार तें जाईना कां । तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्यूची ॥ ४४॥ जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥ हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा । साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें । सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥ २८ ॥ - समर्थ रामदास योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहातां पाहातां मना नपुरे धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फ़िटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥ अनंतरुपें अनंतवेषें देखिलें म्यां त्यासी । रखुमादेविवरीं खुण बाणली कैसी ॥३॥ - ज्ञानेश्वर माऊली मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥ आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥ जालों बरा बळी । गेलों मरोनि तेकाळीं ॥२॥ दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥ - तुकाराम महाराज (ॐ) ||हरि ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ||
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
व्याकरण
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
10404 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

युनिवर्सल कॉसमॉस

तुर्रमखान
Mon, 01/20/2025 - 02:11 नवीन
इन ट्युन बिथ द ट्युन.
  • Log in or register to post comments

तुर्रमखान>>+१

भागो
Mon, 01/20/2025 - 12:27 नवीन
तुर्रमखान>>+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुर्रमखान

+१

वामन देशमुख
Mon, 01/20/2025 - 06:51 नवीन
+१ --- माझा प्रतिसाद वरचा तेवढाच आहे. या लेखावर अजून काही प्रतिक्रिया देणे म्हणजे ताजमहालाला वीट लावण्यासारखं आहे. _/\_
  • Log in or register to post comments

तुमच्या प्रतिसादावर पुन्हा

विजुभाऊ
Mon, 01/20/2025 - 11:54 नवीन
तुमच्या प्रतिसादावर पुन्हा प्रतिसाद लिहीणे हे म्हणजे ताजमहालाला "वीट " आणण्यासारखे आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज

सुबोध खरे
Mon, 01/20/2025 - 11:23 नवीन
प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज ते नक्की काय आहे तुम्हाला कळुच शकत नाही . यावर श्री रा भि जोशी यांनी नर्मदा परिक्रमेतील एक अनुभव लिहिला आहे तो येथे उद्धृत करत आहे. ( हा १९५६ सालची गोष्ट आहे) नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांना एका ठिकाणी एका गुफेच्या बाहेर लिहिलेले आढळले. १० पैशात ब्रम्हदर्शन. त्यांनी १० पैशात ब्रम्हदर्शन करावे म्हणून आतमध्ये प्रवेश केला. तेथे एक साधू धुनीसमोर ध्यानस्थ तप करत बसला होता. पाच मिनिटांनी त्याने डोळे उघडले आणि विचारले. आपला हेतू सांगितल्यावर त्या साधूने जोशींना तेथे १० पैसे ठेवायला सांगितले आणि खडीसाखरेचा खडा दिला. आणि म्हणाला हा खा. खडीसाखर खाल्ल्यावर साधूने विचारले कि कसा लागला जोशी - गोड साधु - गोड म्हणजे कसा? गुलाबजाम सारखा? जोशी -नाही साधु - मग जिलबी सारखा? जोशी -नाही. साधु - मग गोड म्हणजे कसा? जोशी - ते कसं सांगणार? त्यासाठी तुम्हाला खाऊन बघायला पाहिजे साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं, ते स्वतःलाच अनुभवायला लागतं. दुसर्याने देऊन ब्र्म्हदर्शन होत नाही
  • Log in or register to post comments

किस्सा भारी आहे...

मुक्त विहारि
Mon, 01/20/2025 - 16:44 नवीन
आवडला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पण मग 10 पैसे परत दिलेत का साधूने ?

मारवा
Sat, 01/25/2025 - 22:14 नवीन
ते खडी साखरे साठी घेतले होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दॅट्स द व्होल पॉईंट !

प्रसाद गोडबोले
Sun, 01/26/2025 - 10:45 नवीन
दॅट्स द व्होल पॉईंट ! Image removed. https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/9d/10_Indian_paise_%281965%29.jpg कुठल्यातरी धातुच्या तुकड्यावर काही तरी लिहिलेलं आहे किंव्वा कोणत्यातरी कागदाच्या चिटोर्‍याला रंग देऊन कोणीतरी ह्याला 'पैसे/ रुपये' म्हणत आहे, तरी तुम्हाला ठामपणे ठाऊक आहे की मुल्य म्हणजे काय ! इतके ठामपणे की तुम्ही ते परत मागत आहात ! तुम्हाला मुल्य म्हणजे काय हे दाखवता येत नाही , पण 'कळंत' तर आहे ! नाणे , नोटा हे केवळ निर्देशक आहे मुल्याचे ! मुल्य म्हणजे नाणे नव्हे ! तसेच 'गोडीचे' आहे , तुम्हाला गोडी म्हणजे काय हे कोणालाच दाखवता येणार नाही, खडीसाखर केवळ निर्देशक आहे त्या गोडीची ! तुम्हाला गोडी ही स्वतःची स्वतःच अनुभवावी लागेल ! आणि समजा तुमच्या अनुभवास आले की ही गोडी म्हणजे काय आहे तरी तुम्ही ती कोणालाही समजाऊन शकणार नाहीये ! तुम्ही केवळ निर्देशक शब्द वापरु शकाल . दॅट्स द मॅक्स दॅट यु कॅन डू ! दॅट्स द सिंग्युलॅरिटी ! कळ्ळं का ? उपरोधाने नाही , मनापासुन कळकळीने विचारत आहे , कळंलं का ? आर यु गेटींग इट ? --- कोणाला कळ्ळं काय किंवा नाही कळ्ळं काय , त्या 'सिंग्य्लॅरिटीला' काही फरक पडत नाही ! ज्यांना "कळ्ळं " असं वाटतंय त्यांना बस निमिष मात्र हा आनंद आहे की - "हेच तर ज्ञानेश्वर माऊली म्हणत होते !!!!! " . आणि पुढच्या क्षणी तोही आनंद विरुन जाणार आहे त्या सिंग्युलॅरिटीमध्ये ! तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाचा ठाईं । ना दाविला तरीही । हाचि यया ॥ ७-२२५ ॥ जागृती दाविला । कां निदा हारविला । परी जैसा येकला । पुरुषपुरुषीं ॥ ७-२२६ ॥ कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥ ||ॐ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं

वामन देशमुख
Tue, 01/28/2025 - 15:53 नवीन
साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं, ते स्वतःलाच अनुभवायला लागतं.
हा अनुभव-किस्सा आवडला. अर्थात हे इतरही अनेक ठिकाणी लागू पडू शकते. आम्ही तीन मित्र मध्यरात्री दोन-अडीच वाजता वैष्णोदेवी देऊळ डोंगराच्या पायऱ्या उतरत होतो. त्यावेळी एका विशिष्ट वळणावर कुठेतरी सोनचाफ्याची झाडे होती. अर्थात अंधारात ती झाडे दिसत नव्हती. पण त्या झाडांच्या फुलांचा अतिशय मनमोहक सुगंध येत होत होता. तितका उत्कट सुगंध त्यापूर्वी कधीही आला नव्हता. पंधरावीस मिनिटे आम्ही तो सुगंध अनुभवत तिथेच थांबून होतो. तो अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे! तसा विलक्षण सुगंधानुभव पुन्हा कुठेही कधीही मिळाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

असाच अनुभव मी ही घेतलेला आहे

विजुभाऊ
Wed, 01/29/2025 - 14:11 नवीन
असाच अनुभव मी ही घेतलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

लेख आवडला ...

मुक्त विहारि
Mon, 01/20/2025 - 16:45 नवीन
लेख आवडला...
  • Log in or register to post comments

सुपर्ब!

सोत्रि
Mon, 01/20/2025 - 19:31 नवीन
प्रत्यक्ष अनुभुती शब्दांच्या आवाक्याच्या पलीकडे आहे !
यथार्थ! - (मुमूक्षू) सोकाजी
  • Log in or register to post comments

+१

राघव
Mon, 01/20/2025 - 22:44 नवीन
ठाकुरही तेच म्हणतात ना - "ब्रह्म अजून उष्टे झालेले नाही" !! अर्थात् ब्रह्म म्हणजे काय हे कुणीही सांगू शकलेलं नाही. ते वर्णनातीत आहे.
  • Log in or register to post comments

यथार्थ जितके टोकदार तितक्या ब्रह्मादी संकल्पना मादक वाटतात का ?

मारवा
Sun, 01/26/2025 - 21:09 नवीन
ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही. म्हणजे अशा टाईप च्या ज्या कोणत्याही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या करोडोत एखादा जाणतो अनुभवतो या रीतीने च मांडणी प्रत्येक पंथात आवर्जून केलेली असते. शिवाय तुमचा प्रयास वगैरे ही मुप्योगाचा नाही कृपा वगैरे हवी. किंवा तुम्ही मूलतः अतिशय नालायक किंवा पतित इतके आहात की you are not eligible. सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात ब्रहादी संकल्पना अनुभूती बद्दल मांडणी असते. ती तशी जर खरी मानली एकवेळ तर जे यथार्थ आहे that which is ते जे रोज अनुभवायला येते ते भले बुरे अनेकदा बुरेच अनाकलनीय दुखरे टोकदार भयाण वास्तव जे अनेक अक्राळ विक्राळ तोंडणी आपल्या दैंदिन जीवनात आपल्या समोर ठाकलेले असते. त्यापासून पालयनसाठी दिलं के बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है. कारण तो anesthesia सारखं काम करतो. जबाबदारी पासून मुक्ता करतो तात्कालिक pleasure देतो. एक प्रकारचं वैचारिक हस्तमैथुन ज्यात काहीही इमॅजिन करू शकतो.
  • Log in or register to post comments

तथास्तु !

प्रसाद गोडबोले
Sun, 01/26/2025 - 23:36 नवीन
तथास्तु ! :) अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति। नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अभिनंदन आणि शुभेच्छा! !

मारवा
Mon, 01/27/2025 - 07:06 नवीन
जडभूतविकारेषु चैतन्यं यत्तु दृश्यते । ताम्बूलपूगचूर्णानां योगाद् राग इवोत्थितम् ।। That is, being in agony over the impermanent we hopefully pursue what we call the permanent. The motive of our search is to find comfort in the ideal of the permanent, and this ideal is born of impermanency, it has grown out of the pain of constant change. The ideal is unreal, whereas the pain is real; but we do not seem to understand the fact of pain, and so we cling to the ideal, to the hope of painlessness. Thus there is born in us the dual state of fact and ideal, with its endless conflict between what is and what should be. The motive of our search is to escape from impermanency, from sorrow, into what the mind thinks is the state of permanency, of everlasting bliss. But that very thought is impermanent, for it is born of sorrow. The opposite, however exalted, holds the seed of its own opposite. Our search, then, is merely the urge to escape from what is.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

One for the road

मारवा
Mon, 01/27/2025 - 07:17 नवीन
“I would rather have questions that can't be answered than answers that can't be questioned.” ― Richard Feynman
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

परत एकदा तेच म्हणतो ...

प्रसाद गोडबोले
Mon, 01/27/2025 - 15:04 नवीन
परत एकदा तेच म्हणतो ... "तथास्तु" मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि । किं वदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥ ११ ॥ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

तुमच्या अंतर्यामी असलेल्या

मारवा
Mon, 01/27/2025 - 15:58 नवीन
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा ब्रह्म्याला माझे हृदय पूर्ण वंदन. मायेच्या आवरणाखाली जरी माझे शूद्र ब्रह्म झाकलेले असले तरी मी एक दिवस नक्कीच तुमच्या बरोबर बसून अहं ब्रह्मास्मी चा जयघोष करणारच. आणि एक दिवस अखिल विश्वातील शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण इतकेच काय म्लेच्छ ब्रह्मंसुद्धा एकमेकांत बसून जयघोष करणारच वयं ब्रह्मास्मी वयं ब्रह्मस्मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥

प्रसाद गोडबोले
Mon, 01/27/2025 - 21:58 नवीन
मी माझे लेखन किमान ३ ते ४ वेळा वाचुनच प्रकाशित करतो पण तुमचा हा प्रतिसाद पाहुन बुचकळ्यात पडल्याने मी वरील लेखन परत दोन वेळा वाचले ! अहाहा . मजा आली ! त्यामुळे आधी तुम्हाला धन्यवाद देतो :)
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा ब्रह्म्याला माझे हृदय पूर्ण वंदन.
तुम्ही एक तर लेख नीट वाचलाच नाहीये किंवा वाचुन तुम्हाला कळाला नाहीये , किंवा तुम्ही माझे नाव वाचुन आधीच ठरवुन आला होता की काय प्रतिसाद द्यायचे ! मी लेखाचे नावच सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स असे लिहिले आहे , तस्मात तुम्ही वापरलेले हे सगळे शब्द केवळ इव्हेंट होरायझन वर आहेत ! आणि कसलं वंदन अन कसलं काय ? कोण कोणाला काय वंदन करणार ? हे सगळे इव्हेंट होरायझॉनवर , "सिंग्युलॅरिटी" मध्ये नाही !
मायेच्या आवरणाखाली जरी माझे शूद्र ब्रह्म झाकलेले असले तरी मी एक दिवस नक्कीच तुमच्या बरोबर बसून अहं ब्रह्मास्मी चा जयघोष करणारच.
मायेचे आवरण , झाकलेले ब्रह्म वगैरे शब्द तुमचे बाळबोध आकलन आणि तुम्ही लेख वाचलाच नाही ह्याची प्रतीती देत आहेत ! . तुम्हाला कळणार नाहीयेच , पण तरीही रिव्हिजन म्हणुन लिहिति - माया ह्या शब्दाची व्युतप्त्तीच या मा सा माया अर्थात जी नाहीच ती म्हणजे माया अशी आहे . ह्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी अतिषय सुंदर ओवी लिहिली आहे -
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे । हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥
पुढे माऊली म्हणतात :
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥
बाकी तुम्ही शुद्र वगैरे म्हणालात त्यातुन तुमचे पुर्वग्रहदुषित अंतःकरण दिसुन येते , कारण मी माझ्या लेखनात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र , एकुणच सनातन वर्णाश्रम धर्म ह्या विषयी चकार शब्द काढलेला नाही . समर्थांनी स्पष्ट म्हणुन ठेवलं आहे -
ब्राह्मणांचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें ओंवळें । ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५॥
तुमचे पुर्वग्रह तुमच्यापाशी , मला त्यांचा स्पर्ष होत नाही. मी कित्येक अशा शुद्रवर्णातील लोकांना ओळखतो ज्यांचे सनातन धर्मावर , वर्णाश्र्रम व्यवस्थेवर ठाम श्रध्दा आहे , आणि मी एका अशा महाभाग ब्राह्मणालाही ओळखतो जो भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतो आहे. माझ्या लेखी हे असे शुद्र अशा ब्राह्मणांपेक्षा कैकपटीने उच्च आहेत ! आणि तुम्ही लेख नीट वाचला तर तुम्हाला लेखाच्या शेवटी जगद्गुरु संत तुकाराम महाराज ह्यांच्या ब्रह्मानुभुतीचा अभंग दिसेल . तुकोबा स्वतःहुनच "याति शुद्र केला वेवसाय " असे म्हणाले आहेत . तरी त्यांच्या अभंगात मला तीच झलक दिसते जी ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात आहे , समर्थांच्या श्लोकात आहे ! फक्त त्यासाठी दृष्टी पाहिजे ! जोवर तुम्ही "मी शुद्र" ह्या अहंकाराला कवटाळुन बसला आहात तोवर तुम्हा सिंग्युलॅरिटी तर सोडाच पण इव्हेंट होरायझॉन देखील दिसणार नाही !
आणि एक दिवस अखिल विश्वातील शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण इतकेच काय म्लेच्छ ब्रह्मंसुद्धा एकमेकांत बसून जयघोष करणारच वयं ब्रह्मास्मी वयं ब्रह्मस्मी
आता हे तुम्ही उपरोधिक पणे लिहिले आहे की खर्‍या श्रध्देने हे तुमचे तुमालाच ठाऊक , पण कसेही असले तरी परत एकदा तेच म्हणतो जे आधी दोन वेळा म्हणालो आहे - तथास्तु ! अर्थात तसेच असो ! जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ इत्यलम ! अवांतर : समुद्रमंथनाच्या वेळेला जेव्हा भगवान विष्णु मोहिनी रुप घेऊन देवांना अमृत वाटत होते तेव्हा मायावी राहु देवांचे रुप घेऊन त्यांच्या प़तीत जाऊन बसला, इतकेच नव्हे तर त्याने चक्क अमृत प्राशनही केले पण ते लक्षात आल्यावर भगवंतांनी तत्काळ सुदर्शनचक्राने त्याच्या शिरछेद केला आणि अमृत पोटात जाऊन पचण्या आधीच राहु मेला ! अमृत प्राशन करुन देखील मेला ! अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ फार मजेशीर गोष्ट आहे नै ! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

:)

कॉमी
Mon, 01/27/2025 - 12:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

पण पाश्चात्य लोक ब्रम्ह

Bhakti
Mon, 01/27/2025 - 11:41 नवीन
पण पाश्चात्य लोक ब्रम्ह शोधण्याऐवजी भौतिक गोष्टींमागे अभ्यास करू लागले.त्यामुळे त्यांनी अधिक प्रगती केली का?असा मला तर प्रश्न पडतो.ब्रम्ह सर्वांमध्ये आहे तर ते शोधायचे कुठे? ब्रम्हज्ञान प्राप्ती झाली हे ओळखायचं कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

ब्रह्म वा तत्सम संकल्पना आहेत.

मारवा
Mon, 01/27/2025 - 14:03 नवीन
या दिलासादायक संकल्पना आहेत. तुम्ही हव्या तशा खेळू शकता तुम्ही स्वतः त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसेल तरी अमुक अमुक महात्म्याने तो घेतलेला आहे व त्याचे अमुक अमुक म्हणणे आहे. त्याने याच्या अनुभवाचा अमुक अमुक मार्ग दाखवलेला आहे. तो तुम्हाला येत नाही याचा अर्थ त्या महात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अमुक अमुक कारणास्तव अपात्र आहात. आणि हे सर्व ठरवण्यासाठी मी अमुक अमुक प्रमाणे पात्र आहे. वगैरे वगैरे. ही संकल्पना एका अत्यंत सुंदर अशा कवितेसारखी आहे अदभुत अशा fantasy सारखी आहे. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. तशा या प्रचीनांच्या नितांत सुंदर असा कल्पनाविलास असलेल्या संकल्पना आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

ब्रह्म वा तत्सम संकल्पना आहेत.

मारवा
Mon, 01/27/2025 - 14:05 नवीन
या दिलासादायक संकल्पना आहेत. तुम्ही हव्या तशा खेळू शकता तुम्ही स्वतः त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसेल तरी अमुक अमुक महात्म्याने तो घेतलेला आहे व त्याचे अमुक अमुक म्हणणे आहे. त्याने याच्या अनुभवाचा अमुक अमुक मार्ग दाखवलेला आहे. तो तुम्हाला येत नाही याचा अर्थ त्या महात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही अमुक अमुक कारणास्तव अपात्र आहात. आणि हे सर्व ठरवण्यासाठी मी अमुक अमुक प्रमाणे पात्र आहे. वगैरे वगैरे. ही संकल्पना एका अत्यंत सुंदर अशा कवितेसारखी आहे अदभुत अशा fantasy सारखी आहे. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. तशा या प्रचीनांच्या नितांत सुंदर असा कल्पनाविलास असलेल्या संकल्पना आहेत. शिवाय त्या गोळीबंद अशा संकल्पना आहेत. Watertight किंवा वर्तुळ पूर्ण करणारी theory शुद्ध तत्त्वज्ञानाचा अनुसार अमान्य असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता

Bhakti
Mon, 01/27/2025 - 14:42 नवीन
त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो. अगदी अगदी.. ब्रम्ह संकल्पनेच्या? यशाचे हे एक मोठे कारण आहे...आनंद! गोळीबंद संकल्पना नव्हतं माहिती, नवीन समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

+१ अगदी अगदी.

कॉमी
Mon, 01/27/2025 - 14:46 नवीन
+१ अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

१००%

स्वधर्म
Mon, 01/27/2025 - 19:30 नवीन
- या दिलासादायक संकल्पना आहेत. - त्यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. - शिवाय त्या गोळीबंद अशा संकल्पना आहेत. मारवा, तुमची वरील वाक्ये अगदी मनोमन पटली आहेत. मूळ थियरी खूप छोटी असली तरी त्यावर हजारो श्लोकांचा, पाचशे पानांचा ग्रंथ भाषाप्रभू लोक पाडतात. जे तसले ग्रंथ वाचत नाहीत, बौध्दिक चर्चा करत नाहीत, ती साधी लोकं अगदी दिपून जातात, भक्त बनतात. आणि जे लोक परिश्रम करून ग्रंथ वाचतात, त्यांना प्रश्न पडले, नाही पटले, तरी संक कॉस्ट फ॓लसी तयार झाल्याने सोडू शकत नाहीत. उलट त्यातच आणखी भर घालत रहातात. बुध्दाने याला बुध्दिविलास, वाणीविलास म्हटले आहे, आणि अध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात काहीही उपयोग नाही, असे स्पष्ट बजावले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

तथास्तु !

प्रसाद गोडबोले
Mon, 01/27/2025 - 22:00 नवीन
तथास्तु !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 01/28/2025 - 14:32 नवीन
मारवाजी... नंबर एक. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अहं ब्रह्मस्मी!

सोत्रि
Wed, 01/29/2025 - 09:41 नवीन
अशा टाईप च्या ज्या कोणत्याही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या करोडोत एखादा जाणतो अनुभवतो या रीतीने च मांडणी प्रत्येक पंथात आवर्जून केलेली असते. शिवाय तुमचा प्रयास वगैरे ही मुप्योगाचा नाही कृपा वगैरे हवी. किंवा तुम्ही मूलतः अतिशय नालायक किंवा पतित इतके आहात की you are not eligible. सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात ब्रहादी संकल्पना अनुभूती बद्दल मांडणी असते.
दुर्दैवाने हे तंतोतंत खरे आहे.
ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही
ह्याला कारणीभूत आहे वरच्या परिच्छेदातील पंथ आणि त्यांची माडणी. अध्यात्माला शास्त्रिय दृष्टीकोनातून न बघता त्यात इश्वरी, दैवी, धार्मिक अंगाने बघून कृतीवर भर न देता शब्दांचे अवडंबर केल्याने ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेयेऊ शकत नाही. भूमितीमधे प्रमेय सोडवण्याची एक पद्धत आहे. प्रमेयाची सिद्धता खालील पायर्‍यांनी करतात.
  1. पक्ष
  2. साध्य
  3. सिद्धता
  4. निष्कर्ष
अध्यात्मात दुर्दैवाने पक्ष साध्य आणि निष्कर्ष ह्यांचा जयघोष केला गेलाय. अगणीत शब्दसंपदा केवळ ह्यावरच खर्च केलेली आहे. सिध्दता म्हणजे पक्ष आणि साध्य यांच्या निष्कर्षापर्यंत खात्रीने पोहोचण्याचा मार्ग, तंत्र, पध्दती, कार्यप्रणाली नेमकं हेच हरवलेलं आहे. त्यामुळे साक्षात्कार म्हणजे नेमकं काय आणि तो खात्रीने नेमका कसा होईल हे ह्याची पध्दती, कार्यप्रणाली कोणीच सांगत नाही. त्याऐवजी शाब्दिक बुडबुडे सोडून निष्कर्षाचा जयघोष केला जातो. त्याने पंथ, गुरू, बुवा, (स्वयं)सिद्ध ह्यांची भरमार होते. बर्‍याच साधनाप्रणालींची अभ्यास केल्यानंतर विपश्यना साधनाप्रणाली ही सिद्धते वर भर देणारी आणि सुस्प्ष्ट मार्ग आणि तंत्र उलगडून सांगणारी साधनाप्रणाली आहे ह्याचा साक्षात्कार झाला.' शरीर आणि मन म्हणजे आपण नाही' म्हणजे नेमकं काय आणि त्याची अनुभूती (साक्षात्कार), आपली आपण, कोणतेही जयघोष करणारे ग्रंथ, पुस्तके, शास्त्र-पुराणे न वाचता, कशी करून घ्यायचे ह्याची कृती विपश्यना शिकवते. त्यामुळे, 'ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाही' असं म्हणणं रास्त होणार नाही. - (साधक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

म्हणुनच कदचित

हवालदार
Wed, 01/29/2025 - 15:17 नवीन
यम नियमचे महत्व समजावुन देणारा राम ७ वा, योग समजवणारा योगेश्वर ८ वा आणि ब्रह्म कसे अनुभवयाचे हे समजावणारा बुद्ध ९ वा अवतार समजले जात असावेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

विपश्यनेच्या बाबत

स्वधर्म
Wed, 01/29/2025 - 17:27 नवीन
वरील विवेचनाच्या शब्दाश्ब्दाशी सहमत. शब्दांचा पिसारा फुलवून भुलवणार्या लोक व ग्रंथ यापासून मुक्ती मिळवण्याचा आनंद अवर्णनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

है का !

प्रसाद गोडबोले
Wed, 01/29/2025 - 20:41 नवीन
है का !
शब्दांचा पिसारा फुलवून भुलवणार्या लोक व ग्रंथ यापासून मुक्ती मिळवण्याचा आनंद
हेच आम्ही सांगितलं तर तुम्हाला पटत नाही . गट क्रमांक १ आणि २ हे अन डिस्युटेबल आहेत . गट क्रमा़ १ मधील कोणीही काहीही लिहिलं तरी तुम्हाला शब्दाचा पिसारा वाटणार आहे . साधं सोप्पं आहे बघा , १९५६ साली बाबासाहेबांनी समस्त जगाला बुध्दाचा मार्ग दाखवुन दिलेला आहे . तुम्ही कशाला ह्या गट क्रमा़ १ वाल्यांच्या शब्दाचा पसारा अन भुलवणारे ग्रंथ वगैरे बघत बसता ! सरळ विपश्यना करा ! मोक्ष बिक्ष आत्मा ब्रह्म बिम्ह सब झूट आहे हे तुम्हाला माहीत आहेच की आधीच ! कशाला तुम्ही हा शब्दांचा पिसारा बघुन त्रास करुन घेताय ? देश स्वतंत्र आहे , ग्रंथ बिंथ जाळायला तुम्हाला मोकळीक आहे ! अगदीच हा लेख आवडला नसेल तर ह्या लेखाची प्रिंट काढुन जाळा ! जाळपोळ करायची परंपरा ही आहेच ! पण ज्यांना शब्दांचा पिसारा फुलवायचा आहे , ग्रंथ वगैरे वाचायचे आहेत त्यांना वाचु द्या की ! त्यांन्नी तुम्हाला आमंत्रण दिले आहे का वाचायचे ? कि तुम्हाला त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची आहे ? तुम्ही तुमच्या आनंदात रहा , त्यांना त्यांच्या आनंदात राहु दे ! तुम्ही बुध्दाच्या मार्गाचे आचरण केले तर त्यात आम्हाला आनंदच आहे कारण आम्ही बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानतोच ! एके हाती दंतु | जो स्वभावता खंडितु | तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा ||१-१२|| असे म्हणुन माऊलींनी बौध्दमताला गणेशाचा रुपात स्थान दिलेले आहेच ना ! कसेही करा , कोणताही मार्ग आचरा , किंवा कोणताही मार्ग टाळा . आमची कसली सक्ती नाही कि कसला आग्रह नाही ! आमचं काही भांडण नाही विपश्यनेशी . उलट आम्हालाही कौतुकच आहे ! जो जे वांच्छील तो ते लाहो हीच आमची प्रार्थना आहे पहिल्यापासुन ! म्हणुनच म्हण्तो - तथास्तु !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

तसं जर असेल तर

स्वधर्म
गुरुवार, 01/30/2025 - 23:27 नवीन
मग इथल्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद आपण का देता? स्वांतसु़खाय म्हणता आणि सुरूवातच प्रत्येकाला कळायला पाहिजे असं नाही म्हणत बहुतेक लोकांना तुम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान (?) कळणार नाही, असं आधीच सांगता? बरं जर स्वांतसुखायच लिहायचं आहे, तर सार्वजनिक संसंसळावर मुळात टाकता तरी का? (याचं उत्तर खरं तर सगळ्यांना माहित आहे :-) ) इथे टाकलं तर लोक त्यांचे विचार न पटले मांडणारच ना? असो. वेदांचा तो अर्थ | आंम्हासिच ठावा || येरांनी वहावा | भार माथा || हे तुकोबांचे बोल मनोमन पटलेला, - स्वधर्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मग इथल्या प्रत्येक

प्रसाद गोडबोले
Fri, 01/31/2025 - 00:04 नवीन
मग इथल्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद आपण का देता?
तुम्ही इतर प्रतिसाद वाचत नाही काय ? ह्या प्रश्नाचं उत्तर मी खालीच एका प्रतिसादात आधीच दिले आहे - मला मजा येत आहे म्हणुन ! तुम्हाला पटलं तरी हरकत नाही , नाही पटलं तरी हरकत नाही . आम्ही तुमच्या भाषेत "शब्दांचा पिसारा " फुलवत राहु , तुम्ही बस त्रास करुन घेऊ नका ! बाकी ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचताय , वेदांचा अर्थ समजुन घेताय हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे , मग मजा तर येणारच ना ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

रीकन्सिलेशन

कॉमी
Tue, 01/28/2025 - 18:51 नवीन
एका बाबीचे रिकन्सिलेशन मला कधी करता आले नाही. जर आपण मन नाही, शरीर तर नाहीच नाही - हे मनापासून पटले तर माणूस का ऐहिक बाबींमध्ये वेळ घालवेल? त्यांच्या दृष्टिकोनातून हे करणे म्हणजे जो माणूस आपल्या कपड्यांना इस्त्री करण्यात दररोज बरा तस घालवतो त्याच्याइतकीच निष्फळ घालमेल नाही का? म्हणजे बुवा आमच्यासारखी भौतिक जडवादी मंडळी नऊ ते पाच कामाला जातात हे समजण्यासारखे आहे. आम्ही स्वतःला शरीरापासून वेगळे समजत नाही. आम्हाला स्वतःला अर्थात शरीराला सुख, शांती, समाधान द्यायचे आहे. पण स्वतःला ब्रम्ह समजणारी मंडळी का करतात हे सगळे उद्योग? म्हणजे अजून स्वतःचा साक्षात्कार पूर्ण झाला नाहीये की आणि काही? उपरोध नाही. सिरीयस प्रश्न.
  • Log in or register to post comments

कारण सनातननुसार

Bhakti
Tue, 01/28/2025 - 19:10 नवीन
कारण सनातननुसार ब्रम्हज्ञानानंतर आत्मसुखासाठी /परम कल्याणासाठी संन्यास अथवा कर्मयोगी यापैकी दोन मार्ग स्वीकारायचे असतात.ज्या अर्थी त्यांनी संन्यास स्विकारला नाही.त्याअर्थी त्यांंनी निष्काम कर्मयोगाचा मार्ग स्वीकारला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

मार्ग आहेत हे ठीक. पण का?

कॉमी
Tue, 01/28/2025 - 20:03 नवीन
मार्ग आहेत हे ठीक. पण का? ज्यांना स्वतःचा साक्षात्कार झाला आहे आणि ज्यांना शरीर म्हणजे आपण नाही आहे हे समजले आहे ते शरीराची उस्तभार कशाला करतात? गरज काय आहे? जर स्वतःला इतके स्वतःच्या भावना आणि अशाश्वत गोष्टींपासून अलिप्त करायचे आहे तर मग तेच टिकवण्याची मरमर काय म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

स्वतःचा साक्षात्कार हे चूक

Bhakti
Tue, 01/28/2025 - 21:13 नवीन
स्वतःचा साक्षात्कार हे चूक आहे.तुम्ही अलिप्त कधीच होऊ शकत नाही.ब्रम्ह म्हणजे हेच तर की सगळेच जीव/आत्मा जुळलेले आहेत.कर्मयोगीसाठी शरीर हे कर्माचे माध्यम आहे,त्याचा त्याग/ त्याच्या श्रेयसाचा त्याग सर्वांचा समतोल बिघडवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

ब्रम्हाला कर्माची फिकीर कशाला

कॉमी
Tue, 01/28/2025 - 22:32 नवीन
ब्रम्हाला कर्माची फिकीर कशाला? ब्रम्हाच्या पातळीवर जर दोन काही नाहीच तर पाप पुण्य आलेच कुठून? जर ब्रम्ह सोडून इतर काही नाहीच, आणि साक्षात्कार म्हणजे आपण ब्रह्म आहोत, हा असेल, तर मग ऐहिक गोष्टींची चिंता कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

उत्तर

प्रसाद गोडबोले
Tue, 01/28/2025 - 23:51 नवीन
गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः | या स्वया पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता || एका सुगम अशा भगवद्गीतेचा अभ्यास करा , बाकी इतर सार्‍या शास्त्रांची काय गरज आहे ? ही भगवग्द्गीता जी की साक्षात पद्मनाभ विष्णुंच्या वासुदेवाचा मुखातुन उत्पन्न झालेली आहे ! तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भग्वद्गीतेतील तिसर्‍या अध्यायात मिळेल कारण दुसर्‍या अध्यायात भगवंतान्नी सांख्ययोग विषद केल्यावर अर्जुनाने एक्झॅक्टली हाच प्रश्न भगवंताला विचारला होता की , हे ज्ञान , ही स्थितप्रज्ञ अवस्था , ही ब्राह्मी स्थिती जर सर्व श्रेष्ठ आहे तर मग तुम्ही मला निष्कारण ह्या कर्माच्या फेर्‍यात का अडकवता ? (अर्थात माझा मी आपला ब्रह्मानंदी लागली टाळी अवस्थेत सुखनैव बसतो , तिकडे खड्यात गेली दुनिया, अन हे युध्द, अन राज्य वगैरे ) त्यावर भगवंतांनी सविस्तर उत्तर दिलेले आहे ! माऊलींनी काय निरुपण केले आहे राव . निव्वळ लोकोत्तर ! म्हणौनि संगू जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ॥ ६३ ॥ मी मुद्दाम स्पष्ट उत्तर देत नाहीये कारण माझी इच्छा आहे की ह्या निमित्ताने तुम्ही गीता ज्ञानेश्वरी उघडावी , श्रध्देने वाचावी , त्यातुन तुम्हाला बोध होईल ! I don't want to steal your joy of the discovery of truth ! मला अक्षरशः तुकोबांसारखे "माझी मज झाली अनावर वाचा" असे काहीसे ज्ञानेश्वरी वाचताना होत असल्याने माऊलींच्या अजुन काही ओव्या करतो : तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥ म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥ ७८ ॥ म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥ ८३ ॥ म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥ हा कर्मयोग म्हणजे मजा आहे राव ! हे म्हणजे मायेशी कुस्ती खेळल्यासारखे आहे ! तुम्ही ध्यान धारणा साधना अभ्यास चिंतन करता अन ब्रह्मलीन होता अन मग माया म्हणते - " शिवोहं शिवोहं काय ? तुला वाटतंय ना तु ब्रह्मलीन झाला आहेस , मग आता ह्या अवस्थेत सर्वांभूतीं ब्रह्म पाहुन अन शांत , तद्रुप राहुन दाखव !" अन माया कुस्तीचा डाव टाकते , अन मग आपल्या प्रापंचिक आयुष्यात काहीतरी अडी अडचणी येतात , संकटे येतात , आणि आपण आत्मभावातुन देह भावात परत येतो . मग परत नाम , परत साधना अन परत उपासना, परत गीता ज्ञानेश्वरी दासबोध ! परत संध्यावंदन ! अन आपण परत ब्रह्मभावात लीन होतो ! अन मायेचा डाव उलटवुन लावतो ! आणि मग माया परत गालातल्या गालात हसते , म्हणते - ठीक आहे ठीक आहे ! आता हा नवीन डाव घे ! आणि मग तो डाव असतो आनंदाचा सुखाचा समाधानाचा ! आणि आपण तोही पलटवुन लावतो ! आणि मग एक वेळ अशी येते की तुम्हाला हा सगळा खेळ कळतो अन तुम्हीही तिच्या सोबत हसायला लागता आणि म्हणता - "ठीक आहे , ब्रिंग इट ऑन ! " =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

ह्म्म्म

सोत्रि
Wed, 01/29/2025 - 08:54 नवीन
आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम !
अशी प्रस्तावना केल्यावर लेख 'गंगार्पणमस्तू' म्हणून सोडून देण्यातच गंमत आहे (हे माझ मत)! - (स्वांतसुखी होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

येस

प्रसाद गोडबोले
Wed, 01/29/2025 - 11:46 नवीन
येस, इट्स ए मॅटर ऑफ चॉईस ! योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहीनः | यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव ‖ मौन धारण करणे आणि प्रश्नोत्तरे करणे दोन्ही चॉईस आहेस. दोन्ही कुस्ती ! ब्रह्मीभूत माणूस स्वच्छंद असतो. त्याला वाटलं तर तो उत्तर देतो नाहीतर तथास्तु म्हणून निघून जातो :) माऊली संजीवन समाधी घेतात , समर्थ भारत भर मठ स्थापन करून जनजागृती करतात. तुकोबा कर्जाच्या वह्या इंद्रायणीत बुडवून सगळं संसार पांडुरंगाच्या पायी अर्पण करतात , एकनाथ सगळं काही व्यवस्थित करतात अगदी सर्वसामान्य गृहस्थ माणसासारखे ! तसेच काहीसे. स्वांत सुखाय. माझा येते आहे तोवर इथे लेख प्रतिसाद गप्पा टप्पा करायच्या , कंटाळा आला की इथून निघून जायचं ! I think one of the most obvious sign of enlightenment is this sort of simple basic freedom ! This is really amazing indeed. ! जय जय रघुवीर समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

धन्यवाद. वाचतो.

कॉमी
Wed, 01/29/2025 - 08:58 नवीन
धन्यवाद. वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

छान लिहिले आहेस रे! आवडले

राघव
गुरुवार, 01/30/2025 - 23:18 नवीन
छान लिहिले आहेस रे! आवडले मनापासून! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

साक्षात्कार

सोत्रि
Wed, 01/29/2025 - 08:49 नवीन
स्वतःचा साक्षात्कार हे चूक आहे.
हे कसं काय चूक आहे? नेमकं काय म्हणायचं आहे ते कळलं नाही म्हणून हा प्रश्न आहे.
तुम्ही अलिप्त कधीच होऊ शकत नाही
अलिप्त होण हीच मुक्ती आणि त्यासाठीच तर सर्व अट्टाहास आहे! असो, अलिप्त होऊ शकत नाही हे तुमचे म्हणणे जरा स्पष्ट करून सांगाल का? - (अभ्यासू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

माझे मतं

Bhakti
Wed, 01/29/2025 - 11:10 नवीन
स्वतःचा साक्षात्कार होतो? तुमचं अस्तित्व/एखादं ज्ञान या जगात आले ते सत्य आहे साक्षात्कार नाही.उगाच mature झालो की त्याला स्वतःचा साक्षात्कार असं नावं दिलं जाते.यानुसार तर मला दर आठवड्याला स्वतः चा नवा साक्षात्कार होतो.मग काय दरवेळी मी काहीतरी समजलं इकडे पहा असं समजू का? सगळ्यांना साक्षात्कार /सत्य उमगते,सगळे mature होतात... कालावधी वेगवेगळा आहे. अलिप्तता ही कोणत्या लेव्हलची आहे.वैयक्तिक नात्यांची? तो झाला संन्यासी ..सामाजिक जबाबदारीची?..तो झाला संन्यासी. पण त्याला पण /इंद्रियांना भूक लागली की भिक्षा मागावीच लागते ना...ना इंद्रियांपासून अलिप्त ना प्रकृती पासून. संत जर अलिप्त राहिले असते तर प्रबोधन केले असते का? समाजाचे /प्रकृतीचे/सर्व जीवांचे(oneness) कल्याण व्हावे यासाठीच मार्ग देत राहतात. अलिप्त म्हणजे मुक्ती नव्हे,अलिप्त म्हणजे कल्याण व्हावे ही इच्छा तुमचं पण माझं पण सर्वांचे पण! -(दार्शनिक जिज्ञासू )भक्ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

शरीराची उस्तभार

सोत्रि
Wed, 01/29/2025 - 08:42 नवीन
ज्यांना स्वतःचा साक्षात्कार झाला आहे आणि ज्यांना शरीर म्हणजे आपण नाही आहे हे समजले आहे ते शरीराची उस्तभार कशाला करतात
दोन उदाहरणं ह्यासाठी. १. ज्ञानेश्वर माउली, त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहीपर्यंत शरीराची उस्तभार केली. त्यानंतर त्यांनी समाधी घेऊन शरीराचा त्याग केला. २. गौतम बुद्धाला जेव्हा बोधीप्राप्ती झाली तेव्हा त्याच्यातल्या करुणेमुळे, ते ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे ह्यासाठी उर्वरीत जीवन त्याची शिकवण शिकवण्यासाठी शरीराची उस्तभार केली सगळे साक्षात्कारी मोस्टली ह्या दोन कॅटेगरीमधे मोडतात. - (मुमूक्षू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

ज्याना साक्षात्कार झालेला आहे

विजुभाऊ
Wed, 01/29/2025 - 14:14 नवीन
ज्याना साक्षात्कार झालेला आहे. आणि शरीराची उस्तरवार करावयाची नाही. त्याना रजनीश " चलते फिरते प्रेत" असे म्हणतात. शरीराची आसक्ति असणे वेगळे आणि विरक्त असणे वेगळे. विरक्त शरीराला ही देहभोग असतातच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

प्रिय मिपाकरांनो खुप छान

Bhakti
Wed, 01/29/2025 - 11:20 नवीन
प्रिय मिपाकरांनो खुप छान चर्चा झाली.पण मला लई कामे आहेत😅 त्यामुळे इथल्या शास्त्रार्थांना विराम देते, नाहीतर मंडणमिश्रांप्रमाणे गळ्यातली माळ सुटेपर्यंत टाईप केले असते 😉 अधिक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असल्यास मी सध्या जो ग्रंथ वाचतेय तो तुम्हीही वाचा.... गीतारहस्य!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा