*वारी- दिवेघाटा मधले एक आगळे वळण...*

एस.बी's picture
एस.बी in जनातलं, मनातलं
17 Jun 2021 - 12:04 pm

*#आषाढी #भक्ती #वारी #आपलीच* *#माती #आपलीच #माणसं*
*#विठ्ठल #मायबाप #माऊली #पावसाळा #देव*

पावसाळा म्हणले की खूप काही असतं ...नुसता प्रेम आणि सौंदर्याचा मोसम नाही तर ह्याच पावसाळ्यात भक्ती रसाच अत्युच्च उदाहरण दाखवणारी पंढरपूर ला जाणारी वारी होय!...
यंदा महामारी मुळे वारी निर्बंध असल्याने हा योग हवा तितका पाहायला तसेच अनुभवायला मिळणार नाही...पण त्यात काहीच मन उदास करून घेण्यासारखे नाही ....
वारी म्हणजे फक्त पंढरपूरला चालत जाणे एवढेच असते का??
त्याचा जीवनातला अर्थ काय ???
याच साऱ्या प्रश्नांमधून एक लघु कथा...

*वारी- दिवेघाटा मधले एक आगळे वळण...*

"व्हाय डींट यू चेक अवर कार व्हेन वी वेअर लिव्हिंग फॉर सोलापूर?????" रॉय शेठनी ड्रायव्हरला जाब विचारला..
ड्रायव्हर पुरता बावरून गेलेला होता,शेठ ची नवी कोरी लांब लचक गाडी दिवे घाटाच्या एका वळणाला मूकपणे स्थिर झाली होती. परदेशी बनावटीची ती गाडी घाटाच्या वेड्यावाकड्या वळणं आणि रस्त्याच्या खाच खळग्यासोबत यथेच्छ भांडून शेवटी गट्टी फू करून बसली होती!!...
" बघ लवकर आजूबाजूला कुठे मेकॅनिक मिळतोय का?" अस म्हणत विक्रांत रॉयने आपला काळा रिबॅन खाली घेऊन आजुबाजुला नजर फिरवली सर्वत्र भगव्या पताका,पांढऱ्या शुभ्र पक्षांचा थवा पाणी प्यायला जमावा तशी मी मी म्हणणाऱ्या वारकऱ्यांच्या गर्दीचा सागर दूरवर पसरला होता...
सारी गर्दी " विठ्ठल विठ्ठल !! " नामाचा जयघोष करत,रस्त्याची एक बाजू धरून ,पताका हेलकावत, वीणा मृदुंगाच्या घोषात मार्ग कापत होती.

"काय रे ...निवडणुका वगैरे आहेत का पुण्याच्या?? एवढे लोक झेंडे कसले घेऊन चालले आहेत ?? इंडिया मध्ये ना सारखे पॉलिटिक्स सुरूच असते तुम्हा लोकांचे!!! कधी स्टेट साठी तर कधी व्हीलेज साठी ...काही सुद्धा ऑर्गनायझड नसतं इथे ...कधी पण कुठले पण सरकार पडते अन निवडणुका सुरू होतात!!!" रॉय शेठ ने विचारलेला प्रश्न ऐकून ड्रायव्हरला क्षणभर हसूच आले," काय शाणा शेठ आहे आमचा!! वारी आणि प्रचार यातला फरक पण कळत न्हाई का ह्याला??कसा समजील?? ह्येचा पाळणा हलला असल बहुतेक तकडं लंडनच्या पुलावर!! ह्येला काय माहिती असायची!!" क्षणभर तो गाडीच्या इंजिनासोबत झटापट करता स्वतच्या विचारात हरवून गेला होता. " काय रे ? काय म्हणतो मी?" रॉयच्या ह्या प्रश्नाने त्याला भानावर आणले ," न्हाई सर ह्ये इलेक्शन न्हाई वारी आहे वारी!! ह्या वक्ता ला समदी वारकरी देहू न आळंदी वरनं पंढरपुरा स चालतं जात्यात!!!माऊलीच्या दर्शनाला!!! त्ये बगा त्या तिकडं टोकाला पालख्या हायेत आता येतील बगा धा मिनटात आपल्यापाशी!!!!" त्याने लगबगीने उत्तर दिले.
"ओह येस ....येस.... पपा आल्वेज स्पोक अबाऊट समथिंग वारी अँड हाऊ ही वॉन्टेड टू गो देअर फॉर वन लास्ट टाईम!!!" विक्रांत बोलता बोलता आठवणीत हरवून गेला..
त्याला त्याचे अन त्याच्या बापाचे बोलणं आठवू लागलं...

" पोरा...आज तुला आयुष्याच्या वाटेवर प्रचंड यशस्वी झालेले बघताना मला माझ्या माऊलीची पावलं आठवतात रे ..एवढासा होतास तू !! नुकताच जन्माला आला होता तू अन तुझी आई बाळंत व्याधीमूळे बिछान्यात खिळून पडली होती..डॉक्टर वैद्य सर्वांनी आशा सोडली होती तिची...तुला घेऊन माऊलीच्या पायावर ठेवलं मी प्रार्थना नव्हे तर धमकी दिली त्या पांडुरंगाला !!! माऊली ह्या लेकराला आई वेगळं करू नकोस ...वाटल्यास बदली म्हणून माझा जीव घे पण ह्याचा पदर हिरावू नकोस!!! जर अस करणारच असशील तर हा गेल्या १० पिढ्यांचा वारकरी वंश असलेला मी तुला सांगुन ठेवतो की माझ्या पोराला घेऊन तुझ्या गावाच्या काय देशाच्या बाहेर जाईल ... वारकऱ्याचा वसा खंडित करून जाईल ...अन पुन्हा म्हणून तुझ्या वारीला येणार नाही!!! पण त्याला दया नाही आली ..तुला अन मला पोरका करून त्याने माझी तुळस त्याच्या वृंदावनात लावण्यासाठी खुडून नेली रे पोरा!!! त्याक्षणी पंढरपूर सोडलं आणि मुंबईला येऊन गोदी मधल्या परदेशी मालवाहू जहाजावर काम करायचं पत्करले अन तसाच इकडे अमेरिकेत आलो .परत जायचच नाही म्हणून तेंव्हाच ठरवलं होतं ,मागचे काय ऋणानुबंध सुद्धा नकोत म्हणून अगदी आडनाव रुईकर होतं आपलं ते रॉय करून सोयरे धायरे पण बदलले तेंव्हा पासून मागे वळून काही पहिलेच नाही बघ!!..दिवसेंदिवस प्रगती आणि श्रीमंती वाढतच गेली...तुझं पण शिक्षण आणि त्यानंतर आपला व्यवसाय तू लीलया हाती घेतलास आणि त्यात अजून समृद्धी आणलीस ...सगळं काय मिळवलं आपल्या कुटुंबाने पण त्या माऊलीने मी तिच्यावर धरला तसा तुझा न माझा राग नाही धरला हे आता समजतंय मला .. मला जाऊन त्या माऊलीची पावलं पहायचं मन करतय रे !!...पण आता वयोवृध्द शरीर परवानगी देत नाही रे मला माझ्या माउली ला भेटायला ..."

तेंव्हा थोडं वाटलं होत विक्रांतला की चौकशी करावी काय आहे हे वारी ?? कधी असतं, पप्पा ना घेऊन जाता येईल का...पण त्यावेळी इंडिया मध्ये covid ची मोठी वेव्ह धुमाकूळ घालत होती....रोज नुसते प्रचंड वाढ होणारे आकडे...न मिळणारे बेड....ऑक्सिजन चा अभाव....ह्या सगळ्यांचा नुसता मारा सुरु होता सोशल मीडिया आणि न्यूज वरती .. ते सगळे बघून सारा ही प्रचंड धास्तावलेली होती..."see vikrant ..i know that dad wants to go india for visiting some god's temple about which he is so passionate,now its not possible due to this pandemic!!! you must say no to him!!!"

एकीकडे सारा चे प्रेमाने धास्तावलेले मन अन बापाची तगमग त्याला पाहवत नव्हती....अशातच बापाचं आजारपण कोमात मध्ये बदललं आणि त्याची मागणी पण काही काळासाठी थांबली आणि तेंव्हापासून त्याच्या डोक्यातून हे वारी वगैरे सर्व प्रकार कधी गायब झाले त्यालाच कळले नाही ..

पण आज एका बिझनेस प्लस पॉलिटिकल मीटिंग साठी त्याला सोलापूरला जायचं होत त्यासाठी त्याने पुणे एअरपोर्ट वरच केअरटेकर ला सांगून आपल्या पुण्यातल्या बंगल्यावरून त्याची आवडती कार मागवून घेतली होती आणि फ्लाईट चा कंटाळा घालवण्यासाठी ड्रायव्हर सोबत पाठवायला सांगितली होती.
पण ऐन वेळी घाटा मध्ये गाडी बिघडली आणि वारी सोबत त्याचा सामना झाला अन् सारं काही सगळं पुन्हा त्याच्या डोक्यात रुंजी घालू लागलं.
" बोला विठोबा रखुमाई !!! गाडी बिघाडली की काय माऊली??? का पालखीच्या दर्शनाला थांबलायसा जनु??" कोणीतरी आपल्यासमोर उभे राहून आपल्याला काहीतरी विचारतं आहे याची जाणीव त्याला झाली. हे फार विचित्र असतं आपण कोणत्या तरी वेगळ्याच तंद्रीत असतो अन समोरचा काहीतरी विचारतो अन आपण वेंधळ्या सारखा आ वासून त्याच्याकडे बघत राहतो .
डोक्यावर केशरी पागोटं,पिवळ्या मातकट रंगाचा सदरा अन पायजमा ,गळ्यात तुळशीची माळ, हातात एकतारी वीणा अन रापलेल्या चेहऱ्यावर असंख्य जाळी जळमट्या सारखी नक्षी, अन त्या कपाळावरच्या नक्षी मध्ये वाळून पापडी आलेल्या चंदनाचा टिळा लेवून एक म्हातारा त्याच्याकडे अन गाडी कडे बघत मिश्किल नजरेनं पाहत होता.
" ओह येस येस....गाडी बिघडली माझी ...आता ड्रायव्हर गेलाय मेकॅनिक आणायला तो पर्यंत थांबलोय इथे."विक्रांत उत्तरला.
"चला मंग पालखी संग, दिवेघाट वलांडला की पुढं सासवडच्या अल्याड भेटल बगा येखादा ग्यारेज वाला तेव्हढीच माऊलीची पालखीची सेवा घडल तुमच्याकडनं!"

" नाही नको...मला चालत नाही असलं काही ...तुम्ही जाऊ शकता बाबा पुढं मी इथेच थांबेल! " विक्रांत च्या मनात कसली अढ होती त्यालाच समजत नव्हते तरी पण कसलीतरी जाणीव त्याला पालखीसोबत जायला अडवत होती.
" चालत न्हाई??? आं‌...अव माऊली समद्या जगासनी चालवत असती...अन ती तुमास्नी चालत न्हाई म्हंता व्हय??!!" म्हातारा हसत हसत म्हणाला," तुमाला पालखी संग आणायचं माऊलीच्या मनात आसनार म्हून तुमची गाडी बंद पडली बगा इथ! आता तुमचा डायवर येस्तो पतुर येकटं नगा थांबू सांच्या टेमाला ..चला बगु घाटाच्या पल्याड गावं हायती तिथं पालखीचं मुक्काम व्हणार हैत तितच तुमी बी थांबा."
त्याच्या आग्रहाने की त्याच्या मंत्रोच्चार सारख्या लयीत बोलण्याच्या लकबी ने नक्की कशाने ते सांगता नसतं आलं विक्रांत ला पण तो भाळल्या सारखा "ठीक आहे बाबा चला येतो",म्हणाला.
आजू बाजूचे वारकरी आणि तो म्हातारा सर्व एक सारखे कपड्यात अन विक्रांत मात्र कडक इस्त्रीच्या सुटा बुटात होता,निळ्याशार आकाशात सफेद कापसाच्या ढगांची ही भली मोठी गर्दी असावी अन त्यात एकच करड्या रंगाचा ढग असावा असं काही दिसत होतं ते.अशीच गप्प राहून ,म्हाताऱ्याच्या विणेचा झंकार ऐकत ऐकत घाटाची २-३ वळणे पार पडली अन हळू हळू विक्रांत ला वारीचं अवलोकन करत करत काही विचारावेसे वाटू लागलं अन नेमकी हीच त्याची भावमुद्रा म्हाताऱ्याने हेरली आणि म्हणाला," माऊली काय मनात ठीवू नगा काय इचारू वाटतं तर इचारा...."

आणि विक्रांत ला कंठ फुटला," नाही कशा साठी करायचं आहे हे सर्व ...आता हे सगळे लोक कुठ जाणार आहेत ..ह्या वयात परवडणार आहे का हे सगळं??? स्वतच्या घरी सर्व नात्या गोत्याना सोडून कसल्या यात्रा करता आहेत तुम्ही सारी लोकं???
तुम्हाला माहिती तरी आहे का तुमच्या घरी काय सुरू आहे आता कोण आजारी आहे ? तुमची बायको पोरं नातेवाईक ह्यांना तिकडे सोडून तुम्ही इथे रस्त्यावर अनोळखी माणसासोबत गप्पा काय मारत त्याला काय सल्ले देताय ?? की मनात काय ठेवू नकोस म्हणून!!!!?????"
बापाची सारी तडफड त्याला आठवत होती... कोमात जायच्या अगोदर ," माऊली !!! माऊली !!! " म्हणून रात्र रात्र भर मारलेल्या आर्त हाका आता त्याला स्पष्टपणे ऐकू येऊ लागल्या होत्या.बापाची तडफड अन ह्या म्हाताऱ्या च्या चेहऱ्यावरचं प्रचंड समाधान याची सांगड त्याला घालता येत नव्हती अन त्यात हे समाधान आपण आपल्या बापाला का नाही देऊ शकत याची त्याला खंत भासत होती.

"रागवू नकोस रं पोरा... माजी बी पोरं हायेत कदी कुनी रागाला जातं तर कुनी गुणगान गात्यात पण मला न्हाई चालत
त्येंच्या वनी वागून ..तू बी तसाच हायेस पन मला काय न्हाई वाटणार तू बोललास म्हून ... तुज्या मनातलं सांगतुया ना तू... आतला वघळ असाच फवाऱ्या गत उसळून भायेर आला पायजेल नाई तर त्येच डबकं व्हायला येळ न्हाई लागत बग!!!!",हे बोलताना म्हातारा शांतपणे त्याच्याकडे निरखून बघत होता.

" आता तुजी तक्रार हाय ना त्येचा जबाब बी आईक..ह्ये समदी वारीत कशाला जातेत ,त्यांचं कूनी न्हाई का??? त्यांना कुनाची मया न्हाई का??? एवढं वय झालं तर कशाला जातेत वारीला???......माझी माउलींनी कदीच कुनास्नी न्हाई सांगितलं की अमक्या तमक्या वयातच वारीला जाता येतं...कोणत्या बी वयात जाता येतं पोरा वारीला...पण जवानीत न्हाई सुचत कोनाला वारी... समद्या ना परपंच ,शिक्ष्यान, पोरं बाळं , कपडा लत्ता, जमीन जुमला , बंगल जमवायचं असत्यात...तवा वरीसभरात येकदा बी न्हाई जात कोणी गावतल्या मंदिरात बी....वारी तर लई लांब राहिली मग...
अन् अस नग म्हणुस की वारी केलीच पायजेल का...न्हाई तू तुज्या जबाबदाऱ्या पार पाडतुया तवा माझ्या सारखा वारी ला जातू म्हून समाधानी असशिला ना तर तूजी वारी घरीच झाली म्हून समज...माऊली म्हनजी आय अस्ती पोरांची...आय चं काय म्हणन असतं पोरं मोठी झाली,शिरीमंत झाली,निरोगी रायली तर बस झालं र तिला ..मग तुमी पोरं थेट तिच्या मातीला जरी उगिवलास तर त्या माऊलीची माती बी फुलं उगवून द्याला बगल तुमाला...!!! वयाच काय असतं ल्येकरा...तू १६ वर्साचा असताना किती बी जोशात असला तरी १६ वर्साचा तू फकस्त ३६५ दिस राहशील नंतर तूजी थोडी कमी व्हणार ताकद...जाणारी माणसं १९ वर्सी बी मिसरूड फुटायच्या अगोदर जात्यात...मग जाणाऱ्या च दुःख मानून न्हाई चालत बग आविष्यात...कोण ग्येल त्यापेक्षा कोण वाचलं त्येच्याकडे बगून चालायचं समद्यानी...आता ह्येच बग बरं आपून हिथ गप्पा मारत बसलू अन मग पालखी थांबली का तूज्या साठी न माझ्या साठी ???? न्हाई ना???ती ग्येली म्होरच्या वळणाला...!!!
वारी म्हंजी काय त्ये खर सांगू का तुला???????" असं म्हाताऱ्याने विक्रांत ला पताकेचा आधार घेत उभा राहताना विचारलं.
लहानपणी बाबा च्या कुशीत गोष्टी ऐकताना.. हं हं करत हुंकार देताना बाबा जेंव्हा विचारायचे की," विकू झोप आली का रे?? की ऐकायची पुढे गोष्ट?? " तेंव्हाच्याच तत्परतेने विक्रांत उत्तरला," सांगा ...मला समजून घ्यायचं आहे नक्की वारी म्हणजे काय ते????"

" आईक पोरा... वारी म्हंजी तुज आयुष्य हाये....त्यात कसलीच खात्री न्हाई दिली माऊली न ...पण निर्णय कंचा घ्येयचा ह्ये माऊलीन तुज्या वर सोपवल हाये...काय योजना अखु नगुस...भायेर पड...जगात फिर...पाय चालवतेत तवर जग बगून घ्ये.... कोनावर बी माया , पिरेम दाखीवताना हात अखडू नगुस ... तुज ल्येकरू ल्हान असताना जेवढं पिरेम करशील तेवढच पिरेम त्ये लेकरू मोठं व्हून घरट्याच्या भायेर जाईल तेव्हा न्हाई करता येत .. लहान असतानाच त्येची माया कर... त्येच तुजी वारी हाये....
जवा ६०-७० चा असशील अन...आजू बाजूला बगशील तर तुला दिसल की समदी कोडी तशीच हायेत...तू समद आयुष्य खर्च क्येलं पन येक बी कोडं सुटलं न्हाई ...उलट तुजी पोरं बाळं तीच सगळी कोडी त्यांचं आयुष्य खर्चून सोडवायला बगत असतील अन तू किती बी वरडून सांगितलं तरी बी त्येंचा कोड्याचा नाद सुटत नस्तू ...मग ती लहान असताना त्यांनी तुला कोडी सोडून देताना बगितल असल तरच तितच तुजी वारी झाली बग....
चामडी,हाड,रक्त मांस कोना साठी म्हून थांबत न्हाई ...समद्या जीवांची वारी त्या माऊलीने जनमाला घातलं ना तवाच सुरू व्हती....अन त्येच समद्यांच पयले धेय असलं पायजे ....ह्ये सगळं क्येल तर मग माऊली तुज्या कड येईल पुंडलिकाच्या घरला आली व्हती तशी......!!!!!!!"
म्हाताऱ्याच्या डोळ्यातून अखंड सरी वाहत होत्या...थरथरत्या आवाजातले जणू माफी मागणारे त्याचे शब्द त्या म्हाताऱ्याने फार काहीतरी महत्वाचं गमावल्यासारखी जाणीव विक्रांतला करून देत होते...
त्याला काही बोलावं तेच सुचत नव्हतं...

तेवढ्यात "प्यें ऽप्यें ऽप्यें ऽ" करत त्याची गाडी वळणा समोर येऊन थांबली...ड्रायव्हर गाडीतून उतरून विक्रांत च्या हातात मोबाईल देत म्हणाला." सर हिकड कुट आला तुमी चालत चालत....मी येत होतो की कार घ्येऊन ....अन गाडीत कवा पासून तुमचा फोन रिंग करतुया..."
विक्रांत ने पाहिले सारा चे ५-६ मिस्ड कॉल होते...पप्पांच्या हॉस्पिटल चे पण ५-६ मिस्ड कॉल होते!!!....
त्याच्या मनात धडधड होऊ लागली कारण सारा तो इंडिया ला यायला निघाला तेंव्हा ९ व्या महिन्याची गरोदर होती...अन पप्पा तर खूप दिवसांपासून कोमा स्टेज मध्ये होते...
त्याने सारा ला फोन लावला आणि तिकडून सारा आनंदी स्वरात त्याला सांगू लागली," विकी ...तुला विश्वास बसणार नाही....आज खरेच मिरॅकल डे आहे.... तुझे बाबा आज कोमातून बाहेर आले आहेत ...अन आपण दोघे पण सुंदर अशा बेबी बॉय चे ममी पापा झालो आहोत ....बाबा सोबत मगाशी मी व्हिडिओ कॉन्फरन्स ने बोलली होती तेंव्हा तुला ही कॉल करत होतो पण लागला नाही कॉल!!!....आहेस कुठे तू???? सोलापूरला पोचलास का....बिझनेस डील कशी झाली....?? आणि हो बाबा विचारात होते तुझ्याबद्दल ...आता थोड्या वेळाने परत जर कॉल मिस झाला इन केस नेटवर्क वगैरे मुळे तर काही मेसेज देऊ बाबांना....????" हे सारं ऐकताना विक्रांतला भरून आल्यासारखं होऊ लागलं...त्या म्हाताऱ्याचे शब्द," तुज घरच तुजी वारी हाये पोरा...." हे सतत ऐकू येऊ लागलं ..म्हणून त्याने ज्या झाडाखाली तो म्हातारा अन तो गप्पा मारत बसले होते तिकडे पाहिलं...तर तिथे कोणीच नव्हतं....त्याला धक्काच बसला...."एक मिनिट सारा!!!" अन ड्रायव्हर कडे वळून त्याने ड्रायव्हरला विचारले"अरे इथे एक म्हातारा होता ना तू गाडी घेऊन आला तेंव्हा माझ्या सोबत....आता कुठे गेला तो....तू पाहिलास का त्याला जाताना???? तो तर चालत होता...फार लांब नसेल गेला...त्याला गाडीत घेऊन जाऊयात माझ्या मुळे त्याची पालखी लांब पर्यंत गेली असेल...."
"नाही शेठ मी आलो तेंव्हा इथे कोन बी नव्हतं ... तुमी एकटेच झाडाखाली बसले होते....हा सोबत कोणतरी हाये की काय असेच बसले होते ....पण सोबत नव्हतं कुनी बी!..."
विक्रांतला काय बोलावं तेच समजत नव्हतं....ह्याला साक्षात्कार की चमत्कार म्हणावं ते ही त्याला कळत नव्हतं....काही क्षणातच त्याच्या वर अविश्वसनीय अशा गोष्टी सोबत त्याचा सामना होत होता....
" अरे सांग ना ....तिकडे नेटवर्क खूप कमी आहे रे....बाबा चा कॉल आला तर काय सांगू तुझ्याकडुन त्यांना??? " सारा विचारत होती....
विक्रांत ने दीर्घ श्वास घेतला अन तो शांत पणे म्हणाला," सारा मी आता परत येतोय घरी....बिझनेस डील नंतर करता येईल ..आणि बाबांना सांग की आपल्याला जो मुलगा झाला आहे....त्याच नाव मी ," पांडुरंग " ठेवणार आहे....".

लेखक
©शैलेश भोसले (एस बी)

(कथा योग्य तिथे नामोल्लेख करून शेअर करावी)

बोला सर्व ,"जय जय विठोबा रखमाई....जय जय विठोबा रखमाई...."
समस्त वारकरी संप्रदाय यांच्या चरणी भक्तिभावाने अर्पित!!!!!!!!

kathaa

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2021 - 1:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कथा वाचली. कथेची मांडणी विस्कळीत वाटत असली तरी लेखातील भावना पोहचल्या. बाकी, 'वारी' शब्दातच एक मोठा पट डोळ्यासमोर उभा राहतो. एकदा तरी अनुभवावी अशी ती गोष्ट. संत श्रेष्ठ, तुकोबा म्हणतात.

उदंड पाहिले उदंड ऐकिले | उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ||
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर | ऐसा विटेवर देव कोठे ||

-दिलीप बिरुटे
(मिपा वारकरी)

एस.बी's picture

17 Jun 2021 - 1:13 pm | एस.बी

आभारी आहे सर...मी लेखन करण्यात नवखा असल्याने कथा विस्कळीत वाटत असेल तर कृपया असा विस्कळीतपणा कमी व्हावा म्हणून योग्य त्या सुधारणा सुचवाव्यात ही विनंति...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2021 - 1:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपण चांगलं लिहिता. पण, पाहता क्षणी प्रेमात पडावं तसं पहिल्या काही ओळीतच वाचकांची पकड बसावी अशी सुरुवात असायला पाहिजे. आपण दोन-चार ओळीचं प्रास्ताविक लिहिलं, त्या पेक्षा थेट सुरुवात व्हावी. वाचकांना काय सांगायचं, कसं सांगायचं ते थेट लेखनातूनच. लेखनात वारीकाळातील दिवेघाटाचं एखादं छायाचित्रही डकवलं तरी चाललं असतं. लेखनात आलेले हॅशटॅग, चांदण्या, अतिरिक्त उद्वारवाचक चिन्ह. टींबटींब, हे कमी करुन वाक्यांची व्यवस्थित मांडणी जर करत गेला तर उतम लेखन होईल असे वाटते. अर्थात सरावाने ते येत जाईल. अर्थात ही माझी मतं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jun 2021 - 1:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

छान लिहीले आहे...
गोष्ट आवडली पण बिरुटे सर म्हणाले तशी विस्कळीत वाटली, मधेच कोविड चा उल्लेख ही खटकला.
पैजारबुवा,

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ।१।
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देई मज प्रेम सर्वकाळ ।२।
विठो माउलिये हाचि वर देई । संचरोनि राहीं ह्रदयामाजीं ।३।
तुका म्हणे काही न मागे आणिक । तुझें पायीं सुख सर्व आहे ।४।

गुल्लू दादा's picture

17 Jun 2021 - 3:13 pm | गुल्लू दादा

आवडलं. लिहीत रहा.

कॉमी's picture

17 Jun 2021 - 4:09 pm | कॉमी

पण म्हातारबाबा विठ्ठल आहेत लगेच समजलं. हा ट्विस्ट एकदम जुना आहे. काहीवेळेस काही ट्विस्ट नसणे हा मोठा ट्विस्ट असतो.

गारंबीचा बापू'मध्ये बापूंनी तिकडे पंचक्रोशीत कायकाय करून ठेवलं आहे! हे पहिल्या पानावरच बहुतेक आहे ना? त्याने काय केले हे पुढे उलगडत जाणारच आणि वाचकांना समजणार. पण 'वाचकहो' अशी मध्येच हाक आली की वाचक खाडकन भानावर येऊनआसुद,दापोली सोडून धाडकन खुर्चीत आदळतो.
-------------
( बऱ्याच वर्षंपूर्वी वाचली गारंबीचा त्यामुळे पक्के आठवत नाही. पण कादंबरी तशीच रेटून वाचली कारण तो त्या परिसराचा सामाजिक इतिहास आहे. )

MipaPremiYogesh's picture

17 Jun 2021 - 5:32 pm | MipaPremiYogesh

खूप सुंदर कथा..

सौंदाळा's picture

18 Jun 2021 - 5:28 pm | सौंदाळा

छान आहे कथा
येत चला, लिहित रहा