घर पाहतो बांधून : १

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in जनातलं, मनातलं
27 Sep 2022 - 4:14 am

गावी स्वतःचं, स्वतः घडवलेलं एक घर असावं अशी खूप इच्छा होती.

घरांबद्दल मी खूप वाचत आलो. अगदी अलिकडचं उदा. द्यायचं तर नंदा खर्‍यांच्या नागपूरच्या घराबद्दल त्यांच्या 'ऐवजी' या आत्मचरित्रात्मक पुस्तकात वाचलं. त्याआधी माधव आचवलांपासून ते गणेश मतकरी अशा अनेक लोकांचे घराबद्दलचे लेखन मी वाचलं आहे. काहींची अगदी किशोरवयीन उत्साहाने कात्रणंही जपून ठेवली आहेत.
कोल्हापुरात असताना माझ्या वास्तव्याशेजारी एक सुंदर बंगला होता. मी त्या बंगल्याच्या बागेकडे, कुंपणावर सोडलेल्या वेलींकडे जातायेता आवर्जून खूप वेळ पाहत असे. मालकांचे नाव गर्दे अंकल. गर्दे अंकल नामांकित आर्किटेक्ट. माझी काकू ब्युटी पार्लरच्या होतकरू दिवसांमध्ये त्यांच्या पायांना मालीश करायला जाऊ लागली. काकूकरवी मला त्यांच्या घरी प्रवेश मिळाला.

घरात चंद्रप्रकाश सांडावा म्हणून आतल्या जिन्यावरती पारदर्शक छत बसवून घेणारा अवलिया माणूस. स्वतःचं घर असल्याने अर्थातच विट न विट विचारपूर्वक रचलेली. स्थापत्याविषयी माझी जिज्ञासा जागृत झाली आणि मग मी जमेल तशी पुस्तकं, मिडिया, अनेकाविध परदेशी कार्यक्रम यांचा फडशा पाडत गेलो.

गर्दे अंकल यांना म्हशीची चित्रं काढायचा छंद होता. माझ्यात एक डंबलडोर/गँडाल्फ दडून बसल्याने मला असे (अत्रंगी) लोक पटकन आवडून जातात. त्यांचे-माझे बरेचसे इंटरेस्ट जुळत असल्याने मी त्यांच्या घरी जायचा चान्स चुकवत नसे. गर्दे अंकल यांनी मला एकदा त्यांच्या घराबद्दलचा स्थापत्यविचार विस्ताराने समजावून सांगितला. त्यामुळे, आणि पूर्वीच्या माझ्या उपजत किड्यांमुळे अवकाश, आकार अशा अनेक गोष्टींवर इतक्या खोलवर विचार करावा लागतो हे उमगत गेलं. मी दहावीचा अभ्यास सोडून माझ्या भविष्यातल्या घराचे फ्रंट, टॉप, साईड विव्ह्युज काढत बसे त्या वेडेपणाला खरेतर अजून जोरकस चालना मिळाली. आजही बरोब्बर मोक्याच्या वेळेस मी घरांचे आउटलाइन्स काढत बसतो.

मी कुटुंबाच्या प्रेशरला शरण जाऊन पुण्यात फ्लॅट घेतला. त्या फ्लॅटमध्ये २ वर्षे राहिलोही. तरीही त्या फ्लॅटला मला कधीही घर म्हणावेसे वाटले नाही. फ्लॅट वाईट नाही. पण मला तिथे (डीएसकेछाप म्हणा हवं तर) घरपण जाणवलं नाही.

स्वतःचं घर असणं हा एक कर्तबगारी सिद्ध करण्याचा प्रकार आहे. मला त्यात आता बिल्कूल स्वारस्य नाही. ते करून झालं. मला माझं एक घर फक्त माझ्या स्वतःच्या आर्किटेक्ट होण्याच्या खाजेपायी बांधून पाहायचं आहे. मला त्यात आनंद मिळतो.

अनेक लोक घर बांधताना किंवा फ्लॅट सजवताना नको तिथं पैसा घालतात. उदा. आजकाल सगळीकडे साथीसारखा पसरलेला फाल्स सिलिंग नामक भयंकर प्रकार. म्हणजे घराच्या खिडक्यांना उत्तम दर्जाच्या जाळ्या नसातात किंवा एकदम कामचलावू दर्जाचे बाथरूम फिटिंग्ज असतात पण सातशे चाळीस एलईडी लावलेले राजस्थानी फर्निचरवाल्याच्या डिजाईन बुकातले कलाकुसरीची परमावधी असलेले एक फाल्स सिलिंग आणि त्याला चिकटून असलेला एक किंवा दोन करकरणारे पंखे मात्र दिवाणखान्याची शोभा 'वाढवत' असतो. भारतीय हवामानाचा, किड्या कुड्यांचा फारसा विचार न करता, झुरळांच्या प्रजातीच्या रक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी केलेले किचन कट्ट्याखालील किचन कॅबिनेट. अर्थात काही गोष्टी आता गरजेच्या होऊन गेलेल्या आहेत. स्पेसही आक्रसत गेलेली आहे. त्यामुळे प्रसंगी झुरळं सहन करून असे किचन कॅबिनेट केले जातात. खैर, त्यावर पुन्हा कधीतरी.

मला एक घर बांधून पाहायचे आहे. म्हणजे मी काही गर्दे अंकल सारखा नामांकित आर्किटेक्ट नाही. पैसे पडून असलेला मिनिमिलिस्टही नाही. उपयोजिता हा माझ्या घराचा, घरातल्या गोष्टींचा एक महत्त्वाचा गुण असणार आहे. पण उपयोजितेच्या नावाखाली मला ट्रान्सफॉर्मरसाखे एकशेवीस आकार बदलणारे फर्निचरसुद्धा करायचे नाही. मी आतापावेतो पाहिलेल्या अनेक घरांचा, इंटिरियरचा प्रभाव नक्कीच असेल. असे एक घर मला, माझ्या मालकीच्या जागेवर बांधायचे आहे. मी त्याला "मुक्तछंद" किंवा "साजणवेळा" असले भामटं दिखाऊ नावही देणार नाही. त्यात उगाच पूर्वीच्या वाड्यांना होते तसे फॅन्सी दरवाजे, पूर्वीच्या वाड्यांत होते तशा तुळया किंवा सदरा, पूर्वीच्या वाड्यांत होती तशी तुळशी वृंदावने, पूर्वीच्या वाड्यांत होती म्हणून मध्ये चौकोन मोकळी जागा, पूर्वीच्या वाड्यांत होते म्हणून लटकते कमोड, पूर्वीच्या वाड्यांत होत्या म्हणून जागोजागी समया आणि लामणदिवे वगैरे नको त्या इम्प्रॅक्टिकल गोष्टी करणार नाही.

एका बेसिक स्केच पासून सुरु करणार. प्रगती जशी होईल तशी मांडत राहणार. किती काळ लागेल सांगता येणार नाही. किती अडचणी येतील तेही ठाऊक नाही.

जागा कुठे तेही फायनल नाही. इथून सुरुवात आहे. पाहू.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

Bhakti's picture

27 Sep 2022 - 6:28 am | Bhakti

खुप छान!

कर्नलतपस्वी's picture

27 Sep 2022 - 7:04 am | कर्नलतपस्वी

वास्तुशांती बोलवा.
घर बांधण्यास शुभेच्छा.

कंजूस's picture

27 Sep 2022 - 7:47 am | कंजूस

रिकामा प्लॉट केवढा आणि त्यात बांधकाम किती ठेवणार?

उपयोजिता हा माझ्या घराचा, घरातल्या गोष्टींचा एक महत्त्वाचा गुण असणार आहे.

यंव.

आग्या१९९०'s picture

27 Sep 2022 - 7:58 am | आग्या१९९०

आजकाल सगळीकडे साथीसारखा पसरलेला फाल्स सिलिंग नामक भयंकर प्रकार.
+१११
5 स्टार हॉटेलसारखी गृहसजावट करून घराचे घरपण घालवून बसतात बरेचजण.
स्वतःचे आर्किटेक्टचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर बांधत असाल तर नक्कीच बांधा. परंतु वयाची साठी ओलांडली असेल आणि गावी घर बांधायचा विचार करत असला आणि तिथेच कायमचे वास्तव्य करणार असाल तर दोनदा विचार करा. भले फ्लॅट हे घर वाटत नसेल,परंतु उतार वयात तेच सोयीचे ठरते. सोसायटीला मेंटेनन्सचे पैसे भरले तर पाण्याची टाकी भरणे, सेप्टिक टँक वेळोवेळी साफ करणे, कचरा व्यवस्थापन, बाह्य डागडुजी, घरपट्टी ,पाणीपट्टी इतर कर हे सर्व सोसायटी करत असल्याने आपल्याला बघावे लागत नसल्याने वेळ वाचतो. सोसायटीत वॉचमन असल्याने घराच्या सुरक्षितेची वेगळी व्यवस्था करावी लागत नाही. स्वतंत्र घर बांधल्यास हे सगळे आपल्याला करावे लागते जे उतार वयात कठीण होऊन बसते. शहरातील लोकांना गावाकडील लोकं खूप त्रास देतात, ग्रामपंचायत असेल तर मग विचारायलाच नको. मी ह्यातून गेलोय,परंतु माझ्याकडे पर्यायी व्यवस्था असल्याने फार त्रास होत नाही. सर्वात महत्वाचे घरात फार माणसं नसतील तर मजल्याचे घर कितीही छान वाटत असले तरी बांधू नये. उतार वयात जिना चढ उतार करणे कठीण होते व शेवटी वरचा मजला वापराविना पडून रहातो, त्याची देखभाल डोकेदुखी होऊन बसते.
बांधकामास शुभेच्छा!

मुक्त विहारि's picture

27 Sep 2022 - 8:27 am | मुक्त विहारि

सहमत आहे...

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Sep 2022 - 8:40 am | ज्ञानोबाचे पैजार

स्वतःच्या टुमदार घराची स्वप्ने रंगवताना हे मुद्देही लक्षात घेण्यासारखे आहेत.
माझ्या सारखे लोक ज्यांना गावाकडच्या आंगण असलेल्या बैठ्या घरांचे नेहमीच आकर्षण वाटते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा जरुर विचार केला पाहिजे.
पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

27 Sep 2022 - 9:47 am | मुक्त विहारि

आणि गावकरी व्यवस्थित चुना लावतात ....

कंजूस's picture

27 Sep 2022 - 10:30 am | कंजूस

शहरात राहिलेल्या महिला, मुलांना गावी जायचे नसते. ओढून नेल्यासारखे दोन दिवस येतात.

चौकस२१२'s picture

28 Sep 2022 - 9:15 am | चौकस२१२

आजकाल सगळीकडे साथीसारखा पसरलेला फाल्स सिलिंग नामक भयंकर प्रकार. !

"जसा रेस तास घोडा" या उक्ती प्रमाणे तुम्ही फाल्स सिलिंग कुठे करताय यावर अवलंबून आहे
माझ्य सध्याच्या कामात "विविध प्रकारच्या छताचे आकार" याचा संबंध येऊ म्हणून लिहितो

प्रथम, जर फ्लॅट असले तर साहजिक सपाट अशी वरच्या मजल्यावरची स्लॅब असणार म्हणजे बऱ्यापैकी सरळ आतले छत तिथे कदाचित फक्त "अप्रत्यक्ष येणाऱ्या झोताचे दिवे" बसवण्यासाठी आणि सर्वसदाहरण शोभे साठी फाल्स सिलिंग चा उपयोग समजू शकतो अर्थात अति टोकाला ना जाता

बंगला पद्धतीचे घर असे असेल तर छत हे तिरपे ( स्किलीयंन ) टोकेरी / त्रिकोणी ( गेबल ) असण्याची शकयता आणि अशावेळी जो वरील त्रिकोण तयार होतो तो एकतर आतून उघडा ठेवनणे किंवा सपाट पाहिजे असल्यास असे फाल्स सिलिंग अवयषयक ठरते !

दुसरे असे कि थंड प्रदेशातील घर असेल तर इन्सुलेशन साठी तसेच स्वच्छताघरातील टाकी दडवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग असतो
अर्थात सिलिंग वरील भागात उंदीर वैगरे होऊ नयेत म्हणून काळजी घेणे हे आलेच

याशिवाय कधी कधी "रांपासून संरक्षण " किंवा टिकाऊ पण ..असे इतर मुद्दे उपस्थतीत होता कसे ते सांगतो
मित्राने कौलारू ऐसपैस घर बांधले अर्थात छत त्रिकोणी होते ( भारतात) त्याला वरती जरी कौले पाहिजे हवी असली तरी म्हणून आधी त्याने त्रिकोणी स्लॅबच केली आणि मग त्यावर कौले "चिकटवली "

असो
हा छतावरून आठवले .. एक पूर्वी पासून चालत आलेला पारकर म्हणजे संपूर्ण छतावर गावात किंवा इतर वनस्पती लावणे (अर्थ रूफ )

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2022 - 12:51 pm | चौथा कोनाडा

+१

नि३सोलपुरकर's picture

27 Sep 2022 - 9:23 am | नि३सोलपुरकर

हणमंतअण्णा , १ नंबर .
तुमच्या जिद्दीला सलाम आणी खुप खुप शुभेच्छा.

कॉमी's picture

27 Sep 2022 - 10:18 am | कॉमी

हणमंतांण्णा, मस्त लिहिलंय. मज्जा येईल वाचायला.

अनिंद्य's picture

27 Sep 2022 - 11:02 am | अनिंद्य

रोचक आहे तुमचा विचार, स्वतः डिझाईन करून स्वतःच घर बांधायचा.

पुढील कृतींसाठी शुभेच्छा आणि प्रगतीबद्दल उत्सुकता.

पु ले शु

श्वेता व्यास's picture

27 Sep 2022 - 11:24 am | श्वेता व्यास

खूप शुभेच्छा आणि आपल्या मनासारखे घर लवकरात लवकर बांधून पूर्ण होवो ही सदिच्छा!

एक वेगळाच लेखनप्रयोग. रोचक. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

बाकी जिथे कायम राहू शकतो तिथेच घर करावे. "अधेमधे जाऊन राहू" इज अ मिथ.

चांदणे संदीप's picture

27 Sep 2022 - 11:54 am | चांदणे संदीप

रोचक धागा. वाचत राहणार.
पुभाप्र.

सं - दी - प

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Sep 2022 - 12:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

विचार आवडला. बाकी कुठलिही गोष्ट करताना "काय नको" याची यादी तयार असेल तर "काय करायचे" हे चांगले ठरवता येते. तुमची "नको" ची यादी तयार आहे म्हणजे २०% लढाई जिंकली.

बाकी गावाकडे घर बांधणे, मजल्याचे घर बांधणे, वीकेंड होम, फ्लॅट विरुद्ध बंगला यावर जाणकारांनी वरती दिलेल्या मताशी सहमत. आपली आर्किटेक्ट होण्याची इच्छा अणि घर बांधायचे स्वप्न लवकर साकार होवो.

रच्याकने--पुलंचे "आणि इथे मी काय मजा केलेय माहितेय का?" "इथे कुंथावे लागते की तेही ऑटोम्याटिक?" याची आठवण झाली. :) ह. घ्या.

आपली हि रचना आणि निर्मिती ची वाटचाल रोचक वाटतीय... आपण काय नको ते लिहिलंय पण काय हवे त्याचा काही मसूद नाही दिलात !
- जमिन कशी - सपाट/ उतार ?
- आजूबाजूला काय?
- दिशा
- शहरी निम शहरी , गाव कि अगदी वाडी
- हवामान ( प्रदेशातील )
- घरात ?हवामान नियंत्रण कसे काय ? नैसर्गिक?
- कोणते विशष बांधकाम साहित्य वापरायचे आहे का
- वीज पाणी ? सांडपाणी / मल मुत्र ?
- क्षेत्रफळ - जमिनीचे - बांधलेले
- बाग हवी नको
- मजले / सपाट ?
- पोहण्याची सोय?
- आंतरिक सोयी
कोणताही आर्किटेक्त्त आधी हे सर्व काहीतरी "विष लिस्ट " पद्धतीने विचारणारच मग पुढे कल्पना मांडणार !

स्वधर्म's picture

27 Sep 2022 - 2:14 pm | स्वधर्म

आण्णा, तुमचा विचार खूप चांगला आहे. फॉल्स सिलिंग, अतिप्रमाणात केलेली वेगवेगळी प्रकाशयोजना, याबाबत मी १००% सहमत आहे. सर्वात चांगलं घर कोणतं? तर आपल्याला जिथे रहायला छान वाटेल आणि आपले आरोग्यही चांगले राहील, ते; असे माझे व्यक्तीगत मत आहे. घर बांधताना अनेक ‘व्यावसायिक’ त्यात येतात, त्यापैकी सर्वात सावध रहावे असा माणूस म्हणजे अंतर्गत सजावट करणारा. विनाकारण मटेरियल वाढवून, भपका करण्यात अनेक जण धन्यता मानतात. कारण त्यांचे चार्जेस हे मटेरियल कॉस्टच्या प्रमाणात ठरतात. अत्यंत बारिकसारिक विचार ते करतात आणि आपले डिझाईन सेल करताता. उदा. औषधे कुठे ठेवायची, पांघरूणे कुठे ई. अनेकजण यावर इंप्रेस होतात. आयला, हे पण आपलं आपल्याला ठरवता येत नाही काय? परिणामी घरातली मोकळी जागा कमी होते आणि घराचे रूपांतर शो पीसमध्ये होते.
बाकी महापालिकेत मात्र परवानाधारक आर्किटेक्टच्या सहीशिवाय प्लॅनच पास होऊ शकत नाही, अशी माझी माहिती आहे.

अनन्त्_यात्री's picture

27 Sep 2022 - 3:11 pm | अनन्त्_यात्री

४-५ वर्षांपूर्वी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना घोटी ( जि. नाशिक) जवळच्या निसर्गरम्य भागातल्या एका बंगलो वसाहतीत अडीच गुंठ्याचा जमीनतुकडा घेऊन तिथे घर बांधलं. वास्तुरचना १००% स्वत: केली. बांधकामावरची देखरेख ४०-५०% स्वत: केली. वास्तुरचना कटाक्षाने अगदी साधी ठेवली. इथे पाऊस, धुके चार महिने सतत असते व हवेत बाष्प भरपूर म्हणून फर्निचर बनवताना फक्त माईल्ड स्टील, काच व स्टेनलेस स्टीलचा वापर केला. कोटा दगडाच्या लाद्या वापरल्या. गारव्यासाठी घराभोवती आंबा, चिकू, पपई, केळ, पेरू, सोनचाफा,तुती व रातराणी अशी झाडं लावली.

गच्चीतल्या खोलीतून पाऊस,धुकं, डोंगर (कळसूबाई डोंगर रांग) कायम बघता यावं म्हणून तिथे पारदर्शक सरकत्या काचांच्या मोठ्या खिडक्या बसवल्या. पूर्वी इथे रात्री आठनंतर नीरव शांतता असायची. मात्र करोना ओसरू लागल्यापासून वीकांती टूरीस्टांच्या टोळधाडी जवळपासच्या बंगल्यांत पडू लागल्यायत व त्यांच्या डीजे, ओल्या पार्ट्या वगैरेमुळे शांतता गायब झालीय. त्यामुळे मूळ सिंगल ग्लेझिंगच्या खिडक्यांना आता डबल ग्लेझिंग करावे लागणार आहे.

बाकी मूळ वास्तुरचनेत बदल करायची अजूनतरी गरज वाटलेली नाही. MSEB चा अनियमित होणारा वीजपुरवठा सोडला तर इतर कोणतेही त्रास ( बनेल गावकरी, आडमुठी ग्रामपंचायत इ.) इथे नाहीत.

मुंबईतले घर आणि हे गावातले घर दोन्ही राहती ठेवणे सध्या व भविष्यातही अजिबात अवघड जाईल असे वाटत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

27 Sep 2022 - 6:42 pm | कानडाऊ योगेशु

गर्दे अंकल यांना म्हशीची चित्रं काढायचा छंद होता.

इथे फिस्सकन हसलो..हायला.आता हे कसले ओब्सेशन ?
ह्या वाक्यावरुन लेख विडंबन आहे का असे वाटले म्हणुन पुन्हा वाचला.

मला अनिल अवचटांची आठवण झाली.

सुरिया's picture

28 Sep 2022 - 2:59 pm | सुरिया

हायला.आता हे कसले ओब्सेशन

त्यात काय?
एम एफ हुसेनला घोड्याची चित्रे कढावी वाटत. आर के लक्ष्मण सत कावळ्यांची स्केचेस करत. त्यांना त्यात जाणवत असेल काही चॅलेंजिंग, काही क्रियेटिव्ह.
फिस्सकन हसण्यासारखे काही वाटले नाही.

कानडाऊ योगेशु's picture

29 Sep 2022 - 9:37 am | कानडाऊ योगेशु

लिहिताना हुसेन बॅक ऑफ द माईंड होताच पण खात्री नव्हती कि त्यांना घोड्यची चित्रे काढण्याची हौस होती ह्याची. पण आता आठवले हुसेन च्या चित्राचे विडंबन वेलकम मध्ये मजनु भाई ने केले होते गाढवांचे चित्रे काढुन .म्हणजी अशी एकसारखी एका प्राण्याची चित्रे काढण्याची हौस दखलपात्र होते हे नक्की.
हसण्यासारखे ह्यासाठी कि गाढव म्हैस ह्या सारखे प्राण्यांचे उल्लेख बहुतांश विनोदनिर्मितीसाठी केले जातात. गर्दे काकांना गाईंची चित्रे काढण्याची हौस होती हे वाक्य नजर ओलांडुन गेले असते पण म्हशींचा उल्लेख आला म्हणुन पुन्हा वाचले गेले.

तर्कवादी's picture

27 Sep 2022 - 8:00 pm | तर्कवादी

भारतीय हवामानाचा, किड्या कुड्यांचा फारसा विचार न करता, झुरळांच्या प्रजातीच्या रक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी केलेले किचन कट्ट्याखालील किचन कॅबिनेट

पण कॅबिनेटला काय पर्याय मग ?
जागा निश्चित झाली की तुम्हाला घराचा आराखडा तयार करणे सोपे जाईल कारण मग तुम्हाला घर किती बांधता येईल ते ठरवता येईल. शिवाय जागेसाठी किती पैसा लागतो त्यानुसार बांधकामाचे बजेट कमी जास्त करावे लागेल / करता येईल.
या निमित्ताने या धाग्यावर घराच्या आराखड्याबद्दल काही मौलिक उहापोह (ब्रेन स्टॉर्मिंग ) होवू शकेल..

चित्रगुप्त's picture

27 Sep 2022 - 10:38 pm | चित्रगुप्त

लेख खूपच आवडला. तुमच्या स्वप्नातले घर बांधायला पुण्याजवळ जागा हवी असेल तर मी देऊ शकतो. ५० x ६० फुटांचा प्लॉट आहे, लोणीकंद जवळ.
तुमच्या सारखाच मलाही पूर्वीपासून घरांचे आराखडे बनवण्याचा छंद असल्याने मी स्वतःच्या घराखेरीज अन्य काही लोकांनादेखील बनवून दिले होते, अर्थात आता त्याला फार वर्षे झाली.
वाटल्यास व्यनि करावा.

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2022 - 12:59 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख अण्णा !
💖

कसलाही आव न आणता केलेले सांगितलेके मनोगत मनापासुन आवडले !

सस्नेह's picture

28 Sep 2022 - 1:29 pm | सस्नेह

शब्दाशब्दाशी सहमत!
पीओपी सिलिंगची एकच चूक मी केली, पण बाकी घर हव्वं तसंच बांधलं. विद्युत अभियंता असूनही मला स्थपत्यरचनांची विविधताच जास्त भुरळ घालते. मे बी वडील सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे.
माझे घर बांधताना शो पेक्षा सोय जास्त पाहिली. किचन कॅबिनेट ला पर्याय नाही. आपल्याकडे धूळ अमर्याद असते त्यामुळे. पण चिम्नी प्रकार मी मुळीच लावून घेतला नाही. त्याऐवजी एक ऐसपैस खिडकी ठेवली ओट्यापाशी. कॅबिनेट सहा महिन्यातून एकदा पूर्ण बाहेर काढून साफ करून फरशीवर डांबरगोळ्या टाकून ठेवते त्यामुळे झुरळे होत नाहीत.
अण्णा तुम्ही केरळला एक चक्कर टाका. एकसे एक टुमदार बंगले आहेत. प्रत्येकाचे आर्किटेक्चर वेगळे. आणि सगळी नारळीच्या झाडांनी वेढलेले.
बाकी लेख मस्त आणि तुमचे घर लवकरच होवो ही शुभेच्छा.

वामन देशमुख's picture

28 Sep 2022 - 1:45 pm | वामन देशमुख

स्वतंत्र घर बांधण्याच्या निर्णयाबद्धल हार्दिक अभिनंदन तसेच लवकरात लवकर घर बांधून होऊन गृहप्रवेश व्हावा ही सदिच्छा!

वास्तुशांती करणार असाल तर मिपाकरांना बोलवाल ही अपेक्षा ;)

---

लेखन शैली, बरेच मुद्दे आणि मनमोकळेपणा आवडला. अनेक प्रतिक्रियादेखील आवडल्या. घरबांधणीचे नियोजन करताना त्या विचारात घ्यालच, नाही का?

---

माझे मत मांडतो; पटले तर विचार करावा.

घरात फर्निचर, साधने, शोभेच्या वस्तू वगैरे शक्य तितक्या मर्यादित असाव्यात. मोकळी जागा भरपूर असावी.
किचन शक्य तितके लहान असावे, हॉल शक्य तितका मोठा असावा.
खिडक्या रुंद आणि मोठ्या असाव्यात. त्यांना काचेची सरकती दारे आणि डासांच्या जाळ्या असाव्यात.
किमान एक कार व एक बाईक पार्किंगची सोय असावी.
हिंदू + देवभक्त असाल तर मर्यादित आकाराचे देवघर नक्की असावे.
भारतीय हवामानाला साजेशी, उजळ रंगसंगती असावी.
सज्जे (lofts), कपाटे, कोनाडे इ द्वारे पुरेशी साठवणुकीची सोय (storage) असावी.
जमिनीखाली किमान दहा हजार लिटरची पाण्याची टाकी (sump) असावी.
छतावर किमान एक हजार लिटरची पाण्याची टाकी (OHT) असावी.

कपड्यांप्रमाणे आजकाल घरांच्या सजावटीच्या फॅशन्स वारंवार बदलत आहेत. आवड असल्यास + शक्य असल्यास, घराच्या settings सुलभतेने बदलता येतील अश्या प्रकारे बांधकाम करावे.

---

मतभिन्नतेच्या आदरासहित अवांतर: शहरातील सोसायट्यांमधील फ्लॅटमध्ये राहणे हे लहान गावांत स्वतंत्र घरात राहण्याच्या तुलनेत सध्यातरी खूप अधिक सोयीस्कर आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

29 Sep 2022 - 1:29 am | हणमंतअण्णा शंकर...

मोठ्या प्रवासात असल्याने प्रतिसाद देणं जमत नाहीये. दोन दिवसांत गंतव्य स्थानी पोचल्यावर यथेच्छ प्रतिसाद देईन.

आवर्जून अभिनंदन करणार्‍यांचे, महत्त्वाचे सल्ले आणि मदतीचा हात देणार्‍यांचे तोवर टेंपररी आभार मानतो.

अगदीच दुर्लक्ष वाटू नये म्हणून केवळ हा प्रतिसाद.

सुबोध खरे's picture

29 Sep 2022 - 11:11 am | सुबोध खरे

आमच्या वडिलांचे मुंबईतील घर पुनर्विकसित झाले आणि ४२ च्या जागी ५८ सदनिका झाल्या.

यातील मूळ ४२ लोक तर माझ्या जन्मापासून तेथेच राहत असल्यामुळे सख्खे शेजारी होते.

यामुळे प्रत्येकाच्या नव्या घरात जाऊन घर पाहणे झाले.

त्यात निम्मयापॆक्षा जास्त लोकांनी माझ्या घरात मी कशा सुखसोयी केल्या आहेत त्या इतर कुणीच केलेल्या नाहीत असे सांगितले.

यातील काही सुखसोयी मला पटल्या / आवडल्या तर काही अगदीच भंपक वाटल्या.

या लेखातील तुमच्या काही कल्पना मला पटल्या नाहीत आणि त्या मी सहज शास्त्रीय कारणे देऊन खोडून काढू शकतो.

पण त्या तुमच्या स्वतःच्या सुखाच्या कल्पना आहेत तेंव्हा त्यांना चूक ठरवण्याचा मला काय अधिकार आहे?

यातून एक गोष्ट मी शिकलो. तुमचे घर तुमच्या दृष्टीने आदर्श असले तरी काही जणांना ते आवडणार नाही. काही जणांना ते भंपक वाटेल तर काही लोकाना ते खूप आवडेल.

त्यांची मते जरूर घ्या पण शेवटी घरात तुम्हाला काय हवं आहे आणि आवडतं ते स्वतःलाच ठरवावे लागते

तात्पर्य -- लोकांना फाटा मारा

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2022 - 10:00 pm | चौथा कोनाडा

तूमचे घर तुमच्या दृष्टीने आदर्श असले तरी काही जणांना ते आवडणार नाही. काही जणांना ते भंपक वाटेल तर काही लोकाना ते खूप आवडेल.
त्यांची मते जरूर घ्या पण शेवटी घरात तुम्हाला काय हवं आहे आणि आवडतं ते स्वतःलाच ठरवावे लागते

+
अगदी !