Skip to main content

शेअर बाजार २०२४: नियोजन, चर्चा, अंदाज

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 18/12/2023 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा: सदर धागा लेखक अर्थतज्ज्ञ, गुंतवणूक तज्ज्ञ, बाजार सल्लागार इ. नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास व त्यातून आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास हे संस्थळ, सदर लेखक, प्रतिसादक इ. जबाबदार असणार नाहीत. --- बाजारात सध्या तेजीचा बैल चौखूर उधळतोय. महिन्याभरातच सुमारे ९ टक्क्यांनी वाढून मागच्या आठवड्याच्या शेवटी निफ्टी २१,४५६.६५ वर बंद झालाय. अर्थातच, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आइसीआइसीआइ बँक, इन्फी, टीसीएस सहित सगळ्याच प्रमुख कंपन्यांनी या आठवड्यात पाच टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. अदानींचे स्टॉक्स हिंडेनबर्गच्या ग्रहणातून बाहेर पडू लागलेत. या पार्श्वभूमीवर या आठवड्यात (१८ डिसेंबर २०२३) या महिन्यात, पुढच्या तिमाहीत आणि मुख्यतः २०२४ या वर्षात बाजाराचे चित्र कसे असेल, व्यापाराचे, गुंतवणुकीचे दिशा आणि धोरण काय असावे याची चर्चा मिपावर व्हावी या हेतूने हा धागा काढत आहे.* स्फूट नोंदी: इरेडा आइपीओची वर्गणी भरली होती. एकच लॉट मिळाला. ३२ च्या भावाने मिळालेल्या ४६० स्टॉक्सपैकी ८५ च्या भावाने १७३ स्टॉक्स विकून टाकले आणि भांडवल मोकळे केले. सध्या २८७ स्टॉक्स आहेत. १२३ पर्यंत गेलेला भाव सध्या ११० च्या खाली आलाय. ऍक्सेंट मायक्रोसेल आइपीओची वर्गणी भरली होती. एकही लॉट मिळाला नाही. नेट अवेन्यू आइपीओची वर्गणी भरायची होती, तिसऱ्या दिवशी पेमेंट करणे झाले नाही. १८ चा भाव ३४ वर गेलाय. प्रेस्टनिक इंजिनीअरिंग, डॉम्स इंडस्ट्रीज आइपीओची वर्गणी भरली आहे. सुतोवाच करण्यासाठी काही प्रश्न: सुझलॉन वर्षभरात थोडा थोडा करून सरासरी १४ वर घेतला होता, मध्यंतरी ३० वर थोडा विकला होता, आज अजून ३८ वर घ्यावा असा विचार सुरु आहे. दसरा-दिवाळीपर्यंत पन्नाशी पार करेल का? येसबँक या वर्षाच्या सुरुवातीला १६ वर घेतला होता, अजून ठेवला आहे. २०२५ च्या सुरुवातीपर्यंत पन्नाशी पार करेल का? मार्चमध्ये चाळीशीच्या खाली असलेला बँकनिफ्टी काळ अट्ठेचाळीशीवर गेला, येत्या मार्च-जूनपर्यंत पन्नाशी पार करेल का? रेल्वेला सेवा / उत्पादने पुरविणाऱ्या कंपन्यांत सहा महिन्यांसाठी गुंतवणूक करावी का? भारत सरकार अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला उत्तेजन देत आहे. त्यांतील कंपन्यांत वर्ष-सहा महिन्यांसाठी गुंतवणूक करावी का? अमेरिकेच्या बाजाराचे चित्र पुढच्या तिमाहीत कसे असेल? २०२४ लोकसभा निवडणुकांपर्यंत अडाणीचे स्टॉक्स वधारतील का? * 'बाजारात काहीही निश्चित नसते' वगैरे ढिसक्लेमर्स धरून / बाजूला ठेऊन मिपा तज्ज्ञांनी योगदान द्यावे ही विनंती. चर्चेतून झालाच तर मिपाकरांचा फायदा होईल आणि अजून वर्ष-सहा महिन्यांनी आपापले अंदाज किती बरोबर-चूक ठरले याची पडताळणी करून पाहता येईल. मिपावर राजकीय धुळवंड सुरु नाहीय, आर्थिक लठ्ठालठ्ठी सुरु करायला काय हरकत आहे? आखाडा सुरु झाल्यावर चार-दोन गुद्दे देता-घेता येतील ;-) चूभूदेघे. --- सध्या तरी बाजारात "काठोकाठ भरू द्या प्याला फेस भराभर उसळू द्या" अशी स्थिती आहे; एवढ्यातच "मानस का बधिरावे हे? बघतसे खिन्न जगता" असे होऊ नये ही श्री वेंकटेश्वर स्वामी चरणी प्रार्थना.

वाचने 19283
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

हवशे नवशे आणि गवशे चढत्या बाजारात भरपूर पाहायला मिळतात. बाजार उतरू लागला हे सर्व गायब होतात असे मी बाजाराच्या तीन आवर्तनात पाहिले आहे. तेंव्हा आजच्या चढत्या बाजारात नफा केला म्हणून खूष होणारे अनेक लोक बाजार खाली आला कि दृष्टीआड होतील हेही माहिती आहे माझा पहिला अनुभव नजर लागण्यासारखा आहे. पॅन्टलूनचे समभाग (१९९३ च्या आसपास) १० रुपयाला at par घेतलेले शेवटी त्यावर मिळणाऱ्या बोनस समभागासकट (२००३) विकले असता नक्त नफा २ लाख ३७ हजार झाला होता. हा पैसा माझ्या सर्वोच्च न्यायालयातील लढाईसाठी कामास आला होता. यानंतर २००६ मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यावर आलेले भविष्य निर्वाह निधी चे पैसे साफ बुडाले असे गृहीत धर ( तुला दोन वेळच्या जेवणाची कधीही ददात पडणार नाही हि हमी देऊन) असे पत्नीला सांगून मी बाजारात गुंतवले. म्हणून असा अनुभव परत येणार नाही हे १०० % सत्य आहे तेंव्हा पासून बाजारात अतिरिक्त पैसे गुंतवत आलो आहे. साधारण १४-१५ % वार्षिक या दराने मला नफा मिळाला आहे. यात मी संपूर्ण समाधानी आहे. आता या गुंतवणुकीवर आयुष्यभर बसून खाता येईल अशी स्थिती आहे. हे सर्व पैसे केवळ गुंतवणूकीतुन मिळालेले आहेत. यात सट्टा ट्रेडिंग ऑप्शन्स इ कधीही केले नाही. माझे अनेक समभाग गेल्या एक वर्षात १०० % नि वाढलेले आहेत( हि सूज आहे असे माझे मत आहे). त्यातील काही समभाग फार उच्चि वर असल्याने मी अर्धे विकले आहेत. मी कोणत्याही गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याचा विपरीत वागत आलो आहे. माझ्या खात्यात एकंदर १४० वेगवेगळ्या कंपन्यांचे समभाग आहेत. यात दारू आणि सिगरेट विकणाऱ्या कंपन्या नाहीत. एवढ्या समभागांवर लक्ष ठेवता येत नाही हा गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला मी साफ धुडकावून लावतो. आपण आपली क्षमता पाहावी. बहुसंख्य गुंतवणूक सल्लागार हे झापडबंद सल्ला देत असतात असे मी बऱ्याच वेळेस सहज सिद्ध करून दाखवलेले आहे. मी कोणालाही कसलाही सल्ला देत नाही. आणि जवळच्या लोकांचा सल्ला अमलात आणल्याने केवळ नुकसानच झाले असे लक्षात आल्यावर कुणाचाही सल्ला अमलात आणत नाही.

In reply to by सुबोध खरे

हवशे नवशे आणि गवशे चढत्या बाजारात भरपूर पाहायला मिळतात. बाजार उतरू लागला हे सर्व गायब होतात
--- मतभिन्नतेच्या आदरासहित: एखादा विशिष्ट स्टॉक म्हणजे काही आपली लग्नाची बायको* नाही. नांदते आहे तोपर्यंत नांदावायची, नाहीतर... एकूणच बाजार म्हणजे आपले कार्यक्षेत्र; कधी वर कधी खाली होतंच असते, ते सोडून कसे चालेल? हा ट्रेडरचा दृष्टिकोन आहे. अर्थातच गुंतवणूकदाराचा दृष्टिकोन भिन्न असतो याची कल्पना आहे. --- * मी पुरुषाच्या दृष्टिकोनातून असे लिहीत आहे. एखादी स्त्री काय लिहील याची कल्पना नाही.

In reply to by सुबोध खरे

साधारण १४-१५ % वार्षिक या दराने मला नफा मिळाला आहे >>> हे लिहिल्याबद्दल धन्यवाद. सोशल मिडईयावर शेअर्स बद्दल लिहिणार्‍या अनेक गुंतवणूकदारांना मी त्यांना मिळालेल्या CAGR विशयी विचारले. कोणालाही कधीच हे आकडे सांगता आले नाही.

रचनाने बजेटनुसार पर्यटन, सौरऊर्जा, डिफेन्स,रेल्वे विभागातले stock सांगितले आहेत.यूट्यूब चानैलचा comment विभागही बघा अजून stock समजतील. https://youtu.be/zYftky9E7yE?si=BCb_vao1o3gAE33J CA Rachana Ranade(Marathi)असा तिचा व्हाटसपवर चानैल आहे.

आज निफ्टी २१२ व बँकनिफ्टी ८०४ अंशांनी खाली आले आहेत. उद्या आठवड्याचा शेवटच्या दिवशी अजून १०० व २०० अंशांनी खाली येतील का? --- रिझर्व्ह बँक गव्हर्नर दास - "सगळ्या शुल्कांसह कर्जाच्या संपूर्ण किंमतीबद्दल कर्जदारांना माहिती देणे बँकांना बंधनकारक होणार". हे एक समजले. गव्हर्नर अजून काय म्हणाले ते एखाद्या मिपाखराने सोप्या भाषेत समजावून सांगावं ही अपेक्षा.

मार्चमध्ये चाळीशीच्या खाली असलेला बँकनिफ्टी काळ अट्ठेचाळीशीवर गेला, येत्या मार्च-जूनपर्यंत पन्नाशी पार करेल का?
बँकांच्या चढत्या आलेखामुळे आज बँकनिफ्टी पन्नाशीच्या घरात गेलाय! बातमी बँकनिफ्टी निफ्टी