दगडाचा जन्म देवा, कधी कुणाला नसावा..
कसे जगणे म्हणावे, चटक्यांच्या जगण्याला..
दर्याखोर्यातून कितीदा, देह घरंगळलेला..
किती युगे उलटती, फक्त वाट पाहण्याला..
कुणी लाथ घातलेली.. कुणी उशाला घेतलं..
कुठे पडतांना तुटलं.. कुठं तुटतांना फुटलं..
इतकाल्या दगडांतून, निवडक उचलतात..
अन् रुक्ष आकारातूंन एखादाच घणतात..
छिन्नी-हातोडीचे घण.. टवक्यांना अंत नाही
घाव जागजागी पडती.. त्यात घडते विठाई!
--
दगडाचा देव होतो, त्यात कर्तुत्व कुणाला?
खरा शिल्पकार म्हणतो, दगडाचा गुण झाला!
राघव
[२०२१]
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3829
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान सुंदर !
छिन्नी-हातोडीचे घण.. टवक्यांना अंत नाही घाव जागजागी पडती.. त्यात घडते विठाई!--दगडाचा देव होतो, त्यात कर्तुत्व कुणाला? खरा शिल्पकार म्हणतो, दगडाचा गुण झाला!हे खुप आवडले !धन्यवाद चौकोशेठ!
In reply to छान सुंदर ! by चौथा कोनाडा
मस्त
व्वा छान आहे कविता!
सुरेख कविता..
छान