तुम्हाला नातेसंबंधांचा अभ्यास करायचा आहे का? असेल तर हा चित्रपट जरूर पाहा. कारण डीव्हीडी वरील माहितीनुसार "It's a study in relationships..."! त्याआधी स्त्री स्वातंत्र्याचे काही पैलू पाहूनच आपण थक्क होतो. मुलीला 'हायस्कूल' नंतर लग्नाच्या मागे लावणारे आधुनिक विचारांचे पुरूष तर नेहमीच असतात, पण येथे एक सोडून दोन स्वतंत्र विचारांच्या आणि स्वत:बद्दल आत्मविश्वास असलेल्या नायिका यात आहेत. एक स्वत:च्या आई वडिलांना आपले लग्न झाले आहे का नाही ते ठामपणे सांगू शकत नाही, दुसरी तर स्पष्टपणे 'हम लडकिया पेड के बेल की तरह होती है, हम को सहारे की जरूरत होती है, जो भी सहारा दे उसे थाम लेती है" वगैरे सांगते. समस्त स्त्री मुक्ती संघटनांना अध्यक्षा शोधायची गरजच नाही!
बडजात्या व चोप्रा लोकांनी एकत्र येऊन हा पिक्चर काढला आहे का असे वाटावे इतके साम्य आहे (दिग्द. राज कंवर): मुख्य कुटुंबाच्या घरी सदा पडिक असणारे नातेवाईक बडजात्याकडून तर रागीट बाप अमरीश पुरी, प्रेमळ आणि सगळे जिचा आदर करतात अशी 'बिजी' सुषमा सेठ आणि नुसते कोणी आपल्या घरी निघाला की लगेच बहरणारी ती पिवळ्या फुलांची शेते यश/आदित्य चोप्राकडून मागवलेली असावीत. प्रत्येक सीन मधे एवढे लोक की कोण कोणाचा कोण ते कधीच कळत नाही. परत नुसते घर नाही, एकदम "करोडों की जायदाद". त्यात ती एक 'यादे' मधली ती रशियन मुलीचा रोल केलेली पण आहे ('मोनिश्का' बहुतेक), ती तर त्या घरातील सून आहे की मुलगी हे शेवटपर्यंत कळत नाही. सून असेल तर ऐश्वर्या ने घातलेल्या कपड्यांबद्दल तसेच न घातलेल्या दागिन्यांबद्दल बोलताना हिचा अवतार कोणालाच दिसत नाही. जर मुलगी असेल तर "जायदाद" ची वारस एकदम ऐश्वर्या कशी?
तुम्ही "Walk In the Clouds" बघितला असेल तर पुढे काय होईल याची तुम्हाला कल्पना येईल पण ते कशा पद्धतीने होईल याची किंचितही आयडिया नसेल. शहरात कॉलेज मधे शिकायला आलेली असली तरी ही शेवटी 'चोप्रा-सर्टिफाईड' फ्यामिलीमधली 'बडजात्या-सर्टिफाईड' सुसंस्कृत मुलगी! तिच्या घरचे लग्न ठरवत असताना चुकून रागात 'मग तू काय ऑलरेडी लग्न केले आहेस काय?' या प्रश्नाला 'हो केले आहे' म्हणते आणि तिकडे स्फोट होतो. आता करोडोंकी जायदाद मधे पुन्हा फोन करून किंवा मुलीला प्रत्यक्षात भेटून शहानिशा करणे शक्य नसल्याने सगळे 'हमको कहीं का नही छोडा' छाप संवाद म्हणत राहतात. एवढ्या प्रेमळ वगैरे कुटुंबातील इतरांचे सोडा, तिच्या आई ला सुद्धा कुतूहल नाही की मुलीने लग्न केलेच आहे तर कोण आहे नवरा, काय करतो ते जरा बघून यावे.
आता अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडणे शक्य नसल्याने ती थेट आत्महत्या करायला निघते, पण आत्महत्या आपण जिवंत राहिलो तरच करता येईल हे माहीत असल्याने काही खूनी लोक तिच्या मागे लागतात तेव्हा मात्र स्वत:ला वाचवण्यासाठी पळते. तेथे तिला अभिषेक भेटतो. मग पुढे ते आपापल्या मार्गाने जातात, पण नंतर याची गाडी जेथे बंद पडते तेथेच बरोबर ती उभी असते जीव द्यायला एक चांगला धबधबा बघून. तिला वाचवायच्या प्रयत्नात दोघेही खाली पडतात. मग खाली पडून जेथे पाण्यातून बाहेर निघतात तेथे धबधब्यात पडायच्या आधी वरती यांच्या राहिलेल्या बॅगासुद्धा आपोआप आलेल्या असतात!
मग ते तिच्या घरी येतात. तेथे इतके दिवस राहून सुद्धा ऐश्वर्याला कोणालाही सांगता येत नाही की तिचे खरे लग्न झालेले नाही. आता प्रत्येक प्रसंगातच सगळे असले तर कसे सांगणार. इतक्या दिवसांनंतर आणि लग्न करून घरी आलेली मुलगी आपल्या आई किंवा वडिलांशी सविस्तर बोलू शकत नाही. कारण कोणालाही 'माझे लग्न झालेले नाही, तुमचा ऐकण्यात गोंधळ झालाय' असे धाडकन कसे सांगणार? मग त्यासंबंधी प्रस्तावना करणारी वाक्ये आधी टाकावी लागतात "उसका और मेरा रिश्ता ऐसा नही है", "आप जो समझ रहे है वैसा नही है" आणि मग ते वाक्य पुरे न करू देता त्यातून भलता अर्थ काढणारे नातेवाईक असले की केवढा मोठा प्रॉब्लेम! त्यामुळे करवा चौथ पासून ते "जावयाला कुटुंबात सामावून घेण्या आधी आणि इस्टेट चे कागदपत्र देण्या आधी" करतात ती पूजा (चोप्रा व बडजात्या यांच्याकडे अशी पूजा असावी) असे अनेक प्रसंग आले तरी ते खरे नवरा बायको असल्यासारखे पार पाडावे लागतात.
त्या जायदाद ची तर पुढच्या ४-५ पिढ्यांसाठी व्यवस्था आधीच लावली असावी. एकतर ती 'बिजी' आणि ऐश्वर्याचे आई वडील जिवंत असताना (आणि एक ती थोरली बहीण सुद्धा असताना) 'इकलौती वारिस' ऐश्वर्या हे जाहीर असते. तसेच यांच्या लग्नाचे सर्टिफिकेट सुद्धा न बघता जावयाला सगळी इस्टेट देण्याची यांना खूपच घाई झालेली असते. बाकी पडीक लोक ही काही हरकत घेत नाहीत. पण एकूण ते जायदाद चे कागद दर १०-१५ मिनीटानी कोणीतरी कोणाच्यातरी नावाने करत असतात.
पण अभिषेक चे प्रेम अजून शाबूत असते, सोनाली बेन्द्रेवरचे. तो सोनाली कडे परत येतो, पण ती त्याला सरप्राईज काय देते तर त्यांच्या आणखी एका मित्राशी तिचे लग्न झालेले असते! कधीतरी अभिषेक येईल आणि त्याला सरप्राईज देऊ म्हणून ती लग्न झाल्यावर सुद्धा स्वत:च्याच घरात राहते आणि मंगळसूत्र, अंगठी वगैरे घालत नसते त्यामुळे तिला भेटल्यावर सुद्धा अभिषेक ला कळत नाही. मग जेव्हा सरप्राईज उघड होते तेव्हा त्याचा दु:खी चेहरा पाहून तिलाही कळते. पण त्यानंतर अर्ध्या सेकंदात ती त्याला म्हणते की "मला प्रॉमिस कर की पुन्हा कोणावर प्रेम बसले तर लगेच सांगशील". नशीब अभिषेक तिला म्हणत नाही की "आणि तू मला प्रॉमिस कर की पुन्हा लग्न करायच्या आधी तुझ्या सगळ्या 'फक्त-दोस्तां'कडे एकदा चेक करशील"
आता अभिषेक पुन्हा ऐश्वर्याकडे परत येतो. मधल्या काळात सर्व उघडकीला आलेले असते त्यामुळे अमरीश पुरी बंदूक घेऊन तयारच असतो. तो त्याला सांगतो की तिचे लग्न ठरले आहे. येथे मुंबईच्या कोणत्याही स्टेशन वर दोन्ही लोकल लागलेल्या असताना फास्ट लोकल ने लौकर जाऊ म्हणून तिकडे जाताना ती सुटली व पुन्हा जिना धावतपळत चढून उतरताना स्लो ही सुटली की होतो तसा चेहरा अभिषेक चा होतो.
मूळ चित्रपटात ती हीरॉइन प्रेग्नंट असते त्यामुळे हे नाटक करते. येथे संस्कृती बंबाळ चित्रपटात जेथे लग्नानंतर प्रेग्नंट व्हायची मारामार तेथे लग्नाआधी चान्सच नाही. येथे तसे काही नसले तरीही अमरीश पुरीने आक्रमक होणे व बाकीच्यांनी फक्त रागाने बघणे व एखाद्या अनुपम खेर ने समजून घेणे वगैरे रीतसर प्रकार घडतात. त्यात घर एवढे मोठे की अमरीश पुरीचे ओरडणे व दर वाक्यानंतर मारलेली चपराक, तसेच इतरांचे रागाने बोलणे आत असलेल्या ऐश्वर्याला ऐकू येत नाही. पण बाहेर अभिषेक आला आहे हे कोणी सांगितल्यावर मात्र ती नुसती मान वळवते तर तो तिला दिसतो. मग ती तिकडे जायला निघते तर एकदम मधे एक वाळवंट लागते. एक मिनीट मला वाटले की काही लोकांकडे आवारात स्विमिंग पूल असतात तसे यांच्याकडे स्वत:चे वाळवंट आहे की काय, पण ते एक मधेच उपटलेले आणि त्या प्रसंगाशी काहीही संबंध नसलेले गाणे निघाले.
शेवटी व्हिलन येतात, तिचा होउ घातलेला नवरा हाच आधी तिने पाहिलेला खूनी निघतो, मग त्यांचे लग्न जबरदस्तीने लावले जात असताना व अमरीश पुरी च्या फॅक्टरीला आग लावली असताना तो व अभिषेक एका थीम पार्क च्या वाटणार्या पाईप मधून खाली जातात (तो जाळ ही वरून खाली त्यांच्या मागे जातो) व सर्व काही ठीक करतात.
कलाकारही महान आहेत. अभिषेक चा माफ़क दाढी व मिशावाला 'इंटेन्स' लूक नसल्याने तो पूर्वी मासिकात बघितलेल्या अमिताभच्या कौटुंबिक फोटोतील अभिषेक प्रमाणे दिसतो. ऐश्वर्या चा चेहरा कायम प्रेमाने कष्टी झाल्यासारखा आहे. तर काही गाण्यात एवढे दागिने आहेत की पूर्वीच्या पिक्चर्स मधे भारतमाता दाखवायला कोणालातरी दिसेल तेथे दागिने घालून उभे करत तसे दिसते. सोनाली बेंद्रे चा तो सरप्राईज वाला महान शॉट सोडला तर इतर वेळी तिची ती पूर्वी थिएटर्स मधे दिसणारी निरमा का कसलीतरी जाहिरात दाखवली असती तरी चालले असते. ती 'बिजी' तर लहान मुले त्यावर घसरगुंडी खेळू शकतील एवढ्या मोठ्या उंच टाचेच्या चपला घलून घरात का फिरते कळत नाही. बाकी पूजा वगैरे चालू असताना सगळे घरात चपला घालून फिरत असतात. अनुपम खेर एवढा मनमिळावू की अभिषेक ऐश्वर्या ला सोडून जायला निघतो तेव्हा त्याला त्याचे तिच्यावर प्रेम आहे आणि तो दाखवत नाहीये याचीच काळजी. शक्ती कपूर चे बायकांचे ड्रेस घालून नाचणे, शारिरीक व्यंग असलेल्यांची नक्कल वगैरे दर्जेदार विनोद आहेत.
डायरेक्शन सुद्धा सर्वसामान्यपणे आपण ज्याला 'डायरेक्शन' म्हणतो अशा शॉट्स ने भरलेले आहे. म्हणजे 'मेरे सामने खुला आकाश था' असे ऐश्वर्या म्हणताना बॅकग्राउंड ला मोकळे आकाश, तर तिच्या मनात जरा वादळ उठू लागले की लगेच त्यांच्या जीप वर पाऊस व आजूबाजूने झाडांच्या फांद्या पडायला सुरूवात! आधीच्या त्या संवादात फक्त ते दोघेच असताना अभिषेक म्हणतो की 'मै पिंजडे मे बंद होना चाहता हू', लगेच एक पिंजर्यात काही पक्षी ठेवलेला माणूस त्यांच्या मागे येतो आणि दोन मिनीटांनी तेथून जातो, यांना पक्षी हवेत का वगैरे काही न विचारता. तो कोठून आला? माहीत नाही, कदाचित 'डायरेक्शन' मधे हे विचारायचे नसते!
वाचने
9259
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त लेख..
१+ सहमत..
In reply to मस्त लेख.. by भडकमकर मास्तर
हा हा हा ...
'ढाई अक्षर
च्यायला.
मालक
हाहाहा
फारेंड इज
In reply to हाहाहा by मुक्तसुनीत
भारी!
काय मस्तं
मस्तच परीक्षण...
एक नंबर
झकास !!
मिसड दिस फन !!
मस्त
मस्त!
हे वाचायचं राहिलंच होतं...
हसुन हसुन पोट दुख्या. कुठे
हा हा हा, मस्तच.
कहर आहे हे परिक्षणही! हे
ती 'बिजी' तर लहान मुले त्यावर
ती 'बिजी' तर लहान मुले त्यावर घसरगुंडी खेळू शकतील एवढ्या मोठ्या उंच टाचेच्या चपला घलून घरात का फिरते कळत नाही.खल्लास :=) बरं झालं हा पिक्चर बघितला नाही, मायला एवढा भंगार असेल वाटलं नव्हत.छान