Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by टर्मीनेटर on Mon, 07/25/2022 - 13:31
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन
लेख
अनुभव
काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकरांच्या ‘प्रतिपक्ष’ ह्या युट्युब चॅनल वरील “पाच लाख आणि वीस कोटीची गोष्ट” ह्या व्हिडिओची शिफारस करण्यात आली होती. शिर्षकावरून विषयाचा काही अंदाज न आल्याने उघडून बघीतला तर अवघ्या सव्वादोन वर्षांच्या वाटचालीत प्रतिपक्ष चॅनलच्या सदस्यसंख्येने (Subscribers) ५ लाखांचा आणि एकुण दर्शन संख्य्येने (Views) २० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी भाऊंनी हा छोटासा व्हिडीओ तयार केल्याचे लक्षात आले! युट्युबवर पाच, दहा, पंधरा लाख किंवा त्याहुनही जास्त सबस्क्राइबर्स असणारे युट्युबर्स/चॅनल्स संख्येने कमी नाहीत, पण त्यांवरचा कंटेंट हा बहुतांश इंग्रजी किंवा हिंदी भाषेतला असल्याने त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा असतो. परंतु भाऊंच्या ‘प्रतिपक्ष’ ह्या ९८ ते ९९% मराठी* आणि जवळजवळ ‘वन मॅन शो’ टाईपच्या एकखांबी-एकहाती** युट्युब चॅनलने हा पल्ला गाठणे ही गोष्ट खचीतच कौतुकास्पद आहे. ( * लोकाग्रहास्तव काही व्हिडिओज हिंदी भाषेत आहेत. ** आंतरराष्ट्रीय राजकारण/घडामोडींवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी, स्वाती तोरसेकर ह्यांचे काही व्हिडिओज ‘एषा पृथ्वी’ सदरांतर्गत आहेत. ) आभारप्रदर्शनासाठी केलेल्या ‘पाच लाख आणि वीस कोटीची गोष्ट’ व्हिडिओत भाऊंनी ह्या यशाचे श्रेय अनेक घटकांना दिले आहे आणि त्यांच्या काही मर्यादा/तांत्रिक त्रूटी ह्यावरही भाष्य केले असले तरी माझ्यापरीने ह्या यशाचे मूल्यमापन करताना गेल्या काही वर्षांत सुरूवातीला त्यांचा वाचक मग अल्पकालीन प्रेक्षक आणि आता श्रोता अशा झालेल्या माझ्या प्रवासात आलेले काही अनुभव/निरिक्षणे मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच! पाच-साडेपाच वर्षांपूर्वी भाऊ तोरसेकर हे नावही मला माहिती नव्हते पण मिपावरच चर्चा प्रतिसादात कोणीतरी ‘जागता पहारा’ ह्या त्यांच्या ब्लॅागवरील एका लेखाची लिंक दिली होती. तो लेख वाचला आणि आवडला म्हणून त्यांचे अन्य लेखही वाचायला सुरूवात केल्यावर मात्र त्यांची सगळीच राजकीय मते, भाष्ये, अंदाज, अडाखे जरी पटत नसले तरी कधी त्यांचा नियमीत वाचक होऊन गेलो ते समजलेच नाही. घरी असो की ॲाफीसमध्ये ब्राऊझरवर कामासाठीच्या टॅब्जच्या जोडीला एका टॅबमध्ये 'मिपा' आणि दुसऱ्या टॅबमध्ये 'जागता पहारा' उघडलेला असायचा. त्यांच्या नव्या ब्लॅागपोस्टची प्रतिक्षा असायची! पुढे एप्रिल २०२० मध्ये पहिल्या लॅाकडाऊन काळात त्यांनी ‘प्रतिपक्ष’ हे युट्युब चॅनल सुरू केल्यावर मात्र त्यांचे ब्लॅागवरील लेखन कमी कमी होत सप्टेंबर २०२० नंतर नविन लेखन येणे बंदच झाले. नियमितपणे त्यांचे लेख वाचायची सवय झाली असल्याने पुढचे काही दिवस चुकल्या चुकल्यासारखे झाल्यावर काही महिन्यांनी (युट्युबचा वापर राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज पहाण्यासाठी करण्याची कल्पनाच सहन होत नव्हती तरीही) नाईलाजाने प्रतिपक्ष चॅनलला भेट देऊन भाऊंचा एक व्हिडिओ पाहिला आणि घोर निराशा झाली! निकृष्ट सिनेमॅटोग्राफी, कंटाळा येण्याइतपत अतिशय संथगतीतले बोलणे, वारंवार चष्मा काढणे/लावणे, गाल, नाक, कान, डोके खाजवणे, मध्येच रिमोटने AC चालु/बंद करणे अशा प्रेक्षकांना विचलीत करणाऱ्या क्रिया-देहबोली, अनावश्यक गोष्टी काढुन टाकण्यासाठी आवश्यक असलेला व्हिडिओ एडीटींगचा अभाव अशा अनेक कारणांनी अत्यंत निरस वाटल्याने तो पहिलाच व्हिडिओ देखील मी पुर्णपणे पाहु शकलो नव्हतो. मग पुढचे काही महिने प्रतिपक्षच्या वाटेला फिरकलोच नाही! आता नक्की किती महिने झाले असतील ते आठवत नाही (कदाचीत एखाद वर्षही झाले असेल) पण पुन्हा मिपावरील चर्चेतल्या एका प्रतिसादात कोणीतरी भाऊंचे संथ व्हिडिओ पहायला कंटाळा येत असल्याचा उल्लेख केला आणि त्यावरच्या उप्रतिसादात मिपाकर शाम भागवत ह्यांनी प्लेबॅक स्पीड १.५ करून भाऊंचे व्हिडिओ पहाण्याचा सांगीतलेला उपाय वाचला आणि, अरेच्चा… DIY किंवा तत्सम प्रकारातले जाणीवपुर्वक स्पीड वाढवून अपलोड केलेले कित्येक व्हिडिओज आपण त्यातल्या स्टेप्स नीट समजून घेण्यासाठी प्लेबॅक स्पीड ०.५ वा ०.७५ असा कमी करून पहातोच की, तीच क्रिया भाऊंचे व्हिडिओ पहाताना उलट करण्याची कल्पना आपल्याला सुचली कशी नाही असा विचार करून स्वत:च्याच डोक्यात टपली मारून घेत प्लेबॅक स्पीड वाढवून मोबाईलवर प्रतिपक्ष पहायला सुरूवात केली आणि मी प्रतिपक्षचा नियमीत प्रेक्षक झालो! त्यानंतर प्रतिपक्षवरचे शंभरेक व्हिडिओज पाहुन झाल्यावर प्रत्येक व्हिडिओत एकच नेपथ्य (बॅकग्राउंड) आणि वर उल्लेखीलेल्या त्यांच्या क्रिया, देहबोली वगैरे वगैरे बघून परत कंटाळा येऊ लागला परंतु ह्यावेळी मी प्रतिपक्ष पासून दुरावलो नाही ह्याचे कारण म्हणजे वेळीच सुचलेले शहाणपण! त्यावेळच्या त्राग्यात एक विचार मनात चमकून गेला की, आपण प्रतिपक्षवर येतो ते भाऊंचे विश्लेषण ऐकण्यासाठी, त्यांची मते समजून घेण्यासाठी, श्रवणसुखाच्या जोडीने नेत्रसुखाचीही अनुभूती देण्यासाठी भाऊ म्हणजे Aleena Rais Live च्या 'अलीना रईस' (Aleena Rais) किंवा Gravitas Live / Gravitas Plus च्या 'पालकी शर्मा-उपाध्याय' (Palki Sharma-Upadhyay) थोडीच आहेत? तेव्हा भाऊंचे व्हिडिओज आपण बघण्याऐवजी नूसते ऐकु तर शकतो की! ‘भिक नको पण कुत्रं आवर’ ह्या म्हणीच्या धर्तीवर ‘पैसे घे पण जाहिराती आवर’ असं म्हणायची वेळ युट्युबने आणली होती/आहेच. जाहिरातींच्या भडीमारा पासुन मुक्ती मिळवण्यासाठी YouTube Premium चे सबस्क्रिप्शन घेतले होते त्यामुळे युट्युबचे ॲप मिनीमाईज करून इतर ॲप्स वापरत असताना किंवा फोन लॅाक करूनही बॅकग्राउंडला व्हिडीओ प्ले होत असल्याने हा उपाय चांगलाच कामी आला आणि मी प्रतिपक्षचा प्रेक्षक न रहाता श्रोता झालो. त्याचा आणखिन एक फायदा म्हणजे माझा स्क्रिन टाईम कमी झाल्याने डोळ्यांनाही थोडा आराम मिळू लागला. YouTube Premium चे सबस्क्रिप्शन संपल्यावर भाच्याच्या सुचनेवरून गेले काही महिने YouTube Vanced वर युट्युब (सर्व प्रिमीयम फिचर्स चकटफु वापरत 😀) बघत असल्याने हाच नित्यक्रम अद्यापही कायम आहे! असो, ह्या लेखाचा उद्देश भाऊंवर किंवा त्यांच्या ‘प्रतिपक्ष’ चॅनलवर टिका करण्याचा नक्कीच नाही. काही त्रूटी/ कमतरतांचा उल्लेख भाऊंनी स्वत: ह्या आणि त्यांच्या अन्य व्हिडिओज मध्ये प्रांजळपणे केलेला आहेच, पण त्यांचा एक चाहता वाचक, प्रेक्षक आणि श्रोता ह्या नात्याने माझी काही निरिक्षणे, काही गोष्टींमुळे होणारा रसभंग व तो दुर करण्यासाठी केलेले उपाय ह्यांचा गोषवारा माझ्याप्रमाणेच मिपावर असलेले भाऊ तोरसेकरांचे अनेक चाहते, वाचक, प्रेक्षक आणि श्रोते तसेच अशा सर्वांसाठी ह्या छोटेखानी लेखातुन मांडला आहे. सोशल मिडिया वरील भाऊंच्या चॅनलचे हे यश मेनस्ट्रीम मिडियाचा घटता प्रभाव तर दर्शवतेच पण त्याच बरोबर अत्यंत कमी/मर्यादित संसाधनांचा, तंत्रज्ञानाचा वापर करत, कुठलाही चमचमाट, झगमगाट न करता केवळ चांगल्या कंटेंटच्या जोरावर तयार केलेले अनौपचारीक असे व्हिडिओज बनवुनही असे घवघवीत यश मिळवता येते ह्याचेही उत्तम उदाहरण आहे! इतक्या कमी वेळात ‘प्रतिपक्ष’ ला मिळालेल्या ह्या यशाबद्दल भाऊंचे हार्दिक अभिनंदन! सध्या त्यांच्या मागे दिसणाऱ्या Silver YouTube Creator Award च्या जागी लवकरात लवकर १० लाख सबस्क्राइबर्स चा टप्पा गाठल्यावर मिळणारे Gold YouTube Creator Award बघायला मिळो अशा शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
  • Log in or register to post comments
  • 35077 views

प्रतिक्रिया

Submitted by कंजूस on Mon, 07/25/2022 - 20:12

Permalink

मराठी माणसाची आवड.

मराठी माणसाला राजकारण आणि क्रिकेट बायकोपेक्षा जास्त प्रिय असते असे कुठेतरी वाचले होते ते बहुधा खरे असावे.
खरेच आहे. होम मिनिस्टरमध्ये ( झी मराठी चानेलवरचा एक विनोदी कार्यक्रम) बऱ्याच महिलांनी हे सांगितले आहे. "बघण्याचा कार्यक्रमात नवऱ्याकडच्या सगळ्यांनी बघितले पण'ह्यां'नी बघितलेच नाही म्हणून दुसरा आणखी एक कार्यक्रम ठेवावा लागला." "का?" " ते क्रिकेट बघत होते आमच्याकडे टीवीवर."
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Mon, 07/25/2022 - 20:37

Permalink

भाऊ तोरसेकरांचे हे भाषण मी

भाऊ तोरसेकरांचे हे भाषण मी खूप एन्जॅाय केले. <\a> भाऊंनी विनोदी शैलीने मुद्दे मांडले आहेत. बऱ्याच वेळेस खळखळून हसायला येते.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Mon, 07/25/2022 - 20:39

In reply to भाऊ तोरसेकरांचे हे भाषण मी by शाम भागवत

Permalink

अरेच्या चूकून स्टार्ट टाईम ३८

अरेच्या चूकून स्टार्ट टाईम ३८:०० मिनिटांना सेट झालाय. सुरवातीपासून जरूर पहा. नक्की एन्जॅाय कराल.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 07/25/2022 - 21:43

Permalink

Confirmation Bias

एखादा मराठी राजकारणावरील भाष्यकार एवढे दर्शक मिळवू शकतो हेच मोठे यश आहे.
ही Confirmation Bias ची किमया असू शकते. त्या परिप्रेक्ष्यात एखाद्या विचारसरणीचे समर्थक जितके जास्त तितके त्या विचारसरणीच्या भाष्यकाराचे "यश" अधिक असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Mon, 07/25/2022 - 21:48

In reply to Confirmation Bias by सतिश गावडे

Permalink

शक्यता असू शकते.

तोरसेकरांचे युट्यूब व्हिडीओ पासूनचे उत्पन्न इथे भाऊ साधारण किती पैसे कमवत असतील याचा अंदाज येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 07/26/2022 - 12:15

In reply to शक्यता असू शकते. by धर्मराजमुटके

Permalink

पोटार्थी

भाऊ पोटार्थी आहेत असे वरती म्हणलो आहे ते याच साठी
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Tue, 07/26/2022 - 14:21

In reply to पोटार्थी by कपिलमुनी

Permalink

अगदी बरोबर.

अगदी बरोबर. भाऊ तोरसकर हे पोटार्थी आहेत. त्यामुळे त्यांनी बोललेल पास. राजदीप सरदेसाई व बरखा दत्त सारखे हाडाचे पत्रकार भाऊ नाहीत. महामहीन द्रौपदी मुर्मू जींच्यां निवडणुक जिंकल्यावर, पत्रकारांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्यात ते बघुन कोण किती व कसे कातडे ओढुन आहे हे लक्षात येते.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 07/26/2022 - 14:34

In reply to अगदी बरोबर. by डँबिस००७

Permalink

ऑ !

कपिलमुनींच्या मताशी मी सहमत असेलच असे नाही, कारण भाऊ पोटार्थी आहेत वा नाहीत, त्यांना पोटासाठी ते भलामण करतात किंवा विश्लेषण करतात त्या पक्षाकडून काय मिळते ते पण मला माहिती नाही, ती जबाबदारी कपिलमुनी घेवोत, माझे काही बेसिक प्रश्न आहेत फक्त. १. भाऊ पोटार्थी आहेत ह्या विधानातून , बरखा/ राजदीप निस्पृह पत्रकार आहेत हे विधान अन निष्कर्ष कसे काढलेत ? २. धागा भाऊंवर आहे, कॉमेंट भाऊंवर आहे, धागा अन कॉमेंटकर्त्यांच्या तोंडी कश्याला शब्द घुसवताय ?? ते जे बोललेत त्यांची जबाबदारी आहेच पण जे बोललेत त्याला प्रत्युत्तर बरखा राजदीप विकेलेले असणे नसणे कसे होऊ शकते ?? ३. परत, धागा विषय भाऊ, कॉमेंट आली भाऊंवर त्यावर तुम्ही तिसरंच काहीतरी म्हणणार , कश्यासाठी ? भाऊंचे पोटार्थी असणे चूक आहे असे पण म्हणलेलं दिसत नाहीये कॉमेंटकर्त्याने, मग गहजब कश्याला ? का भाऊ पोटार्थी आहेत हे विधान करण्यास कॉमेंटकर्त्याने इतरांना निस्पृह/ विकले गेलेले इत्यादी सर्टिफिकेट वाटणे कायद्याने बंधनकारक आहे म्हणताय ?? तुमचं आमचं काही वैयक्तिक वितुष्ट नाही बुआ (निदान आमच्याकडून तरी) पण एकंदरीत इतकी ढळढळीत लॉजिकल फॉलसी दिसली म्हणून विचारतोय, नक्की काय लाईन ऑफ थॉट्स आहे तुमची ??
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 07/26/2022 - 15:38

In reply to ऑ ! by जेम्स वांड

Permalink

उपरोध आहे तो.

उपरोध आहे तो.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 07/26/2022 - 15:59

In reply to उपरोध आहे तो. by राघव

Permalink

का

व्हॉट अबाऊटरी !?
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Tue, 07/26/2022 - 17:05

In reply to का by जेम्स वांड

Permalink

भाऊ पोटार्थी आहे !!

भाऊ पोटार्थी आहे !! ह्यात "पोटार्थी" शब्दालाच माझा आक्षेप आहे. जगात सगळेच पोटासाठीच काम करतात, राजदीप व बरखा त्याला अपवाद नाहीत. बाकी माझा प्रतिसाद कपीलमुनीं यांना होता, तुम्ही कश्याला तसदी घेता ?
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Tue, 07/26/2022 - 17:48

In reply to भाऊ पोटार्थी आहे !! by डँबिस००७

Permalink

त्याचं काय ए

आपल्या लक्षात आलं नसेल तर सांगतो, मिसळपाव वर नेस्टेड अन थ्रेडेड व्युज पद्धतीने लेटेस्ट सगळ्यात खाली प्रकारात प्रतिसाद दिसतात, धागा स्क्रोल करताना ते 'दिसतात' दिसले की त्याला आम्ही 'प्रतिसाद' देतो, कारण २००७ च्या गणेश चतुर्थीला मिपाची मुहूर्तमेढ रोवली गेली तीच मुळात "मराठी माणसाला व्यक्त होण्याचे एक व्यासपीठ" म्हणून, आता सांगा बरं तुमच्या विनंतीला मान देऊन तसदी घेऊ नको का मालकांच्या मेहनतीला प्रणाम करून थोडी घेऊनच टाकू तसदी म्हणे मी ? ता.क. - फक्त कपिलमुनी ह्यांच्यासोबत जमाडीजम्मत प्रतिसाद गुप्तपणे खेळायचे असल्यास मिपा चालकांनी व्यनि उर्फ व्यक्तिगत निरोप सुविधा दिली आहे हं, किंवा खरडवही पण आहे, लाभ घ्या, ओपन थ्रेड वर प्रतिसाद येणारच, पचत अन पटत नसले तर तो तुमचा प्रश्न आमचा नाही. जगात सगळे पोटार्थी असतात हा साक्षात्कार व्हायचा मुहूर्त अंमळ मजेशीर वाटला इतकेच... असो, तुमचे म्हणणे मान्य ! जगात सगळे पोटार्थी आहेतच, हे सुलभ ज्ञान जरूर लक्षात ठेवेन :)
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Tue, 07/26/2022 - 14:21

In reply to पोटार्थी by कपिलमुनी

Permalink

अगदी बरोबर.

अगदी बरोबर. भाऊ तोरसकर हे पोटार्थी आहेत. त्यामुळे त्यांनी बोललेल पास. राजदीप सरदेसाई व बरखा दत्त सारखे हाडाचे पत्रकार भाऊ नाहीत. महामहीन द्रौपदी मुर्मू जींच्यां निवडणुक जिंकल्यावर, पत्रकारांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्यात ते बघुन कोण किती व कसे कातडे ओढुन आहे हे लक्षात येते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 07/25/2022 - 22:04

Permalink

मी भाऊंचे लेखन त्यांच्या

मी भाऊंचे लेखन त्यांच्या ब्लॉगवर जाऊन काही काळ वाचले होते, त्याचे प्रतिपक्ष या चॅनलवरील व्हिडियो मी अधुन-मधुन पाहत असतो. मराठी मेनस्ट्रीम मिडिया आणि पत्रकार जे विष्लेषण करत नाहीत त्याच गोष्टींवर भाऊ उत्तम विश्लेषण करतात ते देखील कोणतीही लिखित माहिती त्यांच्या समोर न ठेवता. मला स्वाती तोरसेकरांचे व्हिडियो देखील विशेष आवडतात कारण त्या राजकारण सोडुन इतर विषयांवर भाष्य करतात. भाऊंनी देखील इतर विषयांवर बोलायला हवं कारण सात्यत्याने राजाकारावरील विवेचन कंटाळवाणे होते. [ मला तरी व्यक्तिगत रित्या सारखं राजकारणावरच भाष्य केलेले पहायला / वाचायला आवडत नाही. ] अगदी उदा. म्हणुन हल्लीच एक मोठी घटना झाली, ती म्हणजे चीनला मागे टाकुन हिंदूस्थानच्या अदानी समुहाने इस्रायलच्या हायफा बंदराचे ३१ वर्षासाठी असलेले कंत्राट मिळवले आहे. या विषयावर भाऊंचे किंवा स्वाती तोरसेकरांचे भाष्य यायला हवे होते असे एक मराठी श्रोता म्हणुन मला वाटते. भाऊंची दाणगी स्मरणशक्ती आणि त्या आधारे संदभ देण्याची हातोटी उल्लेखनीय आहे. स्व:ताला जास्त तात्रिक माहिती नसुन देखील त्यांनी उत्तम विश्लेषण वेळोवेळी केलेच आहे पण यात उत्तम असे यश मिळवले आहे ही नक्कीच कौतुकाची आणि उल्लेखनिय बाब आहे. या धाग्याच्या निमित्त्याने त्यांचे मी या यशा बद्धल मनःपूर्वक अभिनंदन करतो. जाता जाता :- त्यांच्या चॅनल कडुन राजकारणा बरोबरच हिंदूस्थानाच्या दृष्टीकोनातुन महत्वाच्या ठरणार्‍या आणि घडणार्‍या महत्वाच्या घडामोडींवर देखील भाष्य करावे अशी एक दर्शक आणि श्रोता म्हणुन माझी इच्छा व्यक्त करत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Piharva ft. Shraddha Dangar & Bhavya Gandhi | Sachin Jigar | Anumita Nadesan | Sachin Sanghvi
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Tue, 07/26/2022 - 15:53

Permalink

शीर्षकातली काही शब्दच नवे

शीर्षकातली काही शब्दच नवे लेखन मध्ये दिसत होते ते पाहुन वाटले कि भाऊंनी मिपाचे सदस्यत्व घेतले कि काय?
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 07/26/2022 - 16:42

In reply to शीर्षकातली काही शब्दच नवे by कानडाऊ योगेशु

Permalink

:-))

हा हा! भारी! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 07/26/2022 - 16:52

Permalink

भाऊ फक्त राजकीय प्रतिपक्ष सादर करतात काय?

शिनुमासंबंधित तारे,तारका,घटना यांवर कोण बोलतात चांगले?
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Tue, 07/26/2022 - 17:32

Permalink

करोना काळात काही भाऊंचे काही

करोना काळात काही भाऊंचे काही व्हिडिओ पाहिले होते.खुप विश्लेषणात्मक वाटले.म्हणजे एखाद्याला सवय,आवड लागेल,परत ऐकावे वाटतील एवढा आशय नक्कीच मिळतो. छान लेख धागा आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 07/27/2022 - 03:09

Permalink

भाऊरावांची चलचित्रं

भाऊरावांच्या लेखनाचा चाहता आहे. त्यांचा व्यासंग अफाट म्हणू की दांडगा. पण ती चलचित्रं पाहणं नको वाटतं. एकतर ती वेळखूप घेतात आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे संदर्भ म्हणून उल्लेखता येत नाहीत. त्याकरता लेख बरे पडतात. पण काये की भाऊंरावांचं वय झालं असल्याने लेखन टंकण्याचा ताण असू शकतो. मराठी बोललेलं तत्काळ छापण्याची सुविधा कुठे मिळेल काय? -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 07/27/2022 - 09:52

In reply to भाऊरावांची चलचित्रं by गामा पैलवान

Permalink

हे app पाहा

English to Marathi translator (( https://play.google.com/store/apps/details?id=free.translator.englishtomarathitranslator.marathitoenglishtranslation ))by CrazyDeveloperG Available on Android 8 - 12 10k wordsही भाषांतर करते पटकन. बोललेलं टाईपही होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Wed, 07/27/2022 - 09:32

Permalink

गा.पै. यांच्याशी सहमत.

गा.पै. यांच्याशी सहमत. त्यांचा जवळजवळ प्रत्येक लेख वाचत असे, बऱ्याचदा प्रयत्न केला पण ते व्हिडिओ पाहणं काही जमत नाही. लेखाची मजा व्हिडिओत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 07/27/2022 - 12:40

In reply to गा.पै. यांच्याशी सहमत. by मनो

Permalink

मी स्पीड १.५ करतो. माझी तूनळी

मी स्पीड १.५ करतो. माझी तूनळी वर्गणी प्रिमीयम स्वरूपाची असल्याने मोबाईलचा स्र्कीन ऑफ केला तरी चालतो. मोबाईल हातात किंवा खिशात ठेवयचा. कानात इअर बडस घालायची. घरात बसून किंवा कामे करता करता हिंडत फिरत ऐकता येते. मात्र आपण घरात एकटेच असलो तर फोन आला किंवा घरातील कोणी आपल्याशी बोलल्यास झटकन कळत नाही. त्यासाठी एकाच कानात इअर फोन घालायचा. तेवढे पुरते. मस्त वेळ जातो. पूर्वी खूप श्रीमंत लोकं वर्तमानपत्रे / आलेली पत्रे वाचून दाखवायला माणसे ठेवायची. अगदी ती सर्वीस मिळते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 07/27/2022 - 16:53

In reply to मी स्पीड १.५ करतो. माझी तूनळी by शाम भागवत

Permalink

भाऊ किंवा तत्सम तूनळी

भाऊ किंवा तत्सम तूनळी चित्रफीती मी पहात नाही, भ्रमणध्वनीवरील आवरण मिटवून फक्त बोलणे ऐकतो व ऐकताना इतर काही काम सुरू असते.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on गुरुवार, 07/28/2022 - 10:52

In reply to भाऊ किंवा तत्सम तूनळी by श्रीगुरुजी

Permalink

हे मी शेखर गुप्ता इत्यादी

हे मी शेखर गुप्ता इत्यादी हिंदी पत्रकारांच्या बाबतीत करतो. भाऊ इतके रटाळ बोलतात, आणि मुद्द्यावर यायला वेळ घेतात की ऐकत असलो तरी लक्ष कधीच भलतीकडे गेलेले असते. मला आठवते त्याप्रमाणे भाऊ सामना पेपरात काही काळ तरी नक्कीच होते, त्यामुळं बाळासाहेब, राज ठाकरे इत्यादी मते ही तिथून आलेली आहेत, ती तशीच असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 07/28/2022 - 11:18

In reply to हे मी शेखर गुप्ता इत्यादी by मनो

Permalink

भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत.

भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत. बरेचसे सेनेकडे, काहीसे भाजपकडे झुकलेले आहेत. पण खूप सभ्य व उपरोधिक बोलतात. त्यांच्याकडे खूप माहिती सुद्धा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 07/28/2022 - 11:46

In reply to भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत. by श्रीगुरुजी

Permalink

भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत.

भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत.
भाऊंचे व्हिडिओ पाहवत नाहीत, सादरीकरण आणि भलामण ही दोन कारणे. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचा "जागता पहारा" हा ब्लॉग वाचनीय होता, पण भाऊंनी नंतर लेखनाचा गियर बदलला आणि त्या ब्लॉगची रया गेली. तर ही जेव्हा ब्लॉग वाचनीय होता तेव्हाची गोष्ट. भाऊ लिखाणातील दोन पार्टी कोण आहेत यावरून कुणाला झुकते माप द्यायचे हे ठरवत असावेत बहूधा तेव्हा. म्हणजे दोन भावाविषयी ते काही लिहीत असतील तर धाकट्या भावाची बाजू घ्यायचे. जर राज्य आणि देशपातळीवरील उजव्या बाजू असतील तर ते राज्यपातळीरील उजवी बाजू लावून धरायचे. आणि उजवे विरुध्द इतर अशा सामन्यात ते अर्थातच उजव्या बाजूने असायचे. मधल्या काळात जी बाजूंची गुंतागुंत झाली त्यात कोणती बाजू घ्यायची हे ठरवताना कदाचित त्यांचा गोंधळ उडाला असेल :)
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 07/28/2022 - 11:15

Permalink

भाऊ इतके रटाळ बोलतात, आणि

भाऊ इतके रटाळ बोलतात, आणि मुद्द्यावर यायला वेळ घेतात की ऐकत असलो तरी लक्ष कधीच भलतीकडे गेलेले असते.
अगदी. अगदी. :)
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on गुरुवार, 07/28/2022 - 11:51

Permalink

भाऊची विश्लेषणची शैली आवडते.

भाऊची विश्लेषणची शैली आवडते. सामान्य लोक कशी विचार करतात ते कळते. बरेचदा मोठे मोठे पत्रकार त्यांच्या दुनियेत वावरत असतात. त्यांच्या चित्रफिती सातत्याने बघणे कामामुळे व इतर व्यापामुळे जमत नाही. जेव्हा महत्वाची गोष्ट होते, निवड्णुक असते तेव्हा ते बघण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 07/28/2022 - 12:51

Permalink

चला दुसरा समिक्षक शोधू.

अर्ध्या तासाच्या वक्तव्यात सहा मुख्य वाक्ये असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 07/28/2022 - 15:02

In reply to चला दुसरा समिक्षक शोधू. by कंजूस

Permalink

हो.

हो.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on गुरुवार, 07/28/2022 - 14:29

Permalink

भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत.

भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत. भाऊ नि:पक्षपाती असावेत असा आग्रह का ? जर आयडल सिचुएशन मध्ये पत्रकार म्हणुन नि:पक्षपाती असावेत असा दावा असेल तर तो दावाच चुकीचा आहे कारण ही आयडल सिचुएशन नाही आणि सर्व पत्रकारांनी आपापले पक्ष निवडलेले आह्रेत. त्यात वरिष्ठ पत्रकार शेखर गुप्ता, राजदिप सर देसाई, बरखा दत्त, विनोद दुआ, रविश कुमार, प्रणय जेम्स राय , राहुल कंवल इतकेच कायतर लल्लन टॉपचा ह्रषभ द्विवेदी, लाँड्रीचा सिकरी "द वायरचा" सिद्धार्थ वरदराजन हे सगळे डावे धार्जीणे लोक आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on गुरुवार, 07/28/2022 - 14:53

Permalink

भाऊ तोरसेकर हे पत्रकार आहेत

भाऊ तोरसेकर हे पत्रकार आहेत असे वाटत नाही. म्हणजे, कि ते ऑन ग्राउंड जाऊन नवीन माहिती आणतात असे काही दिसले नाहीये. ते घरबसल्या बातम्या वाचतात आणि त्यावर त्यांची मते सांगतात. राजकीय विश्लेषक हे पत्रकार म्हणण्यापेक्षा योग्य ठरेल. त्यांच्या बातम्यांचा परीघ अगदी लहान असतो असा माझा समज आहे. एकूण, आपल्याला माहित असलेली व पाच मिनिटांत ऐकता येईल अशी बातमी, एकाच बाजूने रटाळपणे ३०-४५ मिनिटं ऐकणे हे दिव्य लोकं कसकाय करतात ह्याचे आश्चर्य वाटते. मला व्यक्तिष: या प्रकारात फारसे मूल्यवर्धन दिसत नाही. हा, काही ऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी ते चांगली सांगू शकतात, आपल्या क्लिंटन साहेबांप्रमाणे. पण आपला त्यातला रस मर्यादित असल्याने त्यासाठी इतका रटाळ व्हिडीओ बघणे शक्य नाही. आमच्या घरातले अनेक वयस्कर लोक झोपताना भाऊ तोरसेकरांचा व्हिडीओ लावतात आणि घोरू लागतात.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 07/28/2022 - 15:01

In reply to भाऊ तोरसेकर हे पत्रकार आहेत by कॉमी

Permalink

आणि घोरू लागतात. :)))

आणि घोरू लागतात. :)))
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 07/28/2022 - 15:00

Permalink

असे कसे...

भाऊ नि:पक्षपाती असावेत असा आग्रह का ?
आहे आग्रह. तुम्ही पण धरा ना तसा आग्रह तुम्ही यादी दिलेल्या पत्रकार लोकांकडून. =)) गंमतीचा भाग सोडा, असा कुणाचा काही आग्रह दिसत नाही. माझा तरी नाही. धागा भाऊंच्या विषयी असल्याने केवळ निरीक्षण व्यक्त केलंय. तुम्ही बळेच इतर पत्रकारांची यादी देऊन whataboutery सदृष्य प्रतिसाद देत आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on गुरुवार, 07/28/2022 - 21:35

In reply to असे कसे... by सतिश गावडे

Permalink

असेच म्हणून

तुम्ही बळेच इतर पत्रकारांची यादी देऊन whataboutery सदृष्य प्रतिसाद देत आहात
सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 07/28/2022 - 15:11

Permalink

YouTube Premium चे

YouTube Premium चे सबस्क्रिप्शन संपल्यावर
मी फॅमिली पॅक घेतो. त्यामुळे मी व घरातील आणखीन ५ जणांना प्रमिअम वर्गणीचे फायदे मिळतात. आपण ५ ईमेल ॲड्रेस फक्त कळवायचे असतात. महिना ₹१८९. ६माणसांना म्हणजे दरदिवशी दरमाणसी ₹१ एवढाच खर्च येतो. मला तरी फुकट घेण्यापेक्षा थोडे पैसे मोजले की बरे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 07/28/2022 - 15:52

In reply to YouTube Premium चे by शाम भागवत

Permalink

मी 'यूट्यूबगो' चानेल वापरतो.

आणि त्यात कमी साईजचा विडिओ डाऊनलोड करतो.( दहा पंधरा एमबी) मग तो हवातसा प्लेब्याक करून पाहतो. म्हणजे पर्यटनचे विडिओ असेच पाहतो. बऱ्याच विडिओत काही विशेष नसतं. वेळ आणि डेटा वाचतो. (( पण हे youtube go app गूगलने हल्लीच काढून टाकले आहे. ))फोनमध्ये डाउनलोड केलेले असेल तर डिसेंबरपर्यंत चालेल.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 07/28/2022 - 21:55

Permalink

कोणाकडे

कोणाकडे भाऊ तोरसेकरांचा संपर्क क्रमांक असेल किंवा विरोपाचा पत्ता असेल तर ह्या चर्चेचा दुवा पाठवून द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Fri, 07/29/2022 - 11:23

Permalink

मी भाऊंचा ब्लॉग वाचायचो

पण त्यांनी लिहिणे बंद केले आणि व्हिडीओ कडे वळले. मी मोबाईल वर फार काही ऐकत नाही आणि व्हिडीओ पण पाहत नाही. त्यामुळे त्यांचा एकही व्हिडीओ पाहीला नाही. त्यांच्या लिखाणाचा मात्र पंखा आहे, कारण त्यांचे संदर्भ. जुने संदर्भ देण्याची त्यांची हातोटी खूप चांगली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Mon, 03/06/2023 - 15:21

Permalink

बऱ्याच दिवसांनी आज भाऊंचा एक चांगला विश्लेषणात्मक व्हिडीओ बघा

बऱ्याच दिवसांनी आज भाऊंचा एक चांगला विश्लेषणात्मक व्हिडीओ बघायला मिळाला! अमित शहांना शिवसेना संपवायची नाही वाचवायची आहे म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 03/06/2023 - 21:45

Permalink

भाऊंच्या चित्रफीति पूर्वी

भाऊंच्या चित्रफीति पूर्वी अधूनमधून पहात होतो. आता क्वचितच पाहतो. त्यांच्या काही ठाम समजूती आहेत व त्या चुकीच्या असल्या तरीही त्या समजुतींना ते घट्ट चिकटून आहेत आणि वारंवार तेच तेच सांगत राहतात. पूर्वी त्यांची काही भाकिते बरोबर आली असतील, पण नंतरची बरीचशी भाकिते चुकली आहेत. त्यांना जे आदर्श वाटतात, ते काही चुकीचे निर्णय घेतात हेच त्यांना मान्य नाही. तेच तेच दळण सुरू असते. त्यामुळे आता फारसे पहात नाही.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com