इतिहासाचे डिटेक्टिव

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
17 Nov 2021 - 7:25 pm

आपण इतिहासात जसजसे मागे जाऊ तसे त्या त्या काळाची कहाणी सांगणारी साधने बदलत जातात. अधिक मागे गेले की एक काळ असा येतो की लिहिलेले असले तरी नेमके काय लिहिले आहे हे वाचता येत नाही किंवा त्यातही काळाच्या ओघात शिल्लक राहिलेले अपुरे असते. अजूनही मागे जावे तर लिखित साधने अगदीच सापडेनाशी होतात. अशावेळी इतिहास जाणून घेताना आपल्याला डिटेक्टिवच्या भूमिकेत शिरावे लागते. अनेक घटना या लिखितपूर्व काळात घडलेल्या असतात आणि एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे आपला ठसा मागे ठेऊन जातात. गुन्हेगार कधी हाताचे ठसे मागे ठेवतो, बुटाचा ठसा सोडतो, एखादा केस किंवा पार्किंगमध्ये गाडीच्या चाकाचे ठसे मागे ठेऊन जातो. चतुर डिटेक्टिवला योग्य ठिकाणी शोधले म्हणजे असे ठसे सापडतात आणि मग गुन्ह्याची उकल होते. अशाच प्रकारे इतिहासातील घटना जे विविध ठसे मागे सोडून जातात त्यांचा शोध आणि योग्य अर्थ लावून आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकतो. भारतीय मान्सून आणि शिसेविरहीत पेट्रोल या दोन आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या महत्वाच्या गोष्टीतून आपण हे अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

भारतीय मान्सून

भारतासाठी पावसाळा किती महत्वाचा आहे याची आपणास कल्पना आहे. दरवर्षी पाऊस कधी सुरु होणार, धरणे किती टक्के भरली, किती पाणी शिल्लक आहे याकडे सर्वांचे लक्ष जाते. भारतात सर्वत्र वर्षभरात पडणाऱ्या एकूण पावसापैकी बराच पाऊस हा जुन-सप्टेंबर या काळातच पडतो. महाराष्ट्रावरही पावसाची कृपा याच काळात होते. या पावसाची मोजणी करून केलेल्या नोंदी १८७१ पासून उपलब्ध आहेत. देशात दीर्घकालीन सरासरीपेक्षा १०% अधिक पर्जन्य म्हणजे पूरस्थिती आणि १०% कमी पर्जन्य म्हणजे दुष्काळ समजला जातो. १८७१ पासून १९ पूराची वर्षे आणि २६ दुष्काळाची वर्षे येऊन गेली आहेत. यातही प्रादेशिक वैविध्य असतेच, एखाद्या ठिकाणी ढगफुटीसारख्या दुर्घटना होतात. नेमके पेरणी केल्यावर आठवडाभर पाऊस गायब झाला, खूपच पडला, पीक कापायला तयार झाल्यावर खूप पाऊस पडला असे जरी झाले तरीही शेतकऱ्यांचे नुकसान होतच. स्वातंत्र्यानंतर आपले शेतमालाचे आणि औद्योगिक उत्पादन कमी वेगाने असले तरी वाढत राहिले आहे. शेतीतील उत्पादनाचा वाटा हा सकल राष्ट्रीय उत्पादनात कमी होत आहे. तांत्रिक प्रगतीतून शेतीवरही दुष्काळ-पूर यांचे दुष्परिणाम कमी होतील असे प्रयत्न चालूच आहेत. तसे असले तरी या स्वातंत्र्योत्तर काळातही शेतमालाचे उत्पादन आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न यावर पावसाचे कमी जास्त पडण्याचा परिणाम झालेलाच आहे. दुष्काळी परिस्थितीत धान्य उत्पादन कमी होतेच आणि ग्रामीण भागात क्रयशक्ती कमी झाल्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नावरही त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे मान्सूनचा अभ्यास आपल्याकरता महत्वाचा आहे. १८७१ पासून सलग दोन वर्ष दुष्काळ पडला (वर दिलेल्या १०% च्या नियमाप्रमाणे) असे दोनदा झाले आहे. साधारण १५० वर्षाचे आकडे पाहून असा भास होऊ शकतो की मान्सून असाच अनेकवर्षे चालू आहे आणि असाच चालू राहील. मात्र पृथ्वीचे वातावरण ही एक जटील प्रणाली (complex system) आहे. वातावरण देश प्रदेश यांच्या सीमा मानत नाही. त्यामुळे एका ठिकाणी झालेला छोटासा बदल सगळीकडे पसरत जातो. सूर्याचे पूर्व-पश्चिम भासमान भ्रमण आपल्याला रोज दिसते. मात्र सूर्याची उत्तर-दक्षिण भासमान हालचाल अनुभवायची असेल तर किमान एक वर्ष निरीक्षणे नोंदवावी लागतील. त्याप्रमाणे मान्सूनच्या प्रमाणात होणारे बदल हे पूर्णपणे दिसून यायला १५० वर्षांचे निरीक्षण अपुरे ठरू शकते. मोजणीपूर्व काळात मान्सूनमध्ये कसे कसे बदल झाले हे जाणून घ्यायचे झाले तर तेव्हाच्या पावसाने मागे ठेवलेले ठसे आपल्याला शोधावे लागतील.
पाण्याच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू अशी रचना आपण जाणतोच. या ऑक्सिजन अणुकेंद्रात सामान्यणे ८ प्रोटॉन, ८ न्यूट्रॉन (ऑक्सिजन-१६) असतात. पण अगदी दहा हजारात दोन ऑक्सिजन अणू असे निघतात की जिथे अणुकेंद्रात १० न्यूट्रॉन असतात, प्रोटॉन मात्र ८ असतात (ऑक्सिजन-१८). त्यामुळे ऑक्सिजन-१८चा अणू हा ऑक्सिजन-१६च्या अणूपेक्षा पेक्षा जरा जड आहे. बाकी त्याच्या गुणधर्मात फार काही फरक नाही. यांनाच आपण समस्थानिके (isotopes) या नावाने ओळखतो. असा हा जड ऑक्सिजन पाण्याच्या रेणूत सहभागी असेल तर तो पाण्याचा रेणूही थोडा जड होतो. पाऊस पडण्यासाठी समुद्राचे पाणी बाष्पीभूत होऊन परत जमिनीवर द्रवीभूत होणे गरजेचे आहे. हे पाणी एकदा जमिनीवर पडून तलाव, नदी यात जमा झाले की त्याचे पुन्हा बाष्पीभवन चालूच असते. बाष्पीभवन होताना ऑक्सिजन-१६ सहभागी असलेले पाण्याचे रेणू, म्हणजेच जरा वजनाने हलके असलेले, सर्वात आधी बाष्पीभूत होतात. याउलट ऑक्सिजन-१८ सहभागी असलेले पाण्याचे रेणू, म्हणजेच जरा वजनाने जड असलेले, सर्वात आधी द्रविभूत होतात. हे पाणी एका तळ्यात साठले की तिथून परत बाष्पीभवन होताना ऑक्सिजन-१६ सहभागी असलेले पाण्याचे रेणू आधी बाष्पीभूत होतात. जेव्हा एखाद्या ठिकाणी कमी पाऊस आणि जास्ती बाष्पीभवन अशी स्थिती असते म्हणजे दुष्काळ आहे असे म्हणता येईल. अशा ठिकाणी जो कमी पाऊस पडतो त्यातून जास्ती प्रमाणात ऑक्सिजन-१८ युक्त पाणी पडते. जेव्हा खूप बाष्पीभवन होईल तेव्हा जास्ती प्रमाणात ऑक्सिजन-१६ युक्त रेणू निघून जातात. म्हणजेच एखाद्या दुष्काळी भागातल्या तळ्यात ऑक्सिजन-१८ युक्त रेणूंचे प्रमाण वाढू लागते. म्हणजेच एक हजार वर्षांपूर्वीचे एखाद्या ठिकाणचे पाणी आणून दिले तर त्यातील ऑक्सिजन-१८ युक्त रेणूंचे प्रमाण पाहून आजच्या तुलनेत त्या वर्षी पाऊस किती पाऊस पडला याचा अंदाज सांगता येईल. आता इतक्या जुन्या काळातील पाणी कुणी साठवून आपल्याकरता त्यावर लेबले लावून ठेवले नाही. त्यामुळे त्याकाळच्या पाण्याचाही परत शोध घ्यावा लागतो.
तलावाच्या तळाशी राहणारे गोगलगायींसारखे कवचधारी जीव इथे आपल्या मदतीला येतात. या जीवांचे कवच कॅल्शिअम कार्बोनेट (CaCO३) पासून तयार झालेले असते. यातील हे जे ऑक्सिजनचे अणू आहेत ते पाण्यातूनच येतात. त्यामुळे पाण्यात ऑक्सिजन-१८ चे प्रमाण हे तत्कालीन पाण्यात असेल तेच आपल्याला या कवचधारी जीवांच्या कवचात सापडते.आणि हे जीव मृत्युमुखी पडले की तळाशी जातात आणि तळ्यात येणाऱ्या गाळात वर्षानुवर्षे गाडले जातात. आपल्यासाठी महत्वाची नोंद ते साठवून ठेवतात. अशा साधनांच्या अभ्यासातून आपल्याला मान्सूनचे दृश्य कसे दिसते?
सुमारे ४००० वर्षांपूर्वी भारतातील लोकांना अतिशय भीषण अशा, म्हणजेच सुमारे २०० वर्ष चाललेल्या, दीर्घकालीन दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले असावे असे वाटते. हरयाणातील कोटला धार येथील तलावातील गाडल्या गेलेल्या जीवांच्या अभ्यासातून ही गोष्ट उघड झाली आहे. आणि असा भीषण दुष्काळ केवळ भारतीयांच्या वाट्याला आला असे नाही. साधारण याच काळात मध्यपूर्वे आशिया, पूर्व आफ्रिका, दक्षिण युरोप, दक्षिण चीन याही ठिकाणी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाले, हवामान अधिक कोरडे होऊ लागले. पावसाच्या नेहमी पेक्षा सुमारे ३०% घट या काळात झाली असावी असे सांगता येतो. मुख्य म्हणजे याचा फटका इजिप्त, मेसोपोटेमिया, आणि आपली सिंधू-सरस्वतीच्या खोऱ्यातील संस्कृती यांनाही बसला (इजिप्त मेसोपोटेमियाही कमी आपले नाहीत). या सर्वानाच उतरती कळा लागण्यात या बदललेल्या हवामानाने सहाय्यच केले. वर म्हटल्याप्रमाणे सलग दोन वर्ष दुष्काळ पडला असे मोजणी काळात केवळ दोनदा घडले आहे. त्यामुळे ४००० वर्षांपूर्वी सरासरीपेक्ष अगदी २०% कमी आणि किमान दहा वर्षे जरी असा दुष्काळ चालला तर तत्कालीन लोकांचे काय अवस्था झाली असेल ते आपल्याला कळेल. दुष्काळाचे हे दुष्टचक्र केवळ ४००० वर्षांपूर्वी एकदाच येऊन गेले असे नाही. दुर्गादेवीचा दुष्काळ या नावाचा दुष्काळ महाराष्ट्रात पंधराव्या शतकाच्या उंबरठ्यावर बारा वर्ष चालला अशी नोंद आहे. म्हणजेच मोजणी केलेली नसली तरी दुष्काळी परिस्थितीचे नोंद आहे. याही दुष्काळाचे ठसे संशोधकांना सापडले आहेत. अशाच प्रकारे दशकभर चालणारे दुष्काळ आपल्या देशात अनेकदा येऊन गेले आहेत आणि आपले ठसे त्यांनी हुशार डिटेक्टिवसाठी मागे ठेवले आहेत.
या भीषण दुष्काळाच्या घटना आपल्यासाठी धोक्याच्या सूचना आहेत. चार हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतींचा ऱ्हास आपल्याला ग्रामीणीकरणाच्या (शहरीकरणाच्या विरुद्ध) स्वरूपात दिसतो. आजही आपल्या देशातही शहरीकरण सुरू आहे. शहरातील लोकसंख्या आणि उद्योग पाण्याकरता धरणांवर अवलंबून असतात आणि अन्नाकरिता ग्रामीण भागातून येणाऱ्या उत्पादनावर. चार हजार वर्षांपूर्वीचे बदल हे मानवी हस्तक्षेपाशिवाय घडून आले. आता तर मानवी हस्तक्षेपाचीही भर पडली आहे. अशा परिस्थिती पावसाची शाश्वती आणि त्यावरचा आपला डोलारा हे किती नाजूक आहेत याची जाणीव आपल्याला असलेले बरी.

शिसेविरहीत पेट्रोल

पेट्रोल इंजिनमध्ये स्पार्क प्लग असतो. त्याच्यातून निर्माण होणाऱ्या ठिणगीमुळे पेट्रोल-हवा यांचे मिश्रण पेट घेते आणि स्पार्क प्लग पासून सुरु झालेली ज्वाला पेट्रोल-हवा यांचे मिश्रण गिळंकृत करत जाते. मात्र काही कारणांनी ही स्पार्क प्लग पासून निर्माण झालेली ज्वाला सर्वत्र पोहोचण्याच्या अगोदरच काही ठिकाणी पेट्रोल-हवा यांचे मिश्रण स्वयंस्फूर्तपणे पेट घेते (auto ignition). हे इंजिनाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. पेट्रोल-हवा मिश्रणाचे स्वयंस्फूर्तपणे पेट घेणे टाळण्यासाठी शुद्धीकरण, प्रत्यक्ष इंजिन यात उपाय करण्यात आले. आणखी एक स्वस्तातला उपाय म्हणजे काही विशिष्ट रसायने पेट्रोलमध्ये मिश्रित करणे. जनरल मोटर्स या अमेरिकेतील कंपनीने त्यांच्या गाड्यात येणाऱ्या या समस्येचे निवारण करण्याकरता टेट्राएथिल लेड (TEL) या रसायनाचा उपयोग होऊ शकतो हे जाणले. १९२३ मध्ये टेट्राएथिल लेड (TEL) हे शिसेयुक्त रसायन पेट्रोल मध्ये मिसळण्यास अमेरिकेत सुरुवात झाली. वापरणारी कंपनी जनरल मोटर्स आणि उत्पादित करणारी ड्यू पॉन्ट यांनी चलाखीने त्यांचे उत्पादन 'इथील गॅसोलिन' या नावाने विकले. TEL या नावातील 'लेड' गाळून टाकले. १९६० मध्ये टेट्रामेथिल लेड (TML) याही रसायनाचा वापर सुरु झाला. आज आपण पेट्रोल विक्री केंद्रावर शिसेविरहित पेट्रोल (unleaded) विकले जाते हे पाहतोच. अमेरिका येथे १९७० पासून, युरोपात १९८० पासून, शिसेविरहित पेट्रोलच्या विक्रीस सुरुवात झाली. भारतात २००० सालापासून देशभरात शिसेविरहित पेट्रोलची विक्री सुरु झाली. संयुक्त राष्ट्राकडून २०२१ मध्ये शिसेयुक्त पेट्रोलचा वापर संपूर्ण जगातून संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. TEL सोडून पूर्वी इमारतींना लावण्याच्या रंगातही शिसे वापरले जात असे. शिसे आणि त्यापासून तयार झालेले संयुगे ही मुलांच्या बौद्धिक वाढीवर वाईट परिणाम करतात. त्यामुळे गरोदर स्त्रिया आणि बालके यांच्यासाठी ते धोकादायक आहेत.
१९२३ साली TEL चे उत्पादन सुरु झाल्यावर लगेच तिथे काम करणारे १३ ते १५ कामगार मानसिक संतुलन बिघडून मृत्युमुखी पडले. त्यामुळे मग TEL चे उत्पादन करणे सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झाला. TEL च्या समर्थनार्थ उतरलेल्या रॉबर्ट केहो यांनी निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या रक्तात आणि कारखान्यातील कामगारांच्या रक्तात किती शिसे सापडते ते पाहून सांगून टाकले की आपल्या रक्तात शिसे निसर्गातून मिसळतच असते, त्यामुळे घाबरायचे कारण नाही. TEL मुळे जरी रक्तातील शिसे वाढले तरी आपलयाला काही होणार नाही असे ठामपणे सांगून टाकले. याच वादात काही दशकांनी प्रवेश झाला तो क्लेअर पॅटर्सन यांचा. क्लेअर पॅटर्सन हे खरेतर भू-रसायनशास्त्रज्ञ आणि त्यांचा अभ्यासाचा विषय होता पृथ्वीचे वय किती आहे ते मोजणे. या कामात त्यांना अनेक प्रकारच्या खडकांवर रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत असत. हा अभ्यास करत असताना त्यांना लक्षात आले शिसे हा धातू पृथ्वीवर जिकडे तिकडे पसरलेला आहे आणि त्याचे कण हवेतही आहेत. त्यांच्या सिद्धांतानुसार शिसे इतक्या प्रमाणात सगळीकडे केवळ नैसर्गिक रीतीने पसरलेले असू शकत नाही. तेव्हाच त्यांना औद्योगिक प्रक्रियेतून शिसे वातावरणात आणि समुद्रातही पसरत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता औद्योगिक प्रक्रियेतून शिसे हवेत पसरले आणि औद्योगिकीकरणापूर्वी त्याचे हवेत प्रमाण कमी होते हे सिद्ध करणे गरजेचे होते.
ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका येथील बर्फाचे नमुने इथे पॅटर्सन यांच्या उपयोगी आले. ग्रीनलँड सारख्या ठिकाणी इथे शतकानुशतके बर्फ पडून त्याचे थर जमा होतात. हे थर स्वतःबरोबर हवेतील धुळीचे कण, बुडबुड्यांच्या रूपात तत्कालीन हवेचे नमुने साठवून ठेवतात. त्यामुळे अशा ठिकाणचे बर्फ खोदून निरनिराळ्या थरातील बर्फावरून आपल्याला हवेत कोणते वायू आणि कण अस्तित्वात होते हे सांगता येते. वरती लिहिल्याप्रमाणे याच बर्फातील ऑक्सिजन-१८ चे प्रमाण पाहून हजारो वर्षांपूर्वीच्या तापमानाचाही अंदाज बांधता येतो. TEL मधून येणारे शिसे हे जरी विसाव्या शतकातील घटना असली, तरी एकूणच धातूंचा वापर सुरु झाल्यापासून शुद्धीकरण प्रक्रियेतून आणि अन्य धातूंच्या बरोबरीने शिसे खाणीतून बाहेर येऊन सर्वत्र पसरू लागले. त्यामुळे पॅटर्सन यांनी थेट इसवीसन पूर्व १००० वर्षांपेक्षा १९६० पर्यंत बर्फात सापडणाऱ्या शिसाचे प्रमाण दोनशे पटीने वाढले असल्याचे दाखवून दिले. औद्योगिकिकरणाचे केंद्र उत्तरेकडेच असल्यामुळे अंटार्क्टिका येथे मात्र १९४० पासून पुढे बर्फात त्याचे नमुने सापडले. त्याहूनही पुढे जाऊन औद्यीगिक क्रांतीपूर्व काळातील मानवी अवशेष, खोल समुद्रातील मासे यांचाही अभ्यास करून त्यानी तत्कालीन हवेत आढळणारे शिसे हे मानवी हस्तक्षेपातूनच आले असल्याचे सिद्ध केले. तत्कालीन हवेत आढळणारे शिसे हे नैसर्गिक आहे हा रॉबर्ट केहो आदी लोकांचा दावा त्यामुळे खोटा ठरला. त्यामुळे भविष्यात शिसे हवेत अधिक प्रमाणात मिसळत जाऊन त्याचे वाईट परिणाम आपल्यावर होवू शकतात याची जाणीव झाली. पॅटर्सन यांनी केवळ त्यांच्या विषयाशी मर्यादित न राहता आपल्याला शिसे या धातूच्या भयानक परिणामांपासून वाचवले.
शिसे आता TEL किंवा अन्य रूपात पेट्रोलमध्ये मिसळले जात नसले तरीही त्याने आपली पाठ सोडलेली नाही. न्यू ऑर्लीन्स येथील मातीचे नमुने तपासले असता २००१-२०१६ या काळात मातीच्या वरच्या थरात आढळणारे शिसे ५० टक्यांनी कमी झाले आहे आणि न्यू ऑर्लिन्स शहरात राहणाऱ्या बालकांच्या रक्तातील शिसे ६० टक्याने घटले असल्याचे दिसले. पॅटर्सन यांनी मुळातच आधुनिक काळात आढळणारे शिसे हे नैसर्गिक पातळीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचे दाखवून दिलेच आहे. त्यामुळे मातीतून आणि हवेतून आपला संपर्क अजूनही त्याच्याशी येत राहणार हे निश्चित. अजून दोन हजार वर्षांनी येणाऱ्या संशोधकांना आपण हे मागे ठेवलेले ठसे नक्कीच सापडतील आणि तेही म्हणतील की या लोकांनी अचानक शिसे धातूचा वापर कमी केलेला दिसतोय.

संदर्भ

[1] https://www.tropmet.res.in/~kolli/MOL/Monsoon/Historical/air.html
[2] Gadgil, Sulochana, and Siddhartha Gadgil. "The Indian monsoon, GDP and agriculture." Economic and political weekly (2006): 4887-4895.
[3] https://earthobservatory.nasa.gov/features/Paleoclimatology_OxygenBalance
[4] Dixit, Yama, David A. Hodell, and Cameron A. Petrie. "Abrupt weakening of the summer monsoon in northwest India~ 4100 yr ago." Geology 42.4 (2014): 339-342.
[5] Sinha, Ashish, et al. "A 900‐year (600 to 1500 AD) record of the Indian summer monsoon precipitation from the core monsoon zone of India." Geophysical Research Letters 34.16 (2007).
[6] Weiss, Harvey, and Raymond S. Bradley. "What drives societal collapse?." Science 291.5504 (2001): 609-610.
[7] Report of the Fact Finding Committee for Survey of Scarcity Areas, Maharashtra State, 1973
[8] https://www.bbc.com/news/world-58388810
[9] Needleman, Herbert L. "Clair Patterson and Robert Kehoe: two views of lead toxicity." Environmental Research 78.2 (1998): 79-85.
[10] Alley, Richard B. "Ice-core evidence of abrupt climate changes." Proceedings of the National Academy of Sciences 97.4 (2000): 1331-1334.
[11] Murozumi, Mv, Tsaihwa J. Chow, and Claire Patterson. "Chemical concentrations of pollutant lead aerosols, terrestrial dusts and sea salts in Greenland and Antarctic snow strata." Geochimica et cosmochimica acta 33.10 (1969): 1247-1294.
[12] Mielke, Howard W., et al. "The concurrent decline of soil lead and children’s blood lead in New Orleans." Proceedings of the National Academy of Sciences 116.44 (2019): 22058-22064.

इतिहासतंत्रलेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

17 Nov 2021 - 7:48 pm | तुषार काळभोर

O-१८ ने पाण्याचा इतिहास जाणण्याची पद्धत कार्बन डेटिंग सदृश्य वाटतेय.
हजारो वर्षांपूर्वीच पाणी नसलं तरी त्या पाण्याचे अवशेष तत्कालीन जलाचरांमध्ये असावेत आणि त्याचं प्रमाण मोजून तेव्हा पडलेल्या किंवा न पडलेल्या पावसाचं अनुमान आता लावावं... अमेझिंग!!

तुषार काळभोर's picture

17 Nov 2021 - 7:50 pm | तुषार काळभोर

तुम्ही शिक्षक आहात का?
खूप छान आणि सुगम पद्धतीने समजावून सांगितलं म्हणून तसं वाटलं :)

केदार भिडे's picture

17 Nov 2021 - 9:59 pm | केदार भिडे

प्रशंसेबद्दल धन्यवाद. कोणताही विषय अशाच प्रकारे लिहावा हा प्रयत्न आहे.
प्रोफेसर होऊ इच्छिणारा जास्ती वयाचा विद्यार्थी आहे. :-)

केदार भिडे's picture

17 Nov 2021 - 9:57 pm | केदार भिडे

कार्बन डेटिंग इथेही वापरावे लागते. तळयात गाडलेले किंवा बर्फाचे थर नेमके किती जुने आहेत हे मोजण्यासाठी थरात सापडणारे जैविक घटक कार्बन डेटिंग करून किती जुने आहेत ते ठरवावे लागते. मगच त्यांच्यातले अन्य पुरावे उपयोगी ठरतात.

ऑक्सिजन-१८ हा नवीनच प्रकार समजला.लेख खुप आवडला.

मुक्त विहारि's picture

17 Nov 2021 - 8:43 pm | मुक्त विहारि

वाखूसा

केदार भिडे's picture

17 Nov 2021 - 10:00 pm | केदार भिडे

वाखूसा काय आहे?

जेम्स वांड's picture

18 Nov 2021 - 11:20 am | जेम्स वांड

म्हणजे वाचन खूण साठवलेली आहे

त्यांनी बुकमार्क केला तुमचा लेख इतका आवडला त्यांना (असं ते अन मी पण म्हणतोय)

केदार भिडे's picture

17 Nov 2021 - 10:09 pm | केदार भिडे

[९] क्रमांकाच्या संदर्भात शिसे प्रदूषणासंबंधात अमेरिकेत जी वैज्ञानिक चर्चा झाली ती वाचण्यासारखी आहे. धोरण ठरवताना विशेष कौशल्य (expertise) किती महत्वाचे आहे ते कळते. आपल्याकडे दिल्लीतील प्रदूषणासंबंधी आय. आय. टी कानपूरच्या २०१६ मधला अहवाल आहे त्याच्यापलीकडे काही चर्चा गेल्याचे ऐकिवात नाही. आपले धोरणकर्तेही (कायम नोकरीवाले आणि पाच वर्षांनी निवडून येणारे) हे अशा पद्धतीच्या अभ्यासात स्वारस्य दाखवतील का तेही सांगणे अवघड आहे.

Bhakti's picture

18 Nov 2021 - 6:56 am | Bhakti

आपले धोरणकर्तेही (कायम नोकरीवाले आणि पाच वर्षांनी निवडून येणारे) हे अशा पद्धतीच्या अभ्यासात स्वारस्य दाखवतील का तेही सांगणे अवघड आहे.

कर्नलतपस्वी's picture

18 Nov 2021 - 7:53 am | कर्नलतपस्वी

इतीहासाची गोडी म्हणून वाचायला सुरवात केली. थोड्याच वेळात चक्रव्यूहात अडकलं आसे वाटले पण पुढे वाचत गेल्यावर क्लिष्ट विषय किती सोपा आणि सरळ मांडला आहे याची कल्पना आली. आपण प्रोफेसर झाला असता विद्यार्थी वर्गाला फायदा झाला असता.
आसो आम्ही पण विद्यार्थी च.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Nov 2021 - 8:59 am | ज्ञानोबाचे पैजार

न थांबता शेवटपर्यंत वाचत राहिलो.
लिहित रहा...
पैजारबुवा,

जेम्स वांड's picture

18 Nov 2021 - 11:22 am | जेम्स वांड

विवेचन हा शब्द ह्या लेखाला चपखल लागू होतो केदार सर.

Economic and political weekly

ह्या नावावरून तुम्हाला लेफ्टी/ कम्युनिस्ट म्हणले जाऊ शकते इथे काही भद्रजनांकडून, पण त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, उत्तम लिहिता, लिहीत राहा.

केदार भिडे's picture

18 Nov 2021 - 1:03 pm | केदार भिडे

विज्ञानेतर विषयात पाऊल ठेवायचे म्हणजे असे डावे/उजवे असे अनेक भूसुरुंग पेरलेले आहेत. त्यामुळे तिकडे जाताना मी सावध राहीनच.
पण इथला ज्या पेपरचा संदर्भ दिलेला आहे त्याचे दोन्ही लेखक IISc येथे अनुक्रमे हवामान शास्त्र आणि गणित विभागात काम करणारे प्रोफेसर आहेत, आणि या विशिष्ट पेपरात तरी डावे/उजवे करण्या सारखे नाहीये.

केदार भिडे's picture

18 Nov 2021 - 1:04 pm | केदार भिडे

आणि सर काय

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Nov 2021 - 11:56 am | राजेंद्र मेहेंदळे

लेख आवडला. ओ१६ आणि ओ१८ बद्द्ल प्रथमच समजले. दोन विषय वेगळे लिहिता आले असते का दोन लेखात? असा प्रश्न पडला. कारण दोन्ही विषय मोठे आहेत आपापल्या परीने.

असो. लिहिते रहा.

केदार भिडे's picture

18 Nov 2021 - 1:05 pm | केदार भिडे

मला मागची शब्दमर्यादा ओलांडायची होती त्यामुळे दोन्ही एकत्र केले.
सर नका म्हणू कृपया

रुपी's picture

18 Nov 2021 - 1:05 pm | रुपी

वेगळ्याच विषयावर खूप छान माहिती मिळाली. शिवाय, सहज लक्षात येईल असे लिहिले आहे!

गामा पैलवान's picture

18 Nov 2021 - 11:06 pm | गामा पैलवान

केदार भिडे,

तुमच्या लेखावरनं देस्त्म्य की प्राचीन चित्रं डोळ्यासमोर उभं करणं हे एक कलाविज्ञान असावं. लेख आवडला. असेच लिहिते राहा.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

18 Nov 2021 - 11:07 pm | गामा पैलवान

देस्त्म्य = दिसतंय

टंकनचुकीबद्दल क्षमस्व.

-गा.पै.

मधुका's picture

19 Nov 2021 - 6:07 pm | मधुका

लेख छानच.
अनेक गोष्टी माहीत नव्हत्या, त्या कळल्या.

मुळात *इतिहासाचे detective* ही कल्पनाच सुंदर आहे.

किंबहुना, इतिहास संशोधन म्हणजे भूतकाळाचे detective होणे असे म्हणू शकतो का?

शशिकांत ओक's picture

20 Nov 2021 - 10:55 am | शशिकांत ओक

ओ भाय
जरा देख के चलो ओ१६ है या ओ१८ है
यहां ऊप्पर से नीचे को नीचे से ऊप्पर आना जाना पडता है!

केदार भिडे's picture

20 Nov 2021 - 11:15 am | केदार भिडे

वैचारिक लिखाण करण्याची माझी पात्रता नाही, पण पुढे जाऊन तेही करण्याचा प्रयत्न आहे. कुठेतरी सुरुवात केली पाहिजे मला ,
तोपर्यंत इतिहासाबद्दल कुतूहल आणि अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रातील औपचारिक अनुभवातून काही लिखाण करण्यास सुरुवात केले आहे.
दहा ठिकाणहून वाचलेली माहिती गोळा करून, भाषांतरीत करून इथे ओतली असे वाटू नये म्हणूनही विशेष प्रयत्न केले.
ते मुख्यतः सर्व माहिती स्वतः वाचून त्यातून मला समजलेले नंतर लिहून काढले अशाच स्वरूपात आहेत.
खरेतर तसा आक्षेप येणार असे मी अपेक्षिलेंच होते.
अजून काही नेमक्या सुधारणा हव्या असतील लेखनात तर कृपया सांगाव्यात.

कर्नलतपस्वी's picture

20 Nov 2021 - 3:16 pm | कर्नलतपस्वी

पात्रता आहे किवां नाही हे स्वताःच म्हणू नका, वाचकांना ठरवू द्या. कोणताही विषय संकलन करून लिहीणे येरागबाळ्याचे काम नाही. लेख उत्तम आहे लिहित रहा प्रतीसाद देतच राहू.