Skip to main content

आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञ

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 11/08/2017 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांत मला अनेक ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांनी शहरांत उपलब्ध असणार्‍या वैद्यकीय तज्ञांबद्दल शंका विचारल्या. तेव्हा असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे: १. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात. २. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS ३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे डॉ.( Consultant / Specialist) खालील शाखांचे असतात: • मेडिसिन : हे डॉ. हृदय, फुफ्फुस, पोटातील अवयव, मेंदू , मधुमेह, रक्तदाब इ. चा एकत्रित अभ्यास केलेले असतात. • फुफ्फुसरोग तज्ञ • बालरोगतज्ञ • स्त्री रोग व प्रसूती तज्ञ • त्वचा व गुप्तरोग तज्ञ • मनोविकार तज्ञ . Pathology ( laboratory medicine) • Radiology ( X ray, sonography, CT scan, MRI इ.) तज्ञ • भूलतज्ञ ४. MS मध्येही खूप उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे तज्ञ असे : • जनरल सर्जन • हाड व सांधे विकारतज्ञ ( Orthopedics) • डोळ्यांचे विकार तज्ञ • कान, नाक व घसा तज्ञ • Plastic surgeon ५. DM ही MD च्या पुढील Superspeciality आहे. यात सुमारे ३० उपशाखा आहेत. त्यातील नेहमीच्या अश्या : • हृदयविकार तज्ञ • मेंदूविकार तज्ञ • कर्करोग तज्ञ • पोट व यकृत विकार तज्ञ • रक्तविकार तज्ञ • हॉरमोन विकार तज्ञ • मूत्रपिंड विकार तज्ञ • सांधे विकार तज्ञ (Rheumatologist) • संसर्गजन्य विकार तज्ञ • अतिदक्षताविभाग तज्ञ ( Critical Care Medicine) • Immunologist ६. MCh ही MS च्या पुढील Superspeciality आहे. त्यातील प्रमुख उपशाखा : • हृदय शस्रक्रिया तज्ञ • मेंदू शस्रक्रिया तज्ञ • पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञ • बालक शस्रक्रिया तज्ञ • कर्करोग शस्रक्रिया तज्ञ • मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ • हात शस्रक्रिया तज्ञ MD & MS ना समकक्ष असणारा अजून एक अभ्यासक्रम म्हणजे Diplomate of National Board (DNB). ही पदवी राष्ट्रीय पातळीवर परिक्षा घेऊन दिली जाते. या अंतर्गतही वर उल्लेखिलेल्या अनेक उपशाखा असतात. सर्वसामान्य लोकांना DNB हे नेमके काय हे फारसे माहित नसते. तेव्हा अशी पदवी असणारा डॉ. हा स्पेशालिस्टच असतो हे ध्यानात घ्यावे. तर, थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. अतिविशिष्ट तज्ञांची माहिती दिलेली नाही. लेख उपयोगी पडावा ही अपेक्षा. काही शंका असल्यास त्यांचे स्वागत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 47298
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

@ Rajesh188 प्रतेक अवयव चे तज्ञ डॉक्टर कधी पासून तयार होवू लागले. तुमचा मोबाईल बिघडला कि शेजारच्या इलेक्ट्रिशियन कडून दुरुस्त करून घेता का?

भारतात सुमारे साठ वर्षांपूर्वी असे अभ्यासक्रम सुरू झाले. जसा मानवी शरीराचा अभ्यास वाढत गेला तसे विविध आजारांचा अभ्यास खोलात जाऊन करण्याची गरज निर्माण झाली. पारंपरिक फिजिशियनला असा सर्व अवयवांचा खोलात जाऊन अभ्यास करणे शक्य झाले नसते.

असा अलिखित नियम आहे. आपल्या नेहमीच्या डॉक्टरनाही चांगली परीक्षा असते. ते प्रथम चार दिवस औषध देऊन खात्री झाल्यावर योग्य स्पेशालिस्टकडे पाठवतात. उदाहरणार्थ डोकूदुखी. त्याची बरीच कारणे असतात. अगदी सामान्य ते गंभीर.

एमबीबीएस च्या प्रवेशासाठी एक मूलभूत अर्हता म्हणजे बारावीच्या परीक्षेत पीसीबी मिळून किमान 50 टक्के गुण मिळालेले असणे. हा नियम गेल्या कित्येक वर्षांपासून संपूर्ण भारतात लागू आहे. नुकतेच आसाम सरकारने यामध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. १. पीसीबी मध्ये किमान 60 टक्के गुण हवेत आणि २. बारावीची परीक्षा प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण हवी . याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे. तिथल्या न्यायमूर्तींनी केंद्र सरकार व एन एम सी यांना स्पष्टीकरण देण्याची सूचना केलेली आहे. यानिमित्ताने, एखादे राज्य सरकार स्वतःच्या अखत्यारीत असा मूलभूत नियम बदलू शकते का, याचा आता उहापोह होईल. https://medicaldialogues-in.cdn.ampproject.org/v/s/medicaldialogues.in/…

एम बी बी एस चा अभ्यासक्रम हिंदी भाषेतून शिकवण्यासाठी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश मध्ये तयारी सुरू. काही विद्यापीठांनी त्यासंदर्भात पाऊल उचलले आहे https://medicaldialogues.in/news/education/soon-mbbs-in-hindi-in-indian…

एका पूर्ण अंध डॉक्टरने पदव्युत्तर नीट ही परीक्षा पार केली असून त्याने एमडी मानसोपचार या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मागितला होता परंतु तज्ञ समितीने त्याचा अर्ज फेटाळला आहे. त्याविरुद्ध संबंधित डॉक्टर सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. जगभरात या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला गेल्याची उदाहरणे आहेत. आता आपले न्यायालय काय निर्णय देते हा उत्सुकतेचा विषय राहील.

मूत्रपिंड रोगतज्ञ - युरोलीजिस्ट का नेफ्रॉलॉजिस्ट ? जर युरो तर नेफ्रो काय करतो अँड व्हाईस व्हर्सा ? अंडाशय तज्ञ असतो का ? अँड्रॉलॉजिस्ट असे काहीसे वाचलेले स्मरते त्याचे काम काय असते ? म्हणजे पुरुष अंडकोष आणि प्रजनन स्वास्थ्य संबंधी का मूत्रमार्ग विशेष मधलीच ही एक उपशाखा होय ?

In reply to by जेम्स वांड

मूत्रपिंड रोगतज्ञ - युरोलीजिस्ट का नेफ्रॉलॉजिस्ट ? >>> झोप फिजिशियन मुत्रपिंड समस्यांचा अभ्यास करतो तो नेफरोलॉजिस्ट. जो सर्जन मूत्रमार्ग, मूत्राशय, प्रोस्टेट इत्यादींचा अभ्यास आणि शस्त्रक्रिया करतो तो यूरोलॉजिस्ट. ... अँड्रॉलॉजिस्ट हा शब्द भारतात इतका वापरात नाही. परंतु जशी बायकांची गायनॅकॉलॉजिस्ट तसा पुरुषांचा अँड्रॉलॉजिस्ट म्हणता येईल

In reply to by हेमंतकुमार

असा का हो पुरुषांचा अनुशेष, गल्लोगल्ली गायनेकॉलॉजिस्ट मिळतात पण पुरुषमंडळी अँड्रॉलॉजिस्टला मोताद, पुरुष स्वास्थ्य हा तितकासा महत्वाचा विषय वाटत नाही वाटतं एकंदरीत लोकांना

In reply to by जेम्स वांड

सध्या आपण बरेच अन्याय सहन करण्याचे युग आहे खरे ! :))))

महाराष्ट्र सरकारने 'सरकारी-खाजगी भागीदारी' या तत्त्वावर शासकीय जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या अभ्यास शाखा: १.MD (aerospace medicine) आकाश व अवकाश वैद्यकविज्ञान २.M.D.(marine-medicine) सागरी वैद्यकविज्ञान

In reply to by हेमंतकुमार

या विज्ञान शाखा नवीन नसून गेली ३५ वर्षे तरी त्यात MD हि पदवी उपलब्ध आहे आणि त्यापूर्वी त्यात पदविका अभ्यासक्रम उपलब्ध होता. मरीन मेडिसिन हा अभ्यासक्रम नौदलाच्या अश्विनी या रुग्णालयाशी संलग्न INM (Institute of Naval Medicine) Mumbai, Maharashtra आणि एरोस्पेस मेडिसिन हा बंगळुरूच्या एरोस्पेस मेडिसिन संस्थेत Institute Of Aerospace Medicine या पदव्याचे शिक्षण दिले जाते. येथे प्रामुख्याने लष्करातील डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी येत असल्याने सामान्य माणसांना या अभ्यासक्रम बद्दल फारसे माहिती नाही.

In reply to by हेमंतकुमार

या विज्ञान शाखा नवीन नसून गेली ३५ वर्षे तरी त्यात MD हि पदवी उपलब्ध आहे आणि त्यापूर्वी त्यात पदविका अभ्यासक्रम उपलब्ध होता. मरीन मेडिसिन हा अभ्यासक्रम नौदलाच्या अश्विनी या रुग्णालयाशी संलग्न INM (Institute of Naval Medicine) Mumbai, Maharashtra आणि एरोस्पेस मेडिसिन हा बंगळुरूच्या एरोस्पेस मेडिसिन संस्थेत Institute Of Aerospace Medicine या पदव्याचे शिक्षण दिले जाते. येथे प्रामुख्याने लष्करातील डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी येत असल्याने सामान्य माणसांना या अभ्यासक्रम बद्दल फारसे माहिती नाही.

नुकतीच माध्यमात वैद्यकिय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदी भाषेतून चालू केल्याच्या बातम्या ऐकल्या. या संकेत स्थळावरील डॉक्टर मंडळींना याबाबत काय वाटते ? यामुळे या क्षेत्राची प्रगती होईल काय ? अधोगती होईल काय ? जास्त प्रमाणात डॉक्टर निर्माण झालयास डॉक्टरांचे उत्पन्न घसरेल काय ? हिंदी डॉक्टर वि. इंग्रजी डॉक्टर यांत उच्च नीच भेदभाव होऊन नवीन जमात उदयास येईल काय ? मते ऐकायला किंवा स्वतंत्र धाग्यावर चर्चा वाचायला आवडतील.

In reply to by धर्मराजमुटके

हा विषय महत्त्वाचा असून एका प्रतिसादात उरकण्यासारखा नक्कीच नाही. इच्छुकांनी यावर स्वतंत्र धागा काढावा. तूर्त मी काही मूलभूत माहिती देतो. १. गेल्या चार वर्षांपासून एमबीबीएसचा नवीन अभ्यासक्रम लागू झाला. त्याच्या पहिल्या वर्षी प्रत्यक्ष वैद्यकीय विषय शिकवण्यापूर्वी दोन महिने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे विषय शिकवले जातात. ज्यामध्ये, संबंधित राज्याच्या (मातृ)भाषेचाही समावेश असतो. मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना चांगली व महत्त्वाची आहेच. २. अजून एक मुद्दा. सध्या वैद्यकीय प्रवेश हे बऱ्यापैकी अखिल भारतीय पातळीवर होतात. त्यामुळे एखाद्या उत्तर टोकाकडच्या राज्यातील विद्यार्थ्याला जर दक्षिण भारतात प्रवेश मिळाला असेल तर त्याने रुग्णांशी बोलायला म्हणून संबंधित राज्यभाषा शिकणे आवश्यक आहे. ….. समजा, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे हिंदीतून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे, त्यांची जर आयुष्यभर फक्त त्या राज्यापुरताच व्यवसाय/ नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्यांचे काही अडणार नाही. तरीही शिक्षणादरम्यान संघर्ष करावा लागेल. तसेच अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी एक आडकाठी निर्माण होईल.

आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून, राज्य सरकारचा मोठा निर्णय हा पर्याय ऐच्छिक असेल.