Skip to main content

असे देश, अशी नावे !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 06/06/2022 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत १९५ ते २४९ असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख. ok देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते : 1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे 2. भूभागाचा भौगोलिक प्रकार 3. भूगोलातील दिशा 4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून 5. अनिश्चित/ विवादास्पद व्युत्पत्ती वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांत विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत. १. प्राचीन जमाती / वंशाची नावे जवळपास एक तृतीयांश देशांची नावे या प्रकारे दिली गेलीत. क्रोएशिया हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे. मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत. या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत. Burkina Faso असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते. १९८४मध्ये त्याचे नामांतर होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत : Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर. थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल. Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे ८५१ भाषा प्रचलित आहेत. ok २. भौगोलिक प्रकार जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत. ok Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालिय पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली ! 😀 Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica) स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसले. या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. 3. भूगोलातील दिशा सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश. त्यांची व्युत्पत्ती अशी : • नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी • जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व) • ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू. हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा : Timor(मलय भाषेत) = पूर्व Leste(पोर्तुगीज) = पूर्व हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले. येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला आहे. ४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत. बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे. मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी त्याला Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले. ओमानमध्ये खूप तांब्याच्या खाणी असल्यामुळे त्याचे जुने नाव मजान असे होते. पुढे ते संस्थापक पुरुषाच्या नावावरून ओमान करण्यात आले. परंतु या संस्थापक नावासाठी खलील, सीबा आणि इब्राहिम असे तीन ‘ओमान’ दावेदार आहेत ! या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत. त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia. ok हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे. ५. अनिश्चित/ विवादास्पद व्युत्पत्ती सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू. माल्टा हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन व्युत्पती प्रचलित आहेत: a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो. b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे. सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत : a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे. b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले. c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश. d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार: ने= गाई-गुरे आणि पा = राखणदार असे हे व्युत्पत्ती प्रकरण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात. “नावात काय आहे?” हा शेक्सपिअर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न. त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे ! प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही देशनावे या लेखात सादर केली. ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे. ……………………………………………………………………………………………………………………………………………. चित्रे जालावरून साभार !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23991
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

स्वतंत्र हिंदू देश तयार व्हायला तर हवा आहे. एखादा देश निर्माण कसा होतो हे मात्र रोचक आहे. सामान्य आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर कोणतेही लागू प्रतिबंध नाहीत. म्हणजे कोणताही प्रदेश स्वतंत्र व्हायला आंतरराष्ट्रीय कायद्याने आडकाठी नाही. मात्र ज्या राष्ट्रापासून हा भूभाग स्वतंत्र होऊ इच्चितो त्याने ते मान्य करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे एक तर भूभाग विकत घेतला पाहिजे. किंवा जगातल्या कोणत्या तरी एका राष्ट्राने तरी राजनैतिक संबंध असण्याला मान्यता दिली पाहिजे. पण देशांनी द्विपक्षीय राजनैतिक संबंध राखले नाहीत म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य अस्तित्त्वात नाही असा अर्थ होत नाही. जसे १९४८ मध्ये इस्रायल सरकारला युनायटेड स्टेट्सने ताबडतोब मान्यता दिली! पण हे प्रदेश मोठे आहेत. अगदी लहान देश स्वातंत्र्य घोषीत करत असतील बहुदा दुर्लक्ष्य केले जाते - कारण बहुदा आर्थिक आणि लष्करी बळ नसतेच! या आधीही असे भारताबाहेर हिंदू देश स्थापनेचे प्रयत्न झाले आहेत का? तर हो! महर्षी महेश योगी यांनी असे अनेक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या देशाचे चलन राम आहे. काही युरोपियन आणि यूएस शहरांमध्ये या राम चलनाला मर्यादित मान्यता होती. हे चलन आयोवामध्यहेही वापरले गेले आहे आणि नेदरलँडमध्ये देखील मान्यता दिली गेली आहे. आणि त्याच्या राजधान्यांमध्ये अमेरिकेतील महर्षी वैदिक शहर, आयोवा आणि व्लोड्रॉप यांचा समावेश आहे. येथे पहा आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांशी संपर्क साधून या देशाला मान्यता मिळवण्याचे प्रयत्न झाले आहेत. तुवालु येथील काही बेटे ताब्यात घेऊन त्यावर स्वतंत्र हिंदू देश तयार करण्याचा ही प्रयत्न झाला आहे. कोस्टा रिकामध्ये असा प्रयत्न झाला. येथे तर स्थानिक भारतीयाला येथील समाजाचा राजा म्हणून नियुक्त करण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला होता. पण स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला म्हणून यांना देश सोडण्याचे आदेश दिले गेले हे फार वाईट झाले. अजूनही आशा मावळलेली नाही. भारताबाहेर एक तरी स्वतंत्र हिंदू देश स्थापनेचे प्रयत्न होतील अशी खात्री आहे.

आज 21 जून. वर्षातील सर्वात मोठा दिवस.! पृथ्वीवरील खालील देशांत काही ठिकाणी तो तब्बल 21 तासांहून अधिक काळ असणार आहे: Iceland, Greenland, Alaska, Canada, Norway, Sweden, Finland, Northern Russia, and the North and South Poles

In reply to by हेमंतकुमार

वरील यादीत शेवटी फक्त उत्तर ध्रुव असे हवे आहे South pole चुकीने लिहिले गेले.

इंग्लंडमध्ये Stonehenge हे एक जागतिक वारशाचे ठिकाण आहे. इथे दरवर्षी लोक 21 जून ला सूर्योदय पाहण्यासाठी जमतात आणि मोठा उत्सव असतो कोविड काळात तो होऊ न शकल्याने यंदाचा उत्साह जोरदार होता

In reply to by मदनबाण

*युगांडा हा देश >>> हे नाव शालेय जीवनात विद्यार्थ्यांमधील चिडवाचिडवी आणि गमतीजमतीमध्ये चांगलेच वापरात असते ! ... यावरून आचार्य अत्रे यांचा, " या न्यायाने लंडन तर महाराष्ट्रात हवं होतं." हा गाजलेला विनोद आठवला तो कितीही वेळा सांगितला गेला तरी हास्याचे धबधबे उसळत असत. :)))

दोन मोठ्या देशांच्या सीमेवर जर एखादा भूभाग असेल तर दोन्ही देश तो बळकावण्यासाठी उत्सुक असतात. पण या वृत्तीला अपवाद म्हणून Bir Tawil (= उंच विहीर) चे उदाहरण पाहता येईल. इजिप्त व सुदान यांच्या सीमेवरील हा छोटासा भूभाग. परंतु या दोन्ही देशांपैकी कोणीही त्याच्यावर हक्क सांगायला तयार नाही ! (अर्थात यामागे काही अन्य कारणे आहेत). Alastair Bonnett यांच्या मते पृथ्वीवरील राहण्यायोग्य पण अद्याप बिलकूल वस्तीविरहित राहिलेला असा हा एकच भाग असून कुठल्याच देशाने त्यावर हक्क सांगितलेला नाही. त्याला एक सूक्ष्मदेश म्हटले जावे असे काहींनी सुचवले आहे.

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, बीर तवील हे नाव जाम रोचक आहे. बीर म्हणजे विहीर दिसतंय. तवील म्हणजे उंच असावं बहुतेक. मुंबईच्या जवळ बदलापूर येथे तवली ( की टवळी ) नामे डोंगराचं शिखर आहे. या नावांतलं साधर्म्य शोधायचा प्रयत्न करायला आव. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्या दोन शब्दांचे बृहदकोश असे अर्थ देतो आहे: तवली स्त्री. १ (खा. व. बे.) धातूचें, मातीचें पसरट आकाराचें थाळीसारखें भांडें. ….. टवळी 3. The fore part of the skull, sinciput. याचा त्या आकाराची काही संबंध असावा काय?

राष्ट्रकुल एक मोठा देशसमूह आहे. 1952 मध्ये जेव्हा एलिझाबेथ राणी त्याची प्रतिकात्मक प्रमुख झाली तेव्हा त्यात फक्त ८ देश होते. आज ही संख्या ५६ झाली आहे. त्यापैकी TogoGabon हे दोन देश नुकतेच सभासद झालेले आहेत. अन्य काही देश या समूहातून पूर्वी बाहेर पडले आहेत.

जगातील तीन देशांचे (San Marino, Vatican City व Lesotho ) एक समान भौगोलिक वैशिष्ट्य आहे. या प्रत्येक देशाभोवती संपूर्णपणे दुसऱ्या देशाने वेढा घातलेला आहे. या तिघांना enclave असे म्हणतात. Enclave व वेढणारे देश कंसात असे : San Marino (इटली) Vatican City (रोम, इटली ) Lesotho (द. आफ्रिका) ok चित्रसौजन्य : विकी.

ज्या देशनावाचे इंग्लीश स्पेलिंग काहीसे मजेदार आहे तो म्हणजे रवांडा ( Rwanada). या देशाची तीन ठळक वैशिष्ट्ये आहेत : १. एका बाबतीत त्यांनी जगात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांच्या संसदेत महिला खासदार बहुसंख्येने आहेत. सध्या एकूण खासदारांपैकी ६१ % खासदार स्त्रिया आहेत. असे होण्यामागे अंशतः एक भीषण घटना कारणीभूत आहे. 1994 मध्ये तिथे एका वंशाच्या दहा लाख लोकांच्या अवघ्या तीन महिन्यात ठरवून हत्या करण्यात आल्या. त्यानंतर राहिलेल्या लोकसंख्येमध्ये स्त्रियांचे प्रमाण 60 ते 70 टक्के असे राहिले. २. प्लास्टिक-बंदीची कठोर अंमलबजावणी ३. गोरिला माकडांच्या १० प्रजाती उद्यानात ठेवल्या आहेत. त्या जगातील सर्वाधिक आहेत.

सध्या अंटार्टिकावर सलग संपूर्ण रात्र चालू आहे. परंतु तेथून ७००० किमी दूर असलेल्या टोंगामधील ज्वालामुखीच्या प्रकाशामुळे तिथे आसमंत उजळून निघत आहे. त्याचे काही सुंदर फोटो इथे पाहता येतील.:

बऱ्याच देशनावांचा उगम खालील क्रमाने विकसित होत गेलेला आहे : १. संबंधित ठिकाणी असलेली नदी/ झरा/ तलाव यांचे नाव (hydronym) २. त्यावरून ठिकाणाचे नाव पडणे (toponym) ३. त्यावरून वंशाचे किंवा देशाचे नाव (ethnonym) देशाच्या दिलेल्या नावांमध्ये दोन प्रकार पडतात: a. देशाबाहेरील लोकांनी ठेवलेले नाव (exo..) b. अंतर्गत नाव (endo..)

4 एप्रिल 2023 रोजी फिनलंड हा नाटोचा 31वा सदस्य देश बनला आहे. *** फिनलंड म्हटले की नोकियाची आठवण येणे अपरिहार्य आहे. नोकिया तर आपल्या हातातून केव्हाच गेला पण.. 'एखाद्याचा नोकिया होणे' हा वाक्प्रचार मात्र रूढ झाला !