शोनार बांगला...! भाग ७ – राजशाही बांगलादेश
भाग १ - कलकाता, भाग २ - ताम्रलिप्ती व ग्रामीण बंगाल , भाग ३ - खुलना, बांगलादेश , भाग ४ - बरीषाल बांगलादेश, भाग ५ –चितगांव बांगलादेश, भाग ६ – सिल्हेट बांगलादेश, समाप्ती – ढाका बांगलादेश
राजशाही विभाग म्हणजे बंगालचे हृदय. प्राचीन काळचा हा पुंड्र देश. राजधानी पुंड्रवर्धन करतोया नदीच्या काठी, गंगा-ब्रह्मपुत्र यांच्या मध्ये. हे बंगालमधील सर्वात प्राचीन महानगर. आजही त्याचे अवशेष जिथे विखुरलेले आहेत ते "महास्थान" म्हणून ओळखले जाते. नंतर महाजनपदांच्या काळात अंग राज्य अधिक प्रभावशाली बनले तरी पुंड्र जनपद व हे महानगर आपले महत्व टिकवून होते. पुढे पाल व सेन हे पराक्रमी राज्यकर्ते बंगालच्याहि बाहेर गंगेच्या खोऱ्यामध्ये आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले, त्यांचीही बहुतांश राजधान्या वा सत्ताकेंद्रे याच भागात होती. सोमपूर व जगद्दल सारख्या भव्य विद्यापीठांची ही भूमी. सत्ताकेंद्र तसेच ज्ञानकेंद्र असलेल्या या प्रदेशाचे आणखी एक नाव म्हणजे वरेंद्र (बांगला अपभ्रंश - बारिन्द) त्यात उत्तरेतील रंगपूर विभागाचाही समावेश करतात. बौद्ध तत्वज्ञानाचा येथे विकास तसेच प्रचार झाला. बंगालच्या दारुण अवस्थेचे एक कारण अतिरेकी बौद्धमत प्रसार हेही सांगितले जाते. गांधार व सुदूर पश्चिम तथा बंगाल व सुदूर पूर्व या दोन्ही ठिकाणी सारखीच परिस्थिती असावी. १२०४ मध्ये बख्तियार खिलजीच्या आक्रमणात बंगालचा पाडाव झाला नालंदा ओदंतपुरी सहित बंगालच्या सर्व विद्यापीठांचा नायनाट या राक्षसाने केला. तेव्हापासून राजा गणेशाचा अपवाद वगळता बंगालने हिंदू राजा पहिला नाही. आश्चर्य म्हणजे यानंतर महाराष्ट्रात परचक्र येण्यास तब्बल नव्वद वर्षांचा कालावधी गेला परंतु या इतरत्र झालेल्या आक्रमणाचे कोणत्याही प्रकारचे संदर्भ ज्ञानेश्वरी किंवा तत्सम समकालीन वाङ्मयात आढळत नाहीत. प्रारंभी काही दशके संपन्न बंगालची लूट करण्यात गेली परंतु नंतर बंगालमध्ये स्वतंत्र सुलतानी राज्य स्थापिले गेले. यातच एका हिंदू राजाने योग्य संधी साधून आपली सत्ता स्थापन केली त्या गणेश किंवा दनुजमर्दन राजाचा १४१४ चा अपवाद वगळता बंगाल मध्ये इस्लामची सत्ता बहुतांशाने कायम आहे. या सर्व सुलतानांची राजधानी ‘पंडुआ’ आताच्या भारताच्या हद्दीत पण याच प्रदेशात. पुढे मुघलांनी राज्य खालसा करून हा प्रदेश सुभा म्हणून जोडून घेतला व पुढे आसाम जिंकण्याचेही अयशस्वी प्रयत्न केले. परंतु मराठ्यांच्या उदयामुळे मुघलांची सर्व शक्ती दक्षिणेत एकवटली व कालांतराने निष्प्रभ होत लोप पावली. मराठ्यांच्या फौजा बंगालच्या उंबरठ्यापर्यंत आल्या परंतु बंगालचे दुर्दैव, ओडिशा स्वतंत्र झाले परंतु मराठी सत्ता येथे बंगालमध्ये मूळ धरण्याआधीच मराठेशाहीचा दुर्दैवी अंत झाला. प्राचीन काळाच्या वैभवाची साक्ष देत आजही येथे काही प्राचीन मंदिरे तेवढी शिल्लक आहेत. सोमपूर महाविहाराला आता जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. दगडांच्या अभावाने येथील मंदिरे विटांनी बांधलेली असल्याने इस्लामी वरवंट्याखाली इतकी शतके उलटल्यानंतर आता फारच कमी प्रमाणात काही शिल्लक राहिलेले आहे. पुढे बंगालचे हस्तांतरण पलाशीच्या लढाईत (पळसाच्या झाडावरून नाव, आपल्याला प्लासी शिकविले जाते) ब्रिटिशांकडे झाले. त्यांनीही याच प्रदेशातून सत्ता व संपत्तीची भूक भागवली. या प्रदीर्घ पारतंत्र्यात इस्लामचे सबलीकरण या राजशाही भागात झाले. पुढे फाळणीच्या वेळी निर्विवादपणे हा सर्व भाग पाकिस्तानात जाणार हे माहितीच झालेले होते परंतु गंगेचे विभाजन टाळण्यासाठी दिनाजपूर चा काही भाग व मालदा हे दोन्ही भारताला देण्यात आले व बदल्यात खुलन्यावरच्या लेखात लिहिल्याप्रमाणे हिंदुबहुल असूनही खुलना सुंदरबनसहित पूर्व पाकिस्तानात समाविष्ट झाले.
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया , अखंड बंगाल
वाचने
3871
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
हा भागही आवडला, अनवट लेखमाला.
अगदी छान लिहीली आहे.
अत्यंत महत्वाचा दस्तऐवज तयार
खुप नवीन माहिती मिळाली.
बंगालची लोक तर मराठयाना लूट्मार करणारे म्हनतात
छान...