Skip to main content

फटाकेमुक्त दिवाळी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 26/10/2013 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी. फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता. कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 58121
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

In reply to by तिरकीट

अत्यंत आक्रस्ताळी प्रतिसादावर तितकेच संयत उत्तर!!! (बाकी देण्यालायक काही उत्तरच नव्हते तो भाग अलाहिदा :) )

एक मशीन शोधायला हवं जे आसपासची हवा खेचून त्यातले हानिकारक प्रदूषण शोषून घेऊ शकेल. हे मशीन गाडीवर ठेऊन फिरते करता येइल आणि अशी अनेक मशीन जास्त प्रदूषित रस्त्यावर ठेवता येतील. हे मशीन चालवण्याचा खर्च फटाक्यांची किंमत थोडी वाढवून वसूल करता येईल आणि मग ज्यांना फटाके उडवायचे असतील त्यांना ते उडवता येतील आणि प्रदूषणाचे परिणाम कमी होतील. अर्थात बाकीची काही बंधने पाळावीच लागतील, जसे हॉस्पिटल जवळ फटाक्यांचा मोठा आवाज नको.

मला एक कळत नाही कि अंनिसने काहिही आवाहन केले कि लोक 'अंनिस कसे फक्त हिंदूंच्या प्रथांविरुद्ध बोलते आणि ईतर धर्मियांविरुद्ध काहीच करत नाही' असे गळे का काढतात. मुळात हे आर्ग्युमेंटच चुकीचे आहे. अंनिसचे समाजसुधारणेचे काम बरोबर आहे कि चुकीचे असा वाद असु शकतो पण काम हिंदू धर्मातच का असा वाद कसा काय होऊ शकतो. काम जर चांगले आहे तर ते सर्वांसाठीच चांगले आहे आणि वाईट आहे तर सर्वांसाठीच वाईट आहे. तरिही डॉ. दाभोळकरांनी एके ठिकाणी यावर फार छान उत्तर दिले होते. त्याचा थोडक्यात सार असा - १. अंनिस फक्त हिंदूसाठीच काम करते हा गैरसमज आहे. अंनिसने वेळोवेळी ईतर धर्मातील प्रथांविरुद्धही काम केले आहे. (उ.दा. नुकतेच अंनिसने नळदुर्गमधील एका फकिर बाबाचा भंडाफोड केला) २. परंतु तरीही अंनिसचे जास्त (मेजर) काम हिंदु धर्मात चालते कारण अंनिसमधले बरेचशे कार्यकर्ते हिंदू असतात आणि आपल्या आजुबाजूच्या अंधश्रद्धांमुळे व्यथित होऊन अंनिस मधे आलेले असतात. शिवाय भारतात हिंदू बहुसंख्य असल्यामुळे अंनिस कडे येणारी अंधश्रद्धेची प्रकरणेही जास्त हिंदूमधीलच असतात. ३.जर एखादा हिंदू कार्यकर्ता मुस्लिम समाजातील अंधश्रद्धेविरुद्ध काही करायला गेला तर प्रबोधन होणे सोडून दोन धर्मात वितुष्ट येण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे मुस्लिम समाजातुनच पुरोगामी लोकांनी पुढे येऊन त्या धर्मात प्रबोधनाचे काम करावे अशी अपेक्षा आहे. ४. तरिही जर कुणी, बहुसंख्य असलेल्या धर्मातील अंधश्रद्धेविरुद्ध काहि काम करत असेल तर त्यात वाईट काय आहे? जर मी उद्या माझ्या घरातील कचरा झाडू घेऊन साफ करु लागलो तर घरच्यांनी माझं कौतुक करावं की "तुला स्वतःच्याच घरातला कचरा बरा दिसतो रे, बाकी घरात काय उकिरडा आहे तो नाही दिसत" अशी माझी निर्भत्सना करावी? राहिला प्रश्न दिवाळीत फटाके ऊडविण्याला विरोध करण्याचा तर अंनिस ही विवेकवादाची चळवळ आहे. दिवाळीत काही सेकंदाच्या करमणुकीसाठी पैशांचा धूर करणे त्यातुन ध्वनी आणि वायू प्रदुषण करणे, आजारी आणि व्रुद्धांना त्रास देणे हे अविवेकी वागणे आहे आणि म्ह्णून अंनिसचा याला विरोध आहे. (बाकी दाभोळकरांची भर दिवसा हत्या झाल्यानंतरही 'सॉफ्ट टारगेट सारखे' शब्द पाहुन अंमळ करमणुक झाली)

माझी लेक फटाक्यांच्या एवजी बंदुकीचे बार करायला लावते.स्वताच्या कानात कापसाचे बोळे घालुन... बाकी गंमत जाउ द्या पण हीच तर भारताची उर्जा आहे,समाजातल्या जिवंतपणाचे लक्षण आहे,म्हणुनच गरिबातला गरिब देखिल स्वतःच्या मानसिक आनंदासाठी निदान लक्ष्मीपुजनाला तरी एखादा फटाका उडवतोच्,जरा मोकळेपणाने रस्त्यावर फिरा पोर ज्या मस्तीत हे चार दिवस जगतात ना त्याला भेंडी कशाचीच सर येत नाय.बच्चे है यार अभी नही करेंगे तो क्या हम जैसे मिसलपाव पे टाइमपास करेंगे.(दिल तो बच्चा है वाला बाबा पाटील.)

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा हा सनातन प्रभात मधील लेख वाचला. लेख आवडला. लेख पटला. जे विचार पटतात ते पटतात म्हणावे मग ते कोणीही व्यक्त करोत. समजा मला फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावीशी वाटते पण अमुक एका संघटनेने ते सांगितले आहे म्हणुन मी मुद्दाम फटाके वाजवणारच ही भुमिका विवेकी वाटत नाही. असो. प्रगल्भतेची वाटचाल ह्ळू हळूच होत असते.

In reply to by गुलाम

चक्क सनातनकडून असे काही होणे लै आवडले.

वरिल सर्व प्रतिसाद पाहुन दोन्ही बाजु पाहुन टोकच्या भुमिका घेत आहेत असे दिसते. बाबा पाटील, गिरीजा यांचेही मत पट्ते तरी थोडे कमी फटाके उड्वुन प्रदूषण रोखणे शक्य आहे. पण फटाक्या शिवाय दिवाळी साजरी करा असे लहान मुलांना समजवुन सांगणे कठिण आहे. आणि आत्ताच बरे आपण विचर करतो कि लोकांना त्रास किंवा आजारी आणि व्रुद्धांना त्रास होतो. होळी,गणपति, दहिहंडी या वेळी राजकर्णी लोक डी. जे वाजवून आवाज ची पातळी ओलांडतात तेव्हा कुणीच काही बोलत नाही.

मला या निमित्ताने गिरिश कुबेर यांचा लोकसत्तातील पराजयदशमी हा लेख आठवला. विचार करण्याच्या मिती कशा असतात ते वाचायला मिळते.

दिवाळीला जसे पणत्या, रांगोळी व फराळाशिवाय पर्याय नाही तसेच फटाक्यांशिवाय देखील नाही.… मोठ्या आवाजाचे आणि प्रदूषण करणारे फटके न आणता साधी फुलबाजी, भुईचक्र व भुईनळे आणुन आपल्या मुलांसोबत मस्त धमाल करावी… असे मला तरी वाटते.

कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांचा म्हातार्या , आजारी माणसांना , लहान मुलांना किती त्रास होतो हे आपल्याला माहित आहेच. परंतु प्राण्यांना त्यांचा किती त्रास होतो ह्यावरचा १ लेख सकाळ मध्ये वाचला होता. त्यानंतर मी फटके उडवणं सोडून दिलं. आपण मोठ आवाज झाल्यावर कानावर हाथ ठेवू शकतो. पण मांजरींना, कुत्याच्या पिल्लांना , पक्ष्यांना ते सुधा करता येत नाही. कित्येक पक्षी प्राणी ह्या आवाजाने ह्दय विकाराचा झटका येवून मरतात. बहिरे होतात. गोंधळ उडाल्यामुळे गोल गोल फिरत राहतात. पण as usual आपल्याला काय त्यांचं म्हणून कोणी लक्षदी देत नाही. आणि पोरांना जास्त फटाके दिले म्हणजे जास्त प्रेम आहे हा आई वडिलांचा गैरसमज.

In reply to by म्हैस

खूपच घाबरुन जातात बिचारे... आणि माणसांनाही त्रास होतोच. आमच्याकडे फटाक्यांच्या आवाजाने एका आजींचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. आणि हळूहळू खचत त्या गेल्या :(

हया वर्षी मुंबईत ध्वनी आणि वायू प्रदुषणाचे प्रमाण, मागिल कांही वर्षांच्या तुलनेत, कमी आहे. - दूरचित्रवाणीची बातमी.

In reply to by सुहासदवन

माझा प्रतिसाद ह्या धाग्याशी सुसंगत दिवाळीच्या फटाक्यांच्या संदर्भात आहे. इतर आवाजांसाठी वेगळा धागा काढा त्यावर भाष्य करीनच. धन्यवाद.

माझ्यापुरते बोलायचे तर कळते पण वळत नाही!.. बाकी फटाके आणायचे केव्हाच थांबवले आहे मात्र आकाशात जाऊन तयार होणारी फुले आणि अग्नीबाण यांचे आकर्षण काही केल्या जात नाही :)

फटाके वाजवणे कधीच बंद केले आहे. प्रदूषण, कुठेही, कोणतेही वाईटच. मग ते दिवाळीचे असो वा ३१ डिसेंबरचे... आनंदाची गोष्ट म्हणाल तर गोड आवडणार्‍या माणसाला डायबिटीस झाला की कंट्रोल करावंच लागतं. पर्यावरणाचे एवढे प्रश्न असताना तोकडी स्पष्टीकरणे देऊन कसले साजरे करायचे आनंद? रोगाची पथ्यं कुणीतरी पाळली पाहिजेत ना?

यावर्षी खरोखरच फटाके उडविण्याचे प्रमाण कमी झाले आहे असं दिसतंय. बेंगलोर मध्ये ३२ % (This Diwali saw a 32% dip in air pollution ) आणि पुण्यात सुमारे ६५% (फटाक्यांचा बार यंदा 'फुसकाच' - विक्रीमध्ये लक्षणीय घट ) घट झाली आहे. अंनिस सारख्या सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांना अखेर यश येत आहे असे म्हणावे लागेल..

In reply to by गुलाम

यावर्षी खरोखरच फटाके उडविण्याचे प्रमाण कमी झाले आहे असं दिसतंय. महागाई हेच मुख्य कारण असे वाटते.. मी स्वतः १० वी नंतर कधीच फटाके वाजवले नाहीत. यावेळी मुलीने हट्ट केला म्ह्णून फटाके आणायला गेलो होतो. किंमतीबघून माझ्याच डोक्यात भरपूर फटाके वाजले. झाड (रु. १००), चक्र (रु १५०) वगैरे काय वाटेल त्या किंमती होत्या. बोरीवलीसारख्या ठिकाणी स्टॉलवर अत्यल्प गर्दी आणि विक्रेत्यांनी माल खपला जावा म्हणून केलेली अजीजी पाहून "फटाक्यांचे भवितव्य" लक्षात आले. महागाईच्या निम्मित्ताने का होईना, यावेळी प्रदुषण कमी झाले म्हणायचे. अवांतर : बाकी संपुर्ण चातुर्मासात लक्ष्मीपुजन कसे करावे हे वाचत होतो. त्यात "लक्ष्मीचे पुजन झाल्यावर बाहेर जाऊन फटाके फोडावेत" या वाक्यामुळे जाम हसू आले. कदाचित एकाद्या चीनी माणसाने चातुर्मास लिहीले असावे...!!!

In reply to by योगी९००

महागाई या निमित्ताने फटाके उडवणार्‍यांचे प्रमाण कमी झाले ही असेल. पण काही वेळा पैसा आला कि त्यासोबत माज ही येतो. मग तो जिरवण्यासाठी महाग वस्तु घेउन त्याची चैन करणे ही संकल्पना येते. जेवढी म्हणुन वस्तु महाग तेवढे त्याचे माजमूल्य जास्त. शंभर रुपयाच्या नोटात तंबाखू भरुन त्याचा झुरका घेणार्‍या लोकांच्या कथा ऐकल्यात की नाहीत? कथेत पुढे याच लोकांचा दुर्दशेत शेवट होतो.

महागाई ही काय आज एकदम सुरु झालेली नाही. गेली कित्येक वर्षे पाहात आहे. महागाई भडकली, महागाई भडकली असा टाहो फोडतही लोकं सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी सणासुदीला, लग्नसराईत, खास खास मुहूर्तांना सराफाच्या दुकानांत गर्दी करीतच असतात. '१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा सॉलीड लोचा' ह्या धाग्यावर तर तिशीतच गाडी/फ्लॅट घेऊन झाला आहे आणि आता काय करावे असा गहन प्रश्न आहे. लोकांच्या हातात भरपूर पैसा आहे (असावा). १० वर्षांपूर्वीचे उपहारगृहांचे दर आणि होणारी गर्दी आणि आजचे दर आणि होणारी गर्दी दोन सारखेच वाढलेले आहे. कपडेलत्ते, मोबाईल्सची महागडी मॉडेल्स, महागड्या मॉल संस्कृतीला आणि मल्टिप्लेक्सना गिर्‍हाईकांकडून मिळणारा वाढता पाठींबा पाहता फटाक्यांच्या विक्रीत आलेली घट महागाईमुळे नसावी असे वाटते. आमची पिढी आता फटाके उडविण्याच्या वयाबाहेर आहे. तरूण पिढीत आमच्या पिढीइतके फटाक्यांचे आकर्षण उरलेले नाही. आमच्या काळात मनोरंजनाचे मार्ग मोजकेच होते त्यामुळे फटाक्यांमध्ये आनंद शोधला जायचा. हल्ली संगणक आणि मोबाईल गेम्स द्वारे तरूण पिढीला मनोरंजनाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे फटाक्यांचे आकर्षण आहे, पण फार कमी आहे. बाल गोपाळांना शाळेतुन वगैरे ध्वनी आणि वायू प्रदुषणाची कारणे देत फटाके न उडविण्याच्या शपथाबिपथा देवविल्या गेल्या आहेत. ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून फटाक्यांचे प्रमाण घटलेले दिसत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

शिवाय फोडाफोडीची हौस भागवायला मिपा(सारखे)संस्थळ देखील उपलब्ध आहे आज... मग कशाला कोणि उगाच फटाके विकत घेऊन फोडेल :)

या धाग्याला चार वर्षे झाली. या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शपथ दिली हे महत्वाचे आहे. अंनिस ने केलेल्या फटाके मुक्त दिवाली या आवाहनाला दर वर्षी प्रतिसाद वाढतो आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

व्यक्तिगत दहा तरीही ती विनाफटाका दिवाळी साजरी करण्याची तयारी दाखवली आहे तुलनेने कमी प्रमाणात फटाका वापर होतो आहे २५ वर्षांमागे फटाका व्यवसाय केलेला पण गेल्या दहापंधरा वर्षांत फटाक्यांशी फटकुन राहिलेला नाखु

ज्या ज्या कुटुंबांनी स्वयंस्फूर्तीने आपली दिवाळी ही प्रदूषणमुक्त व पर्यावरण पुरक साजरी करुन देशाच्या प्रगतीत, वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात हातभार लावला त्या सर्वांच अभिनंदन! ज्यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचा आदर राखून अंमलबजावणी केली त्यांचही अभिनंदन!

फटाकेमुक्त दिवाळी अगदी लहान वयातच आत्मसात केली आहे. मुलालाही लहानपणापासूनच फटाके आवडत नाही. मात्र देशात वितंडवाद वाढेल म्हणून कृपया राममंदिराचा विषय सोडून द्या / राम खरोखरच होता का ? होता तर देव होता का ? असले उपदेश कोणी करु नका प्लीज. त्यांना योग्य जागी फाट्यावर मारले जाईल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

राम १४ वर्षे वनवास भोगून परत आला तेव्हा दिवाळी साजरी केली जाते असे म्हणतात. आता दिवाळी संपली मात्र राममंदिराचा निकाल येणार आहे. तो संदर्भ पकडून विचारवंत कोठेही उपदेशामृत पाजू शकतात म्हणून हे क नेक्शन. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांनुसार मुंबईतील दिवाळी ही गेल्या १५ वर्षातील सर्वात शांत दिवाळी होती. तुमच्या शहराचे आकडे काय सांगताहेत ?

या धाग्याला आता ७ वर्शे झाली. यावरील प्रतिक्रियांचे आता पुनरावलोकन करा.कालसुसंगत होताना काहींना अतिशय त्रास झाला असेल. सगळेच लोक आपली सनातन मानसिकता वेगाने कशी बदलू शकतील हा प्रश्नही तितकाच रास्त आहे. सनातन प्रभात ने देखील सुरवातीपासून फटाक्यांना आपला विरोध दर्शवला आहे. कारण फटाके हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. कारण काही असो पण अंनिस व सनातन वाले यांचे यावर एकमत आहे.

कोविडमुळे प्राणवायुचे महत्व या दीड दोन वर्षात लोकांना कळले असूनही वायु व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके वाजवले जातात? असा प्रश्न एका सहकार्‍याने विचारला आहे. गोष्ट खरी आहे. पर्यावरणाला निर्विवादपणे घातक असणारी गोष्ट आपल्याला समजत असूनही सुसंस्कृत समजणारे सुद्धा लोक फटाके का वाजवतात. प्राणवायुविना तडफडणारे मृत्यु आपण या काळात पाहिले आहेत, वाचले आहेत, ऐकले आहेत. आमच्या गृहसंकुलात देखील फटाके लक्ष्मीपूजनाला भरपुर उडवले. प्रबोधनाच्या तुलनेत फटाके उडवण्याची उर्मी ही जास्त असावी. फक्त निर्बुद्ध लोकच फटाके उडवतात या मताशी मी सहमत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

जग्गी वासुदेव यांनी फटाक्यांवर सरसकट बंदी असू नये असे प्रतिपादन केले आहे. मुलांपासून त्यांचा आनंद हिरावून घऊ नका. मुलांना दिवाळीत फटाके वाजवू द्या. त्या बदल्यात पालकांनी दोन-तीन दिवस ऑफीस ला जाताना वाहनांचा वापर करु नये आणि प्रदुषण टाळावे असे सांगीतले आहे. या बाबतीत आपले काय मत आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

जास्तीत जास्त प्रबोधन वारंवार करुन हे प्रमाण हळू हळू कमी करता येईल. फक्त निर्बुद्ध लोकच फटाके उडवतात या मताशी मी सहमत नाही. पण सुसंस्कृत लोक सुद्धा उडवताना दिसतात हे पाहून आश्चर्य वाटते हे मात्र खरे. असे का ? याचे विश्लेषण समाजमानसशास्त्रज्ञ चांगले करु शकतील

In reply to by धर्मराजमुटके

फटाक्यामुळेच मुलांना आनंद होतो हे खरे नाही. ते कंडिशनिंग आहे. त्यांना पर्यावरणपुरक योग्य पर्याय दिले तर त्यात सुद्धा आनंद वाटेल उदा. फटाके नको विमाने उडवा हा उपक्रम पुण्यात स्वप्नशिल्प सोसायटीत राबवला आहे. बातमी https://policenama.com/pune-news-dont-firecrackers-fly-planes-a-unique-…

एक ठराविक धर्मातील चाली रितींवरच सतत हल्ले करून प्रबोधनाचा जो खोटा आव इतकी वर्षे आणला जात होता तो आता उघड पडत आहे. त्यामुळे डबल ग्रॅज्युअट असून सुद्धा यावेळेला: 1. तब्येतीला हानिकारक असला तरी भरपूर तेलकट फराळ बनवला आणि खाल्ला. 2. देवाला काहीही नको असले तरी मंदिरात जाऊन देणगी आणि अभिषेक केला. 3. माती खणून काढल्यामुळे वनस्पती आणि सरपटणाऱ्या प्राणी चे नुकसान झाले तरी मोठ्ठा किल्ला केला. 4. आणि भरपूर फटाके आणले आणि उडवले.

खालील लेखन कायप्पावर आले. ते वाचून हतबुद्ध झालो. ---------------------------------- आपले ते पुर्वज ज्यांना रीतसर अग्नी मिळाला नाही - त्यांना तो मिळावा म्हणुन अश्विन अमावास्येला “उल्कादान” नावाचा विधी करतात. काठीवर / लाकडावर / एखाद्या यष्टीवर ज्वालाग्राही पदार्थाचे (जसे तेल, कापूर, लाख, तूप इत्यादी) लेपन करून तो सामंत्रित पेटवतात. आणि पेटून निखारे वर जाणाऱ्या त्या जळत्या काठी/काठ्यांना मंत्र म्हणतांना पुरोहितास दान करतात. या प्रकाशाद्वारे आपण आपल्या अश्या पूर्वजांना मार्ग दाखवतो - ही मान्यता आहे. अश्विन अमावास्या = लक्ष्मीपूजन = दिवाळी फुलबाज्या, पाऊस, रॅाकेट वगैरे आगीला “वर” घेऊन जाणाऱ्या गोष्टी या उल्काच आहेत. या तिथीला (दिवाळीला) अग्नी पेटवून आपण आपल्याच पूर्वजांना अग्नी देत असतो. तस्मात् दिवाळीत फटाके (विशेषत: प्रकाशाचे) आवर्जुन फोडावेत. आपण दिवाळीलाच फटाके का फोडतो, दसऱ्याला किंवा राखीपौर्णिमेला का नाही - याचे पण हेच उत्तर आहे. उल्कादानातील उल्का ही प्रकाशासाठी असते. आम्ही प्रकाशाचे फटाके पितरांना सद्गतीचा मार्ग दाखवण्यासाठी पेटवत असतो. सुतळीबॅाम्ब आम्ही आधी मजा म्हणुन फोडायचो. ते फोडणे कमी केले होते. पण मध्यंतरी फुरोगामी लय माजले आहेत - तर आता आम्ही आवाजी फटाके त्या कारणास्तव फोडतो.आवाजी फटाक्यांचा धर्माशी संबंध नाही - फुरोगाम्यांची जाळणे - हा एकमात्र उद्देश. --------------------------- यावर मी दिलेले उत्तर - "चमनचिडी, नागगोळी वगैरे सुद्धा उल्काच असतात का? रॉकेट, फुलबाज्या वगैरे पेटविताना मंत्र म्हणून पुरोहितांना दान दिले नाही तर पूवजांना अग्नी कसा मिळणार? मुळात माणसाचा मृत्यू झाल्यानंतरचे सर्व विधी मला निरर्थक वाटतात. पार्थिव दहनापूर्वीचे विधी, दहावा-तेराव्या दिवसाचे विधी, कावळा शिवणे, वर्षश्राद्ध यात मला स्वत:ला काहीही अर्थ वाटत नाही. मृतदेहाचे शक्य तितके चांगले अवयव नातेवाईकांनी दान करून मृतदेह नंतर एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला द्यावा असे मला वाटते." ------------------------------ भरपूर फटाके उडवा, फटाक्यांपेक्षा जास्त प्रदूषण वाहनांमुळे होते . . . असे सांगणारे संदेश यावर्षी कायप्पावर येत आहेत.

फटाके वाजवा असे आवाहन करणाऱ्या संदेशांना मी कायप्पावर दिलेले उत्तर - ------------------------------ - फटाक्यांमुळे अतिप्रचंड हवाप्रदूषण व ध्वनिप्रदूषण होते. - प्रचंड कचरा निर्माण होतो. - फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग लागून मालमत्तेचे मोठे नुकसान होते. - फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत अनेकांचे प्राण जातात. - फटाके बालकामगारांकडून बनवून घेतात. वीज, पंखा नसलेल्या अत्यंत भीषण परिस्थितीत ही मुले काम करतात. यातून मुलांना लहान वयातच श्वसनाचे रोग जडतात. फटाक्यांच्या कारखान्याला आग लागून काम करणाऱ्या अनेक मुलांचे प्राण जातात. फटाके हा सर्व दृष्टीने अत्यंत घातक व उपद्रवी प्रकार आहे. फटाक्यांवर संपूर्ण बहिष्कार टाका आणि पर्यावरणहानी, वित्तहानी व मनुष्यहानी थांबवा.

यावेळी अनेक वर्षांनी मी फटाके वाजवले ! माझ्या लेकीने फटाक्यांसाठी माझ्याकडे आग्रह धरला, मग मी तिला म्हंटले की बघ मी तुला २ पर्याय देतो. इतक्या रुपयाची मिठाई किंवा त्याच किंमतीचे फटाके, तुला कोणता पर्याय हवा ? माझ्या या प्रश्नाला तिने, बाबा तुम्ही तुमच्या लहानपणी फटाके वाजवले नाहीत का ? असा प्रतीप्रश्न करुन मला क्षणात निरुत्तर केले ! :) मी फटाके घेतले पण त्यात एक चालाखी केली, २ बॉक्स सुतळी बाँम्ब घेतले [ माझे प्रिय ] आणि पहिला सुतळी बॉम्ब तिलाच पेटायला लावला. :) मोठ्ठा आवाज झाला आणि कंपने निर्माण झाली की आजुबाजुला पार्क केलेल्या गाड्या ट्याव ट्याव आवाज करु लागल्या. तिने या आवाजाची दहशत घेतली आणि बाकीचे बॉम्ब उडवण्यास नकार दिला. मग संध्याकाळी तिला, पाऊस आणि जमीनचक्र फुलबाज्या इ. दिले. याच बरोबर काही आपटीबार देखील दिले. हे मात्र तिला आवडले, आवाजाची दहशत बसल्यानेच पुढच्यावेळी फटाक्याची मागणी कमी होते का ? ते आता पहायचे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।