फोन

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
8 Feb 2022 - 9:35 pm

"आरे पत्त्या कुठाय तुजा‌.! किती फोन केलं मी.! सगळं बंदच असतंय गा कायम?"

हॅलोs ? कोण ?

"बास का आता? आता आवाज पन इसरला का आमचा?"

नाय रे.. आवाज नाय ओळखला मी.

"आरे पवन बोलतोय पवन.!"

पवन ?.. पवन ताटे का? मला आवाजाची काय ओळख लागली नाय रे आजून.

"पवन जाधव बोलतो. पळशीवरनं."

आरे हां हां.. हां.. बोल बोल.. कसा काय फोन केला..?

"काय नाय.. बगावं म्हणलं काय चाललंय..! तुजा काय फोन नाय काय नाय..कुठं हाईस कुटं तू ? "

हाय की.. हितंचाय.. चाललंय निवांत.

"आरं पन आसं कुटं आस्तंय गा ? एवडं करूनी लगा.. एवडं कुटं तोडत आस्तेत गा? समजाय पायजे तुला बी."

नाय नाय. तसं काय नाय. खरंच काय नाय..

"नाय कसं.? कदी यितू न् कदी जातू कळत बी नाय..हिकडं आल्यावर बी भेटत नाय.. येक फोन करायला बी जीवावर येतं गा ?"

आरे तुमचे तुमचे कामंधंदे चालल्याले आस्तेत आणि त्यात कशाला उगंच खोळंबा करायचा ?

"आमची कसली कामं न् काय.! म्हागं पुण्याला आलतू एक दोनदा तवा भेटावं म्हणलं पण तुजा फोन बंद..! सिच्चॉपच कायम..! मानसानं हुडकायचं तरी कुटं तुला.! "

बरं काय विशेष मग? कसा काय फोन केला आज ?

"त्ये आपला आबा जगदाळे है ना. त्यो इचारत हुता. त्येच्या मिशेसची चुलतबहीन हाय. इंजन्यरींग झालंय. आता तिकडंच जॉबला आसतीय कंपनीत. तर त्येनं परवा सज माज्यापाशी इषय काडला की बग इचारून तुला. काय इचार है का तुजा बग म्हनत हुता"

आरर्र.. नाय नाय नको .. आयला हेच्यासाठीच फोन केल्ता गा काय तू ?

"आरं थांब थांब.. जरा येक मिनिट थांब.. मी आता येक काम करतू.. ही फोन झाल्यावर तुला व्हॉट्सअप वर तिजा बायोडाटा पाठवतू..! नुसतं बगायला काय जातंय तुला? एकच नंबर पोरगी है..! लगीच पास करचील बग तू..! गॅरंटीच है मला."

चांगल्या वाईटाचा काय विषय नाय..! पोरी चांगल्याच आसतेत..! पण नकोचाय आपल्याला तर..! काय पाठवू बिठवू नको.

"असं कसं नगो ? मला काय कळतच नाय तुजं..! किती दिवस नगो नगो म्हन्नाराय? आं? पाठवतूय बग बायोडाटा..! दोन दिवस इचार कर निवांत अन् मग सांग. एवडं आईकच माजं..! आनी पार्टीबी चांगली है तिकडची. माणसं बी चांगली हैत आपल्या बगण्यातली. आनी आपली त्येंच्यात वाट बी पडल्याली है काशेगावच्या मामीच्या बाजूनं.. हेज्यापेक्षा चांगली जागा मिळनार नाय बग तुला..!"

बरं बरं सांगतो मी तुला नंतर.. मी फोन करतो नंतर.

"तू कसला फोन करतूय..! तुजं तिकडं काय तरी गॅटमॅट हाय भौतेक..! आनी आईक की. तसं काय आसलं तरी बी काय आडचन नाय बरं गा..! सांगून टाक आपल्याला बिन्दास.! मी बोलतो आण्णांला.. दुसरं कुनी डोक्यात हाय का तुज्या?"

नाय नाय आरे. तसलं काय नाय.

"आरं पन हिकडं पै पावन्यात तसाच कालवा उठलाय.! तुजं तू तिकडंच कायतरी जुळवलंय म्हणून.! सांग तसं काय आसलं तर.! औ? कास्ट बिस्टचा बी काय इषय राह्यला नाय आता येवडा..! त्येचं बी काय कमी जास्त आसलं समजा तरी काय आडचन नाय..! चालवून घिऊ आपन..! आं?"

आरे आस्तं तर सांगितलं आसतं मी..! आता काय नाईचाय तर काय पदरचं सांगू का? आनी लोकांचं काय मनावर घ्यायचं.! ते बोंबलतच आस्तेत.! त्येंचं तोंड कोन धरनार ! बरं ठिऊ का आता. काम है जरा.

"आरं कामावरनं आठवलं..! त्ये बी येक इचारायचंच हुतं. जॉबला कुटं अस्तो म्हणं तू आता ?"

जॉब बिब तसा काय नाय करत रे मी.! आता मी फक्त माझी पॅशन फॉलो करतोय..!

"हां..हां.. व्होय काय? चांगलंय चांगलंय..! पण म्हंजे काय करतूस काय नेमकं?"

विशेष काय नसतं..! हितं लोकांना कार पार्कींगसाठी स्वतःचा ॲसिस्टन्स देतो..! ॲसिस्टन्स म्हणजे एखादी कार आसपास घुटमळाय लागली की मी लगेच उठून उभा राहतो.! आनी मग उजवा हात हवेत चक्राकार हलवत 'येऊ द्याss येऊ द्याss हांss फुल्ल माराss' वगैरे आवाज काढतो..! आनी मग कार नीट पार्क झाली की लगीच खिडकीवर हात आपटून मजूरी मागतो...! लोकं देतेत त्येंच्या खुशीनं दहा वीस रूपै..! भागतं माझं तेवढ्यात.! आनी पैशाचं बी काय नसतंय रे एवडं..! कामाचा आनंद महत्वाचा.! तो बक्कळ मिळतो..! बाकी वेळ मग हितंच फुटपाथवर बसून असतो दिवसभर..! हॅलोss पवन.. हॅलोss.. ऐकतोयस ना? च्यायला ठिवला वाटतं फोन पव्यानं..!

कथासमाजमौजमजाप्रतिसादविरंगुळा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2022 - 11:24 pm | चौथा कोनाडा

भारी ... हा .... हा .... हा .... !
😄

सुखी's picture

8 Feb 2022 - 11:25 pm | सुखी

लोल :D

श्रीगणेशा's picture

9 Feb 2022 - 2:48 am | श्रीगणेशा

भारी :-)

बोलीभाषेतील संवाद छान टिपले आहेत!

"बास का आता? आता आवाज पन इसरला का आमचा?"

"आरे पवन बोलतोय पवन.!"

सुजित जाधव's picture

9 Feb 2022 - 8:17 am | सुजित जाधव

खूपच छान..खूप दिवसांनी गावाकडच्या भाषेतला खुसखशीत आणि मजेशीर लेख वाचला.. मराठी भाषेची गम्मत न्यारी.. येवुद्या अजून...

ह्या ह्या

Bhakti's picture

9 Feb 2022 - 9:31 am | Bhakti

शेवट लयीच खतरनाक :)

पाटिल's picture

9 Feb 2022 - 10:22 am | पाटिल

:-)
चौथा कोनाडा, श्रीगणेशा, सुखी, सुजित, कंजूस, भक्ती.
अभिप्रायाबद्दल तुमचे सर्वांचे आभार :-)

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Feb 2022 - 12:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

मोबाईलवरच्या संवादातुन रंगवलेला लेख आवडला. ते " बर्मंग्ठिव्का" आलं असतं तर मजा आली असती.

रच्याकने--ईथे मोठ्या शहरातील शिकली सवरलेली मुले तिशीपर्यंत बिनलग्नाची आहेत्,चिपळुण्,दापोली,रत्नागिरी वगैरे तुलनेने लहान ठिकाणी तर परिस्थिती अजुनच गंभीर. त्यात गावाकडुन शहरात आलेला माणुस सेटल होणार कधी न लग्न करणार कधी हा एक प्रश्नच आहे.

बेकार तरुण's picture

9 Feb 2022 - 12:49 pm | बेकार तरुण

मजा आली .... अजुन येउदे ....

sunil kachure's picture

9 Feb 2022 - 1:39 pm | sunil kachure

ग्रामीण भागातील लोकांची शहरात राहणाऱ्या लोकांविषयी जी धारणा असते ती विनोदी शैलीत मस्त मांडली आहे.
राज्याचा काही ग्रामीण भाग अतिशय उत्तम स्थिती मध्ये आहे तिथे शहरी लोक आर्थिक बाबतीत सू स्थिती मध्ये असतात असे समजले जात नाही.
बेरकी पना नी प्रेमाचा आभास निर्माण करून स्वार्थ साधण्याची माणसाची वृत्ती वर तुम्ही छान प्रकाश टाकला आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Feb 2022 - 2:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

शेवटच्या परिच्छेदातला अ‍ॅटीट्युड तर फारच आवडला
पैजारबुवा,

पुंबा's picture

9 Feb 2022 - 7:08 pm | पुंबा

खुसखुशीत लेख!

उपयोजक's picture

10 Feb 2022 - 8:07 am | उपयोजक

आवडलं

सालदार's picture

10 Feb 2022 - 11:33 am | सालदार

भारी जमलंय बगा!