१५.२५ करोड, पांढरे कपडे आणि लाल चेंडू !
बोला पाच करोड... पाच करोड... जनाब फक्त पाच करोड..... फिनिशिंग बॅट्समन आणि शिवाय विकेटकीपर.... प्रत्येक स्पर्धेचा अनुभव... बोला पाच करोड... गरज लागली तर कॅप्टनशिप पण करणार... नवीन लप्पेवाला शॉट तयार केलेला....बोला पाच करोड... पाच करोड एक.... पाच करोड दोन....
"सव्वापाच करोड"!!!
क्या बात है! इसे कहते हैं कद्रदान... है कोई जोहरी जो इस हीरेको उसका मोल देगा???? सवापाच करोड एक.....सवापाच करोड दो.....
आज अग्रेशन ला डिमांड आहे साहेब .... २० ओव्हरमध्ये सेटल व्ह्यायला वेळ कोणाला आहे? यू शुड मेक एव्हरी बॉल काउंट.
मल्टीटास्किंग हवंच ना. मी बॅटिंगच करणार... मी पॉइंटला फील्डिंग करणार नाही असं म्हणून कसं चालेल?
नुसतं टॅलेंट काय कामाचं? रिझल्ट दिलेला असायला पाहिजे.
आधीच्या सीझन्समध्ये केलेल्या साडेपाच हजार रन्सचं काय लोणचं घालायचंय? गेम कसा बदलतोय बघताय ना?
भाई मास अपील म्हणून काही असतं की नाही? त्याला घेतला की त्याच्या देशाची लोकं आपल्या मॅचेस बघणार ना - साधा हिशेब आहे.
गेल्या तीन दिवसांत भरपूर टॅलेंट विकलं गेलं आणि त्यापेक्षा कितीतरी जास्तं राहून गेलं. न विकला गेलेला माल पुढच्या वेळी बघू. तोपर्यंत नवीन टॅलेंट येईलच की बाजारात!
विषय कोणाला किती बोली लागली आणि आणि कोणाला किती पैसे मिळाले हा नाहीये. १५.२५ कोटी ईशान किशनला नाही तर आत्ताच्या घडीला सर्वोत्कृष्ट फॉर्मात असणार्या स्फोटक ओपनर + विकेटकीपरसाठी लावले गेले. श्रेयस अय्यर कोलकता नाइट रायडर्ससाठी मधल्या फळीत फलंदाजी करेल आणि शिवाय कर्णधार होऊ शकतो म्हणून ते १२.२५ कोटी.
हा बाजार आहे. ह्यात चूक - बरोबर काहीच नाही आणि शाश्वतही काही नाही. हा विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम आहे ज्याचा आपला प्रेक्षकवर्ग आहे, आपले फायदे आहेत, आणि आपला यथार्थ उच्च दर्जा आहे. आयपीएल आणि इतर फ्रॅन्चायजी लीग्सनी गेल्या १२-१५ वर्षांत क्रिकेट इतकं बदललं आहे की ज्याचं नाव ते. आता बॅट्समनची किंमत त्याच्या सरासरीवरून नाही - तर पहिली बाउंड्री मारायला तो किती कमी बॉल घेतो ह्यावरून ठरते. १६-२० ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल टाकणार्या बोलरला सोन्याच्या भावात तोललं जातं. आणि कधी नव्हे ते सर्वोत्तम फील्डर पॉइंट - कव्हर्सला नाही तर लाँगऑन - डीप मिडविकेटला असतो. आकडेवारी आणि विश्लेषण जितकं गुंतागुंतीचं तितकंच अद्ययावत झालं आहे. कुठला बॅट्समन ३ डॉट बॉल नंतर चौथा बॉल कुठे मारायचा प्रयत्न करणार हे त्याच्या प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाच्या विश्लेषकाला माहित असतं. खेळात बदल करणं आणि प्रतिस्पर्धी संघाचे बदल हेरणं ही नुसती गरज नाही तर अनिवार्य झालं आहे. क्रिकेट बदललंय - क्रिकेट बदलतंय.
पण अशी कोणती गोष्ट आहे जी बदलली नाही? १९५७ मध्ये "नौ दो ग्यारह" चित्रपटात देव आनंद आणि कल्पना कार्तिक वेगवेगळ्या खोल्यांमध्ये "आजा पंछी अकेला है" गात "प्रणय" करत होते. आणि आताच्या प्रणयातली "गहराइयाँ" ....काय वर्णावी महाराजा ! आमच्या लहानपणी वाढदिवसाला वर्गात "किस मी" ची दहा पैशाची टॉफी वाटायचो पण आता पोरं मॅक-डी मधल्या पार्टीशिवाय ऐकत नाहीत. मग क्रिकेटनी काय घोडं मारलंय? बदललंय ते चांगलंच आहे... पण.....
हा.... ह्या "पण" मध्येच मेख आहे. आणि ही मेख कळते ती अनुभवातूनच. तरुण वयात फेसाळती बियरच आवडणार. सिंगल मॉल्टची चव कळायला एक परिपक्वता लागते. अॅक्सलरेटरला पीळ मारत ट्रॅफिकला कट मारत गाडी बुंगवायचं एक वय असतं. मग कळते ती जोडीदाराबरोबर ताम्हीणीच्या घाटातून चाळीसच्या स्पीडने धो-धो पावसात निवांत गाणी ऐकत ड्राइव्ह करण्यातली मजा. आत्ता ऐका टोनी कक्कड किंवा BTS, पण लताबाईंचं "अल्ला तेरो नाम" ऐकून काळजाला पीळ पडणारा एक दिवस येतोच. हे कोणाला चुकलं नाही गड्या. "स्वदेस" मध्ये ती म्हातारी म्हणते ना- अपनेही पानीमें पिघलना बरफका मुकद्दर होता है! बिलकुल सही बोलेली है वो!
पण इथे धोका आहे तो वेगळाच. रिअॅलिटी शोजमध्ये १२० सेकंदांचे परफॉर्मन्सेस देत मोठी झालेल्या ह्या पिढीतून अर्धा - पाऊण तास "सहेला रे" रंगवणारी गानसरस्वती किशोरी आमोणकर निपजेल का हा खरा प्रश्न आहे. ४ डॉट बॉल गेले तर अस्वस्थ होऊन हवेत बॉल मारणार्या ह्या पिढीत ओव्हलवर शटर डाउन करून १४० मिनिटांत ९६ चेंडूंत १२ धावा करणार्या द्रविडचा पेशन्स असेल? फक्त रन जाऊ नये म्हणून ऑफस्टंपच्या २ फूट बाहेर यॉर्कर टाकणार्या पिढीत सलग नऊ ओव्हर्स निराश न होता अथक बोलिंग करून WACA वर पॉंटिंगसारख्या वाघाची शिकार करणार्या इशांत शर्माची चिकाटी असेल? एकीकडे धडाधड विकेट्स पडत असताना साक्षात ऑस्ट्रेलियाच्या घश्यातून ब्रिजटाउन टेस्ट एकहाती काढणारा ब्रायन लारा ह्या पिढीत तयार होईल?
व्हायला हवा! खरोखरंच व्हायला हवा! परीक्षेच्या टेन्शननी किंवा परीक्षा पास न झाल्याने आत्महत्येला उद्युक्त होणार्या ह्या पिढीला आयपीलच्या निमित्ताने क्रिकेटची ओळख झाली तरी कसोटी क्रिकेट आवडायला हवं. कारण इतर कुठलाच खेळ टेस्ट क्रिकेट इतका आयुष्याचा आरसा दाखवत नाही. टेस्ट क्रिकेट टॉस हरला तरी तक्रार न करता हिरव्या पिचवर दटून रहायला शिकवतं. अंगावर तोफगोळे डागणार्या फास्ट बोलरची रग जिरून जायची वाट बघायचा संयम शिकवतं. एकही गोष्ट मनासारखी घडत नसताना प्रत्येक नव्या ओव्हरसाठी नव्याने रनअप घ्यायला शिकवतं टेस्ट क्रिकेट. आपल्या बोलरसाठी फॉर्वर्ड शॉर्टलेगला छातीचा कोट करून उभं राहायला शिकवतं ते टेस्ट क्रिकेट. वैयक्तिक गौरवासाठी न खेळता संघाच्या विजयासाठी आपल्या इच्छांना मुरड घालायला शिकवतं टेस्ट क्रिकेट. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाच दिवस काबाड-कष्ट करून सुद्धा पदरात काहीच नाही पडलं तरी निराश न होता पुढच्या सामन्यासाठी सज्ज व्हायला शिकवतं ते ही टेस्ट क्रिकेटच!
मी खूप आशावादी आहे. माझा विश्वास आहे की आत्ता चौकार-षटकारांच्या आतषबाजीला चटावलेल्या ह्या पिढीला एक दिवस कळेल की १५.२५ कोटी ही क्रिकेटच्या हिशोबात किती चिल्लर रक्कम आहे. सुरुवातीला अगदी के-पॉप का ऐकेनात... एकदा का गाणं कळायला लागलं की हीच पोरं कधी लता - भीमसेनचे भक्त बनतील त्यांचं त्यांनाही कळणार नाही. आत्ता भले त्यांना बॅटीची कड घेऊन गेलेले षटकार आवडत असतील, पण एक दिवस हीच तरुण पिढी केन विल्यमसन, पुजारा किंवा लाबुशेननी हिरव्यागार पिचवर आग ओकणार्या फास्ट बोलर्सच्या आक्रमणासमोर उभारलेली भक्कम तटबंदी बघून हरखून जातील. एका बाजूनी आठ-आठ, दहा-दहा ओव्हर्स टिच्चून गोलंदाजी करणार्या पॅट कमिन्स, रबाडा किंवा जिमी अॅन्डरसनच्या प्रेमात पडतील. एक दिवस त्यांना अश्विन, हसरंगा किंवा रशीद खान फलंदाजाला कसे सापळा लावून जाळ्यात ओढतात ते कळेल. एक दिवस यांच्या लक्षात येईल की सिली-पॉइंट / फॉर्वर्ड शॉर्टलेगला उभं राहायला काय जिगर लागते. एक दिवस जेव्हा ज्यो रूट एखाद्या बोलरला एंड बदलून आणेल तेव्हा त्यामागची खेळी त्यांच्या लक्षात येईल.... एक दिवस ह्या पोरांना त्या २२ यार्डाच्या पट्टीवर बॅट-बॉलनी खेळला जाणारा बुद्धीबळाचा डाव कळेल. शेवटी ज्याला क्रिकेट-क्रिकेट म्हणतात ना ते अजूनही पांढर्या कपड्यांत आणि लाल चेंडूनी खेळलं जातं.
म्हणतात ना - अपनेही पानीमें पिघलना बरफ का मुकद्दर होता है!
© - जे.पी.मॉर्गन
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
जबरदस्त लेख
हे क्रिकेट नाही
क्या बात है....
यात फ़क्त बाजार आहे.
मॅच फ़िक्सींग
अप्रतिम
व्वा !!!
तळमळ पोचली
आय पी एल यात मूलभूत गोची हीच
खूपच जबरदस्त लिहीलंय!!
...
खरंय!
कसोटी क्रिकेट हे शास्त्रीय
आत्मीयता निर्माण होऊ शकली नाही
नेहमीप्रमाणेच धडाकेबाज लेख
पब्लिक अजूनही क्रिकेट बघतं ?
क्रिकेट विषयीची तळमळ उतरली
खास प्रतिसाद लिहिण्यासाठी लॉग
क्रिकेटपलिकडे बघताना
अपयश पचवायची ताकद असेल तर...
सगळी सोंगं आणता येतात पैशाचं
छान लेख.
मस्त लिहीले आहे!