Skip to main content

कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 07/12/2020 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयाचे आधीचे संदर्भ : १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज ३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य ४. पूरक विषय: पल्स ऑक्सीमीटरचे गमभन मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! ……………………………………….. करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा : डिसेंबर 2019 : चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते. * 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली. जानेवारी 2020 : * या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला. * हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले. * WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. फेब्रुवारी : बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू. मार्च : * 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर. * HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू. * संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर. * भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद. एप्रिल-मे : * Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता. * रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच. * अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली जुलै : हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन. ऑगस्ट : बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता. सप्टेंबर : जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला. ऑक्टोबर : * Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला). • भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला. नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता. डिसेंबर २०२० : • काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंडने ८ डिसेंबरला लसीकरण सुरु केले. • आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित. ............... ok समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे ! लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा. एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा ! .............................................................................

वाचने 83921
प्रतिक्रिया 183

प्रतिक्रिया

कोविड, बाळंतपण आणि फुप्फुसरोपण : अमेरिकेतील अभूतपूर्व घटना 31 वर्षांची एक तरुणी. गरोदरपणाचे 36 आठवडे पूर्ण झालेले. अचानक तिला खोकला व दम लागतो. रुग्णालयात दाखल. एक आठवड्यात डॉक्टर तिचे बाळंतपण घडवून आणतात. बाळ झाल्यावर या तरुणीला न्यूमोनिया होतो - अगदी गंभीर. व्हेंटिलेटर, ECMO वर देखील ठेवावे लागले. फुफ्फुसात बिलकुल सुधारणा नाही; दोन्ही अगदी निकामी झालेली. सुदैवाने १० दिवसांत फुफ्फुसदाता मिळाला. मग दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले. आता तब्येत उत्तम. रुग्णास शुभेच्छा आणि डॉक्टरांच्या चमूचे अभिनंदन !

वरील तरुणीचे कोविडचे निदान झालेले होते.

विशेष घटना . ..................... करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evasion) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे. डब्ल्यूएचओने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीचा हा संक्षेपित तक्ता : ok या संदर्भात भारतीय लसींच्या बाबतीतले सरकारचे निवेदन इथे

गेल्या दोन वर्षात वैद्यकीय कारणांसाठी पीपीइ संच, एन 95 मास्क इत्यादींच्या भरपूर वापरामुळे वैद्यकीय प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती खूप झालीय. त्याची योग्य विल्हेवाट ही पण एक मोठी समस्या आहे. पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेने या कचऱ्याचे विघटन आणि पुनर्वापर यादृष्टीने एक चांगले तंत्रज्ञान शोधले आहे. बातमी इथे अभिनंदन !

In reply to by हेमंतकुमार

" प्लास्टिकचे विघटन आणि मास्कचा पुनर्वापर " ही बातमी नक्कीच आशादायक आहे. अश्या आश्वासक बातम्या बर्‍याच वेळा वाचण्यात येतात, पण त्याची अंमलबजावणी फारच कमी वेळा झालेली दिसते. मागच्या शासनाच्या कार्यकाळात प्लास्टीकवर तडकाफडकी बंदी घालण्यात आली ज्याचा जनतेने धसका घेतला. नियम करून ४९-५० मायक्रॉन वाढवून ५१+ मायक्रॉन जाडीचे प्लास्टिक वापरात आले. पण प्लास्टिकचा कचरा थांबायचे नाव घेत नाही. नक्की किती प्लास्टिक कचरा पुनर्वापरात येतो हे पर्यावरण विभाग जनतेला विश्वासात घेऊन सांगत नाही जो पर्यंत यावर पर्यावरण विभाग आणि यंत्रणा जनतेच्या पातळीवर उतरून गंभीरतेने काम करत नाही, तो पर्यंत अश्या बातम्या फक्त "आशादायक" म्हणूनच वाचायच्या.

अगदी सहमत, चौ को.

श्रीरंग जोशी यांनी खरडफळ्यावर टाकलेली लिंक 👉 CDC Says You No Longer Need to Do These Things After Vaccination. इथे कदाचित जास्त चांगला उहापोह होऊ शकेल या हेतूने चिकटवतोय.

लस तयार करताना तिच्यामध्ये संबंधित विषाणूची रोगकारक प्रथिने अंतर्भूत केलेली असतात.ती शरीरात टोचल्यानंतर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात आणि T पेशी देखील निर्माण होतात. जर अशा व्यक्तीला भविष्यात विषाणूचा नैसर्गिक संसर्ग झाला, तर आता या अँटीबॉडीज त्या विषाणूला ओळखतात आणि त्याच्या प्रथिनावावर हल्ला चढवून त्याला निष्प्रभ करतात.

In reply to by हेमंतकुमार

माझी अशी समजूत होती की या अँटीबॉडीज विषाणूच्या त्या प्रथिनांना ओळखतात व त्या प्रथिनांवर हल्ला चढवतात. त्यामुळे तो विषाणू आपोआपच निष्प्रभ होतो. त्यामुळे मला असे वाटत होते की, शेवटपर्यंत त्या अँटीबॉडीजना तो विषाणू ओळखता येत नसावा.

अँटीबॉडीज विषाणूला ओळखतात व चिकटतात (tag) ...>> पांढऱ्या पेशींना संदेश जातो >> या पेशी वरील संयुगाला गिळून टाकतात. थोडक्यात ही प्रक्रिया अँटीबॉडीज व पेशी अशी सहकार्याची आहे. यात गुंतागुंतीचे बारकावे बरेच आहेत पण इथे एवढेच पुरे.

In reply to by हेमंतकुमार

धन्यवाद. 🙏

१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत. २. प्रेमास बायोटेकने तर तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत. वरील दोन्ही लसी अमेरिकी कंपन्यांच्या सहयोगाने तयार होत आहेत. https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/vaccine-updates/story/in…

In reply to by हेमंतकुमार

लस बनविण्याच्या उद्योगात भारत महाशक्ती बनतीय असं वाटतंय. तंत्रज्ञान व पैसाही येतोय. कमी खर्चात व कमी वेळात उत्पादन करण्याची क्षमता आपण खूप पूर्वीच मिळवलीय. शिवाय भारताबद्दल विश्वासही वाटायला लागला आहे. . . म्हणजे मला असं वाटायला लागलंय.

हल्ली सगळीकडे फक्त लसीकरणाबाबत नवीन अपडेट येत आहेत, covid झाल्यावर त्यावर उपाय म्हणून वापरण्याबाबत कुठल्या औषधांचे प्रयोग चालू आहेत का ?

राहुल, होय उपचारांवरही संशोधन अर्थातच चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी म्हणजे १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला तातडीच्या वापराची परवानगी दिली. या व्यतिरिक्त खालील औषधे बऱ्यापैकी उपयुक्त आहेत असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे : dexamethasone, baricitinib, remdesivir. हेही संशोधन बराच काळ चालूच राहणार आहे.

राहुल, बरोबर. ते औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील. …..

करोना संबंधीत असल्यामुळे, अन्य धाग्यावर आलेली ही लिंक आणि त्यावरचा माझा प्रतिसाद इथे कॉपी करत आहे. https://www.loksatta.com/maharashtra-news/1000-deaths-a-day-in-next-2-w… हे जर संख्या शास्त्रावर आधारीत अंदाज असतील तर असे मथळे देणे आणि लोकांच्यात घबराट पसरवणे सर्वथा चुक. मग जेंव्हा रुग्णसंख्या कमी होत होती तेंव्हा अमुक अमुक दिवसांनी रुग्णसंख्या शुन्य होइल असा का नाही अंदाज वर्तवला . दुसरे , लोकांनाच सतत दोष का ? पुर्ण टाळेबंदी असतानाही रुग्णसंख्या वाढतच होती ना ? तेंव्हा काय कारणीभुत होते ?

“एका कंपनीच्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर काही काळाने त्याचा साठा संपलेला असेल तर दुसऱ्या डोसचे काय करायचे ?”
हा प्रश्न काही परिचितांनी विचारला आहे. या संदर्भातील काही रोचक संशोधन वाचनात आले. भारतात जसा हा प्रश्न काही ठिकाणी उद्भवला तसाच तो प्रगत देशातही उद्भवलेला आहे. मग अशा वेळेस दुसऱ्या डोसचे काय करायचे हा प्रश्न पडतो. यासंदर्भात अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठातील डॉ. Ross Kedl या तज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मते योग्य अंतराने दुसऱ्या कंपनीचा डोस जर दिला तर प्रतिकारशक्तीच्या दृष्टीने उलट अधिकच फायदा होऊ शकतो ! या अनुषंगाने सध्या असे दोन अभ्यास चालू आहेत : १. यु. के.मध्ये AZ(पहिला डोस) + Pfizer (दुसरा डोस) २. रशियात Sputnik (पहिला डोस) + AZ (दुसरा). वरील अभ्यासाचे निष्कर्ष काही महिन्यांनी समजतील दरम्यान अमेरिकेच्या CDC ने पहिले कडक धोरण शिथिल केले असून ‘अपवादात्मक परिस्थितीत दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा घेतलेला चालेल’, असे म्हटले आहे. .....पुढे चालू ....

वरील संशोधनातील महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या दोन कंपन्यांचे वेगळे डोस द्यावयाचे आहेत त्या दोन्ही लसींचे तंत्रज्ञान वेगळ्या प्रकारचे आहे. या विषाणूचे जनुकीय बदल सतत होत असल्यामुळे कदाचित या प्रकारचा लस-मिश्रणाचा प्रयोग अधिक फायदेशीर ठरेल, असे गृहीतक मांडले गेले आहे.

भारताच्या सामाजिक आरोग्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष के एस रेड्डी यांची अभ्यासपूर्ण मुलाखत येथे आहे: https://www.indiaspend.com/covid-19/mistaken-notion-of-herd-immunity-led... त्यातील ठळक मुद्दे : १.फेब्रुवारीपासून अचानक रूग्ण संख्येत वाढ होण्यामागे लोकांची बेफिकीर वृत्ती, मोठ्या समूहात बिनधास्त वावरणे आणि प्रशासनाची तुलनात्मक ढिलाई ही कारणे आहेत. २. ‘आपल्या भारतीयांना सामूहिक प्रतिकारशक्ती प्राप्त झाली आहे’ हा मोठा गैरसमज पसरवला गेला. ती अजूनही आलेली नाही. या मुद्द्याला ‘निर्वाण’ असे अजिबात समजू नये ! नक्की किती लोकांना संरक्षित केले म्हणजे ती मिळेल, याचा अभ्यास अद्याप अपूर्णच आहे. ३. दरम्यान विषाणूने अनेक जनुकीय बदल केले. तसे बदललेले विषाणू देश-विदेशात पसरले. त्याचबरोबर लोकांचाही परदेश प्रवास तुलनेने वाढला. अर्थात बदललेल्या विषाणूंचा जनुकीय अभ्यास अद्याप चालू आहे. …..पुढे चालू....

In reply to by हेमंतकुमार

हो हर्ड इम्युनिटि इतक्या लवकरच येउच शकत नाही आणि करोना व्हायरस खुपच चाणाक्ष निघाला आहे, आता व्हायरसवर कसा बदलु शकतो आणि त्यावर कोणती औषधे काम करतील याचे ताळेबन्ध शोधायला हवे.गाफिल राहुन चालणार नाही. https://theprint.in/science/why-the-coronavirus-may-not-be-able-to-muta…

In reply to by हेमंतकुमार

.फेब्रुवारीपासून अचानक रूग्ण संख्येत वाढ होण्यामागे लोकांची बेफिकीर वृत्ती, मोठ्या समूहात बिनधास्त वावरणे आणि प्रशासनाची तुलनात्मक ढिलाई ही कारणे आहेत.
जेंव्हा कडकडीत टाळेबंदी होती तेंव्हा का वाढत होती ?

In reply to by मराठी_माणूस

जेंव्हा कडकडीत टाळेबंदी होती तेंव्हा का वाढत होती ?
>> कारण तेव्हा 'पहिली लाट' होती. महासाथीचे स्वरूप सर्वसाधारण असे असते : (3 May 2020 - 9:22 pm | कुमार१ हा प्र पुन्हा डकवतो ): संसर्गजन्य रोगांच्या तद्न्य समितीच्या मते ३ प्रकारच्या परिस्थिती उद्भवू शकतात : १. दोन वर्षांत या आजाराच्या लघुलाटा येऊ शकतात. त्या हळूहळू कमी होणार. २. यंदाचे थंडीचे काळात आतापेक्षाही मोठी लाट येऊ शकते. मग हळूहळू कमी होणार. ३. २ वर्षे संसर्ग सौम्यपणे धुमसत राहील (slow burn). जगभरातील भौगोलिक परिस्थितीनुसार यांत कमी अधिक बदल होऊ शकतात. .... या साथीत अधूनमधून 'लघु/लाटा' येणार आणि त्यासाठी काही तात्कालिक कारणे असणार.

In reply to by मराठी_माणूस

ती सर्वसाधारण तत्वे आहेत. अधूनमधून लाटा येण्यामागे अनेक कारणे एकत्रित घडतात : १. विषाणूचे जनुकीय बदल २. लोकांची बेफिकिरी ३. लसीकरण झाल्यावर बेफिकिरी अजुनच वाढते ..... इ. आता भारतात वरील तिन्ही कारणे एका कालावधीत घडली. कुठल्याही एकाच कारणाने स्पष्टीकरण नाही देता येणार, बाकी संदर्भ दिलेल्या मुलाखतीत सविस्तर आलेले आहे.

In reply to by हेमंतकुमार

एक काल्पनीक परीस्थीति: जर ह्या क्षणी कडकडीत टाळेबंदी केली तर रुग्ण संख्या किती दिवसात शुन्य होइल ?

In reply to by मराठी_माणूस

जर ह्या क्षणी कडकडीत टाळेबंदी केली तर रुग्ण संख्या किती दिवसात शुन्य होइल ?
>>> या प्रश्नाचे उत्तर द्यायला रोगप्रतिबंधक आणि सामाजिक औषधवैद्यक या विषयातील अधिकारी व्यक्तीच पाहिजे. तशा स्वरूपाचा कुठे संदर्भ वाचनात आला तरच मी काही लिहिन धन्यवाद

In reply to by मराठी_माणूस

टाळेबंदीमुळे शुन्यावर संख्या शक्यच नाही. काही ना काही, लोकांमधे करोना राहून जाणारच आहे. आणि पुन्हा संख्या सतत कमी जास्त लाटेप्रमाणे होत राहणारच आहे असे वाटते. लस कितीकाळ करोनास प्रतिबंध करेल, प्रतिबंधाचा कालावधी संपून गेल्यानंतर पुन्हा करोना एके करोना ? प्रतिकार शक्ती निर्माण झाली तरी, करोना त्याचं नवं व्हर्जन थोड्याफार प्रमाणात बदल होऊन येतंच आहे. जो पर्यंत असे व्हॅक्सीन, अशी गोळी, जी घेतल्यावर पुन्हा करोना होणे नोहे, तेव्हाच हे थांबवणे शक्य आहे. करोना टेष्टकीटचं, तपासणी तंत्रज्ञानाचं, नव अद्यावत रुप आवश्यक वाटत आहे. सालं अंग कसकस, तरी करोना. डोकं दुखतंय तरी करोना. सर्दी झाली तरी करोना. कोणतीच लक्षणे नाहीतरी करोना. नेमकं काय सुरु आहे, कळत नाही. किरकोळ इम्युनिटी वाढणा-या गोळ्या दिल्या, काही व्हीटॅमीनच्या गोळ्या दिल्या, किरकोळ उपचार झाले की रुग्ण ठणठणीत. आणि एकदमच कोणीतरी, करोनाने गेल्याची बातमी धडकते, नेमकं काय सुरु आहे, कळायला मार्ग नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जो पर्यंत असे व्हॅक्सीन, अशी गोळी, जी घेतल्यावर पुन्हा करोना होणे नोहे, तेव्हाच हे थांबवणे शक्य आहे.
बरोबर. अजुन असे काहीही सापडले नाही , आधुनिक वैद्दक शास्त्र अजुन चाचपडतच आहे. ते बरेच उघडे पडले आहे. ते लपवण्यासाठी लोकांवर खापर फोडणे चालु आहे.

४. सध्याचा रोगप्रसार भारताच्या पश्‍चिम व दक्षिण भागात जास्त होतोय याची कारणे म्हणजे तिथले अधिक शहरीकरण व औद्योगिकरण, लोकसंख्येची दाट घनता असलेली शहरे आणि लोकांचा राज्यांतर्गत व आंतरराज्य भरपूर प्रवास. ५. साथ नियंत्रणात आणण्याचा लसीकरण हा एकमेव उपाय अजिबात नाही. त्याच्या जोडीला त्रिसूत्री आणि शिस्त दीर्घकाळ हवी. इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. वरील मुलाखतीदरम्यान श्री. रेड्डी यांनी क्रिकेटची उपमा देऊन छान समजावले आहे. ते म्हणतात, “कोविडशी सामना करताना आपण भारतीय टी-ट्वेंटी सामन्याप्रमाणे वागून मोकळे झालेलो आहोत ! ते बिलकुल चूक आहे. जसे कसोटीमध्ये चिवटपणे मैदानावर टिकून राहायचे असते तसा लढा आपल्याला द्यायचा आहे. हा एक मोठा दीर्घकालीन कसोटी सामनाच आहे".

लोकांचा कोणावर च विश्वास राहिलेला नाही. संशोधक लोकांत टोकाचे मतभेद असणारा covid19 हा एकमेव साथीचा आजार आहे.. बचाव कसा करावा,टेस्ट कोणती खरी,लस नक्की उपयोगी आहे का जागतिक संशोधक परस्पर विरोधी मत व्यक्त करत आहेत आणि साथीच्या रोगात एवढे मतभेद असणारा हा एकमेव रोग आहे. Corona आहे हे ठरण्यासाठी हीच pcr टेस्ट करा. Corona वर ह्याच औषधांनी उपचार करा.. Corona च बचाव ह्याच पद्धतीने करा.. ही जबरदस्ती म्हणजे बकवास आणि एकाधिकार शाही आहे. प्रतेक dr ल त्यांच्या मर्जी नी उपचार करू ध्या. CORONA टेस्ट कशी करावी हे dr ना ठरवू ध्या.. प्रतेक dr aani संशोधक ह्यांना त्यांच्या बुध्दी नी वागू ध्या... बघा किती तरी नवीन उपचार,नवीन टेस्ट उपलब्ध होतील. Pcr टेस्ट प्रती व्यक्ती 1000 रुपये ..भरतात 23 कोटी टेस्ट झाल्यात जगात 100 कोटी झाल्या असतील . 100 कोटी ल 1000 नी multify करा मोजक्याच 7 ते 8 कंपन्या ज्या pcr मशीन बनवतात त्यांनी किती कोटी कमवले.. सर्व कंपन्या चीन आणि अमेरिकेतील आहेत Corona चे अर्थकारण ह्या वर चर्चा होणे गरजेचे आहे.

एखाद्याला कोविड झाल्यानंतर त्याच्या शरीरात जी प्रतिकारशक्ती निर्माण होते (म्हणजे अँटीबॉडीज आणि T पेशी) ती किती काळपर्यंत टिकेल, हा सध्याचा महत्त्वाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. जसजसे अधिक रुग्णांचे बरे झाल्यानंतर निरीक्षण होईल तसे त्याचे वाढते उत्तर मिळत जाईल. सध्याच्या अभ्यासानुसार या प्रतिकारशक्तीमध्ये बरीच व्यक्तिसापेक्षता दिसून येत आहे. ही शक्ती मोजताना अँटीबॉडीजचा अभ्यास तुलनेने सोपा असतो आणि त्याचे निष्कर्ष लवकर मिळतात. म्हणून बहुतेक वेळा तोच केला जातो. विविध रुग्णांचे बरे झाल्यानंतर निरीक्षण केले असता, आजाराच्या संसर्ग दिनापासून किती काळ अँटीबॉडीज टिकतात याचे उत्तर चाळीस दिवस ते सुमारे सात महिने इथपर्यंत वेगवेगळे मिळते. आता या मुद्द्याचा भविष्यकालीन अंदाज करायचा असल्यास काही संख्याशास्त्रीय प्रारूपे मदतीला येतात. असाच एक अल्गोरिदम वैज्ञानिकांनी अलीकडे बनविला आहे. त्यामध्ये चाळीस दिवस ते अनेक दशके इथपर्यंत व्याप्ती ठेवलेली असते. विविध रुग्णांची माहिती त्यात हळूहळू साठवली जाते. कालांतराने आपल्याला यावरून दीर्घ भविष्यकालीन सामाजिक अंदाज घेता येतो. या ज्ञानाचा उपयोग लसीकरणाच्या संदर्भातही पुढे होणार आहे. म्हणजे, सध्या दिलेले एखाद्या लसीचे दोन डोस हे किती काळ पुरतील, कालांतराने बलवर्धक डोस लागेल किंवा नाही, अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे प्रारूप उपयुक्त ठरेल.

लसीकरणास गेलेला जर लक्षण नसलेला बाधीत असेल तर काय होइल ?
>>> इथे ‘बाधित’ शब्दाचा अर्थ स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. १. समजा, एखाद्यास आज लक्षणे नाहीत पण जर रोगनिदान चाचणी पॉझिटिव्ह आली आणि म्हणून तो बाधित ठरवला असेल तर, प्रत्यक्ष आजार झालेला असता लसीकरण करत नाहीत. २. एखाद्याच्या शरीरात आज विषाणू शिरला आहे (निव्वळ संसर्ग), तर पुढे त्याला आजार होईलच असे नाही. त्यामुळे अशा व्यक्तीवर लसीकरणाचा काही दुष्परिणाम व्हायचे कारण नाही.

In reply to by मराठी_माणूस

इन्फेक्शन सिद्ध होण्यासाठी एक तर लक्षणे तरी पाहिजेत, किंवा महत्त्वाची चाचणी तरी सकारात्मक अहवाल देणारी पाहिजे. यापैकी काहीच नसल्यास संबंधित व्यक्ती तथाकथित 'निरोगी'च समजली जाईल. मुळात असे काही मुद्दामून प्रयोग केल्याचा कुठेही संदर्भ किंवा विदा नाही. त्यामुळे आता या मुद्द्यावर थांबतो. या धाग्यावरील चर्चाही थांबवावी ही विनंती. नवीन धागा काढलेला आहे