गुंतवणूक ह्या विषयावरील माझे सर्व ज्ञान स्वानुभवाचे ज्ञान आहे. MBA फायनान्स ची मी सुरुवात केली होती पण २ महिन्यात सोडून दिली. ह्यांत टिप्स आणि ट्रिक्स नसून गुंतवणुकीचे तत्वज्ञान मांडले आहे आणि स्वानुभवाने ते मी कसे प्राप्त केले ह्यांचे किस्से लिहिले आहेत. सिरियसली घेऊ नये.
बचत ह्या विषयावर जास्त विचार करण्याआधी खर्च ह्यावर जास्त चिंतन करायला पाहिजे. खर्च नेहमीच कमी करावा असे काही लोक समजतात. दुर्दैवाने हे खरे नाही. कुठेही अति करू नये तसेच योग्य वेळेस फाटलेला कापड शिवला नाही तर काही वेळाने तो चिंधी होतो हे सुद्धा खरे आहे.
खर्चाचे अनेक प्रकार असतात.
- अनुभवावरील खर्च. - प्रवास, डिनर, चित्रपट वगैरे.
- वस्तूवरील खर्च - टीव्ही घेणे, कपडे घेणे.
- लायेबिलिटी वाढवणारे खर्च (म्हणजे एकदा घेऊन होत नाही ह्यावर पुन्हा पुन्हा खर्च करायला पाहिजे) : घर, गाडी, मुले, लग्न इत्यादी.
- गुंतवणूक म्हणून दुहेरी बाजू असणारे खर्च : घर , शिक्षण, व्यवसायाला लागणारे साधन इत्यादी.
- अनपेक्षित खर्च : आरोग्य, आईवडिलानाच्या आरोग्यावरील खर्च इत्यादी.
- धर्मादायी खर्च.
हे सर्व खर्च तारतम्य दाखवून केले तर त्यातून बरीच बचत होते. आणि बचत केलेला प्रत्येक रुपया हा एका अर्थाने तुम्ही नवीन कमावलेला रुपया असतो.
अनुभवावरील खर्च :
माझ्या मते हा सर्वांत महत्वाचा खर्च आहे. पृथ्वीवर आपले अस्तित्व मर्यादित काळापर्यंत आहे. आपल्या जीवनाची सांगता कुना कॉर्पोरट ऑफिसांत खर्डेघाशी करत राहण्यात किंवा गिर्हाईकाशी हुज्जत घालण्यात नाही. उलट आपली करमणूक, आपल्या प्रियजनासोबत वेळ घालविणे ह्यांत आहे. त्यामुळे ह्या गोष्टीवर आपण चांगला खर्च करत आहो कि नाही ह्यावर नेहमीच नजर ठेवावी. काही परिवाराला कधी शहराबाहेर घेऊन जात नाहीत पण मारताना बँकेत लक्षावधी रुपये ठेवून मरतात.
वाचायला पुस्तके, पर्यटन, पाहायला चित्रपट, प्रियजनांना भेटवस्तू, बाहेर डिनर ह्या गोष्टी प्रमाणात कराव्यात. त्याशिवाय हे पैसे फक्त आपण आपल्यावरच खर्च न करता इतर लोकांवर सुद्धा कराव्यात त्यामुळे सर्वच अनुभव द्विगुणित होतो. अनेक वेळी मंडळी "ती युरोप टूर वर गेली म्हणून मला सुद्धा जायला पाहिजे" अश्या प्रकाराने खर्च करतात. असे कधीही करू नये. उलट जास्त लोक घेत नाहीत असे अनुभव आपण घेतल्यास त्याची मजा और असते आणि तिथे पैश्यांची बचत सुद्धा होते. उदाहरण म्हणजे पुस्तके विकत घेऊन वाचण्याऐवजी लायब्रेरीत जाऊन वाचल्यास स्वस्त पडतात आणि इतर वाचकांची ओळख होते. पुस्तके विकत घेतल्यास १ वर्षांत सेकंड हॅन्ड म्हणून विकून टाकावीत किंवा कुणाला दान करावीत.
पर्यटनाचे सुद्धा असेच आहे. प्लॅनिंग व्यवस्थित करावे, आपल्याला जे अनुभव पाहिजेत त्याला प्राधान्य द्यावे आणि बहुतेक वेळा उगाच टूर सोबत जाण्याऐवजी आपण स्वतः गेलात तर स्वस्त पडते. माझ्या साठी नाईट लाईफ, रस्ते आणि अन्न ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे मी त्या दृष्टीने प्लॅनिंग करते. आजपर्यंत कधीही टूर घेतला नाही.
पर्यटन, डिनर, चित्रपट ह्यांना एकवेळचे प्रॉजेक्त्त म्हणून पाहण्याच्या ऐवजी एक रेगुलर प्रोजेक्त म्हणून पाहा. २०३० साली मी युरोप टूर करणार आणि त्यासाठी हि RD केली आहे असा विचार करावा. २०३० मध्ये युरोप टूर ची किंमत साधारण ५ लाख रुपये येईल तर तुम्हाला दर दिवशी १५० रुपये बचत करणे आवश्यक आहे. इथे मी गुंतवणुकीवर परतावा हा विचार केला नाही. आपले सध्याचे इन्कम, ते कसे वाढेल हे सर्व विचार करून हि टूर परवडेल कि नाही हा विचार करावा.
त्यासाठी आधीच यौटूंब वरून रिसर्च करावा त्यामुळे २०३० तुमच्याकडे बरीच माहिती असेल आणि तुम्ही खूप पैसे वाचवू शकालाच पण नक्की काय पाहायला हवे आहे हे सुद्दा तुम्हाला ठाऊक असेल. हाच नियम सर्व प्रवासाला लागू करावा.
ह्याच्या अगदी उलट सुद्धा करता येते. फक्त पैश्यांचे टार्गेट ठेवावे. आणि मग एक दिवस अचानक गाडी घेऊन कुठेही जावे आणि अनपेक्षित पणे सर्व अनुभव घ्यावेत. पण अश्या अनुभवांना अनुभवण्यासाठी काही सामान्य ज्ञान (सुरक्षिततेच्या दृष्टीने) घेणे गरजेचे आहे. माझा एक वर्गमित्र असाच एक दिवस कुठे ट्रेक साठी एकटाच गेला आणि ८ वर्षांनी त्याचा सापळा कुणाला तरी सापडला. रिस्क घ्यावी पण मूर्ख पणाने नको. पर्यटनात सुद्धा आपले वय वाढते तशी आपली शारीरिक क्षमता कमी होत जाते हे लक्षांत असू द्या. एवरेस्ट बेसकैम्प जायचे असेल तर शक्य असेल तेंव्हा लवकर जा. लंडन आपण कधीही जाऊन पाहू शकतो.
- वस्तूवरील खर्च - टीव्ही घेणे, कपडे घेणे.
हा सर्वांत चुकीचा खर्च. अर्थांत टीव्ही किंवा कपडे घेणे आवश्यक आहेच पण इथे तारतम्य दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. महिला वर्गाला वस्त्र आणि दागिने प्रिय असतात. आपण एखादा कापड घेतला कि त्याची किमंत दुसऱ्या दिवशी शून्य आहे. पण दागिने तसे नसतात, ह्यांना किंमत असते. पण अनेक महिला घेतलेले दागिने विकत नाहीत. माझ्या मते दागिने भरमसाठ किमतीचे न घेता छोटे सटल प्रकारचे घ्यावेत आणि काही वर्षांनी विकून दुसरे घ्यावेत. ह्यातून दागिने प्रकाराबद्दल आपले ज्ञान वाढत जाते. पेहेरावांत व्हरायटी येते आणि उगाच दागिन्यात आपले मन अडकून राहत नाही. दागिने लॉकर मध्ये कुजत ठेवण्यात अर्थ नाही. वर्षाला किमान १०-१५ वेळा तरी घालायला मिळावेत, प्रवासांत न्यायला मिळावेत असे घ्यावेत.
वस्तूवरील खर्च माझ्या मते नेहमी "बाय वन्स अँड फोरगेट" प्रकारचा करण्यावर भर द्यावा. हाईक साठी ८००० रुपयांचे वूडलॅंड चे भारी बूट घेतले होते शेकडो मैल चालून ७ वर्षे झाली तरी आहे तसेच आहेत. सन ग्लासेस मध्ये रॅन्डॉल्फ आणि अमेरिकन ऑप्टिकल चे ग्लासेस मी ५ वर्षांपूर्वी घेतले होते. मी मेल्यानंतर सुद्धा कुणी तरी वापरू शकेल असली प्रकरणे आहेत. त्याशिवाय ह्या वस्तू दशको दशके वापरण्याची एक स्टाईल आहे ती वेगळी. काही सेलेब्रिटी मंडळी हातांत जुनाट घड्याळ अभिमानाने घालतात आणि सांगतात कि माझ्या आजोबानी द्वितीय युद्धांत घातलेले हे घड्याळ आहे. ह्यांत शान आहे आणि पैश्यांची बचत सुद्धा आहे. टीव्ही, संगणक, फोन वगैरे गोष्टी दर वर्षी बदलण्यासाठी न घेता किमान ५ वर्षे वापरली जातील अशीच घ्यावी.
घरांत शो पीस वगैरे कधीही महागडे घेऊ नयेत. परिवारातील लहान मुलांनी काढलेली चित्रे. आजीने शिवलेली गोधडी. स्वतः काढलेली चित्रे लावावीत. हि बेढब वाटली तरी त्यातून घराचे जे सौंदर्य वाढते ते पैश्यांनी वाढवले जाऊ शकत नाही.
अनेक खर्च हे शेवटी रिकरिंग असतात, सौंदर्य प्रसाधने, अन्न, औषधें, दररोज चे कपडे इत्यादी. इथे अनेक लोक चूक करतात कि गरज पडेल तेंव्हा पाहिजे त्याच वस्तू घेतात. असे करून नये. ग्रोसरी रन महिन्याला १-२दाच करावी आणि बक्कळ सामान घरी आणून ठेवावे. तांदळाचे अक्खे पोते. घी चे ४ डबे, कोलगेटच्या ६ ट्यूब्स म्हणजे आपल्या कुटुबांची साईझ पाहून ह्या गोष्टी घ्याव्यात. होलसेल मध्ये आणि ठराविक ठिकाणीच घेतले तर स्वस्त पडते. त्याशिवाय भरपूर गोष्टी घेतल्या कि आपण इतरानावश्यक गोष्टी घेण्याच्या नादांत पडत नाहीत.
कपड्याच्या बाबतीत आपले २-३ ब्रॅण्ड्स ठरवून तेच घ्यावेत. त्यांच्या ऑनलाईन सर्व्हिस ला सबस्क्राईब करावे म्हणजे तुम्हाला कुपोन्स वगैरे येतील ती वापरावीत. सर्वसाधारण कपडे एकदम ६-७ घेऊन ठेवावेत.
अनेक लोक वाट्टेल तेंव्हा जीन्स घेतात आणि तिला मग ३-४ वर्षे झिजवतात. वर्षाला भले २-३ जीन्स घ्या पण एक ठराविक प्रकारची घ्या म्हणजे लेवाईस ५०१ स्किन फिट वगैरे. ह्यातून पैसे वाचतात करत वर्षाला ठराविक वेळा ह्यांचा सेल येतो. ह्यांचे डिसाईन आणि दर्जा कालजयी आहे.
खर्चाच्या ह्या कक्षेत एक गोष्ट टाळायची असते ती म्हणजे इम्पल्सिव्ह होऊन काहीही घ्यायचे नाही. नवीन फोन, कुल घड्याळ, काहीही नको. घ्यायचे असेल तर किमान १ आठवडा नाहीतर एक महिना थाम्बावे. त्याशिवाय आपल्याला पाहिजे ती गोष्टच घेऊन मॉल मधून बाहेर पडावे. आणखीन काही आवडले तर मग "पुढच्या रविवारी घेऊ" असा विचार करून घरी यावे.
आणि घरात वापरात नसलेल्या ज्या गोष्टी असतील त्या ताबतोब विकून काढाव्यात. व्यायामाची साधने, जुने फोन, बूट्स पुस्तके, स्वेटर, इत्यादी नाहीतर घरी कामाला येणाऱ्या लोकांना दान म्हणून द्यावे.
महागड्या गोष्टी लायकी पाहूनच घ्याव्यात. महागडी गोष्टी घेऊन त्यावर चिंता करत बसणे ह्या पेक्षा दळिद्री मानसिकता नाही. लोन काढून आयफोन घेतात आणि त्याला मोठे चिलखत वगैरे घालतात आणि नाजूक पणे वापरतात. मग तो हरवेल किंवा मॉडेल म्हणून प्रचंड भीती सतत मनात घेऊन वावरतात. गाडी घेतली कि आठवड्याला दहा वेळा घासून चालक्ति करतील मग कुठला रास्ता खराब किंवा कुठे तरी पार्किंग मध्ये कुणी लावेल म्हणून रिक्षाने फिरतात. ह्याला अर्थ नाही. अशी भीती वाटत असेल तर स्वस्त माल घ्यावा. जास्त खर्च करून त्या वस्तूवर चिंता करणे निरर्थक आहे.
लायेबिलिटी वाढवणारे खर्च
हे खर्च थोडे विचित्र आहेत. कारण इथे पैश्यांच्या दृष्टीने नुकसान होत असले तरी एकूण आयुष्य जगण्याच्या बाबतीत ह्यांचा फार परिणाम होतो. मुले नसल्याने तुमच्याकडे खूप जास्त पैसे असतील पण त्या ओघाने येणारे इतर अनुभव नसतील. त्यामुळे इथे फक्त आर्थिक समीकरण जुळून चालत नाही, भावनिक सुद्धा पाहिजे त्याच प्रमाणे फक्त भावनिक होऊन चालत नाही थोडे तारतम्य सुद्धा पाहिजे.
घर हि एक अशी गोष्ट आहे. है घरात तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी ते महत्वाचे आहे. कदाचित संपुन आयुष्यांत तुम्ही ते कधीही विकणार नाहीत त्यामुळे तुमच्या दृष्टिकोनातून त्याची गुंतवणूक म्हणून किंमत शून्य सुद्धा असू शकते.
माझ्या मते अश्या गोष्टी घेताना फक्त घर, जोडीदार, गाडी ह्यांच्याकडे न पाहता त्यांचा लाईफटाईम व्हॅल्यू काय आहे हे पाहावे. कधी कधी ४ बेडरूम चा मोठा फ्लॅट घेण्याऐवजी २ बेडरूम चे आजूबाजूचे फ्लॅट घेणे फायदेशीर ठरू शकते कारण तो भांड्याला दिला जाऊ शकतो किंवा आईवडिलांना तिथे राहायला दिले जाऊ शकते. माझ्या मते एकत्र कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असली तरी दोन पिढ्यानी जवळपास पण वेगळे राहणे माझ्या मते चांगले आणि प्रॅक्टिकल आहे.
अनेक लोक घर आणि गाडी घेताना इतर लोकांना इम्प्रेस करण्यासाठी घेतात. ह्याच्या पेक्षा चुकीची गोष्ट दुसरी नाही.
घर, गाडी, सोफा, खाट, गाडी, फरशी, बाथरूम, नळ, किचन काउंटर ह्या गोष्टीकडे लोक जास्त लक्ष देत नाहीत पण तुम्ही आधी हे गणित केले पाहिजे कि दिवसाला किती तास आपण ह्यांच्या सानिध्यांत खर्च करतो. आपण साधारण ८ तास गादीवर झोपतो त्यामुळे गाडी आणि बेड घेताना खूप विचार करावा. आपण गरोदर होणार असाल तर त्याची उंची वगैरे व्यवस्थित आहे ना हे पाहून घ्यावे. कधी कधी तुम्हाला बेड वर बसून पुस्तक वाचायची हौस असेल तर त्याचा हेडबोर्ड कसा आहे हे पाहावे. त्याच न्यायाने गाडी, गाडीचे सीट पाहावे. नाहीतर काही लोक बेड आणि गाडी इथे काही हजार रुपये वाचवण्यासाठी तडजोड करतात आणि उतारवयात मग लक्षावधी रुपयांच्या कंबरदुखीने किंवा निद्रानाशाने त्रस्त होतात. भांडी घेताना नेहमी उच्च दर्जाची घ्यावी जी १०-१२ वर्षे टिकतील. कास्ट लोखंडाचे तवे ऑम्लेट करण्यासाठी छान असतात. हे शेकडो वर्षे टिकू शकतात.
घर घेतल्याशिवाय माणूस सेटल झाला नाही अशी समजूत भारतीयांची आहे त्यामुळे कुठल्या तरी इमारतीत तो काँक्रीट चा ठोकला मिळवण्यासाठी जीवापाड मेहनत केली जाते आणि त्यांत गैर काहीच नाही. पण शक्य असेल तर घरांत अश्या गोष्टीवर खर्च करावा ज्यामुळे घराचे मूल्यवर्धन होईल. उदाहरणार्थ चांगला दरवाजा, व्यवस्थित ग्रील केलेली गॅलरी, उच्च दर्जाचे किचन काऊंटर्स इत्यादी. ह्या उलट फर्निचर वगैरे सर्व काही डेप्रिशिएटिंग असेट असल्याने उगाच इम्प्रेस करण्यासाठी काहीही घेऊ नका.
घर घेताना हे मी ३० वर्षांनी विकणार अश्या मानसिकतेने घ्या. तुम्ही सध्या ३० वर्षांचे असाल तर आपली मुले आपली काळजी घेतील हा हव्यास आणि स्वार्थ सोडून द्या. निवृत्त झाल्यानंतर स्वस्त पण चांगल्या दर्जाचे जीवनमान असलेल्या शहरांत किंवा वृद्धाश्रमात जाण्याची तयारी ठेवावी आणि घर हे त्यासाठी गुंतवणूक म्हणून घ्यावे. नाहीतर हे घर विकून मुलांच्या जवळ दुसरा फ्लॅट घेण्याची तयारी करून ठेवावी.
गुंतवणुकीचे खर्च
बचत वेगळी आणि गुंतवणूक म्हणून खर्च केलेली गोष्ट वेगळी. शिक्षणावर केलेला खर्च हा अनेक वेळा गुंतवणूक म्हणून पहिला जाऊ शकतो पण शिक्षण त्या पात्रतेचे असेल तरच. उगाच BSE BCOM ह्यावर भरमसाठ पैसे खर्च करू नका. साधारण कॉलेजांत प्रवेश घेतला तरी चालेल, क्लास ला दांड्या मारलाय तरी चालतील पण शिकवणीवर भर द्या. इंग्रजी भाषा ह्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी पैसे खर्च करा. ड्रायविंग, मोटार सायकल इत्यादी लवकर शिकून घ्या. डिग्री पेक्षा स्ट्रीट स्मार्ट बनवणारे शिक्षण चांगला परतावा देते. प्रचंड चतुर असलेल्या मुली दादरच्या गर्दींत ट्रेन मध्ये घुसायला घाबरतात. हे बरोबर नाही. स्ट्रीट स्मार्टनेस लवकारांत लवकर आत्मसात करावे.
सगळ्यांत महत्वाची गुंतवणूक म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य. २५ वर्षे झाली कि दार वर्षी ब्लड चेकअप केलाच पाहिजे. लिव्हर, साखर इत्यादी सर्व पाहून वजन नियंत्रणात आणलेच पाहिजे. ह्यावर काही हजार रुपये वर्षाला खर्च होतील किंवा २ तास दिवसाला खर्च झाले तरी हरकत नाही. जिम पाहिजेच असे नाही, टेनिस, पोहणे, बॅडमिंटन सुद्धा चालेल. ह्यातून आपले सोशल सर्कल सुद्धा वाढते. मधुमेहासारखा एक रोग म्हणजे किमान १०-१५ लाखांचे नुकसान आणि किमान १० वर्षे आयुष्य कमी.
मानसिक आरोग्यासाठी "घनिष्ट मैत्रिणी/मित्र" महत्वाचे. हि सुद्धा एक गुंतवणूकच आहे त्यामुळे कुना जवळच्या मैत्रिणीचे काही पैसे उधार मागितले म्हणून नाक मोडू नका. मी विद्यार्थी असताना माझ्याकडे विशेष पैसे नव्हते. एकदा मला ५० हजार रुपयांची गरज पडली. मी माझ्या एका श्रीमंत मैत्रिणीकडे उधार मागितले मला ७ दिवसांत परत देण्याची क्षमता होती. पण त्या ७ दिवसांसाठी सुद्धा ती मला पैसे द्यायला घाबरली. व्यसने मित्रपरीक्षा !
जुगार, दारू सिगारेट इत्यादी व्यसने असली तरी प्रमाणात केली असता मित्र परिवार वाढतो. पण व्यसने करायलाच पाहिजे असेहि नाही. तारतम्य ठेवावे.
आपल्या व्यवसायाला ज्या गोष्टींची गरज आहे, लॅपटॉप असो किंवा ड्रिलिंग मशीन. तिथे तडजोड करू नये. चांगली गुणतंवणूक करावी.
त्यामुळे काही प्रकारचे खर्च हे वरून खर्च वाटले तरी प्रत्यक्षात खूप मोठा परतवा देणारी गुणतंवणूक असू शकते.
अनपेक्षित खर्च
प्रत्येकाच्या आयुष्यांत अनपेक्षित गोष्टी घडतील त्यामुळे त्यासाठी खर्च केलाच पाहिजे. आपले आणि प्रियजनांचे आरोग्य, घर गाडी ह्यांच्या रिपेर साठी खर्च, कुना मित्राला मदत वगरीए गोष्टीवर आपला खर्च होईल आणि त्यासाठी वर्षाला किती बजेट लागेल ह्यावर विचार करून ठेवावा. एक इमरजेंसी फंड ठेवावा आणि ह्या फंड ला इतर कुणी ऍक्सेस करू शकेल अशी व्यवस्था करावी. (तुम्हाला अपघात झाला तरी इतर कुणी तरी ते पैसे काढू शकेल ह्या साठी).
विमा महत्वाचा आहे पण उगाच गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नये. आपला जोडीदार नोकरी करत असेल तर त्याला पैश्यांची गरज आहे असे नाही. किंवा विम्याच्या पैशायंवरच त्याने जगायला पाहिजे असे नाही. साधारण होम लोन वगैरेची परतफेड होईल इतकाच विमा घेऊन ठेवावा.
धर्मादायी खर्च.
देवाने आपल्याला चांगले हातपाय दिले, बुद्धी दिली आणि लक्ष्मीने आपल्यावर कृपा केली आहे. दोन वेळचे जेवण ताटात असणे आणि घरी कोणी वाट बघत असणे हि फार चांगली गोष्ट आहे त्यामुळे त्यासाठी आपण आभारी असले पाहिजे. आणि आपल्यापेक्षा जे कमी नशीबवान आहेत त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे दर वर्षी काही पैसे धर्मादायी गोष्टींवर खर्च करावे. सरकारी नियंत्रणात असलेली मंदिरे आणि सरकारी फंड ह्यांना मी शक्यतो टाळते. आपली जात, धर्म, प्रांत ह्यांच्याशी निगडित ज्या छोट्या संघटना आहेत किंवा थेट गरजू लोकांना मी मदत करते.
त्याशिवाय आपल्या आजूबाजूला असणारे गरीब लोक (पण प्रामाणिक) त्यांना सुद्धा मदत करावी. मदत करताना दान हे सत्पात्री असले पाहिजे आणि गुप्त ठेवले पाहिजे.
शेवटी :
शेवटी पैसे हे जाणारच आहेत. तुम्ही काही वर घेऊन जाणार नाहीत त्यामुळे आपले मानसिक समाधान आणि आपल्या परिवाराचे मानसिक समाधान ह्याला नेहमीच प्राधान्य द्या. जोडीदाराच्या हातून काही मोडले किंवा मुलाने काही हरवले म्हणून त्याच्यावर ओरडू नका विनाकारण भांडणं करू नका. शेवटी हि गोष्ट "कृष्णार्पणमस्तु" झाली असे समजावे आणि कामाला लागावे. १० वर्षांनी तुम्ही ह्या घटनेचा विचार कराल तेंव्हा ती चिंता किती निरर्थक होती हे लक्षांत येईल. त्यामुळे वस्तूंत गुंतू नका, पाहिजे तर माणसांत गुंता.
मस्त लेख