आज काय घडले... फाल्गुन व.६ संतवर्य एकनाथांचा जलप्रवेश !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 10:34 am

eaknath

शके १५२१ विकारी नाम संवत्सरी फाल्गुन व. ६ रविवारी अविंधमय होऊ पाहणाऱ्या महाराष्ट्राला शांति, औदार्य, समता, भूतदया, इत्यादि दैवी गुणांनी प्रसिद्ध होऊन सर्वभूती भगवद्भावाची शिकवण देणारे श्रेष्ठ पुरुष
एकनाथ यांनी दक्षिणच्या काशीस म्हणजे पैठणास जलप्रवेश करून अवतारकार्य संपविले.

याच फाल्गुन व.६ ला एकनाथचरित्रांत फार महत्त्व आहे. कारण एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामी यांचा जन्म, जनार्दनस्वामीस दत्तदर्शन, जनार्दनस्वामींचा नाथांवर अनुग्रह, जनार्दनस्वामींचा देहत्याग, आणि नाथांचे
निर्याण या सर्व गोष्टी या एकाच तिथीला झाल्या असल्यामुळे ही तिथि भाविक लोकांत विख्यात होऊन बसली आहे. एकनाथस्वामींच्या भागवत, भावार्थरामायण, इत्यादि ग्रंथांवर महाराष्ट्रीय जनतेचे अलोट प्रेम आहे. त्यांची भजनी भारुडें आजहि लोक आवडीने गातात. ज्ञानेश्वरी लुप्त होण्याच्या मार्गाला
लागली होती ती ज्ञानदेवांच्याच प्रेरणेने संशोधून तिचा प्रसार नाथांनी महाराष्ट्रदेशभर केला. समाजसुधारक म्हणूनहि एकनाथांची ख्याति आहे. भक्तीच्या प्रांतांतच नव्हे तर एरवींहि स्पृश्यास्पृश्य भेद उरता कामा नये हे तत्त्व त्यांनी अनेकांचा-विशेषतः स्वतःच्या पुत्राचा-रोष पत्करून आपल्या आचरणांत उतरवून दाखविलें.

आणि--" तो नाथांचा वाडा, ती पूजेताल कृष्णमूर्ति, तो नाथद्वारीचा रांजण, अखंड अन्नदान व ज्ञानदान यांनी पावन झालेला तो सभामंडप, नाथांच्या अद्भुत शांतीने शरण येणाऱ्या यवनाची ती देवडी, नाथांच्या कीर्तनश्रवणाने सन्मार्गाला लागणाऱ्या 'पिंगला वेश्येची' ती माडी, पितरांसाठी केलेल्या श्राद्धान्नाने तृप्त केलेला ते अंत्यजांचे वसतीस्थान, कर्मठांच्या संतोषासाठी नाथांनी
घेतलेली प्रायश्चित्ते, शास्त्रीपंडितांपासून तो शूद्रातिशूद्रांपर्यंत सर्वांच्या उद्धारार्थ अहर्निश केलेले उद्योग या नाथांच्या अलौकिक भूताराधनयज्ञामुळे दीड सहस्र वर्ष विद्यापीठ म्हणून गाजलेल्या पैठणास नाथांनी स्वगुणांनी धर्मपीठाच्या योग्यतेस चढविलें."
२५ फेब्रुवारी १६००

इतिहासलेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2021 - 12:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या शहराजवळील, प्रसिद्ध असलेल्या देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार असलेले जनार्दन स्वामी हे एकनाथांचे गुरु. खरं तर, एकनाथांचं आयुष्य आपल्याला खुप मोठी शिकवण देते. कोणा टवाळांच्या सांगण्यावरुन एक व्यक्ती संत एकनाथांच्या अंगावर १०८ वेळा थुंकला, पण एकनाथांना क्रोध आला नाही. उलट पान खाल्ल्याने तुझं तोंड आलं असेल तर तुला मधाचं चाटण देतो, म्हणजे तुझा दाह कमी होईल असे ते म्हणाले. काय तो संयम आणि अहिंसेचा सत्याग्रह.

आपण मिपाकरांनी त्यांच्या बोधकथेतून काही शिकवण घेतली पाहिजे.

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

10 Apr 2021 - 5:13 pm | प्रसाद गोडबोले

मी एकदा किवाम पान खाऊन १०८ वेळा थुंकण्याचा प्रयत्न केलेला पण १० १२ नंतर तोंड कोरडे पडते . अर्थात १०८ वेळा थुंकायचे असेल तर १०-१२ पाने खावे लागतील , अन तेवढी खाल्ली तर भिंगरीच होईल!
तस्मात ही कथा काल्पनिक अख्यायिका वाटते !

बाकी संतांच्या कोणत्याच वर्तणुकीतुन बोध घेऊ नये, बहुतांश संत हे ट्रान्सेंडेड , अर्थात परे गेलेले असतात , मिपावर एक निराकार गुर्देव सोडले कोणी सिद्ध संत असल्याचे आमच्या तरी ऐकीवात नाही. मिपावर जरा नुसतं मोदीतलं मो म्हणलं की पित्त खवळणारी माणसे आहेत , त्यांना नाही जमणार एकनाथांचा ह्या काल्पनिक कथेतुन बोध घ्यायला ;)

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2021 - 5:15 pm | चौथा कोनाडा

मिपावर एक निराकार गुर्देव

कोण ते ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2021 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तस्मात ही कथा काल्पनिक अख्यायिका वाटते !

सदरील कथा सत्य असल्याचा माझा दावा नाही. पण संत एकनाथांबद्दल ज्या आख्यायिका सांगितल्या जातात, त्यात हे येतं.
कधी काही संदर्भ मिळालेत काही तर इथे डकवीन. निळोबांच्या एका अभंगात उल्लेख सापडला तो असा.

''यवन अंगावरी थुंकला । प्रसाद देवुनी मुक्‍त केला ॥
निळा शरण तुमच्या पाया । अनन्यभावे नाथराया.

-दिलीप बिरुटे